Thursday, 31 January 2013

शेती मित्र पक्षी - घार

इंग्रजी नाव - Black kite
स्थानिक नावे - घार, लालपाखी घार (भंडारा)
शास्त्रीय नाव - Milvus Migrans (Boddaert,1783)

संस्कृत नाव - चिल्ल, प्रख्यात चिल्ल आणि शकुनी इ.
वैशिष्ट्ये - हा पक्षी आकाराने गिधाडापेक्षा लहान असतो. बाणाच्या फाळाप्रमाणे दुंभगलेल्या शेपटीवरून ओळखू शकतो. हा शेपटीचा आकार उडत असताना ठळकपणे दिसून येतो.

आढळ - भारतभर सर्वत्र आढळतो. ग्रामीण परिसरात दिसतो.
विणीचा हंगाम - यांचे घरटे कावळ्याच्या घरट्यापेक्षा मोठे असते. घरट्यात 2 ते 4 अंडी घालतात.

शेतीविषयक उपयुक्तता -- हा शिकारी पक्षी असून याच्या खाद्यामध्ये उंदीर, घुशी, साप, कोंबडीची पिल्ले, लहान पक्षी, टाकाऊ पदार्थ व कुक्‍कुटपालन व कत्तलखान्यातील मांस यांचा समावेश असतो.
- मात्र अलीकडे शहरी भागातील कचरा डेपोमध्ये घार घिरट्या घालून अन्न मिळविताना दिसून येते. तसेच माशांचा बाजार, नाला अशा ठिकाणीही आढळून येत आहे. मानवनिर्मित कचऱ्यामुळे त्यांच्या खाद्यसवयीमध्ये बदल होत असून अन्नसाखळीतील समतोल बिघडत असल्याचे दिसून येत आहे.

शेती मित्र पक्षी - गव्हाणी घुबड

इंग्रजी नाव - Barn Owl
स्थानिक नावे - कानेल नाशिक, कोठीचे घुबड, घुबड.
शास्त्रीय नाव - Tyto Alba (Scopoil, 1769)
संस्कृत नाव - कुवय, कुटरू, चन्द्रक इत्यादी.
वैशिष्ट्ये - निशाचर पक्षी. आकाराने साधारण डोमकावळ्याएवढा असतो. त्याचे पंख वरून सोनेरी- बदामी व राखी रंगाचे असून त्यावर काळ्या-पांढऱ्या रंगांचे पट्टे असतात. पोटाखाली पांढरट व त्यावर बदामी रंगांची झाक असून तपकिरी रंगाचे ठिपके असतात. याचा आवाज सायंकाळी किंचाळल्याप्रमाणे येतो.
आढळ - जुन्या इमारती, शेतीचा प्रदेश, कडेकपारी, शहरामध्ये तसेच जुनाट वृक्षाच्या ढोल्या, पडके वाडे, किल्ले अशा ठिकाणी यांचे वास्तव्य असते. रात्रीच्या वेळी शिकार करतात.
विणीचा हंगाम - यांची वीण जवळ जवळ वर्षभर सुरू असते. झाडांची ढोली किंवा भिंतीच्या कपारीमध्ये चार ते सात अंडी घालतात.

अंधश्रद्धा - - घुबडाला दगड मारल्यास तो दगड घुबड नदीच्या किनारी जाऊन खडकावर उगाळते, तसतसा माणूसही झिजत जातो.
- कोणाचा मृत्यू होणार असेल तर घुबडाला ते आधीच कळते व त्या माणसाच्या घरावर जाऊन ते घुमत बसते, अशी काही ठिकाणी समजूत आहे.
- त्याचा आवाज माणसांच्या किंचाळण्यासारखा येतो. तसेच त्याचे वास्तव्य हे निर्मनुष्य, जुनाट वाडे, किल्ले अशा ठिकाणी असल्याने माणसांच्या मनात त्याच्याबद्दल एक भीती बसलेली आहे.
- कदाचित या शांत आणि उपयुक्त पक्ष्यांना कोणी हानी पोचवू नये, यासाठी अशा रूढी किंवा समजुती आपल्या पूर्वजांनी रूढ केल्या असतील.

घुबडांच्या डोळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण - - रात्रीच्या वेळी अचूक शिकार करण्यासाठी डोळ्यांचा आकार मोठा असतो.
- घुबड आपली मानही सुमारे 180 अंशांपर्यंत फिरवू शकते.

शेतीविषयक उपयुक्तता - - घुबडाच्या खाद्यामध्ये प्रामुख्याने उंदीर, चिचुंद्य्रांचा समावेश असल्यामुळे यांच्यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळले जाते.
- रात्रीच्या वेळी शेतमळे, फळबागेमध्ये शिरून उंदीर, घुशी, खारी, सरडे यांची शिकार करून नियंत्रण करतात. तसेच त्यांच्या अन्य भक्ष्यांमध्ये साप, सरडे, मासे व खेकडे यांचा समावेश होतो.

शेती मित्र पक्षी - शिंपी


इंग्रजी नाव - Common Tailorbird
स्थानिक नावे - लिटकुरी (भंडारा), पाणशिव्या (नाशिक), लहान सुई, लिट्या, लिचकूर, लहान लिंबू इ.
शास्त्रीय नाव - Orthotomus sutorius (pennant,1769)
संस्कृत नाव - टुण्टुक, पुटिका, पुटिनी, पोटियक इ.

वैशिष्ट्ये -
हा चिमणीपेक्षा लहान आकाराचा पक्षी आहे. याचा रंग वरून हिरवा तर खालून पांढुरका असतो. डोक्‍याच्या वरचा भाग तांबूस असून, शेपटी लांब व निमुळती होत टोकदार असते. हा पक्षी आपली शेपटी नेहमी हलवत असतो.
आढळ - शेती परिसरातील झुडपे, पानगळतीची जंगले, बागा, वनराई परिसरात आढळतात. शिंपी हा गाणारा पक्षी आशियाच्या उष्ण कटिबंधात आढळतो. हा सर्वसामान्यपणे शहरी व ग्रामीण भागामध्ये आढळतो.
विणीचा हंगाम - मार्च ते डिसेंबर या काळात वीण होते. यांचे घरटे खोल, मऊ घटकांनी सजवलेले व घनदाट पानांमध्ये असते. दोन पानांचा वापर करून घरट्याचे शिवणकाम केले जाते. घरट्यात लालसर किंवा निळसर पांढरी तपकिरी ठिपके असणारी तीन ते चार अंडी घालतात.

विशेष - - एखाद्या शिंप्याप्रमाणे घरटे शिवताना पानाच्या कडेने अतिशय लहान छिद्रांची शिवण करतात, त्यामुळे पाने तपकिरी होत नाहीत. फांदीवर असणाऱ्या अन्य पानांमध्ये घरटे मिसळून जाते.
-जरी हे पक्षी गर्द हिरवळीत लपलेले असले तरी त्यांचा मोठा आवाज ओळखीचा असतो व त्यांची उपस्थिती दर्शवितो.
- शिंपी हे एकटे किंवा जोडीने आढळतात.

शेतीविषयक उपयुक्तता - - त्याच्या खाद्यामध्ये लहान कीटक व त्यांच्या अंड्यांचा समावेश असतो.
-हे पक्षी फुलातील मकरंद पिताना आढळतात. त्यामुळे फुलझाडे त्याचप्रमाणे ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांच्या परागीभवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
-हे पक्षी उसावरील कीटक खातानाही आढळतात.

शोती मित्र पक्षी - कोतवाल


इंग्रजी नाव - Black Drongo
मराठी नावे - गोचा (भंडारा), गोच्या (चंद्रपूर), काळी बाणोली (नाशिक), बैलघोशे (ठाणे), घोशा, बांडोळी इ.
शास्त्रीय नाव - Dicrurus macrocercus (Vieillot, 1817)
संस्कृत नावे - अंगारक, कलिकार, कालचटक, जल्पक इ.
वैशिष्ट्ये - हा पक्षी आकाराने बुलबुलपेक्षा मोठा व सडपातळ असून, काळ्या रंगाचा असतो. शेपटी लांब व दुभंगलेली असते. नर व मादी दिसायला सारखेच असतात.
आढळ - मनुष्यवस्तीजवळील पानगळीची जंगले व शेती परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात. टेलिफोनच्या तारा व चरणाऱ्या मेंढ्या, शेळी व गुरांजवळही आढळतात.
विणीचा हंगाम - मार्च ते जुलै या काळात वीण होते. मोठ्या झाडांवर लहान काड्या, गवत व इतर वनस्पतींच्या धाग्यांपासून वाटीप्रमाणे घरटे बनवितात. घरट्यात तीन ते पाच अंडी घालतात व नर - मादी दोघे पिल्लांचा सांभाळ करतात. घरटी बनविण्यासाठी ते काटेरी झाडांना प्राधान्य देतात.

विशेष बाबी - - कृष्णा पक्षी, पल्लवपुच्छ कोतवाल, डोंगरी मैना इ. पक्षी इतर पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करतात.
- कावळ्यासारख्या मोठ्या पक्ष्यांबाबतीतच्या आक्रमकतेसाठी ही प्रजाती प्रसिद्ध आहे. आपल्या अधिवासामध्ये अन्य कोणताही पक्षी आल्यास त्याच्यावर आक्रमण करून हाकलून देतात. घार, कावळा, घुबड यासारख्या पक्ष्यांवरही सहज आक्रमण करताना दिसून येतो.
- तसेच बगळ्यासारख्या पक्ष्यांच्या तोंडातील कीटकसुद्धा कोतवाल सहजपणे पळवून नेतो म्हणून याला दक्ष पक्षी कोतवाल असे म्हणतात.

खाद्यसवयी - - कोतवाल हे पक्षी मुख्यतः खुल्या प्रदेशात आढळतात व मैदानाजवळच चरणाऱ्या गुरांजवळ कीटकांना पकडताना दिसून येतात. गुरांच्या चालण्याने गवतातील टोळ, नाकतोडे यांसारखे कीटक आपली जागा सोडून उड्या मारत दुसरीकडे पळून जाण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळी कोतवाल त्यांना हवेत किंवा जमिनीवर टिपत असतो.
- रानात डोंगरावर वणवा लागल्यानंतर किंवा उसाच्या पाचटाला आग लागल्यानंतर हे पक्षी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कीटकांवर ताव मारताना दिसून येतात.
- मधमाश्‍यांच्या पोळ्यांना आपल्या पंखाने धडक देऊन नंतर मोहळातून उठलेल्या मधमाश्‍या खातात.
- भोरड्या पक्ष्यांसोबत हा खाद्यासाठी सुरवातीला भांडतो; मात्र नंतर त्यांच्यासोबत कीटक खात असतो. हा पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून इतर पक्ष्यांना सावधतेचा इशारा देत असतो.

संरक्षणासाठी आपण काय करू शकतो - या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी शेती परिसरातील व गवताळ भागातील काटेरी अधिवासांचे जतन केले पाहिजे.

शेती मित्र पक्षी- शेकाट्या किंवा वकील

इंग्रजी नाव - Black - winged Stilt
मराठी नावे - मोठा टिलवा (भंडारा), लांब पायाची कुडावळ (ठाणे), टिवळा, घोगर टिलवा, पाणटिटवा इ.
शास्त्रीय नाव - Himantopus himantopus (Linnaeus, 1758)
संस्कृत नाव - कालपक्ष प्रवालपाद, यष्टिक इ.
वैशिष्ट्ये - या पक्ष्याचा आकार साधारणतः तितराएवढा असतो. पाय काटकुळे व उंच असतात. चोच सरळ व बारीक असते. रंग काळा, राखट, उदी व पांढरा असतो. नर व मादीच्या रंगात ऋतुमानानुसार बदल होतो. उडत असताना शेपटीजवळचा पांढरा भाग पाठीपर्यंत पाचरीसारखा दिसतो. शेपटी समपातळीत व पाय ताणलेले असतात. पाठ व पंख काळभोर रंगाचे असतात. हे पक्षी नेहमी तीन ते चारच्या संख्येने खाद्यासाठी भांडत असतात.
आढळ - दलदलीची, पाणथळ ठिकाणे, चिखलाणी, नदी व तलाव परिसर या ठिकाणी आढळतात. उथळ पाण्याच्या ठिकाणी हा खाद्य शोधताना आढळतो. भारतभर सर्वत्र आढळतो. स्थानिक स्थलांतर करतो.
विणीचा हंगाम - एप्रिल ते ऑगस्ट या काळात वीण होते. तलाव किंवा पाणथळ ठिकाणी जमिनीवर खड्डा करून त्यामध्ये तीन ते चार अंडी देतात.

विशेष बाबी - - सम आकाराच्या पक्ष्यांच्या तुलनेत त्यांचे लांब पाय त्यांना खोल पाण्यात जाण्यासाठी फायदेशीर ठरतात. पक्षिजगतामध्ये शरीराच्या आकाराच्या प्रमाणात त्यांचे लांब पाय त्यांचे वेगळेपण दर्शवितात.
- या पक्ष्यांच्या पंखावरील काळ्या कोटामुळे त्याचे नाव वकील आहे. हा पक्षी पाणथळ अधिवासातील असल्याने शेती परिसरात आढळत नाही.

पाण्याच्या प्रदूषणाचा निर्देशांक - - याच्या खाद्यामध्ये चिखलातील अळ्या, शंख-शिंपले, गोगलगाय व पाणकीटकांचा समावेश असतो. प्रदूषित पाण्यात हा आपली चोच बुडवून खाद्य शोधत असतो. हा पक्षी ज्या ठिकाणी दिसतो, ती पाणथळ ठिकाणे प्रदूषित असल्याचे समजले जाते.
- 1990 पूर्वी हे पक्षी सर्वत्र व मोठ्या संख्येने आढळत होते; मात्र त्यांचे प्रमाण कमी होत आहे. सर्वच पाणथळ भागातील वाढत्या जलप्रदूषणाने त्यांच्या संख्येवर शरीरावर परिणाम होत आहे.

Sunday, 27 January 2013

सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत

शेतातील मातीत पुरेसा सेंद्रिय कर्ब असेल तर ती चांगले उत्पादन देईल व पिकांसाठी अनावश्यक खर्च कमी केला की, मूळ नफ्यात वाढ होईल, हा शाश्‍वत शेतीचा मूलमंत्र आहे. जमिनीच्या पोताचा विचार न करता बर्‍याच वेळा फसव्या जाहिरातीकडे आकर्षित होऊन चुकीच्या महागड्या बियाण्यांची लागवड करण्यात येते. कम्पोस्ट, शेणखत इत्यादींचा वापर न करताच रासायनिक खतांच्या आणि रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे जमिनीत काम करणारे जिवाणू कमी झाले आहेत. म्हणून जमीन सजीव करण्याकरिता जिवाणू खते, कम्पोस्ट, गांडूळ खते, गांडूळे, नॅडेप पिकांचा फेरपालट आणि मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करता येईल.
सेंद्रिय खते तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या याप्रमाणे :
गांडूळ खत
शेतातील काडीकचरा, गोठ्यातील शेण-मलमूत्र यांचा वापर गांडूळासाठी खाद्य म्हणून करून यासाठी शक्यतो गोठ्याजवळ पाणी सहज मिळू शकेल अशी जागा निवडावी. धुम्मस करून किंवा आवश्यकतेप्रमाणे सिमेंट, रेतीचे प्लॅस्टर करून टणक करावी, जेणेकरून गाडूळे जमिनीत जाणार नाहीत. तसेच या जागेभोवती विटांची एक फूट उंचीची एका विटेची भिंत बांधून, बांबू पर्‍हाट्या, तुर्‍हाट्यांचा उपयोग करून सावली तयार करावी. या जागी शेणकाडी, कचर्‍याचे मिश्रण करून चार फूट रुंद व दीड फूट उंचीचे व आवश्यकतेनुसार लांबीचे बेड तयार करावेत. बेडवर ‘आसेनिया फिटीडा’ जातीचे गांडूळ सोडून जुने पोते किंवा कंता वरून झाकावे. दररोज बेडवर हलकेसे पाणी शिंपडून ओलसर ठेवावा. गांडूळांच्या संख्येनुसार सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर साधारण ४५ दिवसांत चहापत्तीसारख्या रवेदार गांडूळ खतात होते. यानंतर बेडवर पाणी देणे बंद करून, गांडूळ तळाशी रास करून ते जमा करावे. त्यामुळे गांडूळे तळाशी जमा होतील. वर असलेले गांडूळ हलक्या हाताने जमा करून शेतीसाठी वापरावे. तळाशी राहिलेल्या गांडूळांचा नवीन बेडसाठी उपयोग करावा. गांडूळ खत वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. त्याचबरोबर पिकांना व जमिनीतील जिवाणूंना संतुलित प्रमाणात सर्व अन्नद्रव्ये व एन्झाईमस उपलब्ध होऊन पिकाच्या उत्पादनात व गुणवत्तेमध्ये वाढ होते. पक्षी, साप, उंदीर, बेडूक, मुंग्या, कोंबड्या इत्यादी शत्रूंपासून गांडूळांचे संरक्षण करावे.
नॅडेप खत
सेंद्रिय खत तयार करण्याची विकसित पद्धत आहे. साधारणतः १०० किलो शेणासोबत शेतातील काडी, कचरा, पालापाचोळा, तण व माती इत्यादींचा वापर करून साधारणतः चार महिन्यांत ३ टन सेंद्रिय खत तयार होते. जमिनीवर विटा-सिमेंटचे टाके बांधून खत तयार करता येते.
कम्पोस्ट खत
नेहमीच्या पद्धतीत जमिनीवर ढिग करून ठेवलेले शेण व काडीकचरा सतत ऊन-पावसात राहत असल्यामुळे त्यातील आवश्यक अन्नघटक मोठ्या प्रमाणात हवेत व पाण्यासोबत निघून जातात. त्याऐवजी हाच शेण-काडीकचरा खड्डा करून त्या खड्ड्यात टाकल्यास जास्तीत जास्त एक मीटरपर्यंत खोलीच्या दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते. या पद्धतीत नेहमीच्या शेणखतासोबत येणार्‍या तणांचाही बंदोबस्त होतो.
पर्‍हाट्यापासून कम्पोस्ट बनविण्याची पद्धत
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने ही नवीन पद्धत विकसित केली आहे. यामध्ये १० मीटर लांब, २ मीटर रुंद, १ मीटर खोल खड्डा करून त्यात दोन हेक्टर क्षेत्रातील पर्‍हाट्यावर ज्वारीची फणवटे व सोयाबीनचे काड इतर मऊ सेंद्रिय पदार्थ पर्‍हाट्यातील रिकामी जागा भरण्यासाठी टाकावे. खड्डा चार थरावर हे द्रावण शिंपडावे व खड्डा मातीने झाकून घ्यावा. तयार झालेले खत गांडूळ खताप्रमाणे वापरता येते.
इफको, फास्फो, सल्फो, नायट्रो (पीएसएन) कम्पोस्ट आवश्यक सामग्री
* ताजा शेण २५० किलो
* काडीकचरा २५० किलो
* माती १५ किलो, युरिया ५.५ किलो
* राक फॉस्फेट किंवा डीएपी १४३ किलो किंवा २५ किलो, जिप्सम १०० किलो
* पीएसबी कल्चर २१ किलो
* जिथे ऊन पडते अशा ठिकाणी ३ मीटर लांब १.५ मीटर रुंद व १ मीटर खोल असा खड्डा बनवावा.
* पहिला थर ः १५ किलो काडीकचरा आणि १५ किलो शेण एकसारखे काडीकचर्‍यावर पसरावा.
* दुसरा थर ः ३३० ग्रॅम युरिया, १ लिटर पाणी व शेणात मिसळून पातळ करून शिंपडावा.
* तिसरा थर ः ८.६ किलो रॉक फॉस्फेट किंवा २ किलो डीएपी शेणासोबत मिसळून पातळ करून शिंपडावा.
* चौथा थर ः ६.२५ किलो जिप्सम, शेण व पाण्यासोबत मिसळून शिंपडावा.
* पाचवा थर ः १.५ किलो बारीक खत माती टाकावी. वरीलप्रमाणे असे १६ थर बनवावेत.
* शेवटी माती आणि शेणाच्या मिश्रणाचा लेप लावावा व यावर प्लॅस्टिक सीटने झाकावे.
* प्रत्येक ३-४ आठवड्यांची एक पलटणी द्यावी.
* खड्ड्यामध्ये ५०-६० टक्के आर्द्रता ठेवावी. यासाठी बांबूंनी पाच ठिकाणी छिद्रे करावीत. यामधून प्रत्येक दोन आठवड्यांनी पाणी घालावे.
* ११० दिवसांत उत्तम प्रतीचे ५५० किलो कम्पोस्ट तयार होते. खत थंड झाल्यावर यामध्ये पीएसबी कल्चर मिसळावे. अशा प्रकारे तयार झालेले कम्पोस्ट १ टन प्रति एकर याप्रमाणे वापरावे.
* पीएसएन कम्पोस्टमध्ये १.९० ते २.५० नत्र, ३.०५ ते ४.५ टक्के स्फूरदच्या व्यतिरिक्त सल्फर कॅल्शियम व अन्य सूक्ष्म पोषक तत्त्व असतात.
- प्रशांत वायझडे
क्षेत्रीय अधिकारी, इफको, जालना
मो. नं. ९०११५१५६२८

शेतीसाठी पाणी बचतीच्या नऊ गोष्टी युक्तीच्या

यंदाच्या जलसंकटाला तोंड देण्यासाठी उपलब्ध असणार्‍या पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि कार्यकुशलतेने वापर करून पीक उत्पादन घेण्याचा आणि भविष्यात वाढणार्‍या अशा प्रकारच्या संभाव्य संकटाची तीव्रता कमी करण्याचा प्रत्येक शेतकर्‍याने गांभिर्याने विचार केला पाहिजे. ज्या शेतकर्‍यांकडे सध्या थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, त्यांनी आपल्या अनुभवांप्रमाणे, निवडलेल्या पीक पद्धतीप्रमाणे आणि योजलेल्या सिंचन प्रणालीप्रमाणे पुढे उल्लेख केलेल्या उपायांचा वापर केला तर त्यांच्याकडील पाण्याची पन्नास टक्क्यांपर्यंत बचत होऊन पीक उत्पादनातील कार्यक्षमता टिकून राहील. यासंदर्भात ‘आधुनिक किसान’च्या मागील काही अंकांमध्ये माहिती प्रसिद्ध झालीच आहे. पाणी बचत आणि पीक नियोजनाचे उपाय याही अंकात देत आहोत.
सतत वाढत्या औद्योगिकरणामुळे, इंधन ज्वलनामुळे वातावरणात होणार्‍या बदलांवरून येणार्‍या काळात गोड्या पाण्याची कमतरता प्रचंड प्रमाणात भासेल असे संकेत दिसू लागले आहेत. आपल्याकडे मोसमी पावसाच्या दिरंगाईमुळे खरिपाचा हंगाम जवळजवळ धोक्यात आल्याचे दरवर्षी जाणवायला लागले आहे. काही ठिकाणी पाऊस कमी पडतो किंवा काही भागात तो मुसळधार पडतो. कमी पाऊस पडला तरी शेती आणि पिण्याच्या पाण्याची निकड भागवण्यासाठी भूजल स्रोतांवर अवलंबून राहावे लागते आणि मुसळधार पाऊस पडला की, त्याचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे भूजल स्रोतांचे पुनर्भरण न होऊन त्यांच्यावरील उपशाचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसते आहे. अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर भारतासारख्या शेतीप्रधान देशात पाण्याची ही कमतरता एखाद्या बॉम्बप्रमाणे अर्थकारणावर परिणाम करू शकते. येणार्‍या पावसाचे पाणी अडवले गेले नाही, जमिनीतल्या पाण्याचे पुनर्भरण केले गेले नाही, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला गेला नाही तर आपली अन्नसुरक्षा आणि पिण्याच्या पाण्याची गरज नक्कीच धोक्यात येईल. या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने आपापल्या परीने उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याने जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची वेळ आली आहे.
वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वापरल्या जाणार्‍या सिंचनाच्या पद्धती भिन्न असतात. त्यामध्ये त्या प्रदेशांचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण, आर्थिक स्थिती आणि शेती करण्याच्या पद्धतींचा ठसा बर्‍याच प्रमाणात उमटलेला असतो. जरी सिंचनाचे काही पाणी जमिनीतील शोषणाद्वारे स्थानिक भूजलसाठ्यात मिसळत असले तरी बरेचसे पाणी पिकांच्या वाढीसाठी आणि त्याद्वारे होणार्‍या बाष्पोत्सर्जनातून स्थानिक जलचक्राच्या बाहेर पडते. त्यामुळे पिकांद्वारे वाढीसाठी वापरल्या गेलेल्या पाण्याचा हिस्सा नेमका त्यापासून मिळणार्‍या उत्पादनासाठीच वापरला जाणे आणि पिकांमधून होणारे बाष्पोत्सर्जन कमीत कमी करणे हे पाणी बचतीचे दोन उद्देश प्राधान्याने डोळ्यांसमोर ठेवणे आवश्यक आहे. पाण्याची काटकसर करताना आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढवताना सध्या उपलब्ध असलेल्या ठिबक सिंचनाच्या पद्धतीला बागायती पिकांसाठी सध्या तरी दुसरा पर्याय नाही. सर्व प्रकारच्या फळबागा, कापूस-उसासारखी नगदी पिके, भाजीपाल्याची आणि फुलांची पिके घेणार्‍या शेतकर्‍यांनी सिंचनासाठी ही पद्धत अवलंबलीच पाहिजे. तुलना करायची झाल्यास सरीने पाणी दिल्यास कार्यक्षमता पन्नास-पंचावन्न टक्के मिळते, तर ठिबक सिंचनाने कार्यक्षमता ८५-९५ टक्क्यांपर्यंत मिळू शकते. यामधला मार्ग गहू, हरभरा, भुईमुगासारख्या पिकांसाठी तुषार सिंचनाच्या स्वरूपात वापरता येतो. ठिबक सिंचन प्रणालीतही कमी पाणी फेकणारे ठिबक आणि काही ठराविक दाबालाच कार्य चालू करणार्‍या नळ्या तसेच जमिनीच्या खाली बसवल्या जाणार्‍या नळ्या किंवा सच्छिद्र पाईप वापरल्यास अजूनही काही प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते आणि सिंचन कार्यक्षमतेने होऊन पीक उत्पादन वाढण्यास मदत होते.
१.जमिनीची मशागत
जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असेल तर पाण्याच्या ताणामुळे त्या लवकर भेगाळतात. जमिनी भेगाळल्या की, त्यात खोलवर असलेले पाणीही वाफ होऊन उडून जाते आणि पिकांना दिलेले पाणी भेगांत शिरून खोलवर जाऊन बसते. असे पाणी पिकांच्या उपयोगी पडत नाही. भेगा पडलेल्या जमिनीवर कोळपणी, निंदणी करून मशागत केली आणि जमीन झाकण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा वापर केला तर भेगा बुजल्या जाऊन सिंचनाची कार्यक्षमता वाढते आणि पाण्याची बचत होते. सेंद्रिय आच्छादनासाठी खुरपलेले गवत, तण, उसाचे पाचट, धान्य मळणी केल्यानंतर उरलेला भुसा, झाडांचा पालापाचोळा इत्यादी शेतकचर्‍याचा वापर करता येतो.
२.पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिके निवडा
पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणावरून पिकांची निवड करणेही आवश्यक आहे. उदा. मक्याच्या पिकाला एकरी ५.५ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते तर त्याच्या निम्म्या पाण्यात सूर्यफुलाचे पीक येऊ शकते. आपल्याकडे घेतली जाणारी ऊस, केळी अशांसारखी पिकेही प्रचंड प्रमाणात पाण्याची मागणी करतात. पाण्याची बचत करायची असेल तर अशा जास्त पाणी लागणार्‍या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारी पिके लावणे आणि त्यांचीही दुष्काळी परिस्थितीत तग धरून ठेवणारी वाणे वापरणे हाच उपाय शिल्लक राहतो. अशा वाणांवर काम करण्यास अनेक बिजोत्पादन कंपन्यांनी सुरुवात केली आहे. पाणी ही कुठल्याही पिकाची अत्यावश्यक गरज आहे; पण वनस्पतीच्या प्रकारावरून काही पिकांना जास्त तर काही पिकांना कमी पाणी लागते. सर्वसाधारणपणे वनस्पतीच्या अंगात १ ग्रॅम सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होण्यासाठी मुळांद्वारे जमिनीतून ५०० ग्रॅम पाणी शोषले जाते. हे पाणी मुळांपासून पानांपर्यंत पोहोचून त्यातला फक्त दोन टक्क्यांपर्यंतचाच भाग पेशींमध्ये राखला जातो आणि उरलेले पाणी वाफेच्या स्वरूपात परत वातावरणात सोडले जाते. जमिनीतून पाणी शोषणे आणि सेंद्रिय पदार्थांची निर्मिती म्हणजेच पिकांच्या बाबतीत उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग या गोष्टीची कार्यक्षमता ठरताना पीक वनस्पतीच्या पानांचे एकूण क्षेत्रफळ, मुळांचा प्रकार आणि संख्या, खोडातील पाणी वहन क्षमता, पानांवरील पर्णरंध्रांची संख्या, पानांची प्रकाश ऊर्जा आणि हवेतील कार्बन वायू खेचून घेण्याची क्षमता इत्यादी घटक महत्त्वाचे असतात. पानांचे एकूण क्षेत्रफळ, खोलवर जाणारी किंवा उथळ असलेली मुळे यावरूनही कुठल्या पिकाला कमी पाणी लागेल हे ढोबळमानाने ठरवता येते.
३.मोकळे पाणी देण्याच्या पद्धतीत सुधारणा
बर्‍याच शेतकर्‍यांनी अजूनही सिंचनाच्या आधुनिक सुविधा स्वीकारल्या नसल्याने पिकांना मोकाट पाणी देण्याची पद्धत सर्रास अवलंबली जाते. जमीन हलकी असेल तर पिकांना सारख्या पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. अशा वेळेस मुख्य पाईपला एक बायपास काढून त्यात व्हॉल्वद्वारे थोड्या-थोड्या वेळाने पाणी सोडले की, मुख्य धारेत अडथळे येऊन पाणी मोठ्या पृष्ठभागावर एकसारखे लवकर पसरण्यास मदत होते. या पद्धतीने पाण्याने माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच जमिनीत कमी पाणी मुरून पाण्याची बचत होते. सध्या उभ्या गव्हाच्या आणि हरभर्‍याच्या पिकांना ही पद्धत अमलात आणता येईल. भाजीपाल्याच्या पिकांसाठी सरी-वरंबा पद्धत वापरली असेल तर सुरुवातीच्या एक-दोन पाण्यानंतर नंतरचे पाणी फक्त एक आड एक सरीत जरी सोडले तरी पुरेसे होते.
४.पाण्याचे बाष्पीभवन कमी करणे
शेततळ्यातील पाण्याची उष्णतेने वाफ होऊन पाणी कमी होते. पाण्याच्या पृष्ठभागावर पसरणारी काही रसायने बाजारात उपलब्ध आहेत. अशा रसायनांचा तवंग पाण्यावर साठलेला राहून पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत करतो. अशा प्रकारची साधने वापरताना पाण्याचा दर्जा खालावणार नाही आणि सिंचन प्रणालीत अडथळे येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. शेततळ्यावर पन्नास टक्के ते नव्वद टक्के क्षमतेची शेडनेट एक ते दीड मीटर उंचीवर आच्छादूनही पाण्याचे बाष्पीभवन बर्‍याच प्रमाणात रोखता येते. अशा प्रकारे सावली केल्याने शेततळ्यात शेवाळ्याची वाढही होत नाही.
५.तुषार सिंचन पद्धतीचा वापर
तुषार सिंचनाचा संच उपलब्ध असल्यास हरभरा, गहू, कांदा, लसूण अशा पिकांसाठी त्याचा जरूर वापर करावा. यामुळे सिंचनाची कार्यक्षमता वाढून पाण्याची बचतही होते. फळझाडांसाठी छोटी स्प्रिंकलर्स वापरल्यास ठिबकपेक्षा जास्त जमीन भिजू शकते.
६.ठिबक सिंचनाचा वापर
पाण्याची बचत करणारी आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढवणारी सर्वात चांगली सिंचनप्रणाली कोणती असे विचारले तर ठिबक सिंचन प्रणालीचाच उल्लेख करावा लागेल; पण पाईपलाईनमधील गळती, फिल्टरमध्ये अडकलेला कचरा, गरजेपेक्षा जास्त दाब आणि पाणी देण्याचे अनियंत्रित वेळापत्रक यांमुळे अशी चांगली प्रणाली उपलब्ध असूनही पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. अगदी आणीबाणीच्या परिस्थितीत भाजीपाल्याची पिके आणि फळपिके यांच्यामध्ये तापमानाच्या चढ-उतारानुसार पाण्याच्या मागणीत होणारे बदल, पिकांची पाण्याची ताण सहन करण्याची क्षमता आणि जमिनीतील ओलावा यांचा अभ्यास करून ठिबक संचाद्वारे देण्यात येणार्‍या पाण्याची वीस टक्क्यांपर्यंत कपात करता येते. अशा प्रकारच्या तुटीच्या सिंचनाद्वारे सद्यःस्थितीत डाळिंब, आंबा, मोसंबीसारखी पिके दहा टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी देतील; पण दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहतील. कमी पाणी उपलब्ध असताना ‘पिकाचे मूळ क्षेत्र दिवसआड पक्षपातीपणाने भिजवणे’ ही एक नवीनच पद्धत आता अमलात आणली जाऊ लागली आहे. ठिबक सिंचनाद्वारे संध्याकाळच्या थंड वेळेत उघड्यावरील भाजी आणि फळपिकांना पाणी दिले तर सिंचनाची कार्यक्षमता वाढू शकते आणि पाण्याच्या पाळ्या कमी होऊन पाण्याची बचत होऊ शकते.
७.जमिनीवर आच्छादनाचा वापर
उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी शेतजमिनीवर आच्छादनाचा वापर करणे हा एक सोपा उपाय आहे. उघड्या जमिनीवर पिकांना दिलेले पाणी काही प्रमाणात जमिनीत मुरते आणि काही प्रमाणात उष्णतेने वाफ होऊन वातावरणात उडून जाते. जमीन हलकी असेल तर या दोन्ही घटनांच्या शक्यता जास्त असतात. अशा परिस्थितीत पीक लवकर ताणावर येऊन उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. या गोष्टीवर मात करण्यासाठी पाण्याच्या पाळ्या वाढवाव्या लागतात आणि त्यासाठी जास्त पाण्याची गरज भासते. फळपिके किंवा सरी-गादी वाफ्यांवर लावलेल्या भाजीपाला पिकांच्या भोवतीची जमीन शेतातील काडीकचर्‍याने किंवा बाजारात उपलब्ध पातळ प्लॅस्टिकच्या कागदाने झाकली तर जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्या लागून पाण्याची बचत होते. पीक लावलेल्या जागेपासून पाण्याचा स्रोत लांब असेल आणि दांडाने पाणी पिकापर्यंत आणण्याची पद्धत रूढ असेल तर दांडामध्ये प्लॅस्टिक कागदाच्या आच्छादनाचा वापर करावा किंवा गुंडाळी पाईप वापरून पीक जमिनीपर्यंत पाणी पोहोचवावे. यामुळे दांडातून पाणी वाहत जात असताना जमिनीत मुरून होणारी त्यातील तूट कमी करता येते.
८.पाण्याचे पुनर्भरण
‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अशासारख्या मोहिमा काही वर्षांपासून आपल्याकडे चालू झाल्याने भूजलाचे पुनर्भरण म्हणजे काय, याची थोडीफार कल्पना शेतकर्‍यांनाही आता येऊ लागली आहे. ज्या ठिकाणी नद्या, धरणे, तळी असे जलसाठे नाहीत अशा ठिकाणी विहिरीतून किंवा बोअरमधून मिळणार्‍या भूजलावरच पिकांचे सिंचन अवलंबून असते. अशा भूजल साठ्यांमधून सतत उपसा केला गेल्यास जमिनीतील पाण्याची पातळी खाली-खाली जाते आणि परिसरातील पाणथळ जागा किंवा नद्याही आटू लागतात. सद्यःस्थितीत सगळीकडे ही परिस्थिती आपण अनुभवतो आहोत. जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, त्यातील क्षारांचे प्रमाण वाढते आणि अशा पाण्याची विद्युतवाहकता जास्त राहून पिकांसाठी ते निरुपयोगी ठरू शकते. पाण्याची पातळी खाली गेल्याने पिकांना दिलेल्या पाण्याचा निचराही लवकर होतो आणि त्यांना वारंवार पाणी देण्याची पाळी येते. आपल्या शेतीचे क्षेत्र, त्यातील चढ-उतार बघून शेतात अथवा जवळून वाहणार्‍या ओढ्या-नाल्यांवर छोटे बंधारे बांधून पावसाच्या जोराने वाहणार्‍या पाण्याचा प्रवाह कमी कसा करता येईल, याचा विचार करून शक्य त्या पाणी जिरवण्याच्या योजना अमलात आणल्या तर भूजलाचे संवर्धन करण्यात आपलाही हातभार लागेल. शेततळी केलेली असतील तर त्यांचा उपयोग भूजल उपसून साठवणूक करण्यापेक्षा पावसाचेच पाणी साठवण्यासाठी करावा. हरितगृहे असतील तर त्यांच्या छतावर पडणारे पाणी एकत्र करून शेततळ्यात साठवावे किंवा विहिरी-बोअरमध्ये सोडावे. पावसाचे जमा केलेले पाणी हरितगृहातील पिकांसाठी उत्तम समजले जाते. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी युरोपसारख्या पन्हाळी पत्र्यांच्या बंदिस्त टाक्या आपल्याकडेही उभारून देणार्‍या कंपन्या आहेत. शेततळ्यांऐवजी अशा पर्यायांचा विचार करावा. पडिक जमिनीवर वनीकरण करूनही पाणी जमिनीत मुरवण्यास मदत होऊ शकते.
९.पाण्याचा पुनर्वापर
शेतीसाठी किंवा इतर कामांसाठी वापरलेल्या पाण्याचा शेतीसाठीचा पुनर्वापर हा पाण्यासारख्या किमती आणि दुर्मिळ होत चाललेल्या संसाधनाच्या बचतीचा शाश्‍वत पर्याय आहे. वनशेती किंवा जैवइंधनाच्या पिकांची शेती यासाठी तर हा पर्यायच वापरला गेला पाहिजे, असा विचार आता पुढे येतो आहे, तर खाद्य पिकांच्या उपयोगासाठी, मानवी आरोग्याचा विचार करता हा पर्याय वापरावा की नाही, याबद्दल साशंकता आहे. डेन्मार्कच्या ‘ग्रून्डफॉस बायोबूस्टर’सारख्या कंपन्यांनी केलेल्या संशोधनांवरून आणि निर्माण केलेल्या साधनांवरून मानवी सांडपाणीही थोड्या प्रक्रिया करून भाजीपाल्यासारखी पिके घेण्याच्या योग्यतेचे करून दाखवले आहे. अशा प्रकारच्या शक्यतांवर जास्त संशोधन झाल्यास आपल्याकडील विशेषतः मोठ्या शहरांच्या आसपासच्या शेतकर्‍यांची पाणी समस्या कायमची मिटण्यास हातभारच लागेल. हरितगृहांतही ‘मातीशिवाय शेती’ची कल्पना अमलात आणल्यास वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर सहजतेने करता येतो आणि या प्रकारच्या प्रणाली बर्‍याच ठिकाणी सर्रास वापरल्या जातात. या पद्धतीत पाण्याची आणि खतांची बचत असा दुहेरी फायदा असतो

Wednesday, 23 January 2013

अबब! दहा एकरांत एक कोटीचे आले!!

                  केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला शेतकरी दहा एकरांत एक कोटीचे उत्पादन घेऊ शकेल, यावर कदाचित विश्‍वास बसणार नाही; परंतु बहिरगाव (ता. कन्नड) येथील संतोष गुलाबराव जाधव (वय 34) यांनी हे साध्य केले आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेला व मेहनतीला आपण दाद देतो. त्यांनी आले लागवडीत नवनवीन प्रयोग राबवून उत्पादनाचा उच्चांक प्रस्थापित केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी आल्याचे उत्पादन घेऊन लक्षाधीश झाले आहेत.

जाधव यांनी आले लागवडीचा पहिला प्रयोग 1995 मध्ये दहा गुंठे जमिनीत केला, तेव्हा पाच क्विंटल उत्पादन मिळाले. 1998 मध्ये दोन एकर लागवड क्षेत्र वाढविले. एकरी उत्पादन 40 ते 50 क्विंटल निघाले. त्या वेळी दीड ते दोन हजार रुपये भाव मिळाला. जाधव यांनी क्षेत्रवाढ करण्यास सुरवात केली. आधुनिक तंत्राचा अवलंब केला. 2003 पर्यंत सरी पद्धतीने चार एकर क्षेत्रांवर लागवड केली व एकरी 150 ते 160 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले. त्या वेळी प्रतिक्विंटल चार ते पाच हजार रुपये भाव मिळाला. चार एकरांतून सुमारे तीस लाखांचे 600 क्विंटल आले निघाल्याने आत्मविश्‍वास वाढला. आले विक्रीच्या पैशातून संपूर्ण चाळीस एकर शेतीला ठिबक सिंचन केले. यासाठी स्टेट बॅंकेच्या चापानेर शाखेचे अर्थसाहाय्य घेतले.

त्यांनी 2004 पासून बेड पद्धतीने आले पिकाची लागवड करण्यास सुरवात केली. यामुळे उत्पादनात वाढ होऊन एकरी 325 क्विंटल उत्पादन काढले. तीन हजार रुपये भाव मिळाला. जाधव दोन वर्षांपासून सरासरी तीन हजार क्विंटल आल्याचे उत्पादन घेतात. त्यापैकी पाच-सहाशे क्‍विंटल बेणे विक्री होते. यातून बाजारभावापेक्षा दीड ते दोनपट जास्त नफा मिळतो. नवापूर, धुळे, सातारा, जालना, नाशिक, अकोला, जळगाव येथे बेणे पाठविले जाते. शेतीत नवनवीन प्रयोग राबवून उत्पन्न काढणाऱ्या जाधव यांना 2005-06 मध्ये तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते "शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

एकरी एक लाख रुपये खर्चआले लागवडीतून एकरी सरासरी दहा लाख रुपये उत्पन्न निघते. मात्र, त्यासाठी मशागतीपासून बाजारपेठेपर्यंतच्या प्रवासासाठी एक लाख रुपये खर्च येतो. एकरी नऊ क्‍विंटल आले बेणे लागते. या बेण्यास चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. एक ट्रॉली शेणखत तीन हजार रुपये भाव आहे. मुख्य बाजारपेठ सुरत, नंदुरबार, नाशिक आहे. एका गोणीमध्ये आल्याचे कंद स्वच्छ करून 40 ते 45 किलो भरून बाजारात पाठविले जाते. बाजारपेठेशी दररोज संपर्क ठेवून भावाचे अपडेट्‌स ठेवले जातात. मोबाईलवरून घरच्या घरी भाव कळतात.

समृद्धीकडे वाटचाल
बहिरगावात 381 घरे असून, शेतकऱ्यांकडे एकूण 325.55 हेक्‍टर जमीन आहे. त्यापैकी 56.73 हेक्‍टर कोरडवाहू आहे. जवळपास 70 टक्के शेती ठिबक व तुषार सिंचनाखाली आहे. परिसराचे पर्जन्यमान 749.2 मिलिमीटर असून, जागोजागी बांध घालून पाणी अडविण्यात आल्याने बारमाही उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी पोपटराव दापके (आठ एकर) यांनीही साठ ते सत्तर लाखांचे उत्पादन काढले. शिवाजी जाधव, नामदेव दापके, मधुकर जाधव, कार्तिक दापके, कचरू शिरसे (प्रत्येकी चार एकर), सुधाकर जाधव (तीन एकर), शिवाजी पाटील, संताराम पवार, कृष्णा पवार यांनीही विक्रमी उत्पादन घेतले. परिसरात आल्याच्या शेतीचे प्रमाण वाढल्याने मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत. अगोदर शंभर रुपयांवर समाधान मानणारा शेतमजूर आता दिवसाला तीनशे ते चारशे रुपये कमावत आहे.REF #  http://www.esakal.com/esakal/20100331/5287694650106746739.htm

Tuesday, 22 January 2013

शून्यातून विश्‍व निर्माण करीत पगार बनले पोल्ट्री उद्योगात आयकॉन!


घरची परिस्थिती हलाखीची असल्याने गंगा पगार यांनी गाव सोडून शहरात खासगी दुकानात नोकरी धरली. प्रामाणिकपणा, कामाचे चांगले नियोजन यातून त्यांनी तेथे मालकांचे मन जिंकले. उद्योजक बनण्याचे स्वप्नही मनाशी सतत बाळगले असल्याने पोल्ट्री व्यवसायात उडी घेतली. यातून केवळ जिद्द, अभ्यासाच्या जोरावर दहा वर्षांत हा व्यवसाय यशस्वी करून नावारूपास आणला. कमी भांडवल, कमी क्षेत्र असतानाही शिस्तबद्ध नियोजनातून प्रगतीची मोठी झेप घेणाऱ्या कळवण येथील पगार यांची राहुल हॅचरीज युवकांचे प्रेरणास्थान बनली आहे.
ज्ञानेश उगले

नाशिक जिल्हा पोल्ट्री उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अनेक पोल्ट्री उत्पादक खासगी कंपन्यांसोबत करार करून या पूरक व्यवसायात चांगला जम बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकजण यात यशस्वी झाले. काही मोठे उद्योजकही झाले. कळवण येथील गंगा पगार यांचे वय 35 वर्षे आहे. वयाच्या पंचविशीपासून ते पोल्ट्री व्यवसायात उतरले. या दहा वर्षांत करारातून पोल्ट्री व्यवसायात पदार्पण, स्वत:ची हॅचरीज, शेतकऱ्यांचा करार शेतीत सहभाग, स्वत:चे चिकन सेंटर, स्वत:चे ब्रीडर युनिट असे एकेक टप्पे त्यांनी पार केले आहेत. यातूनच नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या "कसमादे' पट्ट्यात राहुल हॅचरीज ब्रॅण्ड बनला आहे.

गंगा पगार- एक संघर्षयात्री
घरचे अठराविश्‍वे दारिद्य्र, वडिलांचे अकाली निधन झाल्याने लहान वयातच पडलेली कुटुंबाची जबाबदारी. अशा धडपडीतून चार लहान बहिणींच्या लग्नाची जबाबदारी पगार यांनी पेलली. पाठीशी फक्त आईचा आशीर्वाद आणि सोबत तीव्र महत्त्वाकांक्षा यातून संघर्षमय प्रवास सुरू राहिला आहे. शालेय शिक्षण सुरू असताना इतरांच्या म्हशी चारायचे काम करीत त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) केले. घरच्या गरिबीमुळे 1997 वर्षी वयाच्या विसाव्या वर्षी नाशिक शहरातील भाविनभाई शहा यांच्या दुकानात नोकरी पत्करली. चोख, विश्‍वासू कामाची पसंती मिळवत शहा यांनी पगार यांना कळवणमध्येच स्वतंत्र व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले. तेथे जनरल स्टोअर्स सुरू केले तरी शहा यांच्याकडील नोकरी सुरूच होती. दरम्यान वरवंडी येथे पोल्ट्री फार्म पाहिल्यानंतर हा व्यवसाय करण्याचे ठरविले. सन 2002 मध्ये पाच हजार पक्ष्यांच्या शेडपासून व्यवसायाला सुरवात केली. हरियाना, पानिपत, जबलपूर, हैदराबाद येथून पक्षी मागवावे लागत. नुकसान, फसवणूक यातून मार्ग काढीत तीन वर्षांनंतर बॅच चांगली येऊ लागली. मात्र कोंबडीला रेट पुरेसा मिळत नसल्याने आर्थिक चणचण वाढत होती. जवळ भांडवल नव्हते. बॅंकांचे उंबरठे झिजवले. तारणाअभावी कर्ज नाकारले. पुन्हा पितृतुल्य भाविनभाई धावून आले. त्यांनी आठ लाखांची मदत केली. पुढे अविश्रांत मेहनत, जिद्द, चिकाटी या गुणांचा कस लावीत पगार यांनी दहा वर्षांच्या संघर्षात यशाचा टप्पा गाठला आहे. एक हजार रुपये महिन्याची नोकरी करणारे पगार महिन्याला तब्बल एक कोटी रुपयांची उलाढाल करीत आहेत.

व्यवसायाची कुठली पार्श्‍वभूमी नसताना, मोठे भांडवल गाठीस नसताना दिवसरात्र मेहनत करीत, अनेक अडथळ्यांवर मात करीत प्रभावी व्यवस्थापन करीत त्यांनी पोल्ट्री व्यवसायात देदीप्यमान यश मिळविले आहे.

पगार यांचे वडिलोपार्जित अवघे सव्वा एकर (60 गुंठे) क्षेत्र. त्यातही पाण्याची सोय नसलेले. खरंतर दहा वर्षांपूर्वी ओसाड असलेले. शेतात जाणारा कच्चा रस्ता.. एखादेच आंब्याचे जुने झाड, त्या झाडाजवळच झोपडीवजा त्यांचे घर! अर्थात हे चित्र दहा वर्षांपूर्वीचे, आता मात्र संपूर्ण बदलले आहे. कळवण शहरातून दक्षिण दिशेने अर्धवट कच्च्या रस्त्याने गंगा पगार यांच्या शेताकडे जाता येते. शेताजवळ गेल्यानंतर मोठे प्रवेशद्वार, कडेला सुरक्षारक्षकाची खोली, परिसरात एक साधे, दोन दुमजली ब्रॉयलर शेड्‌स, हॅचरीस, खाद्य प्रक्रिया केंद्र या सर्व भागात कामगारांची सुरू असलेली लगबग असे दृष्य दिसते. तीन वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये पोल्ट्रीचे काम सतत सुरू असल्याने नेहमीच धावपळ असते.

कसा चालतो पगार यांचा पोल्ट्री उद्योग? 1) अंड्यापासून पक्षीनिर्मिती, पिले निर्मितीची यंत्रणा, दोन किलो वजनाचे पक्षी बनविण्याचा विभाग, पक्षी विक्री तसेच चिकन सेंटर असे वेगवेगळे उपविभाग.
2) प्रत्येक विभागाचे साप्ताहिक वेळापत्रक. त्यानुसार कामे परिपूर्ण व अचूक होण्याकडे पगार यांचे सातत्याने लक्ष.
3) सर्व विभागात पहाटेपासून कामास सुरवात. कामगारांकडून साफसफाई, कोंबड्यांची अंडी गोळा करणे, जंतुनाशक वापरून क्षेत्र साफ करणे, पुन्हा निर्जंतुकीकरण आदी कामे.
4) त्यानंतर अंडी "कोल्डरूम' मध्ये 16- 17 अंश से. तापमानाला व त्यानंतर इनक्‍युबेटरमध्ये साडेअठरा दिवस ठेवली जातात. (अंड्यापासून पिल्ले निर्मितीच्या या प्रक्रियेत पारंपरिक पद्धतीत कोंबडीला 21 दिवस लागतात. यासाठी 99.9 अंश से. तापमान व 86.5 टक्के आर्द्रता असते.) इनक्‍युबेटरमधील साडेअठरा दिवसांनंतर पुढील अडीच दिवस हॅचरमध्ये जातात. त्यानंतर 21 दिवसांनी म्हणजे 504 तासांनी पिल्लू बाहेर येते.
5) कॅन्डलिंग व स्कॅनिंग चाचण्यांच्या पद्धतीमुळे 12 व्या दिवशीच अंड्यांची फर्टिलिटी समजू शकते.
6) अशा पद्धतीने पगार यांच्या हॅचरीमधून दर महिन्याला एक लाख पिल्ले निघतात. पैकी 40 टक्के (40 हजार) पिल्ले करारशेतीसाठी 15 करारबद्ध शेतकऱ्यांना दिली जातात. उर्वरित पिल्लांची मुंबई, गुजरातमध्ये थेट बाजारात विक्री होते.
7) पिल्ले दोन किलो वजनाची बनवून विकली जातात. उर्वरित 10 टक्के कळवण परिसरातील स्वत:च्या चिकन सेंटरला जातात. असे दररोज 500 पक्षी सेंटरला जातात.

इन्सिमेशन महत्त्वाचे ब्रॉयलर अंड्यांच्या गुणवत्तेसाठी इन्सिमेशन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची. ती जितकी काळजीपूर्वक होईल तितके कोंबडीकडून गुणवत्तेचे अंडे मिळते. त्यासाठी एका नराकडून (कोंबड्यापासून) वीर्य काढून ते 100 मादींना (कोंबड्यांना) शास्त्रशुद्ध पद्धतीने दिले जाते. त्यासाठी प्रशिक्षित कामगारांची आवश्‍यकता असते. दर तिसऱ्या दिवशी 12 प्रशिक्षित कामगार सरासरी 10 हजार पक्ष्यांना इन्सिमेशन करतात. काटेकोर लक्ष असल्याने पिल्ले निर्मिती प्रक्रियेत पगार यांनी 90 टक्‍क्‍यांपर्यंत यशस्विता मिळाली आहे. पोल्ट्री उद्योगातील ती उच्चांकी मानली जाते.

दर्जेदार खाद्य हा यशाचा पाया
दर्जेदार खाद्य हा पोल्ट्री व्यवसायाच्या यशाचा पाया असल्याचे पगार मानतात. मका, सोयाबीन, नदीतील शंख, हिलग्रीट असे एकंदर 20 घटक एकत्र करून कोंबडीखाद्य तयार केले जाते. पोल्ट्री खर्चाच्या 60 टक्के खर्च खाद्यावर होत असल्याने त्याचे पोल्ट्रीतच मिश्रण करणे, त्यावर प्रक्रिया करणे या बाबींवर भर दिला आहे. दिवसातून एकदाच खाद्य दिले जाते. प्रत्येक पक्षाला 150 ग्रॅम खाद्य मिळेल याकडे लक्ष दिले जाते. पक्ष्यांना विविध रोगांपासून वाचविण्यासाठी पिल्लांच्या आईचे तसेच पिल्लांचेही पहिल्या दिवसांपासून ते 67 आठवड्यांपर्यंत एकूण 40 वेळा लसीकरण केले जाते.

भारनियमनामुळे खर्चात भरच
पोल्ट्री व्यवसायाला पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत 18 तास अखंडित वीजपुरवठा आवश्‍यक असतो. या काळात अल्पवेळेसाठी जरी वीज खंडित झाली तरी इनक्‍युबेटरमधील पक्षी दगावून लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. यासाठी पगार यांनी सहा जनरेटर संच खरेदी केले आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला. या नियोजनात रात्री नऊ ते रात्री चार या काळात सर्व शेडमधील वीजपुरवठा बंद करण्यावर कटाक्षाने भर दिला जातो. कारण या काळात दूरवरचा प्रकाश जरी पक्ष्यांच्या नजरेच्या टप्प्यात आला तरी पक्षी प्रोलन्स आजाराने रोगग्रस्त होऊ शकतो.

स्वच्छता आवश्‍यकच!
- ब्रॉयलर शेड, हॅचरीज व पोल्ट्री परिसरात शंभर टक्के स्वच्छता ठेवण्यावर भर दिला जातो.
- एकूण 25 कामगारांपैकी चार कामगारांना सातत्याने सफाईची जबाबदारी
- अंड्यातून पिल्लू बाहेर पडताना शेवटचा एक तास सर्वाधिक महत्त्वाचा. या वेळी पिल्लांची गर्दी वाढते. या वेळी तापमान वाढून पिल्ले दगावण्याचा धोका असतो.

सोयाबीन टंचाईचे आव्हान
पोल्ट्री व्यवसायासमोर मजूर व सोयाबीन टंचाई, त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च ही मोठी समस्या आहे. पोल्ट्रीचे काम ठराविक वेळेचे नसते. कामाचे स्वरूपही वेगळे असते. त्यामुळे मजूर मिळणे अवघड बनते. सध्या पगार यांच्याकडे 25 मजूर तीन शिफ्टमध्ये काम करतात. त्यांना प्रशिक्षण, प्रोत्साहन देण्याबरोबरच गॅसपुरवठ्यासारख्या सुविधाही दिल्या जातात. त्यांचे आजारपण, अडचणीसंदर्भात विशेष आपुलकीने लक्ष दिले जात असल्याने मजूर आमच्या कुटुंबातील घटक झाल्याचे पगार म्हणाले.

अर्थशास्त्र
खर्चाचा विचार करता ब्रीडर, हॅचरीज, कॉन्ट्रॅक्‍टचे शेड्‌स, मजूर, लाइट, मजूर आणि खाद्य यासाठी रोज तीन लाख रुपये या प्रमाणे महिन्याला 90 लाख रुपये खर्च होतो. उत्पन्न पाहता रोज 3000 अंडी व 4500 पिले तयार होतात. पिलांना सरासरी 20 रुपये दर मिळतो. त्यातून 90 हजार रुपये उत्पन्न मिळते. या शिवाय दररोज 50 टक्के पक्षी ब्रॉयलर म्हणून विक्री होतात. त्याला सरासरी सरासरी 60 रुपये मिळतो. करार शेतीसाठी (कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिग) महिन्याला पाच लाख पक्षी तर चिकन सेंटरसाठी रोज 500 पक्षी पाठवले जातात. या सर्वांचे एकत्रित उत्पन्न पाहिले तर एकूण एक कोटी रुपये उत्पन्न मिळते. एक कोटी रुपये निव्वळ उत्पन्नातून 90 लाख रुपये खर्च यातून प्रत्येक महिन्याला सरासरी 10 लाख रुपये निव्वळ उत्पन्न यातून मिळत असल्याचे गंगा पगार यांनी सांगितले.

सुरवातीला संधी नाकारली मात्र...
सन 2005 वर्षी पगार यांनी आपला ब्रीडर फार्म सुरू करायचे ठरविले. तेव्हा ते या क्षेत्रातील एका आघाडीच्या खासगी कंपनीच्या कार्यालयात कळवणहून एसटी बस व रिक्षाने गेले. यावर ब्रीड नेण्यासाठी करोडपती उद्योजक स्वत:च्या वाहनाने येतात. तुमच्यासारखी व्यक्ती हा व्यवसाय करू शकत नाही, असे सांगत पगार यांना ब्रीड देण्याचे नाकारले गेले. मात्र पगार यांनी उद्योगाच्या सर्व निकषांसाठी पात्र असतानाही ब्रीड देण्याचे का नाकारता, असा सवाल करीत कंपनीचा पिच्छा पुरवला. त्यानंतर मात्र त्यांना अपेक्षित ब्रीड तर मिळालेच त्याशिवाय त्यांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी कंपनीने त्यांची विशेष प्रशंसाही केली.

संपर्क - गंगा पगार, 9423556244

दुष्काळात मल्चिंगचा वापर ठरला पिकांना वरदान

अलीकडील वर्षांत, त्यातही प्रामुख्याने मागील वर्षी महाराष्ट्रातील विविध भागांत दुष्काळाची तीव्रता भयंकर जाणवली. तरीही पाण्याची अधिकाधिक बचत करण्याचे उपाय वापरून शेतकऱ्यांनी आपली पिके जगवण्याचा प्रयत्न केला. त्यात जैविक तसेच पॉलिमल्चिंगचा (प्लॅस्टिक पेपर) वापर अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यातील काही निवडक प्रयोग. येत्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना या प्रयोगांची प्रेरणा उपयोगी ठरणार आहे.
वासुदेव काठे यांचा द्राक्ष बागेत प्रयोग

नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथील प्रयोगशील शेतकरी व श्री. अ. दाभोळकर प्रयोग परिवाराचे समन्वयक वासुदेव काठे यांनी दुष्काळजन्य स्थितीत पाण्याची बचत करणारे विविध प्रयोग आपल्या द्राक्ष बागेत केले आहेत. अलीकडील वर्षात द्राक्ष पिकाला दुष्काळी परिस्थितीचा गंभीर सामना करावा लागला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणतात, की जेथे पाणी अजिबात उपलब्ध नाही तेथे छाटणी न करता बाग फक्त जिवंत कशी राहील असा विचार करावा लागेल. अशावेळी बागेत गवत उगवले असेल तर वरंब्यावर त्याचे मल्चिंग करावे.
काठे यांचे प्रयोग त्यांच्याच शब्दांत.

बाष्पीभवनावाटे वाया जाणाऱ्या पाण्याची बचत
1) सेंद्रिय आच्छादन : दुष्काळात सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करण्यासाठी साखर कारखान्यातील बगॅस आदींचे आच्छादन फायदेशीर ठरते. बागेत वाढलेले गवत कापून वरंब्यावर आच्छादनाकरिता वापरावे. द्राक्ष बाग छाटणीपूर्वी बागेवर प्रति 200 लिटर पाण्यास 750 ग्रॅम मोरचूद + 600 ग्रॅम चुना असे बोर्डो मिश्रण तयार करून त्यामध्ये प्रति एक लिटर पाण्यास दीड ग्रॅम वेटेबल सल्फर (80 डब्ल्यूडीजी) एकत्र करून गच्च फवारावे. त्यामुळे पानांवरील, काडीवरील डाऊनी, भुरी व काही कीटकांच्या अळ्यांचा नाश होईल. यानंतर छाटणीत पडलेल्या काड्यांचे वरंब्यावर आच्छादन करावे.
2) प्लॅस्टिक मल्चिंग : आमच्या प्रयोगांतून लक्षात आले की विविध जमिनींत 40 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत पाण्याची बचत प्लॅस्टिक मल्चिंगमुळे होते.

प्लॅस्टिक मल्चिंग पद्धती
1) द्राक्ष बागेत बहुतांशी ठिबक सिंचनाच्या लॅटरल वरंब्यावरती अडीच- तीन फुटांवर बांधलेल्या असतात. तेथून वरंब्यावर पाणी पडून पसरत असते. अशावेळी प्लॅस्टिक मल्चिंग करताना ठिबकचे जमिनीवर जेथे पाणी पडते तेथे नऊ इंचाचे प्लॅस्टिकचे गोल छिद्र कापून घ्यावे. खबरदारी म्हणजे छिद्र पाडलेल्या ठिकाणी पाणी सतत पडून तेथील माती प्लॅस्टिकला लागून घट्ट होते. त्यामुळे काही प्रमाणात पाणी प्लॅस्टिकवरून वाहून जाते. त्यामुळे पाण्याच्या दर दुसऱ्या ते तिसऱ्या पाळीला मातीत घट्ट झालेले प्लॅस्टिक हाताने मोकळे करून घ्यावे. म्हणजे प्लॅस्टिक मल्चिंगचा पुरेपूर वापर होतो.
2) अन्य पद्धत : यात ठिबक सिंचनाची लॅटरल वरंब्यावर ठेवून संपूर्ण वरंबा प्लॅस्टिकला छिद्र न पाडता झाकून घेतला जातो. साधारण चार फूट रुंद प्लॅस्टिक मल्चिंग करून कडेने झाकले पाहिजे. प्लॅस्टिक मल्चिंग पेपरवर एक ते दीड इंच माती दोन्ही प्रकारच्या मल्चिंग पद्धतींत टाकली पाहिजे. म्हणजे पेपर तापत नाही व बाष्पीभवन कमी होते. प्लॅस्टिक मल्चिंग पेपर तापला नाही तर त्याखाली भरपूर प्रमाणात पांढऱ्या मुळ्या तयार होतात. त्यामुळे अत्यंत कमी पाण्यातही वेलीची वाढ जोमदार होते.

महत्त्वाच्या टिप्स
1) पाणी कमी असल्यावर बरेच शेतकरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अर्धा तास पाणी देतात. याप्रमाणे पाणी दिल्यावर बागेस सेंद्रिय किंवा प्लॅस्टिक मल्चिंग नसेल, तर दिलेल्या पाण्यापैकी 50 ते 60 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. कसबे सुकणे (ता. निफाड) येथील आनंद तिडके यांच्याकडील प्रयोगात (2009) दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देत असलेले पाणी एकत्र करून तेवढेच पाणी दर सात दिवसांनी दिले. त्यामुळे बागेस पाण्याचा ताण न जाणवता ती कमी पाण्यात जोमदार राहिली. कारण दर दुसऱ्या दिवशी पाणी देण्याच्या पद्धतीत दिलेल्या पाण्यापैकी 50 टक्के हे मुळांच्या कक्षेत जमिनीच्या पृष्ठभागापासून दोन ते सहा इंचात न जाता वरच्या वर राहते. त्यातील अधिकाधिक पाण्याचे बाष्पीभवन होते. सात दिवसांनी एकत्र करून दिलेले पाणी दोन ते सहा इंच खोलीत जाते. एकावेळेस जादा पाणी दिल्याने ते जमिनीत पसरून जास्त मुळांना मिळते व त्याचा फायदा होतो. दर सात दिवसांनी पाणी देण्याबरोबर मल्चिंग असेल, तर पाण्याची बचत अत्यंत चांगली होते व बागही जोमदार राहते असे माझ्याकडील सातत्याने तीन वर्षे केलेल्या प्रयोगांत लक्षात आले.

प्लॅस्टिक मल्चिंगच्या बागेत ठिबक व्यवस्थापन
प्लॅस्टिक मल्चिंग केलेल्या बागेत ठिबक सिंचन व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे. कारण ठिबकचे लॅटरल, ड्रीपर जर प्लॅस्टिक मल्चिंगखाली झाकले असेल तर ते डोळ्यांना दिसत नसल्याने ड्रीपर बंद किंवा सुरू आहे हे समजत नाही. ड्रीपर बंद पडणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागते. अशावेळी पुढील काळजी घ्यावी -
1) बागेला देत असलेले पाणी शक्‍यतो गढूळ नसावे किंवा कचरा विरहित असावे.
2) ठिबक संचाचा सॅण्ड फिल्टर गरजेनुसार पाण्याच्या दोन ते चार पाळ्यांनंतर तर स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर गरजेनुसार पाण्याच्या दोन ते तीन पाळ्यांनंतर साफ करावा.
4) पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्यास महिन्यातून एक वेळेस ऍसिड ट्रीटमेंट ठिबक संचास करावी. क्षार जास्त नसतील तर किमान तीन महिन्यांनी ही ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे. सर्वसाधारण परिस्थितीत ठिबक सिंचनाने ड्रीपर मल्चिंगखाली झाकलेले नसतील तेव्हा सहा महिने, वर्षातून एकदा ठिबक संचास ही ट्रीटमेंट करावी.
5) दर 15 दिवसांनी पीव्हीसी पाइपमधील साचलेली गाळमाती एण्डकॅप उघडून काढून द्यावी.

महत्त्वाचा मुद्दा
काळ्या जमिनीत प्लॅस्टिक मल्चिंग केल्यास 40 टक्‍क्‍यांपर्यंत, तर मुरमाड जमिनीत 50 टक्के ते अधिक पाणी बचत होते. काळ्या जमिनीत पाणी खोल जाते, त्यामुळे बाष्पीभवनाने पाणी कमी उडून जाते. मुरमाड जमिनीत पाणी कमी खोल जिरते व पृष्ठभागावर पसरते. त्याचे बाष्पीभवन जास्त होते. मुरमाड जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन प्लॅस्टिक मल्चिंगने मोठ्या प्रमाणात कमी होऊन पाण्याची बचत काळ्या जमिनीपेक्षा जास्त होते.

उसाला मिळाला आधार
सांगली जिल्ह्यातील पानमळेवाडी (ता. तासगाव) येथील कुलदीप पाटील यांचे मागील वर्षी लावण व खोडवा धरून सुमारे 12 एकर ऊस क्षेत्र होते. द्राक्षाच्या टापूत त्यांचे ऊस पीक पथदर्शक होते. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने ऊस अडचणीत आला. विहिरी कोरड्या पडल्या. संपूर्ण क्षेत्राला ठिबक असल्याने त्यांनी पाणी मोजून दिले. मात्र जमिनीत ओलावा टिकून राहावा यासाठी उसात पाचटाचे मल्चिंग केले. महिना ते सव्वा महिन्यापर्यंत त्याचा परिणाम राहतो.

सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत तर पिण्याचेही पाणी उपलब्ध नव्हते. या भागात जिद्दीने द्राक्ष बागा फुलवणारे बागायतदार आहेत. येथे पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेले शेतकरी आहेत. सन 2011 मध्ये भरून ठेवलेल्या शेततळ्याच्या माध्यमातून द्राक्ष बागा जगवण्याचे नियोजन त्यांनी मागील खरिपात केले. सोनलगी (ता. जत) येथील विठ्ठल बिराजदार व त्यांच्या भावांची मिळून वीस एकर द्राक्ष क्षेत्र मागील वर्षी होते. दुष्काळी परिस्थिती गृहीत धरून मागील जानेवारीतच उसाचा पाला गोळा करून संपूर्ण बागेत पसरून घेतला. जमिनीतील ओल कायम राहावी असा प्रयत्न केला. या मल्चिंगचा दुष्काळात आधार झाल्याचे ते म्हणाले.

याच भागातील रोहिदास सातपुते यांनीही आपल्या द्राक्ष बागेला पाल्याच्या मल्चिंगचा आधार शोधला. मल्चिंगमुळे प्रतिकूल परिस्थितीत ओलावा जास्त दिवस टिकून राहिला व पांढऱ्या मुळ्या सुटण्यास मदत झाली.

वेलंग (जि. सातारा) येथील शेखर पाटणे यांचा भाग कमी पावसाचा आहे. त्यांच्या गटशेतीच्या माध्यमातून सदस्य शेतकऱ्यांनी गेल्या सात- आठ वर्षांपासून पट्टा पद्धत आणि पाचटाच्या आच्छादनावर भर दिला आहे. मागील वर्षी पावसाने चांगलाच ताण दिला. अशावेळी पाचट आच्छादनामुळे पाटपाण्यावरील उसाला 20 दिवसांनी पाणी दिले. जोड ओळ लागवड असल्याने एकाच सरीत पाणी दिले जाते. जेथे ठिबक सिंचन आहे तेथे दर चार दिवसांनी केवळ चार तास ठिबकने पाणी देतो. वेलंग गावातील बहुतांश शेतकऱ्यांना पाचटाचे महत्त्व पटले आहे.

आष्टा (जि. सांगली) येथील प्रयोगशील ऊस उत्पादक संजीव माने यांनीही खोडव्यात पाचटाचे आच्छादन करून जमिनीत गारवा टिकवला. लावणीच्या उसाचे खालचे पाचट मुद्दाम काढले नाही, त्यामुळे उसातून होणारे बाष्पीभवन काही प्रमाणात थांबले.

जे. बी. पाटील हे गोटखिंडी (जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी. गेल्या काही वर्षांपासून ते पाचट जमिनीत कुजवीत असल्याने जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण चांगले वाढले असून, पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमताही वाढली आहे. त्यामुळे पावसाचा ताण पडला तरी जमिनीतील टिकलेल्या ओलाव्याचा पिकाला फायदा झाला आहे.

तणांचे मल्चिंग फायदेशीर
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनीही मल्चिंगबाबत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी राबविलेल्या शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर विदर्भातील राजेश पाटील यांनी आपल्या कापूस पिकात केला. एक पट्टा पिकांचा आणि एक पट्टा तणांचा घेऊन त्यांनी दुष्काळी परिस्थितीतही चांगल्या प्रकारे पीक जगवण्याचा प्रयत्न केला. एका पट्ट्यात तणे वाढवायची, फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ती जमिनीलगत कापायची असा हा प्रयोग होता. तणांचे मल्चिंग केल्याने भूपृष्ठावर ओलावा टिकवून ठेवला जातो. तणांच्या मुळ्या जमिनीत राहिल्याने जमीन भुसभुशीत राहते. पुढे तण कुजल्याने त्याचे खत तयार होते. पिकाला त्याचा फायदा होतो. कोल्हापूर जिल्ह्यात विविध भागांतील शेतकरी हा प्रयोग करीत आहेत.

चिपळूणकर म्हणतात, की विदर्भातील काही शेतकरी तूर- सोयाबीन, कापूस-सोयाबीन, कापूस-तूर, तूर- मूग किंवा उडीद अशी मिश्र पीक पद्धती वापरतात. या पद्धतीमुळे मुख्य पिकास पाण्याचा ताण सहन करावा लागतो. काही वेळेला मुख्य पिके वाया जाण्याचाही धोका असतो. यासाठी मिश्रपीक घेण्याऐवजी मुख्य पिकामध्ये तणांचा पट्टा वाढविण्याचे प्रयोग सुरू आहेत. ही तणे फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्यांचा वापर मल्चिंगसाठी हिरवळीच्या खतांबरोबर करता येतो. त्यातून पाण्याची बचत केली जाते. द्राक्ष, डाळिंबाच्या बागांतही असे प्रयोग सुरू आहेत. त्यात बागांमधील आंतरमशागत बंद केली आहे. तणे वाढवायची व फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच ब्रश कटरने जमिनीलगत कापून त्याचे आच्छादन केले जाते. तणांच्या मुळांना धक्का द्यायचा नाही. यामुळे बागांमध्ये आंतरमशागतीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चातही बचत होते व पिकास सेंद्रिय खतही उपलब्ध होते. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. पाण्याची कमतरता भासणाऱ्या भागात असे प्रयोग होणे गरजेचे आहे.

जळगाव जिल्ह्यातील लोहारा येथील प्रयोगशील सेंद्रिय उत्पादक विश्‍वासराव पाटील गेल्या अनेक वर्षांपासून किफायतशीर व प्रायोगिक शेती करीत आहेत. त्यांच्या शेतीतील व्यवस्थापनात पीक फेरपालट, चौरस पीक पद्धती, आंतरपिके, मिश्रपिके, सापळा पीक पद्धती, वाफसा अवस्था, आच्छादन वापर, हिरवळीची खते यांचा समावेश असतो. शेतातील बांधावर वाढणाऱ्या गवताचे आच्छादन केले तर जमिनीची धूप थांबून बाष्पीभवन रोखण्यास मदत होईल असे ते म्हणतात. शेतात तयार होणारे सेंद्रिय कर्ब म्हणजे काडी-कचरा, उसाचे पाचट आदींचा वापर आच्छादनासाठी करावा. पीक काढणीनंतर पिकाचा उरलेला प्रत्येक अवशेष उपयोगात आणता येऊ शकतो.

शिवणी (जि.जालना) येथील उद्धव खेडेकर अभ्यासू शेतकरी आहेत. पाण्याची परिस्थिती पाहून उन्हाळी भाजीपाला, शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची असे त्यांचे नियोजन असते. शेततळ्यातील पाण्यावर उन्हाळी विशेषतः शेडनेटमध्ये ढोबळी मिरची व काकडी घेतली जाते. शेडनेटमध्ये पॉलिमल्चिंग पद्धतीचा वापर करतात, मात्र प्रत्येक पिकातच पॉली वा जैविक मल्चिंगचा वापर करून पाण्याची बचत त्यांनी साधली आहे.

पंढरपूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) आढीव येथील प्रगतिशील शेतकरी भारत रानरुई यांची सुमारे 35 एकर शेती असून त्यात द्राक्षे, ऊस, केळी, डाळिंब, आंबा आदी पिके असतात. यंदाच्या दुष्काळात सात एकरांपैकी केवळ दोन एकर ऊस त्यांनी पट्टा पद्धतीने ठेवला व त्यात पाचट ठेवले. सात एकरांपैकी खोडव्याची चार एकर केळी सोडून दिल्यानंतर उर्वरित केळीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. केळीच्या सर्व क्षेत्रात पडणाऱ्या पानांचे मल्चिंग करायचे होते, मात्र पाने कमी पडल्याने एक आड एक सरी मल्चिंग केले. डाळिंब बागेसाठी लाकडाच्या वखारीतून लाकडी भुसा विकत आणून डी- कंपोस्टिंग कल्चर व शेणाची स्लरी टाकून 21 दिवस कुजवून त्याचे मल्चिंग केले. आंब्याच्या बागेतही ते मशागत करत नाहीत. त्यामुळे पालापाचोळा, काड्यांचा शेतात थर तयार झाला आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी राहतो.

डाळिंबात मल्चिंग पेपरचा वापर फायदेशीर
पाण्याची उपलब्धता चांगली असतानाही पाण्याचा अपव्यय न होता त्याचा काटेकोर वापर व्हावा यासाठी अनेक शेतकरी मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करतात. सोलापूर जिल्ह्यातील कुसळंब (ता. बार्शी) येथील अरुण व अशोक शिंदे या बंधूंनी आपल्या शेतातील बहुतेक सर्व पिकांसाठी "मल्चिंग पेपर'चा वापर करण्याचा प्रयोग पूर्वी केला आहे. या पद्धतीतून त्यांनी मशागतीचा खर्च वाचवलाच शिवाय पाण्याची मोठी बचत केली.

पपई, केळी, खरबूज, कलिंगड अशा पिकांमध्ये मल्चिंगचा मुख्यतः वापर होतो. मात्र शिंदे बंधूंनी डाळिंबासह केळी, द्राक्ष, कलिंगड अशा बहुतांश पिकांना मल्चिंगचा वापर केला. त्यांच्या अनुभवानुसार मल्चिंग पेपरमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत बचत झाली. झाडांच्या पोषकतेला फायदेशीर ठरणारी पांढरी मुळी सशक्त राहते. झाडाच्या चोहोबाजूंनी पेपर अंथरल्याने खुरपणीचा खर्चही वाचतो. अलीकडील वर्षात डाळिंब उत्पादकांना मर, सूत्रकृमी आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. डाळिंबात मल्चिंग केल्याने सूत्रकृमीवर नियंत्रण ठेवणेही शक्‍य होऊ शकेल, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

पॉलिमल्चिंग पेपरचा वापर फायदेशीर कसा?
1) जमिनीचे तापमान व आर्द्रता अनुकूल राहून पांढऱ्या मुळींची उत्तम वाढ होते.
2) बाष्पीभवन कमी होते.
3) प्रकाश परावर्तन करत असल्यामुळे पिकांवर येणाऱ्या रसशोषक किडींवर नियंत्रण मिळवता येते.
4) सूर्यप्रकाश जमिनीवर पोचत नसल्याने तण उगवण्यास अटकाव होतो.
5) जमीन वाफशावर राहिल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

केळीच्या मोकळ्या पट्ट्यात पालापाचोळ्याचे आच्छादन
दुष्काळी परिस्थितीत अत्यल्प व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून रोपळे बु. (जि. सोलापूर) येथील प्रताप बिस्किटे यांनी केळीची बाग चांगल्या प्रकारे जोपासली आहे. बागेतील मोकळ्या पट्ट्यात पालापाचोळ्याचे आच्छादन केले. गांडूळ खत निर्मितीचा प्रयोगही केला.
रोपळे भागातील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळाच्या तीव्र झळा बसल्या. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली.
बिस्किटे यांचे मागील वर्षी चार एकर केळीचे क्षेत्र होते. मागील वर्षी मार्च- एप्रिल महिन्यात त्यांना पाणीटंचाईने घेरले. केळी बागेला पाणीटंचाईची झळ बसू लागली. जुन्या विहिरीचे थोडे पाणी उपलब्ध झाले. पुन्हा मेमधील कडक उन्हाळ्यामुळे हे पाणी कमी झाले. दररोज शेतात स्वतः उभे राहून ठिबक सिंचनाने पाणी देऊनही पाणी कमी पडू लागले. त्या वेळी नवीन बोअर घेऊन त्यातील पाणी विहिरीत घेणे व ते ठिबक सिंचनाने बागेला देणे सुरू होते.

बागेत गांडूळ खत निर्मिती
या परिस्थितीत नियोजन करताना वाळलेला पाला, केळीच्या खुंटाचे वाळलेले सोपट काढून ते बागेतील लागवडीच्या मोकळ्या पट्ट्यात समान पद्धतीने पसरले. त्यात तीन ते चार दिवसांनी पाणी सोडले. यामुळे पाल्याखाली ओलावा तयार झाला. एका कृषी प्रदर्शनातून त्यांनी गांडूळ कल्चर आणले होते. त्याच्या वापरामुळे बागेत गांडूळ संवर्धन झाले. यामुळे चांगले सेंद्रिय खत तयार होऊ लागले.

योग्य व्यवस्थापनातून केळी फुलली. विक्रीच्या सुरवातीच्या टप्प्यात व्यापाऱ्याला जागेवरच तीन टप्प्यांत व तीन दरांमध्ये म्हणजे प्रति किलो नऊ, साडेनऊ व पावणेदहा असे दर बिस्किटे यांच्या केळीला मिळाले. बागेत सुमारे 25 किलोपासून 35 किलो वजनाचे घड तयार झाले. उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्याने शेजारच्या केळी उत्पादकाला ज्या वेळी किलोला साडेसात रुपये दर मिळत होता, त्या वेळी बिस्किटे यांच्या बागेतील केळींना तो नऊ रुपये मिळाला होता.

दुष्काळी आटपाडी तालुक्‍यात सात एकरांत ढोबळी मिरची

सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा कायम दुष्काळी तालुका. प्रतिकूल परिस्थितीमुळे येथील अनेकांना गावे सोडण्याची वेळ आली. मात्र, तालुक्‍यातील घरनिकी येथील सुरेश बेरगळ या युवा शेतकऱ्याने विलक्षण जिद्दीने शेती फुलवली आहे. पाणी उपलब्ध त्या सर्व स्रोतांतून अक्षरशः संकलित करून त्यांनी तब्बल सात एकर ढोबळी मिरचीचे पीक आटपाडीच्या वाळवंटसदृश भागात मागील वर्षी घेतले. दोन वर्षांपूर्वीही त्यांनी ढोबळी मिरची घेतली होती. मागील वर्षीही परिस्थिती अनुकूल राहील या भरवशावर पिकाचे नियोजन केले. जुलैला पाऊस पडेल या अपेक्षेतून एप्रिलमध्ये लागवड केली. पाण्याची बचत करण्यासाठी पॉलिमल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर केला. पाण्याच्या काटेकोर बचतीतून ढोबळी मिरची फुलवली.

सुरवातीच्या पाच तोड्यांना प्रति किलो सरासरी चौदा रुपये भावही मिळाला. अर्थात, उत्पादनापेक्षा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे पीक पॉलिमल्चिंग वा ठिबक सिंचन अशा विविध उपायांनी जगवणे हीच गोष्ट या प्रयोगात महत्त्वाची ठरली.

सामूहिक प्रयत्नांतून देऊ तेलकट डागाशी लढा

डाळिंब फळपीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे आहे. परंतु त्यातील तेलकट डाग व मर रोगाच्या समस्येमुळे अतोनात नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांना यातून दिलासा देण्याचा संकल्प सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे नवनियुक्त संचालक डॉ. आर. के. पाल यांनी केला आहे. सामूहिक प्रयत्नांतून तेलकट डागाशी लढा देणे शक्‍य आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

तेलकट डाग रोगाची समस्या कशी सुटणार?
- डाळिंबातील तेलकट डाग रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. संघटित होऊन या रोगाला नियंत्रणात ठेवणे शक्‍य आहे. यामुळे एका बागेतून दुसऱ्या बागेत रोगाचे जिवाणू पसरणार नाहीत. जिथे तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे, तिथे शक्‍यतो मृग बहर घेण्याचे टाळावे, हस्त बहर घ्यावा. मृग बहर घेणाऱ्यांनी दक्षता बाळगावी. शासन मान्यताप्राप्त रोपवाटिकेतील रोपेच लागवड केली पाहिजे. रोपवाटिकांचे प्रमाणीकरण काटेकोरपणे व्हायला हवे. रोपवाटिकेतील रोपांत एक टक्‍का जरी तेलकट डाग रोगाचे प्रमाण आढळले तरी त्याबाबत कारवाई केली पाहिजे. यासाठी शासनामार्फत अभियान राबविण्याची गरज आहे. केंद्राच्या आवारात संशोधन प्रात्यक्षिकात लावलेल्या डाळिंबाच्या दोन जातींमध्ये एक तेलकट डाग रोगाला थोड्याफार प्रमाणात प्रतिकारक, तर दुसरी संवेदनशील आढळून आली आहे. गेल्या दोन वर्षांत या जातींमध्ये तेलकट डागाचा प्रादुर्भाव दिसला नाही. या जातींतील जनुकांवर सध्या संशोधन सुरू आहे. बागेत कीटकनाशकांची फवारणी केल्यावर आर्द्रता वाढते. त्यासाठी स्ट्रेप्टोसायक्‍लीनचा वापर केला पाहिजे. परंतु याच्या वापराने झाड अशक्‍त होते, हा गैरसमज आहे. स्ट्रेप्टोसायक्‍लीन 500 पीपीएम (अर्धा ग्रॅम प्रति लिटर) फवारणीतून वापरले पाहिजे. इलेक्‍ट्रोस्टॅटिक स्प्रेअरने याची फवारणी केल्यास चांगले परिणाम दिसतात. फवारणीमुळे तेलकट डाग रोगाच्या जिवाणूत प्रतिकारक्षमता वाढत नाही. स्ट्रेप्टोसायक्‍लीनपेक्षा कमी किमतीत, अधिक परिणामकारक अन्य पर्याय देता येईल का, यावरही संशोधन सुरू आहे. बॅक्‍टेरिओ फेजसंदर्भातही संशोधन सुरू असून यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे. स्टेम कटिंग हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानाने रोपे बनविता येऊ शकतात. सध्या त्याच्या यशस्वी होण्याचे प्रमाण साठ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. ते नव्वद टक्‍क्‍यांवर न्यावे लागेल. याद्वारे तेलकट डाग रोगाची पडताळणी लवकर होऊ शकेल. सहा ते आठ महिन्यात हे तंत्रज्ञान पूर्णत्वास येऊ शकते.

"पीसीआर'तंत्रज्ञान योग्य आहे का?
- डाळिंबाच्या रोपांवरील सुप्तावस्थेत असलेल्या "झान्थोमोनास ऑक्‍झीनोपोडीस पीव्ही पुनिकी' जिवाणूला ओळखण्यासाठीचे "पीसीआर' तंत्रज्ञान पूर्णपणे सक्षम नाही. कारण बहुतांश शेतकरी गुटीपासून रोपे तयार करतात. कोणत्या झाडाच्या कोणत्या पानात हा रोग आहे, हे सांगता येणे अवघड आहे. यासाठी या तंत्रज्ञानात सुधारणा करून आणखी अद्ययावत तंत्रज्ञान आणावे लागणार आहे.

मर रोगानेही त्रासले आहे, काय केले पाहिजे?

- मर रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी जमिनीला योग्य ट्रीटमेंट दिली जाणे आवश्‍यक आहे. मर रोगास "सेरॅटोसिस्टीस फेब्रिएटा' हा रोगकारक जीव मुख्य कारणीभूत आहे. तसेच जमिनीतील "शॉर्ट होल बोरर' ही कीड मातीत राहून मुळांना छिद्र करून नुकसान करते. नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम किंवा प्रोपीकोनॅझोल किंवा ट्रायझोफॉसचा वापर फायद्याचा ठरतो. तसेच मातीत सूत्रकृमी असतात, हे मुळांवरील छिद्रात घुसून मुळावर गाठी तयार करतात. फोरेटचा वापर केल्याने सूत्रकृमी नियंत्रणात राहतात. शेतकऱ्यांनी ही ट्रीटमेंट योग्यप्रकारे केली पाहिजे, याशिवाय चांगले परिणाम दिसणार नाहीत. एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनाविषयी जागरूक असणेही तितकेच आवश्‍यक आहे.

उतिसंवर्धित रोपांद्वारे फायदा होतो का?

- डाळिंबाच्या उतिसंवर्धित रोपांची लागवड केल्याने तेलकट डाग रोग येणार नाही, हा गैरसमज आहे. त्यासाठी लागवड व्यवस्थापनात (पॅकेज ऑफ प्रॅक्‍टिसेस) सुधारणा करण्यावर भर द्यावा लागेल. परंतु सध्या त्याचे प्रमाणीकरण झालेले नाही. उतिसंवर्धित रोपांचे बायो हार्डनिंग करणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे, यासाठी एक वर्ष लागेल. उतिसंवर्धित रोपे कशी लावावी, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणे सुरू केले आहे.

"वंडरफूल' जातीबाबत आपले मत?

- अनेक शेतकरी इस्राईलमधील डाळिंबाची "वंडरफूल' जात आपल्याकडे का आणत नाहीत, असा प्रश्‍न विचारतात. परंतु ती आपल्याकडे का आणावी, असा प्रश्‍न पडतो. कारण या जातीच्या फळांचा आकार तर मोठा आहे, परंतु फळे चवीला आंबट असून यात आम्लता अधिक असते.
प्रक्रियेसाठी ही जात चांगली आहे, परंतु खाण्यासाठी नाही. त्यामुळे ही जात आपल्याकडे कितपत चालेल याबाबत शंका वाटते. प्रक्रियेसाठी वेगळी जात विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

सध्या "एनआरसी' डाळिंब कशावर भर देत आहे?

- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संशोधन लोकांपर्यंत पोचावे म्हणून सुरवातीला केंद्राचे संकेतस्थळ अपडेट करण्यावर भर दिला आहे. संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचले तरच खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होईल. www.nrcpomogranate.org हा संकेतस्थळाचा पत्ता आहे. संकेतस्थळाला देश, परदेशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या देशांतून हे संकेतस्थळ पाहिले जात आहे, याचीही माहिती उपलब्ध आहे. छायाचित्रे, व्हीडीओद्वारे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. एक वर्षाच्या आत अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा संकल्प आहे. संकेतस्थळावर डाळिंब बागायतदार संघाच्या संकेतस्थळाची लिंक दिलेली आहे. संघाच्या सोबतीने काम करणार आहोत. केंद्रातील प्रयोगशाळा अद्ययावत करणे सुरू आहे. केंद्रात डाळिंबाच्या एकूण 350 जाती आहेत. त्यांचे स्वतंत्र म्युझियम तयार केले आहे. त्यातून एखादी नवीन जात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे एकमेव केंद्र आहे, जे डाळिंबावर संशोधन करते. त्यामुळे हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न आहे.

अन्य कोणत्या समस्या जाणवत आहेत?

- दिवसेंदिवस जमिनीतील क्षारतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात द्राक्षाप्रमाणे डाळिंबातही खुंटाचा वापर करावा लागेल. क्षारता तसेच तेलकट डाग रोगाला प्रतिकारक खुंटाच्या संशोधनावर भर द्यावा लागेल. तसेच कमी पाण्यात अधिक उत्पादनाचे तंत्रही द्यावे लागेल. बाजारात सध्या जी बुरशीनाशके आहेत, त्यातील अनेक बनावटी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा कितीही वापर केला तरीही परिणाम दिसत नाही. दुकानदार सांगतात, त्याप्रमाणे शेतकरी फवारतात. माल खपविण्यासाठी शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कीडनाशके विक्रेत्यांवर अवलंबून न राहता "एनआरसी'च्या शास्त्रज्ञांशी नियमित संवाद साधावा, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.
- केंद्रात शास्त्रज्ञांची कमतरता ही मुख्य समस्या आहे. सध्या जैवतंत्रज्ञान, जनुकीय तंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, सूत्रकृमी, प्रक्रिया, विस्तार इ. विषयांसाठी शास्त्रज्ञच उपलब्ध नाहीत. शेतकऱ्यांशी नियमित संपर्क साधण्यासाठी विस्तार विभागाच्या माणसांची गरज आहे. येत्या काळात त्यावर विचार होणे आवश्‍यक आहे.
- अलीकडील काळात डाळिंबात "कॉलर रॉट' दिसून येत आहे. पूर्ण झाड हिरवे असूनही ते कोलमडते. डाळिंब झाडांभोवती, जमिनीलगत रॉटिंग होते. खोडात तेलकट डाग आल्यावर कॅन्कर होतो. त्यानंतर सेरेटोसिस्टिसचा प्रादुर्भाव होऊन झाड कोलमडते. याच्या नियंत्रणासाठी जमिनीतून कार्बेन्डाझिम, फोरेटची ट्रीटमेंट करण्याची आवश्‍यकता आहे.

कमी खर्चातील कुलिंग चेंबर कसे आहे?
- शीतगृहाची सोय जिथे नाही, तिथे इव्हॅपोरेटिंग कुलिंग चेंबर तयार करता येऊ शकते. फळे किंवा भाजीपाल्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते,
ते कमी झाल्यावर बाजारात त्याला मागणी मिळत नाही. संध्याकाळी फळे, भाजीपाल्याची काढणी झाल्यावर कुलिंग चेंबरमध्ये ठेवल्यास फायदेशीर ठरते, याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारातील चेंबर 100 किलो क्षमतेचे आहे. हे शेतकरी स्वतः घरी तयार करू शकतात. त्यास तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. दुसऱ्या प्रकारातील चेंबर चार ते पाच टन क्षमतेचे आहे. त्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे.

------------------------------------------------------
"अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत योग्य तंत्रज्ञान पोचविणे हाच उद्देश ठेवला आहे. केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असा विश्‍वास देऊ इच्छितो, की तेलकट डाग रोगाशी लढा देणे अवघड नाही, त्यासाठी सामूहिक पद्धतीने एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन करावे, केंद्राच्या शास्त्रज्ञांशी नियमित संपर्क ठेवावा, वारंवार शेतातील नमुने तपासणीस द्यावे.''
- डॉ.आर. के. पाल, संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर
------------------------------------------------------

डाळिंब मूल्यवर्धनाचा विचार आवश्‍यक ः
- चालू वर्षी पाऊस कमी असल्याने तेलकट डागाचा प्रसार कमी आहे. परंतु पाण्याची समस्या गंभीर आहे. सांगोला (जि. सोलापूर) भागात फळे लागलेली झाडे सुकू लागली आहेत. अशा ठिकाणी जलसंधारणाबरोबर कमी पाण्यात अधिक उत्पादनाचे तंत्रज्ञान द्यावे लागेल.
- कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईडचा वापर जास्त होत असल्याने मातीतील विषारीपणा वाढत आहे. यापासून वाचविण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे
सहकार्य घेऊन हा विषारीपणा नैसर्गिक पद्धतीने कसा कमी करता येईल, याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- डाळिंबाचे मूल्यवर्धन होणे महत्त्वाचे आहे. ज्यूस काढल्यानंतर डाळिंबाची साल फेकली जाते. सालीत नैसर्गिकता टॅनीनचे प्रमाण अधिक असते, त्यावर प्रक्रियेतून उपयोगी पदार्थ बनविता येऊ शकतात.
- डाळिंबात न्युट्रॉसिटीकल गुणवत्ता इतर फळांच्या तुलनेत अधिक आहे. ऍन्टिऑक्‍सिडेंट गुणधर्म असल्याने मधूमेहींना फायदेशीर ठरते.
- डाळिंबाची वाइन तयार होऊ शकते. परंतु डाळिंबाला बाजारातच इतका चांगला दर मिळतो, की प्रक्रियेसाठी ज्या दरात डाळिंब मिळायला हवे ते
मिळत नाही. वाइन तयार करण्यासाठी खास जात विकसित करावी लागणार आहे.


Wednesday, 16 January 2013

विहीर पुनर्भरण कसे करावे?

शेतातील वाहून जाणारे पावसाचे पाणी विशिष्ट पद्धतीचा वापर करून विहिरीत सोडून विहिरींचे पुनर्भरण करता येते. यासाठी शेतातून वाहत येणारे पाणी विहिरीच्या बाजूला काही अंतरावर 6 x 6 x 6 फूट आकाराचा शोषखड्डा करून साठवावे. या खड्ड्यापासून विहिरीच्या दिशेने आणखी एक 4 x 4 x 4 फूट आकाराचा लहान खड्डा खोदावा. या खड्ड्यातून विहिरीस जोडणारा पाइप विहिरीच्या भिंतीपासून एक फूट पुढे राहील असा विहिरीत सोडावा. पाइपच्या आतील बाजूस लोखंडी जाळी लावावी. खड्डा प्रथम मोठ्या दगडांनी भरावा. त्यानंतर लहान दगड, वाळू, कोळसा यांचे थर देऊन खड्डा भरावा. उतारामुळे वाहत येणारे पाणी मोठ्या खड्ड्यात जमा होते. पाण्याबरोबर काही प्रमाणात गाळही येतो. हा गाळ या खड्ड्यात जमा होतो. खड्डा पाण्याने भरल्यानंतर ते पाणी विहिरीकडील उताराकडे असलेल्या दुसऱ्या खड्ड्यात येते. तेथून ते विहिरीत पाइपद्वारे पडते.

पुनर्भरण चर : पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी अडवून जमिनीत पाणी पुनर्भरणाची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी पुनर्भरण चर हा एक महत्त्वाचा उपाय आहे. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्रोत कायम होण्यासाठी मदत होते, शिवाय पाणी जमिनीच्या आत साठून राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. ज्या पाणलोटात नाला- विहीर आहे, त्या नाल्याखाली पुनर्भरण चर खोदावयाचे असल्यामुळे नाल्याचा तळ चार ते पाच सें.मी.पर्यंत कच्च्या मुरमाचा असणे आवश्‍यक आहे. नाल्याची रुंदी दहा मी. एवढी असेल, तर नाल्यात दहा मी. रुंद आणि चार ते सात मी. खोलीचा खड्डा खोदावा आणि लांबी 20 ते 30 मी. उपलब्धतेनुसार असावी. शक्‍यतोवर गोल दगड वापरणे सोईचे होते. हे दगड 20 ते 50 सें.मी. व्यासाच्या आकाराचे असावेत. अशाप्रकारे पुनर्भरण चर खोदल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण जवळजवळ सहा ते आठ महिने सतत होत राहते.

श्री. पेंडके - 9890433803

एकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य

सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश कबाडे यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे सातत्य अलीकडील काही वर्षांपासून ठेवले आहे. सुधारित तंत्रज्ञान, एकात्मिक व्यवस्थापनाबरोबर अभ्यास, प्रयोगशील वृत्ती व काटेकोर नियोजनाचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या ऊस शेतीतून घालून दिला आहे.
- श्‍यामराव गावडे

पेठ- सांगली रस्त्यावर आष्ट्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कारंदवाडीचे शिवार लागते. कृष्णा नदीचे पाणी, निचऱ्याची जमीन यामुळे या भागातील अनेक शेतकरी भाजीपाला, ऊस शेती करतात. यापैकीच सुरेश कबाडे एक. त्यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती. सन 1984-85 पासून आपले वडील अप्पासाहेब यांना ते शेतीत मदत करू लागले. पारंपरिक व्यवस्थापनात एकरी 40 ते 50 टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. शेतीची जबाबदारी घेतल्यानंतर मात्र सुरेश कबाडे यांनी सुधारित तंत्राचा वापर करीत ऊस शेतीत आमूलाग्र बदल केला. त्यांचे लागवड व्यवस्थापनातील काही नियोजन थोडक्‍यात असे.

मशागत व लागवडीचा टप्पा
- उसाचा खोडवा तुटून गेला, की रोटाव्हेटर फिरवून हरभरा घेतला जातो, तो निघाला की दोन वेळा नांगरट.
- एकरी पाच ते सहा ट्रॉली कंपोस्ट किंवा शेणखत विस्कटणे.
- 15 मेच्या दरम्यान सऱ्या सोडून धैंचा (एकरी 25 किलो बियाणे). सुमारे 50 दिवसांनी फुलोरा आला की धैंचा न उपटता सरीमध्ये दाबला जातो व वरंब्याची सरी बनवली जाते.
- सरीत एकरी दोन पोती डीएपी, दोन किलो फोरेट व आठ किलो अन्य कीटकनाशक यांचा डोस
- साडेचार फुटांची सरी व एक डोळा पद्धतीने लावण, दोन डोळ्यांतील अंतर दोन फूट.
बेणे प्रक्रिया - क्‍लोरपायरिफॉस दोन मि.लि. आणि कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी
- उगवणीनंतर एक महिन्यात तुटाळी भरून घेण्यासाठी लावणीवेळीच रोपांची निर्मिती एका सरीत जादा केली जाते.

खत व्यवस्थापन थोडक्‍यात (खतांचे प्रमाण पोत्यांमध्ये, एक पोते - 50 किलो)
- उगवणीनंतर 30 ते 35 दिवसांनी - एक पोते युरिया, एक पोते अमोनिअम सल्फेट, एक पोते पोटॅश. युरियाला निंबोळी पेंडीचे कोटिंग -
- 60 दिवसांनी - दोन पोती 12-32-16, एक पोते युरिया, एक पोते अमोनिअम सल्फेट, एक पोते पोटॅश. या वेळी कुदळीने कोंबांना छोटीशी भर.
- 85 दिवसांनी प्रत्येकी दहा किलो झिंक, फेरस व गंधक, 25 किलो मॅग्नेशिअम, पाच किलो मॅंगेनिज, तीन किलो बोरॉन व सिलिकायुक्त खत यांचे मिश्रण करून चाळलेल्या शेणखतात मिसळले जाते. आठ दिवस ठेवले जाते व मातीआड करून दिले जाते.
- 110 दिवसांनी पॉवर टिलरच्या साहाय्याने रिव्हर्स भरणी. त्या वेळी दोन पोती डीएपी, दोन पोती युरिया, एक पोते पोटॅश, तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर हे घटक असलेले खत एकरी दोन बॅगा टाकून रिव्हर्स भरणी.
- 135 ते 140 दिवसांनी पॉवर टिलर रेजरच्या साहाय्याने भरणी. या वेळी प्रत्येकी एक पोते युरिया व पोटॅश.
- 165 ते 170 दिवसांनी पाचट काढून एक आड एक सरीत टाकले जाते. त्या वेळी शेवटचा डोस दोन पोती 12ः32ः16, एक पोते युरिया. कुदळीचे चर काढून हा डोस दिला जातो. तिथून दोन महिन्यांनी दुसऱ्यांदा पाचट काढणे.
सूक्ष्म अन्नद्रव्ये (प्रति लिटर डोस)
फवारणी - पहिली 30 दिवसांनी - पाच मि.लि., सोबत 19-19-19 विद्राव्य खत पाच ग्रॅम
दुसरी - साठ दिवसांनी - दहा मि.लि. सोबत 13-0-45 दहा ग्रॅम
तिसरी - 90 दिवसांनी - दहा मि.लि., सोबत 0-0-50 दहा ग्रॅम

जीवाणू खते -
ही खते देताना जमिनीत भरपूर ओल हवी. शक्‍यतो संध्याकाळी चारनंतर ते द्यावे. 35 दिवसांनी, 50 दिवसांनी, तसेच 65 व 80 दिवसांनी ते दिले जाते.

खोडवा व निडवा व्यवस्थापन
खोडवा व निडवा व्यवस्थापनाकडे काटेकोर लक्ष.
- आडसाली ऊस गेल्यानंतर पाचटाची कुट्टी, उसाचे बुडखे तासून घेणे, त्यानंतर बगला मारून घेणे.
- त्यानंतर एका बाजूला प्रत्येकी दोन पोती डीएपी व युरिया, एक पोते पोटॅश, दुसऱ्या बाजूला झिंक व फेरस दहा किलो, 25 किलो मॅग्नेशिअम, पाच किलो मॅंगेनिज, तीन किलो बोरॉन यांचा वापर.
- त्यानंतर पाणी दिले जाते. पाचट कुजण्यास सुरवात होते. दोन महिन्यांनंतर पॉवर टिलर चालवला जातो, त्या वेळी दोन पोती युरिया, एक पोते पोटॅश, त्यानंतर एका महिन्याने एक पोते डीएपी, दोन पोती युरिया, एक पोते पोटॅश मात्रा.
- पुन्हा महिन्याने दोन पोती डीएपी, दोन पोती युरिया, एक पोते पोटॅश असा शेवटचा डोस

बेणे मळा
चांगल्या बेण्यावरच 20 टक्के उत्पादन अवलंबून असते, असे कबाडेंचे मत आहे.
- स्वतःच्या शेतावरच आठ ते दहा गुंठ्यांवर बेणे मळा करतात.
- नऊ ते दहा महिने वयाचे बेणे निवडतात. जाड, लांब पेऱ्याचे व रुंद पानाचे हवे. पाच ते सहा इंच तळातील घेर, पेरे दहा इंच लांबीचे अशा पद्धतीने तयार करतात. दरवर्षी बेणे मळ्यातील चांगला ऊस निवडून निवड पद्धतीने निरोगी व चांगली रोपे वेगळी केली जातात, त्यांचा वापर होतो, त्यामुळे गवताळ वाढ कमी राहते. बेणे चांगल्या दर्जाचे मिळते.

कबाडे यांच्या ऊस शेतीची वैशिष्ट्ये :
- हिरवळीच्या खतांचा चांगला वापर
- सर्व खते मातीआड करून दिली जातात, त्यामुळे खते वाया जात नाहीत
- साडेचार फुटांवरील लागवड या वर्षीपासून सहा फुटांवर
- शेतीच्या देखभालीसाठी कायम पाच मजूर
- उसाची एकरी संख्या 40 ते 42 हजार
- कंपोस्ट खत वापरावर भर
- संपूर्ण क्षेत्राला सरी पाटाने पाणी, भविष्यात संपूर्ण ठिबकचे नियोजन
- पाचटाचा वापर
- एक डोळा पद्धतीचा वापर
- को 86032 वाणाला प्राधान्य

- मार्गदर्शन - वडील अप्पासाहेब कबाडे, पत्नी सौ. पद्मजा कबाडे, राजारामबापू साखर कारखान्याचे तत्कालीन ऊस विकास अधिकारी ए. एन. साळुंखे, संभाजीराव माने- पाटील, श्रेणिक कबाडे, रमेश हाके, दत्तात्रेय लाड
-- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ऊसभूषण पुरस्काराने सन्मानित
- अनेक ठिकाणच्या कृषी प्रदर्शनांत उसाला प्रथम क्रमांक
- महाराष्ट्रासह तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, नेपाळ आदी शेतकऱ्यांची कबाडे यांच्या शेतीला भेट

उत्पादन
- लावण उसाचे एकरी सरासरी उत्पादन 100 टन, खोडवा - एकरी 65 ते 70 टन, निडवा - 50 ते 55 टन
अलीकडील चार ते पाच वर्षांत आडसालीचे 11 एकरांत 1125 टन, 13 एकर 26 गुंठ्यांत 1480 टन,
सात एकरांत 755 टन, साडेनऊ एकरांत 1006 टन, तीन एकरांत 305 टन असे उत्पादन मिळाले आहे.


सुरेश कबाडे - 9403725999
Tuesday, 15 January 2013

जलसंधारणाच्या कामातून कातपूरने टाकली कात

शासनाने केलेल्या जलसंधारण कामाच्या देखभालीकडे गावकऱ्यांनीच लक्ष देणे आवश्‍यक असते. काळाची गरज लक्षात घेऊन कातपूर (जि. लातूर) गावातील शेतकऱ्यांनी जलसंधारण कामाची दुरुस्ती केल्याने दुष्काळातही दीड कि.मी.पर्यंत ओढा पाण्याने भरलेला आहे. शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्नांतून शेती, दुग्धोत्पादन यात चांगले उत्पादन मिळवत आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. डॉ. टी. एस. मोटे
गावाशेजारचा ओढा पावसाळ्यानंतर वाहायचाच थांबला, की विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होत जाते, त्यामुळे सिंचनासाठीच नव्हे, तर पिण्यासाठीही पाण्याची कमतरता भासते, असे चित्र सर्वत्र आपल्याला दिसते. असेच काहीसे चित्र काही वर्षांपर्यंत कातपूर (जि. लातूर) या गावातही होते. मात्र, काळाची गरज लक्षात घेऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कातपुरातील शेतकरी एकत्र आले. त्यांनी जल संधारणांची कामे पूर्ण केली. आजच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर या गावात पाणी उपलब्ध असून, गावातील अर्धचंद्राकृती ओढा आज सलग दीड कि.मी. पाण्याने तुडुंब भरलेला आहे. पर्यायाने परिसरातील विहिरींना भरपूर पाणी असून शेतकऱ्यांच्या सिंचनाची बारमाही, हंगामी सोय झालेली आहे. टॅंकरच्या मागे धावणारे गाव ही ओळख गावकऱ्यांनी पुसली आहे.

सुरवात शासनाची... - कातपूर गावची लोकसंख्या 2000, तर शिवाराचे क्षेत्र फक्त 650 एकर आहे. गावाला लागूनच असलेल्या ओढ्यावर कृषी विभागाने जलसंवर्धनासाठी सन 1994 मध्ये तीन व सन 2004 मध्ये एक असे चार सिमेंट नाला बंधारे बांधले होते.
- या बंधाऱ्याखाली सन 1995 व 2008 मध्ये प्रत्येकी एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा जिल्हा परिषदेमार्फत बांधला होता.
- या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे लोखंडी गेट चोरीला गेल्यामुळे तो निरुपयोगी ठरला, तसेच सिमेंट बंधाऱ्यात माती अडल्याने, तसेच फुटतूट झाल्यामुळे पाणी राहत नव्हते.
- जलसंधारणाच्या कामाची निगा न राखल्यामुळे पाणी साठले नाही. हळूहळू पाणीटंचाई वाढत गेली.

अशी झाली दुरुस्ती कामे... गावानजीक असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याजवळ गावची पाणीपुरवठ्याची "देवाची' विहीर आहे. या विहिरीची पाणीपातळी वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेने सन 2009 मध्ये सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती, रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम केले. यामुळे पहिल्या पावसातच आजूबाजूच्या विहिरींचे पाणी वाढल्याचे लक्षात आले.
- हे लक्षात घेऊन कातपूरचे माजी सरपंच लालासाहेब देशमुख यांनी ओढ्यालगतच्या शेतकऱ्यांना एकत्र केले. जुन्या जल संधारण कामाचे पुनरुज्जीवन लोकसहभागातून करण्याचे सर्वानुमते ठरले.
- 1995मध्ये बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला दार बसवण्यासाठी शेतकऱ्यांनी 86 हजार रुपयांची वर्गणी जमा केली. 2010मध्ये या बंधाऱ्यास लोखंडी दार बसवण्यात आले, त्याचा फायदा सर्वांना दिसून आला.
- दुसऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील ओढ्यामध्ये जागोजागी बेटे तयार होऊन ओढा अरुंद झाला होता. ओढ्याचे नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक लाख 86 हजार रुपये उभे केले. त्यातून 2011 मध्ये दोन्ही कोल्हापुरी बंधाऱ्यांची जेसीबीच्या साहाय्याने नाला सरळीकरण करून खोली वाढवली, त्यामुळे ओढ्याची रुंदी 25 मीटरपर्यंत वाढली. यातून निघालेली माती नाल्याच्या बांधावरच टाकल्याने त्याची उंची वाढली. त्याचा लाभ घेण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यावर आणखी सिमेंट कॉंक्रिटचे बांधकाम करून त्यात लोखंडी अँगल बसवले. त्यात जुन्या दाराच्या मापाचे व दीड फूट उंचीचे नवीन लोखंडी दार बसवले, त्यामुळे पाणीसाठ्यात दीड फुटाची भर पडली. त्यात पाणी साठल्याने आता चार कि.मी.चा ओढा पाण्याने पूर्णपणे भरला आहे.
- कातपूरजवळच्या एका छोट्या सिंचन प्रकल्पाचा कालवा कातपूरवरूनच जातो. हा कालवा गावाजवळ 30 फूट इतका खोल आहे. त्यातून आतापर्यंत पाणी सुटले नाही. त्याचा वापर गावकऱ्यांनी पुनर्भरण चर म्हणून केला असून, पुलाच्या ठिकाणी असलेले पाइप मातीने बुजवून टाकले, त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी कालव्यात थांबले.

बदलले गावाचे चित्र - गावचे सरपंच विष्णू बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले, की जलसंधारण कामाची डागडुजी झाल्यापासून शेतीच्या सिंचनाची सोय झाली, तसेच हिरव्या चाऱ्याची सोय झाल्याने दुभत्या जनावरांची संख्या वाढली असून, गावातून लातूरला रोज 1000 लिटर दूध जाते. पाच शेतकरी व्यावसायिक तत्त्वावर दुधाचे उत्पादन घेतात. गावात भाजीपाला व फुलांचे क्षेत्रफळ वाढले असून पाच शेतकरी आठ एकरवर रेशीम उत्पादन घेत आहेत. या गावात एकूण 300 एकर क्षेत्रावर ऊस असून त्यापैकी 150 एकर ऊस हा ठिबक सिंचनावर आहे. यापैकी 200 एकर क्षेत्रावरील उसाला जलसंधारण कामाचा फायदा होत आहे. हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी रब्बी पिकांना ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिले आहे.

बचतीचे प्रमाण वाढले - बचत गटाविषयी माहिती सांगताना धनराज काकासाहेब देशमुख सांगतात, की कातपूर गावात पुरुष शेतकऱ्यांचे चार बचत गट असून, बॅंकेत सध्या सात लाख रुपये जमा आहेत. कातपूरमध्ये पाण्यामुळे शेतीचाच नव्हे, तर गावाचा सर्वांगाने विकास होत गेल्याने गावाने कात टाकली आहे.
(लेखक लातूर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

जलसंधारणाने झाला फायदा : शेतीला पाण्याची गरज आहे, हे शेतकऱ्याला सांगावे लागत नाही. गावाला नदी नसली तरी ओढ्यातील पाणी अडविण्याशिवाय पर्याय नव्हता. शासनाने आपले काम केले होते. काळजी घेण्याच्या कामात गावकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज होती. पाण्याची कमतरता भासू लागल्यानंतर दुरुस्तीची कामे केली. केलेल्या कामाचा गावच्या अर्ध्याहून अधिक शिवाराला फायदा झाला आहे.
- लालासाहेब बापूसाहेब देशमुख, 9921561111

माझी शेती ओढ्याच्या दोन्ही बाजूने असल्याने तीन एकर क्षेत्र बागायत झाले आहे. माझ्याकडे एक एकर तुती लागवड असून, रेशीम अळी संगोपनासाठी शेड बांधले आहे. ओढ्यापलीकडील शेतात मला पाण्यामुळे जाता येत नसल्यामुळे लाकडी पूल स्वखर्चातून बांधला आहे. पाण्याच्या शाश्‍वतीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग हा फायद्याचा ठरत आहे.
- चंद्रसेन साहेबराव पाटील, (मुलगा - दिलीप, 9850362573)

मी दहा वर्षांपासून खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद; तर रब्बीमध्ये हरभरा व ज्वारीचे बीजोत्पादन करतो. गेल्या वर्षी तीन एकर क्षेत्रातून 70 क्विंटल ज्वारीचे बीजोत्पादन घेतले होते. जलसंधारण कामाच्या पुनरुज्जीवनामुळे माझ्या बीजोत्पादन पिकाच्या सिंचनाची सोय झाली असून, उत्पादनात भर पडत चालली आहे.
- अजित उद्धवराव देशमुख, 9403862432

ओढ्याच्या बाजूला माझी चार एकर शेती असून, त्यात सर्व क्षेत्रावर यशवंत व गजराज हे चारा पीक लावले आहे. पाण्याच्या शाश्‍वतीमुळे व्यावसायिक दुग्धोत्पादनाकडे वळलो असून, माझ्याकडे 40 म्हशी आहेत, त्यापैकी 28 म्हशी दूध देत आहेत. माझे घरचे 260 लिटर दूध आहे. गावकऱ्यांचे सुमारे 150 लिटर दूधही मी विकत घेतो. ते दूध लातूर येथे घरोघरी विकण्यासाठी माझ्याशिवाय अन्य पाचजण कामाला ठेवले आहेत, त्यामुळे माझ्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. माझ्यासारखे आणखी दहाजण लातूरला दूध घालतात.
- सतीश जनार्दन देशमुख, 9890380273

Monday, 14 January 2013

शेती मित्र पक्षी - भारद्वाज


इंग्रजी नाव - Greater Coucal
स्थानिक नावे - चांभार कुकडी (भंडारा, चंद्रपूर), काकड कुंभाऱ्या (नाशिक), कुक्कुड कोंभा (सिंधुदुर्ग), कुंभार कावळा, सोनकावळा, पानकोंबडा इ.
शास्त्रीय नाव - Centropus Sinensis (Stephens, 1815)
संस्कृत नाव - कुलाल कुक्कट, प्रख्यात कुक्कुभ, भरद्वाज इ.
वैशिष्ट्ये - आकाराने डोमकावळ्या एवढा असतो. तो अतिशय रागीट असतो. दूरवर निनादणारा "कुप कुप कुप' असा आवाज काढत असतो. शेपटी लांब व रुंद असते. पंख तांबूस रंगाचे असतात. नर व मादी दिसायला सारखेच असतात.
आढळ - झुडपी राने, बागा व खुरट्या झाडांच्या गवताळ प्रदेशात आढळतात.
विणीचा हंगाम - मुख्यतः नोव्हेंबर ते मे या काळात वीण होते. काटेरी झुडपात छोट्या काड्या व पानांचे घरटे बनवतात. या कुळातील भारद्वाज हा एकमेव पक्षी स्वतःचे घरटे स्वतः बनवतो. त्यात तीन ते चार अंडी घालतात.
विशेष - भारद्वाज हा पक्षी गवतामधील कीटक खाताना आपल्या दोन्ही पंखांचा उपयोग करून व तोंडाने कीटक हुसकावून कीटकांना पकडून खातात.
श्रद्धा - भारद्वाज दिसणे हे सकारात्मक मानले जाते. खासकरून पाडव्या दिवशी हे शुभ मानतात.

शेतीविषयक उपयुक्तता - हा पक्षी सरपटणारे प्राणी, कीटक, लहान पक्ष्यांची अंडी व पिल्ले यांना भक्ष्य बनवतो. त्यांची संख्या नियंत्रणामध्ये मोलाचे कार्य करतात.
संरक्षणासाठी आपण काय करू शकतो -
अविकसित पिल्ले ही त्यांच्या उडण्याच्या अपरिपक्वतेमुळे वाहनांच्या समोर येऊन धडकतात व जखमी अवस्थेत रस्त्यावर आढळतात.
- शेती परिसरातील काटेरी झाडे वाचवणे आवश्‍यक.

शेती मित्र----कोकीळ


इंग्रजी नाव - Asian Koel
स्थानिक नावे - कोयार (भंडारा), कोयाळ (ठाणे), भिंगरी (सिंधुदुर्ग), कुहू (नाशिक), कोकिळा, कोयल इ.
शास्त्रीय नाव - Eudynamys Scolopacea (Linnaeus, 1758)
संस्कृत नाव - कोकील, परभृत, पिक, वनप्रिय इ.
वैशिष्ट्ये - कोकीळचा आकार हा कावळ्यापेक्षा थोडा लहान असतो व शेपटी लांब असते. चोच पोपटी तर डोळे गुलाबी असतात. मादी गडद तपकिरी रंगाची असते. कुहू कुहू असा आवाज करतात.
आढळ - जंगली झुडपे, शेती परिसर, बागा व उजाड जंगलांच्या परिसरात वास्तव्य करतात. हा पक्षी झुडपी जंगले, शेती परिसर, उंच व गर्द झाडी, बागा अशा ठिकाणी शांतपणे दाट सावलीत बसलेला असतो.
विणीचा हंगाम - मार्च ते ऑगस्ट या काळात कोकीळ कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडी घालते. कोकीळची अंडी कावळ्यांच्या अंड्यासारखीच पण लहान असतात. कावळ्याच्या घरट्यामध्ये अगदी चार ते 13 अंडी सापडली आहेत.

गायनाचे विशेष - - हिवाळ्यात हे पक्षी खूप शांततेत बसलेले असतात; मात्र पावसाळा व उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्याने गात असतात.
- मिलनाच्या कालावधीमध्ये नर कोकीळ अतिशय सुंदर कुहू कुहू कुहू असे गाणे गाऊन मादीला आकर्षित करीत असतो.
- या पक्ष्यांमध्ये नर दिसायला सुंदर असून अतिशय मोहक गातात. मादीचा आवाज मात्र किक किक किक असा कर्कश असतो.

अन्य बाबी -
ज्या वेळी मादी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते, त्या वेळी नर कावळ्याशी भांडण करून कावळ्याला घरट्यापासून दूर नेतो. कोकीळ बऱ्याचदा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालत असताना कावळ्याची अंडी घरट्यातून बाहेर ढकलते. पिल्लांचा जन्म झाल्यानंतर पितृत्वाचे काम कावळा प्रामाणिकपणे करत असतो.

शेतीविषयक उपयुक्तता - कोकिळांच्या खाद्यामध्ये फळे, अळ्या व कीटक यांचा समावेश असतो. कीड नियंत्रणासाठी महत्त्वाचे काम करतात.
संरक्षणासाठी आपण काय करू शकतो -
या पक्ष्यांना वाचविण्यासाठी घराशेजारील कडुनिंब, उंबर, शेवगा, वड, पिंपळ यासारखी झाडे वाचविली पाहिजेत, तर गावाशेजारी असणारी गर्द व उंच झाडी वाचवावीत.
- या पक्ष्यांचा अधिवास मानवी वस्तीजवळ असतो. मानवी वस्तीजवळची झाडे वाचवणे आवश्‍यक आहे.

शेती मित्र----व्होला/ लहान कवडीइंग्रजी नाव - Little Brown Dove
नावे - घुटनाड (चंद्रपूर), बोबडी होली (नाशिक), धवळ होला, पिठ्या होला, मांगली कवडी इत्यादी.
शास्त्रीय नावे - Streptopelia Senegalensis (Linnaeus, 1766)
संस्कृत नाव - कुंकुम धूम कपोत, धूसर कपोत इत्यादी.
वैशिष्ट्ये - आकाराने मैनेपेक्षा मोठा असून, मातट राखी रंगाचा असतो. मानेवर दोन्ही बाजूंस पांढुरक्‍या किंवा राखी ठिपक्‍यांचे डाग असतात.
आढळ - माळराने व जंगली झुडपामध्ये आढळतात. हा पक्षी शुष्क व उजाड गवताळ मोकळ्या वनामध्ये आढळतो. मानवी वस्तीशेजारी असलेल्या काटेरी खुरट्या विरळ झुडपामध्ये आढळतो.
विणीचा हंगाम - जानेवारी ते ऑक्‍टोबर या काळात वीण होते. काटेरी झाडांच्या फांद्यांवर वाळलेल्या फांद्या गोळा करून स्वतःचे घरटे स्वतः बांधतात. या वाटीसारख्या आकाराच्या घरट्यात पांढऱ्या रंगाची दोन अंडी घालतात.
अन्य बाबी - हे पक्षी खूप चांगल्या प्रकारे नाचून व आवाज करून मादीला आकर्षित करतात.

शेतीविषयक उपयुक्तता - याच्या खाद्यामध्ये कीटक, गवताच्या बिया व जमिनीवर पडलेले धान्य यांचा समावेश असतो. हे अन्न ते शुष्क वालुकामय जमिनीमधून घेतात. त्यामुळे तणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. खूप मोठ्या प्रमाणात कीटक खात असल्याने शेतीचे कीटकांपासून नैसर्गिकरीत्या संरक्षण होते. अलीकडे हे पक्षी गाव व शहरांमध्येही सहजपणे वावरताना आढळतात.

संरक्षणासाठी आपण काय करू शकतो - - प्रामुख्याने निवडुंग, रुई व हिंगण यांसारख्या झाडांवर बसलेले दिसून येतात. मात्र या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न आवश्‍यक.
- या पक्ष्यांची शिकार खाद्यासाठी केली जात होती; पण आता वन्यजीव कायदा व पर्यावरण जनजागृतीमुळे यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. तरी ग्रामपंचायतीच्या पातळीवर या शिकारीवर लक्ष ठेवणे आवश्‍यक.


शेती मित्र...वंचक


इंग्रजी नाव - Indian Pond Heron
स्थानिक नावे - देवठोकरी (भंडारा), पाण ढोसला (नाशिक), पिसळ बगळा (पुणे).
शास्त्रीय नाव - Ardeola graayii (Sykes, 1832)
संस्कृत नाव - अन्धकाक, अन्धबक, बक इ.
वैशिष्ट्ये - याचा आकार कोंबडीपेक्षा मोठा असतो. बसलेला असेल तर रंग मातकट दिसतो, तर उडू लागल्यास पंख पांढरे दिसतात. विणीच्या काळात डोक्‍यावर लांब पांढरा किरमिजी रंगाचा तुरा येतो. नर व मादी दिसायला सारखेच असतात. स्थानिक स्थलांतर करतात.
आढळ - तळी, दलदलीचे प्रदेश, भात शेती आणि खाजणीची जंगले या ठिकाणी आढळतात. पाणकावळे, कावळा, गायबगळे व वंचक एकाच झाडावर वसाहती करीत असल्याचे दिसून येते.
विणीचा हंगाम - मे ते सप्टेंबर या काळात वीण होते. आंबा, चिंच, निलगिरी यासारख्या झाडांवर घरटी करतात. घरट्याचा आकार कावळ्याच्या घरट्यासारखा असतो, त्यामध्ये फिकट हिरवट निळ्या रंगाची तीन ते पाच अंडी घालतात.

अन्य माहिती - - भारतीय वंचक यांना त्यांच्या दृष्टिदोषामुळे अंधबक असे म्हणतात. हे पक्षी स्तब्ध, न हलता, ध्यानसाधनेमध्ये असल्याप्रमाणे उभे राहतात, याला "बकध्यान' असे म्हणतात.
- माणूस ज्याप्रमाणे गळाला खाद्य लावून पाण्यात गळ टाकतो; त्याप्रमाणे वंचक पक्षी टाकाऊ पदार्थ पाण्यात टाकून माशांना आकर्षित करून त्यांना पकडतो.

शेतीविषयक उपयुक्त - - बहुधा हे पक्षी खूपच शांत असतात; पण शिकारीच्या वेळेस आक्रमक झाल्याचे आढळतात. हा पक्षी बेडूक, मासे, खेकडे आणि कीटक खात असतो, त्यामुळे हा निसर्गातील अन्नसाखळी मजबूत ठेवण्यास मदत करतो. घराशेजारी असणाऱ्या डबक्‍यामधील पाणकीटकांना खातो.

संरक्षणासाठी आपण काय करू शकतो - - सध्या पाणथळ भागात जलपर्णी, गारवेल किंवा समुद्रसोक, वेडीबाभळ यासारख्या घातक वनस्पतींचे प्रमाण वाढत असल्याने खाद्य मिळविण्याच्या जागा कमी होत आहेत. वंचक पक्ष्याचे संरक्षण होण्यासाठी परिसरातील छोटीशी तळी, डबकी, तलाव, ओढे यासारख्या अधिवासांचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे.

करार शेतीतून बहरला 50 एकरांवर टोमॅटो

अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्‍यातील दानापूर येथील संजय आणि गोपाल या येऊल बंधूंनी सुमारे 50 एकरांवरील टोमॅटोच्या करार शेतीतून समृद्धीकडे वाटचाल केली आहे. गेल्या सात ते आठ वर्षांचा या पिकातील अनुभव त्यांना आर्थिक स्थैर्य देणारा ठरला आहे. विनोद इंगोले
येऊल कुटुंबीयांची वडिलोपार्जित केवळ सात एकर शेती. त्यात पानवेल, कपाशी यांसारखी पिके घेण्यावर त्यांचा भर होता; परंतु आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने सात वर्षांपूर्वी येऊल बंधूंनी (संजय व गोपाल) पानवेलीची शेती करणे सोडले. चार वर्षांपूर्वी त्यांनी कपाशीचे पीकही कमी केले. याच काळात म्हणजे सन 2003मध्ये त्यांनी टोमॅटो लागवडीचा प्रयोग केला. त्यांच्या गावकुसात टोमॅटोची शेती होत होती. इतरांच्या अनुकरणातूनच सुरवातीला अर्धा एकर क्षेत्र निवडले. योग्य व्यवस्थापनाच्या बळावर टोमॅटोचा दर्जा चांगला असल्याने लगतच्या अकोट तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत दर चांगला मिळाला. पारंपरिक शेती पद्धतीऐवजी टोमॅटोची शेती तुलनेने फायदेशीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर येऊल भावंडांनी टोमॅटो लागवडीत सातत्य ठेवले आहे. एक एकर, दोन एकर, त्यानंतरच्या कालावधीत त्यांनी संपूर्ण सात एकर असे टप्प्याटप्प्याने टोमॅटोचे क्षेत्र वाढवले. अकोट, अकोला, नागपूर या बाजारपेठा त्यांनी क्षेत्रवाढीनंतर काबीज करण्यास सुरवात केली. सात एकर क्षेत्रातील पिकाची गरज भागविण्याकरिता दोन विहिरी घेतल्या आहेत. टोमॅटो शेती आर्थिक उन्नतीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसताच सात एकरांवरून 2010पर्यंत बारा एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली. लागवडीत करार शेती करताना सुरवातीला अडीच एकर, पाच एकर असे क्षेत्र वाढवत नेले. गावातीलच विखे यांची शेती करारावर केली. सध्या संतोष गांधी यांचे सुमारे 55 एकर क्षेत्र त्यांनी करारावर घेतले आहे. सन 2003 या वर्षात 12 हजार रुपये प्रति एकर दर त्यांनी वर्षभर शेती वापरापोटी दिला. सन 2012मध्ये 18 हजार रुपये प्रति एकर दराने त्यांनी शेती करारावर कसण्यास घेतली आहे. करार क्षेत्रातील 50 एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड आहे.

टप्प्याटप्प्याने होते लागवडीचे व्यवस्थापन ऑगस्टच्या सुरवातीच्या आठवड्यात बियाणे टाकून रोपवाटिका तयार केली जाते. एका एकराकरिता सरासरी 40 ग्रॅम बियाणे लागते, असा त्यांचा अनुभव आहे. रोपवाटिकेतील रोपे 20 ते 22 दिवसांनी शेतात लावली जातात. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी 15ः15ः15 या खताची मात्रा एकरी दोन पोते याप्रमाणे दिली जाते. त्यानंतर वीस दिवसांनी 24ः24ः0 एकरी दोन पोते या खतासोबतच एक पोते झिंकयुक्त खताचेही दिले जाते. खताच्या या मात्रेनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी खताचा तिसरा डोस दिला जातो. त्यामध्ये डीएपी एकरी दोन पोते, त्यानंतर प्रत्येकी 20 ते 25 दिवसांनी खताची ही मात्रा आलटूनपालटून देत असल्याचे संजय येऊल सांगतात. लागवडीपासून टोमॅटोचा हंगाम सरासरी सहा महिने कालावधीचा आहे. या कालावधीत खत मात्रेवर एकरी दहा हजार रुपयांचा खर्च होतो.

रासायनिक फवारणी - पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी बुरशीनाशकाची फवारणी केली जाते. लाल कोळी वा तत्सम किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता पाहता निरीक्षणाअंती कीटकनाशकाच्या फवारणीवरही भर असतो. सहा महिन्यांच्या हंगाम कालावधीत कीडनाशकाच्या सुमारे पंधरा फवारण्या होतात. त्यावर एकरी सरासरी नऊ हजार रुपये एवढा खर्च होतो.

व्यवस्थापन - टोमॅटो वेलींना वाढीच्या काळात आधार द्यावा लागतो, त्याकरिता तारा व बांबू याची आवश्‍यकता भासते. त्यासोबतच बांधणी कामाकरिता मजूर हा घटकही महत्त्वाचा ठरतो. एक एकर क्षेत्राकरिता 1500 बांबू व सरासरी दीड क्‍विंटल तार लागते. यावर 19 हजार 500 रुपयांचे बांबू व तारेकरिता 9600 रुपये खर्च होतो. तार एकदा खरेदी केल्यानंतर दोन वर्षे वापरता येते, तर बांबू एकदा खरेदी केल्यानंतर तीन वर्षे उपयोगी पडतात. सुरवातीच्या बांधणीकामी एक एकर क्षेत्रासाठी 45 मजुरांची गरज भासते. अशाप्रकारे हंगाम कालावधीत तीन वेळा बांधणीची आवश्‍यकता असते. मजुरीवर एका बांधणीसाठी एकरी सरासरी सात हजार रुपये खर्च होतो.

बाजारपेठ - अकोट येथे टोमॅटोची विक्री करत असताना नागपूर बाजारपेठेविषयी माहिती येऊल बंधूंना मिळाली. तेथूनच त्यांनी हैदराबाद बाजारात शिरकाव केला. सद्यःस्थितीत ते वाशी बाजारपेठेत टोमॅटोची विक्री करीत आहेत. या माध्यमातून विदर्भातील शेतकरीही बाजारपेठेची योग्य संधी मिळाली तर निश्‍चितच आपल्या मालाचे सोने करू शकतो हे कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. वाशी बाजारपेठेत टोमॅटोचे सध्याचे घाऊक दर सात ते आठ रुपये प्रति किलो आहेत. सुमारे 50 एकर क्षेत्रातील टोमॅटोची दररोज तोडणी होते. तोडलेला माल दररोज विक्रीसाठी वाशी बाजारात पाठविला जातो. सध्या 55 एकरांपैकी 22 एकर क्षेत्रातील माल तोडणीस आला आहे. दररोज सरासरी आठ टन मालाची तोडणी होत तो बाजारपेठेत विक्रीसाठी धाडला जातो असे संजय सांगतात. 15 क्रेट (प्रति 20 किलो क्रेट) टोमॅटो तोडणीकामी एका मजुराची गरज भासते, तर प्रति क्रेट वाहतुकीपोटी 60 रुपये खर्च होतो. एक एकर क्षेत्रातील टोमॅटो व्यवस्थापनावर सरासरी 65 हजार रुपये खर्च होतो. सहा महिन्यांच्या कालावधीत एक एकर क्षेत्रातून सुमारे 1500 क्रेट उत्पादन मिळते. व्यवस्थापनावर होणारा सुमारे 65 हजार रुपयांचा खर्च वजा जाता मिळणारा निव्वळ नफा एकरी एक लाख दहा हजार रुपयांपर्यंत जाणारा आहे.

संपर्क - संजय येऊल - 9822454914

कशी परवडते टोमॅटोची शेती? येऊल बंधूंना गेल्या सात ते आठ वर्षांचा टोमॅटो शेतीचा अनुभव आहे. सध्या त्यांच्या मालकीच्या शेतात टोमॅटो नसला तरी कराराने घेतलेल्या शेतीतून त्यांनी या पिकातून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे 50 एकर क्षेत्रावर हे पीक घेताना हवामान किंवा दराबाबतची जोखीम वाटत नाही का, या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, की ऑगस्टमध्ये बियाणे लावले जात असले तरी लागवड क्षेत्राचे टप्पे केले जातात, त्यामुळे सर्व क्षेत्राची तोडणी काही एकावेळी येत नाही. त्यामुळे होणारे नुकसान काही सर्व क्षेत्राचे मिळून होत नाही. डिसेंबरपासून विक्रीस सुरू झालेला माल मार्चपर्यंत अशा रीतीने सुरू राहतो. पहिल्या टप्प्यातील क्षेत्रात मिळालेले पैसे पुढील टप्प्यातील लागवड क्षेत्राला उपयोगी पडतात. अलीकडील वर्षांतील उत्पादनाची सरासरी सांगायची तर सुमारे 1500 ते 1600 क्रेट उत्पादन एकरी मिळते.

सर्व खर्च वजा जाऊन एक लाखापर्यंत एकरी नफा मिळतो. काही वेळा पावसाळ्यात करपा किंवा अन्य कारणांमुळे प्लॉट फेल होऊन नुकसानही झाले आहे. वाशी मार्केट किंवा मुंबईच्या बाजारपेठेत मिळणाऱ्या दरावर सर्व काही अवलंबून असते. खर्च वजा जाता सरासरी चार ते पाच रुपये प्रति किलो मिळतात. दर घसरले तरी खर्च निघेल वा किमान नुकसान होईल इतपत आर्थिक समाधान हे पीक देत असल्याचे संजय यांनी सांगितले.

दुष्काळात फुलली फुलशेती

उस्मानाबादच्या अभिजित काकडे यांचा हरितगृहातील फुलशेतीचा प्रयोग
मराठवाड्यातील कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. गावशिवारातील शेती ओस पडली आहे. उस्मानाबाद शहरानजीकच्या शिवारात मात्र हिरवाई दिसू लागली आहे. पाण्याच्या थेंबाचा काटेकोर उपयोग करून दुष्काळात हरितगृहातील फुलशेती फुलवणाऱ्या अभिजित काकडे या अवघ्या पंचविशीतल्या युवकाची शेतीतील वाटचाल कौतुकास्पद आहे.
गणेश फुंदे
उस्मानाबाद शहरात काकडे प्लॉट परिसरात अभिजित काकडे व परिवाराची 68 गुंठे शेती आहे. अभिजित यांचे वडील काशिनाथ काकडे पोलिस खात्यात नोकरीत असल्याने शेतीसाठी त्यांना पुरेसा वेळ देता आला नाही. अभिजित महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. त्यांना शेतीची प्रचंड आवड. त्यातूनच आईच्या मदतीने शेतीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेत अभिजित यांनी हायटेक शेती करण्याचा निर्धार पक्‍का केला. दरम्यानच्या काळात म्हणजे 2009 मध्ये आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे एकमेव हरितगृह उस्मानाबाद जिल्ह्यात होते. तेथे प्रत्यक्ष पाहणीतून हरितगृह उभारणी ते थेट बाजारपेठ याबाबत आवश्‍यक माहिती देणारे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर हरितगृह उभारणीच्या निर्णयाला कृतीची जोड दिली.

कर्जासाठी मात्र हेलपाटे हरितगृह उभारणीसंदर्भात शेतकऱ्यांच्या 15 जणांच्या गटाने प्रशिक्षण घेतले. हरितगृह उभारणीसंबधीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्जासाठी बॅंक गाठली. उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश बॅंकांकडे कर्जासंदर्भात विचारणा केली. मात्र बहुतांश बॅंकांनी कर्जास नकार दिला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील आगळगाव येथील एका बॅंक शाखेने नऊ लाख रुपयांचे कर्ज दिले. सद्यःस्थितीत दीड लाख रुपयाच्या कर्जाची परतफेड बाकी आहे.

व्यवस्थापन महत्त्वाचे 28 मीटर रुंद व 36 मीटर लांबीच्या आकारातील पाइपच्या साहाय्याने शेड उभारले. 200 मायक्रॉन जाडीच्या प्लॅस्टिक पेपरने शेड बंदिस्त केले. लागवडीपूर्वी 90 ब्रास निचरा होणारी लाल माती टाकण्यात आली. 60 सें.मी. रुंद व 13 मीटर लांब आकाराचे गादीवाफे तयार केले. सेंद्रिय घटक पुरविण्याच्या उद्देशाने मातीत 30 ब्रास शेणखत व एक टन निंबोळी पेंड मिसळली. पाण्याचा निचरा होण्यासाठी एक टन भाताचे तूस टाकण्यात आले. फॉरमॅलीनच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले. बेडवर तीन ड्रीपर ठेवून इनलाईन ठिबक सिंचन करून घेतले. पुण्यातील एका खासगी कंपनीकडून रोपे आणली. हरितगृहात जून 2009 मध्ये जरबेराच्या पांढरा, पिवळा, लाल, केशरी व गुलाबी अशा विविध फुलांची लागवड केली.

व्यवस्थापन "टाइम टू टाइम' फुलशेतीत व्यवस्थापनाला टाइम टू टाइम महत्त्व देण्यात आल्याचे अभिजित सांगतात. पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खते देणे सुरू केले. सोमवारी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही सुरू केला. कॅल्शिअम नायट्रेटचा वापरही उपयुक्‍त ठरवला. रोग-किडींचे नियंत्रण करण्यासाठी कीडनाशकांचा वापर केला.

पॅकहाऊसची उभारणी दररोज सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत जरबेराच्या फुलांची तोडणी होते. तजेलदार व देठात ताठरता असणारी फुले या वेळेत पॅकहाऊसमध्ये नेली जातात. फुलाच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिकची पिशवी वापरली जाते. दहा फुलांचा प्रति गुच्छ बनविला जातो. असे एकूण 35 गुच्छ प्रति बॉक्‍समध्ये भरले जातात. हरितगृहालगतच कृषी विभागाच्या अनुदानावर 20 x 30 फूट अंतराचे उभारलेले पॅकहाऊस बहुपयोगी ठरले आहे. फुलांसोबत काकडी, टोमॅटो ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. प्रत्येक दिवसाला सरासरी 600 ते 700 फुलांची काढणी होते.

सध्या अडीच रुपये प्रति फूल असा दर घसरला आहे. वास्तविक नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत हाच दर सहा ते सात रुपये अपेक्षित होता. जो मागील हंगामात मिळाला होता. लागवडीच्या पहिल्या वर्षी सुमारे तीन लाख रुपये नफा मिळाला होता. यंदा मात्र नफ्याचे प्रमाण घसरणार आहे. खर्च वजा केला तर उत्पन्नाच्या 50 टक्‍के नफा मिळतो. लातूरचे तत्कालीन कृषी सहसंचालक एस. एल. जाधव तसेच अन्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अभिजित यांना लाभले.

गांडूळ खत निर्मितीचे दोन प्रकल्प शेतावरच गांडूळ खत निर्मितीचे दोन प्रकल्प उभारले आहेत. काकडी व भाजीपाला पिकांसाठी गांडूळ खत तर फुलशेतीसाठी व्हर्मिवॉश वापरले जाते. महिन्याला दोन लिटर व्हर्मिवॉश ठिबकमधून सोडले जाते.

पाण्याचे नेटके नियोजन दुष्काळाची भीषणता लक्षात घेत पाण्याचे नियोजन केले आहे. एका बोअरवेलमधून पाणी पुरविण्यात येते. दिवसाकाठी हरितगृहातील फुलांना पाणी देण्यासाठी 20 मिनिटे पंप चालविला जातो. आवश्‍यकतेनुसार प्रति झाडास 150 ते 350 मि.लि. पाणी पुरविण्यात येते.

कार्नेशननेही दिली साथ जरबेरा फुलशेती आत्मविश्‍वास येत असल्याचे पाहून 2010 मध्ये दुसरे हरितगृह उभारणीचा निर्णय घेतला. यात ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. त्यापासून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर म्हणजे 2011 च्या नोव्हेंबरमध्ये 10 गुंठे क्षेत्रात कार्नेशनची लागवड केली. योग्य व्यवस्थापनातून फुलवलेल्या फुलांची मार्च महिन्यात तोडणी सुरू झाली. मेपर्यंत ती सुरू राहिली. कार्नेशनच्या पहिल्या तीन महिन्याच्या हंगामात 40 हजार फुलांचे उत्पादन हाती आले. प्रति फुलास सरासरी सात रुपये दर मिळाला. खते, फवारणी, मजुरी, पॅकिंग यासाठी मिळून एक लाख 25 हजार रुपये खर्च आला. दुसरा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू झाला. हैदराबाद, नागपूर व मुंबईच्या बाजारपेठेत फुले पाठविली जातात. सध्या प्रति 20 फुलांच्या पेंडीला 70 ते 80 रुपये असा दर घसरला आहे. वास्तविक या काळात तो दोनशे रुपये असणे गरजेचे होते.

काकडी उत्पादनातही आघाडी सुमारे 35 गुंठ्यांत खुल्या शेतीत (ओपन) काकडी आहे. निविष्ठांमध्ये मल्चिंग पेपरसाठी 10 हजार रुपये, बियाणे 3500 रुपये, खते, कीडनाशके सहा हजार रुपये व मजुरी 7500 रुपये असा एकूण 27 हजार रुपये खर्च आला. 10 टन उत्पादन मिळाले. 10 ते 12 रुपये प्रति किलो दराने पुणे बाजारपेठेत काकडी विक्रीसाठी पाठविली. आतापर्यंत 10 टन मालाची विक्री झाली आहे. आणखी सहा ते सात टन उत्पादनाची अपेक्षा आहे. आतापर्यंत एक लाख रुपये उत्पन्न हाती आले आहे.

मायलेकांनी खांद्यावर शेतीची धुरा बी. कॉम.चे शिक्षण सुरू असतानाच अभिजित यांनी शेतीची धुरा खांद्यावर घेतली. आई सौ. लताबाई यांची मदत त्यांना उत्साह देणारी ठरली. लताबाईंचे शिक्षण दहावीपर्यंत असून शहरात राहूनही त्या समर्थपणे शेती सांभाळतात. आई व मुलगा असे मायलेक शेतीची सर्व कामे सांभाळतात.
अभिजित यांनी शेतीलगतच तीन एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली आहे. या शेतात गहू व ज्वारी प्रत्येकी दीड एकर आहे. याच शेतीत टोमॅटो लागवडीचे नियोजन सुरू आहे.

मार्केटिंगसाठी चमू फुले व भाजीपाला विक्रीसाठी योग्य बाजारपेठ मिळविण्यासाठी श्री. तुळजाभवानी गट स्थापन करण्यात आला आहे. गटाच्या माध्यमातून फुले व भाजीपाल्याची योग्य भावात विक्री करण्यात येते. राज्यभरातील दरांत चढ-उतार पाहून बाजारपेठेत फुले व भाजीपाला विक्रीसाठी पाठविण्यात येतो. यासाठी पाच लोकांचा चमू कार्यरत आहे. अध्यक्ष मनोज पडवळ व सचिव म्हणून मनोज पडवळ काम पाहतात.

संपर्क - अभिजित काकडे - 9175325656