Sunday, 24 February 2013

मत्स्य संवर्धनासाठी जागेची निवड महत्त्वाची

मस्त्यशेतीमध्ये माशांचे संवर्धन करण्याकरिता तलाव हा सर्वांत महत्त्वपूर्ण घटक आहे. योग्य आकाराचा, प्रकाराचा तलाव असल्यास मत्स्यसंवर्धन करणे सोपे जाते. यासाठी तलावाचे खोदकाम, बांधकाम चांगल्या प्रकारे करावे लागते. आजच्या लेखामध्ये आपण मत्स्यतलावाचे प्रकार, जागेची निवड, मत्स्यतलावाकरिता महत्त्वपूर्ण घटकांची माहिती घेत आहोत.
डॉ. के. डी. पाटील, एस. एस. गांगण

अ) मत्स्यतलाव जागा निवडीची तत्त्वे -
1) भूप्रदेश - मत्स्यतलावाची जागा निवड करताना जागेचा उतार हा मध्यम असावा. म्हणजेच दोन टक्केपर्यंत उतार असलेली जागा योग्य समजावी. जास्त उतार असलेली जागा निवड केल्यास खोदकामाचा खर्च तसेच बांध किंवा तट कामाचा खर्च वाढतो. तलावाची जागा पूरक्षेत्रापासून दूर असावी. प्रदूषणमुक्त जागेस प्राधान्य द्यावे.
2) पाणी उपलब्धता - बारामाही पाण्याची उपलब्धता असावी. मत्स्य प्रकारानुसार पाण्याची गुणवत्ता (गोडे/ निमखारे/ खारे) असलेल्या पाण्याची उपलब्धता असावी. पाणीपुरवठा साधनाची हमी, पाणी उपलब्धता पाण्याची गुणवत्ता (क्षारता, सामू, गढूळता/ पारदर्शकता, रंग, प्राणवायूचे प्रमाण इत्यादी) चांगली असावी.
3) मृदा प्रकार - कमी अंतःसरण गती असलेली मृदा योग्य ठरते. म्हणजेच पाणी जास्त काळ धरून ठेवण्याची क्षमता असलेली मृदा. चिकण मातीस उत्तम पाणी धारणक्षमता असते. सर्वसाधारणपणे चिकण माती प्रमाण 45 टक्केपेक्षा जास्त असलेली माती योग्य समजावी. (विविध मृदेकरिता अंतःसरण गती तक्ता क्र. 1 मध्ये दिलेली आहे.)
4) हवामान - तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग इत्यादी बाबींचा करावा. कमी पाऊस असलेल्या प्रदेशामध्ये पाणी साठवणक्षमता जास्त असलेले तलाव तयार करावे किंवा बाहेरील पाणीपुरवठा साधनाची निर्मिती करावी. बाष्पीभवन वेगाचा विचार करून तलावाची क्षमता ठरवावी. बाष्पीभवन वेग जास्त असल्यास पाणी वापर जास्त होतो व पाण्याचे तापमान वाढते. त्यामुळे सतत पाणीपुरवठा करावा लागतो.
5) व्यवस्थापन बाबी - चोरीपासून संरक्षण, मत्स्य खाद्य, काढणीपश्‍चात काळजी, हाताळणी, रोगापासून संरक्षण इत्यादी.
6) विक्री व्यवस्थापन - शहरापासून अंतर, वाहतुकीची साधने, काढणीपश्‍चात काळजी, हाताळणी, साठवण, रस्ता इत्यादी.
7) इतर बाबी - अ) मजुराची उपलब्धता, ब) वीज उपलब्धता, क) तांत्रिक मार्गदर्शन, ड) साहित्य उपलब्धता, ई) वित्त पुरवठा/ पत पुरवठा इत्यादी.

ब) मत्स्यतलावाचे प्रकार -
कोणत्याही प्रकारचा तलाव हा मत्स्यपालनाकरिता उपयोगात आणला जाऊ शकतो; परंतु मत्स्यपालन करण्याकरिता योग्य आकाराचा समांतर पायाचा व तळाचा कमी उतार असलेला तलाव हा योग्य समजला जातो.
1) संगोपन तलाव - या तलावाचा आकार हा लहान व कमी खोलीचा असतो. या तलावाचे क्षेत्रफळ हे 0.02 ते 0.05 हेक्‍टर इतके असू शकते. उपलब्धता जागेनुसार तलावाचा आकार हा बदलतो, तलावाची लांबी व रुंदी ही उपलब्ध जागेवर अवलंबून असते. या तलावाची लांबी 12 मीटर, रुंदी 10 मीटर व खोली 1.25 मीटर इतकी असते.
2) संवर्धन तलाव - संवर्धन तलाव हा संगोपन तलावापेक्षा मोठा असतो. या तलावाचे क्षेत्रफळ 0.08 ते 0.2 हेक्‍टर इतके असू शकते. या तलावाची लांबी 25 मीटर, रुंदी 10 मीटर व खोली 1.25 मीटर इतकी असते. तलावाच्या क्षेत्रफळानुसार तलावाची लांबी व रुंदी बदलू शकते.
3) संचयन तलाव - हा तलाव संवर्धन तलावापेक्षा फार मोठा असतो. या तलावाचे क्षेत्रफळ हे 0.2 ते 2.0 हेक्‍टर इतके असू शकते. सर्वसाधारणपणे या तलावाची लांबी 90 मीटर, रुंदी 30 मीटर व खोली 2 ते 3.5 मीटर इतकी असते.
4) विक्रीकरण तलाव - या तलावाचा उपयोग हा विक्रीयोग्य मासे ठेवण्याकरिता होतो. ज्या वेळी बाजारामध्ये मागणी वा किंमत जास्त असते त्या वेळी या तलावाचा उपयोग होतो. या तलावाचे क्षेत्रफळ कमी असून तलावाची खोली ही सर्वसाधारणपणे तीन मीटरपर्यंत असते.
5) प्रजननक्षम माशांचे तलाव - या तलावामध्ये प्रजननक्षम मासे ठेवण्यात येतात. माशांची चांगल्या प्रकारे हालचाल होण्याकरिता या तलावाचे क्षेत्रफळ हे 0.2 ते 0.4 हेक्‍टर इतके ठेवलेले असते. सर्वसाधारणपणे या तलावाची खोली ही दोन ते तीन मीटर इतकी ठेवतात. तलावाची लांबी व रुंदी ही 125 मीटर व 30 मीटर अनुक्रमे इतकी असू शकते. उपलब्ध जागेनुसार तलावाचे क्षेत्रफळ, लांबी, रुंदीमध्ये बदल संभवतो.
6) अलग/ वेगळीकरण तलाव - या तलावामध्ये बाहेरील आणलेले मासे किंवा रोगग्रस्त मासे ठेवण्यात येतात. मुख्य माशांपासून रोगग्रस्त मासे स्वतंत्र ठेवण्याकरिता या तलावाचा उपयोग होतो. या तलावाचे क्षेत्रफळ हे 0.02 हेक्‍टर इतके असू शकते. या तलावाची खोली 1.5 मीटरपर्यंत असते.

वरील सर्व तलाव प्रकारांमध्ये काही मुख्य बाबी लक्षात ठेवाव्यात. उदा. केवळ माशांचे बीज सोडून ते विक्रीयोग्य होईपर्यंत वाढवणे असल्यास तलाव लहान असला तरी चालतो. अशा तलावाचे क्षेत्र हे. 0.04 हेक्‍टर (400 चौ.मी.) पेक्षा कमी असू नये. मोठ्या प्रमाणात मत्स्यशेती करावयाची असल्यास वेगवेगळ्या प्रकारची तळी तयार करावी. तळ्याचे क्षेत्रफळ हे तलावाचा आकार व उपलब्ध जागेनुसार ठरवावा. शक्‍यतो तलावाचा आकार चौरस किंवा आयताकृती असावा. तलावाची लांबी जास्त ठेवावी म्हणजे तलावात मासे पकडताना जाळी फिरवणे सोपे जाईल. तलावाचा तळ सपाट करावा किंवा थोडा हलका उतार द्यावा.

तलाव खोदकाम आणि बांधकाम -
मत्स्यशेतीकरिता तलाव तीन पद्धतीने तयार करता येतात. प्रथम प्रकारामध्ये नियोजित जागी खड्डा पाडून किंवा खोदकाम करून तलाव तयार करण्यात येतो. दुसऱ्या प्रकारामध्ये नियोजित जागी आजूबाजूच्या परिसरातील माती जमा करून त्यांचा बांध तयार करून तलावाची निर्मिती करता येते. दोन्ही पद्धतींच्या तलावामध्ये पाणी भरण्याकरिता पाणी आसपासच्या विहिरी, पाणी साठ्यातून घ्यावे लागते. खोदकाम केलेल्या तलावामध्ये पाण्याची पातळी ही खोल असल्यामुळे (सभोवतालच्या जमिनीच्या पातळीच्या खाली असल्यामुळे) पाणी उपसा करण्याकरिता पंपाची गरज लागते. परंतु बांधाद्वारे निर्मित तलावामध्ये पाण्याची पातळी जमिनीलगत असल्यामुळे पाणी उपसा करण्याकरिता पंप न लागता झडपेद्वारे पाण्याचे वाहन करता येते. तलावाच्या तळावर व बांधाच्या आतील बाजूस चांगल्या दर्जाच्या पोयटायुक्त किंवा चिकण मातीचा थर द्यावा. त्यामुळे तलावातील पाण्याचा झिरपा कमी होतो. तलावामधील पाणी काढण्याकरिता तलावाच्या तळाशी थोडा हलका उतार द्यावा.

बांध रचना :
1) तलाव बांधकाम करताना खोदकाम करून बांध तलावाच्या एक बाजूस किंवा दोन किंवा सर्व बाजूनी बांधून तलाव निर्माण करता येतो. तलाव तयार करण्याकरिता बांधाची निर्मिती ही मातीपासून किंवा बांधकाम साहित्यापासून (रेती, सिमेंट, दगड, लोखंड) करता येते.
बांध हा भक्कम किंवा मजबूत होण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव घालावा लागतो.
2) बांधाला भराव घालताना योग्य उतार द्यावा त्यामुळे बांध ढासळत नाही. खोदकाम करून तळे बनविल्यास माती बाहेर टाकण्यासाठी खूप खर्च येतो किंवा बांध बांधून तलाव तयार करण्याकरिता बाहेरील माती आणण्यासाठी खूपच खर्च होतो. म्हणून तलाव तयार करताना जमीन पातळीखाली थोडे खोदून उपलब्ध मातीद्वारे बांध केल्यास खर्च कमी करता येतो.
3) बांध बांधताना बांधाला आतील बाजूस 3ः1 असा उतार ठेवावा. तसेच बाहेरील बाजूस 2ः1 असा उतार ठेवावा. बांध जेवढा उभा (कमी उताराचा) तेवढा बांध ढासळत राहण्याची शक्‍यता जास्त असते.
4) खोदकाम केलेला मातीचा बांध तयार करताना काढलेल्या मातीचा 15 ते 20 से.मी.वर थर तयार झाल्यानंतर त्यावर पाणी टाकून त्या थराची दबाई करून तो दाबून घ्यावा. अशा दबलेल्या थरावर दुसरा थर घालावा व त्या थराची देखील दबाई करावी. अशाप्रकारे बांध घातल्यास तो पक्का व मजबूत होईल.
5) बांधामधून पाण्याचा झिरपा टाळण्याकरिता बांधाच्या मध्यभागी चिकण मातीचा वापर करावा. तलावाकरिता विविध पद्धतींच्या बांधाचा अवलंब होत असतो. सर्वसाधारणपणे वापरत असलेल्या बांधाचा आराखडा चौकटीत दिला आहे.


क) मत्स्यतलाव तयार करताना...
1) तलावाचे खोदकाम करताना वरील थराची माती कोरडी व सेंद्रिय पदार्थयुक्त असते. अशा प्रकारची माती प्लवंग निर्मितीला उपयुक्त असल्यामुळे अशी माती वेगळी करावी. तलाव पूर्ण झाल्यावर तलावाच्या तळाशी (आतील बाजूस) टाकावी.
2) तलावाचा आकार हा प्रथम ठरवून घ्यावा. उपलब्ध जागा, तलावाचा आकार व क्षेत्रफळ यांचा विचार करून लांबी व रुंदी ठरवावी. तलावाची खोली जागेचा उतार, खोदकामाची खोली, मातीची खोली व उपलब्धता इत्यादी बाबींचा सखोल विचार करून ठरवावी.
3) तलावाचा आकार शक्‍यतो चौरस, आयताकृती ठेवावा.
4) तलावाचा तळ सपाट ठेवावा किंवा थोडा हलका उतार द्यावा. तलावामध्ये खाचखळगे व झाडाचे बुंधे ठेवू नये.
5) वाऱ्याची दिशा तळ्याच्या उताराला समांतर राहील अशी रचना करावी.
6) संगोपन वा संवर्धन तलाव बांधाची वरील बाजूची रुंदी ही कमीत कमी 1.5 मीटर इतकी असावी व संचयन तलाव बांधाची वरील बाजूची रुंदी 2.5 मीटरपेक्षा कमी नसावी.
7) पावसाळ्याच्या सुरवातीला बांधावर हरळीसारखे गवत लावावे. त्यामुळे बांधाची धूप टाळता येईल.
8) तलावाच्या बांधावर योग्य प्रकारची झाडे लावावी. त्यामुळे तलावामधील पाण्याचे तापमान नियंत्रित ठेवून बाष्पीभवन कमी करता येते.
9) वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांपासून बांधाची होणारी धूप टाळण्याकरिता बांधाला दगडाचे अस्तरीकरण करावे.
10) तलावासाठी बांध घालण्याकरिता बांध योग्य आकाराचा निवडावा. बांधाला दोन्ही बाजूंनी (आतील व बाहेरील) योग्य उतार द्यावा. त्यामुळे बांध ढासळणार नाही.
11) बांधाला आतील बाजूस 3-1 असा उतार ठेवावा. तसेच बाहेरील बाजूस 2-1 असा उतार ठेवावा.
12) बांधाला आतील बाजूस पाटा ठेवावा. त्यामुळे मासे पकडण्याकरिता जाळे फिरविणे वा चालण्याकरिता सोईस्कर होईल.
13) योग्य आकाराचे व योग्य क्षेत्रफळ असलेले तलाव व्यवस्थापन करण्याकरिता सुयोग्य ठरतात.
14) बांधाची खालील बाजू (तळ) ही तलावाच्या उंचीच्या तीन पट ठेवावा. त्यामुळे बांधाला मजबुती मिळते. उदा. तलावाची उंची दोन ते तीन मीटर असल्यास बांध तळाची रुंदी 6 ते 10 मी. ठेवावी.

संपर्क - 022- 27452775
(लेखक खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि.रायगड येथे कार्यरत आहेत.)

विविध मृदेकरिता अंतःसरण गती
क्र.प्रकारअंतःसरण गती (सें.मी./ तास)
1वळूची जमीन2.5
2पोयट्याची जमीन1.8 ते 2.5
3वाळूमिश्रित पोयट्याची जमीन1.2 ते 1.8
4क्त पोयट्याची जमीन (चिकण मातीयुक्त पोयटा)0.6 ते 0.8
5जमीन (चिकण माती)0.2 ते 0.6

विविध मृदा प्रकारातील पाणीपुरवठा कालव्याच्या बाजूला उतार व पाण्याचा वेग
क्र.-दा प्रकारबाजूचा उतार (आडवा - उभा)पाण्याचा वेग (मी./ से.)
1वालुकामय व वाळूमिश्रित पोयटा3-1/ 2-10.75
2वाळूयुक्त चिकण माती पोयटा1.5-11.0
3बारीक पोयटा1.5-10.90
4चिकणमातीयुक्त पोयटा1-11.20

गोड्या पाण्यात संवर्धनासाठी कार्प मासे

मत्स्य संवर्धन करताना मासे हे इतर माशांच्या बरोबर राहण्यास योग्य असावेत. मासे हे दाटीवाटीने राहूनसुद्धा वाढीसाठी सक्षम असावेत. मासे हे वातावरणातील तसेच पाण्यातील होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणारे असावेत. गोड्या पाण्यातील संवर्धनासाठी कोणत्या जाती योग्य आहेत याची माहिती आजच्या भागात घेऊ या.

गात माशांच्या सुमारे 22,000 जाती आढळतात. त्यापैकी 1600 च्यावर जाती या आपल्या भारतात आढळतात. या सर्व जातींपैकी ठराविक जाती खाण्यासाठी उपयोगी आहेत. संवर्धन योग्य जातीच्या माशांची निवड करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. मत्स्यसंवर्धन करताना मासे हे इतर माशांच्या बरोबर राहण्यास योग्य असावेत. मासे हे दाटीवाटीने राहूनसुद्धा वाढीसाठी सक्षम असावेत. मासे हे वातावरणातील तसेच पाण्यातील होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणारे असावेत. उदा. तापमान, सामू, गढूळपणा, विद्राव्य प्राणवायू, विद्राव्य कार्बन- डाय- ऑक्‍साईड. तलावातील बंदिस्त परिस्थितीमध्ये प्रजनन होण्याची क्षमता ठेवणारे असावेत. मासे हे हाताळण्यास योग्य तसेच काढणीसाठी योग्य असावेत. बाजारात माशांना चांगली मागणी असावी.

अ) भारतीय प्रमुख कार्प
1) कटला (Catla catla)
- डोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रुंद व फुगीर असतो.
- अंगावरचे खवले मोठे असतात. ओठाच्या ठेवणीवरून इतर कार्प माशांमध्ये हा सहज ओळखला जातो.
- तोंड वरच्या बाजूला वळलेले, खालचा ओठ जाड असतो. मिशा नसतात.
- खालच्या ओठाचा काठ मऊ दातेरी नसतो. माशाचे प्रमुख खाद्य प्राणी प्लवंग वा वनस्पती प्लवंग आहे.
- तलावाच्या वरच्या थरातील अन्न खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरिता स्पर्धा करीत नाही. वाढ जलद असते.
- भारतात सर्वत्र आढळतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा प्रजननाचा हंगाम आहे.

2) रोहू (Labeo rohita)
- या माशाचे शरीर प्रमाणबद्ध वा लांबट असते. अंगावरचे खवले लालसर असतात.
- हा मासापण त्याच्या ओठाच्या ठेवणीवरून ओळखला जातो. खालचा ओठ जाड असून त्याची किनार मऊ दातेरी असते.
- वरच्या जबड्यास दोन लहान मिशा असतात. तोंड किंचित खालच्या बाजूला वळलेले वा अरुंद असते.
- हा मासा प्रामुख्याने जलाशयाच्या मधल्या थरात राहतो. प्राणी प्लवंग व सडणारी वनस्पती, त्यावरील जीवजंतू यावर उपजीविका करतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.

3) मृगळ (Cirrhinus mrigala)
- या माशाचे शरीर जास्त लांबट असते. तोंड खालच्या बाजूला वळलेले वा रुंद असते.
- ओठ पातळ वा खालच्या जबड्यावर दोन मिशा असतात. हा मासा तलावाच्या तळाजवळ राहतो.
- तळावरील कुजणारे वनस्पतिजन्य अन्न, शेवाळे, प्राणीप्लवंग हे अन्न घेतो.
- फक्त तळाजवळील अन्न घेत असल्याने कटला, रोहू माशांशी खाद्याच्या बाबतीत स्पर्धा नसते. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.

ब) चायनीज कार्प
1) सायप्रिनस-
- जगात सर्वत्र मत्स्यशेतीसाठी वापरला जातो. शरीराच्या घेरापेक्षा किंचित लांब असतो.
- या माशाचे काळपट, हिरवट, पिवळा, सोनेरी, लालसर असे विविध रंग आढळतात.
- तोंडाची ठेवण विशिष्ट असून अन्न खाण्यासाठी ते काहीसे लांबविता येते.
- खालच्या वा वरच्या जबड्यांस मिळून एकूण चार मिशा असतात. पृष्ठ पर लांब असतो व त्याच्या सुरवातीला किंचित दातेरी काटा असतो.
सायप्रिनस माशाच्या पोटजाती ः
i) स्केल कार्प (Cyprinus carpio var. communis)
- माशाचे शरीर संपूर्णपणे खवल्यांनी झाकलेले असते.
- खवले एकसारख्या आकाराचे असतात.
- त्यांच्या हिरवट, पिवळा, सोनेरी, लालसर रंग आढळतात.
ii) मिरर कार्प (Cyprinus carpio var. specularis)
- म ाशाचे खवले मोठे, विखुरलेले असून त्यांच्या कडा चकाकणाऱ्या असतात.
iii) लेदर कार्प Cyprinus carpio var. nudus)
- या माशाच्या अंगावर अजिबात खवले नसतात. क्वचित खवल्यांची एक ओळ आढळते.
- तळाशी राहणारा हा मासा सर्वभक्षक आहे. तळाशी आढळणारे किडे, शंखवर्गातील लहान प्राणी, कुजणाऱ्या पाणवनस्पती वा गाळ खातो.
- हा मासा कित्येकदा तळात रुतून राहतो. मत्स्यबीज केंद्रात ठेवल्यास तळ्याचे बांध कुरतडतो.
- वयाच्या पहिल्याच वर्षातच प्रजननास योग्य होतो.

2. चंदेरा (Hypophthalmichthys molitrix)
- पूर्ण शरीरावर बारीक चंदेरी खवले असल्यामुळे या माशाला "चंदेरा' म्हणतात.
- शरीर मध्यभागी चपटे असून डोके जरा निमुळते होत जाते.
- खालचा जबडा वरच्यापेक्षा किंचित लांब असतो. पोटावर चाकूच्या पात्याप्रमाणे मांसल पात असते. ही जात मूळची चीन देशातील आहे.
- जलाशयाच्या वरच्या थरात हा मासा राहतो. हा मासा वनस्पती प्लवंग व शेवाळ खातो. मासेमारी करताना बराच उडतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.

3. गवत्या (Ctenopharyngodon idella)
- या माशाचे शरीर लांबट वा बरेचसे मृगळ माशासारखे दिसते.
- परंतु तोंड निमुळते, अरुंद असते. मिशा नसतात.
- पाठीवरील पर वरच मागे असतो. शेपटीचा पर पूर्णपणे दुभागलेला नसतो. त्याची कड अंतर्गोल असते.
- ही जात चीन देशातील आहे. जलाशयाच्या मधल्या थरात राहतो.
- याचे खाद्य वनस्पती प्लवंग व मुख्यतः मोठ्या पाणवनस्पती हे आहे. त्यामुळे याला "गवत्या' म्हणतात.
- हा मासा अतिशय खादाड असून पाणवनस्पतींचा भरपूर प्रमाणात फडशा पाडतो.
- याचा उपयोग तळ्यांमधील पाणवनस्पतींच्या निर्मूलनाकरिता किंवा नियंत्रणाकरिता चांगला होतो.
- हा मासा वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.

गोड्या पाण्यातील संवर्धनयोग्य जाती...
अ) भारतीय प्रमुख कार्प ः कटला, राहू, मृगळ
ब) चायनीज कार्प ः सायप्रिनस, स्केल कार्प, मिरर कार्प, लेदर कार्प, चंदेरा, गवत्या.

संपर्क : 022- 27452775
(लेखक खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथे कार्यरत आहेत.)

शास्त्रीय पद्धतीने बांधा शेततळी

फळबागांच्या संरक्षित पाण्यासाठी बरेच शेतकरी आता शेततळी करीत आहेत. या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुरेशा पाण्याची साठवण होते, तसेच या पाण्याचा वापर मत्स्यशेतीसाठी देखील करता येतो. शेततळी बांधताना ती शास्त्रीयदृष्टीने बांधायला हवीत. आजच्या लेखात शेततळी कशी बांधावीत आणि कोणत्या जातीच्या माशांचे संवर्धन करणे शक्‍य आहे, याबाबतची माहिती घेत आहोत. डॉ. के. डी. पाटील, एस. एस. गांगण

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे महाराष्ट्रामध्ये शेततळी योजना कार्यान्वित झाली. या योजनेची थोडक्‍यात माहिती लेखात चौकटीत दिलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005 नुसार अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / अल्प भूधारक व सीमांत शेतकरी/ इंदिरा आवास योजना व भूसुधार योजनेचे लाभार्थी यांच्या शेतजमिनीवर सिंचन सुविधा पुरविणे, भूसुधारणेची कामे हाती घेणे, फळबाग लागवड व वृक्ष लागवड इत्यादी वैयक्तिक लाभाची कामे घेण्याची तरतूद आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळी व तत्सम अन्य कामे घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 14 डिसेंबर, 2011 अन्वये देण्यात आल्या आहेत. तथापि, शेततळी योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत सुलभता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे सदर शासन निर्णय अधिक्रमित करून सविस्तर सुधारित सूचनेबाबत शासनाकडून पुढील निर्णय घेण्यात आला.

...असा आहे शासन निर्णय - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट - 1 कलम 1 (4) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर ग्रामपंचायती व यंत्रणांमार्फत शेततळी घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अ) अनुसूचित जाती
ब) अनुसूचित जमाती
क) दारिद्य्ररेषेखालील लाभार्थी
ड) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
फ) कृषी कर्जमाफी योजना सन 2008 नुसार अल्प भूधारक (एक हेक्‍टरपेक्षा जास्त पण दोन हेक्‍टर (पाच एकर) पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक/ कुळ) व सीमांत शेतकरी (एक हेक्‍टरपर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक/ कुळ).
ग) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत अन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती.
उपरोक्त ""अ'' ते ""ग'' प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतात खालील आकारमानाचे शेततळे घेण्यात मान्यता देण्यात येत आहे.

कार्यान्वयन यंत्रणा - शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी शेततळ्यांचा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असल्यामुळे या कार्यक्रमाची अंमलबजावणी यंत्रणेमार्फत किंवा ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावी. त्यांच्याद्वारे कामे करताना तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याच्या संदर्भात खालीलप्रमाणे अधिकार असतील.

यंत्रणेमार्फत काम करताना दिनांक 27 मे, 2011 च्या शासन निर्णयाचे पालन करावे. तसेच ग्राम पंचायतीमार्फत तसेच यंत्रणेमार्फत शेततळे घेण्याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी तांत्रिक मार्गदर्शन करावे.

गोड्या पाण्यात कार्प माशांचे संवर्धन 1) गोड्या पाण्यातील कार्प, कॅटफिश, कोळंबी, काकई संवर्धन करता येते. गोड्या पाण्यातील मस्त्यसंवर्धनातील अधिक घडामोडी आंध्र प्रदेशात गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते.
2) मत्स्यबीज निर्मिती, मत्स्यपालन, मासेमारी, माशांची खरेदी आणि विक्री, मत्स्यप्रक्रिया अशा विविध माध्यमांतून रोजगार वाढीला संधी आहे.
3) गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारच्या तळ्यांमध्ये, जलाशयांमध्ये, विविध कालावधीच्या मर्यादेत तसेच उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीच्या साहाय्याने मत्स्य उत्पादन केले जात आहे. भारतीय प्रमुख कार्प तसेच चायनीज कार्प यांच्या मिश्र संवर्धनात ठराविक साठवणूक क्षमता ठेवून दर हेक्‍टरी चार ते सहा टन उत्पादन घेता येते.
4) गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन वाढविण्यासाठी मत्स्यबीज, मत्स्यसंवर्धनाचे उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान, नवीन जातीच्या माशांचे संवर्धन, माशांच्या गुणसूत्रांमध्ये मूल्यवर्धन, मत्स्य खाद्याची गुणवत्ता, तलावाचे पाणी व्यवस्थापन, मासे आणि कोळंबी यांचे आरोग्य व्यवस्थापन, मत्स्यतलावांचे आधुनिकीकरण आणि स्वयांत्रिकीकरणाचा वापर महत्त्वाचा आहे.

संपर्क - 022- 27452775
(लेखक खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथे कार्यरत आहेत.)

नियोजन मत्स्यशेतीचे..

1) मत्स्य तलावासाठी पाणी धरून ठेवण्याची चांगली क्षमता असणारी जमीन योग्य असते. या जमिनीत चिकण माती आणि गाळ यांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असावे. मत्स्य तलाव खोदताना ज्या ठिकाणी खोलगट जमीन आहे, अशी जमीन निवडल्यास तलाव खोदण्यास खर्च कमी येतो, तसेच क्षारपड जमिनीतही मत्स्य तलाव करता येतो.
2) मत्स्यशेती सुरू करण्याकरिता प्रथमतः तलाव करणे आवश्‍यक आहे. तलावाचा आकार हा आयताकृती असावा. तलावाची लांबी रुंदीच्या दीड ते दोन पट असावी. तळे भरण्यासाठी गुरुत्वाकर्षणाने पाणी घेता यावे किंवा तलावात पाणी भरण्याची सोय असावी. नदी, विहीर, धरण, नाला किंवा कालवा यांतून विद्युत पंप/ इंजिन बसवून पाणी तळ्यात घेता यावे, अशी सोय असावी.
3) पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपवर बारीक आसाची जाळी बसवावी किंवा गाळप कक्ष तयार करावा. पाणी घेण्याची व सोडण्याची व्यवस्था असावी. तलावामध्ये फक्त कोळंबीसंवर्धन करावयाचे असल्यास तळ्यातील तळातून पाणी काढून टाकता येईल, अशी व्यवस्था असावी.
4) तलावामध्ये पाण्याची खोली सहा फूट असावी, अशा प्रमाणात किमान दहा महिने तरी पाणी उपलब्ध असावे. तळ्यातील विद्राव्य प्राणवायू, पाण्याचा आम्ल विम्ल निर्देशांक तपासून घ्यावा. पाणी स्वच्छ व प्रदूषणयुक्त हवे. तळ्यामध्ये जलवनस्पती, तसेच इतर झाडोरा असू नये.
5) तळ्यात पाणी घेतल्यावर बीजसंवर्धन सुरू करण्यापूर्वी पाण्याचा आम्ल विम्ल निर्देशांक 15 ते 20 दिवस अगोदर व्यवस्थित करून घ्यावा. 20 गुंठे तलावाकरिता तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार चुन्याची मात्रा द्यावी. तळ्याच्या पाण्यात माशांचे नैसर्गिकरीत्या अन्न तयार होण्यासाठी पहिला हप्ता ओले शेण, युरिया व सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. तळ्यात शेवाळ वाढू लागल्यास युरियाचा वापर थांबवावा.
6) मासे व कोळंबीच्या वाढीसाठी केवळ तळ्याची नैसर्गिक आणि खत वापरामुळे वाढविलेली उत्पादकता यावरच अवलंबून न राहता, नैसर्गिक खाद्याच्या जोडीला पूरक खाद्य अधिकतम मत्स्योत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते. शेंगदाणे, तीळ, मोहरी इत्यादीची पेंड (ढेप) आणि कणी (पॉलिश) कोंडा किंवा गव्हाचा कोंडा यांचे समभाग मिश्रण पूरक खाद्य म्हणून वापरावे.
7) मत्स्यबीज, कोळंबी बीजाचे प्रमाण व वाढ विचारात घेऊन दैनंदिन पूरक खाद्याची मात्रा ठरविण्यात यावी. कोळंबीच्या वाढीसाठी खास तयार केलेले व बाजारात उपलब्ध असलेले पॅलेटेड खाद्य वापरावे. पूरक खाद्य दररोज ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी द्यावे. पेंड व कोंडा यांचे समभाग मिश्रण पाणी घालून भिजवावे आणि त्यांचे घट्ट गोळे करून तळ्यात टाकावेत किंवा उथळ पाण्यात बांबूच्या टोपल्यांत ठराविक ठिकाणी असे गोळे ठेवावेत.
8) मत्स्य संवर्धनाकरिता रोहू, कटला व मृगळ या मत्स्य प्रजाती उपलब्ध आहेत. कोळंबीकरिता मायक्रोब्रॅचियम रोझेनबर्गी व मायक्रोब्रॅचियम माल्कमसानी या प्रजाती उपलब्ध आहेत. यापैकी मायक्रोब्रॅचियम रोझेनबर्गी ही प्रजाती जास्त फायदेशीर आहे. सदरहू मत्स्य प्रजाती पाण्यातील वेगवेगळ्या थरांतील खाद्य खात असल्याने अन्नासाठी त्यांच्यात स्पर्धा होत नाही. पाण्याच्या वरच्या थरात कटला, मधल्या थरात रोहू व तळालगत कोळंबीचे संवर्धन करता येते. मत्स्य व कोळंबीचे एकत्रित संवर्धन करताना कटलाचे प्रमाण 40 टक्के, रोहूचे प्रमाण 30 टक्के व कोळंबीचे प्रमाण 30 टक्के ठेवतात.

गोड्या पाण्यातील तलावामध्ये मांगूर संवर्धन

मांगूर मासा गोड्या पाण्यामध्ये विशेषतः दलदलीच्या भागामध्ये नैसर्गिकरीत्या आढळतो. हा मासा चविष्ट, काटे कमी असलेला व औषधी गुणधर्म असलेला मासा आहे. मांगूर संवर्धनासाठी लागणारा कालावधी कार्प संवर्धनाच्या तुलनेत कमी म्हणजे सहा महिने इतकाच आहे. सोमनाथ यादव, उमेश सूर्यवंशी
भारतामध्ये प्रामुख्याने कार्प (कटला, रोहू, मृगळ, इ.) या जातीच्या माशांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते. एकूण मत्स्य उत्पादनापैकी 80 टक्के एवढे उत्पादन फक्त कार्प माशापासून मिळते. सुधारित पद्धतीने कोळंबी संवर्धनातून चांगला नफा मिळतो. परंतु वारंवार कोळंबीला होणारे रोग टाळण्याकरिता आलटून पालटून कोळंबी उत्पादन घेणे फायदेशीर ठरते. यासाठी तळ्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोळंबी संवर्धन करावे, दुसऱ्या टप्प्यात मत्स्यसंवर्धन करावे. यासाठी मांगूर व पंगस या जातीच्या माशांचे संवर्धन उपयोगी ठरते.

माशांचे संवर्धन - मांगूर संवर्धनासाठी लागणारा कालावधी कार्प संवर्धनाच्या तुलनेत कमी म्हणजे सहा महिने इतकाच आहे. भारतीय मांगूरची नैसर्गिक उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे कारण म्हणजे आफ्रिकन मांगूरचा (Clarias garipenius) भारतामध्ये झालेला शिरकाव. आफ्रिकन मांगूर हा भारतीय मांगूरपेक्षा वेगाने वाढतो, विविध प्रकारचे अन्नग्रहण करतो.

नैसर्गिकरीत्या हा मासा मिश्र आहारी, निशाचर आहे. शाकाहारीसोबत हा मासा प्राणिजन्य पदार्थांचेदेखील सेवन करतो. पाण्याची कमी खोली (साधारणतः तीन ते चार फूट) व तळाला चिखल असलेली जागा मांगूरला आवडते. बहुतेक वेळा हा मासा तळ्यातील चिखलामध्ये लपून बसतो. अधून मधून पृष्ठभागावर प्राणवायू श्‍वसनासाठी येत असतो.

1) तलावाची पूर्व तयारी - या माशाचे संवर्धन करण्यासाठी तलावाचे क्षेत्रफळ साधारणतः 1000 चौ.मीटर व तलावाची खोली 1.5 ते दोन मीटर एवढी असावी. 1000 चौ. मीटर एवढी जागा उपलब्ध नसल्यास 500 ते 1000 चौ.मीटर एवढ्या आकाराचे तळेसुद्धा संवर्धनास सोईस्कर होऊ शकते.
प्रथमतः नवीन तलावातील मातीचा सामू नियंत्रित राखण्याकरिता तलावामध्ये शेतीचा चुना विस्कटून घ्यावा. चुन्याचे प्रमाण 200 किलो प्रति हेक्‍टर एवढे असावे. तलाव जर जुना असेल तर चुन्याचे प्रमाण 500 ते 750 कि. ग्रॅ. प्रति हेक्‍टर एवढे ठेवावे.
तळ्यात कुठले भगदाड वा तडे गेलेले नाही ना याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर चांगले गाळलेले पाणी 50 सें.मी. खोलीपर्यंत भरून घ्यावे. सविस्तर खात्री करून घेतल्यानंतरच तलावामध्ये शेणखत 5000 कि.ग्रॅ. प्रति हेक्‍टर किंवा कोंबडी खत 1000 कि.ग्रॅ. प्रति हेक्‍टर वापरावे. सोबत 150 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्‍टरी तलावात मिसळावे. तलावामध्ये पाण्याची पातळी 0.75 ते एक मीटर एवढी असावी. पाण्यावरील बांधाचा भाग कमीत कमी तीन फूट एवढा असावा. जेणेकरून हा मासा पाण्याबाहेर पडणार नाही. चिखलाचा किंवा चिकण मातीचा तळ असलेला तलाव संवर्धनासाठी उपयुक्त ठरतो.
हा मासा सवयीनुसार सतत पाण्याच्या पृष्ठभागावर हवेतील प्राणवायू घेण्यासाठी येत असतो. तेव्हा हा मासा इतर पक्ष्यांचे भक्ष्य बनू शकतो. म्हणून तळ्याच्या वरती पक्षी येऊ नयेत म्हणून जाळ्याचे संरक्षण देणे महत्त्वाचे असते.

2) तलावामध्ये बोटुकली संचयन - मांगूर या जातीच्या माशांच्या बोटुकलीचे आकारमान 7.5 सें.मी. लांब असावे. ऑक्‍टोबर महिन्यात या माशाचे संचयन करणे फायदेशीर ठरते. हा मासा पाच ते सहा महिन्यांत विक्रीयोग्य होतो. सर्वसाधारणपणे प्रति हेक्‍टरी 40 ते 50 हजार बोटुकली एवढी संचयन घनता ठेवली जाते.

3) खाद्य व्यवस्थापन - तलावाचे सर्व अर्थशास्त्र खाद्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. माशांच्या योग्य वाढीसाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेली स्वस्त मासळी 70 टक्के आणि भाताचा कोंडा 30 टक्के या प्रमाणात पुरवावा. पुढील महिन्यापासून भाताच्या कोंड्याची टक्केवारी वाढविली तरी चालते. मांगूर जातीच्या या माशाला तयार केलेले खाद्य त्याच्या शरीराच्या सरासरी वजनाच्या 10 टक्के, दुसऱ्या महिन्यात आठ ते पाच टक्के व तिसऱ्या महिन्यानंतर शेवटपर्यंत पाच ते तीन टक्के एवढे खाद्य पुरविले गेले पाहिजे.

4) जल व्यवस्थापन - माशाचे उत्पादन व माशांचा आजार हे दोन महत्त्वाचे घटक पाण्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतात. पाणी दूषित असल्यास व पाण्याचे व्यवस्थापन चांगले नसल्यास माशांमध्ये आजार दिसतात. त्याचा खूप मोठा परिणाम उत्पादनावरदेखील होऊ शकतो.
जसजसा संवर्धनाचा कालावधी वाढतो तसतसे स्वच्छ पाण्याचा दर्जा व पातळी व्यवस्थित ठेवावी. जसे संवर्धनास दोन महिने पूर्ण होतील व तिसऱ्या महिन्यास सुरवात झाली असेल, त्या वेळेस पंधरा दिवसांत एकदा किंवा एका महिन्यात 15 ते 20 टक्के एवढे पाणी बदलावे. त्यामुळे तळ्यामधील पाण्याची प्रत व्यवस्थित राहते.

5) मांगूर माशांचे उत्पादन - सहा महिन्यांमध्ये मांगूर 150 ते 200 ग्रॅ. पर्यंत विक्री योग्य होतो. मांगूर संवर्धनासाठी योग्य व्यवस्थापन केल्यास 70 ते 80 टक्के एवढे जिवंत मासे व सहा ते आठ टन उत्पादन प्रति हेक्‍टरी सहा महिन्यांच्या संवर्धन कालावधीत मिळू शकते. मासे पकडण्याकरिता मत्स्य तळे पूर्णपणे रिकामे करून पाणी ज्या ठिकाणाहून बाहेर सोडले जाते त्या ठिकाणी जाळे बांधून माशांना पकडावे. तलावाच्या तळाशी राहिलेले मासे हाताने पकडावे.

मांगूर माशाची वैशिष्ट्ये - 1) हा मासा गोड्या पाण्यामध्ये विशेषतः दलदलीच्या भागामध्ये नैसर्गिकरीत्या आढळतो.
2) हा मासा चविष्ट, काटे कमी असलेला व औषधी गुणधर्म असलेला मासा आहे.
3) या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे हवेतीलदेखील प्राणवायूचा श्‍वसनासाठी वापर करण्याची व काही काळ पाण्याबाहेर रेंगाळण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे.
4) पश्‍चिम बंगाल व त्रिपुरा या दोन राज्यांत मांगूर माशाला चांगली मागणी.
5) भारतीय मांगूर (Clarias batrachus) या जातीला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी व दरदेखील चांगला मिळतो.

वेगवेगळ्या संवर्धन पद्धती आणि मिळणारे उत्पादन - 1) संमिश्र मत्स्यजातीचे संवर्धन - चार ते सहा टन /हे /वर्ष.
2) सांडपाणी वापरात घेऊन केलेले मत्स्यसंवर्धन- तीन ते पाच टन / हे / वर्ष.
3) पाणवनस्पती असलेल्या तलावामधील मत्स्यसंवर्धन- तीन ते चार टन/ हे/ वर्ष.
4) बायोगॅस द्रावणाचा वापर करून केलेले मत्स्यसंवर्धन- तीन ते पाच टन/ हे/ वर्ष.
5) एकात्मिक मत्स्यसंवर्धन- तीन ते पाच टन/ हे/ वर्ष.
6) सुधारित पद्धतीने केले जाणारे मत्स्यसंवर्धन- 10 ते 15 टन/ हे/ वर्ष.
7) मोठ्या जलाशयात बांबू व जाळीचा वापर- तीन ते पाच टन/ हे/ वर्ष करून बंदिस्त जागेत केले जाणारे मत्स्यसंवर्धन.
8) पिंजरा संवर्धन- 10 ते 15 कि.ग्रॅ. /चौ.मी./ वर्ष.


संपर्क - उमेश सूर्यवंशी - 9096900489
(लेखक मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर येथे कार्यरत आहेत.)

Thursday, 21 February 2013

योग्य नियोजनातून साधली "चाईव्ज' भाजीची निर्यातक्षम शेती

हरितगृहामध्ये नावीन्यपूर्ण परदेशी भाजीची प्रायोगिक लागवड करत शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील गणपतराव पाटील यांनी त्याची निर्यात केली आहे. त्यासाठी आवश्‍यक "ग्लोबल गॅप'चे प्रमाणपत्रही त्यांनी मिळवले आहे. बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजनावर विश्‍वास ठेवत चाईव्जसारखे नवे पीक प्रायोगिक तत्त्वावर लावण्याचे धाडस केले आहे. राजकुमार चौगुले
कोल्हापुरातील शिरोळ तालुका हा प्रामुख्याने उसाबरोबरच भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्‍यातील अनेक गावे भाजीपाल्यामुळे ओळखली जातात. याच शिरोळ तालुक्‍यातील गणपतराव पाटील हे त्यांच्या शंभर एकर हरितगृह शेतीमुळे प्रसिद्ध आहेत. हरितगृहामध्ये नावीन्यपूर्ण पिकांच्या शोधात असलेल्या गणपतरावांनी चाईव्ज या परदेशी भाजीची लागवड केली आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन आणि निर्यात करत त्यातून चांगले अर्थार्जनही मिळवले आहे. त्यांच्याकडील हरितगृहामध्ये नियमित भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यात गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी "चाईव्ज' या परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेत यशस्वी करून दाखवले आहे. नेहमी फुलांच्या पॅकिंगमध्ये व्यस्त असणारे श्री. पाटील यांचे कामगार आता या फुलांबरोबर परदेशी भाजीपाल्याच्या व्यवस्थापनात गुंतले आहेत.

प्रवास भाजीकडे... गणपतराव पाटील यांच्याकडे शंभरहून अधिक एकर क्षेत्रावर हरितगृह आहेत. त्यामध्ये डच गुलाब व फुलांची शेती केली जाते. त्यांच्या हरितगृहातून दरवर्षी जगातील विविध बाजारपेठांत गुलाब निर्यात केले जातात. सातत्यपूर्ण दर्जा आणि नियमिततेमुळे त्यांनी परदेशातील बाजारपेठांमध्ये ब्रॅंड विकसित केला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे हरितगृहात विविध फुलांच्या बरोबरीने भाज्यांचे उत्पादनही घेतले जात आहे.

गुजरातमधून मिळाली प्रेरणा गणपतराव पाटील हे ग्रीन हाउस व्यवसायाच्या निमित्ताने देशभर फिरत असतात. नावीन्यपूर्ण पिकांच्या शोधात असलेल्या गणपतराव यांना गुजरातमध्ये चाईव्ज या भाजीची माहिती मिळाली. ही भाजी करायचे ठरल्यावर त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. युरोपातून चांगली मागणी असल्याचे कळल्यानंतर धाडस करून एकदम अठरा एकर क्षेत्रावर लागवड करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधून या भाजीच्या बिया त्यांनी विकत घेतल्या. याचे बी जर्मन कंपनीचे असून, साडेपाच हजार रुपये किलो या दराने बीज खरेदी केले. वाफा पद्धतीने भाजीची लागवड केली असून, एकरी चार किलो बिया वापरल्या आहेत. जूनमध्ये रोपे तयार केली. ऑगस्टला लावण केली. नोव्हेंबरपासून उत्पादन सुरू झाले.

खत व पाण्याचे व्यवस्थापन चाईव्ज भाजीची लागवड करताना एकरी चार टन गांडूळ खत वापरले. सुपर फॉस्फेट 300 किलो, डायअमोनिअम फॉस्फेट 100 किलो, मॅग्नेशिअम सल्फेट 50 किलो, झिंक सल्फेट 25 किलो, फेरस सल्फेट 15 किलो, बोरॅक्‍स तीन किलो या प्रमाणे वापरले. आठवड्याला कॅल्शिअम नायट्रेट तीन किलो दिले. आठवड्यातून दोन वेळा विद्राव्य 19: 19:19 एक किलो दिले. अमोनिअम सल्फेट सहा किलो, युरिया सहा किलो, म्युरेट पोटॅश सहा किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 500 ग्रॅम या प्रमाणे खताचे व्यवस्थापन केले. प्रत्येक दिवशी ठिबकद्वारे सोळा हजार लिटर पाणी दिले. या भाजीवर फुलकिडीचा प्रादुर्भाव होतो. तो रोखण्यासाठी एक दिवसाआड सेंद्रिय कीडनाशकांची फवारणी केली.

गणपतराव पाटील यांच्याकडून शिकण्यासारखे... * सातत्याने नावीन्याचा ध्यास
* बाहेरील तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित करण्याचे प्रयत्न
* बाजारपेठेचा कायम अभ्यास
* हरितगृहातील पिकांतही नावीन्य ठेवण्याचा प्रयत्न
* ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर

अर्थशास्त्र (एकरी) * आतापर्यंत मिळालेले उत्पादन : सहा टन (6000 किलो) (सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत)
* आतापर्यंत मिळालेला सरासरी दर : 420 रुपये प्रति किलो.
* आतापर्यंत मिळालेले उत्पन्न : 25 लाख 20 हजार रुपये
* झालेला उत्पादन खर्च : 12 लाख रुपये
* बाजारपेठ : युरोपीय देश
- हे पीक आपल्याकडे नवीन असून, त्याची आर्थिकदृष्ट्या अधिक माहिती पिकाच्या अंतिम काढणीनंतरच उपलब्ध होऊ शकेल, असे मत गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

बाजारपेठेचा अभ्यास... - जूनला या भाजीपाल्याची लागवड केली. परंतु हे पीक रब्बी हंगामातील आहे.
- तसेच या भाजीची बाजारपेठ ही प्रामुख्याने थंड हवेचे देश आहेत. यानुसार बाजारपेठेची माहिती घेतली. सहा युरोपर्यंत (400 रुपये) भाव मिळाला. यात दहा ते वीस रुपये चढ-उतार होता. माल वेळेत जाण्यासाठी काटेकोर मेहनत घेतली.
- भाजीपाला थेट पाठविण्यापूर्वी गुजरातमधील हरितगृहातील परिस्थितीचाही अंदाज घेतला.

तोडणीपासून पाठवणीपर्यंत सर्वच हायटेक - साधारणतः आपल्या नियमित भाजीच्या उंचीएवढी भाजी तयार झाल्यानंतर त्याची सकाळच्या वेळी कापणी केली जाते.
- भाजी कापणीनंतर शीतगृहात अर्धा तास थंड केली जाते.
- शीतकरणानंतर भाजीचे ग्रेडिंग केले जाते. 20 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत वजन करून वर्गवारीनुसार त्याच्या पेंढ्या बांधल्या जातात.
- या पेंढ्यांचा एक किलो वजनाचा बॉक्‍स तयार केला जातो.
- एका वेळी 560 किलो भाजी परदेशात पाठविण्यात येते. दोन ते पाच अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या कुलिंग व्हॅनमधून मुंबई विमानतळावर नेली जाते. तेथून वातानुकूलित विमानातून ती परदेशात पाठवली जाते.
- भाजी कापणीनंतर चार दिवसांत परदेशात पोचली पाहिजे, या बेताने सर्व नियोजन केले जाते.
- आठवड्यातून तीन वेळा भाजी पाठविली जाते.
- आठवड्यात दीड ते दोन टन भाजीची तोडणी केली जाते.
- सर्व माल परदेशातच विकला जातो. लंडन हॉलंड आणि जर्मनी या भागांत या भाजीची विक्री होते. स्थानिक ठिकाणी विक्री केली जात नाही.
- या भाजीला दिल्लीच्या ग्लोबल गॅप या संस्थेने प्रमाणितही केले आहे.

केवळ एकाच उत्पादनावर अवलंबून न राहता अन्य उत्पादने कमी खर्चात घेण्यासंदर्भात विचार करत असताना चाईव्ज या भाजीची ओळख झाली. हिवाळ्यात युरोपीय देशांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने तिथे शेतीचे काम थंडावलेले असते. याच दरम्यान जर भाजीपाल्याचे उत्पादन केल्यास या भाजीला चांगली मागणी मिळते. फूल निर्यातीमुळे परदेशी बाजारपेठेशी सातत्यपूर्ण संबंध असल्याने विक्रीमध्ये अडचण आली नाही. आपल्याकडे इतर हरितगृहांमध्येही अशी भाजीपाल्याची लागवड करणे शक्‍य आहे.
- गणपतराव पाटील

"चाईव्ज"ची वैशिष्ट्ये - *कांदावर्गीय भाजीपाला
*कांद्याच्या वासाशी साधर्म्य
*विशेष करून युरोपीय देशात जास्त मागणी
*शरीरातील उष्णता वाढण्यासाठी या भाजीचा उपयोग
*सूप किंवा सॅलड म्हणून परदेशात लोकप्रिय
*एकरी सहा टनांपर्यंत उत्पादन शक्‍य
*एकदा कापणी केली की 28 दिवसांत पुन्हा कापणीला येते
*सहा महिन्यांत सहा वेळा कापणी होते.
*जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने पिकविण्याचा प्रयत्न.

संपर्क -02322-252181

Friday, 15 February 2013

ऍझोला - कुक्कुटखाद्यामधील अपारंपरिक खाद्य घटक


कुक्कुट खाद्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या अपारंपरिक खाद्य घटकांपैकी महत्त्वाचा घटक म्हणजे शैवालवर्गीय वनस्पती ऍझोला. ऍझोलामध्ये साधारणतः 25 ते 30 टक्के प्रथिने असतात, ऍझोलामध्ये कॅरोटिनॉइड पिग्मेंट असते. हे पिग्मेंट अंड्यांच्या बलकाला पिवळा रंग येण्यासाठी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर यामध्ये जीवनसत्त्वे, अमिनो आम्ले आणि क्षार असतात.
डॉ. व्ही. डी. लोणकर, डॉ. ए. एस. कदम

पक्षावरील येणाऱ्या एकूण खर्चापैकी 60 ते 70 टक्के खर्च हा खाद्यावर होतो. प्रथिने या घटकाला पक्षीखाद्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पक्ष्याच्या खाद्यात वापरण्यात येणाऱ्या खाद्य घटकांचा दर हा त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रथिनावरून ठरवला जातो. खाद्याची किंमत त्याचा दर्जा खालावू न देता जर कमी करता आली तर ते कुक्कुटपालकास एकूण उत्पादन खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरते. कुक्कुटपालकास एकूण उत्पादन खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरते. कुक्कुटखाद्यात नेहमी वापरात येणाऱ्या पारंपरिक खाद्य पदार्थांची किंमत सतत वाढत आहे. त्यामुळे स्थानिकरीत्या उपलब्ध होणारे अपारंपरिक खाद्य पदार्थ वापरल्यास खाद्यावरील होणारा खर्च कमी करता येतो.

कुक्कुट खाद्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या अपारंपरिक खाद्य घटकापैकी महत्त्वाचा घटक म्हणजे शैवालवर्गीय वनस्पती ऍझोला ही आहे. हे गोड्या पाण्यात वाढणारे निळे- हिरवे शैवाल आहे. त्याची वाढ झपाट्याने होते, दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये दुप्पट उत्पन्न आपणास ऍझोलापासून मिळते. सरासरी 700 ग्रॅम ऍझोला उत्पादन प्रति चौरस मीटर जागेमध्ये दोन ते तीन दिवसांत होते. ऍझोला हे पाण्याच्या पृष्ठभागावर वाढते. याच्या एकूण सहा जाती असून, त्या उष्णकटिबंधाच्या भागात वाढतात.

कुक्कुटखाद्यामध्ये ऍझोलाचा उपयोग
ऍझोलाचा वापर अंडी देणाऱ्या व मांसल पक्ष्यांच्या खाद्यामध्ये करता येतो (सिंग आणि सुबुद्धी 1978). ऍझोलाचा वापर प्रामुख्याने प्रथिने स्रोत म्हणून कुक्कुट खाद्यामध्ये केला जातो. ऍझोलामध्ये साधारणतः 25 ते 30 टक्के प्रथिने असतात. तसेच यामध्ये कॅरोटिनॉइड पिग्मेंट असतो. हा घटक कोंबड्यांच्या अंड्यांच्या बलकाला पिवळा रंग येण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर जीवनसत्त्वे अमिनो आम्ले आणि क्षार अशा प्रकारचे पक्ष्यांच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी आवश्‍यक असणारे घटक असतात.

पाण्याच्या पृष्ठभागावर पूर्णपणे वाढलेला ऍझोला काढून घ्यावा. तो उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर तयार करून तिचा वापर कुक्कुट खाद्यामध्ये अपारंपरिक खाद्यपदार्थ म्हणून करता येतो.

ऍझोलामध्ये प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगले असल्यामुळे व कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात. याचा वापर कुक्कुटखाद्यामध्ये करण्यासाठी विविध ठिकाणी संशोधन करण्यात आले आहे. कुक्कुटखाद्यामध्ये ऍझोलाचा वापर उन्हामध्ये वाढविल्यानंतरच करण्यात येतो. या प्रक्रियेमध्ये ऍझोलावर कोणत्याही प्रकारची बुरशीची वाढ झालेली चालत नाही. अन्यथा, कोंबड्यांमध्ये बुरशीजन्य आजार होण्याची शक्‍यता असते. कोंबड्यांमध्ये कोणत्याही अपारंपरिक खाद्य घटकाचा वापर करताना त्याचा उत्पादकतेवर होणारा परिणाम पाहणे गरजेचे असते. ऍझोलाचा वापर विविध ठिकाणी पाच ते दहा टक्के इतका कुक्कुटखाद्यामध्ये करण्यात आलेला आहे.

वाळलेल्या ऍझोल्यातील पोषणतत्त्वे : आर्द्रता 4.92 टक्के
प्रथिने 21.17 टक्के
तंतुमय घटक 4.60 टक्के
स्निग्धांश 4.59 टक्के
टोटल ऍश 19.91 टक्के
कॅल्शिअम 1.05 टक्के
फॉस्फरस 0.49 टक्के
लोह 0.49 टक्के
मॅंगेनिज 0.20 टक्के

संशोधनाचे निष्कर्ष : कुक्कुटखाद्य तयार करताना पक्ष्यांचे वय, त्यांची अन्नसत्त्वाची आवश्‍यकता आणि उत्पादकता गृहीत धरून पक्षीखाद्य तयार करण्यात येते. अंडी देणाऱ्या पक्ष्यांमध्ये तीन प्रकारचे खाद्य म्हणजे चीक स्टार्टर, ग्रोअर व लेअर खाद्य देण्यात येते. तसेच मांसल पक्ष्यांमध्येसुद्धा चीक प्रीस्टार्टर, स्टार्टर व फिनिशर अशी तीन प्रकारची खाद्ये देण्यात येतात. या सर्व प्रकारच्या खाद्यामध्ये ऍझोलाचा वापर करण्यात आलेला आहे. या संशोधनाचा सारांश खाली देण्यात आला आहे.

1) मांसल पक्षी मांसल पक्ष्यांमध्ये विक्रीचे वजन, विक्रीचे वय, खाद्याचे मांसात रूपांतर करण्याचे गुणोत्तर व मरतुकीचे प्रमाण इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात.
ऍझोलाचा वापर ब्रॉयलर खाद्यात 2.5 ते 5 टक्‍क्‍यांपर्यंत सोयाबीन मिलच्या ऐवजी वापरल्यास पक्ष्यांचे खाद्याचे मांसात रूपांतर करण्याचे गुणोत्तर चांगले मिळते. प्रति पक्षी निव्वळ नफ्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ऍझोलाचा वापर चीक स्टार्टर खाद्यामध्ये दहा टक्के प्रमाणात केल्यास ब्रॉयलर पक्ष्यांच्या मांस उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. (काम्बेल 1984). ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये पाच टक्के ऍझोला हा 2.6 टक्के व्हीट ब्रान व 2.4 टक्के मासळीच्या जागी वापरल्यास पक्ष्यांच्या वतनात वाढ होते. (पार्थसारथी व इतर 2002)

2) अंड्यावरील पक्षी अंडी देणाऱ्या पक्ष्यांमध्ये त्यांचे अंडी देण्याचे वय, अंडी उत्पादन, खाद्याचे अंड्यात रूपांतर करण्याचे गुणोत्तर व मरतुकीचे प्रमाण इ. गोष्टी महत्त्वाच्या असतात. अंडी देणाऱ्या पक्ष्यांच्या खाद्यात पाच आणि दहा टक्के ऍझोला या प्रमाणात खाद्यात मिसळल्यास असे दिसून आले आहे, की अंड्यावरील पक्ष्यांचे खाद्याचे अंड्यात रूपांतर करण्याच्या क्षमतेत आणि वजनात वाढ होते.

ऍझोलाचा वापर कोंबड्याच्या खाद्यात 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त केल्यास पक्ष्यांच्या वजनवाढीमध्ये घट, खाद्याचे मांसात व अंड्यात रूपांतर करण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून आले आहे. (पार्थसारथी व इतर 2001)

दहा ग्रॅम ऍझोला पावडर प्रति लाव्ही पक्षी प्रति दिनी खाद्यामध्ये मिसळून दिल्यास असे दिसून आले आहे, की प्रत्येक पक्ष्यामागे 10.73 ग्रॅम खाद्य वाचले. साधारणतः 15 पैसे प्रमाणे प्रति पक्षावरील खाद्याचा खर्च कमी करता येतो.
वरील सर्व संशोधनावरून असे दिसून येते की कुक्कुटखाद्यामध्ये ऍझोलाचा वापर पाच ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत केल्यास त्याचा फायदा होतो.

ऍझोला आरोग्यपूर्ण

जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे महत्त्वाचे आहे. सद्यःस्थितीत जनावरांसाठी उपलब्ध चारा व पशुखाद्य यामध्ये तफावत आहे. यातून स्थानिक उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर उपयोग करून ऍझोलाचा पशुखाद्यात वापर फायदेशीर दिसून आला आहे.

ऍझोलाच्या बहुपयोगी गुणधर्मांमुळे आणि कमी दिवसांतील जास्त उत्पादनामुळे ऍझोलाचा जनावरांच्या खाद्यात समावेश करणे फायदेशीर ठरते. ऐंशीच्या दशकापर्यंत ऍझोलाचा मुख्य उपयोग भातशेतीसाठी जैविक खत म्हणून केला जात होता. नत्र स्थिरीकरण या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या जास्त प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणून ते उपयोगात आणले गेले आहे. केरळ, तमिळनाडूमधील भात उत्पादक ऍझोलाचा वापर करतात. ऍझोला मत्स्यखाद्य म्हणून उपयुक्त असल्यामुळे या काळात भात, ऍझोला व मत्स्य; तसेच भात, ऍझोला, मत्स्य व बदक इ. एकात्मिक मिश्र शेती पद्धती विकसित झाली आहे.

ऍझोला शैवाल ही पाण्यावर मुक्तपणे तरंगणारी नेचेवर्गीय वनस्पती आहे. प्राचीन काळापासून ऍझोलाची ओळख नील-हरित शैवाल अशी आहे. ही एक सहजीवी वनस्पती असून, वातावरणातील नत्र नील-हरित शैवालाच्या मदतीने (ऍनबिना अझोली) स्थिर करते. अलीकडच्या काळात पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे पशुखाद्याला पर्याय म्हणून ऍझोला वापरण्यास सुरवात झाली आहे.

ऍझोलातील पोषणतत्त्वे ः
ऍझोलातील मुबलक अन्नघटकांमुळे पशुखाद्य म्हणून जनावरे, डुकरे, बदके, मत्स्य, कोंबड्या, लाव्ही व इमू इ. खाद्यांत उपयोग केला जातो. कोरड्या वजनानुसार ऍझोलात २५ ते ३५ टक्के प्रथिने, १० ते १५ टक्के खनिजे आणि सात ते दहा टक्के अमिनो आम्ले, जैवक्रियाशील पदार्थ, बायोपॉलिमर असतात. ऍझोलात प्रथिनांचे प्रमाण जास्त, तर लिग्निनचे प्रमाण कमी असल्यामुळे ते सहज पचते.

ऍझोला वाढवण्याची पद्धत ः
ऍझोला आकाराने एक ते तीन सें.मी. असते. ऍझोलाची वाढ समांतर दिशेने होते. आपल्या सोयीनुसार शेतात, परसात, गोठ्याशेजारी व गच्चीवरही ऍझोलाची लागवड करता येते. ऍझोलाची लागवड ही वाफे पद्धतीने शक्‍यतो झाडाच्या सावलीत करावी. लागवडीसाठी १० ते १२ सें.मी.पर्यंत पाणीसाठा करू शकणारे वाफे तयार करावेत. यासाठी तात्पुरते प्लॅस्टिकचे किंवा कायमस्वरूपी सिमेंटचे पक्के वाफे वापरतात. तयार केलेल्या वाफ्यामध्ये सिलपोलिन या प्लॅस्टिकचा वापर केल्यास अधिक फायद्याचे ठरते. जास्त प्रमाणात उत्पादन करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा उपयोग करता येईल.

ऍझोलाचे उत्पादन ः
प्रत्येक चौरस मीटरमागे २०० ते ३०० ग्रॅम अझोला वाफ्यातून रोज काढता येतो. ऍझोलाचे सरासरी उत्पादन ७०० ते ७५० टन प्रति हेक्‍टर प्रति वर्ष इतके आहे.

जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत ः
१) ओला ऍझोला ः
साधारणपणे एक ते दीड किलो ऍझोला प्रति दिन प्रत्येक जनावरास खाऊ घालावा. एका दिवशी जास्तीत जास्त दोन किलो ऍझोला प्रत्येक जनावरास देता येतो. सुरवातीस पशुखाद्यात / आंबवणामध्ये मिसळून १ः१ या प्रमाणात ऍझोला खाऊ घालावा, त्यानंतर पशुखाद्याशिवाय ऍझोला खाऊ घालावा.

२) सुका ऍझोला (ऍझोला मिल) ः
ऍझोला सुकवल्यानंतर दहा टक्के प्रमाणात पशुखाद्यात मिसळून वापरावा.

वेगवेगळ्या जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत ः
दुधाळ गाई व म्हशी ः दुभत्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये, आंबवणामध्ये एक ते दीड किलो अझोला प्रति दिन मिसळून (१ः१ प्रमाण) खाऊ घालावा. दूध उत्पादनात, तसेच फॅटमध्ये वाढ होते.
वासरे ः ऍझोलाच्या वापरामुळे वासरांच्या वजनात (३०० ते ५०० ग्रॅम) वाढ झाल्याचे दिसून येते.
शेळ्या व मेंढ्या ः ऍझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन (३००-५०० ग्रॅम) वाढ होते.
पक्षी (कुक्कुट, बदक, इमू, लाव्ही) : कोंबड्यांच्या खाद्यात मिश्रण स्वरूपात ऍझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन वाढते व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ होते, तसेच अंड्यांचा पृष्ठभाग चकचकीत होतो.

ऍझोला खाद्याचे फायदे ः१) दूध उत्पादन, फॅट, वजन व अंड्यांचे उत्पादन यांमध्ये वाढ. २) १५-२० टक्के आंबवणावरचा खर्च कमी होऊन खाद्यावरच्या खर्चात बचत होते. ३) एकूणच जनावरांत गुणवत्तावृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारते व आयुष्यात वाढ होते.

ऍझोलापासूनचे इतर फायदे ः
ऍझोला वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी झाडांसाठी वापरता येते, तसेच वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या एक किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे ०.५ किलो रासायनिक खताइतके आहे. ऍझोला लागवड हे सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर तंत्रज्ञान असून, ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे, त्याचा जनावरांच्या आहारात वापर करणे ही काळाची गरज आहे.

संपर्क फोन नं. ः ०२१६९ - २४९६७९
डॉ. पाटील, मो. नं. ः ९७६६७०१०३०

(लेखक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

गोपालन आणि सेंद्रिय गुळातून वाढविला नफा

नामदेव मोळे यांचे प्रयत्न
घरपण (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील नामदेव आकाराम मोळे हे केवळ 30 गुंठे जमीन असलेले शेतकरी; परंतु उपलब्ध जमीन आणि गीर गाईच्या संगोपनातून त्यांनी प्रगती साधली आहे. सेंद्रिय गूळ निर्मिती, दूध विक्री त्याचबरोबरीने गांडूळ खत आणि गोमूत्र विक्रीतून त्यांनी गावातच उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे.
अमित गद्रे

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्‍यातील शेती ही लहान लहान तुकड्यांत विभागलेली, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची जमीनधारणा ही तशी कमीच. गेल्या काही वर्षांत परिसरातील ऊस कारखान्यांमुळे बरेचसे शेतकरी पारंपरिक भात पिकाऐवजी ऊस शेतीकडे वळले आहेत. शेतीतील उपलब्ध चाऱ्यामुळे घरटी एक - दोन दुधाळ जनावरे अशी येथील शेतकऱ्यांची परिस्थिती. अशा शेतकऱ्यांपैकीच एक आहेत घरपण गावचे नामदेव मोळे. गेल्या सहा वर्षांत शेतीला पशुपालनाची जोड देत त्यांनी गूळ आणि दूध विक्री, गांडूळ खत निर्मिती, गोमूत्र विक्रीतून आर्थिक नफा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

शेती आणि पशुपालनातून प्रगती -
शेती आणि विविध उपक्रमांबाबत श्री. मोळे म्हणाले, की वडिलांपासून आमच्याकडे केवळ 30 गुंठे ऊस शेती आहे, त्यामुळे आर्थिक उत्पन्नासाठी पशुपालनाला सुरवात केली. सध्या माझ्याकडे दोन म्हशी आणि एक गीर गाय आहे. मी मुद्दामच गीर गाय निवडली. याचे कारण म्हणजे ही गाय दुधाला चांगली आहे, व्यवस्थापन खर्चही कमी आहे. परिसरातील ग्राहकांकडून देशी गाईच्या दुधाला मागणी आहे. याचबरोबरीने देशी गाईच्या गोमूत्राला धार्मिक कार्य आणि औषधोपचारासाठीही मागणी आहे. तीन वर्षांपूर्वी मी पुण्याहून तीन वेत झालेली गीर गाय आणली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गावडे यांच्या सल्ल्याने गीर रेतमात्रा आणून कृत्रिम रेतन केले. आता तिला पाडी झाली आहे. गाईचे आरोग्य आणि दूध उत्पादनात सातत्य राहण्यासाठी सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दीड किलो पशुखाद्य दिले जाते. खाद्याच्याबरोबरीने अर्धा किलो गव्हाचा भुसा, भाताचा कोंडा एक किलो याचबरोबरीने हिरवा व सुका चारा कुट्टी करून दिला जातो. जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी बांधावर यशवंत गवताची लागवड केली आहे. जनावरांच्या आहारात मी ऍझोलाचा वापर सुरू केला आहे. दै. "ऍग्रोवन'मध्ये आलेल्या लेखातील मार्गदर्शनानुसार घरीच सहा फूट बाय पाच फूट बाय अर्धा फूट उंचीचा विटेचा वाफा बनविला. त्यामध्ये प्लॅस्टिक कागद अंथरूण त्यामध्ये ऍझोलाची वाढ केली. दररोज पाव किलो ऍझोला गाईला खायला दिला जातो. गाईचे योग्य व्यवस्थापन ठेवल्याने दररोज सकाळ - संध्याकाळ मिळून दहा लिटर दूध मिळते. यातील सहा लिटर दुधाची 40 रुपये प्रति लिटर या दराने जवळच्या कळे गावात विक्री करतो. गीर गाईच्या दुधाला पाच फॅट आहे. दुधाला गुणवत्ता असल्याने दुधाची आगाऊ नोंदणी झालेली आहे. गाईच्या व्यवस्थापनाचा रोजचा सरासरी खर्च 70 रुपये आहे. चारा घरचाच आहे. येत्या काळात दुधाच्या बरोबरीने तुपाचीही विक्री करणार आहे.

गांडूळ खत निर्मिती -
शेतीला पुरेसे सेंद्रिय खत उपलब्ध होण्यासाठी श्री. मोळे शेणखत, गांडूळ खत निर्मिती करतात. याबाबत ते म्हणाले, की माझ्याकडे 20 वर्षांपासून दीनबंधू गोबरगॅस आहे. म्हशी आणि गाईचे शेण गोबरगॅससाठी वापरले जाते. गोबरगॅसमधील स्लरी खड्ड्यात गोळा करून ठेवली जाते. या स्लरीचा वापर ऊस शेतीसाठी करतो. शेतीला पुरेसे सेंद्रिय खत उपलब्ध होण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून गांडूळ खत तयार करीत आहे. प्लॅस्टिक कागदाच्या दोन बेडमध्ये गांडूळ खत तयार केले जाते. एक बेड भरायला साधारणपणे 100 किलो पालापाचोळा आणि 100 किलो शेण लागते. साधारणपणे अडीच महिन्यांनी गांडूळ खत तयार होते. एका बेडपासून साधारणपणे 200 किलो गांडूळ खत मिळते. वर्षभरात एक टन गांडूळ खत तयार होते. त्यातील 600 किलो गांडूळ खत शेतीला वापरतो. उरलेले 400 किलो गांडूळ खताची विक्री करतो. सरासरी दहा रुपये प्रति किलो या दराने गांडूळ खताच्या विक्रीतून चार हजार रुपये मिळतात.

कमी खर्चाची सेंद्रिय शेती -
गोपालन आणि ऊस शेतीवरच घर अवलंबून असल्याने सुधारित पद्धतीने ऊस लागवड आणि काटेकोर व्यवस्थापनावर त्यांचा भर असतो. श्री. मोळे स्वतः, त्यांची बायको आणि मुलगा शेतीचे व्यवस्थापन पाहतात. गेल्या सहा वर्षांपासून ते सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करीत आहेत. गूळ निर्मिती करीत असल्याने त्यांनी को- 92005 ही जात निवडली आहे. कारण ही जात रसासाठी चांगली आहे, उताराही चांगला मिळतो. ऊस लागवडीबाबत श्री. मोळे म्हणाले, की माझी 30 गुंठे जमीन मध्यम प्रतीची आहे. लागवडीसाठी जमिनीची मशागत करून पुरेसे शेणखत, गांडूळ खत शेतात मिसळून तीन फुटांची सरी पाडली. बेण्याचा खर्च वाचविण्यासाठी आता ऊस लागवड मी रोपांपासून करतो. साधारणपणे 15 नोव्हेंबरच्या दरम्यान गावादीवाफा तसेच ट्रेमध्ये रोपे तयार केली जातात. लागवडीसाठी घरचेच दर्जेदार बेणे निवडतो. उसाचा डोळा लागवडीपूर्वी शेण आणि गोमूत्राच्या द्रावणात बुडवून लागवड करतो. या प्रक्रियेसाठी ड्रममध्ये 20 लिटर पाण्यात पाच किलो शेण, दोन लिटर गोमूत्र आणि अर्धा किलो गूळ यांचे मिश्रण तयार करतो. या द्रावणात उसाचा डोळा पाच मिनिटे बुडवितो. बेणे प्रक्रियेमुळे उगवण क्षमता चांगली होते असा माझा अनुभव आहे. प्लॅस्टिक ट्रेमध्ये गांडूळ खत, कोकोपीट भरून त्यामध्ये एका डोळ्याची लागवड करतो. गादीवाफ्यावरही काही प्रमाणात रोपे तयार केली जातात. रोपे दीड महिन्याची झाल्यावर शेतात जानेवारी महिन्यात दीड फुटावर एक रोप यापद्धतीने लागवड केली जाते. रोप लावताना लहानसा खड्डा करून त्यात गांडूळ खत भरून रोप लावले जाते. साधारणपणे 30 गुंठ्यांना 6000 रोपे लागली. रोपेनिर्मितीसाठी घरचेच बेणे, गांडूळ खत असते, त्यामुळे रोपे तयार करण्याचा खर्च अत्यंत कमी आहे. रोप लागवडीनंतर गरजेनुसार पाणी देत एक महिन्याने शेणखताची स्लरी देतो. पुढे दर 20 ते 25 दिवसांनी पाट पाण्याच्या बरोबरीने स्लरी दिली जाते. उसामध्ये पाचटाचे आच्छादन ठेवतो. हे पाचट शेतात सरीमध्ये कुजत राहते. भरणीच्या वेळी 500 किलो गांडूळ खत सरीतून देतो. रोप लावणीनंतर मका, पालेभाज्या, वांगी, मिरचीचे आंतरपीक घेतो, यामुळे घरापुरता भाजीपाला मिळतो; तसेच अतिरिक्त भाजीपाल्याच्या विक्रीतून चार महिन्यांत सरासरी चार ते पाच हजार रुपये मिळतात. शेताच्या बांधावर यशवंत गवताची लागवड केली आहे, त्यामुळे जनावरांसाठी वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झाली आहे.

पूर्वी मी रासायनिक खतांचा वापर करीत होतो, त्यामुळे खर्चात वाढ होत होती, उत्पादन मात्र 35 टनांच्या आसपास होते. गेल्या सहा वर्षांपासून मी रासायनिक खतांचा वापर करीत नाही. जास्तीत जास्त शेणखत, गांडूळ खत आणि शेणस्लरीचा वापर करतो. दरवर्षी शेणखत, गांडूळ खत आणि पाचटाच्या आच्छादनामुळे जमिनीचा पोत चांगला राहिला आहे. पाण्याच्या पाळ्या कमी लागतात. सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढले आहे. जमीन वाफसा स्थितीमध्ये राहते. उसाची चांगली वाढ आणि गोडी चांगली होते.

तीस गुंठ्यांतून मला लागणीचे 40 टन, खोडवा, निडवा आणि चौथ्या पिकाचे 35 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. जमिनीची सुपीकता टिकून ठेवल्याने उत्पादन चांगले मिळते; तसेच पुढच्या चार पिकांना मशागत, रोप लागवडीचा खर्च नाही. खोडव्याला तोडणी झाल्यानंतर आणि भरणीच्या वेळी एक टन गांडूळ खत देतो. त्याचबरोबरीने दर 20 दिवसांनी पाण्याबरोबरीने गोबरगॅसची स्लरी दिली जाते. पाचटाचे आच्छादन कायम असते. मशागत, रोपे निर्मिती, लागवड आणि व्यवस्थापनाचा सरासरी 15 हजार रुपये खर्च येतो. हिशेबात मी घरच्या तिघांची मजुरी धरली आहे. बाहेरचा मजूर शक्‍यतो वापरत नाही.


सेंद्रिय गूळ निर्मितीतून वाढविला नफा... गूळ निर्मितीबाबत श्री. मोळे म्हणाले, की साधारणपणे जानेवारी - फेब्रुवारीमध्ये उसाची तोड होते. 30 गुंठ्यांतून सरासरी 40 टन उत्पादन मिळते. गूळ निर्मितीसाठी पाच दिवस गुऱ्हाळ भाड्याने घेतो. गूळ निर्मिती करताना गुणवत्ता चांगली राहण्याची काटेकोर काळजी घेतो. सरासरी 40 टन उसापासून पाच टन गूळ निर्मिती होते. गुळाची चव आणि गुणवत्तेमुळे ग्राहक घरी येऊन गूळ घेऊन जातात. गुऱ्हाळ भाडे, ऊस आणि गूळ वाहतूक आणि गुळाचे पॅकिंग याचा सर्व खर्चसाधारणपणे 30 हजार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार एक किलोची ढेप तयार केली आहे. साधारणपणे 40 रुपये प्रति किलो या दराने गुळाची विक्री होते.

घरच्या लोकांची मजुरी धरून ऊस शेती आणि गूळ निर्मितीचा खर्च सरासरी 45 हजारांपर्यंत जातो. गुळाच्या विक्रीतून खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. घरातूनच गुळाची विक्री होत असल्याने रोख पैसे हाती येतात. एका महिन्याच्या आत सर्व गुळाची विक्री होते. कारखान्याला ऊस देण्यापेक्षा गूळ निर्मितीतून मला चांगला नफा मिळतो. या वर्षी शेतीचे सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेणार आहे. यासाठी गावातील 12 शेतकऱ्यांचा बलराम कृषी गट तयार केला आहे. नाबार्डच्या योजनेसाठी बॅंकेकडे आम्ही गटाचा प्रस्ताव दिला आहे. पुढील वर्षापासून गुळाची "ब्रॅण्ड नेम'ने विक्री करणार आहे. क्षेत्र कमी असले तरी आर्थिक नफा वाढविण्याचा आमचा प्रयत्न असतो. गूळ निर्मितीसाठी कोल्हापूर येथील शाहू गूळ उत्पादक संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असते.

गोमूत्र आणि गोवऱ्यांतूनही वाढविला नफा... गीर गाईच्या दुधाची विक्री, शेणापासून गांडूळ खत तयार करून श्री. मोळे थांबलेले नाहीत. त्यांनी गोमूत्र आणि गोवऱ्यांचीही विक्री सुरू केली आहे. याबाबत श्री. मोळे म्हणाले, की आपल्याकडे आयुर्वेदिक औषधोपचारामध्ये गोमूत्राचा वापर वाढतो आहे. हे लक्षात घेऊन मी सहा महिन्यांपासून गोमूत्र अर्क तयार करण्यास सुरवात केली. गोमूत्राचा अर्क तयार करण्यासाठी बडोदा येथून ऊर्ध्वपातनाचे यंत्र आणले. दररोज गीर गाईचे सात लिटर गोमूत्र गोळा करतो. हे गोमूत्र ऊर्ध्वपातन यंत्रात 12 तास उकळवतो. त्यापासून तीन लिटर गोमूत्र अर्क मिळतो. हा अर्क 500 मि.लि. बाटल्यांत भरून विक्री केली जाते. सध्या 100 रुपये प्रति लिटर या दराने अर्काची विक्री होते. गीर गाईच्या शेणापासून गोवऱ्या तयार करतो. कोल्हापूर आणि परिसरातील गावांत अग्निहोत्र आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी गोवऱ्यांना चांगली मागणी आहे. एक रुपयाला एक गोवरी अशी विक्री होते. गाईचे व्यवस्थापन, गोमूत्र अर्क निर्मिती, शेती व्यवस्थापनाबाबत मला कोल्हापुरातील जनभारती न्यासाचे शेखर धर्माधिकारी यांची मदत मिळते. कळे गावात माझे दुकान आहे. गाईपासून मिळणाऱ्या नफ्याचा विचार करता दर महिन्याला व्यवस्थापन खर्च वजा जाता दूध विक्रीतून सरासरी सात हजार रुपये, गोमूत्र विक्रीतून पाच हजार आणि गोवऱ्यांच्या विक्रीतून एक हजार रुपये मिळतात.

"ऍग्रोवन' ठरतोय मार्गदर्शक - दै. "ऍग्रोवन'च्या माध्यमातून जनावरांचे व्यवस्थापन, ऊस व्यवस्थापन तंत्र, गांडूळ खत निर्मिती, ऍझोला निर्मितीबाबत माहिती मिळाली. तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांशी संपर्क वाढला. या माहितीच्या आधारे शेती सुधारण्याचा माझा प्रयत्न असतो.

नामदेव आकाराम मोळे,
घरपण, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
संपर्क - 9271666943

ऍझोला निर्मिती कशी करावी? जनावरांसाठी खाद्य म्हणून वापराबाबत मार्गदर्शन.

गो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती : ऍझोला हे एक वनस्पतिजन्य पूरक खाद्य आहे. ही पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारी नेचा वर्गातील वनस्पती आहे. ही वनस्पती हवेतील नत्र शेवाळाच्या मदतीने शोषून घेऊन सहजीवन पद्धतीने वाढते.
यात 25 ते 35 टक्के प्रथिने असून ते पचनास हलके आहे. दहा ते 15 टक्के क्षार व आठ ते दहा टक्के ऍमिनो ऍसिड आहेत, तसेच जीवनसत्त्व अ, कॅरोटीन आणि कॅल्शिअम, झिंक यांसारखी खनिजे आहेत. तसेच ऍझोलाचा वापर नत्र स्थिर करणारे जैविक खत म्हणूनही होतो. नत्रयुक्त पदार्थ, कॅलरीज, क्षार आणि जीवनसत्त्वांच्या उणिवेमुळे जनावरांतील दुग्धोत्पादन क्षमता कमी होते. या उणिवा भरून काढण्यासाठी पशुखाद्य पूरकांचा उपयोग करणे आवश्‍यक आहे.
ऍझोलासंवर्धनासाठी अनबिना ऍझोला या जातीचे वाण उत्तम आहे. ऍझोला लागवडीसाठी तीन मीटर एक मीटर 0.2 मीटर या आकाराचा समपातळी खड्डा खोदावा. यामध्ये सिल्पोलीन प्रकारचा पॉलिथिन कागद अंथरावा. त्यानंतर कडांच्या बाजूने विटा लावाव्यात. सिमेंट कॉंक्रीटचा वापर करून पक्के वाफे तयार करता येतात. या प्रकारात प्लॅस्टिक पेपर न वापरता ऍझोला लागवड करता येते. या वाफ्याला एका बाजूला पाणी बाहेर काढण्यासाठी छिद्रे सोडावीत. वाफ्यातील लहान खडे काढून टाकावेत, त्यामुळे प्लॅस्टिक पेपर फाटणार नाही. ऍझोलासंवर्धन करताना पहिल्यांदा वाफ्यामध्ये 10 ते 15 किलो चाळलेल्या मातीचा समपातळी थर द्यावा. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गाईचे शेण 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट वाफ्यामध्ये सोडावे. ऍझोलाचे ताजे, बुरशी नसलेले बियाणे वापरावे. साधारणपणे एका वाफ्यासाठी 500 ग्रॅम ते एक किलो बियाणे पुरते. वाफ्यातील पाण्याची पातळी वरील बाजूस दोन ते तीन इंच वाफा रिकामा राहील अशी असावी.
ऍझोला निर्मितीसाठी ः 1) ऍझोलासंवर्धन शक्‍यतो झाडाच्या सावलीत किंवा कृत्रिम सावलीत करावे. 2) लागवडीसाठीच्या वाफ्यामध्ये चाळलेल्या मातीचा थर समप्रमाणात पसरून टाकावा. 3) 3 1 मीटर वाफ्यातून दररोज एक किलो ऍझोला काढून घ्यावा. 4) दर पाच दिवसांनी 20 ग्रॅम सुपरफॉस्फेट, एक किलो शेण, 20 ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून वाफ्यामध्ये मिसळावे. 5) ऍझोला काळा पडल्यास दहा ग्रॅम कार्बेन्डाझीम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 6) दहा दिवसांनी 30 ते 35 टक्के पाणी बदलून त्यात स्वच्छ पाणी ओतावे. 7) प्रत्येक महिन्याला खड्ड्यातील पाच किलो माती काढून नवीन चाळलेली माती त्यात टाकावी. 8) दर सहा महिन्याने वाफे रिकामे करून स्वच्छ धुऊन पुन्हा मिश्रण भरावे.
: जे. आर. देशमुख, 9422737089
: धनराज चौधरी, 9657963091
गो संशोधन व विकास प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर

केळी प्रक्रिया उद्योग फायद्याचा

केळीपासून गर, पावडर, प्युरी, वेफर्स, जॅम, टॉफी, केळी फीग इ. टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. यापासून शेतकरी आर्थिक लाभ मिळवू शकतात. पुढील लेखात आपण या प्रक्रिया पदार्थांची माहिती घेणार आहोत. प्रा. अमोल खापरे, डॉ. विजय तरडे
केळी गर/ पल्प (बनाना प्युरी) - केळीचा तयार केलेला गर अथवा साठवून ठेवलेला गर हा केळींपासून प्रक्रियायुक्त पदार्थ उदा. जॅम, टॉफी, पावडर वा बिस्कीट तयार करण्यासाठी वापरता येऊ शकतो. केळीपासून गर तयार करण्यासाठी चांगली पिकलेली केळी निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. साल काढून पल्परच्या साहाय्याने या केळींचा गर तयार करावा. तयार गर 80 अंश से. तापमानास 10 ते 15 मिनिटे पाश्‍चराईज करून थंड करावा. या गरात 0.5 टक्के पेक्‍टिनेझ एन्झाईम मिसळावे. दुसऱ्या दिवशी हा गर निर्जंतुक काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा.

केळी पावडर (पीठ) - केळी पावडरचा वापर आइस्क्रीम, बेबी फूड्‌स, बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी होतो. ही पावडर तयार करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर केला जातो.
पद्धत क्र. 1 - कच्ची केळी घेऊन त्यांची साल काढावी, त्यातील पांढऱ्या मगजाचे बारीक काप करून वाळवून घ्यावेत. वाळल्यानंतर ते काप ग्राइंडरमध्ये किंवा मिक्‍सरमध्ये बारीक करून त्यापासून पावडर तयार होते. केळीची साल काढल्यानंतर ती काळी पडतात, त्यामुळे प्रक्रियेसाठी स्टीलचेच साहित्य वापरावे व कापलेले काप पोटॅशिअम मेटाबायसल्फेटच्या द्रावणातून बुडवून काढून वाळवावेत.
पद्धत क्र. 2 - केळीचे पीठ तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीची पिकलेली केळी स्वच्छ पाण्याने धुऊन पल्परच्या साहाय्याने प्रथम गर तयार करावा. हा गर स्प्रे ड्रायरचा वापर करून त्यापासून पावडर तयार करावी.

केळी जॅम - केळीपासून जॅम तयार करताना त्यात कृत्रिम रंगाचा वापर करावा, जेणेकरून केळीपासून येणारा अनावश्‍यक काळा रंग जॅमला येणार नाही. जॅमसाठी प्रथम पूर्ण पिकलेल्या केळीची साले काढून त्यांचे बारीक काप करावेत अथवा केळीचा गर वापरावा. कापाच्या वजनाएवढीच साखर (1ः1) टाकावी. त्यात दोन टक्के सायट्रिक आम्ल टाकावे व मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. शिजवताना मिश्रण सतत ढवळावे, नाही तर करपट वास येतो.
शेवटी जॅम तयार झाला की नाही हे ओळखण्यासाठी मिश्रणाचा एक थेंब हॅंड रिफ्रॅक्‍टोमीटरवर टाकून त्याची रीडिंग 68.5 अंश ब्रीक्‍स (साखरेचे प्रमाण) आली आहे का हे पाहावे, अथवा मिश्रण दोन बोटांमध्ये धरून ओढले असता तार दिसते का हे बघावे. जॅम तयार झाल्यानंतर तो निर्जंतुक काचेच्या बाटल्यांत भरावा.

केळी बिस्कीट - केळीपिठात 30 टक्के मैदा घालून, त्यात गरजेप्रमाणे साखर, तूप, बेकिंग पावडर, दूध पावडर योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून त्यांची कणीक तयार करावी. ही कणीक बिस्किटांच्या साच्यात टाकून बेकिंग ओव्हनमध्ये 105 अंश सेल्सिअसवर 10-15 मिनिटांकरिता ठेवावी. केळीपासून बनविलेली ही बिस्किटे अतिशय चविष्ट व पौष्टिक असतात.

केळी टॉफी - केळीपासून टॉफी तयार करण्यासाठी प्रथम चांगली पिकलेली केळी निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांचे बारीक काप करावेत. कापांपासून गर तयार करून, एक किलो गरास एक किलो साखर, 20-25 ग्रॅम मक्‍याचे पीठ व 120 ग्रॅम वनस्पती तूप मिसळून ते मिश्रण चांगले शिजवावे. मिश्रण चांगले घट्ट व्हायला लागल्यानंतर त्यात दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. गॅसवरील मिश्रण चांगले घट्ट झाल्यानंतर (शिऱ्याप्रमाणे तयार झाल्यावर) ते तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून एकसारखे पसरावे व थंड होऊ द्यावे. त्यानंतर स्टीलच्या चाकूने योग्य त्या आकाराचे तुकडे करून ते टॉफी पेपरमध्ये पॅक करावेत.

केळी चिप्स - केळीच्या चिप्सला बाजारात चांगली मागणी आहे. केळीचे चिप्स तयार करण्यासाठी कच्ची फळे निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढावी. चिप्स बनविण्याच्या यंत्राच्या साहाय्याने एक ते दोन मि.मी. जाडीच्या गोल चकत्या कराव्यात. या चकत्या 0.6 टक्के पोटॅशिअम मेटाबायसल्फेटच्या द्रावणात 10-15 मिनिटांसाठी बुडवून ठेवल्यानंतर त्या गोडेतेलात किंवा वनस्पती तुपात तळाव्यात. जास्तीचे तेल काढून चिप्सवर दोन टक्के मीठ लावावे. चिप्सचा कुरकुरीतपणा कायम ठेवण्यासाठी ते लगेच पॉलिथिन पिशव्यांत भरावेत. चिप्स पॅक करताना प्रथम त्यातील सर्व हवा काढून त्यात नायट्रोजन वायू भरल्यास चिप्सला तेलाचा कुबट वास न येता ते दीर्घकाळ टिकतात.

केळी फीग (केळीचे सुके अंजीर) - चांगल्या प्रतीच्या, मध्यम पिकलेल्या केळींची साल काढून ती एक टक्का पोटॅशिअम मेटाबायस्फेटच्या द्रावणात 10-15 मिनिटांसाठी बुडवून ठेवावीत. त्यानंतर या केळींच्या 3.5 ते 4.5 मि.मी. जाडीच्या चकत्या करून त्या वाळवणी यंत्रामध्ये (ड्रायरमध्ये) 50-55 अंश सेल्सिअस तापमानास 24 तासांकरिता ठेवाव्यात. चांगल्या वाळल्यानंतर यापासून केळी फीग तयार होतील.

केळी ज्यूस - पिकलेल्या केळीगरात पेक्‍टोलायटिक एन्झाईम मिसळावे. दोन दिवसांनंतर गर गाळून घ्यावा किंवा सेंट्रिफ्युगल मशिनच्या साहाय्याने ज्यूस वेगळा करावा. हा ज्यूस अडीचपट पाणी घालून पातळ करावा. रसाचा ब्रीक्‍स 16 टक्के व आम्लता 03. टक्के ठेवावी. तयार ज्यूस 80 अंश से. तापमानास 15 ते 20 मिनिटे पाश्‍चराईज करून काचेच्या निर्जंतुक बाटल्यांत भरावा.

फोटो - केळी ज्यूस
संपर्क : 02162 - 265227
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

असा तयार करा प्रक्रिया उद्योगाचा प्रकल्प अहवाल

उद्योग सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवालात प्रस्तावित उद्योगासंबंधी सविस्तर माहिती समाविष्ट करावी. सदर उद्योग आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम ठरणार आहे, तसेच घेतलेले कर्ज कशाप्रकारे परत केले जाईल याबाबत वित्तसंस्थेला खात्री पटवून द्यावी. व्यावसायिकाने प्रकल्प अहवाल जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बॅंकेकडे किंवा वित्तसंस्थेकडे कर्ज मंजुरीसाठी सादर करावयाचा असतो. दिनेश क्षीरसागर, डॉ. दिनेश नांद्रे
प्रक्रिया उद्योग सुरू करण्याआधी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करावी लागते, त्यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या सरकारी बॅंका किंवा सहकारी वित्तसंस्थांकडून कर्ज घेणे क्रमप्राप्त ठरते. लघु उद्योगांकरिता सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत. वित्तसंस्थेकडून कर्ज मिळविण्यासाठी त्यांना प्रस्तावित उद्योगांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागतो. त्यास "प्रकल्प अहवाल' असे म्हणतात.

अ) उद्योगाची ओळख - उद्योगाची निश्‍चिती करताना प्रथम बाजारपेठेचे सर्व्हेक्षण करणे अत्यंत जरुरीचे असते. प्रस्तावित उद्योगाद्वारे कोणते प्रक्रिया पदार्थ तयार करण्यात येणार आहेत यासंबंधी माहिती द्यावी. हे पदार्थ जगात तसेच देशात कोठे आणि किती प्रमाणात तयार होतात, त्यांचे उत्पादन किती होते, विनियोग कसा होतो, तसेच आपल्या परिसरात सदर उद्योग उभारणे कसे गरजेचे आणि फायदेशीर राहील याबाबत खुलासा करावा. जे पदार्थ तयार करायचे प्रस्तावित आहे, त्यांच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती थोडक्‍यात नमूद करावी. कोणत्या अन्नधान्यावर तसेच फळे व भाज्यांवर प्रक्रिया करणार, प्रत्येकापासून कोणते प्रक्रिया पदार्थ तयार केले जाणार, त्यांची प्रक्रिया पद्धती, प्रमाणीकरण, प्रतनियंत्रण आणि पॅकेजिंग यासारख्या बाबी स्पष्ट कराव्यात. याचबरोबर संबंधित प्रक्रिया उद्योगाबाबत शासकीय धोरण, प्रचलित फायदे, उपलब्ध सवलती यांचा उल्लेख करावा. प्रस्तावित उद्योगाचे पंजीकरण (Registration) केले असल्यास त्याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. उद्योग स्वतः एकटे किंवा खासगी कंपनी स्थापन करून करणार असल्यास उद्योजक म्हणून आपली स्वतःची किंवा कंपनीच्या मुख्य प्रवर्तक संचालकाची वैयक्तिक माहिती समाविष्ट करावी. उद्योग सहकारी आहे वा खासगी, हे स्पष्ट करावे. खासगी उद्योग असेल तर तो अधिक प्रभावीपणे कसा चालेल याबाबत सविस्तर माहिती, तसेच प्रस्तावित खासगी उद्योग यशस्वी होण्याची खात्री करून द्यावी.

ब) उद्योगाचे ठिकाण व कार्यक्षेत्र - व्यवसायासाठी लागणारी जागा ही स्वतःच्या मालकीची असावी. जर दुसऱ्याच्या नावावर असेल, तर त्याबाबतचे संमतिपत्र प्रकल्प अहवालासोबत जोडावे. प्रस्तावित उद्योगाच्या ठिकाणाचा पत्ता नमूद करून सदर जागा मोठ्या शहरास रेल्वे, पक्के रस्ते यांनी कशी जोडलेली आहे हे नमूद करावे. उद्योगाची जागा मोठ्या शहरापासून शक्‍यतो जवळ आणि दळणवळणास सोयीची असावी. सदर ठिकाणाच्या सभोवतालच्या 75 ते 100 कि.मी. परिसरातील शेतीमाल (फळे, भाजीपाला व अन्नधान्य) प्रस्तावित प्रक्रिया उद्योगासाठी वापरला जाईल. काढणीनंतर हा माल कमीत कमी वेळ व खर्चात प्रक्रिया युनिटमध्ये पोचून त्यावर पुढील प्रक्रिया सुरू करणे कसे फायद्याचे आहे, याबाबत सविस्तर माहिती द्यावी.

क) कच्च्या मालाची उपलब्धता -प्रक्रिया युनिटच्या परिसराच्या हवामानाविषयी माहिती देऊन ते आवश्‍यक शेतीमालासाठी कसे उपयुक्त आहे याबाबत उल्लेख करावा. ज्या मालाची प्रक्रिया करावयाचे प्रस्तावित आहे; त्या प्रत्येक पिकाखालील परिसरातील लागवड क्षेत्र, जाती, एकूण उत्पादन, उत्पादक शेतकरी, त्यांचे सरासरी बाजारभाव, हमीभाव देऊन खरेदी होणार असेल तर नक्की केलेले बाजारभाव यांविषयी माहिती द्यावी. याशिवाय उद्योगासाठी लागणारी इतर संयंत्रे, संरक्षक रसायने, खाद्यरंग, पॅकिंग साहित्य, लेबल यांच्या उपलब्धतेविषयी उल्लेख करावा.

ड) प्रक्रिया उद्योगाची किंमत व आर्थिक उपलब्धता : प्रामुख्याने प्रकल्पास लागणारी जमीन, प्रकल्पाचे बांधकाम, प्रक्रिया व साठवणुकीसाठी लागणारी संयंत्रे, इतर साधने उदा. विजेचे साहित्य, जनरेटर, पाणीप्रक्रिया युनिट, फर्निचर, प्रयोगशाळेकरिता लागणारी उपकरणे व साहित्य, पंजीकरण, उद्योगास लागणारे तज्ज्ञ मार्गदर्शन, तसेच प्रकल्प चालविण्यास लागणारा दैनंदिन किंवा मासिक कच्चा माल, मजूर यांच्या खर्चाचा तपशील द्यावा. यावरून प्रकल्पाची एकूण किंमत काढावी. एकूण लागणाऱ्या किमतीपैकी किती कर्ज बॅंकेकडून घेणार आणि किती स्वतः किंवा भागभांडवलातून उभारणार याचा तपशील द्यावा. त्याचप्रमाणे दैनंदिन किंवा मासिक खर्चासाठी कशाप्रकारे तरतूद केली आहे, हे स्पष्ट करावे. प्रकल्पासाठी द्यावयाच्या कर्जासाठी तारणाची काय व्यवस्था आहे याचा उल्लेख करावा.

इ) आर्थिकदृष्ट्या उद्योग टिकण्याची व वाढण्याची शक्‍यता : यामध्ये उद्योग प्रत्यक्षात कधी सुरू होणार, उत्पादन क्षमता, युनिटच्या क्षमतेचा वापर, पक्‍क्‍या मालाच्या विक्रीची किंमत, एकूण विक्री, विक्रीसाठी येणारा खर्च, कच्च्या मालाची खरेदी किंमत, एकूण खरेदी, कर्जावरील व्याज, कर्जफेडीचा तपशील, वार्षिक नफा- तोटा पत्रक, अपेक्षित शिल्लक, मालाची विक्री करण्याची पद्धत आणि तपशील या बाबींचा समावेश करावा.

ई) इतर बाबींचा तपशील : यामध्ये प्रकल्पासाठी लागणारी वीज, ती कोठून मिळणार, वीज उपलब्ध नसल्यास पर्यायी जनरेटरची व्यवस्था तसेच त्याचा खर्च, पाण्याची उपलब्धता आणि त्याचा खर्च, सांडपाण्याची व्यवस्था आणि त्याचा खर्च, लागणारे मजूर तसेच त्यांचे पगार यासारख्या बाबींचा समावेश करावा.

निष्कर्ष - प्रस्तावित प्रक्रिया उद्योग कसा उपयोगी व आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे, त्याचे तांत्रिक तसेच आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे कसे केले आहे व तो निश्‍चितपणे कसा यशस्वी होण्याची शक्‍यता आहे याची ग्वाही द्यावी.

कृषी प्रक्रिया उद्योगासंबंधी प्रकल्प अहवालातील महत्त्वाच्या गोष्टी - - प्रस्तावित उद्योगाची सर्वसाधारण ओळख
- उद्योगाचे ठिकाण आणि कार्यक्षेत्र
- कच्च्या मालाची उपलब्धता
- प्रक्रिया उद्योगाची किंमत व आर्थिक उपलब्धता
- आर्थिकदृष्ट्या उद्योग टिकण्याची तसेच वाढण्याची शक्‍यता
- उद्योगासाठी लागणाऱ्या वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, मजूर यांचा तपशील.

थोडक्‍यात पण महत्त्वाचे.. 1) प्रकल्प अहवाल हा कृषी प्रक्रिया व्यवसायातील तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने तयार करावा. अशा तज्ज्ञ व्यक्तीस उत्पादन क्षमतेनुसार व्यवसायासाठी लागणारी इमारत, संसाधने, उत्पादन क्षमतेनुसार लागणारा कच्चा माल, उत्पादन क्षमता पूर्ण करण्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग, कुशल व अकुशल कामगार यांची परिपूर्ण माहिती असते, त्यामुळे प्रकल्प अहवाल तयार करताना चुका होणार नाहीत.
2) प्रकल्प अहवाल तयार केल्यामुळे आपणास उद्योगाचे प्रस्तावित स्वरूप ध्यानात येते. आपला उद्योग यशस्वी होण्यासाठी योग्य खबरदारी घेणे सोपे जाते.
3) व्यवसायासाठी इमारत अथवा शेड बांधताना हळूहळू उत्पादन क्षमता वाढल्यानंतर त्यामध्ये मशिनरींचा विस्तार करण्यास वाव असावा याची दक्षता घ्यावी. सुरवातीस कमीत कमी उत्पादनक्षमता गृहीत धरून हा व्यवसाय सुरू केल्यास नंतर हळूहळू विक्रीनुसार उत्पादन क्षमता वाढविता येते.
4) प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर व्यावसायिकाने हा प्रकल्प अहवाल जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बॅंकेकडे किंवा वित्तसंस्थेकडे कर्जमंजुरीसाठी सादर करावयाचा असतो.

संपर्क : 02189 - 233001
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

नारळ सोडण भुशापासून तयार करा कंपोस्ट, गांडूळ खत

नारळाच्या सोडणापासून काथ्याची निर्मिती केली जाते, त्या वेळी काथ्याबरोबरच जो भुसा वेगळा केला जातो, त्याला क्वायरपीथ किंवा कोको पीट असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे सोडणात 70 टक्के भुसा असतो. याचा उपयोग कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत तयार करण्यासाठी करता येतो. डॉ. दिलीप नागवेकर
नारळास फुलोरा येण्यास सुरवात झाल्यापासून नारळास दर महिन्याला एक पान आणि एक फुलोरा (पोय) येत असतो, हे त्याचे कार्य त्यांच्या अंतापर्यंत चालू राहते. पोयीत फळधारणा झाल्यापासून नारळ पक्व होण्यास 11 ते 12 महिन्यांचा कालावधी लागतो. ज्या वेळी नारळास अन्नद्रव्ये कमी जास्त होतात, त्यावेळी त्यांचा पोयीवर चांगला/वाईट परिणाम होत असतो. अन्नद्रव्ये कमी झाली तर पोय छोटी होते किंवा पोयीत फळांची गळ होऊन उत्पादन कमी होते. पोयीचा उगम ते पोय फुटणे हा कालावधी (गर्भधारण कालावधी) हा 32 ते 34 महिन्यांचा असतो. नारळास खताचे नियोजन करताना शेणखत, कंपोस्ट खत, नारळ झावळांचे गांडूळ खत, हिरवळीचे खत (धैंचा, ताग इ.) तसेच कुंपणाच्या कडेला गिरिपुष्प लागवड करून हिरवळीचे खत बागेत उपलब्ध करता येते. त्याचबरोबरीने आता नारळ सोडण्याच्या भुशापासून कंपोस्ट खत आणि गांडूळ खताची निर्मिती करता येते.

सोडणाचा भुसा - 1) अखंड पक्व नारळ वजनाच्या 35 ते 45 टक्के नारळ सोडण असते. नारळ पक्व होण्याच्या सुरवातीला सोडणाचे प्रमाण जास्त असते. तो जसजसा पक्व होत जातो तसतसे त्याचे सोडणाच्या वजनात घट होत असते.
2) नारळामध्ये फळात 50 ते 55 टक्के आणि 12 महिने वयाच्या पक्व फळात 35 ते 45 टक्के सोडण असते. नारळ पक्व होताना पाण्याचे प्रमाण घटते; परंतु सोडणाचे प्रमाण तेच राहात असते. या सोडणापासून काथ्याची निर्मिती केली जाते, त्या वेळी काथ्याबरोबरच जो भुसा वेगळा केला जातो, त्याला क्वायरपीथ किंवा कोको पीट म्हणतात.
3) सर्वसाधारणपणे सोडणात 70 टक्के भुसा असतो. याचा उपयोग खत म्हणून अगर माती सुस्थितीत ठेवणारा पदार्थ म्हणून केला जातो. यामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण कमी असते.
4) सोडणाचा भुसा हा सर्व प्रकारच्या जमिनीवर आच्छादन म्हणून वापरण्यासाठी उत्कृष्ट आहे. सोडणाचा भुसा वजनाच्या आठ पट पाणी धरून ठेवतो. यामध्ये अल्प प्रमाणात नत्र असते, तर मोठ्या प्रमाणात लिग्निन आणि फायटोटॉक्‍झिक पॉलिफिनॉल असतात.
5) हा भुसा अनेक वर्षे ऊन पावसात राहिल्यास त्यातील हानिकारक रसायने कमी होतात आणि ते शेतात वापरण्यास योग्य होते. ताज्या भुशाचे कर्बःनत्र गुणोत्तर हे 112ः1 असते. त्यामुळे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त सेंद्रिय किंवा रासायनिक पदार्थांचा वापर करणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारे सोडणाचा भुसा ताजा न वापरता त्याचे खत करून वापर करावे.

1) खत करण्याच्या पद्धती - अ) सोडण भुशापासून कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत -
1) ज्या ठिकाणी झाडांची सावली आहे अशी 5 मी. x 3 मी. जागेची निवड खतनिर्मितीसाठी करावी.
2) या जागेवर ऊन पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी छप्पर करावे.
3) खत तयार करण्यासाठी जमिनीवर 100 किलो सोडणाचा भुसा पसरावा.
4) सदर भुशावर 400 ग्रॅम अळंबी बी शिंपडावे.
5) त्यावर 100 किलो सोडणाचा भुसा पसरावा.
6) या थरावर एक किलो युरिया संपूर्ण सोडण्याच्या भुशावर पसरावा. परत 100 किलो सोडणाच्या भुशाचा थर व त्यावर 400 ग्रॅम अळंबी बी शिंपडावे. परत 100 किलो सोडण भुशाचा थर त्यावर 1 किलो युरिया पसरावा. असे एकावर एक थर द्यावेत.
7) यामुळे प्रत्येकी अळंबी बी आणि युरियाचे पाच थर होतील, तर भुशाचे 10 थर होतील. यासाठी 1000 किलो सोडण भुसा, पाच किलो युरिया आणि दोन किलो अळंबी बी लागेल.
8) योग्य प्रकारे ओलावा टिकविण्यासाठी दररोज त्यावर पाणी शिंपडून ते मिश्रण ओले ठेवावे.
9) अशाप्रकारे कंपोस्ट खत तयार होण्यास 25 दिवस लागतात.

) सोडण भुशापासून गांडूळ खत तयार करण्याची पद्धत - 1) सर्वप्रथम 1000 किलो सोडणाचा भुसा घेऊन त्यामध्ये 0.5 टक्का चुना आणि 0.5 टक्का रॉक फॉस्फेट मिसळावे.
2) असे हे मिश्रण तीन आठवडे तसेच ठेवावे आणि त्यामध्ये 50 टक्के ओलावा राहील असे पाहावे.
3) तीन आठवड्यांनंतर त्यामध्ये 10 टक्के शेणखत आणि 10 टक्के ताजे गांडूळ खत मिसळावे.
4) एकूण वजनाचे 20 टक्के पीडा काढलेल्या झावळा घ्याव्यात.
5) झावळ्या व वरील मिश्रणाचे एकावर एक थर द्यावेत.
6) प्रति टनास 1000 युड्रीलस जातीची गांडूळ सोडावेत.
7) जवळ जवळ दोन महिने या ढिगावर पाणी शिंपडत राहावे व ढीग ओलसर ठेवावेत. या कालावधीत गांडूळ खत तयार होईल.

कंपोस्ट आणि गांडूळ खताचे फायदे -1) याचा उत्तम खत म्हणून झाडांसाठी उपयोग होतो.
2) मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक आरोग्य सुधारते.
3) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
4) पिकाला द्यावयाच्या पाण्याच्या पाळ्यांतील अंतर कमी करता येते.
5) नैसर्गिक एन्झायम आणि फायटोहॉर्मोन्स यांची जमिनीत वाढ होते.
6) झाडांच्या मुळांची वाढ होऊन झाड सक्षम होते.
7) पिकांचे उत्पादनात वाढ होते.

संपर्क - डॉ.नागवेकर - 9421137769
(लेखक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी येथे कृषिविद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत.)

जिरवण नाला उभारणीतून देऊ या दुष्काळाला उत्तर

अवर्षणप्रवण क्षेत्रातून वहातळीच्या पावसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहून जात असते. या क्षेत्रातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे आता "जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्याचे काम सामुदायिक पद्धतीने हाती घेणे आवश्‍यक आहे. विजय जोगळेकर

योग्य पद्धतीचे नियोजन व व्यवस्थापन करून उपाय केले तर दुष्काळातही पाणी समस्या कमी करणे शक्‍य होईल. त्यासाठी आपल्या पावसाची, जमिनीची वैशिष्ट्ये, पाणी व जमीन यांचा संबंध, आपला पाणलोट विकास कार्यक्रम, पाणीप्रश्‍न सोडविण्याचा सोपा उपाय, पावसाची बदललेली प्रवृत्ती, नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे निकष या सर्व बाबींचा तपशीलवार विचार करावा लागणार आहे.

आपल्या पावसाची वैशिष्ट्ये - -आपल्याकडे सुमारे 150 वर्षांच्या पावसाचा तपशील आहे, त्यावरून आपल्या पावसाची वैशिष्ट्ये समजावून घेऊन त्यांचा वापर करता येईल. आपल्या पावसाची वैशिष्ट्ये अशी आहेत.
-पावसाळ्याचे 120 दिवस असतात, पैकी 50 ते 80 दिवसच पावसाचे असतात. एखाद्या क्षेत्रात जेवढे सेंटिमीटर पाऊस पडतो, तेवढे पावसाचे दिवस असतात. पाऊस- कोरडे दिवस असे चक्र पावसाळ्याच्या 120 दिवसांत सुरू राहते.
-पावसाचे सात वर्षांचे चक्र असते, पैकी तीन वर्षे कमी पावसाची, दोन वर्षे मध्यम पावसाची व दोन वर्षे अतिवृष्टीची असतात.
-कमी पाऊस व अति पाऊस यांत सरासरीपेक्षा 25 टक्‍क्‍यांपर्यंत कमी किंवा जास्त पावसाची नोंद होते.
-पडणाऱ्या पावसापैकी 50 टक्के पाऊस रिमझिम स्वरूपाचा व 50 टक्के जमिनीवरून पाणी वाहणारा असतो. ताशी अर्धा सें.मी. वेगाने पाऊस पडला तर पाणी जमिनीवरून उताराकडे वाहू लागते.
-50 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात 25 सें.मी. पाऊस वहातळीचा असतो, म्हणजे एकरी दहा लाख लिटर पाणी जिरवण्यासाठी उपलब्ध होते. ते अडवून जिरविले नाही, तर जमिनीवरून वाहून निघून जाते. हे पाणी जिरविले तर आपला प्रश्‍न सुटू शकतो.

आपल्या जमिनीची वैशिष्ट्ये - पाणी जमिनीत जिरविण्यासाठी जमिनीची वैशिष्ट्ये समजावून घेणे जरुरीचे आहे.
अवर्षणप्रवण क्षेत्रात जमीन खोल आहे, त्यामुळे या जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता चांगली आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील काळ्या जमिनी 15-20 टक्के फुगणाऱ्या व त्यामुळे पाणी जिरण्यास प्रतिबंध करणाऱ्या आहेत, त्यामुळे विशेष रचना केल्याशिवाय येथे पावसाचे पाणी जमिनीत जिरू शकत नाही. मुरमाड जमिनीत पाणी मुरू शकते; मात्र अनेक ठिकाणी मुरमाड जमिनी काळ्या मातीच्या खाली आहेत. यासाठी जमिनीवरून नव्हे तर कडेने पाणी जमिनीच्या आत जाईल अशी व्यवस्था सर्व ठिकाणी करणे आवश्‍यक आहे.

पाणी- जमीन यांचा संबंध व पाणलोट विकास कार्यक्रम - -आपल्या पाणलोट विकास कार्यक्रमात माथा ते पायथा असा विचार झाला; मात्र सपाट माळावरील वाहणारे पाणी जिरविण्याचा फारसा विचार झाला नाही. हे सपाटीचे क्षेत्र फार मोठे आहे, त्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रातून वहातळीच्या पावसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहून जाताना आढळते.
-वहातळीच्या पावसाचे पाणी जमिनीत साठवू शकलो, तर वार्षिक 50 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात आपण 25 सें.मी. म्हणजे दहा लाख लिटर पाणी प्रति एकर दरवर्षी जमिनीत साठवू शकू.
-एक सेंटिमीटर रिमझिम पाऊस जमिनीचा पाच सें.मी. भाग भिजवू शकतो. सलग दोन- तीन दिवस पडणाऱ्या रिमझिम पावसाने, तसेच पाणलोट विकास कार्यक्रमातील प्रचलित एक फूट खोलीच्या चरांमुळे जमिनीचा कमाल एक मीटर खोलीपर्यंतचा भाग भिजू शकतो. त्यानंतर खंडित पावसाच्या दोन- तीन दिवसांतील ऊन व वाऱ्याच्या प्रभावाने पाणी केशाकर्षणाने वर येऊन बाष्पीभवनाने निघून जाते, त्यामुळे जमिनीत पाणी साठविण्यासाठी रिमझिम पाऊस किंवा एक फूट खोलीच्या चराचा फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आहे.

पाणीप्रश्‍न सोडविण्याचा सोपा उपाय - -आपला पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी वहातळीच्या पावसाचे सर्व पाणी आपल्या जमिनीत खोलवर जिरविता आले पाहिजे.
-प्रत्येक माळावर किंवा शेतजमिनीवर पावसाचे पाणी वाहून नेणारे लहान- मोठे नाले नैसर्गिकरीत्या तयार झालेले असतात. पावसाचे वाहणारे पाणी सर्व बाजूने त्या नाल्यांत येऊन त्या क्षेत्राच्या बाहेर निघून जात असते. हे पाणी जमिनीत जिरवले नाही, तर उन्हाळ्यात पाणीप्रश्‍न तयार होतो.
-या "पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे' आपण "पाणी जिरविणाऱ्या नाल्यांत' रूपांतर करायला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक नाला रुंद व खोल करायचा. उताराचे प्रमाण लक्षात घेऊन नाल्यात ठराविक अंतरावर पाच ते दहा मीटर रुंदीची माती तशीच ठेवायची. त्याच्या उताराच्या बाजूला आधार म्हणून 50 सें.मी. रुंदीचा दगड, सिमेंट, रेतीचा बांध घालायचा. जादा असलेले पाणी त्या दगड, सिमेंट, रेतीच्या बांधावरून पुढील खड्ड्यात जाईल, अशा प्रकारे खड्डे व दगड, सिमेंट, रेती बांध यांची मालिका करून सर्व नाला खोदून व बांधून काढायचा. याला "पाणी जिरवण नाला' असे म्हणता येईल.
-शिरपूर (जि. धुळे) येथे तालुक्‍यातील 35 गावांत असे "पाणी जिरवण नाले' तयार केले आहेत, त्यामुळे परिसरातील गावे बारमाही बागायतीची झाली आहेत. जमिनीतील पाणीपातळी 150-200 मीटर खोलीवरून 10-12 मीटरवर आली आहे. या क्षेत्रात केवळ 50 सें.मी. पाऊस पडतो. शिरपूर तालुक्‍याला भेट देऊन कोणीही या जिरवण नाल्यांचा अभ्यास करू शकतो. या कामासाठी प्रति हेक्‍टरी एकदाच तीन हजार रुपये खर्च आला आहे (धरणे बांधून कालव्याने पाणी शेतीपर्यंत पोचविण्यासाठी हेक्‍टरी तीन ते चार लाख रुपये खर्च येतो).
-जिरवण नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात वहातळीचा पाऊस झाल्यावर हे पाणी स्वाभाविक नाल्यात येते. तेथे थांबून राहून जिरते. वाहतळीच्या पावसामुळे हेक्‍टरी केवळ दहा सें.मी. पाणी नाल्यात आले तरी ते दहा लाख लिटर होते आणि सर्वच्या सर्व जमिनीत जिरते, त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी हळूहळू वर येते.
वार्षिक 50 ते 60 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात बागायतदारांना आवश्‍यक पाण्यासाठी आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाण्याची जरुरी नाही. जंगलांमुळे पाणी मुरविण्याचे जे काम होते ते आपल्या पाणलोट क्षेत्रात जिरवण तलावामुळे होईल.

नाला रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे निकष - नाले कित्येक वर्षे त्यांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी वाहून नेत आहेत. या काळात या क्षेत्रात काही वेळा अतिवृष्टी होऊन ते पाणी नाल्यांतून वाहून गेलेले असते. असे जास्तीत जास्त किती पाणी नाल्यातून वाहून गेले हे नाल्याच्या आकारावरून कळते, कारण असे जोरदार वाहून जाणारे पाणी नाल्याच्या दोन्ही बाजू व तळ घासून काढते. याच्या 15 ते 18 पट पाणी साठेल अशाप्रकारे नाला खोल व रुंद करावा लागत असतो. अशा प्रकारचा जोरदार पाऊस 15 ते 20 मिनिटेच पडतो. एक एकरावर एक सें.मी. वहातळीचे पाणी पडले तर ते 40 हजार लिटर होते. एका वेळी जास्तीत जास्त दोन सें.मी. पाऊस पडेल असे गृहीत धरून पाणलोट क्षेत्र मोजावे. त्यावरून नाल्यात किती पाणी साठविले पाहिजे हे कळू शकते; परंतु नाल्याच्या आकाराच्या 15-18 पट पाणी साठविण्याचा निकष हिशेबाला सोपा आहे.

अतिवृष्टीच्या 15 ते 18 पट पाणी साठविण्यासाठी नाल्याच्या रुंदीच्या सहापट रुंदी वरच्या बाजूस ठेवावयाची व तळात तीनपट रुंदी ठेवावयाची. म्हणजे माती ढासळत नाही. नाल्याच्या खोलीच्या चार पट इतकी या खड्ड्याची खोली करावयाची. असे केल्याने 18 पट पाणी साठवणक्षमता तयार होते.
नाल्यात एवढ्या खोलीनंतर दोन्ही बाजूच्या काठांच्या भिंतीत अनेक ठिकाणी पाणी जिरण्याच्या जागा उपलब्ध होतात. साठलेले पाणी त्या भेगांतून जमिनीत मुरते. जमिनीत उताराच्या दिशेने काळ्या दगडांपर्यंत जाऊन प्रति घनमीटर मातीत सुमारे 200 लिटर या प्रमाणात साठते. कालांतराने जोरदार वहातळीच्या पावसाच्या वेळी या जिरवण नाल्यातील खड्डे भरतात. हे पाणी जमिनीतच जाते. अशाप्रकारे चार ते पाच वेळा हे नाले भरून पाणी जिरले तर जमिनीत ठिकठिकाणी पाणी उपलब्ध होऊ लागते. या जिरलेल्या पाण्यातील पाणी उपसून काढले जात नाही, त्याचा जमिनीत साठा राहतो. ज्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो (सात वर्षांत अशी किमान दोन वर्षे असतात), त्या वर्षी हा साठा आणखी वाढतो. शिरपूर येथे गेल्या पाच वर्षांत 40 ते 50 सें.मी. प्रमाणात वार्षिक पाऊस पडला आहे. तेथे "नाला रुंदीकरण आणि खोलीकरण' केलेल्या 35 गावांत 10 ते 15 मीटर खोलीवर पाणी उपलब्ध आहे.

पावसाची बदललेली प्रवृत्ती पावसाची प्रवृत्ती बदलली असल्याचे यंदा तरी प्रकर्षाने जाणवले. खरीप पिकांना उपयोगी पडणारा पाऊस फारसा झाला नाही; परंतु अवर्षणप्रवण क्षेत्रात पडणारा वहातळीचा पाऊस (जो नेहमी 24-27 सें.मी. इतका पडतो) मात्र दरवर्षीइतकाच ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात पडला. या क्षेत्रातील नाले अजूनही "जिरवण नाले' झाले नसल्याने हे सर्व पाणी या क्षेत्राच्या बाहेर निघून गेले आहे. "जिरवण नाले' असते तर इतका कमी पाऊस पडूनसुद्धा पाण्याची जमिनीतील पातळी वाढली असती, त्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे आता "जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेणे आवश्‍यक आहे. या नाल्यांचे "जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्यासाठी हे नाले रुंद व खोल करावे लागतील. नाल्यांच्या परिसरात पडणारे सर्व पाणी या खड्ड्यांतून साचून राहून ते जमिनीत जिरावे, पाणलोट क्षेत्राच्या बाहेर निघून जाऊ नये इतकी साठवण क्षमता तयार करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी नाला रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे काही निकष आहेत.
( लेखक जलव्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ आहेत)

संवेदनशील अवस्थेत द्या पिकांना पाणी

दुष्काळी परिस्थितीत पिकांचे नियोजन खालीलप्रकारे करून आपले उत्पादन वाढविण्यासाठी व वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. एस. बी. पवार
1) रब्बी ज्वारी 1) पीक उगवणीनंतर 8-10 दिवसांनी पहिली विरळणी करून त्यानंतर 8-10 दिवसांनी दुसरी विरळणी करावी. हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य ठेवावी (हेक्‍टरी 1.20 ते 1.35 लाख झाडे).
2) कोरडवाहू ज्वारीस पेरणीनंतर 3, 5 व 8 आठवड्यांनी एकूण तीन कोळपण्या द्याव्यात. आवश्‍यकतेनुसार एक ते दोन निंदण्या केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडणार नाहीत, जमिनीतील ओलावा टिकून राहील, तसेच तणाचा बंदोबस्त होईल.
3) रब्बी हंगामात जमिनीतील जवळपास 60 ते 70 टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे कमी होतो. जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकविण्यासाठी शेतातील काढलेले तण, पालापाचोळा, गव्हाची काडे, तूर काटके इ. चा वापर ज्वारी पेरल्यापासून 50 दिवसांच्या आत आच्छादन म्हणून करावा.
4) शक्‍य झाल्यास कमकुवत झाडे काढावीत.
5) संरक्षित पाणी व्यवस्थापन करावे. एकाच पाण्याची सोय असल्यास पीक 35-40 दिवसांचे असताना किंवा पीक पोटऱ्यात असताना पाणी द्यावे.
6) पाणी मोकाट पद्धतीने न देता पट्‌टा पद्धतीने द्यावे.

2) करडई 1) पीक उगवणीनंतर 25-30 दिवसांनी विरळणी करून दोन रोपांतील अंतर 20 से.मी. ठेवावे.
2) पीक उगवणीनंतर 25 - 30 आणि 45-50 दिवसांनी दोन निंदण्या व कोळपण्या कराव्यात.
3) पाणी सोड ओळ पद्धतीने किंवा रुंद वरंबा पद्धतीद्वारे द्यावे.
4) सोड ओळ पद्धतीने पिकाच्या दोन ओळींनंतर एक ओळ पेरणी न करता सोडून द्यावी. सोडलेल्या ओळीतून सरी पाडून त्या सरीद्वारे पिकास पाणी द्यावे.
5) सुरवातीच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करावा.
6) पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (पीक फुलावर येते वेळेस व बोंडात करडई भरण्याची) पाणी द्यावे.

3) गहू 1) गव्हाची एकेरी पेरणी करावी.
2) वेळेवर आंतरमशागतीमुळे तणाचा नायनाट होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
3) पेरणीनंतर 30-40 दिवसांच्या आत गरजेप्रमाणे एक-दोन वेळा खुरपणी करावी.
4) आच्छादनाचा वापर करावा.
5) कमी प्रमाणात ओलिताची सोय असेल तर पाण्याच्या पाळ्यांचे खालील प्रमाणे नियोजन करावे.

अ.क्र.--ओलिताची उपलब्धता --- पाण्याची पाळी देण्याची वेळ (पेरणीनंतरचे दिवस)
1.-- एक ओलिताची सोय ---- 42
2. -- दोन ओलिताची सोय-- 21, 65
3. -- तीन ओलिताची सोय-- 21, 42, 65

6) पाणी देण्यासाठी पिकास तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.

4) हरभरा 1) तीन आठवड्यांच्या आत पिकास एक कोळपणी व खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
2) जिरायती क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असतो आणि एखादे पाणी देणे शक्‍य असल्यास पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
3) जिरायती हरभऱ्यासाठी पीक फुलावर येण्यापूर्वी एक टक्का पोटॅशिअम नायट्रेट किंवा दोन टक्के युरियाची फवारणी करावी. त्यानंतर दुसरी 15 दिवसांनी फवारणी करावी.
4) तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.

5) ऊस 1) हलक्‍या ते मध्यम जमिनीत पाणी लवकर मुरते व जास्त पाणी दिल्यास बहुतांशी पाणी निचऱ्याद्वारे वाया जाते अशा जमिनीत सर्वसाधारण पाच हेक्‍टर सें.मी.पर्यंत पाणी द्यावे व दोन पाळ्यांतील अंतर कमी करावे.
2) पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एकावेळी एकच सरीत पाणी न देता दोन ते तीन सऱ्यांमध्ये तो सारख्या प्रमाणात विभागून द्यावा.
3) पाणी नेहमी एक आड एक सरीमध्ये द्यावे.
4) पट्‌टा पद्धतीने व जोडओळ पद्धतीने उसाची लागवड करावी.
5) हेक्‍टरी 8-10 टन उसाचे पाचट किंवा शेतातील पालापाचोळा अथवा पॉलिथिन शीटचा वापर करावा.
6) अति अवर्षण काळात पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन (10 टक्के) बाष्पीभवन विरोधी द्रावणाचे 10-12 दिवसांच्या अंतराने दोन-तीन फवारण्या कराव्यात.
7) पिकांच्या बुंध्याकडील वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत व त्याचा आच्छादनासाठी वापर करावा.
8) तणांचा बंदोबस्त करावा.
9) उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार असेल तर अगोदर नोव्हेंबरपासूनच प्रत्येक पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे व शक्‍य तेथे आंतरमशागत करावी. पिकाला सिंगल सुपर फॉस्फेटचा 25 टक्के हप्ता अधिक द्यावा.

आपत्कालीन परिस्थितीतील ऊस व्यवस्थापन - ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे, अशा ठिकाणी उसाला पाणी देताना एक आड एक सरीतून द्यावे.
- पाण्याच्या ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली, तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
- ठिबक अथवा तुषार सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
- को-86032, कोएम-0265, को-740, कोव्हीएसआय-9805 या जाती इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी या जातीचीच लागवड करावी.
- पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी (दिवसांनी) दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
- ऊस पीक तणविरहित ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन ऊसवाढीसाठी उपयुक्त ठरेल.
शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्‍टरी सहा टन पाचटाचे आच्छादन करून प्रतिटन पाचटासाठी आठ किलो युरिया, दहा किलो सुपर फॉस्फेट व एक किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
- ऊस लागवड करताना ऊस रोपांचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची कमतरता भासली तरी रोपे तग धरून राहतील.
- खतांची शिफारशीत मात्रा देऊन 25 टक्के पालाश खत अधिक द्यावे. पालाश वनस्पतीच्या पर्णरंध्राची उघडझाप करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवले जाते, तसेच मुक्त ----प्रोलीनचे प्रमाण वाढविण्यास मदत करते, त्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते.
- लोह, जस्त, मंगल आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर दोन महिन्यांनी आणि दुसरी फवारणी तीन महिन्यांनी द्यावी.
- सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते, पीक अवर्षणास तोंड देते.
उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत पाण्याची प्रत्येक पाळी दोन-तीन दिवसांनी वाढवत न्यावी. त्यामुळे पिकाची पाण्याची ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढत जाते.
- उसाची लागण करताना बेणे दोन तास चुनखडीच्या पूर्ण विद्राव्य स्वरूपातील द्रावणात बुडवून मगच लावावे.

पाण्याच्या ताणाचे उसावरील परिणाम - पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.
- मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळांद्वारे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊन प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते.
- पूर्ववाढ व जोमदार वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कांड्याची लांबी व उसाची जाडी कमी होऊन वजनात घट येते.
उसातील तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचे प्रमाण वाढते.
- सुरू आणि खोडवा उसात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन तोडणीच्या वेळी गाळण्यालायक ऊस संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते.
- पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्याची लांबी व जाडी कमी होते. उत्पादनात लक्षणीय घट होते. आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, कारण या काळात हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो.

हंगामनिहाय आपत्कालीन व्यवस्थापन सुरू हंगाम -
सुरू हंगाम लागवड सर्वत्रच सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन लागवडीच्या वेळी वरील प्रमाणे काळजी घ्यावी. त्यात पट्टा पद्धत, सहनशील जातींची निवड, रोपे किंवा बेणेप्रक्रिया, सेंद्रिय खताचा योग्य प्रकारे वापर करावा.

खोडवा -
राज्यात खोडव्याखाली 35 ते 40 टक्के क्षेत्र आहे. खोडवा उसासाठी आच्छादनासाठी पाचट उपलब्ध असते. त्याचा वापर केला पाहिजे. अन्य व्यवस्थापन वरीलप्रकारे करावे.

संपर्क - डॉ. सु. बा. पवार, 9422178982
(लेखक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे विस्तार कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत.)

दुष्कातही द्राक्ष बाग हिरवी टवटवीत...

एकीकडे सर्वांत कमी पाऊस पडलेला जालना जिल्हा दुष्काळाशी तोंड देत आहे. तर दुसरीकडे शहरापासून पंधरा किलोमीटरवरील कडवंची (जि. जालना) गावात द्राक्ष बागा, शेडनेटमधील ढोबळी मिरची, डाळिंब ही पिके दिमाखाने उभी आहेत. गावाने एकजुटीतून काही वर्षांपूर्वी यशस्वी केलेल्या पाणलोटाच्या कामांचे हे द्योतक आहे. आजमितीला गावात कमी पाण्यातही शेतकऱ्यांनी शेती हिरवीगार ठेवली आहे. याच गावातील तरुण शेतकरी संदीप क्षीरसागर यांनी द्राक्ष वेलीला निम्मे पाणी कमी करून नऊ एकर बाग यशस्वी केली. ओलावा टिकण्यासाठी तागाचे, प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन, मोजून-मापून पाणी देण्याचे तंत्र वापरले, त्यांचे व्यवस्थापन खरोखर वाखाणण्याजोगे आहे. अमोल बिरारी
कडवंची हे जालना-सिंदखेडराजा रोडवर गोदावरी-पूर्णा खोऱ्यामध्ये वसलेले गाव. जिल्ह्यात यंदा सर्वांत कमी पाऊस झाल्याने सगळीकडे भकास उजाड शेती दिसते. गावच्या हद्दीत प्रवेश केल्याबरोबर हे चित्र एकदम पालटते. द्राक्षाच्या हिरव्यागार बागा, पाण्याने भरलेली शेततळी, शेडनेटमधील ढोबळी मिरची पाहून दुष्काळातील हे चित्र आहे यावर विश्‍वास बसत नाही. पावसाळ्यात या गावात केवळ 198 मि.मी. पाऊस पडूनही दुष्काळाची छायाही गावावर दिसत नाही. गावाने 1995-2000 मध्ये पाणलोट अंतर्गत शेतात बांधबंदिस्तीची कामे केल्याचा हा परिणाम आहे. हिरवीगार शेते पाहून ही किमया लक्षात येते. गावात आज दोनशेहून अधिक शेततळी असून त्यात पाणी उपलब्ध आहे, शिवाय विहिरींनाही थोडेफार पाणी असल्याने येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते.

क्षीरसागर यांची शेती दृष्टिक्षेपात - एकूण क्षेत्र - 25 एकर
द्राक्षपीक - सहा एकर सोनाका, तास ए गणेश दीड एकर,
थॉमसन दीड एकर.
भगवा डाळिंब - साडेचार एकर (अठरा महिन्यांची बाग)
पपई- अडीच एकर, काही क्षेत्रावर ज्वारी घेतली जाते.
पाण्याचा स्रोत - चार विहिरी, 75 लाख लिटर क्षमतेचे शेततळे
ठिबकद्वारे पिकांना पाणीपुरवठा केला जातो.

गावातील संदीप व विनोद क्षीरसागर हे भाऊ एकत्रित शेती करतात. वडील प्रभाकर पारंपरिक शेती करायचे. संदीपने दहावी झाल्यानंतर शेती करायला घेतली, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरू लागले. अकरा वर्षांपूर्वी दोन एकरांत सोनाका जातीची द्राक्ष बाग लावली. ठिबकचे नियोजन केले. सन 2007 मध्ये चार एकरांत बाग वाढविली. आज एकूण नऊ एकरांवर द्राक्ष बाग आहे. व्यावसायिक दृष्टीने शेतीचे नियोजन असल्याने दोघे भाऊ शेतीतून किमान लाखाची कमाई करीत आहेत.

शेततळ्यातील पाण्याचा हिशेब - सन 2005 मध्ये शासकीय योजनेतून क्षीरसागर यांनी 75 लाख लिटर क्षमतेचे शेततळे केले. यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी या तळ्यात पाच लाख लिटर पाणी शिल्लक होते. दोन विहिरी ओढ्यालगत असल्याने कमी पाऊस पडूनही ओढ्याला थोडेफार पाणी गेल्याने त्याचा फायदा विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास झाला. या विहिरींतून पाणी शेततळ्यात टाकले. बांधबंदिस्तीतून मृद्‌संधारण झाल्याने जमिनीत पाणी मुरून पाण्याची पातळी अजूनही बऱ्यापैकी असून विहिरीला पाणी आहे. सध्या शेततळ्यात 70 लाख लिटर पाणी उपलब्ध आहे. हे पाणी जुलैपर्यंत पुरविण्याचे संदीप यांचे नियोजन असून शेतातील एकूण फळझाडांची संख्या लक्षात घेऊन यापुढे प्रति झाड आठ लिटर पाणी मिळेल अशी व्यवस्था आहे.

बागेला पाणी देण्याचे गणित - संदीप म्हणाले, की ऑगस्ट 2012 मध्ये पाण्यासंदर्भात गावकऱ्याबरोबर तज्ज्ञांनी चर्चा केली. बागायतदारांनी बागेला पाणी देण्यात 50 टक्के पाणी कपात करावी असा निर्णय झाला. पूर्वी 30-40 लिटर प्रति दिवस प्रति वेल दिले जाणारे पाणी 20 लिटरवर आणले. द्राक्ष पिकाची परिस्थिती चांगली राहिली. यातून समजले की कमी पाण्यातही हे पीक यशस्वी करता येऊ शकते. पाऊसही कमी झाला होता. पावसाळ्यात पाऊस सुरू असल्याने बागेला फारसे पाणी द्यावे लागत नव्हते, परंतु ऑक्‍टोबर छाटणीनंतर पाणी देणे महत्त्वाचे होते. उपलब्ध पाण्यात द्राक्ष उत्पादन घ्यायचे असल्याने छाटणीपासूनच काटकसरीने पाणी देणे सुरू केले. मागील वर्षीच्या तुलनेत प्रति वेल दररोज 16 लिटर पाणी देऊनही मण्यांची फुगवण चांगली झाली. माल काढणीपर्यंत असेच नियोजन ठेवले. फुगवणीच्या अवस्थेत मोकळे पाणी देता आले नाही. तरीही अडचण आली नाही. कमी पाण्यावरही बागेची अवस्था चांगली राहिली. येथून पुढे प्रति वेल आठ लिटर पाणी देण्याचे नियोजन ठेवले आहे.

आच्छादनावर भर - पाण्याचा काटेकोर वापर व ओलावा टिकून राहावा म्हणून गावातील जवळपास सर्वच बागांमध्ये बोदावर आच्छादन केले आहे. संदीप त्याला अपवाद नव्हते. केवळ सेंद्रिय आच्छादन म्हणून बारा एकरात ताग पेरला. त्यामुळे ओलावा टिकून राहिलाच शिवाय तो हळूहळू कुजून जमिनीत विघटन झाल्याने जमिनीला सेंद्रिय घटकही मिळाले. द्राक्षाच्या एका प्लॉटमध्ये प्लॅस्टिक पेपरचे मल्चिंग आहे.

शेतीत असे ठेवले नियोजन - ठिबक सिंचनाच्या वापरातून मोजून-मापून पाणी
- ओलावा टिकण्यासाठी बोदावर तागाचे आच्छादन
- शेतीकामासाठी ट्रॅक्‍टर, रोटाव्हेटर, एचटीपी स्प्रेअरचा वापर
- गोबरगॅसमधून निघणाऱ्या स्लरीचा बागेसाठी वापर
- पूर्ण क्षमतेने विद्राव्य खते मिळण्यासाठी फर्टिगेशन

संदीप यांनी सर्व क्षेत्रावर ठिबक केले आहे. सेंद्रिय खतात गोबरगॅसची स्लरी बागेला दिली जाते. रासायनिक खते देताना एकरी दहा टन शेणखत दिले. बागेत डाऊनी, भुरी, फुलकिडे आदी किडी-रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने नियंत्रणासाठी फवारणीचे नियोजन केले. यात एक टक्का बोर्डो पेस्ट, इमिडाक्‍लोप्रीड, मॅन्कोझेब, कार्बेन्डाझिम, सेक्‍टीन, कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड यांची गरजेनुसार व आलटून-पालटून फवारणी केली.
फुलोरा अवस्थेत दोन दिवसाआड एक अशी "जीए'ची तीन वेळा फवारणी घेतली.

मार्गदर्शक तज्ज्ञ - राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सावंत, डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. एस. डी. रामटेके यांचे "ऍग्रोवन'मधील लेख व सल्ला यांतून मार्गदर्शन मिळते. खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पंडित वासरे हे सुद्धा नियमित मार्गदर्शन
करतात.

क्षीरसागर बंधूंकडून शिकण्यासारखे - - उपलब्ध पाण्याचा विनियोग करणे
- कमी पाण्यातही शेती करण्याचे कसब
- पाण्याचा थेंब न्‌ थेंब वाचविणे
- ओलावा टिकविण्यासाठी आच्छादन
- शास्त्रज्ञांशी सतत संपर्क
- शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे

जमा-खर्च थोडक्‍यात - -द्राक्ष बागेसाठी दरवर्षी एकरी सरासरी एक लाख रुपये खर्च येतो.
-चालूवर्षी आतापर्यंत सव्वा एकरातून सोनाका जातीचे 215 क्विंटल उत्पादन मिळाले.
-इतर क्षेत्रातून आणखी 80 टन माल अपेक्षित. आगाप छाटलेल्या बागेतील मालाला प्रति किलो 40 रुपये दर मिळाला, त्या वेळी बाजारात फारसा माल नसल्याने स्पर्धा नसते, परंतु आता बाजारात आवक वाढल्याने प्रति किलो 35 रुपये दर मिळत आहे. चंद्रपूर, बल्लारशा येथील व्यापारी जागेवर मालाची खरेदी करतात.

मागील तीन वर्षांची सरासरी -
एकरी उत्पादन - सरासरी 15 टन
दर - प्रति किलो सरासरी तीस रुपये
एकरी खर्च - एक लाख रुपये
एकरी निव्वळ उत्पन्न - चार लाख रुपये
गेल्या वर्षी आठ एकरांत एकरी दहा टन उत्पादन मिळाले. प्रति किलो चाळीस रुपये दर मिळाला.

सांडपाण्याचाही पुनर्वापर - संदीप यांनी पाण्याची बिकट परिस्थिती पाहूनच सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे. याचे उदाहरण म्हणजे घरातील सर्व सांडपाणी एकत्र करून छोट्या खड्ड्यात साठविले आहे. खड्ड्याला प्लॅस्टिक पेपरने आच्छादित करून हे पाणी त्यात सोडले आहे. या पाण्याचे "रिसायकलिंग' करून त्याचा पुनर्वापर केले जाणार आहे.

गोबरगॅसद्वारे ऊर्जा - संदीप यांचे घर शेतात असून घराजवळ गोठा आहे. थोड्या अंतरावर गोबरगॅस यंत्रणा आहे. पाइपलाइनच्या आधारे गॅसचा वापर करून घरातील सदस्यांचा स्वयंपाक होतो. गोबरगॅसमधून निघणाऱ्या स्लरीचा उपयोग शेतीसाठी होतो.

समस्यांवर मात - बागेतील कामांसाठी मजुरांची समस्या भेडसावते. यंदा पाऊस कमी झाल्याने इतर भागात मजुरांना कामे कमी असल्याने मजूर उपलब्ध झाले. द्राक्ष पिकात आगाप प्लॉटमध्ये डाऊनी, फुलकिडे, घडकूज, घड जिरणे, पाण्याची अडचण, ऑक्‍टोबर छाटणीनंतर पाऊस झाल्यास भुरी येणे या समस्या जाणवतात. त्यावर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिल्याने फवारणी वेळेत करणे शक्‍य होते, असे संदीप म्हणाले.

बाजारपेठेतील दराच्या चढ-उताराबाबत त्यांनी सांगितले, की व्यापारी प्रत्यक्ष जागेवर येऊन खरेदी करतात. काही माल स्थानिक बाजारात पाठविला जातो. सन 2010 मध्ये दरात घसरण होऊन दर प्रति किलो 23 ते 25 रुपयांपर्यंत आले. त्यानंतर दोन वर्षांपासून दर 30 ते 40 रुपयांदरम्यान स्थिर आहेत.

""उपलब्ध पाणी 15 जुलैपर्यंत कसे पुरेल याचे नियोजन करत आहे. पुढच्या वर्षीचे माहिती नाही, परंतु या वर्षी बाग जगली पाहिजे.''
- संदीप क्षीरसागर

संपर्क - संदीप क्षीरसागर, 9765116090

Saturday, 9 February 2013

उसासाठी फवारा सिंचन पद्धती…

उसामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी रेनगनचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. या पद्धतीमध्ये पाणी व्यवस्थापन करताना ३२ ते ५५ मीटर अंतरावर शेतामध्ये ऍल्युमिनिअम किंवा एचडीपीई पाइपवर रेनगन (फवारा नोझल) बसवून हवेतून पाणी दाबाने फवारले जाते. या पद्धतीमुळे प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते आणि २५ ते ४० टक्के उत्पादनात वाढ होते.
उस
सुरू उसाची सिंचनाची गरज १६००
मिलिमीटर पाणी असताना पारंपरिक, सिंचन
पद्धतीने २५०० ते २७०० मिलिमीटर पाणी दिले जाते. फवारा सिंचन पद्धतीत पाणी हवेतून फवारून दिल्यामुळे सरीमधील पाचट कुजण्याची प्रक्रिया लवकर होते.
फवारा संच निवड
सिंचनासाठी उपलब्ध पाणी, मातीचा प्रकार, जमिनीची खोली, शक्‍य असेल तर जमिनीचा कंटूर नकाशा व जमिनीची कमीत कमी पाणी शोषणक्षमता, उपलब्ध ओलावा धरून ठेवण्याची क्षमता इ. माहिती मिळवावी. विहिरीतील सिंचनासाठी उपलब्ध पाणी मोजण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात पंपाचा पाणी प्रवाह दर (डिसचार्ज) मोजावा. आपल्याकडे उपलब्ध असणारा २०० लिटरचा ऑइलचा किंवा बॅरल घेऊन त्यामध्ये डिलिव्हरी पाइपला बांगडी पाइप जोडून २० लिटरचा ड्रम भरण्यास किती वेळ लागतो ते मनगटी घड्याळाने मोजावे. समजा २०० लिटरचा ड्रम भरण्यास ५० सेकंद लागले, तर पंपाचा डिसचार्ज लिटर प्रति सेकंद म्हणजे दर ताशी १४,४०० लिटर पाणी उपलब्ध असेल, जर उन्हाळ्यात पंप पाच तास चालत असेल, तर पाण्याची रोजची कमीत कमी उपलब्धता ७२,००० लिटर असेल. जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या उसाची मे महिन्यातील पाण्याची गरज जर आठ मिलिमीटर असेल आणि सिंचनाची कार्यक्षमता ८० टक्के गृहीत धरली तर एक हेक्‍टर क्षेत्रासाठी उसाची पाण्याची गरज खालीलप्रमाणे काढता येते :
उसाला पाण्याची गरज काढण्याचे सूत्र
पाण्याची गरज (लिटर) = ८ ु १०,००० / ०.८० = १,००,००० लिटर येते.
उपलब्ध पाण्यात ७२,०००/१,००,००० म्हणजे ०.७२ हेक्‍टर किंवा ७२ आर उसाच्या क्षेत्राची लागवड करता येईल.
उसासाठी  फवारा संच
उसासाठी फवारा संच
…अशी करा रेनगनची निवड
उसासाठी सध्या रेनगन फवारा संच वापरणे शेतकरी पसंत करतात. रेनगन फवारा संचामधील नोझलची निवड करताना त्याचे आकारमान (१२ ु ८, १४ ु ८, १६ ु ८, २० ु ८ मिलिमीटर), तो चालविण्यास आवश्‍यक प्रेशर (२, ३, ४ कि.ग्रॅ./ चौ.सें.मी.), भिजणारे क्षेत्र (२००० ते ४००० चौ. मी. जवळजवळ अर्धा ते एक एकर), पाण्याच्या झोताची लांबी (२२ ते ४० मीटर) आणि त्यानुसार दोन नोझलमधील व दोन लॅटरल पाइपमधील अंतर (३२ ते ५५ मीटर) ठरविता येते. यामध्ये एक रेनगनचा पाणी प्रवाहाचा दर १८० पासून ६०० लिटर प्रति मिनीट असतो, त्यानुसार पंपाच्या उपलब्ध पाणी प्रवाह दरानुसार एकावेळी किती रेनगन चालू शकतील ते ठरवावे लागते; तसेच जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा दर मातीच्या मूलभूत पाणीशोषण दरापेक्षा कमी असणारा आराखडा आणि नोझल निवडणे आवश्‍यक असते. त्यामुळे जमिनीवरून पाणी वाहून जात नाही, तसेच जमिनीवरील खतेदेखील वाहून जाऊ शकत नाहीत. हलकी, मध्यम व भारी जमिनीसाठी हा दर अनुक्रमे चार ते सहा, आठ ते १५ व २० ते ५० मिलिमीटर प्रति तास असतो. त्यापेक्षा कमी दराने पाणी फवारणारा संच निवडणे आवश्‍यक असते.
सिंचनाच्या पाण्याच्या प्रतीचा जमीन आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे, त्यामुळे समस्यायुक्त जमिनींच्या क्षेत्रात वाढ होऊन, शेतीच्या शाश्‍वत उत्पादकतेस धोका उत्पन्न झाला आहे. यासाठी पाण्याची प्रत आणि हे पाणी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचे आरोग्य यांची वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे झाले आहे.
पिकांच्या उत्तम वाढीसाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याची गरज असते. सिंचनाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास पिकांची एकंदरीत वाढ चांगली होत नाही. निचरा कमी असलेल्या जमिनीला थोडे जास्त प्रमाणात पाणी दिले तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरात एकवटतात. अशा अयोग्य पाण्याचा सतत वापर केल्यास ते क्षार विरघळतात, त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून कालांतराने पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते. पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करणे हितावह ठरते.
पाणी चवीस खारवट किंवा मचूळ वाटत असल्यास, पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास, पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास, जमीन चोपण, चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास आणि जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास सिंचनाच्या पाण्याची तपासणी करून घ्यावी.
परीक्षणासाठी पाण्याचा नमुना -
निरनिराळ्या सिंचन साधनांमधून घेतलेला पाण्याचा नमुना प्रातिनिधिक असावयास पाहिजे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगले ढवळून घ्यावे. विहिरीवर पंप बसविलेला असेल तर तो साधारणपणे १५ ते २० मिनिटे सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावे. काचेची किंवा प्लॅस्टिकची बाटली स्वच्छ धुऊन घ्यावी आणि त्यामध्ये साधारणतः एक लिटर पाणी भरावे. कूपनलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या साह्याने लहान बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घ्यावा. त्या बाटलीवर शेतकऱ्यांचे नाव व पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्‍यात पाण्याबाबत शेतकऱ्यांचे अनुभव लिहिलेले लेबल बाटलीला चिकटवून प्रयोगशाळेत त्वरित पाठवावा.
क्षारयुक्त पाणी -
सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरल्यानंतर पिके काही पाणी शोषून घेतात. काही जमिनीतील खालच्या थरात जाते आणि जास्तीत जास्त पाण्याचे बाष्पीभवन होते; परंतु पाण्यातील विद्राव्य क्षार जमिनीत शोषले जाऊन त्यांचे प्रमाण वाढत जाते. शेवटी क्षारांचे प्रमाण खूप वाढून जमीन क्षारयुक्त बनते. याचा परिणाम कालांतराने पिकांवर दिसून येतो. पिकांची वाढ खुंटते, बियाण्याची उगवण कमी किंवा उशिरा होते. पिकांच्या तंतुमय मुळांची टोके मरतात व त्याचा अनिष्ट परिणाम पिकांवर दिसून येतो. जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते. क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळे उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होणे, क्‍लोराईड्‌स आणि सल्फेट्‌स यांचे प्रमाण वाढणे इत्यादी विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. पिके पाण्याची आणि अन्नद्रव्याचे शोषण करू शकत नाहीत.
क्षारयुक्त व विम्ल पाण्याचे व्यवस्थापन -
क्षारवट पाणी ओलितासाठी वापरावयाचे असल्यास ते सहजासहजी जमिनीच्या परिणामकारक खोलीमधून काढून टाकणे आवश्‍यक असते. वालुकामय पोयटा व जाड पोयट्याच्या जमिनीत क्षारवट पाण्याचे काहीही दुष्परिणाम न होता सिंचनासाठी वापरले जाऊ शकते; परंतु हे पाणी चिकणमातीच्या जमिनीत वापरल्यास जमिनी क्षारवट व चोपण होतात. जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी देण्यापेक्षा फवारा पद्धतीने सिंचन केल्यास जमिनीमध्ये कमी प्रमाणात क्षार साचतात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून अशा पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो आणि जमिनी खारवट, चोपण होण्यापासून वाचविता येतात.
सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण -
प्रयोगशाळेमध्ये पाण्याचे परीक्षण करताना आम्ल-विम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्‍लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम या घटकांचे प्रमाण काढण्यात येते. शेती सिंचनासाठी पाण्याची प्रत ठरविताना पाण्याचा आम्ल-विम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, शोषित सोडिअम गुणोत्तर, क्‍लोराईड व बोरॉनचे प्रमाण, तसेच उर्वरित सोडिअम कार्बोनेटवरून वर्गवारी करून हे पाणी ओलितासाठी योग्य किंवा अयोग्य हे ठरविण्यात येते. पाण्यात विरघळणाऱ्या क्षारांच्या प्रमाणाचा विद्युतवाहकतेवर परिणाम होत असल्यामुळे पाण्याची विद्युतवाहकता मोजून क्षारांचे प्रमाण ठरवितात. विद्युतवाहकता जितकी जास्त तितके क्षारांचे प्रमाण जास्त असते. पाण्याच्या पृथक्करण अहवालावरून पाण्याची विद्युतवाहकता व अधिशोषित सोडिअम गुणोत्तराचा एकत्रित वापर करून पाण्याच्या वर्गीकरणानुसार पाण्याची प्रत ठरवून सिंचनासाठी शिफारस करण्यात येते.