Wednesday, 26 September 2012

शशिकांत पवारांची यशस्वी डाळिंब शेती

कळस (इंदापूर, पुणे) येथील शशिकांत पवार यांनी सेंद्रिय पद्धतीने नियोजन करून आपली डाळिंब शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. किडी-रोगांवर नियंत्रण व मालाची गुणवत्ता टिकविण्याच्या दृष्टीने डाळिंबाची शाश्‍वत सेंद्रिय शेती अधिकाधिक प्रभावी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
संतोष डुकरे

शशिकांत पवार यांची कळस परिसरात सुमारे पावणेसहा ते साडेपाच एकर डाळिंब बाग आहे. याच कळस परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा तेलकट डाग व मर रोगांमुळे अखेरच्या घटका मोजत असताना पवार यांनी आपली बाग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार पूर्वी घरचे दोन ट्रक व मालवाहतूक व्यवसाय सांभाळत होते. कुटुंबाची सुमारे 22 एकर कोरडवाहू शेती मुख्यतः वडील पाहत होते. त्यांचे निधन झाल्यावर शेतीची धुरा शशिकांत यांच्या खांद्यावर आली. सन 2008-09 च्या काळात पवार पूर्णवेळ शेतकरी झाले.

डाळिंब शेतीचा श्रीगणेशा
पहिल्या वर्षी सुमारे साडेपाच एकर डोंगराळ क्षेत्रावर डाळिंबाच्या भगवा वाणाची 1600 रोपे दोन टप्प्यांत 15 x 10 फूट अंतरावर लागवड केली. खड्डे न घेता ट्रॅक्‍टरने खोल सरी काढून त्यात रोपे लावली. त्यास ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक झाडाला प्रति तास चार लिटर क्षमतेचे दोन ड्रीपर बसवले. मेपर्यंत दररोज एक तास व जून ते ऑगस्टपर्यंत दररोज अर्धा तास असे पाणी नियोजन केले.

जानेवारी 2011 ला सेंद्रिय पद्धतीने पहिला बहर धरला. बाहेरून सेंद्रिय खते, कीडनाशके विकत घेऊन वापरली. त्या वेळी फळ पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. सुमारे पाच टन उत्पादन झाले. त्यातील अडीच टन खराब वा विक्रीयोग्य राहिले नाही. त्यासाठी खर्च 75 हजार रुपये होऊन उत्पन्न हाती आले अवघे 25 हजार रुपये. पुढे आगाप हस्त बहर घेतला. सुमारे 25 ते 30 टक्के रासायनिक व 60 ते 70 टक्के सेंद्रिय अशी पद्धत वापरली. मात्र या हंगामात बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. सप्टेंबरमध्ये पावसाचे नियोजनही बिघडले. अवघी 25 टक्‍के फळधारणा झाली. त्यावर पुन्हा तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला. शेवटी 50 हजार रुपये खर्च करून संपूर्ण बहर सोडून देण्याची वेळ आली.

ऍग्रोवन, विश्‍वासराव पाटलांनी दाखवली वाट
सलग दोन बहर तोट्यात जाऊन बाग हातची चालल्याने पवार संकटात सापडले. अशा वेळी ऍग्रोवनमध्ये लाहोरा (जि. जळगाव) येथील प्रयोगशील सेंद्रिय उत्पादक विश्‍वासराव पाटील यांची सेंद्रिय शेतीची यशोगाथा वाचनात आली. काहीतरी मार्ग निघेल या आशेने त्यांच्याशी संपर्क वाढवला. विश्‍वासरावांनी "तुमची झाडे उपाशी असतील तर त्यांना व्यवस्थित खाऊपिऊ घाला, तर चांगले उत्पादन मिळेल' हा मंत्र दिला. तिसरा बहर धरण्याआधी चार महिने झाडे सशक्त करण्यावर भर दिला. विश्‍वासरावांनी सेंद्रिय शेतीतील जाणकार सुभाष पाळेकर यांची सेंद्रिय शेतीवरील पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. रात्रंदिवस या विषयावर अभ्यास केला.

- जिवामृतावर मुख्य भर
पुढील नियोजन करताना बागेला आंबे बहर धरला. झाडांच्या खोडापाशी उसाचे पाचट, गवत व पालापाचोळ्याचे आच्छादन केले. सुमारे 200 लिटर पाण्यात 10 किलो ताजे शेण, पाच ते दहा लिटर गावरान गाईचे मूत्र, एक ते दीड किलो जुना काळा गूळ, एक ते दोन किलो कडधान्यांचे पीठ, मूठभर झाडांच्या मुळाजवळची माती या क्रमाने घटकांचे मिश्रण करून ते 48 ते 72 तास ठेवून जिवामृत तयार केले. दर आठ दिवसांनी प्रत्येक झाडाला दीड लिटर याप्रमाणे त्याचा वापर केला.

कीड -रोग व्यवस्थापन
फुलकिडे नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, अग्नीअस्त्र व ब्रह्मास्त्र यांचा वापर केला. अग्नीअस्त्र तयार करण्यासाठी गोमूत्र, लिंबाच्या पाल्याचा लगदा, तिखट हिरवी मिरची, गावरान लाल लसूण, तंबाखू यांचे मिश्रण वापरले.

ब्रह्मास्त्र तयार करण्यासाठी गोमूत्र, लिंबाच्या पाल्याचा लगदा, लिंबाची साल व बेल, पांढरा धोतरा, निरगुडी व करंजी या झाडांच्या पानांचा लगदा घेऊन त्याचे मिश्रण तयार केले व ते वापरले.

बहरात पहिली फवारणी 200 लिटर पाण्यात तीन लिटर अग्नीअस्त्र व तीन लिटर ब्रह्मास्त्र यांची केली. या फवारणीनंतर तिसऱ्या दिवशी 10 टक्के जिवामृताची फवारणी केली. पुढील तीन दिवसांनी तीन टक्के गावरान गाईचे ताक फवारले. जुलैमध्ये बागेत मध्यम प्रमाणात तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला. तो नियंत्रणात ठेवण्यासाठी गावरान गाईच्या गोवऱ्या, लिंबाचा पाला व वावडिंग पावडर यांची धुरी केली.

नारळ पाणी व धान्यांकुराची फवारणी फळधारणा झाल्यानंतर डाळिंबाला सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्यासाठी सप्तधान्यांकुराच्या द्रावणाची फवारणी केली. यासाठी गहू, तीळ आदी सात धान्ये घेऊन, त्यांना मोड आणून त्यांचा अर्क काढला. पुढील 15 दिवसांनी एक ते दोन टक्के नारळ पाण्याची फवारणी केली. त्यासाठी नारळ विकत आणले. 15 दिवसांनी गावरान गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व साखर यांचे द्रावण तयार करून त्याची फवारणी केली. यामुळे फळाची साल जाड होते, फळ फुटत नाही व फुगवण चांगली होते असा पवार यांचा दावा आहे.

उत्पादन खर्चात कपात, उत्पन्नात वाढ
एकूण नियोजनानंतर सुमारे पंधराशे उत्पादनक्षम झाडांपासून सुमारे 16 टन माल उत्पादित झाला. सुमारे साडेतेरा टन मालाची विक्री मुंबई, पुणे, बारामती, सोलापूर व जागेवर केली. त्यास किलोला 40 पासून 70 रुपयांपर्यंत (सरासरी 55 रु.) दर मिळाला. एकूण उत्पन्न सुमारे सहा लाख रुपये मिळाले. जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीमाल उत्पादक व विक्रेत्यांकडून सुमारे अडीच टन माल सेंद्रिय नावाने खरेदी करण्यात आला. त्याला प्रतिकिलो 100 रुपये दर मिळाला. भिगवण परिसरातील डॉक्‍टरांच्या गटामार्फत प्रत्येकी पाच किलोच्या पेट्यांची याच दराने मागणी झाली. सेंद्रिय नावाने विकलेल्या मालाचे सुमारे अडीच लाख रुपये मिळाले. एकूण क्षेत्रात 30 हजार रुपये छाटणीसह उत्पादन खर्च 75 हजार रुपयांपर्यंत आला. आमच्या परिसरात किमान तीनशे ते सहाशे एकर डाळिंब क्षेत्र आहे. बहुतांश भागांमध्ये तेलकट डाग व मर रोगांमुळे बागा नुकसानीत गेल्या आहेत. यंदा माझ्याही बागेत तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मध्यम प्रमाणात होता. मात्र सेंद्रिय पद्धतीने नियोजन केल्याने त्यावर नियंत्रण शक्‍य झाले आहे असे पवार यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांकडून अडवणूक
पवार म्हणाले, की वाशी बाजार समितीत 60 रुपये किलो दराने डाळिंबाची विक्री झाल्यानंतर प्रत्यक्षात 50 रुपयांनी बिल करण्यात आले. याबाबत तक्रार केल्यानंतर तुम्हाला फरकाची रक्कम देऊ, पुढच्या वेळी कसर काढू, असे आश्‍वासन बाजार समिती प्रशासक व व्यापाऱ्यांमार्फत देण्यात आले. पुन्हा माल पाठविल्यानंतर वजनात मोठी कपात केली. आता मुंबईला माल पाठवणे बंद केले असून, पुणे बाजार समिती व स्थानिक विक्रीवर भर दिला आहे.

"ऍग्रोवन'मुळेच यश...
डाळिंब उत्पादनातील यशामध्ये ऍग्रोवनचा वाटा मोठा आहे. घरापासून आठ किलोमीटर अंतरावर "ऍग्रोवन' येतो. दोन- तीन दिवसांचे अंक एकदम ताब्यात घेऊन वाचतो. गरजेनुसार फळपिके, सेंद्रिय शेती, यशोगाथा अशी वर्गवारी करून कात्रणांची फाइल करून ठेवतो. ऍग्रोवनमधील यशोगाथा प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचा सल्ला घेतला, असे पवार यांनी सांगितले.

तज्ज्ञ काय म्हणाले?
सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या पथकाने डॉ. ज्योती शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पवार यांच्या बागेची पाहणी केली. याविषयी डॉ. शर्मा म्हणाल्या, की पवार यांच्या बागेतील डाळिंब चवीला, रंगाला व गुणवत्तेला चांगले आहे. त्यांनी वापरलेल्या सेंद्रिय पद्धतीला एकच वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांनी वापरलेल्या सेंद्रिय पद्धती, त्यावर आधारित उत्पादन तसेच त्या पद्धतीने तेलकट डाग, मर रोग आदींचे नियंत्रण किती प्रभावी झाले आहे याचे निष्कर्ष सलग तीन वर्षे केलेल्या प्रयोगानंतर ठळकपणे पुढे येऊ शकतील. केंद्रामार्फत ही बाग देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.''

डॉ. ज्योत्स्ना शर्मा, शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

संपर्क - शशिकांत पवार, 9423034897

7 comments:

 1. मी राजाराम आनंदा माने , रा - टिळकनगर , श्रीरामपूर , अहमदनगर , मी आज आपला सेंद्रिय डाळींब शेती हा लेख वाचला खूप आनंद झाला कारण सध्या सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे , म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करी इच्छितो कि सेंद्रिय शेती हीच शाश्वत शेती आहतरी थोड्या का होईना प्रमाणात सेंद्रिय शेती कडे वाटचाल करा. मी सध्या टिळकनगर कंपनी मध्ये ६एकर क्षेत्रावर सेंद्रिय भाजीपाला उत्पादन करत आहे यामध्ये सर्व साधारण पणे १० ते १२ प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो आहे.याच माझ्या अनुभवातून मी आमच्या (टिळकनगर कंपनी)श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्ट मार्फत श्रीरामपूर , राहता, राहुरी या तालुक्यातील गावांमध्ये सेंद्रिय भाजीपाला व कडधान्ये पिके , तृणधान्ये पिके फळपिके इ बाबत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करत आहे ( सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती देत आहे .धन्यवाद अधिक महीतीसाठी संपर्क फोन न -०९१६७७७४९४७

  ReplyDelete
 2. ती सेंद्रीय शेती नाही झिरो बजेट शेती आहे उगाच सेंद्रिय शेतीचा प्रचार करू नये

  ReplyDelete
 3. खूपच छान ।
  आपण कोणती पुस्तके वाचली त्याबद्दल माहिती दयावी व आपला मोबाईल न.द्यावा.धन्यवाद

  ReplyDelete
 4. खूपच छान ।
  आपण कोणती पुस्तके वाचली त्याबद्दल माहिती दयावी व आपला मोबाईल न.द्यावा.धन्यवाद

  ReplyDelete