Monday, 29 October 2012

शाश्वत शेती...शाश्वत जीवन...शाश्वत दांपत्य!


सध्याच्या जागतिकीकरणाच्या लाटेमुळे शहरी समाजाचीच जीवनशैली बदलली आहे असे नव्हे तर शेतक-यांच्याही जीवनशैलीत फार मोठा फरक पडला आहे. हा फरक झाल्याने शेतक-यांच्या अर्थकारणात मात्र फरक झाल्याचे दिसून येत नाही. उलट ही जीवनपद्धती शेतक-यांच्या आत्महत्त्या घडवण्यासच अधिक हातभार लावत आहे. ही बदललेली जीवनशैली म्हणजे मुळातच शेती करण्याची बदललेली पद्धती. हायब्रीड...जनुकीय बदल केलेली बियाणी, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा मारा, चुकीची पीकपद्धती व त्यामुळे शेतजमीनींची होणारी अपरिमित हानी...यातुन निर्माण होणा-या समस्या...जीवनसंघर्षात पडत जाणारी ताण-तणावात्मक भर...हे आता सर्वत्र दिसनारे चित्र आहे. पण या समस्यांची सुरुवात आजची नाही हे आपल्याला सहसा माहित नसते. याची पाळेमुळे कृषिक्रांती घडवण्याच्या, तत्कालीन निकडीच्या गरजेच्या पण चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या गेलेल्या पद्धतीतच रोवली गेली होती. आज त्याची भयावहता सर्वांना जाणवू लागली आहे हे खरे पण १९८१ सालीच विदर्भातील करुणाताई व वसंतराव फुटाणे या दांपत्याने या समस्येची भविष्यातील भयावहता ओळखुन स्वत:च्या प्रत्यक्ष प्रयोग, आचरण व सातत्याने प्रबोधन करत "शाश्वत शेती...शाश्वत जीवनपद्धती" या तत्वांवर काम सुरू केले ते आजतागायत ३३ वर्ष अव्याहत सुरु आहे. त्यांचे कार्य आता राष्ट्रव्यापी होत असून हजारो शेतकरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शाश्वत शेती व शाश्वत जीवनपद्धतीचा अंगिकार करू लागले आहेत. या कार्याचा परीघ विस्तारत आहे. तेही कोणतीही संस्था, ट्रस्ट वा संघटना स्थापन न करता. एक रुपयाचे अनुदान अथवा देनगी न घेता. वसंतरावांचा एकाच तत्वावर विश्वास आहे व तो म्हणजे अनुयायी नकोत...सहप्रवासी पाहिजेत. या तत्वामुळे समविचारी, सहद्धेयाने प्रेरीत एक अवाढव्य टीम उभी राहते आहे. एका सायलेंट मुव्हमेंटचा विस्तार होतो आहे.
काय प्रेरणा आहे यामागची? का स्वत:चे आणि अगदी मुलांचेही जीवन या ध्येयाला वाहिले गेले? कसलीही अपेक्षा न ठेवती, प्रसिद्धीची गरजही न भासता कसे य दांपत्त्याला हे साध्य करता आले? हा इतिहास मोठा रोचक आहे.

विनोबाजी व जेपी प्रेरणा

करुणाताईंचे वडील रणजितभाई देसाई हे गुजराथी तर आई बिंदी बिहारी. वडिल आधी गोशाळांचे व्यवस्थापन करायचे. काही काळाने त्यांनी बैलगाडीतुन फिरत विनोबांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार सुरू केला. त्या विक्रीतुन येणारे उत्पन्न तुटपुंजे असे. आई कापुस पिंजणे ते सुतकताई व कपडे शिवण्यापर्यंतचे काम स्वत:च करायची. गांधीवादाचा प्रभाव तेंव्हा अगदीच अतुट असाच होता. १४ सप्टेंबर १९५८ रोजी करुणाताईंचा जन्म झाला. विनोबाजींच्या "सत्य:प्रेम:करुणा" या त्रिसुत्रीतुन व करुणा हे भगवान गौतम बुद्धाचे अव्यवच्छेदक असल्यामुळे व वडिल बौद्ध साहित्याचे अभ्यासकही असल्यामुळे त्यांनी आपल्या कन्येचे नांव करुणा असे ठेवले.

१९६३ साली विनोबाजींनी पवनारला स्त्रीयांसाठी आश्रम काढला. करुणाताईंच्या आईनेही त्या आश्रमात संन्यस्त जीवन जगायचा निर्णय घेतला. करुणाही आईबरोबरच त्या आश्रमात रहायला गेली. करुणाताईंचे सारे शिक्षण झाले ते अत्यंत अनौपचारिक पद्धतीने. विद्वान स्त्रीया देश-विदेशातुन आश्रमात यायच्या. करुणाताईनाही शिकवायच्या. बाळकोबा, विनोबाजींची भाषणे, चर्चा यातुन विचारवैभवही वाढत गेले. अशोक बंगांमुळेही त्यांना खूप शिकायला मिळाले. शेती ते इतर प्रत्यक्ष कामेही करत श्रममाहात्म्यही ठसत गेले. बांगलादेशी शरणार्थींसाठीही काम करायला मिळाले. १९७३-७४ सालच्या दरम्यान विनोबाजींनी करुणाताईंना अचानक एक प्रकल्प दिला. त्यांनी सांगितले कि तू पपयांची लागवड कर. जोवर त्या झाडांना पपया येत नाहीत तोवर मी पपई खाणार नाही. या प्रकल्पासाठी त्यांनी करुणाताईंना ७ गुंठे जमीन दिली.

शाश्वत शेतीचा प्रयोग विनोबाजींच्या प्रेरणेने सुरु झाला तो असा. करुनातांंनी स्वत: मशागत केली, सेंद्रिय खते व त्यांचे प्रमाणही स्वत: निवडले, बियाणी आणुन लागवड केली. पाणी द्यायचे कामही स्वतच. प्रत्येक नोंदी, अगदी खतांवरचा खर्चही ठेवला. आणि जेंव्हा फळे आली तो दिवस आश्रमवासियांच्या दृष्टीने उत्सवाचाच दिवस होता. अशोक बंग स्वत: थोर कृषितज्ञ. त्यांनी सांगितले, ही फळे जागतीक दर्जाची आहेत. विनोबाजींनी आपला पपई-उपवास तोडला. करुणाताईंच्या दृष्टीने हा अतीव आनंदाचा व परिपुर्तीचा क्षण होता. शाश्वत जीवन आणि शाश्वत शेतीचा हा शोध त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा देणारा होता.

दरम्यान करुणाताईंचा सामाजिक चळवळीतही सहभाग सुरु झाला. किंबहुना त्यांना त्यांचा जीवनसाथी या चळवळीमुळेच भेटला. जयप्रकाश नारायणांनी आणिबाणीच्या काळात "तरुण शांती सेना" स्थापन केली होती. या संघटनेतर्फे वेगवेगळ्या प्रांतात शिबीरे घेतली जात. तरुणांचा सहभाग वाढवला जाई. विनोबाजींचा आणिबाणीला पाठिंबा असतांना तुम्ही जयप्रकाशजींच्या आणिबाणीविरुद्ध आंदोलनात कसा भाग घेतला हे करुणाताईंना विचारले तर त्या सांगतात, हे धादांत खोटे आहे. विनोबाजींचा आणिबाणीला पाठिंबा कधीच नव्हता. समाजकारण करणा-यांचा प्रभाव राजकारण्यांपेक्षा मोठा असला तरच अनुशासनपर्व येवू शकते असे त्यांचे म्हनणे होते, परंतु तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठेंनी या चांगल्या तात्विक विधानाचा विपर्यास करून आणिबाणीलाच अनुशासन पर्व ठरवून टाकले.

वसंतराव फुटाणे तसे शेतकरी कुटुंबातील. पण तेही जेपींच्या या तरुण शांती सेनेत हिरिरीने काम करत होते. दोघांची ओळख याच निमित्ताने झाली.  चर्चा, वाद-विवाद यातुन मैत्री झाली. दोघांचा विवाहाचा असा विचार नव्हता...पण मित्रांनीच तुम्ही एकमेकांना अनुरुप आहात असा सल्ला दिल्याने त्या दृष्टीने प्रथमच चर्चाही केली. पण विनोबाजींची परवानगी महत्वाची होती. विनोबाजी ब्रह्मचर्याचे समर्थक...पण करुणाताईंनी आपली भुमिका स्पष्ट केली आणि विनोबाजींनी परवानगीही दिली. वैवाहिक जीवनाकडे कल असेल तर सक्तीच्या ब्रह्मचर्याच्या तेही विरोधातच होते. १९८१ साली दोघे पवनारच्या आश्रमातच अत्यंत आश्रमवासी पद्धतीने विवाहबद्ध झाले. या लग्नाला चार-दोन मित्र सोडले तर कोणाचेही नातेवाईक नव्हते. वसंतरावांचा वडिलांचा या विवाहाला कडाडुन विरोध होताच. परंतु इच्छाशक्ती जिंकली. या विवाहाबरोबरच करुणाताईंचे जवळपास १८ वर्षांचे आश्रमवासी जीवन संपुष्टात आले.

शाश्वत जीवन:शाश्वत शेतीच्या शोधात

वसंतरावांचे गांव अमवरावती जिल्ह्यातील रवाळा, पोस्ट सावनूर, ता. वरुड. हे आदिवासी गांव. ६०% लोकसंख्या आदिवासींची, २०% दलित समाज व उर्वरीत अन्य अशी विभागणी. वरूड तालुका तेंव्हाही संत्र्यांसाठी प्रसिद्ध होताच. रवाळा हे मध्यप्रदेशाच्या सीमेला लागुन असलेले गांव. सातपुडा पर्वतराजीचे संगत. मेळघाटाचे अरण्य तेंव्हा रवाळ्यापर्यंत विस्तारलेले होते. वाघांचे दर्शनही दुर्मीळ नव्हते. संत्र्यांसाठी देशभरातुन वरुड तालुक्यात ट्रक्सची वर्दळ असायची. आणि लोकसंख्या हजार-बाराशेच्या घरात. परंपरांचे जोखड वावरत जगणारे सर्वच. वसंतरावांच्या घरच्यांना हा विवाह पचने कठीणच होते. एक तर हा आंतरजातीय विवाह. अजुन वसंतरावांच्या एका बहिणीचे व दोन्ही भावांचे विवाह व्हायचे होते. अशा स्थितीत त्यांचे विवाह कसे होणार ही समस्या भेडसावणारी. वसंतरावांच्या एका भावाचा विवाह ठरला तर करुणाताईंनी तेथे येवून "या कोण?" असा प्रश्न होणा-या सोय-यांनी विचारला तर पंचाईत होवू नये म्हणुन साक्षगंधाच्या दिवशी करुणाताईंना चक्क कोंडुन ठेवण्यात आले. पण सुदैवाने वसंतरावांचे बंधुही तेवढेच बंडखोर. त्यांनी हा सारा बेत हाणून पाडला...सारे काही सुरळीत झाले.

शेती करायची तर शाश्वत पद्धतीनेच असा निर्णय विवाहापुर्वीच या दांपत्याने घेतला होता. पण घरचे मानत नव्हते. प्रयोग करायचे तर स्वतंत्र जमीनीची गरज होती. "रसायने अन्नाला विषाक्त करतात...जर असे विषारी अन्न खावू शकत नाही तर इतरांनाही कसे खावू द्यायचे?" हा दोहोंसमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता. मग घरच्यांशी बोलणी करुन वसंतरावांनी बारा एकर जमीन मिळवली व स्वतंत्र झाले.  शेतावरच रहायला आले. चळवळीतील अनेक मित्रही तेथे मुक्काम ठोकु लागले. शाश्वत शेतीचे विविधांगी प्रयोग सुरु झाले. कसलेही रसायनी खत अथवा कीटनाशके न वापरता विविध वाणांची पीके कशी घेता येतील व उत्पादकताही बाधणार नाही   असे प्रयोग स्वत: केल्याखेरीज इतरांना पटवून देणे तर अशक्यप्राय होते. लोक हायब्रीड बियाणे व त्यातुन वरकरणी उदंड दिसणा-या पीकांना सरावले होते. आपल्याच पुर्वजांनी निर्माण केलेल्या पीक-चक्रांना विसरले होते. सेंद्रीय खतांचे तर नांवही उरलेले नव्हते. बदल घडायला तर हवा होता पण ते तेवढे सोपे राहिलेले नव्हते. स्वत: यशस्वी प्रयोग करणे आवश्यक होते. सुरुवातीला काही प्रयोग सफल तर काही अक्षरशा विफलही झाले. मग यशाची मात्रा दिसु लागली. परिसरातच नव्हे तर देश्भरात प्रचार-प्रसारही सुरु राहिला. पण लोक अद्याप समजावून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

शाश्वत शेतीच नव्हे तर शाश्वत जीवनपद्धती हे ध्येय उभयतांनी बाळगलेले होते. स्वत:च्या गरजा किमान ठेवणे, स्वत:साठी आवश्यक असणा-या सर्वच शेतमालाचे उत्पादन स्वत:च करणे, (अगदी तेलही स्वत:च्या शेतात पिकलेल्या तेलबियांपासून तेलघाण्यावर बनवुन आणणे)) अत्यंत अत्यल्प वस्तुंची बाहेरुन खरेदी करणे ही जीवनशैली म्हणजेच शाश्वत जीवनशैली हे उभयतांचे मुलभूत तत्वज्ञान. ते सर्वच शंभर टक्के पाळु शकत नाही ही जाणीव असली तरी स्वत: फुटाणे कुटुंबीय सुरुवातीपासुनच याच जीवनशैलीचा अंगीकार करुन जगत आहेत व त्या पद्धतीचे फायदे लोकांच्याही लक्षात येवू लागले आहेत. आज शंभराहुन अधिक शेतकरी कुटुंबे या शैलीप्रमाणे वा किमान जवळपास जात जीवन जगत आहेत व त्याची व्याप्तीही विस्तारत चालली आहे.

शाश्वत शेती म्हणजे काय?

शाश्वत शेतीचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मात्र तिला एका चळवळीचेच रुप प्राप्त झाले. सभा, पत्रके, अहवाल, प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिके या माध्यमातुन देशभर प्रचार सुरु झाला. शाश्वत शेतीची मुलतत्वे म्हणजे १. हायब्रीड अथवा जनुकीय बियाण्यांचा वापर न करता पारंपारिक बियाण्यांचाच वापर करणे. २. फक्त सेंद्रीय खते वापरणे. ३. रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करणे. ४. स्थानिक पर्यावरणाला व मृदेला सुसंगत अशीच पीके घेणे. ५. पीकवितरण योग्य प्रमाणात करणे. ६. निसर्गचक्रात ढवळाढवळ न करता निसर्गापासुन शिकणे. ई.वरील शेतीपद्धतीमुळे भूजलउपसा मर्यादेत रहातो. करुणाताई म्हणतात उदा. विदर्भातील संत्र्यांच्या बागा म्हणजे स्थानिक पाणी उपसणे व देशभर फळांच्या रुपात पाठवणे. त्यांत पैसा आहे, पण अतिरिक्त सातत्यपुर्ण उत्पादनामुळे विदर्भाची भूजल पातळी संकटात आली आहे. त्यापेक्षा कही प्रमानात का होईना स्थानिक आंब्यांच्या प्रजाती वाढवण्यावर आम्ही जोर दिला. सुरुवातीला सर्वांनाच हे धाडसी पाऊल वाटले. परंतु हळु हळु चळवळ एवढी यशस्वी झाली कि सर्वाधिक चविष्ट आंबे पिकवणारे म्हणुन टाइम्स ओफ इंडियाने आमच्या शेतक-यांची दखल घेतली. उलट उत्त्पन्न वाढायला मदतच झाली व भुजलाचा झाडांकडुनच होनारा अमर्याद उपसा कमी झाला.
हायब्रीड बियाण्यांमुळे रासायनिक खते व कीटनाशके अपरिहार्य होतात, कारण या प्रजाती मुळात नाजूक प्रकृत्तीच्या. पण यामुळे ते विषारीपण अन्नात तर उतरतेच पण कसही कमी झालेला असतो. शेतजमीन हळुहळु निकस होत जाते, खारावू लागते व नापीकतेकडे वाटचाल सुरु होते...म्हणुन मग अधिक खते...हे एक दु:श्चक्र आहे. आज जो फायदा मिळतांना दिसतो तो शाश्वत नाही...तात्कालिक आहे व याची अनिष्ट फळे भविष्यात येणार हे निश्चित आहे. याहुन निर्माण झालेला मोठा धोका म्हणजे खेड्यांत पुर्वी मधुमेह/हृदयविकारदि आजारांची नामोनिशानी नव्हती. आज त्याची लागण ग्रामीण भागात झपाट्याने होवू लागली आहे. गेली सतत ३१ वर्ष प्रचार-प्रसारत्मक चळवळीतुन साध्य झालेली बाब म्हणजे अक्षरश: हजारो शेतकरी आज शाश्वत शेतीचे महत्व समजावून घेवू लागले आहेत, आपापल्या विभागांतील नैसर्गिक परिस्थितीनुसार प्रयोग करत पुढे वाटचाल करु लागले आहेत. अर्थात हे अत्यल्प प्रमाण आहे याचीही जाणीव या दांपत्याला व त्यांच्या देशभरातील सहका-यांना आहे.

सरकारी मदत घ्यायची नाही!

या दांपत्याने शाश्वत शेतीला चळवळीचे स्वरुप देतांना एक निर्धार केला होता व तो म्हणजे कसलीही शासकीय मदत घ्यायची नाही. कोणाकडुनही देणगीही घ्यायची नाही. कसल्याही पुरस्काराला थारा द्यायचा नाही. वृत्तपत्रीय प्रसिद्धीच्या मोहातही कधीही पडायचे नाही. प्रत्यक्ष कामातुनच लोकांपर्यंत पोहोचायचे. हा निर्धार या जोडप्याने कटाक्षाने आजवर पाळला ही अत्यंत अभिनंदनास्पद बाब आहे. अन्यथा अगणित एन.जी.ओ. काम करोत अथवा नकोत, अनुदाने अथवा देणग्यांकडे डोळे लावून बसलेले असतात हे वास्तव आपण पहातो.

एवढेच नव्हे तर या चळवळीला संस्थात्मक स्वरुप जाणीवपुर्वक या दांपत्याने दिले नाही. एका अर्थाने हे एक सैल व अनाम पण समान उद्दिष्टांचे असे संघटन आहे. वसंतराव व करुणाताई जेपींच्या आंदोलनात असल्यापासुनचे त्यांचे देशभरचे अनेक मित्र व त्यात स्वयंस्फुर्तीने सामील होनारे हे सारेच समान पातळीवर वावरत ही चळवळ व्यापक करत आले आहेत. वसंतरावांचे वरुडमधील एक सहकारी मोहन रत्नपारखी सांगतात कि "अनुयायी नकोत...सहप्रवासी हवेत..."हेच या दांपत्याचे मूलभुत तत्वज्ञान आहे आणि त्यामुळेच सामुदायिक...सम-स्वतंत्र-विचारी नेतृत्व हा पाया राहिलेला आहे जो आजच्या काळात दुर्मिळातिदुर्मिळ असाच म्हणावा लागेल. आणि ते खरेच आहे.

दारुबंदी

शाश्वत शेतीच्या कामाबरोबरच सर्वात महत्वाचे काम म्हणजे दारुबंदी. करुणाताई अत्यंत प्रांजळपणे सांगतात कि मी या चळवळीचे नेतृत्व केले नाही. खरे तर आदिवासींचेच गांव असल्याने दारु हा आदिवासींच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे हे मी मनोमन मान्य करुनच टाकले होते. ग्रामसुधारणांचे, प्रौढ शिक्षणाचे उपक्रम मात्र १९८१ पासुनच सुरु होते. पण एकदा गांवात लग्न करुन आलेल्या काही तरुण सुना माझ्याकडे आल्या आणि दारुबंदीबाबत बोलु लागल्या. विरोध व्यक्त करु लागल्या. आपली दु:खे सांगु लागल्या. मला त्या सर्व प्रश्नांची जाणीव होतीच पण आता आदिवासी तरुणींनाही त्याविरोधात आवाज उठवावा वाटु लागला आहे याचा मला मनोमन आनंद झाला. मी त्यांना सांगितले...मी नेत्रुत्व करणार नाही. आपण सारे मिळुन एकत्र हा प्रश्न सोडवुयात. त्या तरुणी तयार झाल्या. आणि सुरु झाली एक मोहीम.पोलिसांनी या आंदोलकांविरुद्ध खोट्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गाठली. करुणाताईंसोबत आत्मविश्वास वाढलेल्या या तरुणी पार मामलेदार, जिल्हाधिकारी यांच्याशीच्या चर्चांत/वादांत हिरिरीने भाग घेवू लागल्या. आज परिस्थिती अशी आहे कि गांवातील स्त्रीया ताठ मानेने जगतात. दारुबंदीसोबत स्त्रीमुक्तीची ही अभिनव चळवळ बनली तिही सर्वांनीच नेतृत्व केलेली चळवळ. ती नंतर अन्यत्रही पसरली.

वर्तमान

शाश्वत शेतीचे काम जोमाने फोफावत आहे. जनुकीय बियाणे बनवुन देशाला परावलंबी बनवु पाहणा-या मोन्सेटोसारख्या बलाढ्य कंपनीशीही संघर्ष सुरु आहे. एकट्या वरुड तालुक्यात शंभरेक शेतकरी शाश्वत शेतीच्या मार्गाने सुखासमाधानाचे जीवन जगत आहेत. या व्यापक कामात आता दुसरी पिढीही उतरली आहे. शालेय शिक्षणाला आई-वडिलांप्रमानेच महत्व न देता प्रत्यक्ष जीवन शिक्षणातुन मिळवलेले ज्ञान ही पिढी प्रचारत आहे वाटत आहे. विनय आणि चिन्मय ही या दांपत्याची मुले. हे दोघेही बायोग्यस तंत्रज्ञान, सुलभ सेंद्रीय खते कशी बनवायची यावरची प्रात्यक्षिके देशभरातुन त्यांच्याकडे भेट द्यायला येणा-या शेतक-यांना देत असतात. स्वत:ही अनेकविध प्रयोग करत आपल्या मातापित्यांना साथ देत असतात. कलकत्ता ते पोंडॆचरी अशा देशभर विखुरलेले सहकारी जोमाने शेतक-यांचे जीवन सम्रुद्ध करण्यासाठी राबत आहेत. त्यासाठी कार्यशाळा घेत आहेत...प्रात्यक्षिके देत आहेत...प्रबोधन करत आहेत.सध्या वसंतराव स्थानिक वाणांची पण उत्तम उतारा देवू शकतील अशा बियाण्यांची महाब्यंक बनवण्याच्या अवाढव्य प्रयत्नांना लागलेही आहेत. हे कार्य देशव्यापी स्वरुपावर सुरु असून या बीज-ब्यंकेमुळे शेतक-यांना बीजौत्पादक कंपन्यांवर भविष्यात कधीही अवलंबुन रहावे लागणार नाही, स्वत:चे बियाणे स्वत:लाच निर्माण करता येईल असा या उभयतांना विश्वास आहे. सध्या देशी वाणांची व विविध प्रकारची बियाणी उपलब्ध करणे सोपे उरलेले नाही. अनेक भागांतुन अनेक प्रकारची परंपरागत बियाणी पुरेपुर नष्ट झालेली आहेत. हायब्रीड अथवा जनुकिय बियाणी नवीन बियाण्यांचे पुनरुत्पादन करु शकत नाहीत. ते काम फक्त पारंपारिक/नैसर्गिक बियाणी करु शकतात. कारण ती शाश्वत व अविनाशी आहेत.

आता ही बियाणी मिळतात ती आदिवासी शेतक-यांकडुन अथवा दुर्गम भागांतील शेतक-यांकडुन अथवा अल्प प्रमाणात का होईना गांवरान वाण करतात त्यांच्याकडुन. ती सर्व बियाणी एकत्र करत कोठे कोणते बियाणे अनुकुल असेल व अधिक उत्पादकताही देवु शकेल यावर प्रयोग करुन अवाढव्य बीज-ब्यंक निर्माण केली जानार आहे.

या क्रांतीचा भवितव्यातील धोका लक्षात घेतलेल्या विदेशी बियाणी बनवणा-या कंपन्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्याचे पडसाद वर्धा जिल्यातील शाश्वत शेती करणा-या काही शेतक-यांना मिळालेल्या धमक्यांत उमटत आहेत.

विदेशी बीजकंपन्या शेतक-यांना पुर्णपणे परावलंबी करत आहेत. दरवर्षी भाव वाढवत शेतक-यांची लूट करत आहेत. एके दिवशी भारतीय शेतीचे संपुर्ण नियंत्रणच त्यांच्या हाती जाण्याचा धोका आताच निर्माण झालेला आहे. या शाश्वत शेतीपद्धतीने आणि बीजब्यंकेमुळे शेतकरी खरा स्वावलंबी "बळीराजा" बनु शकणार आहे.

भारतीय शेतक-याची मानसिकता बदलता येणे सोपे नसते याची उभयतांना ३१ वर्षांच्या अनुभवांतुन कल्पना आली आहे. पण पहाड फोडुन कोट्यावधी शेतक-यांपैकी काही हजार शेतकरी तरी आता प्रत्यक्ष शाश्वत शेतीत उतरत शाश्वत जीवनाचा मार्ग अंगिकारु लागले आहेत ही एक अभिनंदनास्पद उपलब्धी आहे. प्रसिद्धीच्या झोतात न येण्याचे फायदे हेच कि मुख्य उद्देशापासुन, ध्येयापासुन लक्ष विचलित होत नाही. म. गांधीजींचे परम शिष्य विनोबाजींच्या तालमीत तयार झालेल्या करुणाताईंना अन्य कोणत्या आदर्शाची वा व्यक्तिगत आकांक्षेची मोहिनी पडणे शक्य नव्हते. तसे कधीही झाले नाही. आजही करुणाताई व वसंतरावांचे पवनार आश्रमाशी असलेले नाते सुटलेले नाही. आजही ते तेथे कार्यरत असतात. वर्धा जिल्ह्यातही त्यांचे कार्य फोफावलेले आहे. आज विद्रभातच नव्हे तर देशभरात त्यांचे कार्य शेतक-यांत नावाजले जात आहे. वैदर्भियांमद्धे अर्थातच या दांपत्याबद्दल मोठा आदर आहे. करुणाताईंना तर सर्वत्र "विदर्भकन्या" म्हणुनच ओळखले जाते. हाच खरा सन्मान...!

हे एक विलक्षण, एकरुप-एकध्येय असलेले, स्वप्न साकार करण्यासाठी खांद्याला खांदा लावुन बरोबरीने आयुष्य पणाला लावणारे शाश्वत दांपत्य आहे. अशी दांपत्ये या यच्चयावत विश्वात असतील तरी किती? कोणालाही आदर्शभुत ठरावे असे त्यांचे दांपत्यजीवनही आहे.

शाश्वत शेती आणि शाश्वत जीवन ही आजच्या शेतक-यासमोरील स्वप्ने असायला हवीत. शहरी लोकांनाही शाश्वत जीवनशैलीचे मोल समजणे तेवढेच आवश्यक आहे. गरजा किमान करत नेत, मानवी संबंधांना दृढमुल करणारी जीवनशैली म्हणजे शाश्वत जीवनशैली. ही जीवनशैली प्रत्यक्ष जगणे किती सुंदर व अनोखी गोष्ट असते हे फुटाणे दांपत्याच्या जीवनावरुन लक्षात येते. आज आपण मात्र अशाश्वताच्या हव्यासापायी काय करत चाललो आहोत, कोठे चाललो आहोत यावर सर्वांनीच आत्ममग्न होत चिंतन करायला हवे...

बदलायला हवे.

-संपर्क:
सौ. करुणाताई व वसंतराव फुटाणे,
रवाळा, पोस्ट सावनूर,
ता. वरुड, जि. अमरावती
फो.-०७२२९-२३८१७१
    ०७२२९-२०२१४७
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/10/blog-post_14.html

स्वयंसहाय्यता बचत गट


स्वयंसहाय्यता बचत गट म्हणजे काय ?
 • सर्वसाधारण 15-20 लोकांचा/महिलांचा अनौपचारिक समूह म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट.
 • निश्चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन स्व-इच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा/महिलांचा समूह म्हणजे बचत गट.
 • एकाच कारणासाठी गटातील लोकांच्या उन्नती, विकास व फायद्यासाठी एकत्रित आलेला समूह म्हणजे बचत गट होय.
 • प्रत्येक सभासद समान रक्कम, ठराविक कालावधीत बचत म्हणून एकत्र करतात व त्याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी लोकशाही मार्गाने करतात.
 • ही कोणतीही योजना अथवा प्रकल्प नसून महिलांना व युवकांना संघटित करण्यासाठी, त्यांना विकासात्मक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठीचे माध्यम होय.

बचत गटासाठी शासनाच्या योजना व फायदे.
 • ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व्यक्तींच्या बचत गटास ग्रामविकास विभागाच्या ग्राम स्वरोजगार योजनेत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गट विकास अधिकारी, (पंचायत समिती) यांचेकडून स्वयंरोजगारासाठी रु.10,000/- अनुदान दिले जाते व त्यावर बॅंकेकडून रु.15,000/- कर्ज असे एकूण रु.25,000/- खेळते भांडवल दिले जाते.
 • शहरी भागातील व्यक्तींच्या बचत गटास आयुक्त तथा संचालक, महानगरपालिका प्रशासन यांच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत उपायुक्त, महानगरपालिका व मुख्याधिकारी, नगरपालिका यांचेकडून स्वयंरोजगारासाठी रु.1.25 लाख (50%) अनुदान दिले जाते व उर्वरित 50% रक्कम रु. 1.25 लाख राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्जरूपाने मिळते.
 • शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास आयुक्त तथा संचालक, महानगरपालिका प्रशासन यांच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत उपायुक्त, महानगरपालिका व मुख्याधिकारी, नगरपालिका यांचेकडून स्वयंरोजगारासाठी 15% परंतु कमाल रु. 7500/- इतके अनुदान शासनाकडून दिले जाते. हे अनुदान राष्ट्रीयकृत बॅंकेकडील जास्तीत जास्त कर्ज रु. 50,000/- वर दिले जाते.
 • राष्ट्रीयकृत बॅंका गटाच्या बचतीच्या प्रमाणावर 1:2 ते 1:4 या प्रमाणात टप्प्याटप्प्याने गटास कर्ज देतात.
 • सहकारी बॅंका बचत गटाच्या बचतीच्या प्रमाणात म्हणजेच 1:1 ते 1:4 या प्रमाणात व्यवसायासाठी कर्ज देतात.
 • स्टेट बॅंक ऑफ इंडिया बचत गटातील सदस्याला घरबांधणीसाठी रु. 50,000/- व भुखंड खरेदीसाठी रु. 25,000/- कर्ज 7.75 % व्याजदराने देते.
बचत गटाचे फायदे.
 • संघटन होते व बचत आणि काटकसरीची सवय लागते.
 • बचत गटामुळे अडीअडचणींच्या वेळेस तातडीच्या गरजा भागविण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत नाही.
 • त्वरीत व सुलभरित्या कर्ज पुरवठा होतो व सभासदांना बचतीची सवय लागते आणि बँकेचे व्यवहार माहिती होतात.
 • सावकारी कर्जाच्या तुलनेत अत्यंत कमी व्याजदरात आर्थिक सहाय्य उपलब्ध होते त्यामुळे सदस्यांच्या एकमेकांच्या आर्थिक अडचणी सोडविल्या जातात.
 • सभासदांमध्ये परस्पर सहकार्य व विश्वास निर्माण होतो.
 • सभासदांना अंतर्गत कर्ज पुरवठा अल्प व्याजदराने होतो.
 • महिला घराबाहेर पडून त्यांना नवीन बाबी शिकण्याची संधी मिळते.
 • महिला स्वावलंबी होतात.
 • महिलांना बचत, कर्ज घेणे व परतफेड करणे अशा आर्थिक व्यवहारांची माहिती होते व त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
 • सरकारच्या लोककल्याणाच्या विविध योजनांची माहिती होते.
 • समाजात स्थान निर्माण होते.
 • परतफेडीची सवय लागते.
 • कार्यरत असलेल्या बचत गटास एक वर्षानंतर प्रती सभासद रू. 1000/व जास्तीत जास्त रू. 25000/पर्यंत व्यवसायासाठी खेळते भांडवल (कॅश क्रेडीट) मिळते.
 • दारिद्रय रेषेखालील बचत गटास व्यवसायासाठी रू. 1.25 लाख किंवा 50% यापैकी कमी असेल त्या रकमेएवढे अनुदान मिळते.
गट स्थापन्याच्या पाय-या. (स्टेप्स)
 • प्रथम कार्यक्षेत्राची निवड करून त्या कार्यक्षेत्रात जाऊन बचत गटाची संकल्पना व्यवस्थित व स्पष्टपणे समजावून देऊन गट स्थापन्यास प्रोत्साहित केले जाते.
 • गटामध्ये सहभागी होणा-या 15 ते 20 इच्छुक महिला / पुरूषांचा गट तयार केला जातो.
 • सर्वांच्या संमतीने सोईच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी बैठक आयोजित करून बचत गटाविषयी माहिती दिली जाते.
 • बैठकीत सर्व संमतीने गटाला एक नांव देण्यात येते व गटामध्ये जमा करावयाच्या बचतीची रक्कम ठरविली जाते.
 • गटाच्या नांवे बँकेत खाते उघडले जाते व प्रत्येक महिन्याची जमा रक्कम खात्यात जमा करण्यात येते.
 • लघुसिंचनाचे बाबतीत व अपंग व्यक्तींच्या बाबतीत 5 व्यक्तींचा गट बनविला जातो.
 • एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती गटात सभासद होऊ शकते.
 • गट स्थापनेचा कालावधी सर्वसाधारणपणे 6 महिने गृहित धरला आहे. 6 महिन्यांनंतर गटाची प्रतवारी (Grading) करण्यात येते.
 • शेजारी राहणा-या महिला किंवा एकाच ठिकाणी काम करणारे 15 ते 20 सहकारी बचत गट स्थापन करू शकतात.
बचत गटांचे व्यवस्थापन.
 • गटाच्या कार्यक्षेत्रात दरमहा किमान एक बैठक घेतली जाते व प्रत्येक सभेची विषयपत्रिका काढली जाते.
 • एक गट प्रमुख नेमला जातो व दरवर्षी तो बदलला जातो.
 • गटाच्या विकासासाठी सर्व सभासदांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो व नियमांचे पालन करतात.
 • नियम हे गटाच्या सर्व सभासदांनी ठरविलेले असतात.
 • सर्व सभासद हे मालक असतात. शिवाय सामुहिक जबाबदारी असते.
 • प्रत्येक गट स्वतःची आचारसंहिता व नियमावली ठरवितो.
 • प्रत्येक व्यक्ती पाहून कामाची जबाबदारी सोपविली जाते.
 • हजेरीपत्रक, कार्यवृत्तान्त, कर्ज नोंदवही, सामान्य लेजर, रोकड वही, बँक पासबुक, वैयक्तिक पासबुक इ. रेकॉर्ड ठेवले जाते.

उद्देश.
 • सावकारांच्या पाशात अडकावे लागू नये व बचतीची सवय लागावी हा बचत गट स्थापन करण्यामागचा प्राथमिक हेतू आहे.
 • सदस्यांनी दैनंदिन स्वरूपांत काही बचत करायची आणि अडीअडचणींना या एकत्रित बचतीतून कर्ज घ्यायचे ही बचत गटाची मूळ संकल्पना.
 • बचत गटातील महिलांचे व युवकांचे मानसिक व वैचारिक परिवर्तन घडवून आणून त्यांना स्वबळावर उभे राहण्यास मदत करणे.
 • दारिद्रय रेषेखालील गरीब महिलांच्या विकासासाठी 10 किंवा त्यापेक्षा अधिक महिला एकत्र येऊन बचत गट स्थापन करून बचतीला प्रोत्साहन देणे व अडीअडचणींना छोटे कर्ज मिळवून देणे.

स्वयंसहाय्यता बचत गटातील कर्ज वितरण पधदत.
 • कर्ज गटाबाहेरील व्यक्तीस देत नाहीत.
 • सर्व रक्कम एकाच सदस्यास देत नाहीत.
 • कर्जाच्या रकमेची गरज किती हे बघतिले जाते.
 • सर्व सदस्यांना समान कर्ज दिले जात नाही.
 • परंतु कर्जावर सर्व सदस्यांना समान व्याजदर आकारला जातो.
 • परतफेडीचे अल्पमुदतीचे वेळापत्रक केले जाते.
 • कर्जवितरण व परतफेडीची नोंद नोंदवहीत अत्यावश्यक.
 • स्वयंसहाय्यता गटाची कर्जासंबंधी बॅंकेशी संलग्नता (लिंकेज).


स्वयंसहाय्यता बचत गटाची कामे.
 • ठराविक रक्कम प्रत्येक बैठकीला जमा करणे.
 • लोकशाही पध्दतीने 2-3 नेत्यांची निवड.
 • मासिक / पाक्षिक नियमित बैठका घेणे.
 • हजेरी पुस्तक व इतिवृताची नोंदवही नियमित ठेवणे.
 • पैशाच्या आवक जावकाची पारदर्शकपणे नोंद ठेवणे.
 • सदस्यांच्या दैनंदिन गरजा व उत्पादन करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे.
 • कार्यकुशलता व सबळीकरणासाठी उपक्रम राबविणे.
 • आळीपाळीने नेतृत्व रचना करणे.
बचत गटांनी ग्रामविकासात केलेली कामगिरी.
 • महिला धाडसी बनल्या.
 • एकमेकांच्या दु:खात सहभागी झाल्या.
 • दारुबंदी केली.
 • श्रमदानाने रस्ते तयार केले.
 • एस.टी. बसेस सुरु केल्या.
 • आरोग्य विषयक कामे केली.
 • आर्थिक बाबींची सोडवणूक केली.
 • शैक्षणिक विषयक कामे केली.
 • सामाजिक कामे केली.
 • महिलांमध्ये स्वयंरोजगाराची गोडी निर्माण केली.
 • बॅंकाच्या कार्यपध्दतीची ओळख झाली.
बचत गटाची महाराष्ट्रातील चळवळ.
 • सन 1992 मध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) पुढाकार घेऊन सुरू केलेल्या स्वयंसहायता समूह बँक संलग्नता कार्यक्रमाने आता राज्यात चांगलीच प्रगती केलेली आहे.
 • महाराष्ट्र राज्यात एक लाखांहून अधिक बचत गटांच्या माध्यमातून सुमारे 267 कोटी रूपयांचा पतपुरवठा सामान्य नागरिकांना करण्यांत आला आहे.
 • राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 18,000 बचत गट स्थापन झालेले आहेत.
 • राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सुध्दा आता बचत गट जोडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया बचत गट स्थापनेत अग्रेसर असून, त्यांनी 46,000 बचत गट स्थापन केले आहेत.
 • त्यापाठोपाठ बँक ऑफ महाराष्ट्रने 24,000 बचत गट जोडले आहेत.
 • बँकांकडून 8.5% व्याजदराने बचत गटांना कर्ज पुरवठा केला जातो.
 • बचत गटांना दिलेल्या कर्जाची 100% वसुली होऊ लागल्याने बँकांचा बचत गटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
 • बचत गटांना बचतीच्या चार पट कर्ज व सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येते.
 • दिलेले कर्ज हमखास वसूल होण्याची खात्री असल्याने राज्यातील बचत गटांचे महत्त्व आता राष्ट्रीयीकृत बँकांनाही वाटू लागले आहे.

स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे अशी कार्यालये / संस्थांचे
मुख्य कार्यालय व त्यांच्या इतर कार्यालयांचे जिल्हानिहाय पत्ते खालीलप्रमाणे
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड)
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) हे ग्रामीण भागात स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतात. स्वयंसेवी संस्था ह्या बचत गट स्थापन करतात, त्यासाठी नाबार्डकडून त्यांना आर्थिक व प्रशिक्षण विषयक सर्व सहकार्य मिळत असते. थोडक्यात ग्रामीण भागामध्ये नाबार्ड ही संस्था स्वयंसहाय्यता बचत गट हे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्थापन करते.
तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या तसेच मोठया शहरांच्या ठिकाणी उत्पादित मालाची प्रदर्शने भरवून त्या प्रदर्शनामधून महिलांचा आर्थिक मदत होते.

पत्ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महिला आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (माविम)
महिला आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (माविम) ही संस्था ग्रामीण भागात तसेच शहरी भागात महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करते. या कामामध्ये माविमला त्यांनी नेमलेल्या स्वयंसेवी संस्थांसुध्दा मदत करतात. विशेष म्हणजे तालुका कार्यक्षेत्रात सहयोगिनींच्या मार्फत बचत गटांची स्थापना व गटांना प्रशिक्षण देण्यात येते.

बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, कामधेनू योजना तसेच केंद्र शासन पुरस्कृत स्वयंसिध्दा योजना यामध्ये माविमकडून मदत होते. बचत गटातील महिलांसाठी प्रदर्शन व मेळावे, महिला जाणीव जागृती कार्यक्रम राबविले जातात. तसेच बचत गटांना वित्त सहाय्य मिळवून देण्याकरिता प्रस्तावांची छाननी करून ते प्रस्ताव राष्ट्रीय महिला कोष यांच्याकडे सादर केले जातात.

पत्ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नगरपरिषद प्रशासन संचालनालय
महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील तसेच मागासवर्गीय महिलांसाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालयातर्फे महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात स्थापन केले जातात. बचत गटांतील महिलांना शासनाच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमध्ये स्वयंरोजगारासाठी कर्ज तसेच प्रशिक्षण सुध्दा दिले जाते.
शहरी भागामध्ये स्थापन झालेल्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शने आयोजित केली जातात.
पत्ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामीण विकास विभाग

ग्रामीण भागामध्ये दारिद्रय रेषेखालील तसेच अपंग, मागासवर्गीय, महिला यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी ग्रामीण विकास विभागाने स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्याचा उपक्रम सुरु केलेला असून जिल्ह्याचे प्रकल्प संचालक व गट विकास अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून बचत गट स्थापन केले जातात.

ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रदर्शने आयोजित केली जातात. तसेच बचत गटातील सभासदांना प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी कर्ज दिले जाते.
पत्ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

इ. राष्ट्रीयकृत, शेडयुल्ड व सहकारी बँका

शासनाप्रमाणेच बचत गट स्थापन करण्याचे काम राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड व सहकारी बँका शहरी व ग्रामीण भागामध्ये करतात. बँका स्वतंत्रपणे बचत गट स्थापन करीत असल्यामुळे बचत गटांच्या बचतीच्या प्रमाणात म्हणजेच 1 : 1 ते 1 : 4 या प्रमाणात स्वयंरोजगारासाठी कर्ज देतात. स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन बँका कर्ज व प्रशिक्षणाची सुविधा बचत गटांना देतात.

बँका स्वतंत्रपणे बचत गटाच्या सभासदांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शने आयोजित करतात.
बँकांच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा.

स्वयंसेवी संस्था
स्वयंसेवी संस्थांचा स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्यामध्ये मोठा सहभाग आहे. गावपातळीपर्यंत स्वयंसेवी संस्थांचा कामामध्ये सहभाग असल्यामुळे मोठया प्रमाणात बचत गट स्थापन करण्याचे काम स्वयंसेवी संस्थांकडून होत आहे.
स्वयंसेवी संस्था ह्या बचत गटातील सभासदांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, शासनाच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देण्याचे महत्त्वाचे काम करतात.

Sunday, 28 October 2012

सेंद्रीय शेती-002

सेंद्रीय शेतीकडे चला...


अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’च्या 24 जून 2012 च्या भागात सेंद्रीय शेतीविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. हा खरोखरच अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यावर ठिकठिकाणी उत्तम प्रयोग सुरू आहेत. दुर्दैवाने या प्रयोगांना अद्यापही राजमान्यता मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचेही त्याकडे दुर्लक्ष होते.
माझ्या ‘आयकॉन्स’ सिरीजमध्ये अशी माणसे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. 1 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित झालेल्या ‘लातूर आयकॉन्स’मध्ये निष्ठावंत शेतकरी संदीपान बडगिरे यांच्या प्रयोगांचा वेध मी घेतला. हा लेख आपणा सर्वांसाठी...

------------------------------------------------------------------------------
‘‘गोमुत्र ही शेतकर्‍यांसाठी आणि समाजासाठीही खूप तारक गोष्ट आहे. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आम्ही ‘गोशक्ती’ बनवितो आणि पिकांतील रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आणि कीटकांचा नाश करण्यासाठी ‘गोबाण’. यासाठी आम्ही गोमुत्र जमिनीवर पडण्याआधीच संकलित करतो. त्यावर विविध प्रक्रिया करतो. यासाठी फक्त सेंद्रीय पदार्थांचाच वापर होतो. साधारण 21 दिवसांच्या मेहनतीनंतर ‘गोबाण’ तयार होतो. हा पिकांसाठी रामबाण उपाय आहे, असे मी स्वानुभवाने सांगतो. आम्ही हे प्रॉडक्ट विक्रीसाठी बाजारात आणले. पण शेतकर्‍यांना फवारणी केल्याबरोबर अळी मरायला हवी असते. सेंद्रीय पद्धतीत ते अपेक्षित नसते. सेंद्रीय खतांतून आणि कीटकनाशकांमधून पिकांना हवी ती जीवनमूल्येही मिळतात आणि कीटक - अळ्यांना हे पदार्थ वेगळ्या प्रक्रियेने नष्ट करतात. आधी किटकांना भोवळ येते. त्यांच्यातील प्रजननक्षमता नष्ट होते. त्यानंतर त्यांची अन्नावरील वासना उडते आणि ते पिकांतील द्रव्ये खाणे बंद करतात. साधारण तीन ते चार दिवसांत ते मरून पडतात. इतकी वाट पाहण्याची अनेकांची इच्छा नसते. मग ते रासायनिक कीटकनाशकांच्या मागे लागतात. दहा वर्षांपुर्वी वापरली जाणारी कीटकनाशके आता चालत नाहीत. कारण ते पचविण्याची कीटकांची क्षमता वाढली आहे. त्याच्या अनेक पटीने क्षमता असलेली कीटकनाशके वापरावी लागतात. त्यामुळे जमिनीतील ‘मायक्रोऑरगॅनिझम’ नष्ट होतो आहे. माणसांवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. पण हे लोकांना कळत नाही आणि सरकारला त्या बाबतीत काहीच करायचे नाही. त्यांना शेतकर्‍यांना अज्ञानातच ठेवायचे आहे... ही सारी देशाचा विनाश घडविणारी चिन्हे आहेत...’’ संदिपान बडगिरे मनस्वीपणे बोलत होते. त्यांच्या शब्दाशब्दांतून तळमळ व्यक्त होती. एकेकाळी ‘युक्रांद’च्या झेंड्याखाली झुंज देत आणीबाणीतील तुरुंगवास हसतहसत भोगणार्‍या बडगिरे यांनी आता स्वबळावर सेंद्रीय शेतीचे प्रयोग हाती घेतले आहेत. 1993 पासून ते या मध्ये मग्न आहेत. आपले अनुभव सर्वांना वाटण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

लातूरहून बाभळगावकडे निघालो की बाभळगाव गावात शिरण्याआधीच डाव्या हाताला सोनवतीला जाणारा रस्ता लागतो. सोनवती गावातून डावीकडे वळले की साधारण एक किलोमीटर अंतरावर बडगिरे यांचा अकुजा सेंद्रीय फार्म लागतो. वयाची साठी ओलांडलेले पण पन्नाशीचे दिसणारे संदिपान बडगिरे तेथे असतात. त्यांच्या शब्दांब्दांतून त्यांचे कार्यकर्तेपण डोकावत असते. फक्त फरक एवढाच असतो, की या ‘कार्यकर्ते’पणाला ‘कार्या’ची जोड मिळालेली असते. हवेतील गप्पागोष्टी बडगिरेंना मान्यच नाहीत!

संदिपान निवृत्ती बडगिरे मूळचे सोनवतीचेच. 3 मे 1952 ही त्यांची जन्मतारीख. चौथीपर्यंतचे शिक्षण याच गावात झाल्यानंतर पाचवीपासून पुढे शिकण्यासाठी ते लातूरमध्ये दाखल झाले. त्या वेळच्या ‘पीयूसी’नंतर त्यांनी जून 1975 मध्ये बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. जुलै 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्यांची रवानगी तुरुंगात! 1977च्या जानेवारीत ते तुरुंगातून सुटले आणि शिक्षणाला रामराम ठोकून ते ‘युवक क्रांती दला’चे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून बाहेर पडले. 1986 पर्यंत त्यांनी स्वतःला याच कार्यात झोकून दिले. पुढे आयुष्याच्या एका वळणावर ते आपल्या गावी परतले आणि शेती करण्यास सुरवात केली. पहिली पाच-सहा वर्षे रासायनिक शेतीचे मार्ग चाचपडल्यानंतर 1993 पासून त्यांनी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगांना सुरवात केली. त्यांच्या आजोबांची शंभर एकर जमीन होती. पुढील दोन पिढ्यांमध्ये विभागणी होत आता संदिपानजींच्या वाट्याला 12 एकरांची जमीन आली आहे. 1993 पासून ही जमीन ते स्वतः कसतात. त्यांच्या शेतीत 100 टक्के सेंद्रीय खत व कीटकनाशकांचाच उपयोग होतो. कोणतेही रासायनिक घटक येथे वापरले जात नाहीत.

या विषयाची सुरवात 1993 मध्ये झाली. लौकीक शिक्षण बी. ए.च्या पहिल्या वर्षात थांबले असले तरी जीवनाच्या शिक्षणात त्यांनी उच्चशिक्षण प्राप्त केले होते. त्यांच्या कार्याला चिंतनाची, वाचनाची जोड होती. यातूनच शेतीतील पारंपरिक मार्गांची ओळख त्यांना झाली. भारतीय परंपरेत गोधन हे शेतीतील महत्वाचे साधन आहे. गोमुत्र पवित्र मानले जाते खरे, पण या पावित्र्याचा झापडबंद अर्थ न घेता त्यांनी त्यातील सारतत्व शोधण्याचा प्रयत्न केला आणि डोळसपणे त्याचे पावित्र्य तपासले. त्यातील पिकांना आणि माणसांना उपयुक्त असलेले गुणधर्म लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावर शास्त्रीय प्रयोग केले आणि त्यातून माणसांसाठी आणि पिकांसाठी उपयुक्त ठरणारे ‘गोशक्ती’ आणि ‘गोबाण’ यांची निर्मिती त्यांनी सुरू केली.

ते म्हणतात, ‘‘गावरान गायींच्या मुत्रात नायट्रोजन, सल्फर, अमोनिया, कॉपर, आयर्न, युरिक ऍसिड, फॉस्फेट, सोडियम असे विविध मौल्यवान घटक आहेत. अशा परिपूर्ण घटकांचा समावेश असलेल्या गोमुत्रावर विविध आयुर्वेदिक प्रक्रिया करून आम्ही गोशक्ती बनवितो. माणसांचे शरीर रोगमुक्त राहण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. ‘गोबाण’मध्ये याच गोमुत्रावर काही वेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. त्यात आणखी काही वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारण 21 दिवसांच्या प्रक्रियेनंतर ‘गोबाण’ विक्रीसाठी तयार होतो.’’
केवळ ही निर्मिती करून ते शांत बसले नाहीत. हा त्यांच्या कार्याचा एक छोटासा भाग आहे. त्यांनी हाती घेतलेले मुख्य कार्य आहे ते सेंद्रीय शेतीच्या व्यापक प्रचाराचे. या साठी त्यांनी अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत. पत्रके काढली आहेत. अनेक ठिकाणी जाऊन व्याख्याने दिली आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या स्वतःच्या 12 एकर शेतात ते स्वतः याच पद्धतीने शेती कसत आहेत. समर्थ रामदासांनी सांगितलेल्या ‘मूर्ख लक्षणां’मध्ये ’स्वतः न कसे, दुसर्‍यास कसाया न देई, शेती पाडून ठेवी, तो एक मूर्ख’ असे वर्णन आहे. तो आधार घेत ते शेतकर्‍यांची आगळी चळवळ उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

त्यांच्या मते सरकार प्रोत्साहन देत असलेली ‘व्यापारी शेती’ शेतकर्‍यांसाठी आणि देशासाठीही घातक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लॉर्ड मेकॉलेने 2 फेब्रुवारी 1835 रोजी केलेल्या भाषणात म्हटले होते, ‘‘भारत हा देश इतका समृद्ध आहे, तिथली नैतिक मूल्ये इतकी उच्च आहेत आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की आपण हा देश कधी जिंकू शकू असे मला वाटत नाही. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे. आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल, तर तोच कणा मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन श्रमाधारित शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल.’’ पुढचा इतिहास आपल्याला ठावूकच आहे. ब्रिटिशांनी शिक्षण आणि श्रमाची फारकत केली. ब्रिटिशांचे आदेश पाळणार्‍या गुलामांच्या फौजा त्यांनी निर्माण केल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही यात बदल झाला नाही. आता या फौजा सरकारचे ऐकतात. सरकारला हे चित्र बदलण्याची इच्छा नाही. पण हेच चित्र कायम राहिले तर हा देश नष्ट होईल, असे संदीपानजी सांगतात. या साठी सर्वात आधी शेतकरी शहाणा झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि सरकार शेतकर्‍याला शहाणा होऊच देत नाही, असा त्यांचा आरोप आहे. यावर उत्तर म्हणून ते स्वतःच ‘सेंद्रीय शेती जनआंदोलन’ चालवीत आहेत. साध्या जीवनपद्धतीचा स्वीकार, श्रमसंस्कृतीची जोपासना, व्यापारी व रासायनिक शेतीपद्धतीचा त्याग आणि शेतकर्‍यांचे संघटन या चतुःसुत्रीवर त्यांचे काम चालू आहे.

ते म्हणतात, ‘‘निसर्गालाच एक पीक पद्धत मान्य नाही. एकाच शेतात मिश्रपद्धतीने एकदल- द्विदल प्रकारची अनेक पिके आपण घेतली तर जमिनीतील अन्नघटक आणि ओलावा घेण्याची पिकांत स्पर्धा होत नाही. ही पिके कमी-जास्त उंचीची असल्याने आणि वेगवेगळ्या काळात वाढत असल्याने त्यांना सूर्यप्रकाशही भरपूर मिळतो. जमिनीवर सेंद्रीय पदार्थही भरपूर पडतात. त्यामुळे त्यावर जगणारे जिवाणूही योग्य प्रमाणात वाढतात. जमीनीवर सेंद्रीय पदार्थांचे अच्छादन निर्माण झाल्याने पावसाच्या पाण्याची ओल उडून जात नाही आणि वाफसाही लवकर येतो. त्यामुळे पिकांबरोबरच जमिनीचा पोतही सुधारतो.’’

या संदर्भात ते एक मॉडेलही शेतकर्‍यांसमोर ठेवू इच्छितात. ‘‘तीन फणांच्या औजाराने दक्षिण-उत्तर पेरणी करणार असाल, तर उत्तरेकडे पेरत जाताना बाजूच्या दोन नळ्याने तूर पेरून मधल्या नळ्याने हिरवळीचे पीक (ताग, धेंचा, बाजरी इ. द्विदल बियाणे) 1:2 या प्रमाणात मिसळून पेरावे आणि परत दक्षिणेकडे पेरत जाताना बाजूच्या दोन नळ्यांनी मूग पेरावे आणि मधल्या नळीने पिवळी ज्वारी किंवा आपल्या परिसरातील कोणतीही गावरान ज्वारी पेरावी. या पद्धतीने शेतात आपण दर 20 फुटांवर मुगाच्या ठिकाणी बदल करून उडीद, तीळ व सोयाबीन पेरू शकतो. या पद्धतीने एका शेतात आपण सात-आठ पिके पेरू शकतो. या पद्धतीत हिरवळीच्या लाईनमधील पिकाच्या दीड महिन्यांच्या अंतराने दोन छाटण्या करून तुरीच्या ओळीच्या शेजारी टाकल्याने जमिनीला सेंद्रीय पदार्थ मिळतात व त्यावर जिवाणू वाढतात. तसेच हिरवळीच्या (द्विदल) पिकाच्या व तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या मुळ्यावरील नत्राच्या गाठींमुळे जमिनीतील सेंद्रीय नत्राचे प्रमाण वाढते. तूर व पिवळा उंच वाढण्यापुर्वी मूग, तीळ, उडीद व सोयाबीन निघून जाते. तूर वाढण्यापुर्वी पिवळी ज्वारी निघून जाते आणि तुरीच्या वाढीला जागा मोकळी होते. पिवळ्या ज्वारीच्या मुळ्या जमीनीच्या वरच्या थरात वाढत जात असल्याने त्या मूग, उडीद व तीळ यांच्याशी स्पर्धा करीत नाहीत. तुरीच्या मुळ्या या सर्वांपेक्षा खोल जात असल्याने सर्वच पिकांची जोमदार वाढ होते. ही बहुविध पीक पद्धत असल्याने कोणत्याही पिकावरील अळीला सक्रीय होऊन वाढण्यात अडथळा येतो. ही पीकपद्धत दरवर्षी वेगळ्या जमिनीत घेतल्याने अळीची अंडी मातीत सुप्त अवस्थेत जास्त दिवस राहात नाहीत. या पद्धतीत रासायनिक फवारणी अजिबात केली जात नसल्याने सर्व मित्र किडी, पक्षी सुरक्षित राहतात. त्यामुळे या पद्धतीत पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. अशा पद्धतीने एकदल-द्विदल पिकांच्या अनेक जोड्या लावून खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना कोणतीही पिके पेरता येतील. या पद्धतीतून कोरडवाहू आणि बागायत जमिनीतून कमी पाण्यात, मातीचा पोत वाढवत हमखास उत्पन्न तर मिळेलच पण त्याच बरोबर कुटुंबाला लागेल ते सर्व प्रकारचे धान्य व भाज्या विषमुक्त, सकस, चवदार व टिकावू मिळतील तसेच जनावरांसाठी वैरणही मिळेल आणि हळूहळू उत्पादनखर्च शून्यावर येईल.’’

स्वबळावर हे सारे उपक्रम करणार्‍या संदिपानजींचा विविध चळवळींवरील विश्र्वास आता कमी झाला आहे. आपला विचार त्यांनी विविध व्यासपीठांवरून मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तेथे यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी आता आपला मार्ग स्वतःच बनविण्याचा निर्धार केला आहे. वयाच्या साठीमध्ये हा ‘युवक’ पुन्हा एकदा ‘क्रांती’ची हाक देत शेतकर्‍यांच्या ‘दला’च्या पुनर्स्थापनेची ललकारी घुमवीत आहे. या चळवळीत त्यांच्या पाठीशी आहे गांधीजींचे तत्वज्ञान...!
ंं
संदिपान बडगिरे
अकुजा सेंद्रीय फार्म, सोनवती, ता. जि. लातूर

सेंद्रीय शेती-001

सेंद्रीय शेतीचे हे आणखी एक उदाहरण...

अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’च्या 24 जून 2012 च्या भागात सेंद्रीय शेतीविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. हा खरोखरच अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यावर ठिकठिकाणी उत्तम प्रयोग सुरू आहेत. दुर्दैवाने या प्रयोगांना अद्यापही राजमान्यता मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचेही त्याकडे दुर्लक्ष होते.
माझ्या ‘आयकॉन्स’ सिरीजमध्ये अशी माणसे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. 11 मार्च  2012 रोजी प्रकाशित झालेल्या ‘नांदेड आयकॉन्स’मध्ये सेंद्रीय शेतीचे प्रचारक दिलीपराव देशमुख बारडकर यांच्या प्रयोगांचा वेध मी घेतला. हा लेख आपणा सर्वांसाठी...
-----------------------------------

रासायनिक खतांचे दुष्परिणाम त्यांनी स्वतः भोगले आहेत. त्यांच्या पायांवर आलेली सूज इतकी जास्त असायची की अनेकजण तो हत्तीरोग तर नाही ना, याची खातरजमा करण्यास सांगायचे. आयुष्यातील एका वळणावर ते सेंद्रीय शेतीच्या संपर्कात आले आणि त्यापासून मिळणारे लाभ पाहून त्यांनी स्वतःला या शेतीच्या प्रसारासाठी वाहून घेण्याचे ठरविले. सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या दिलीप देशमुख बारडकर यांची ही कहाणी...
-----------------------------------
नांदेडच्या कोंडेराव देशमुख यांच्या मुलाला - दिलीप देशमुख यांना शेतीची आणि त्या संबंधीच्या संशोधनांची भारी आवड. याच आवडीतून एम.एस्सी. ऍग्रीकल्चर झाल्यानंतर ते एका कीडनाशक कंपनीत संशोधक म्हणून रुजू झाले. ‘फील्ड रिसर्च’ हा त्यांच्या संशोधनाचा भाग होता. 1971 ते 1980 अशी साधारण 10 वर्षे त्यांनी कीडनाशक कंपनीत काम केले. या संशोधनकार्यात ते सहा राज्यांत विविध ठिकाणी कार्यरत होते. प्रत्यक्ष शेतीत कीडनाशकांची फवारणी करणे आणि त्यावर आधारित थेट संशोधन हे त्यांच्या नोकरीचे स्वरुप होते. पण 1980च्या दरम्यान या रसायनांचे दुष्परिणाम त्यांना जाणवू लागले. विशेषतः पायांवर येत असलेल्या सूजेमुळे त्यांना काम करणेही अशक्य झाले. अखेर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते 1980च्या सुमारास आपल्या गावी बारड येथे परतले. त्यानंतर 1998 पर्यंत त्यांनी रासायनिक खते वापरूनच शेती केली पण 1998 मध्ये झालेल्या एका प्रात्यक्षिकाने त्यांच्यात परिवर्तन घडून आले आणि तेव्हापासून आजतागायत ते सेंद्रीय शेतीचे कट्टर पुरस्करर्ते, प्रचारक आणि मार्गदर्शक बनले आहेत. कसे घडले हे परिवर्तन? योग्य वेळी डोळे उघडले की चांगला मार्ग दिसतो, याचेच हे प्रत्यंतर.


कोंडेराव देशमुख हे बारडचे प्रतिथयश शेतकरी. मोठी शेतजमीन. शेती बाळगून असतानाच ते वकिलीचा व्यवसायही करीत. या व्यवसायातही त्यांनी चांगली प्रतिष्ठा मिळविली होती. त्यांच्या पत्नी - सुशीलाबाई देशमुख समाजकार्य करीत. त्या काळात त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने राज्य सरकारने सन्मानित केले होते. अशा कुटुंबात दिलीप देशमुख यांचा जन्म 16 डिसेंबर 1949 रोजी झाला. वडिलांची वकिली आणि घरची संपन्न शेती या पार्श्वभूमीवर संपन्न परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले. शेती बारडला असली तरी या कुटुंबाचे वास्तव्य नांदेडमध्येच असे. नांदेडच्या पीपल्स हायस्कूलमधून 1965 मध्ये ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी शेतकी शिक्षणाचीच दिशा निवडली आणि 1969 मध्ये परभणीच्या कृषि विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. ऍग्रिकल्चरची पदवी मिळविली. त्यानंतर नागपूरच्या कृषि महाविद्यालयातून कीटकशास्त्रात त्यांनी एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली आणि 1971 मध्ये ते ‘सिबा’ या बहुराष्ट्रीय कंपनीत संशोधक म्हणून रुजू झाले.

इथे त्यांच्या घरातील माहितीही जाणून घेणे उद्बोेधक ठरेल! त्यांच्या घरात चार मुले आणि एक मुलगी. या चारपैकी एका मुलाने डॉक्टर व्हावे, एकाने इंजिनइर व्हावे, एकाने शेती पाहावी आणि एकाने नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची तीव्र इच्छा. ही इच्छा त्यांनी मुलांवर लादली नाही पण त्या दृष्टीने त्यांना प्रवृत्त केले. त्यानुसार इतर भावांचे शिक्षण पार पडले आणि वडिलांच्या इच्छेनुसार आणि त्याच बरोबर स्वतःच्या कलानुसार दिलीपराव शेतीच्या क्षेत्रात उतरले. घरची भरपूर शेती. या शेतीतही आपल्या शिक्षणाचा उपयोग होईल असा त्यांचा होरा होता. या सार्‍या शिक्षणप्रवासात एक उल्लेखनीय बाब म्हणजे दिलीपरावांनी कधीही ट्यूशन लावली नाही. शाळा-कॉलेजातील शिक्षण आणि स्वतःहून घरी केलेला अभ्यास यांच्याच बळावर ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होत गेले. एम.एस्सी. सुद्धा त्यांनी ‘डिस्टिंक्शन’मध्ये पूर्ण केले.

कृषी क्षेत्रातील संशोधनाच्या आवडीतून दिलीपरावांनी ‘सिबा’ जॉईन केली. चांगला पैसा देणार्‍या सेल्स किंवा मार्केटिंगपेक्षाही बुद्धीचा कस लागणार्‍या ‘रिसर्च’चे क्षेत्र निवडण्यामागे त्यांचा हेतू शेतीच्या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचाच होता. ही कंपनी विविध प्रकारची कीडनाशके, रोगनाशके आणि तणनाशके बनवीत असे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांतून ते या कंपनीसीठी फिल्ड रिसर्च करीत असत. या सर्व ठिकाणी 1971 पासून पुढे दहा वर्षांत त्यांनी काम केले. भाजीपाला, चहा, कॉफी यासह सर्व प्रकारच्या पिकांवरील रासायनिक प्रयोग ते करीत. या प्रयोगांचे काही दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर झाले. दुष्परिणाम कसले? ते तर ‘स्लो पॉयझनिंग’ होते. त्यांच्या पायांवर सूज येत असे. पाय इतके सुजत की अनेक जण चक्क हत्तीरोगाची तपासणी करण्याचा सल्ला देत. याचा त्रास 1980 मध्ये खूपच वाढला. काही प्रमाणात किडनीवरही दुष्परिणाम जाणवू लागले. मग मात्र त्यांनी थांबायचे ठरविले. नोकरी सोडली आणि ते नांदेडला परतले. विचारपूर्वक पुढील दिशा ठरवीत त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच ते पत्नी विजया देशमुख यांच्यासह सहकुटुंब बारडमध्ये येऊन दाखल झाले. तेथील निसर्गसंपन्न वातावरणात आपल्यावरील रासायनिक दुष्परिणाम नक्कीच कमी होतील, याबद्दल त्यांना विश्वास वाटत होता. नांदेडचे डॉ. व्ही. एस. कुलकर्णी यांनी त्यांना नॅचरोपथीची ट्रीटमेंट सुरू केली. आवडीचेच क्षेत्र असल्याने दिलीपराव शेतात चांगलेच रमले. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग केले. आधुनिक शेतीच्या स्वरुपात हे प्रयोग होते. इथेही ते रासायनिक कीडनाशकेच वापरत. पण या वेळी ते स्वतः दूर राहून मजुरांकडून ही कामे करून घेत. याच काळात त्यांनी डेअरी सुरू केली. दररोज 100 लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन त्यांनी सुरू केले. तुती पालनाचा व्यवसाय सुरू केला. दूध काढण्याचे जिल्ह्यातील पहिले स्वयंचलित मशीन त्यांच्या डेअरीत सर्वप्रथम सुरू झाले. शेतीत ठिबक सिंचन, तुषार सिंचनाची यशस्वी अंमलबजावणीही त्यांनी केली. हा क्रम 1980 ते 1998 या दरम्यान सुरू होता.  याच काळात 1997 मध्ये एक वेगळा विषय त्यांच्यासमोर आला. हा विषय सेंद्रीय शेतीचा होता. नागपूरचे ऍड. मनोहर परचुरे यांच्या संपर्कातून सेंद्रीय शेतीचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि 1998 मध्ये नांदेडला कृषि विज्ञान मंडळाची स्थापनाही झाली. दिलीपराव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बनले. ऍड. परचुरे यांचा संपर्क या काळात वाढला होता. 1998 मध्ये मुंबईत ‘ऍग्रो ऍडव्हान्टेज’ हे प्रदर्शन भरणार होते. या प्रदर्शनाला जाण्याचे दिलीपरावांनी निश्चित केले होते. पण ऍड. परचुरे यांनी त्यांना त्या ऐवजी विदर्भात सहकुटुंब येऊन सेंद्रीय शेतीची प्रात्यक्षिके पाहण्याचा आग्रह केला. तो मानून दिलीपरावांसह 8 ते 10 जणांनी आपल्या कुटुंबासह 10 दिवसांची विदर्भ सहल आयोजित केली. यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपूर या परिसरातील अनेक शेतांना त्यांनी भेटी दिल्या आणि तेथील सेंद्रीय शेतीच्या प्रयोगांनी ते प्रभावित झाले. त्या आधी ते स्वतः सेंद्रीय शेतीकडे फारसे आस्थेने पाहत नसत. औषध न फवारता शेती होऊच शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्र्वास होता. ते स्वतः कृषि क्षेत्रातील उच्चशिक्षित होते आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाचा अनुभव त्यांच्या गाठीला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी करून घेतलेला हा समज तसा योग्यच होता! पण विदर्भातील ही प्रात्यक्षिके त्यांनी पाहिली आणि त्यांचा दृष्टीकोन बदलू लागला.

सेंद्रीय शेतीत कार्यरत असलेल्या पुणे येथील विक्रम बोके, पी. बी. शितोळे, परचुरे आदींशी 1999 मध्ये त्यांचा संपर्क आला. तेव्हापासून दिलीपरावांच्या सेंद्रीय शेतीतील प्रयोग आणि प्रसाराला वेग आला. याच काळात त्यांच्या कृषि विज्ञान मंडळाला राज्यस्तरीय सेंद्रीय मेळाव्यात पुरस्कारही प्रदान करण्यात आला. 2000 पासून त्यांनी ‘महाराष्ट्र ऑरगॅॅनिक फार्मिंग फेडरेशन’च्या (मॉफ) उपाध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली. 2005 पासून ते बारडहून पुण्यात दाखल झाले आणि ‘मॉफ’च्या मुख्यालयातून त्यांनी कामकाजाला प्रारंभ केला. त्यांच्या येण्याने ‘मॉफ’च्या परिवारात एका चांगल्या माणसाची भर पडली.

शेतीतील आवड आणि अनुभव असणारी व्यक्ती ‘मॉफ’च्या सेंद्रीय शेतीसाठी आग्रही असणार्‍या परिवारात आली हे या चळवळीच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करताना झालेल्या रासायनिक कीडनाशकांच्या दुष्परिणामांचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला होता. या पार्श्वभूमीवर सेंद्रीय शेतीतील प्रयोगांचे फायदे त्यांना अधिक लवकर लक्षात आले आणि रासायनिक शेतीमध्ये काम केलेल्या माणसाने सेंद्रीय शेतीची भलावण करण्यामुळे शेतकर्‍यांना तो मुद्दा अधिक प्रभावीपणे पटणे सोपे झाले. मात्र, शेतकर्‍यांना या गोष्टी तत्वतः समजावून सांगणे सोपे असले तरी व्यवहारातील जोड देणे अतिशय आवश्यक होते. दिलीपराव म्हणतात, लोक सेंद्रीय शेती करण्यासाठी तयार होतात पण पहिल्याच वर्षी त्यांचे उत्पन्न घटते. मग ते पर्याय शोधू लागतात आणि त्यातून जमिनीचा अधिकच र्‍हास होऊ लागतो. यासाठी ते आता काही विशिष्ट पद्धती विकसीत करीत आहेत. रासायनिक खते पूर्णतः बंद करायची हे त्यांचे पहिले तत्व आहे. अगदी प्रारंभी गांडुळ खत टाकायचे आणि नंतर दुर्लक्ष करायचे हे हे उपयोगाचे नाही, हे त्यांच्या लक्षात आले. पिकांच्या वाढीच्या काळातही त्यांना ‘ऑरगॅनिक इनपुट्‌स’ देणे आवश्यक ठरते. पेरणीतील अंतर, पिकांची जात, पेरणी पूर्व पश्चिम की दक्षिणोत्तर, आंतरपिके कोणती घेतली जातात, घेतली जातात की नाही हे प्रत्येक मुद्दे या दृष्टीने महत्वाचे ठरतात, असे ते सांगतात.

सेंद्रीय शेती ‘मोनोक्रॉपिंग’ म्हणजे एका वेळी एकच पिक घेणे मान्य करीत नाही. उदाहरणार्थ सोयाबीन काढायचे तर त्यात मूग, मका, चवळी ही पिके घेतलीच पाहिजेत. यामुळे जमिनीचा कस टिकतो आणि जमीन सशक्त होते. हिरवळीची खते हा आणखी एक प्रकार ते सांगतात. 60 टक्के द्विदल बी, 30 टक्के एकदल बी आणि 10 टक्के तेलबिया एकत्र करून दर एकरी 20 किलो बियाण्यांचा पेरा करायचा आणि साधारण 40 दिवसांत वाढलेली पिके कापून जमिनीत अंथरायची आणि सुकू द्यायची, या मुळे जमीन सशक्त होते. यानंतर नियमीत पेरणीसाठी जमीन कसण्यास सुरवात करायची. अशा प्रकारे मॉन्सुनच्या आधी किमान 40 दिवस पूर्वतयारी केल्यास पिके चांगली येतात, असा अनुभव ते सांगतात. शेती मूलद्रव्यांची नसून जिवाणूंची असते हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे ते आवर्जुन सांगतात. जमिनीत जिवाणू वाढले तरच पिकांची वाढ चांगली होते कारण पिकांना हवी असलेली जीवनसत्वे जिवाणूच पुरवीत असतात असे सांगताना ते ‘थइरी ऑफ ट्रान्सम्युटेशन’चा आधार घेतात. 1888 मध्ये बॅरन हॅरझेले या शास्त्रज्ञाने मांडलेला हा सिद्धांत अनेक कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंनाही माहिती नाही, असे सांगताना ते म्हणतात, ‘या थइरीनुसार जमिनीत सर्व प्रकारचे जिवाणू असतात. पिकांनुसार ते आपोआपच कमी अधिक होत असतात. पिके आपल्याला पोषक जिवाणूंना स्वतःहून बळ देतात आणि ते जिवाणू पिकांना घातक असलेल्या जिवाणूंचा आपोआपच नायनाट करतात. यातून निसर्गाचा समतोल राखत पिकांना आवश्यक ती जीवनसत्वे मिळतात. जे कमी आहे ते आपोआप तयार होते, नको आहे ते आपोआप कमी होते’. हवेत, झाडांवर, जमिनींत उपयुक्त आणि उपद्रवी असे दोन्ही प्रकारचे किडे - जिवाणू असतात. रासायनिक फवारणीने सरसकट सर्वच जिवाणूंचा नाश होतो आणि पिके निःसत्व बनतात. त्यामुळे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली जाईपर्यंत पिकांवरील किडींकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते, असे ते आवर्जुन सांगतात.

मिजोराम, कर्नाटक, केरळ, बिहार आदी राज्यांत रासायनिक शेती - जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे यांवर अनेक प्रतिबंध आणण्यात आले आहेत, मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणवल्या जाणार्‍या राज्यात राज्यकर्त्यांनी बड्या कंपन्यांच्या दबावाखाली झुकून या कडे दुर्लक्ष केले आहे, अशी खंतही ते व्यक्त करतात. राज्याने सेंद्रीय शेतीविषयक धोरण ठरविले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. स्वतःच्या कारकीर्दीची सुरवात रासायनिक कीडनाशकांपासून झालेले दिलीपराव आता संपूर्णतः सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते झाले आहेत. हे परिवर्तन घडवून आणताना न्याय्य हक्कांसाठी न्यायालयीन लढा देण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. 1997 मध्ये इंडोजर्मन कंपनीकडून त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी टरबुजाचे बियाणे खरेदी केले होते. आपापल्या शेतीत पेरलेले हे बियाणे उगवलेच नव्हते. या कंपनीवर कारवाई करण्यासाठी त्यांना तेव्हापासून लढा उभारला होता. या लढ्याला शासनाने अजिबात पाठबळ दिले नाही. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. दिलीपरावांनी आपल्या सहकारी शेतकर्‍यांसह या कंपनीला पुण्याच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात खेचले. मंचाने प्रत्येकी एकरी 40 हजाराची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्या विरुद्ध त्या कंपनीने मुंबईत राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचात दाद मागितली. तेथेही शेतकर्‍यांची बाजू खरी ठरली आणि आता सन 2011 मध्ये त्या न्यायालयाने शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानुसार या सर्वांना प्रत्येकी सरासरी 3 ते 4 लाख रुपये आणि त्यावरील 18 टक्क्यांप्रमाणे व्याज मिळणार आहे. त्यांच्यातील संघर्षशील वृत्तीचाच हा पुरावा!

सेंद्रीय शेतीबरोबरच शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत ते आग्रही आहेत. सेंद्रीय शेतीचा अवलंब करणार्‍या शेतकर्‍यांना पहिल्याच वर्षीपासून आधीच्या वर्षाइतके उत्पन्न सुरू झाले पाहिजे आणि नंतर ते हळूहळू वाढत गेले पाहिजे या साठी ते प्रयत्नशील आहेत. शेतकर्‍यांनी आपला शेतीमाल प्रक्रिया केल्याशिवाय विकू नये आणि त्यातही दलालांना फाटा देऊन थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल कसा पोहोचवता येईल, या साठी त्यांनी आपल्या संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी ठिकठिकाणी कंपनी कायद्यानुसार शेतकर्‍यांच्या संस्था उभारल्या जात आहेत. याचे एक उत्तम उदाहरण वाशीम येथे उभे आहे. तेथील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन उभारलेल्या संस्थेमुळे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहेत. ‘मॉफ’तर्फे ते शेतकर्‍यांसाठी 3 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करतात. शेती आणि शेतकर्‍यांच्या संपन्नतेसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

शेतीबरोबरच वैयक्तिक पातळीवरही दिलीपराव नवमतवादी आहेत. त्यांच्या पत्नी विजया यांचीही त्यांना साथ आहे. याच दृष्टीतून त्यांनी 1976 मध्ये एकाच मुलीच्या जन्मानंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली. मुलगा -मुलगी असा भेद मानत नसतानाच फक्त एकाच मुलीवर थांबण्याचा 1976 च्या काळात त्यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच क्रांतीकारी होता. या क्रांतीमध्ये त्यांच्या पत्नीचीही त्यांना साथ मिळाली. ही साथ एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. विजयाताईंनी सेंद्रीय शेतीतही लक्ष घातले आहे. त्यांच्या माहेरीही चांगली शेती होती. त्यामुळे त्या ही शेतीच्या वातावरणात रमल्या. बारडच्या शेतीतील प्रयोगात त्यांचे लक्ष असे. सेंद्रीय शेतीतही त्यांनी लक्ष घातले आणि आता तर त्या सेंद्रीय शेतीची प्रशिक्षण शिबिरे घेतात! आपले शेतीतील अनुभव आणि घेतलेले प्रशिक्षण यांच्या बळावर त्या सेंद्रीय शेतीच्या ‘प्रचारक’ बनल्या आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी आता हा ‘सपत्निक वसा’ घेतलेला आहे. त्यांनी ‘समृद्धीसाठी सेंद्रीय शेती’ हे पुस्तक लिहिले असून त्यांचे दुसरे पुस्तक ‘ऑरगॅनिक फार्मिंग सिस्टिम्स फॉर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर’ लवकरच प्रकाशित होत आहे. केवळ ‘थइरी’ऐवजी ‘प्रॅक्टिकल’वर भर देण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सेंद्रीय शेतीची ही विचारधारा झपाट्याने सर्वत्र विस्तारते आहे.
ंं
दिलीप देशमुख बारडकर
उपाध्यक्ष ‘मॉफ’, 1038/11, बालाजी निवास, फ्लॅट क्र. 5, कॉसमॉस बँक लेन,
दीप बंगला चौक, मॉडेल कॉलनी, पुणे - 16

दुग्धं दर्शयामि चीजं दर्शयामि


तयार झालेले चीज बाहेर पडताना “हे पहा, इथून दूध येतं, हे पहा, इथं त्याचं दही होतं. या टाकीत दही कडक करून त्याचे तुकडे पाडतात. पहा, इथून चीजचे तयार ब्लॉक बाहेर पडतात,” मिश्रा साहेब आम्हाला सांगत होते आणि आम्ही ‘वा वा’, ‘ओ हो’ करून वेळ मारून नेत होतो. त्या असंख्य नळ्या, नळ आणि टाक्या पाहून झाल्यानंतर लक्षात काय राहिलं असेल, तर सर्वात आधी दूध असतं आणि सर्वात शेवटी त्याचं चीज होतं.  हे एक सत्य शिकणं, यातच आमच्या बुद्धीचे चीज झाल्यासारखं आहे.
गोवर्धन या ब्रॅण्डने दुग्ध उत्पादन करणाऱ्या पराग मिल्क यांचा चीज उत्पादनाचा प्रकल्प मंचरजवळ आहे. आशियातील चीजचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. कंपनीचे मालक देवंद्र शहा यांच्या आदेशावरून मिश्रा साहेब आम्हाला अख्खा प्रकल्प फिरवून दाखवत होते. त्यात दूध कुठं जमा होतं, कोणत्या टाक्यात जातं, किती डिग्रीवर उकळतं, हे सगळं कसं स्वयंचलीत आहे, कुठंही माणसाचा हात लागत नाही हे ते यथासांग सांगत होते. मात्र आमच्या टाळक्यात त्यातलं काही जाईल तर शप्पथ. बरं, हे त्यांना सांगता येईऩा. पत्रकार म्हणवून घेतात स्वतःला आणि इतकंही काही समजत नाही, असं त्यांना वाटण्याची शक्यता. मग त्यातल्या प्रत्येक गोष्टीला ‘मम’ म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच काय होता?
यंत्रांच्या जंजाळातील चीजचे उत्पादन एक तर त्या सगळ्या आसमंतात दुधाचा वास पसरला होता.  मला त्या वासाने काहीसं अस्वस्थ व्हायला होत होतं. त्यात ते अगडबंब नळकांडे पाहिल्यावर काहीसं खट्टू व्हायला होतं. त्यात दुधाच्या पदार्थांबद्दल आमची पाटी अगदी दुधासारखीच पांढरी शुभ्र. त्यामुळं स्लाईसचं चीज आणि पिझ्झाचं चीज याच्यात काय फरक असतो हे आम्हाला कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्या अधिकाऱ्यांनी बिचाऱ्यांनी आपली कामं सोडून आमची ट्यूशन घ्यावी, अशी अपेक्षा तरी कशी करणार. त्यामुळे मुकाट्यानं ते जे सांगत होते ते ऐकून घेण्यापलिकडे आम्हाला काम नव्हते.
त्या तासाभराच्या धड्यानंतर लक्षात राहिलं एवढंच, की या कारखान्यात दिवसाला चाळीस टन चीजची निर्मिती होते आमि त्यासाठी चार लाख लिटर दूध दररोज लागतं. हे दूध साठवण्यासाठी तीन टाक्या बाहेर उभ्या केलेल्या आहेत. टॅंकरमधून सरळ या टाक्यांत दूध जातं आणि तिथून ते गरम होण्यासाठी जाते.  साधारण 30 अंश सेल्सिअस तापमानाला आल्यानंतर एका ठिकाणी 26 मिनिटांत त्याचं दही करण्यात येते. (विरजणासाठी वापरलेले पावडर डेन्मार्कहून आयात करण्यात येतं-मिश्रा) पुढच्या एका टाकीत या दह्यातील पाणी आणि मुख्य पदार्थ वेगवेगळे केले जातात. अगदी रवाळ स्वरूपात असलेल्या या मुख्य पदार्थाचेच नंतर चीज तयार केले जाते.  त्यातील एक चीज मोठ्या ठोकळ्यांच्या स्वरूपात कापले जाते आणि दुसरे पुढे पाठवून पिझ्झासाठीचे (बहुतेक मोझ्झेरेला) चीज तयार केले जाते.
Cheese storage शीतगृहात साठवलेले चीजगोवर्धनच्या ब्रॅण्डखाली अनेक उत्पादन तयार केले जातात. मात्र त्यातील मुख्य आहे चीजचे. महिन्याला 480 टन चीजच्या उत्पादनापैकी साधारण 320 टन कोरियाला निर्यात करण्यात येते.  आम्ही गेलो तेव्हा प्रकल्पाचे काही बांधकाम चालू होते. मात्र मिश्रा आणि त्यांचे सहकारी अगदी भरभरून आम्हाला कारखाना दाखवत होते. उत्पादनच नाही तर स्टोरेजसुद्धा. “आपको सिमला-काश्मीर देखना है,” असं विचारत त्यांनी कोल्ड स्टोरेजचा दरवाजा उघडला. एक सेकंदात उणे तापमानाची शिरशिरी पायांपासून सुरू होऊन अंगभर पसरली. तिथे अगदी चीजचे भांडारच ठेवलेले. बाहेरच्या जगात दुध टंचाई आणि दुधाच्या दरवाढीवर चर्चा चालू होती आणि तिकडे आम्ही दुधाचे भांडार बघत होतो.  त्या दुधाच्या स्रोताबद्दलच आम्हाला उत्सुकता होती. त्याबद्दल पुढच्या पोस्टमध्ये…

भारतीय भूमीवरील ब्रिटिश गोपालक


एडमंड पायपरएडमंड पायपर यांना भेटण्यापूर्वी केवळ एक ब्रिटीश व्यक्ती मंचरला गाईंचा गोठा सांभाळण्या साठी आला आहे, हीच आमची कल्पना होती. पायपर यांच्याशी तासभर गप्पा मारून निघाल्यानंतर शेती, पशुपालन आणि व्यावसायिकता यांच्याबद्दलच्या अनेक नव्या कल्पनांनी आमची झोळी भरून गेली होती. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली होती. भारतीय शेतकऱ्यांचे दुखणे कुठे आहे, याची अंधुकशी कल्पना आली होती. तसेच भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे, मला काहीही माहित नसताना वाटायचे सगळे माहित आहे आणि जसजसे कळत गेले तसतसे जाणवत गेले, की मला काहीही माहित नाही.
गोवर्धन फार्मगेल्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, दररोज चाळीस टन चीज बनण्यासाठी 'गोवर्धन'ला लागणारे दूध पुरविले जाते ते मंचरजवळच असलेल्या एका फार्मवर सांभाळलेल्या गाईंपासून. 'लोकमत'मध्ये पायपरबद्दल आलेली एक त्रोटक बातमी वाचून आम्ही तिथे गेलो होतो. आमच्यादृ्ष्टीने ही एक रंजक घटना होती. त्यात रंजक काही नसून व्यावसायिकता आणि वैज्ञानिक माहितीचे ते एक उपयोजन होते, हे कळाले पायपर यांच्याचकडून.
शेतीविज्ञानात पदवी घेतल्यानंतर पायपरनी मायदेशी इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी कामे केली. लहानपणापासून शेतावर राबल्यामुळे शेतातच काम करण्याची आवड होती. इंग्लंडमधील यंत्रणेमुळे आणि लाल फितीच्या कारभारामुळे पायपरला कंटाळा आला आणि स्वारी निघाली पोलंडला. तिथून हंगेरी, सौदी अरेबिया बहारिन आणि जॉर्डन अशी यात्रा करून पायपरची  स्वारी भारतात आली. शहा यांनी 'गोवर्धन’च्या उत्पादनांसाठी ऑऱ्गॅनिक फार्मिंगचे प्रमाणपत्र मिळण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी डेअरी व्यवसायातील आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन करण्यासाठी त्या प्रकारचे ज्ञान असणारी व्यक्ती हवी होती. त्यातून आधी मायकेल नावाच्या एकाची आणि दीड वर्षांपूर्वी पायपर यांची निवड करण्यात आली.
“मला केवळ काम म्हणून करायचे असते, प्राण्यांवर माझं प्रेम नसतं तर इथं एक क्षणभरही थांबलो नसतो,” पायपर म्हणाले. कारण सुमारे तासभर जनावरांच्या पालनाबाबत मांडलेली भूमिका आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे असे काही गणित मांडले होते, की गाय म्हणजे त्यांना केवळ कच्चा माल वाटतो की काय अशी शंका मला आली होती. 2300 गाई आणि सुमारे शंभरेक कालवडी सांभाळणाऱ्या पायपरना विचारलं, की कालवडींना पिंजऱ्यात का ठेवलं आहे तर ते म्हणाले, कारण त्या उद्याच्या गाई आहेत. त्यांना काहीही इजा होऊ द्यायची नाही यावर त्यांचा कटाक्ष आहे. ते अशा थराला, की कालवडींना देण्यात येण्याऱ्या खाद्यावर माशा बसू नयेत, म्हणून ते झाकून ठेवण्यात येतं. त्यामुळे त्या प्राण्यांवर त्यांचे प्रेम आहे का नाही हा प्रश्न मला सतावत होता.
भाग्यलक्ष्मी फार्म, मंचर सुमारे तेवीसशे गाईंना तसेच कालवडींना स्वतंत्र क्रमांक देण्यात आला आहे. त्यांच्या अंगावर एक चिप बसविण्यात आली आहे त्यातून त्या गाईवर संगणकाद्वारे लक्ष ठेवण्यात येते. या गाईने किती खाद्य घेतले, तिच्य़ापासून किती दूध मिळाले, तिला कोणता आजार आहे का, तिच्यात आजाराचे काही लक्षणं आहेत का, हे सगळं त्या एका चिपच्या साहाय्याने पाहण्यात येतं. एवढंच नाही तर एखाद्या गायीने दिलेल्या दुधाचे तापमान जास्त असलं तर काहीतरी गडबड आहे, हेही त्या संगणकाच्या साहाय्याने कळतं. पन्नास गाईंचा एक गट अशा रितीने रोलर पार्लर नावाच्या यंत्रावर चढवून पाच मिनिटांत दूध काढण्यात येतं. या सगळ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पायपर साहेबांवर आहे.
ते हे काम काटेकोरपणे करत आहेत, याची चुणूक आमची गाडी भाग्यलक्ष्मी फार्ममध्ये प्रवेश करतानाच मिळाली. फाटकाजवळच जीपवर जंतुनाशकाचा फवारा करण्यात आला. त्यानंतर कालवडींच्या गोठ्यात जातानासुद्धा जंतुनाशक मिसळलेल्या पाण्यात पाय बुडवूनच आत प्रवेश करावा लागला. गायींचे दूध यंत्राद्वारे तीन वेळेस काढण्यात येते. ते पाहण्यासाठी खास प्रेक्षागृह केलेले आहे. तिथेच पायपर आणि आमचा संवाद झाला. आधी काहीसा आखडू वाटणारा हा माणूस नंतर एवढा खुलला, त्याला आवरताना आमच्या नाकी नऊ आले होते.
“भारतात सर्वाधिक गायी आहेत, पशुधन आहे. मात्र जगात प्रति गाय दुधाचे उत्पादन सर्वात कमी आहे. याचं कारण इथल्या लोकांना दिलेली चुकीची माहिती आणि काळानुसार न बदलणे,” हे त्यांचं निदान होतं. एकावेळी पाच पाच हजार गाईंचे गोठे सांभाळण्याऱ्या माणसानं ते सांगितलं म्हणजे खरंच असणार.
“ब्रिटनध्ये माणसांना पगार खूप द्यावा लागतो. त्यामुळे तिथे एवढा फार्म चालविण्यासाठी दोन किंवा तीन माणसे पुरतात. तुमच्या इथे माणसं मुबलक मिळतात. शिवाय त्यांना अनेक कामं करायला आवडत नाहीत. एक माणूस एकच काम करू पाहतो. गाई ढकलायला एक माणूस आणि मशीन चालू करायला दुसरा माणूस कशाला पाहिजेत? गाईंना एवढे आजार होतात त्यांच्यासाठी आम्हाला लसीसुद्धा मिळत नाहीत. फक्त तीन लसी घेण्यासाठी सरकारी परवानगी देत. इथं एवढ्या माशा आहेत, किडे आहेत त्यामुळे गाईंना खूप सांभाळावं लागतं. आता आम्ही इतक्या कडेकोट वातावरणात गाईंना ठेवलंय आणि त्यासाठी गुंतवणूक केलीय. पण सगळेच ते करू शकतील असं नाही,” त्यांचं सांगणं चालू होतं.
तिथे काम करणाऱ्या माणसांनी सांगितलं, की पायपर यांना जुजबी मराठी येतं. त्याच्या साहाय्याने त्यांनी हाताखालच्या माणसाला अगदी तयार केलंय. एका सहाय्यकाकडे बोट दाखवून ते विचारू लागले, “हाच माणूस जर जनावरांच्या खुराकाकडे लक्ष देऊ शकला, त्यांच्या बारीक सारीक बदलांकडे लक्ष ठेवू लागला, वेळेवर सगळी निरीक्षणे घेऊ शकला तर डॉक्टरची गरजच पडणार नाही. डॉक्टरचे काम फक्त आजारी प्राण्यावर उपचार करण्यापुरतेच राहतील. प्राण्यावर लक्ष ठेवण्याचं, रोगाचं निदान करण्याचं काम हाच माणूस करेल ना.” हे धोरण काहीसं सफल झालं असावंही कारण फार्मवर ठेवलेल्या कालवडींपैकी फक्त एक टक्का कालवडींचा मृत्यू झाला. शिवाय भारतात कालवडींचा वाढीचे सरासरी प्रमाण दररोज तीनशे ग्राम असताना या कालवडींचा वाढीचे प्रमाण दररोज नऊशे ग्राम आहे.
हा माणूस इतक्या दूर का आला असवा? हाच प्रश्न विचारला असता पायपरचे उत्तर होते,  “मला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला आवडते. तिथली संस्कृती जाणून घ्यायला आवडते. दर दिवशी नवीन काहीतरी जाणून घ्यायला आवडते. शेवटी थेअरी सगळीकडे सारखीच असते. प्रात्यक्षक वेगवेगळे असतात. मी याच्यापेक्षाही उष्ण देशांमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे मला इथं फारसं वेगळेपण जाणवत नाही.”
फार्मजवळच्याच एका बंगल्यात पायपर राहतात. त्यांना कोणीतरी विचारलं,  “तुम्हाला इथं चर्च नाही मग कसं करता?” त्यावर त्यांचं उत्तर होतं, “माझा देव चार भिंतीच्या आत नाही. तो सगळीकडे आहे. त्यामुळे मला चर्चमध्ये जाण्याची गरज नाही. ”

शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून जपू या तुरीचा फुलोरा

झाली असेल तर मध्यम व उशिरा परिपक्व होणारे वाण ऑक्‍टोबरमध्ये जमिनीच्या मगदुरानुसार कळी व फुलोरा अवस्थेत येतील. पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी म्हणजेच हेलिकोव्हर्पाची मादी प्रामुख्याने अंडी घालण्यास सुरवात करते. ही बाब दुर्लक्षित झाल्यास अळीचा प्रादुर्भाव पिकाला नुकसानकारक ठरतो. तूर पिकाच्या अवस्थेनुसार पाहिल्यास साठवणुकीच्या काळात तसेच कायिक वाढीच्या अवस्थेत होणाऱ्या प्रादुर्भावापेक्षा कळ्या, फुले व शेंगांवरील प्रादुर्भाव आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसानकारक ठरतो.

किडीच्या प्रादुर्भावाचा इशारा
यंदा खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, सूर्यफूल पिकांवर हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा (अमेरिकन बोंड अळी) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला. लवकर परिपक्व होणारे तुरीचे वाण सध्या फुलोऱ्यात आहेत, त्यावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे मध्यम कालावधीच्या तुरीवरही यंदा तिचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हे वाण फुलोऱ्यात आल्यावर त्यांचे काळजीपूर्वक सर्वेक्षण करणे आवश्‍यक आहे.

हेलिकोव्हर्पाबाबत महत्त्वाच्या गोष्टी
ही बहुभक्षी कीड आहे.
तिची नावे - अमेरिकन बोंड अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी
पिके - तूर, हरभरा, वाटाणा, उडीद, मूग, मसूर तसेच चवळीवर प्रादुर्भाव आढळून येतो.
तुरीवर 25 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत या किडीच्या प्रादुर्भावाची नोंद झाली आहे. अनुकूल उदा. ढगाळ वातावरण असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
किडीची ओळख
पतंग शरीराने दणकट, पिवळसर.
पंखाची लांबी सुमारे 37 मि.मी.
पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके, मागील पंखांच्या कडा धुरकट रंगाच्या.

किडीचा जीवनक्रम
मादी पतंग पीक फुलोरा अवस्थेत आल्यावर अंडी घालण्यासाठी पिकाकडे आकर्षित होते व कळी, फुले व शेंगांवर अंडी घालते. अंडी अवस्था तीन ते चार दिवसांची असते. पूर्ण विकसित अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटासुद्धा आढळतात), 37 ते 50 मि.मी. लांब असून, तिच्या शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. अळी अवस्था 17 ते 23 दिवस असते. कोष जमिनीत असतात. कोषावस्था नऊ ते 11 दिवसांची असते. पाच ते सहा आठवड्यांत किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो.

नुकसान
अळी लहान असताना पानांवर, तर पीक फुलोऱ्यावर असताना कळ्या, फुले व शेंगांना नुकसान करते. सहसा पानांवरील प्रादुर्भाव आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक नसतो. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव कळी व फुलांवर, तर नंतरच्या अवस्था फुलांपेक्षा शेंगांवर जास्त आढळतात.
अळी शेंगांवर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगांतील परिपक्व तसेच अपरिपक्व दाणे खाते.
हेलिकोव्हर्पाची एक अळी साधारणतः तुरीच्या 20- 25 शेंगांचे नुकसान करते. प्रथिनांचे जास्त प्रमाण असलेल्या शेंगा व दाण्यांवर उपजीविका केल्यामुळे किडीची प्रजनन क्षमता वाढत असल्याचे आढळले आहे. एका प्रयोगानुसार तुरीच्या प्रति झाडावर एक अळी असल्यास उत्पादनात हेक्‍टरी 138 किलो घट, तर एका झाडावर तीन अळ्या असल्यास हीच घट 308 किलो प्रति हेक्‍टर इतकी राहते.

शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एक वेळ पिकाचे सर्वेक्षण करावे. हेक्‍टरी 12 ते 24 झाडांच्या निरीक्षणावर आधारित नियंत्रणाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. संख्येचा अंदाज घेण्यासाठी लिंगाकर्षण सापळ्यांचा चांगला उपयोग होतो.
सर्वेक्षणासाठी सापळ्यात हेक्‍झालूरचा वापर करावा. शेतात प्रति हेक्‍टर पाच ते दहा सापळे पिकापेक्षा एक फूट उंचीवर लावावेत. रोज सापळ्यातील नर पतंगांची नोंद घेऊन ते मारून टाकावेत. पतंगांची संख्या सतत तीन दिवस आर्थिक नुकसानीच्या मर्यादेपेक्षा जास्त (सतत तीन दिवस आठ ते दहापेक्षा जास्त) आढळल्यास त्वरित पीक संरक्षणाचे उपाय करावेत. ही पातळी शेतात होणाऱ्या प्रादुर्भावाचे सूचक आहे.
शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीवर (10 अळ्या प्रति 10 झाडे) असल्यास नियंत्रण सुरू करावे.
प्रति हेक्‍टरी 20 ते 50 पक्षिस्थानके उभारल्यामुळे अळ्यांची संख्या कमी होते. प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीचे झाड थोडेसे वाकडे करून हळुवार हलवून अळ्या पाडून नष्ट कराव्यात.

वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा वापर
नियंत्रणाची रणनीती
पीक कळ्या- फुलांवर आल्यापासून अंडी मोठ्या प्रमाणावर घातली जातात. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळीवर आधारित कीडनाशकाचा वापर फायदेशीर ठरतो. निंबोळी अर्क फवारलेल्या क्षेत्राकडे अन्य क्षेत्राच्या तुलनेत प्रौढ हे अंडी घालण्यासाठी कमी प्रमाणात आकर्षित होतात, त्यामुळे कमी प्रमाणात अंडी घातली जातात. तसेच, त्यातून निघणाऱ्या अळ्यांचे प्रमाणही कमी दिसून आले आहे. निंबोळी अर्क फवारलेल्या क्षेत्रात अळीची खाण्याची क्रिया मंदावते, नर- मादी मिलनात अडथळा येतो, किडीच्या वाढीवर व कात टाकण्यावर विपरीत परिणाम होतात. अशा प्रकारे किडीच्या जीवनक्रमात बाधा येते.

नियंत्रण
सुरवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी किंवा अझाडिरेक्‍टीन (10,000) पीपीएम 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

जैविक व्यवस्थापन
प्रति हेक्‍टरी एचएनपीव्ही या विषाणूजन्य कीटकनाशकाची 250 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (2 ु 10 9-- तीव्रता) किंवा 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (1 ु 10 9 तीव्रता) या प्रमाणात फवारणी करावी. विषाणूच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अतिनील किरणांत टिकविण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम नीळ टाकून हे द्रावण एक मि.लि. प्रति लिटरप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांच्या नियंत्रणासाठी ही फवारणी प्रभावी ठरते.

रासायनिक कीटकनाशकांद्वारे व्यवस्थापन
लहान अळ्या कळ्या- फुलांना छिद्र पाडून खातात, त्यामुळे अशी फुले काळजीपूर्वक बघितल्यास प्रादुर्भावाचा प्रकार लक्षात येऊ शकतो. अशा वेळेस दुहेरी प्रहार करणाऱ्या प्रोफेनोफॉसचा (अंडीनाशक व अळीनाशक) वापर फायदेशीर ठरतो. शेतात मोठ्या प्रमाणावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची अंडी आढळून आल्यास 25 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या कीटकनाशकाची फवारणी करावी.
अळ्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोचल्यास इमामेक्‍टीन बेंझोएट (पाच टक्के) तीन ग्रॅम किंवा क्‍लोरपायरिफॉस (25 टक्के प्रवाही) 25 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी वेळापत्रक
पहिली फवारणी - पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना अझाडिरेक्‍टीन (10,000 पीपीएम) 10 मि.लि. प्रति 10 लिटर
दुसरी फवारणी - त्यानंतर 15 दिवसांनी - इमामेक्‍टीन बेंझोएट (पाच टक्के) - तीन ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी
तिसरी फवारणी - त्यानंतर 15 दिवसांनी - डेल्टामेथ्रीन एक टक्का अधिक ट्रायझोफॉस 35 टक्के - संयुक्त कीटकनाशक - 25 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी

: राहुल वडस्कर, 9922934949
(लेखक कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

"हायटेक' तंत्रज्ञानातून साधले शेतीचे व्यवस्थापन

पीक व्यवस्थापनाला माहिती तंत्रज्ञानाची जोड
पीक उत्पादनवाढ आणि मजूरटंचाईच्या समस्येवर प्रत्येक जण यांत्रिकीकरणातून उपाय शोधतो आहे. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये सिंभोरा (जि. अमरावती) येथील मंगेश देवहाते यांचा समावेश होतो. संगणकशास्त्रातील पदवीधर मंगेश 35 एकर शेती पूर्णतः व्यावसायिकतेने करत आहे. महत्त्वाचे म्हणजे शेती व्यवस्थापनात त्याने संगणकशास्त्राचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे.

विनोद इंगोले

अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी बाजारपेठ आणि उपलब्ध सिंचन सुविधांच्या बळावर संत्रा, लिंबू, मोसंबीच्या बागा फुलविल्या आहेत. त्यामुळे येथील फळशेतीला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प या भागातील शेतीसाठी फायदेशीर ठरला आहे. सिंचन सुविधेमुळे येथील शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करीत असतात. अशा या अमरावती जिल्ह्यातील मोर्शीपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील सिंभोरा शिवारात मंगेश प्रभाकर देवहाते या प्रयोगशील युवा शेतकऱ्याची शेती आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्याचे वडील प्रभाकरराव यांचा मिरची व संत्रा पिकांच्या दर्जेदार उत्पादनावर भर होता. मंगेशने देखील त्यांचाच वारसा जपत मिरचीच्या दर्जेदार उत्पादनाची हातोटी कायम ठेवली. बदलत्या बाजारपेठेप्रमाणे मंगेशने लाल मिरचीऐवजी जास्त पैसे मिळवून देणाऱ्या हिरव्या मिरचीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षी मंगेशने सात एकर मिरची आणि अठरा एकरावर कपाशी लागवड केली आहे. याचबरोबरीने तीन एकर आवळा आणि सात एकर क्षेत्रात संत्रा आहे. गेल्या वर्षी मंगेशला कपाशीचे एकरी सरासरी उत्पादन 20 क्विंटल, मिरचीचे 375 क्‍विंटल उत्पादन मिळाले. पीक व्यवस्थापनातून जास्तीत जास्त नफा कसा मिळविता येईल याकडे त्याचे लक्ष आहे.

मिरचीने दिला आर्थिक नफा -
बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मंगेश देवहाते यांचा मिरची लागवडीवर कायम भर राहिला आहे. याबाबत माहिती देताना मंगेश म्हणाले, की गेल्या वर्षी मी तीन एकर मिरची लागवडीकरिता संकरित वाणाची निवड केली. शेतावरच कोकोपीटच्या माध्यमातून मिरचीची रोपे तयार केली. उन्हाचा रोपांच्या वाढीला त्रास होऊ नये यासाठी हिरव्या रंगाच्या शेडनेटचे रोपवाटिकेला आच्छादन केले होते. रोपे पंधरा दिवसांची झाल्यावर तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीड - रोगनाशकांची फवारणी केली. कारण जोमदार रोपेच पुढे उत्पादनाच्यादृष्टीने फायदेशीर ठरतात. साधारणपणे तीस दिवसांनी मुख्य शेतात रोपांची पुनर्लागण केली. पुनर्लागणीच्या अगोदर जमिनीची चांगली मशागत करून शेणखत मिसळले. तणांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारशीत तणनाशकाची फवारणी केली, त्यामुळे एक महिना तणांचा प्रादुर्भाव दिसला नाही. पिकाला माती परीक्षणानुसार एकरी 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश खतांची मात्रा जमिनीत मिसळून दिली. लागवड पाच फूट बाय एक फूट अंतराने केली आहे. 1 जुलै रोजी तीस दिवसांची मिरचीची रोपे वरंब्यावर एक फूट अंतरावर ड्रीपरच्या बाजूला लावली. एकरी 8750 रोपे बसली.

पाणी आणि विद्राव्य खत व्यवस्थापनाच्यादृष्टीने मिरचीला ठिबक सिंचन केले. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी ठिबकद्वारे विद्राव्य खत देण्याचे नियोजन आहे. पिकाची गरज लक्षात घेऊन विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रांचे नियोजन केले आहे. पीक संरक्षणाच्या दृष्टीने तज्ज्ञांकडून शिफारशीत कीडनाशकांची फवारणी केली जाते. पहिला तोडा 60 दिवसांनी सुरू झाला. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत मिरचीचे उत्पादन घेतले. पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवल्याने प्रति एकरी हिरव्या मिरचीचे 375 क्‍विंटल उत्पादन मिळाले. एक किलो मिरचीच्या व्यवस्थापनासाठी सहा रुपये प्रति किलो खर्च आला. अमरावती बाजारपेठेत सरासरी 13 रुपये प्रति किलो दर मिळाला. एकरी एक लाखाचा खर्च वजा जाता निव्वळ नफा तीन लाख 75 हजार इतका मिळाला.

मिरची उत्पादनाबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील भाजीपाला पैदासकार डॉ. श्‍याम घावडे म्हणाले, की जातीची निवड, जमिनीची सुपीकता, काटेकोर पीक व्यवस्थापन, संतुलित खतांचा मात्रा, गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, वेळीच कीड- रोग नियंत्रण या गोष्टी लक्षात घेता हिरव्या मिरचीचे चांगले उत्पादन शेतकरी मिळवीत आहेत.

मोठ्या क्षेत्रावर कीडनाशकांच्या फवारणीचा त्रास टाळण्यासाठी मंगेशने जुन्या तुषार सिंचन संचाच्या वीस फूट लांब ऍल्युमिनिअम पाइपला 2.5 फुटांवर 8.5 मि.लि. व्यासाचे छिद्र पाडून त्यावर स्प्रे होज बसवून नोझल बसविले आहेत. हे नोझल पाइप लाइनद्वारे एच.टी.पी. पंपास जोडले आहेत, त्यामुळे एकावेळी मिरचीच्या चार ओळी फवारल्या जातात. त्यामुळे फवारणीची वेळ आणि मजुरांमध्ये बचत झाली.

संगणकशास्त्राची पदवी आली शेतीच्या कामी -
मंगेश देवहाते यांच्यापुढे 35 एकर शेतीला खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य वेळेत करण्यासाठी मजुरांच्या टंचाईची अडचण होती; तसेच ऐन हंगामात चढ्या दराने द्याव्या लागणाऱ्या मजुरीमुळे मंगेश त्रासून गेले होते. परंतु या परिस्थितीवर मात करण्यासाठी संगणकशास्त्रातील पदवी त्यांच्या कामी आली. याबाबत मंगेश म्हणाले की, माझे शिक्षण संगणकशास्त्रात झाल्यामुळे या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल याच्या प्रयत्नामध्ये मी होतो. या वेळी विविध शेतकरी आणि तज्ज्ञांशी चर्चा करताना मला पाणी आणि विद्राव्य खत व्यवस्थापनासाठी संगणकीकृत प्रणालीतून उत्तर सापडले. मी आता 35 एकर क्षेत्रावरील पिकाच्या पाण्याचे व खत व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन केले आहे. पाणी व्यवस्थापनासाठी मला वर्षातील किमान दहा महिने दररोज दोन मजुरांची गरज भासत होती. प्रति मजूर शंभर रुपये अशी मजुरी द्यावी लागत होती, त्यामुळे सरासरी प्रति वर्षी मजुरीसाठी आठ हजार रुपये खर्च होत होते; मात्र आता स्वयंचलित संगणकीकृत प्रणालीमुळे या पैशांची बचत झाली आहे. या पाणी व्यवस्थापन आणि विद्राव्य खत व्यवस्थापन प्रणालीला बारा लाख रुपये खर्च आला आहे. टप्प्याटप्प्याने मी शेतात ठिबक सिंचन केले. संगणक आणि मोबाईलद्वारे कार्यान्वित होणारी ही यंत्रणा इंटरनेटशी जोडलेली आहे. मशिनच्या नियंत्रण कक्षातून एक "कम्युनिकेशन पोर्ट' संगणकाशी जोडला आहे. सदर संगणक 24 तास सुरू असतो, त्याला इंटरनेटचे डोंगल जोडलेले असल्याने कोठूनही या यंत्रणेचे नियंत्रण करता येते. पाणी व्यवस्थापनाच्याबरोबरीने पिकाच्या गरजेनुसार या यंत्रणेद्वारे विद्राव्य खताच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन करता येणे शक्‍य आहे. वीजपंप सुरू किंवा बंद करणे, सॅंड फिल्टर स्वच्छ करणे, डिस्क फिल्टर स्वच्छ करणे, विद्राव्य खते देणे, पाणी तसेच खतांचा सामू, विद्युत वाहकता नियंत्रित करणे यासारखी कामे देखील या यंत्रणेने घरबसल्या करणे शक्‍य आहे.

असे आहे नियोजन -
व्यवस्थापनाच्यादृष्टीने मंगेशने शेतीचे एकूण आठ प्लॉट तयार केले आहेत. यंत्रणेच्या नियोजनासाठी स्वतंत्र आठ व्हॉल्व्ह आहेत. संबंधित पिकाला किती वेळ पाणी द्यायचे, याचा अंदाज घेतल्यानंतर त्या पिकाला तितकेच पाणी दिले जाते. संगणकात पीकनिहाय्य पाणी व खत व्यवस्थापनाबाबत महिन्याचा आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाणी किंवा विद्राव्य खत देण्याचे काम सुरू असताना ते संगणकीय प्रणालीवर आपल्यास दिसते. वीज भारनियमन झाल्यास यंत्रणा थांबते. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर उर्वरित खत किंवा पाणी देण्याचे काम यंत्रणेद्वारे पुन्हा सुरू होते. विद्राव्य खते तयार करण्यासाठी एक हजार लिटरच्या चार टाक्‍या मंगेशने बांधल्या आहेत. ही प्रणाली चालविण्यासाठी थ्रीफेज व्यवस्था आहे. यापैकी एक फेज बंद झाल्यास त्यासंबंधीची सूचनाही मोबाईलच्या माध्यमातून मंगेशला लगेच कळते. अशा हायटेक शेतीला विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, तालुका कृषी अधिकारी देशमुख, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी ताटे, जैन इरिगेशनचे राज्य व्यवस्थापक डी. बी. चौधरी, विभागीय व्यवस्थापक अशोक अग्रवाल, विशाल बोरखडे, ऑटोमेशन इंजिनिअर दुसाने, श्री. वानखडे, कृषी विद्यावेत्ता पंकज देशमुख, त्यासोबतच इस्राईलच्या तज्ज्ञांनी देखील भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.

संगणकीकृत ताळेबंद -
अजूनही बरेचसे शेतकरी शेतातील खर्च आणि उत्पन्नाचा ताळेबंद कधीच लिहून ठेवत नाहीत, त्यामुळे नक्की नफा झाला की तोटा हे शेवटपर्यंत लक्षात येत नाही. मंगेश मात्र त्याला अपवाद ठरला आहे. काळाची पावले ओळखत मंगेशने आपल्या संगणकीय ज्ञानाचा उपयोग करीत गेल्या चार वर्षांपासून "एक्‍सेल' प्रणालीमध्ये 1 जून ते 31 मे असा एक वर्षाचा लेखाजोखा मांडला आहे. यामध्ये मजुरांना आगाऊ दिलेली रक्‍कम, दररोजचा होणारा खर्च, कीटकनाशक, खत, बियाणे व हंगामाच्या शेवटी बाजारात विकलेला माल आणि मिळालेला दर, अशा सर्व खर्चाच्या गोष्टी दररोज संगणकात न चुकता नोंदविल्या जातात. त्यामुळे वर्षअखेरीस शेती व्यवसायाचा ताळेबंद हाती असतो.

संपर्क
मंगेश देवहाते
9960236450