Tuesday, 15 January 2013

जलसंधारणाच्या कामातून कातपूरने टाकली कात

शासनाने केलेल्या जलसंधारण कामाच्या देखभालीकडे गावकऱ्यांनीच लक्ष देणे आवश्‍यक असते. काळाची गरज लक्षात घेऊन कातपूर (जि. लातूर) गावातील शेतकऱ्यांनी जलसंधारण कामाची दुरुस्ती केल्याने दुष्काळातही दीड कि.मी.पर्यंत ओढा पाण्याने भरलेला आहे. शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्नांतून शेती, दुग्धोत्पादन यात चांगले उत्पादन मिळवत आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. डॉ. टी. एस. मोटे
गावाशेजारचा ओढा पावसाळ्यानंतर वाहायचाच थांबला, की विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होत जाते, त्यामुळे सिंचनासाठीच नव्हे, तर पिण्यासाठीही पाण्याची कमतरता भासते, असे चित्र सर्वत्र आपल्याला दिसते. असेच काहीसे चित्र काही वर्षांपर्यंत कातपूर (जि. लातूर) या गावातही होते. मात्र, काळाची गरज लक्षात घेऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कातपुरातील शेतकरी एकत्र आले. त्यांनी जल संधारणांची कामे पूर्ण केली. आजच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर या गावात पाणी उपलब्ध असून, गावातील अर्धचंद्राकृती ओढा आज सलग दीड कि.मी. पाण्याने तुडुंब भरलेला आहे. पर्यायाने परिसरातील विहिरींना भरपूर पाणी असून शेतकऱ्यांच्या सिंचनाची बारमाही, हंगामी सोय झालेली आहे. टॅंकरच्या मागे धावणारे गाव ही ओळख गावकऱ्यांनी पुसली आहे.

सुरवात शासनाची... - कातपूर गावची लोकसंख्या 2000, तर शिवाराचे क्षेत्र फक्त 650 एकर आहे. गावाला लागूनच असलेल्या ओढ्यावर कृषी विभागाने जलसंवर्धनासाठी सन 1994 मध्ये तीन व सन 2004 मध्ये एक असे चार सिमेंट नाला बंधारे बांधले होते.
- या बंधाऱ्याखाली सन 1995 व 2008 मध्ये प्रत्येकी एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा जिल्हा परिषदेमार्फत बांधला होता.
- या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे लोखंडी गेट चोरीला गेल्यामुळे तो निरुपयोगी ठरला, तसेच सिमेंट बंधाऱ्यात माती अडल्याने, तसेच फुटतूट झाल्यामुळे पाणी राहत नव्हते.
- जलसंधारणाच्या कामाची निगा न राखल्यामुळे पाणी साठले नाही. हळूहळू पाणीटंचाई वाढत गेली.

अशी झाली दुरुस्ती कामे... गावानजीक असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याजवळ गावची पाणीपुरवठ्याची "देवाची' विहीर आहे. या विहिरीची पाणीपातळी वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेने सन 2009 मध्ये सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती, रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम केले. यामुळे पहिल्या पावसातच आजूबाजूच्या विहिरींचे पाणी वाढल्याचे लक्षात आले.
- हे लक्षात घेऊन कातपूरचे माजी सरपंच लालासाहेब देशमुख यांनी ओढ्यालगतच्या शेतकऱ्यांना एकत्र केले. जुन्या जल संधारण कामाचे पुनरुज्जीवन लोकसहभागातून करण्याचे सर्वानुमते ठरले.
- 1995मध्ये बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला दार बसवण्यासाठी शेतकऱ्यांनी 86 हजार रुपयांची वर्गणी जमा केली. 2010मध्ये या बंधाऱ्यास लोखंडी दार बसवण्यात आले, त्याचा फायदा सर्वांना दिसून आला.
- दुसऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील ओढ्यामध्ये जागोजागी बेटे तयार होऊन ओढा अरुंद झाला होता. ओढ्याचे नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक लाख 86 हजार रुपये उभे केले. त्यातून 2011 मध्ये दोन्ही कोल्हापुरी बंधाऱ्यांची जेसीबीच्या साहाय्याने नाला सरळीकरण करून खोली वाढवली, त्यामुळे ओढ्याची रुंदी 25 मीटरपर्यंत वाढली. यातून निघालेली माती नाल्याच्या बांधावरच टाकल्याने त्याची उंची वाढली. त्याचा लाभ घेण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यावर आणखी सिमेंट कॉंक्रिटचे बांधकाम करून त्यात लोखंडी अँगल बसवले. त्यात जुन्या दाराच्या मापाचे व दीड फूट उंचीचे नवीन लोखंडी दार बसवले, त्यामुळे पाणीसाठ्यात दीड फुटाची भर पडली. त्यात पाणी साठल्याने आता चार कि.मी.चा ओढा पाण्याने पूर्णपणे भरला आहे.
- कातपूरजवळच्या एका छोट्या सिंचन प्रकल्पाचा कालवा कातपूरवरूनच जातो. हा कालवा गावाजवळ 30 फूट इतका खोल आहे. त्यातून आतापर्यंत पाणी सुटले नाही. त्याचा वापर गावकऱ्यांनी पुनर्भरण चर म्हणून केला असून, पुलाच्या ठिकाणी असलेले पाइप मातीने बुजवून टाकले, त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी कालव्यात थांबले.

बदलले गावाचे चित्र - गावचे सरपंच विष्णू बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले, की जलसंधारण कामाची डागडुजी झाल्यापासून शेतीच्या सिंचनाची सोय झाली, तसेच हिरव्या चाऱ्याची सोय झाल्याने दुभत्या जनावरांची संख्या वाढली असून, गावातून लातूरला रोज 1000 लिटर दूध जाते. पाच शेतकरी व्यावसायिक तत्त्वावर दुधाचे उत्पादन घेतात. गावात भाजीपाला व फुलांचे क्षेत्रफळ वाढले असून पाच शेतकरी आठ एकरवर रेशीम उत्पादन घेत आहेत. या गावात एकूण 300 एकर क्षेत्रावर ऊस असून त्यापैकी 150 एकर ऊस हा ठिबक सिंचनावर आहे. यापैकी 200 एकर क्षेत्रावरील उसाला जलसंधारण कामाचा फायदा होत आहे. हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी रब्बी पिकांना ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिले आहे.

बचतीचे प्रमाण वाढले - बचत गटाविषयी माहिती सांगताना धनराज काकासाहेब देशमुख सांगतात, की कातपूर गावात पुरुष शेतकऱ्यांचे चार बचत गट असून, बॅंकेत सध्या सात लाख रुपये जमा आहेत. कातपूरमध्ये पाण्यामुळे शेतीचाच नव्हे, तर गावाचा सर्वांगाने विकास होत गेल्याने गावाने कात टाकली आहे.
(लेखक लातूर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

जलसंधारणाने झाला फायदा : शेतीला पाण्याची गरज आहे, हे शेतकऱ्याला सांगावे लागत नाही. गावाला नदी नसली तरी ओढ्यातील पाणी अडविण्याशिवाय पर्याय नव्हता. शासनाने आपले काम केले होते. काळजी घेण्याच्या कामात गावकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज होती. पाण्याची कमतरता भासू लागल्यानंतर दुरुस्तीची कामे केली. केलेल्या कामाचा गावच्या अर्ध्याहून अधिक शिवाराला फायदा झाला आहे.
- लालासाहेब बापूसाहेब देशमुख, 9921561111

माझी शेती ओढ्याच्या दोन्ही बाजूने असल्याने तीन एकर क्षेत्र बागायत झाले आहे. माझ्याकडे एक एकर तुती लागवड असून, रेशीम अळी संगोपनासाठी शेड बांधले आहे. ओढ्यापलीकडील शेतात मला पाण्यामुळे जाता येत नसल्यामुळे लाकडी पूल स्वखर्चातून बांधला आहे. पाण्याच्या शाश्‍वतीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग हा फायद्याचा ठरत आहे.
- चंद्रसेन साहेबराव पाटील, (मुलगा - दिलीप, 9850362573)

मी दहा वर्षांपासून खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद; तर रब्बीमध्ये हरभरा व ज्वारीचे बीजोत्पादन करतो. गेल्या वर्षी तीन एकर क्षेत्रातून 70 क्विंटल ज्वारीचे बीजोत्पादन घेतले होते. जलसंधारण कामाच्या पुनरुज्जीवनामुळे माझ्या बीजोत्पादन पिकाच्या सिंचनाची सोय झाली असून, उत्पादनात भर पडत चालली आहे.
- अजित उद्धवराव देशमुख, 9403862432

ओढ्याच्या बाजूला माझी चार एकर शेती असून, त्यात सर्व क्षेत्रावर यशवंत व गजराज हे चारा पीक लावले आहे. पाण्याच्या शाश्‍वतीमुळे व्यावसायिक दुग्धोत्पादनाकडे वळलो असून, माझ्याकडे 40 म्हशी आहेत, त्यापैकी 28 म्हशी दूध देत आहेत. माझे घरचे 260 लिटर दूध आहे. गावकऱ्यांचे सुमारे 150 लिटर दूधही मी विकत घेतो. ते दूध लातूर येथे घरोघरी विकण्यासाठी माझ्याशिवाय अन्य पाचजण कामाला ठेवले आहेत, त्यामुळे माझ्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. माझ्यासारखे आणखी दहाजण लातूरला दूध घालतात.
- सतीश जनार्दन देशमुख, 9890380273

No comments:

Post a Comment