Tuesday, 2 October 2012

शिसाळ बंधूंचे आदर्श बंदिस्त शेळीपालन

सध्याच्या महागाईच्या तसेच पाणीटंचाईच्या काळात शेळीपालनाचे व्यवस्थापन सांभाळणे आर्थिकदृष्ट्या सोपे नाही; मात्र सांगली जिल्ह्यातील पलूस येथील शिसाळ बंधूंनी सुयोग्य व्यवस्थापनाद्वारे आफ्रिकन बोअर जातीचे बंदिस्त शेळीपालन विकसित करून अन्य शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
श्‍यामराव गावडे
सांगली जिल्ह्यात पलूस येथील तुकाराम मारुती शिसाळ हे मेंढपाळ होते. दिवसभर पलूस व परिसरात मेंढ्या चारणे व शेतावर मेंढ्या बसवणे हे काम त्यांच्याकडे अहोरात्र सुरू होते. पुढे आनंदा, गोविंद व संदीप शिसाळ ही मुले त्यांना व्यवसायात मदत करू लागली. वयपरत्वे तुकाराम शिसाळ थकले, त्यातच बागायती क्षेत्रामुळे चराई क्षेत्रात झालेली घट या व्यवसायासाठी अडचणीची ठरत होती.

अशी घेतली प्रेरणा
शिसाळ बंधूंमधील सर्वांत धाकटे संदीप यांनी फलटण परिसरात बंदिस्त शेळीपालनाचा गोठा सर्वप्रथम पाहिला तो 2000 मध्ये. आपण पारंपरिक मेंढ्या सांभाळण्याऐवजी अशा पद्धतीने शेळ्यांचे व्यवस्थापन केले तर यशस्वी होऊ, अहोरात्र भटकण्याचा त्रास कमी होईल व आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास होईल, असा विचार त्यांनी केला. तेथील एका नामवंत संस्थेतून आफ्रिकन बोअर जातीच्या पाच शेळ्या आणल्या.

सुरवातीला या शेळ्यांसाठी साधा गोठा व छप्पर केले. पुढे या पाच शेळ्यांचे नर विकले. शेळ्यांची संख्या वाढू लागली, त्यावेळी पूर्वी असलेल्या पारंपरिक शेळ्या विकायचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने बंदिस्त गोठ्यातील शेळ्यांची संख्या 100 वर गेली.

असे होते शेळीपालन
शिसाळ बंधूंच्या बंदिस्त गोठ्यात आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या आहेत. शिसाळ यांची पलूसपासून दोन किलोमीटर अंतरावरील गोंदीलवाडी नजीक शेती आहे. तिथे तिघे भाऊ एकत्र राहतात. 70 फूट रुंद व 250 फूट लांबीचा गोठा आहे. मधे जाण्या-येण्यासाठी रस्ता, बाजूला सिमेंटच्या गव्हाणी आहेत. तशाच गव्हाणी वीस फुटांनंतर एक अशा आडव्याही आहेत. शेळ्यांना मान बाहेर करून चहूबाजूंनी चारा खाता यावा हा त्यामागील उद्देश आहे. आडव्या गव्हाणीत एका बाजूला सुरवातीला नळ जोडून पाणीसाठा केला आहे, त्यामुळे शेळ्यांना पाणी पिणे सोपे झाले आहे. गोठ्याच्या बाहेर दहा फूट अंतरावर मोकळ्या जागेत गोठ्यासभोवती जाळी आहे. उन्हात व खेळत्या हवेत शेळ्यांना मोकळे फिरता यावे यासाठी ही रचना आहे. गव्हाणीत मका, सरकी पेंड, तुरीचे भुसकट, हत्ती गवत, कडवळ यांची कुट्टी दिवसातून दोन वेळा दिली जाते. बंदिस्त गोठ्यात वीस बाय वीस आकाराचे छोटे कप्पे आहेत. एका कप्प्यात बारा ते पंधरा शेळ्या मुक्तपणे सोडल्या जातात. सकाळी एकवेळ गोठ्याची स्वच्छता केली जाते. शेळी व्यायल्यानंतर करडे शेळीजवळ ठेवले जाते. त्यानंतर ते बाजूला घेऊन दुसऱ्या कप्प्यात ठेवले जाते. सकाळ - संध्याकाळ दूध पाजण्यासाठी ती करडे आईजवळ आणली जातात. दोन मजूर यासाठी दिवसभर काम करतात. तांबूस पांढऱ्या रंगातील बोअर जातीच्या शेळ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. शेळी गंभीर आजारी असेल तरच पशुवैद्यकाला बोलावले जाते.

विक्री व्यवस्थापन
शिसाळ यांच्या गोठ्यावर धष्टपुष्ट नर आहेत. त्यांची वर्षभर चांगली जोपासना केली जाते. बकरी ईदच्या सणाला कुर्बानीसाठी या मोठ्या नरांना जास्त मागणी असते. मुंबई, आंध्र, तमिळनाडू येथील व्यापारी येऊन त्यांची खरेदी करतात. स्थानिक पातळीवर पाच ते सहा महिन्यांच्या करडांचीही किरकोळ विक्री केली जाते. गोठ्यावरच करडांचे वजन करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा उभारला आहे.

शेळ्यांच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. सकाळी गोठा साफ करताना शेळीच्या माजाची लक्षणे ओळखली जातात. त्या आधारे नर पुढील पैदास होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सोडला जातो. एक शेळी वर्षात दोन वेळा व्याते.

साधली आर्थिक प्रगती शिसाळ बंधूंची पाच ते सहा एकर जमीन असून त्याठिकाणी द्राक्ष बाग आहे. पलूस शहरात कृषी सेवा केंद्र आहे. आनंदा मुख्यत्वे करून शेळ्यांची जबाबदारी सांभाळतात. गोविंद हे द्राक्ष बाग व अन्य शेतीकामांकडे लक्ष पुरवतात. संदीप हे एकूण कारभाराचे नियोजन करीत कृषी सेवा केंद्र सांभाळतात. कष्ट आणि कामावर श्रद्धा ठेवल्यास प्रगती अटळ असते हे शिसाळ बंधूंच्या वाटचालीतून दिसून येते.

आपल्या शेळीपालन व्यवसायाबाबत बोलताना संदीप म्हणाले, की सध्या आमच्याकडे 150 ते 175 शेळ्या आहेत. पैदास या हेतूने आम्ही मादी व नर यांची विक्री करतो. वर्षाला त्या पद्धतीने लहान वयाची 60 ते 100 पर्यंत जनावरे विकली जातात. आमचे ग्राहक गोठ्यावर येऊन खरेदी करतात. बकरी ईदसारख्या सणांसाठी नरांचे चांगले संगोपन करून त्यांचीही विक्री त्यावेळी केली जाते. वजनाप्रमाणे प्रति बोकडाला दहा हजारपासून ते 25, 50 हजारपर्यंतही दर मिळाला आहे. काही वजनदार बोकडांना यापूर्वी प्रति 85 ते 95 हजार रुपयांपर्यंतही दर मिळाला होता. शेळीपालनातील एकूण विक्रीतून वर्षाला सुमारे 20 लाख रुपये उत्पन्न तरी मिळते. शेळ्यांसाठी आरोग्य व्यवस्थापन, खाद्य व अन्य देखभाल असा किमान साडेपाच लाख रुपये खर्च तरी येतो.

शिसाळ बंधूंनी दिल्या शेळीपालनाच्या टिप्स
- आफ्रिकन बोअर शेळ्यांना सोन्यासारखी मागणी आहे.
- गाई- म्हशींमध्ये गाभण अवस्था, वेताचा काळ या गोष्टी विक्रीमध्ये महत्त्वाच्या असतात; मात्र शेळी वाढीच्या कोणत्याही अवस्थेत विकता येते.
- सध्या मटणाचे भावही वाढले आहेत, त्यामुळे शेळीपालनाला वाव आहे.
- आफ्रिकन बोअर जात रोगप्रतिकारक आहे. उष्ण तसेच थंडीच्या तापमानातही ती चांगली तग धरते.
- खाद्य विशिष्टच दिले पाहिजे असे नाही. या जातीचे वजन अन्य शेळ्यांच्या तुलनेत वेगाने वाढते.
- बंदिस्त गोठापालनामुळे लेंडीखत भरपूर व शुद्ध मिळते. आम्हाला वर्षाला किमान 20 ते 25 ट्रॉली खत त्यातून उपलब्ध होते. त्याचा वापर द्राक्षशेतीला होतो. हे खत विकता देखील येते.
- बंदिस्त पद्धतीमुळे शेळ्यांच्या मुक्त फिरण्यावर मर्यादा येऊन रोगांचा संसर्ग टाळणे शक्‍य होते.
- वर्षातून दोन महत्त्वाच्या रोगांसाठी लसीकरण केले जाते. जंतनाशकाचा वापरही केला जातो. गोठ्याची जागा निर्जंतुक केली जाते.
- जनावरांना त्यांच्या वयानुसार मका, सरकी पेंड, मिनरल मिक्‍श्चर दिले जाते.


संपर्क - संदीप शिसाळ - 9226395206


http://www.agrowon.com/Agrowon/20121003/5031737510136632787.htm

16 comments:

 1. सुंदर अति सुंदर शेतकर्यांचा अर्थिक स्तर उंचवण्यासाठी ही तर जादू़ची कांडी

  ReplyDelete
 2. आपल्या प्रगती साठी खुप शुभेच्छा आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 3. आपल्या प्रगती साठी खुप शुभेच्छा आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 4. आपण जी माहिती दिली आहे. त्यात्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्याला आमच्या शुभेच्छा

  ReplyDelete
 5. aapan dileli mahiti khup chan ahe.mi magil ek varshapasun jobless ahe.sheti naslytach jama ahe.tyamule shelipalanacha vichr karto ahe.

  ReplyDelete
 6. आपल्या प्रगती साठी खुप शुभेच्छा आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 7. MARATHI MANSANE NOKARI/JOB KARNYA PEKSHA SWATACHA UDOYG SURU KARAWA .AAPANCH SWATALA KAMI LEKHTO TYAMULE AAPAN MAGHE RAHATO PAN AAPLYA PRYOGAMULE SARWANA PRERNA MILEL.

  ReplyDelete
 8. या व्यवसायाला यशस्वी करण्याकरिता काय योजना आखावी लागते ? आणि जर घाटा झाला तर घाट्याचे कारण काय असू शकते ? मी नकारात्मक बोलत नाही पण हा विचार सुद्धा करावा लागतो म्हणून कृपया माहिती द्यावी..... धन्यवाद !!!

  ReplyDelete
 9. या व्यवसायाला यशस्वी करण्याकरिता काय योजना आखावी लागते ? आणि जर घाटा झाला तर घाट्याचे कारण काय असू शकते ? मी नकारात्मक बोलत नाही पण हा विचार सुद्धा करावा लागतो म्हणून कृपया माहिती द्यावी..... धन्यवाद !!!

  ReplyDelete
 10. आपल्या प्रगती साठी खुप शुभेच्छा आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ।।।

  ReplyDelete
 11. आपल्या वाटचालीस शुभेच्छा..!!

  ReplyDelete