Saturday, 30 March 2013

पशुधनास "पहाटची पेंडी' सुरू करा

"पहाटची पेंडी' ही फार पूर्वी असणारी पशुपालनातील बाब आता जवळपास बंदच झाली आहे. उन्हाळा आणि दुष्काळ यांची तीव्रता कमी करण्यासाठी "पहाटेची पेंडी' उपयोगी ठरून पशुधनाचे आरोग्य प्रतिकूल परिस्थितीत अबाधित ठेवता येऊ शकेल.
...
जनावरे चांगल्याप्रकारे कशी सांभाळावीत याचे ज्ञान भारतीय संस्कृतीत पूर्वापार आहेच. मध्यंतरीच्या काळात गोशेतीपेक्षा जास्त पैसा इतर व्यवसायात मिळविता येतो, याची काही अपवादात्मक उदाहरणे समोर आल्यामुळे पशुपालनाकडे दुर्लक्ष होत गेले. सुधारित व्यवस्थापन म्हणून पुन्हा शाश्‍वत विचार होऊ लागल्याने पूर्वीच्या सगळ्या पद्धती, रीती, सवयी पुन्हा अवलंबणे क्रमप्राप्त ठरत आहे.

पहाटे वैरण टाकणे म्हणजे पहाटेची पेंडी, सुमारे चार - साडेचार वाजता पेंडी टाकल्यास म्हणजे आतासारखी कुट्टी दिल्यास पुढे तासाभरात जनावरे चारा खाऊन संपवतात आणि रवंथ सुरू करतात. सूर्योदयास निवांत बसून रवंथ करणारी जनावरे तासाभरानंतर मुक्त गोठ्यात हिंडू फिरू शकतात आणि पुढे नऊ-दहानंतर सकाळी थंड सावलीचा आधार घेत विश्रांती सुरू करतात.

उन्हाळ्यात जनावरे दुपारी चरावयास सोडू नयेत, ही बाब सांगण्याची नाही. मात्र सर्रास उन्हात दिसणारी जनावरे आणि प्रामुख्याने म्हशी उन्हात असतात हेच खरे. अल्प उत्पादक, गावठी वांझ जनावरांकडे दुर्लक्ष होते आणि त्याचा प्रतिबंध करणेही अशक्‍य दिसून येते. एकही जनावर उन्हाळ्यात सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत उन्हात जाणारच नाही याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.

वातावरणातील उष्णता आणि शरीरातील उष्णता वेगवेगळ्या अवस्थेत निर्माण होण्यासाठी काही उपाय करता येतात. उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान कमी करता येणे शक्‍य नसते. मात्र जनावरांच्या शरीरातील उष्णता दिवसाऐवजी रात्रीच निर्माण होईल, असे उपाय योजता येतात. पहाटेची पेंडी अशा दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते.
चारा खाल्ल्यानंतर साधारणपणे चार तासांत शरीरात उष्णता निर्माण होते, हा नियम समजल्यास किमान उन्हाळ्यात सकाळी पाचनंतर कोणताही चारा न दिलेला चांगला. यामुळे दिवस जसजसा मध्यान्हीकडे जाईल, तेव्हा शरीरात उष्णता निर्माण न होणारी जनावरे वातावरणातील उष्णता म्हणजे एकच ताण सहन करून प्रकृतिस्वास्थ्य टिकवू शकतील. पुढे दुपारी तीनपर्यंत संपूर्ण सावली मिळाल्यानंतर दुपारची पेंडी सुरू केल्यास सूर्यास्तानंतरच जनावरांच्या शरीरात उष्णता निर्माण होईल.

महत्त्वाची बाब अशी, की दिवसाकाठी लागणारा चारा भूक कमी होते म्हणून टाकतानाही कमी करणे अजिबात अपेक्षित नसते. प्रमाण कमी न करता फक्त वेळा बदलणे, चाराकुट्टीबाबत लक्षात घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा, कमी पोषण, बाह्य उष्णतेचा ताण यामुळे जनावरे अशक्त बनून उत्पादन, शरीरवजन आणि प्रकृतिस्वास्थ्यात घसरण दाखवितात. दिवसा चारा कमी आणि त्याची पूर्तता सायंकाळी व रात्री करता येते.

पाणी हा घटक शरीरक्रियेसाठी महत्त्वाचा असल्याने दिवसभर उपलब्धता आणि गरजेएवढी पूर्तता होणे आवश्‍यक असते. दिवसा पाणी जास्त लागते, जनावरे तहानलेली असतात आणि शरीर तापमान नियंत्रणात पाण्याची मदत होते. तेव्हा पाण्यासाठी दिवसा रोध न लावता किंवा चाऱ्याचा नियम न अवलंबता सतत उपलब्धता ठेवावी. शक्‍यतो, निर्जंतुक, थंड, वासरहित पाणी पुरविण्याची दक्षता घ्यावी.

चारापेंडी उपलब्ध असण्याची शक्‍यता उन्हाळ्यात कमी असते, तेव्हा असणारे गव्हाचे काड, सोयाबीन कुटार, तूर भुसकट अशा कमी पोषणमूल्यांच्या बाबी युरिया प्रक्रिया करून वापराव्या लागतात. फळांच्या साली, फळांच्या गराचा चोथा, मका बीरहित कणसे आणि ऊसचोथा थोड्या प्रमाणात उपयोगात आणता येतो. पशुआहाराचा महत्त्वाचा नियम असा, की उपलब्धतेचा विचार सोडून कोणतीही वनस्पतिजन्य बाब तेहतीस टक्के प्रमाणापेक्षा जास्त नसावी. म्हणजे किमान तीन विविध प्रकारचा चारा, घटक पुरविल्यास दुष्परिणाम दिसून येत नाहीत.
राज्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने उसाची कुट्टी, वाडे, पाने, चोथा अशा विविध बाबींचा वापर उन्हाळ्यात करता येतो. उसाचा चारा म्हणून वापर पोषणयुक्त आणि ऊर्जायुक्त ठरतो. मात्र वाडे, चोथा यात आहार घटक अतिशय कमी असल्याने आणि उसाची पाने "ऑक्‍झेलेट' प्रमाण वाढवत असल्याने एकूण चारा प्रमाणात पंधरा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक टाकू नयेत. वाळलेला आणि प्रसंगी जळलेला ऊस चारा म्हणून वापरू नये. उसाबरोबर चुन्याची एक टक्का निवळी हमखास वापरावी.

जनावरांचे कोठीपोट म्हणजे कोठी किंवा भांडारच. अशा गोदामात संपूर्ण पौष्टिक चारा गरजेचा नसतो. मात्र पोट भरणे गरजेचे असते. पोटाची भूक प्रमाणात शांत करण्यासाठी म्हणजे "ढेकर' निर्माण होण्यास झाडपाला, अपारंपरिक चारा, पाणवनस्पती यांचा उपयोग होतो. तमिळनाडू राज्यात गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) झाडे लावण्याचा मोठा प्रयत्न झाला आहे.
चारा नियोजन असल्याशिवाय जनावरे सांभाळणे धोक्‍याचे ठरते. जनावरांची संख्या आणि त्यांना लागणारा चारा याचे सहामाही नियोजन किमान चार महिने उन्हाळा आणि पहिले दोन महिने पावसाळा यासाठी दरवर्षी असावे लागते. मात्र दूध व्यावसायिकांची जनावरे छावणी दिसून येताना नियोजनाचा अभाव कळू शकतो. दुष्काळी भागासाठी "चारा दान' मोहीम सुरू आहे. तेव्हा मिळणारा चारा काटकसरीने आणि कुट्टी करूनच वापरला जाण्याची खात्री महत्त्वाची ठरते.
"दै. ऍग्रोवन'च्या स्थापनेपासून मूरघासविषयक माहिती सातत्याने प्रकाशित करण्यात आली आहे. परदेशात कडबापेंडी साठवत नाहीत, तर केवळ मूरघास कुट्टीच साठवली जाते. मूरघास चळवळ राज्यात चाऱ्यासाठी आज एक टक्का प्रमाणातही नसल्याने होणारे, झालेले आणि शिफारस प्रयत्न व्यर्थ ठरतात. नवीन अनुभव पाठीशी बांधताना यंदाचा दुष्काळ "मूरघास' संकल्पना किमान दूध व्यावसायिकांना पक्की खूणगाठ बांधेल ही अपेक्षा.

शेतकरी, पशुपालक यांच्याकडील दोन-चार जनावरे चार-पाच वर्षांत कधीतरी येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत संपणार नाहीत, याची दक्षता राज्यातील सर्वांनी घेण्यासाठी पुन्हा पाणलोट, चारा नियोजन, वृक्षसंवर्धन, पर्यावरण रक्षण याकडे शाश्‍वत दृष्टीने पाहून जुन्या संकल्पना गांभीर्याने अवलंबासाठी पुनरुज्जीवित करण्यात सहभागी व्हावे.

9422657251
(लेखक परभणी येथील पशुवैद्यक महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

Friday, 29 March 2013

डाळिंबाची बाग बहरली मांडवावरी


मांडवावर बहरलेली ही आहे डाळिंबाची बाग. द्राक्ष बाग काढून टाकल्यानंतर मांडवावर द्राक्षांप्रमाणं डाळिंबाचं उत्पादन घेण्याचा जगातला पहिलाच अभिनव प्रयोग राजीव माने या प्रयोगशील शेतकऱ्यानं यशस्वी केलाय. प्रचलित पद्धतीत एकरी 300 रोपांची लागवड केली जाते, पण या महाशयानं एकरात पाचपट रोपांची लागवड म्हणजे 1500 रोपांची लागवड करून भरघोस उत्पन्न देणारी डाळिंबाची बाग उभी केलीय. विशेष म्हणजे, ही बाग त्यांनी सेंद्रीय पध्दतीनं फुलवलीय.


 


सोलापूर जिल्ह्यातील कासेगावच्या (ता. पंढरपूर) राजीव नामदेव माने यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाला चांगलंच यश मिळालंय. द्राक्षांची जुनी बाग काढून त्यातच डाळिंबाची लागवड करून मांडवाचा वापर त्यांनी आधार देण्यासाठी केलाय. सध्या मांडव पध्दतीनं केलेली ही डाळिंबाची बाग फुलांनी बहरलीय. या पध्दतीमुळं झाडांच्या संख्येत वाढ होऊन उत्पादनातही प्रचलित पध्दतीपेक्षा जबरदस्त वाढ झालीय.

Dalimb1मांडव उभारणी
डाळिंबासाठी मांडव उभारण्यासाठी एकरी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. ही सुरुवातीची गुंतवणूक असते. यानंतर वर्षानुवर्षं आपल्याला डाळिंबाचं उत्पादन घेता येतं. नवीन पध्दतीनं द्राक्षाप्रमाणं मांडवावर केलेल्या या डाळिंब प्रयोगाला चांगलंच यश मिळालं. या झाडांना माल भरपूर लागला. इतर डाळिंब उत्पादकांनाही हा प्रयोग दिशा देण्याचं काम करीत आहे. उत्पादन खर्च कमी करून झाडांची संख्या वाढवण्याचा सल्ला माने इतर शेतकऱ्यांना देतात.

उत्पादन वाढलं
मांडव पध्दतीनं डाळिंब लागवडीचे फायदे अनेक आहेत. मांडवावर तारांना डाळिंबाच्या फांद्या वेलीसारख्या बांधता येतात. यामुळं फांदीला आणि फळांना चांगला आधार मिळतो. झाडाची फांदी मोडत नाही. जास्त फळं फांदीला राखता येतात. फळांची संख्या वाढल्यानं उत्पादनात वाढ होते. फळांचा आकार आणि एकूणच गुणवत्ता यामध्ये समानता राहते. मांडव पध्दतीत एकरी 1500 झाडांचं योग्य व्यवस्थापन शक्य होतं. या पध्दतीत सेंद्रीय औषध फवारणीही सोपी जाते. सर्व फांद्या आणि फळांवर स्प्रे चांगला बसतो. झाडांची तसंच फळांची संख्या वाढल्यानं उत्पादनात प्रचलित पध्दतीपेक्षा तिपटीनं वाढ होते.

रासायनिक खतांना सुट्टी
कीड आणि रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकाचा वापर केला. रासायनिक खतांना फाटा देऊन तंबाखू अर्क, गोमूत्र, दशपर्णी अर्क, मोड आलेली कडधान्यं, नीम ऑईल यांचा वापर केला. यामुळं तेल्या आणि मर रोगापासून बाग मुक्त झालीय. गांडुळांमुळं जमिनीची मशागत 8 फुटांपर्यंत झाली. प्रचंड संख्येनं प्लॉटमध्ये गांडुळं असल्यानं जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून राहिला आहे. शिवाय फळं दिसायला आणि चवीलाही उत्तम आहेत. पाहताक्षणी हा फरक लक्षात येतो. येथील दर्जेदार भगवा डाळिंब खरेदीसाठी राज्यातून तसंच राज्याबाहेरील व्यापारीही थेट त्यांच्या शेतावर पोहोचले आहेत.

कारभारणीची साथ
मजुरांच्या बरोबरीनं त्यांच्या पत्नी प्रेमा काम करतात. सर्व कामाचं नियोजन आणि देखभाल यात त्या जातीनं लक्ष देतात. या नावीन्यपूर्ण डाळिंब शेतीमध्ये त्यांना कारभारणीची मोलाची साथ मिळत असल्याचं ते आवर्जून सांगतात. सध्या त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येतात. या यशस्वी प्रयोगानंतर आता झिगझॅग पध्दतीनं डाळिंब लागवडीचा प्लॅन त्यांनी आखलाय.

तर तुम्हाला बघायचाय हा नावीन्यपूर्ण प्रयोग
संपर्क - राजीव नामदेव माने, प्रयोगशील शेतकरी, कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
मोबाईल नं. 09766280509

लागवड, उत्पादन व मार्केटिंग तंत्रDalimb
 • एकरी 1500 झाडं
 • झाडातील अंतर- 5X6 फुटाचं अंतर
 • व्हरायटी- भगवा डाळिंब
 • सेंद्रीय पध्दतीचा वापर
 • एकही रसायन वापरलं नाही
 • तणांचा आच्छादन म्हणून वापर केला
 • पांढऱ्या मुळांची संख्या वाढली
 • आच्छादनामुळं 50 टक्के पाण्याची बचत

असा आहे फळांचा बहार
 • फुलकळी भरपूर लागली
 • मादी कळ्यांची संख्या जास्त
 • खर्च फक्त एकरी 10 ते 15 हजार रुपये
 • एका फळाचं वजन सरासरी 250 ग्रॅमपर्यंत
 • दर्जेदार चकचकीत फळं
 • एका झाडाला लगडली 70-80 फळं
 • एका झाडाला जवळजवळ 20 किलोचा माल
 • एकरी 1500 झाडांपासून मिळाले 30 टनाचं उत्पादन
 • किलोला जागेवर 75-80 रुपयांचा दर

डाळिंब रोपांची नर्सरी
 • भगवा व्हरायटी
 • सेंद्रीय पध्दतीनं तयार केलेली रोपं
 • सध्या 1 लाख रोपं उपलब्ध
 • मर आणि तेल्या रोगमुक्त रोपं
 • महिला मजुरांना रोजगार

इंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख

एखादा चांगला इंजिनीयर नोकरी-व्यवसायातून वर्षाकाठी सहा ते सात लाख सहज मिळवतो. पण गोंदिया जिल्ह्यातल्या चुटिया गावातील ऑटोमोबाईल इंजिनीयरनं व्यवसाय म्हणून शेतीची निवड केली आणि दोन महिन्यात आठ लाखांचं पॅकेज कमावण्याची किमयाही केली. ऋषी टेंभरे या युवकानं आपल्या चार एकर शेतीतून पंधरा दिवसांत काकडीचं ३०० क्विंटल उत्पादन घेतलंय आणि शेतीकडं युवा वर्ग आकर्षित होत नाही, या म्हणण्याला फाटा दिलाय. प्रामुख्यानं धानाची शेती करणाऱ्या गोंदियात त्यानं पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर काकडीचं उत्पादन घेत तिथल्या शेतकऱ्यांना वेगळा आदर्शच घालून दिला.
 
kakadi 1

निर्णय शेती करण्याचा...
ऑटोमोबाईल डिप्लोमा केलेल्या ऋषीनं अभियांत्रिकीचं क्षेत्र न निवडता आपला वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. भरघोस नफा देणारं फिल्ड हे शेतीच आहे, यावर त्याचं ठाम मत होतं. वडिलोपार्जित चार एकर शेतीत त्याची घरची मंडळी पारंपरिक पद्धतीनं धानाची शेती करीत. मात्र आपला डिप्लोमा पूर्ण केल्यावर या शेतीची सगळी सूत्रं त्यानं आपल्या हातात घेतली आणि १२-१२-१२ या तारखेचा योग साधत आपल्या शेतात निन्जा कंपनीच्या काकडीची लागवड केली.

अशी केली काकडी लागवड
लागवड करण्यापूर्वी त्यानं संपूर्ण जमीन प्रथम नांगरून घेतली. नंतर आपल्या शेतात सात बाय सात अंतरावर पाटे तयार केले. याच पाट्यांवर त्यानं काकडीची लागवड केली. साधारण काकडी पिकाची तीन बाय चार अंतरावर लागवड करण्यात येते. मात्र काकडीबरोबरच पुढं पपईचं आंतरपीक घ्यायचं ठरवल्यामुळं त्यानं एवढं अंतर अगोदरच ठेवलं. यात त्यानं काकडीच्या बियाणांची लागवड केली. या पिकासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता केवळ सेंद्रीय खतांचा वापर केला. त्याचसोबत पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रामध्ये ठिबक सिंचनाची सोय केली. डिसेंबर महिन्यात लावलेल्या या काकडीच्या रोपांनी सध्या पीक देण्यास सुरुवात केली आहे.


kakadi photo 1एका तोड्यातून १५ ते २० क्विंटल उत्पादन

दर दिवसाला वेगवेगळ्या प्लाण्टमधून काकडीचा तोड केला जातो. ऋषीला एका तोड्यातून १५ ते २० क्विंटलचं उत्पादन मिळतं. काकडीचं पीक साडेतीन ते चार महिन्यांचं असतं. एकदा लागवड केली की, दीड महिन्यानंतर उत्पादनास सुरुवात होते. आतापर्यंत या प्लाण्टमधून ३० टन काकडीचं उत्पादन त्यानं घेतलं आहे.

योग्य नियोजन आणि खर्च
काकडीच्या पिकाच्या लागवडीकरता ऋषीला एकरी पन्नास हजाराचा खर्च आला. काकडीला कीड लागू नये म्हणून बऱ्याच प्रकारच्या फवारणी कराव्या लागतात. शिवाय दिवसातून तीन वेळा पाणीसुद्धा द्यावं लागतं. काकडीवर पोट्याश, मॅग्नेशियम सल्फेट, १३०४५, ०५२३४, ००५०, कॅल्शियम नायट्रेटसारखी खतं द्यावी लागतात, असं ऋषी टेंभरे म्हणाला. आज एकरी दोन लाखांचा फायदा या साडेतीन महिन्यांच्या काळात तो घेतोय. या नफ्यातून लागवड खर्च वगळता त्याला दीड लाखांचा निव्वळ नफा या काकडीच्या लागवडीतून मिळणार आहे.


kakadi photo 2मार्केटिंग आणि नफा

ही काकडी गोंदिया, नागपूर, बालाघाट, जबलपूरसारख्या बाजारपेठेत जिथं जास्त भाव मिळेल तिथं विकली जाते. साधारणतः काकडीला दहा ते बारा रुपये किलोप्रमाणं भाव मिळतो. त्यातल्या त्यात हे काकडीचं वाण चांगलं असल्याकारणानं पंधरा रुपये किलोप्रमाणं बाजारभाव मिळतो. आपल्या चार एकर शेतीमध्ये केवळ साडेतीन महिन्यात आठ लाखांचा नफा झाल्याचं ऋषीनं 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. कमी वेळेत भरपूर फायदा देणारं हे काकडीचं पीक आहे. त्यातच आरामाची नोकरी करण्यापेक्षा शेतीकडं वळून हा तरुण अवघ्या तीन ते चार महिन्यात लाखोंचा फायदा कमवतोय हे विशेषच. या विक्रमी उत्पादनामुळं इतरही तरुण शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत होतील आणि त्यांना शेती करण्यास नवीन दिशा मिळेल, अशी आशा त्यानं व्यक्त केली.
संपर्क : ऋषी टेंभरे, चुटिया, गोंदिया. मोबाईल - 9923479450

‘ऑटोमायझेशन’वर बहरली गुलाब शेती

नाशिक जिल्ह्यातील जानोरी येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय नामदेवराव घुमरे यांनी दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करून गुलाबाची बाग फुलवली आहे. त्यांनी साडेसात एकर क्षेत्रात पॉलीहाऊसमध्ये गुलाबाची सर्वात मोठी बाग फुलवली असून, ‘ऑटोमायझेशन’सारखी अत्याधुनिक यंत्रणा वापरून मजूरटंचाईवर मात केली आहे. या तंत्रामुळे गुलाबाच्या झाडांना योग्य प्रमाणात पाणी व खत देणे त्यांना शक्य झाले आहे.
‘फुलांचे शहर’ अर्थात ‘गुलशनाबाद’ म्हणून नाशिकची पूर्वी ओळख होती; मात्र काळाच्या ओघात ही ओळख पुसली गेली. अनेक वर्षांनंतर नाशिक परिसरात पुन्हा फुलांचे मळे बहरत आहेत. नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन, हॉर्टीकल्चर बोर्ड, राज्याचा कृषी विभाग, नाबार्ड, कृषी पणन मंडळ आदींच्या सहकार्यातून नाशिक व परिसरात शेतकर्‍यांनी फुलांच्या बागा फुलविल्या आहेत. या बागांना ‘ऑटोमायझेशन’सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकर्‍यांनी पॉलीहाऊस उभारले आहेत. या पॉलीहाऊसमध्ये सुरक्षित वातावरणात फूलशेती केली जात आहे. नाशिकलगत असलेल्या जानोरी आंबे, मोहाडी, कसबे सुकेणे, महिरवणी, मखमलाबाद, गिरणारे; तर दिंडोरीलगतच्या गावांमध्ये पॉलीहाऊसबरोबरच पांरपरिक फुलांची शेती केली जात आहे. त्यातून फ्रस्टेड, गोल्ड स्ट्राईक, नारंगा, बोर्डा यांसह विविध प्रकारच्या गुलाबांचे उत्पादन घेतले जात आहे.
दिंडोरी-ओझर रस्त्यावरील जानोरी गावाजवळ दत्तात्रय नामदेवराव घुमरे यांची १५ एकर शेती आहे. पूर्वी त्यांची द्राक्षबाग होती. द्राक्षबागेतून पाहिजे तसा आर्थिक फायदा न झाल्यामुळे त्यांनी शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. पॉलीहाऊसमधील गुलाब शेतीचे तंत्र जाणून घेण्यासाठी त्यांनी तळेगाव दाभाडी येथील विविध कंपन्यांच्या पॉलीहाऊसमध्ये दीड महिना काम केले. स्प्रेईंग, हार्वेस्टिंग, पॅकिंग कसे करायचे, याचे तंत्र जाणून घेतले. नंतर स्वत:च्या शेतात पॉलीहाऊस उभारण्यासाठी देना बँकेच्या अधिकार्‍यांसमोर प्रस्ताव मांडला. अडीच कोटी रुपयांचे कर्ज देऊ, असे आश्‍वासन बँकेने दिल्यावर घुमरे यांनी लगेचच साडेसात एकरावरील द्राक्षबाग तोडून जमीन व्यवस्थित करून घेतली. जानेवारी २०११ मध्ये पहिल्या एकरात पॉलीहाऊस उभारणी सुरू केली. पहिल्यांदा मुरूम टाकून त्यावर लाल माती टाकली, खत टाकून बेसल डोस दिला. रोटरी केली, पाणी भरले. १ मीटर बाय ३३ ची बेड आखणी केल्यानंतर लागवडीला सुरुवात केली. रेड, बोरडेक्स या जातीच्या गुलाबाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एक एकर पॉलीहाऊसमध्ये ‘बोरडेक्स’ चे रोप लावले. नंतर हळूहळू दोन एकर, पाच एकर असे करत एकाच वर्षात साडेसात एकरवर पॉलीहाऊस उभारले.
पाणी व्यवस्थापन
या साडेसात एकरवरील पॉलीहाऊसमधील गुलाब शेतीला पाणी मोठ्या प्रमाणावर लागणार हे घुमरे यांना माहीत होते, म्हणूनच त्यांनी थेट धरणावरून शेतापर्यंत पाईपलाइन केली. इतकेच नव्हे, तर २०० बाय २०० फूट आकाराचे २५ ते ३० फूट खोल शेततळे करून सव्वा ते दीड कोटी लिटर पाणी बसेल, अशी सोय केली. क्षार नसणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी संपूर्ण पॉलीहाऊसचे पाणी पाईपलाइनद्वारे शेततळ्यात साठवले. शेततळे भरल्यानंतर उरणारे पाणी थेट पाईपलाइनद्वारे विहिरीत साठवले जाते.
‘ऑटोमायझेशन यंत्रा’मुळे बहरली शेती
घुमरे यांनी आपल्या पॉलीहाऊसमध्ये जवळपास ५६ ते ६२ कॉक बसवले आहेत. हे सर्व कॉक रात्री-बेरात्री फिरवावे लागत होते. वीज आल्यानंतर मजुरांना उठवणे व स्वतः त्यांच्यासोबत जाऊन ते सर्व कॉक चालू करावे लागत. त्यामुळे घुमरे यांनी जैन इरिगेशन कंपनीकडे पाणी, खते देणार्‍या स्वयंचलित यंत्रासंदर्भात विचारपूस केल्यावर, त्यांनी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरून बनवलेले ‘ग्यालकॉन’ कंपनीचे अत्याधुनिक कंट्रोलर बसवण्यास सांगितले. त्यानुसार घुमरे यांनी १२ लाख रुपये खर्चून जैन इरिगेशन कंपनीकडून ऑटोमॅटिक कॉक फिरवणारे ऑटोमायझेशन यंत्र बसवून घेतले. या यंत्रामुळे गुलाबाच्या बागेला स्वयंचलित पद्धतीने पाणी व खत दिले जाते. त्याचा ‘पीएच’ व ‘एसी’ नियंत्रित केला जातो. मजूरटंचाईवर मात व झाडांना योग्य प्रमाणात खते व पाणी देण्यासाठी घुमरे यांनी हे ऑटोमायझेशन यंत्र बसवले व त्यामुळे गुलाब शेतीही बहरली.
घुमरे सांगतात की, ‘ऑटोमायझेशन यंत्रा’ला आपण एकदा संगणकाद्वारे प्रोग्रॅम देऊन सांगितले की, एक नंबरच्या पॉलीहाऊसला ५ मिनिटे साधे पाणी दे. त्यानंतर १५ मिनिटे वॉटर सोल्युबल खतांचे पाणी व नंतर पुन्हा १० मिनिटांनी साधे पाणी दे. त्यावर ते यंत्र स्वयंचलित पद्धतीने त्या-त्या वेळेला पाणी, खत देण्याचे काम करते व नायट्रिक ऍसिडने त्याचा ‘पीएच’ व ‘एसी’ नियंत्रित केला जातो. गुलाबाच्या झाडाला कमीत कमी साडेपाच ते साडेसहापर्यंत ‘पीएच’ हवा असतो व ‘एसी’ १.५ किंवा १.६ असला तरी चालतो.
खत व पाणीपुरवठा करणार्‍या टाक्यांची उभारणी
ऑटोमायझेशन यंत्राला खत, पाणी पुरविणार्‍या एक, एक हजार लिटरच्या तीन टाक्या व पाचशे लिटरची एक टाकीबसवण्यात आली आहे. पहिल्या टाकीत शुद्ध पाणी व दुसर्‍या टाकीत कॅल्शियम नायटे्रटयुक्त पाणी असते. तिसर्‍या टाकीत ‘पीएच’ व ‘एसी’ नियंत्रित करण्यासाठी नायट्रिक ऍसिडयुक्त पाणी असते, तर चौथ्या ५०० लिटरच्या टाकीत न मिसळणारी खते जसे १९:१९ किंवा अमोनियम सल्फेटसारखी खते टाकलेली असतात व पाईपलाइनद्वारे हे पाणी, खतांच्या गरजेनुसार ऑटोमायझेशन होत असते.
पॉलीहाऊसमधील गुलाब रोपांचे लागवड तंत्र
गुलाबाची लागवड कोरड्या हवामानात करावी लागते. पावसाळ्यात रोपांवर रोग येण्याची भीती असते. शिवाय, गुलाब मोकळ्या व स्वच्छ सूर्यप्रकाशातच चांगला वाढतो. ही परिस्थिती पावसाळ्यात नसते. त्यामुळे शक्यतो फेब्रुवारी-मार्च महिन्यात लागवड केल्यास गुलाबाची वाढ चांगली होते. ही झाडे ५ इंचापासून ६ इंचापर्यंत लावावीत. एका बेडवर दोन ओळी टाकाव्यात. साधारण एक एकर पॉलीहाऊस असेल तर ३६ हजारांपासून ते ४० हजारांपर्यंत झाडे बसतात व एक चौरस मीटरमध्ये ‘बोर्डो’ जातीची साधारणत: २०० फुले निघतात. एक एकर पॉलीहाऊसमधील गुलाब शेतीसाठी साधारण ४० लाख रुपये खर्च येतो.
माती परीक्षण गरजेचे
घुमरे यांनी माती परीक्षणाला फार महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते काळी, तांबडी व पिवळी असे मातीचे ढोबळ प्रकार आहेत. गुलाबाचे रोप हे तांबड्या व काळ्या मातीत चांगले फुलते. पिवळ्या मातीत पाणथळ असते. चुनखडीचे प्रमाण जास्त असते म्हणून पिवळ्या मातीत गुलाब चांगला येत नाही. मोठ्या प्रमाणावर गुलाबाची लागवड करण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असते. उत्पादनाच्या दृष्टीने त्याचे फार महत्त्व आहे. गुलाबाच्या वाढीला मध्यम प्रतीची निचर्‍याची जमीन योग्य ठरते. जमिनीचा ‘पीएच’ ७.० असेल तर आम्लता व क्षार समप्रमाणात आहे, असे समजले जाते. ७.० ‘पीएच’ असलेल्या मातीस ‘न्यूट्रल’ म्हटले जाते व अशी माती बहुतेक सर्वच पिके पेरण्यासाठी चांगली असते.
पॉलीहाऊसमध्ये होते संशोधन
घुमरे यांनी सात नंबरच्या पॉलीहाऊसमध्ये विविध जातींच्या फुलांची लागवड केली आहे. त्या फुलांवर सध्या संशोधन चालू आहे. ‘बोरडोला’ या फुलाला टफ देणारे ‘हॉटशॉट’ हे फूल सध्या संशोधनाच्या प्रक्रियेत आहे. सध्या या पॉलीहाऊसमध्ये नॉबलेक्स, नॉलबल, रिव्हॉलव्हर, सुगंधी नारंगा, हॉटशॉट, डेलीडोस अशा १० ते १२ प्रकारच्या फुलांच्या जाती लावण्यात आल्या आहेत.
फुलांची काढणी व पॅकिंग
फुलांची हार्वेस्टिंग म्हणजे काढणी झाल्यानंतर ती फुले साधारणपणे १ तास पाण्यात ठेवल्यानंतर त्या फुलांच्या दांड्यांची, फुलांची प्रतवारी केली जाते. त्यात ७० इंच, ६० इंच व ५० इंच असे प्रतवारीचे प्रकार केले जातात. नंतर ‘डेल्फीन’ नावाच्या मशीनमध्ये त्या फुलांच्या दांडीचा ६ इंचापर्यंतचा पाला काढला जातो. बेंचेस तयार होतात. ते परत पाण्यात ठेवले जातात. ५०, ६० चे बेंचेस बांधून ते कोल्ड स्टोरेजमध्ये २४ तास ठेवून नंतर विक्रीसाठी बाहेर पाठवले जाते.
स्वतःचे शीतगृह
फुलांची काढणी झाल्यानंतर त्याला थंडावा आवश्यक असतो; अन्यथा ती फुले लगेचच सुकतात. त्यामुळे घुमरे यांनी आपल्या शेतात ११ लाख रुपये खर्चून दोन शीतगृहे (कोल्ड स्टोरेज) उभारली आहेत. एका कोल्ड स्टोरेजमध्ये सर्वसाधारण लाख ते सव्वा लाख फुलं बसू शकतात. सकाळी फुलांची काढणी केल्यानंतर ती पॅकिंग करून शीतगृहात ठेवली जातात. नंतर २४ तासांनी म्हणजे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ती एका खोक्यात पॅक करून मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, इंदौर आदी ठिकाणी पाठवली जातात.
गुलाबाच्या फुलांचे अर्थकारण
खुल्या शेतात उत्पादित होणारी गुलाबाची फुले साधारण २० रुपये डझन या दराने विक्री होतात. ‘व्हॅलेण्टाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर गुलाब फुलांचा दर ३० रुपये डझन इतका असतो, तर पॉलीहाऊसमध्ये उत्पादित गुलाब फुलाची प्रति नग २० रुपये दराने विक्री होते. पॉलीहाऊसमधील गुलाबाला तर ३५ ते ४० रुपयेदेखील मिळतात. आज नाशिकमधून मुंबई व पुण्याला मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची विक्री होते. ही फुले परदेशातही निर्यात केली जातात. नाशिक तालुक्यातील १२ एकरवर उभारलेल्या पॉलीहाऊसमध्ये नियंत्रित पद्धतीने तर ५० एकर क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने गुलाबाची शेती केली जात आहे. दिंडोरी तालुक्यात २५० पॉलीहाऊसच्या माध्यमातून एकूण १०० हेक्टर क्षेत्रावर गुलाबाचे उत्पादन घेतले जात असून, २५० ते ३०० हेक्टर क्षेत्रावर पारंपरिक गुलाबाची लागवड केली जात आहे. तालुक्यातून वर्षाकाठी ४ ते ५ कोटी रुपयांची गुलाबाची फुले विक्रीसाठी बाहेरगावी जातात.
मजुरांकडे विशेष लक्ष
घुमरे यांनी सालगडी म्हणून कायमस्वरूपी ७२ मजूर कामावर ठेवले आहेत. या मजुरांना त्यांनी शेतातच २२ खोल्या बांधून दिल्या आहेत. हे मजूर रोज सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० पर्यंत काम करतात. दुपारी १ ते २ पर्यंत जेवणाची सुटी असते व सायंकाळी पुन्हा ६ नंतर ‘ओव्हरटाईम’ करतात. या मजुरांना २४ तास पाणी, वीज, संडास, बाथरूम, प्रत्येकी दोन कुटुंबांना मिळून १ टीव्ही, दोन टाक्या असलेला एलपीजी गॅस, दळणासाठी मोटारसायकल दिली आहे. दिवाळीत प्रत्येक मजुराला व त्याच्या कुटुंबाला कपडे केले जातात.
संपर्क : दत्तात्रय नामदेवराव घुमरे
मु. पो. जानोरी, ता. जि. नाशिक
मो. नं. ९८२३१७१५७१
- अतुल भांबेरे / नाशिक

शेततळ्याच्या पाण्यावर माळरान बनले ‘नंदनवन’!

डोंगररांगांनी वेढलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड परिसरातील खडकाळ जमिनीत पिकं फारशी येत नसल्याने अनेक शेतकरी केवळ खरीप पिकांचेच उत्पादन घेतात. तथापि, हिवरखेडच्याच दादाराव हटकर व बंधूंनी मात्र जेथे कुसळ उगवत नव्हती अशा माळरानावर जिद्द, चिकाटी व कष्टाच्या बळावर संत्रा, डाळिंबाची बाग फुलविली आहे. शेततळ्यातील पाण्याचे गुरुत्वाकर्षण पद्धतीने उत्तमप्रकारे सिंचन व नियोजन करून त्यांनी फळबागेसह शेतात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत.
हिवरखेड (ता. खामगाव) येथील दादाराव हटकर यांचा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे मेंढीपालनाचा. हा व्यवसाय करत असतानाच दादाराव व त्यांचे बंधू शेतीकडे वळले आणि मेहनतीने त्यांनी शेती पिकविली. कौंटी शिवारालगत ज्यांची शेतजमीन आहे, तेथे आजूबाजूच्या डोंगरावरील मोठे दगडगोटे, माती पसरली असल्यामुळे पीक कसे घ्यायचे, शेती कशी पिकवायची, अशा विवंचनेत इतर शेतकरी असताना, हटकर बंधूंनी शेततळ्यातील पाण्याचा उपयोग करीत भरघोस उत्पादन घेत इतर शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. हटकर यांनी राष्ट्रीय फलोत्पादन मिशनअंतर्गत सन २००६-०७ मध्ये आपल्या शेतात तळे खोदले आहेत. आपला परंपरागत मेंढपाळ व्यवसाय अबाधित ठेवत त्याला नवनवीन संकल्पनांची जोड देणार्‍या हटकर भावंडांनी शेतीतून समृद्धी मिळवली आहे. भरघोस उत्पादन घेणार्‍या हटकर यांना शासनाने ‘उद्यानपंडित’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.
हटकर बंधूंनी वडिलोपार्जित सहा एकर शेती दोनशे एकरपर्यंत वाढविली आहे. पाच भावंडांपैकी मोठे दादाराव हटकर हे शेतीत काय घ्यायचे याचे नियोजन करतात. दुसरे भाऊ निंबाजी ऊर्फ अनिल हटकर हे शासकीय योजनांची माहिती मिळवून योजनांचा लाभ कसा घ्यायचा, यासाठी प्रयत्नशील असतात. तृतीय बंधू रमेश हटकर हे मेंढीपालन व्यवसायासोबत शेतात काय काम करायचे याचा आराखडा बनवतात. चतुर्थ बंधू राजू हटकर हे कृषी निविष्ठा आणण्यापासून ते मजुरांकडून काम करवून घेण्याची जबाबदारी सांभाळतात, तर पाचवे भाऊ विनोद हटकर हे आपल्या चारही भावांना कामात मदत करतात.
या सर्वांचा परिपाक म्हणून आज हटकर यांचा मळा माळरानावरील नंदनवन बनला आहे. राजकीय नेते, केंद्रातील पर्जन्यछाया प्रदेश विकास प्राधिकरणातील सचिव, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे तसेच विविध कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ आदी हटकर यांच्या शेतीकडे प्रयोगाचे ठिकाण म्हणून पाहतात.
गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार शेतात फिरविले पाणी !
हटकर यांच्या शेतात राष्ट्रीय फलोत्पादन मिशनअंतर्गत घेतलेले तीन शेततळे आहेत. ४४ बाय ४४ मीटर अंतर व तीन मीटर खोली असलेल्या या तीन शेततळ्यांपैकी दोन शेततळे जवळ जवळ असून, एक शेततळे ५०० मीटर अंतरावर आहे. विशेषत: ही तीनही शेततळे हटकर यांनी कल्पक बुद्धीने अंडरग्राऊंड पाईपलाईनने जोडले आहेत. त्यामुळे तीनही शेततळ्यांतील पाणी एकमेकांना देता येते. तसेच या शेततळ्यांच्या पाईपलाईनला शेताच्या मध्यभागात तीन व्हॉल्व्ह ठेवून हे पाणी संत्रा, डाळिंब, भाजीपाला, तुती व कापूस पिकांमध्ये फिरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेततळ्याची उभारणी करतेवेळी तळ्यात बुडाशी पाईप फिट केलेला आहे. त्या पाईपला एल्बलो लावून पाणी जाण्यासाठी छिद्र ठेवले. फलीम व खाली टाकलेल्या फलीमला रबर टाकून नट-बोल्टांनी छिद्राची जागा निश्‍चित केली. पाईपला थोडे फलीमच्या वर उचलण्यात आले व बुडापासून पाच फुटांपर्यंत पीव्हीसी पाईप टाकला. या पाईपला एक ते दीड फूट अंतरावर खाचा ठेवल्या. जेणेकरून पाणी कमी झाल्यास खाचांमधून पाण्याचा प्रवाह सुरू राहतो. हाच पाईप शेततळ्याच्या बुडातूनच बाहेर काढत गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाण्याचा प्रवाह उताराकडे वळविला. तीनही शेततळे जमिनीपासून उंचीवर उभारण्यात आली असून, डोंगरकडांच्या शेजारी आहेत. जेणेकरून तीनही शेततळ्यातील पाणी, शेताकडे उतार असल्यामुळे कुठल्याही अवरोधाने थांबत नाही. या पद्धतीमुळे शेततळ्याच्या पाण्यावर ४० एकर संत्रा, १२ एकर डाळिंब, १० एकर कापूस आणि ५ एकर भाजीपाला व तुतीच्या शेताचे ओलित होते. त्याचप्रमाणे हटकर यांच्या शेतात चोहोबाजूला सहा विहिरी आहेत. या विहिरीसुद्धा अंडरग्राऊंड पाईपलाईनने एकमेकांना जोडल्या आहेत. तसेच शेततळ्यांनाही जोडल्या आहेत. पावसाळयात विहिरींमधील पाणी शेततळ्यात सोडून तळे भरले जाते. हेच पाणी रब्बी हंगामात वापरले जाते.
शेततळ्यातील पाण्यावर ८० एकर ओलित
तीनही शेततळ्यांच्या पाण्यावर हटकर बंधूंनी जवळपास ८० एकर शेतीचे ओलित केले आहे. त्यामध्ये संत्रा ४० एकर, डाळिंब १२ एकर, कापूस १० एकर, भाजीपाला दीड एकर व तुती पाच एकर व तूर तसेच खरिपात पाणी नसल्यास सोयाबीन, उडीद, मूग, रब्बी हंगामात हरभरा, गहू असे एकूण ८० एकराचे ओलित त्यांनी केले आहे. शेती करत असतानाच परंपरागत मेंढीपालन व्यवसायही त्यांनी चालू ठेवला आहे. त्यांच्याकडे जवळपास ६०० मेंढ्या असून, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही हटकर यांनी शेततळ्यातून केली आहे. मेंढ्यांसाठी संत्रा बागेजवळ हौदही बांधला आहे.
संत्रा बागेपासून साडेतेरा लाख रुपयांचे उत्पन्न
शेततळे आहे तर मग कशाला घाबरायचे, असे बोलून दादाराव हटकर आपल्या भावंडांना बळ देतात. ‘कुठवर करणार तीच ती पारंपरिक शेती, काहीतरी नवीन करून दाखवू’, असे म्हणत त्यांनी २००५ पासून संत्रा बागेचा श्रीगणेशा केला. पुढच्याच वर्षी दादारावांनी शेततळे खोदले. त्यानंतर २००६ मध्ये १००० व २००७ मध्ये २०० झाडांची वाढ केली. १८ बाय १८ फूट अंतरावर संत्र्याची २२०० झाडे त्यांनी जगविली. ठिबक सिंचनद्वारे एका झाडाला चार ड्रीपरच्या माध्यमातून सिंचन केले. मृग बहार घेण्यासाठी किटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली. वर्षातून दोन ते तीन वेळा रोटाव्हेटर करीत आंतरमशागतही सुरू ठेवली. कोणतेही रासायनिक खत न देता बांगडी पद्धतीने पाच फुटांपर्यंत लेंडी खत दिले. त्याचा परिपाक म्हणून २०११-१२ मध्ये त्यांना संत्रा बागेपासून साडेतेरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. चिखली तालुक्यातील एकलारा येथील व्यापार्‍यांनी हटकर यांच्या संत्रा बागेची हर्रासी केली.
१० टन डाळिंबाचे उत्पादन
डाळिंब बागेपासूनही हटकर यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. २६ डिसेंबर २००९ मध्ये हटकर बंधूंनी धुळे येथून आणलेल्या ‘भगवा’ जातीच्या १६०० डाळिंब कलमांची लागवड केली. त्यांनी १० बाय १५ फूट अंतरावर लागवड करीत प्रति झाड २०० ग्रॅम १०:२६:२६ व १ पाव निंबोळी ढेपेची मात्रा दिली. गतवर्षी त्यांनी अंबिया बहार घेत १० टन डाळिंबाचे उत्पादन घेतले. त्यापासून साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी मृगबहाराची तयारी त्यांनी सुरू केली असून, विविध किटकनाशकांच्या ३० फवारण्या आतापर्यंत केल्या आहेत. हटकर बंधूंनी डाळिंबाची (प्रतवारी) ग्रेडिंग पद्धतही विकसित केली आहे. ते शेतातच डाळिंबाचे ग्रेडिंग करून स्वखर्चाने अकोला, नांदेड येथील बाजारपेठेत माल विकतात. २०१२ मध्ये त्यांनी डाळिंब बागेवर दीड लाख रुपये खर्च केला आहे.
मुले घेताहेत कृषी शिक्षण
व्यवसायाने मेंढपाळ असलेले हटकर बंधू प्रयोगशील शेतकरी झाले. शेती करत करत त्यांनी आपल्या मुलांमध्ये शेतीविषयी, कृषी शिक्षणाची गोडी निर्माण केली. परिणामी, दादाराव हटकर यांचा मुलगा बी. एस्सी. (ऍग्री) चे शिक्षण घेत आहे, तर एक मुलगा शेतकी शाळेत शिक्षण घेत आहे.
भारनियमनावर मात
शेतीसाठी १६ तास विजेचे भारनियमन असल्यामुळे विजेअभावी अनेक शेतकरी पाणी असतानाही पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. मात्र, हटकर बंधूंनी कुठलाही सबमर्सिबल पंप, विद्युतपंप न वापरता गुरुत्वाकर्षण पद्धतीचा वापर करीत शेततळ्यातील पाणी ८० एकर शेतात फिरविले आहे. हा प्रयोग करून त्यांनी एक प्रकारे भारनियमनावर मात केली आहे.
एकाच ठिकाणाहून फवारणी
हटकर बंधूंनी डाळिंबाच्या बागेत कॉम्प्रेसर मशीन बसवून फवारणी यंत्र उभारले आहे. तिथेच २०० लिटरची टाकी आहे. कॉम्प्रेसरच्या माध्यमातून हवेचा दाब निर्माण करण्यात येऊन ठिबकच्या जाड नळ्यांमधून फवारणी करण्यात येते. फवारणीसाठी नळ्या डाळिंब व संत्रा बागेत मोठ्या कौशल्याने फिरविल्या आहेत. डाळिंब बागेत एक ओळ आणि संत्रा बागेत दुसरी ओळ व मधोमध व्हॉल्व्ह अशी व्यवस्था करण्यात आली आहे. डाळिंबाच्या बागेत फवारणी करावयाची असल्यास संत्रा बागेकडील व्हॉल्व्ह बंद केला जातो. संत्रा बागेला फवारणी करताना डाळिंब बागेचा व्हॉल्व्ह बंद केला जातो. एकाच ठिकाणाहून फवारणी होत असल्यामुळे मजूरही कमी लागतात. केवळ कॉम्प्रेसर सुरू करायची वेळ पाळावी लागते. प्रत्येक फळझाडाच्या ओळीजवळ एक नोझल असून, फवारणीसाठी फक्त नोझल सुरू करावे लागते, असे दादाराव हटकर यांनी सांगितले.
संपर्क : दादाराव मांगो हटकर
मु.पो. हिवरखेड, ता. खामगाव,
जि. बुलडाणा
मो. नं. ९९२११२६१०१

फुलली शेती टिश्यू कल्चर डाळिंबाची

अहमदनगर जिल्ह्यातील कनकुरी (ता. राहाता) येथील शिवाजी मारुती दुशिंग यांनी ऊस पिकाला रामराम ठोकून डाळिंबाची लागवड केली. पदार्पणातच त्यांनी अडीच एकरांवर टिश्यू कल्चर डाळिंबाची बाग फुलवत पहिल्याच तोड्यात एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळविले. त्यांच्या टिश्यू कल्चर डाळिंब शेतीची प्रेरणा घेऊन अनेक शेतकर्‍यांनी आपापल्या गावांत बरड माळरानाला ‘हिरवा साज’ चढविला आहे. अगदी अठरा महिन्यांतच भरघोस उत्पन्न मिळवून देणारे हे टिश्यू कल्चर डाळिंब कृषी विभागाच्याही कौतुकाचा विषय ठरले आहे.
डाळिंबाचे नाव निघाले की, महाराष्ट्रातील सांगोला, पंढरपूर, संगमनेर, औरंगाबाद, जालना हा भाग डोळ्यांसमोर येतो. आता अवर्षणप्रवण पट्ट्यातील शेतकर्‍यांनीही डाळिंब शेतीकडे मोर्चा वळविला आहे. पाटपाण्याच्या पट्ट्यातही अनेकांनी उसाला पर्याय म्हणून डाळिंबाचे पीक घेऊन प्रगती साधली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील राहाता तालुका भंडारदरा धरणाच्या कालव्यावर अवलंबून आहे. उसाचा पट्टा म्हणून नावलौकिक असलेल्या राहाता तालुक्यातील शिवाजी दुशिंग या शिक्षकाने उसाचे पीक परवडत नसल्याने जैन टिश्यू कल्चर डाळिंबाची लागवड करून पहिल्याच तोड्यात एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळविले. वडील मारुती दुशिंग यांच्या मदतीने डाळिंबाचे उत्पादन घेत त्यांनी इतरांना आधुनिक शेतीची वाट दाखविली आहे.
डाळिंबाला हाय, उसाला बायबाय !
शिवाजी दुशिंग हे संगमनेर तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरी करतात. नोकरी करत-करत त्यांनी आपल्या शेतात डाळिंबाची बाग फुलवली. त्यांचे वडील मारुती दुशिंग हे संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यात ‘बॉयलर अटेंडंट’ म्हणून काम करत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेती करण्याचे ठरवले. शिवाजीरावांनाही आधुनिक पद्धतीने शेती करून काहीतरी करण्याची हौस होती. २००७ साली मारुती दुशिंग हे सेवानिवृत्त झाले. साखर कारखान्याला घातलेल्या उसाचे पैसे तीन टप्प्यांत मिळायचे. शिवाय, उसाच्या दर ठरवण्यातही कारखान्यातील संचालकांची मक्तेदारी असायची. यामुळे ऊसशेतीला फाटा देऊन नवीन पीक घेण्याचा दुशिंग यांचा विचार होता.
‘जैन कंपनी’च्या टिश्यू कल्चर डाळिंबाची निवड
बाजारपेठेचा अंदाज घेत ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाची लागवड करण्याचे ठरवले. त्यावेळी डाळिंब उत्पादक बजरंग पावसे (रा. हिवरगाव पावसा), नानासाहेब वामन (रा. जवळे कडलग), ‘क्रॉप गोल्ड’ कंपनीचे संचालक बापू वाघ, ‘युनिमॅक्स’चे बी. टी. गोरे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर संगमनेर तालुक्यातील अनेक गावांतील डाळिंबाच्या बागा ‘मर’ व ‘तेल्या’ रोगग्रस्त असल्याचे समजले. तेथील गुटी कलम आणण्यापेक्षा अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या पट्ट्यातील शेतकर्‍यांकडून डाळिंबाची कलमे आणण्याचे ठरवले. त्यानुसार प्रति १५ रुपयाने एक हजार गुटी कलमे आणून लागवडीचे नियोजन केले. मात्र, त्याचवेळी ‘आरक्ता’बरोबरच आता ‘जैन इरिगेशन कंपनी’ने डाळिंबाच्या ‘भगवा’ जातीची टिश्यू कल्चर रोपे बाजारात आणल्याचे वाघ यांनी सांगितले. त्यानुसार गुटी कलमे फेकून देऊन ‘जैन इरिगेशन कंपनी’ची विश्‍वासार्हता व टिश्यू कल्चर केळीच्या यशोगाथा यांचा विचार करून मी एक हजार टिश्यू कल्चर रोपांचे बुकिंग केले, असे दुशिंग यांनी सांगितले.
‘कॅनॉपी मॅनेजमेंट’ गरजेचे
डाळिंबाची मालकाडी बळावण्यासाठी छाटणी तंत्राकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे दुशिंग सांगतात. ते म्हणाले की, डाळिंब ही जंगली झुडूपवर्गीय वनस्पती आहे. तरीही छाटणीद्वारे मालकाडी तयार करून झाडाला डेरेदार आकार देण्यासाठी ‘कॅनॉपी मॅनेजमेंट’ करणे गरजेचे असते. लागवडीसाठी माती व पाणी परीक्षण करून डिसेंबर २००९ मध्ये रान तयार करून ठेवले होते. त्यावर खड्डे घेऊन त्यात ५० ग्रॅम फ्युरोडॉन टाकून ठेवले. २०१० च्या जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात एक हजार झाडांसाठी प्रत्येकी एक किलो याप्रमाणे ५०० किलो शेणखतात डॉर्स सेंद्रिय खत, ‘आनंदन कंपनी’चे निंबोळी, एरंड व करंजाचे मिश्रखत, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, बॅसिलोमायसिस, ऍझोटोबॅक्टर, स्फूरद विरघळवणारे जिवाणू, पोटॅश ऍटिव्हा, वॅम प्लस, न्यूट्रिमॅक्स, ई.एम. द्रावणासह एकूण एक हजार किलोचे कल्चर तयार केले. लागवडीच्या आदल्या दिवशी दोन तास ठिबक चालवून वाफशावर खड्ड्यात हे कल्चर टाकून त्यात १३ बाय १० फूट अंतराने रोपांच्या हुंडी लावल्या. अनेकदा कोरड्या जमिनीत उष्णतेने रोपांना ‘शॉक’ बसतो. हे टाळण्यासाठी वाङ्गशावर लागवड करावी.
तसेच लागवडीनंतर दोन महिन्यांत रोपांच्या मुळ्या जमिनीत स्थिर होताना व त्यानंतरही झाडांना बुरशीमुळे येणारा ‘मर’ रोग टाळण्यासाठी बुरशीनाशकांचे कल्चर वापरणे गरजेचे असते. झाडांना चांगला आकार देतानाच कोणत्याही बांबूकाठीचा आधार देणे टाळावे. लागवडीतील चुकांमुळेच अनेकदा पुढील नियोजन बिघडते. त्यामुळे लागवडीचे योग्य नियोजन करून लागवडीनंतर ‘कॅनॉपी’ व्यवस्थापन करावे. त्यासाठी पहिल्या वर्षी चार छाटण्यांचे नियोजन करून पहिली छाटणी लागवडीनंतर साडेतीन महिन्यांनी केली. छाटणीत प्रत्येक फांदीला इंग्रजी ‘वाय’ आकार देण्यासाठी शेंडे तोडावे लागतात. यासाठी जैन कंपनीचे ऍग्रोनॉमिस्ट चेतन गुळवे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
वर्षातच फळधारणेचे नियोजन
टिश्यू कल्चर डाळिंबाच्या रोपांची जोमाने वाढ होत असल्याने दुशिंग यांनी वर्षातच फळधारणेसाठी बाग ताणावर सोडली व विसाव्या महिन्यांपर्यंत एकूण साडेसहा लाख रुपये खर्चून १३ टन माल दहा लाख रुपयांना विकला. याविषयी त्यांनी सांगितले की, लागवडीनंतर या रोपांची वेगाने वाढ झाली. वेळोवेळी छाटणी केल्याने डिसेंबर २०१० मध्ये झाडांना साठ दिवसांच्या ताणावर सोडले. चांगली पातेगळ झाल्याने चालू वर्षी २ मार्चला पाणी देऊन बहाराचे नियोजन केले. लागवडीपासूनच अनेकदा शेतकरी डाळिंबाच्या रोपांना बांबूच्या काठ्या उभ्या करून आधार देतात. या झुडपाला आधाराची गरजच नसते. फक्त फळधारणा झाल्यानंतर फळसंभाराने फांद्या तुटू नयेत यासाठीच थोडासा आधार पुरेसा असतो. त्यासाठी जमिनीत खड्डे घेऊन गॅल्व्हनाईज्ड तारेने दगडास बांधल्यानंतर बांबूंना तारेचा आधार द्यावा. झाडांना सहा बाजूंनी ड्रिपरने पाणी दिल्यानेही आधाराची गरज कमी झाली. बांबूमध्ये बोअर किटक राहू शकत असल्याने बांबूला क्लोरोपायरिफॉसच्या द्रावणात प्रक्रिया करून वापरावे. तसेच जमिनीत खोचाव्या लागणार्‍या बांबूच्या बाजूस डांबर लावावे. योग्य नियोजनातूनच डाळिंबाची बाग फुलते. आम्हाला लागवडीनंतर टिश्यू कल्चरच्या या झाडांना हवामानानुसार येणार्‍या कळ्या तोडण्यासाठी वर्षभर एका मजुराला कामावर ठेवावे लागले. एप्रिलमध्ये एका-एका झाडाला पाचशेपर्यंत कळ्या आल्या होत्या. मात्र, फधारणेसाठी इतर कळ्या तोडून प्रतिझाड शंभर कळ्या स्थिर करण्याचे नियोजन ठेवले. जैन कंपनीच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांनी थेट बांधावर येऊन मार्गदर्शन केले. सप्टेंबरमध्ये तोडणीला आलेल्या काही फळांचे वजन ८०० ग्रॅमपर्यंत भरले. पहिलाच तोडा असल्याने झालेल्या खर्चाच्या वसुलीसाठी झाडांच्या क्षमतेपेक्षा जास्त फळे ठेवले असल्याने सरासरी ४०० ग्रॅमची फळे आली. पाकोळीने हल्ला केल्याने सुमारे एक टन फळे पंक्चर झाल्याने फेकावी लागली. बाजारात आमच्या फळांची गोडी व चकाकी यामुळे ११० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळाला.
टिश्यू कल्चरची दर्जेदार फळे
पस्तीस वर्षांपासून गुटी कलमांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड करून डाळिंबाच्या बागा फुलविल्या आहेत. मात्र, दुशिंग यांच्या बागेची २६ मे २०१२ रोजी पाहणी केल्यावर आतापर्यंतची सगळ्यात दर्जेदार फळे मी पाहिली. दुशिंग यांच्या बागेतील पंधरा महिन्यांच्या झाडांच्या खोड व फांद्यांनाच फळे आहेत. ही बाग पाहून खूप समाधान वाटले.
- मोहन देशमुख,
रा. जवळे कडलग, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
…अन् लखपती झालो !
साखर कारखान्यात मी ४५ वर्षे काम केले. महिन्याचा पगार अन् त्यानंतर रिटायरमेंटची मिळकत आतापर्यंत पाहिली. शेतीतूनही लखपती होता येतं, हे टिश्यू कल्चर डाळिंबातून अनुभवले. आपल्याकडचे शेतकर्‍यांमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची मनोवृत्ती जास्त असून, चांगले सल्ले न देता शेतीतून लांब जाण्याचाच सल्ला अनेक जण देतात. आमच्या शेतातील ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाची बहारदार बाग पाहण्यासाठी बाहेरच्या राज्यातून अनेक शेतकरी येऊन गेले आहेत. आम्ही शेतकर्‍यांना सगळी माहिती देतो; परंतु शेतकर्‍यांनी बागेत फेरफटका मारल्याने ‘तेल्या’ रोगाचा प्रसार होत असल्याने आम्ही आता बाग लांबूनच दाखवतो.
- मारुती दुशिंग,
रा. कनकुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर
सुयोग्य नियोजनाचा फायदा
आमच्या कंपनीतर्फे दर्जेदार टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध करून दिली जातात. शिवाजी दुशिंग यांनी काटेकोर नियोजन करून डाळिंबाची बाग फुलविली आहे. त्याचा फायदा यापुढेही त्यांना मिळेल. कंपनी तुर्कस्तान येथील डाळिंबतज्ज्ञ डॉ. ओनुर यांचेही शेतकर्‍यांना थेट मार्गदर्शन अनेकदा उपलब्ध करून देते. दशकभराच्या अथक परिश्रमातून आधुनिक तंत्रज्ञानाने प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात तयार केलेल्या या टिश्यू कलचर डाळिंबातून अनेकांनी प्रगती केली आहे. बरड माळरानाच्या जमिनीसाठी हे पीक वरदान ठरले आहे. जास्त पाणी लागत नसल्याने शक्यतो पावसाळा वगळता इतर ऋतूंमध्येच या डाळिंब रोपांची लागवड करावी. तसेच सहा ड्रिपरचा वापर केल्याने फायदा होतो. प्रयोगशाळेत पेशी विभाजनातून रोपे तयार करताना वापरलेल्या संप्रेरकांमुळे या झाडांची वाढ वेगाने होते. मात्र, पांढरी मुळी कार्यक्षम राहण्यासाठी ४ लिटर/तासापेक्षा जास्त पाणी देणारे ड्रिपर वापरू नयेत.
- डॉ. अनिल पाटील,
प्रॉडक्शन मॅनेजर, जैन टिश्यू कल्चर, जळगाव

हरितगृहातील लागवडीसाठी वाफ्याचे नियोजन

हरितगृहाची उभारणी केल्यानंतर लागवडीसाठी आवश्‍यक माध्यम (म्हणजेच माती, कोकोपीट किंवा अन्य सुधारित माध्यमे) याचा विचार करणे आवश्‍यक आहे. हरितगृहातील बहुतांश लागवड ही एक वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची असल्याने माती किंवा माध्यमाची निवड काळजीपूर्वक करावी. आजच्या लेखामध्ये माती या माध्यमाविषयी माहिती घेऊ.
---
माती ः योग्य सामू आणि विद्युतवाहकता या गुणधर्माबरोबरच निचरा होणारी माती लागवडीसाठी आवश्‍यक असते. हरितगृहामधील पिकांच्या लागवडीसाठी लाल मातीचा वापर करावा. लोहाची विविध ऑक्‍साईड्‌स असल्याने विशिष्ट असा लाल रंग मातीला प्राप्त होतो. या प्रकारची माती हलक्‍या सच्छिद्र, चुनाविरहित, कमी विद्राव्य क्षार व कमी सुपीकता असलेली असते. या जमिनीचा पी.एच. (सामू) 5.5 ते 6.5 असावा. क्षारता ही एकपेक्षा कमी असावी. हरितगृहामध्ये प्रस्तावित पिकाच्या वाफ्यांचा आकार, उंचीनुसार गरजेनुसार योग्य तितकी ब्रास माती टाकून घ्यावी. ती सर्वत्र समप्रमाणात पसरून घ्यावी. या मातीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक असते.

मातीचे निर्जंतुकीकरण ः
जमिनीतील रोगकारक जीव, कीटक व तणांचा नाश करण्याची प्रक्रिया म्हणजेच निर्जंतुकीकरण होय. सूक्ष्मजीव हे काही भौतिक, रासायनिक अथवा आयर्न्सच्या स्वरूपातील घटकांचा वापर करून मारले अथवा दूर केले जातात.

निर्जंतुकीकरणाच्या पद्धती ः
निर्जंतुकीकरणाच्या विविध पद्धती उपलब्ध असून प्रत्येकाला स्वतःच्या मर्यादा आहेत. त्यामुळे पद्धत निवडताना आपल्याला अपेक्षित असणारी कार्यक्षमता, त्याची उपयुक्तता, विषारीपणा, उपलब्धता व खर्च या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. निर्जंतुकीकरणासाठी खालील रासायनिक घटकांचा वापर केला जातो.
---------------------------------------------------
1) फॉरमॅलिन
2) डॅझोमेट
3) व्हॅपम (VAPAM)
-----------------
या रासायनिक घटकांतील मिथिल ब्रोमाईडसारखे काही घटक हे सामान्य तापमानाला वायुरूप धारण करतात. तसेच ते अत्यंत विषारी असल्याने योग्य प्रशिक्षित आणि परवाना असलेल्या लोकांच्या साह्यानेच त्याचा वापर करावा लागतो. अर्थात त्याचा खर्च अधिक पडतो. आर्थिकदृष्ट्या आपल्या भागामध्ये फॉरमॅलिन या रसायनाचा वापर मातीच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाते.
---------------------------------------------------
फॉर्मल्डेहाईड (फॉरमॅलिन) ः
बाजारात फॉरमॅलिन नावाने मिळणारे द्रावण 37-40 टक्के फॉर्मल्डेहाईडयुक्त असते. ज्याच्यात झिरपण्याची व सर्वत्र पसरण्याची क्षमता कमी असते. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे फॉरमॅलिन पाण्यात 1ः10 या प्रमाणात मिसळावे. ड्रेचिंगसाठी 7.5 लि./फॉरमॅलिन 100 चौ. मीटरसाठी म्हणजेच पाच गुंठ्याच्या (500 चौ. मी.) पॉलिहाऊससाठी 37.5 लिटर फॉरमॉलिनची गरज असते.
- हे रसायन वापरण्याआधी माती ही वाफसा स्थितीत असावी.
- रसायन पहाटे किंवा सकाळी लवकर जमिनीवर टाकावे.
- रसायन टाकल्यानंतर उपलब्ध उष्णतेनुसार साधारणतः तीन ते सात दिवस त्यावर काळ्या रंगाचे पॉलिथिन पसरावे. त्यात निर्माण होणारा वायू बाहेर जाऊ नये, याकरिता मातीने पॉलिथिनच्या कडा किंवा बाजू व्यवस्थित गाडून घ्याव्यात.
-सात दिवसांनंतर पॉलिथिन काढून एक दिवस हरितगृहाच्या सर्व खिडक्‍या आणि दरवाजे उघडे ठेवून वायू बाहेर जाऊ द्यावा.
- भरपूर पाण्याने रसायन मातीतून धुऊन जाईल असे पाहावे.
- त्यानंतर वाफसा आल्यानंतर (ड्रेचिंगनंतर दोन आठवड्यांनी) वाफे बनविण्यास सुरवात करावी.

मातीचे वाफे तयार करणे ः
फुलझाडे व भाज्या लागवडीसाठी शेडहाऊससाठी लाल माती, शेणखत, भाताचे तूस पुढील प्रमाणात वापरून माध्यम तयार करावे.
1) लाल माती - 70 टक्के
2) शेणखत (एफवायएम) - 20 टक्के
3) भाताचे तूस - 10 टक्के
या शिवाय अन्य सेंद्रिय पदार्थ. उदा. निंबोळी पेंड, बोनमील, खतांची पायाभूत मात्रा यासारख्या गोष्टी वाफे करताना घालाव्यात.

1) शेणखताचे महत्त्व ः
शेणखत वापरताना त्यातील सूक्ष्मजीव मारण्यासाठी आधी निर्जंतुकीकरण करावे. याचा वापर केल्यास मातीची रचना सुधारते, कारण-
* त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची मातीची क्षमता वाढते.
* जमिनीची रचना (पोत, छिद्रांचे प्रमाण) सुधारते.
* सेंद्रिय मूलद्रव्ये हळूहळू मिळत राहतात.

2) भाताच्या तुसाचे महत्त्व व वापरण्याची आवश्‍यकता ः
- हवा खेळती राहते ः प्रत्येक प्रकारच्या मातीत हवा व घनपदार्थांचे प्रमाण ठरलेले असते. लागवडीत सुरवातीला हवेचे प्रमाण जास्त लागते. मातीमध्ये भाताचे तूस व शेणखत मिसळून हे प्रमाण वाढविले जाते. याच्या वापराने मातीतील ओलावाही वाढतो.
- मातीतील निचरा ः मातीतील पाणी झिरपण्याची क्षमता चांगली असणे आवश्‍यक असते. वरचा थर निचरा होणारा व खालील थर तसा नसेल तर खालील प्रकारचे धोके संभवतात.
अ) झाडांची मुळे कडक थराला फोडण्याचा व त्यात शिरण्याचा प्रयत्न करतात व त्याचा परिणाम झाडांची वाढ कमी होण्यात होतो.
ब) तळात पाणी साठून राहिल्याने फायटोफ्थोरा क्रिप्टोजिया किंवा अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा थरांवर पाणी साठते.
क) मातीत असे थर असल्यास खोल नांगरणी करून व भाताचे तूस वापरून निचरा सुधारता येतो.

3) वाफे तयार करण्याची पद्धत ः
अ) वाफ्याची लांबी पूर्व-पश्‍चिम असावी.
ब) वाफे शेडहाऊस व पिकाप्रमाणे योग्य प्रकारे आखलेले असावेत.
क) मुख्य रस्त्यासाठी, विविध कामांसाठी पुरेशी जागा शेडहाऊसच्या आकाराप्रमाणे योग्य अशी ठेवावी.
ड) शेडहाऊसचे कॉलम्स शक्‍यतो वाफ्यांवर यावेत. चालण्याच्या पाथमध्ये येऊ नयेत.
इ) वाफे तयार केल्यावर त्यावरून चालू नये.
ई) दोन वाफ्यांत मशागतीची कामे करण्यासाठी पुरेसे रुंद रस्ते असावेत.
फ) पिकांच्या आवश्‍यकतेनुसार आधाराच्या रचना आधी बनवून मग वाफे करावेत. नंतर रचना करताना वाफे मोडले जातात.
---------------
संतोष डोईफोडे, 9422052777
(लेखक हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथे सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.)

देवरे कुटुंबाच्या एकीची मात चिकाटीला लाभली प्रगतीची साथ

"ज्याच्या शेतात शेणखत, गावात पत आणि घरात एकमत असते, तो खरा शेतकरी' अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. भऊर (ता. देवळा, जि.नाशिक) येथील देवरे कुटुंबीयांची शेतीतील प्रगती पाहताना या म्हणीची प्रचिती येते. चोवीस एकरांत पिके आणि पूरक व्यवसाय अशी एकात्मिक पद्धत राबवताना नियोजन, मेहनत, चिकाटी यातून या कुटुंबाने आदर्श निर्माण केला आहे.
...
ज्ञानेश उगले
...
नाशिक जिल्ह्यातील देवळा हा सातत्याने कमी पावसाचा राहिला आहे. तालुक्‍याच्या दक्षिण भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचेही हाल होतात. गेल्या तीन वर्षांत कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्‍यांच्या "कसमादे' पट्ट्याकडेच पावसाने पाठ फिरवली असल्याने गिरणा धरणातील पाणीसाठा जेमतेमच राहिला आहे. परिणामी, उसाची जागा घेणारे डाळिंब तीनच वर्षांत 50 हेक्‍टरवरून 150 हेक्‍टरपर्यंत वाढले आहे.

देवळ्याच्या उत्तरेस सहा-सात किलोमीटरवर देवरे कुटुंबीयांचा बंगला, त्यामागे विस्तीर्ण पसरलेले 24 एकर क्षेत्र लक्ष वेधून घेते. शेताच्या प्रत्येक विभागात देवरे कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात मग्न असे दृश्‍य नेहमी दिसते.
--
या कुटुंबातील प्रमुख म्हणजे बाबूभाई श्‍यामभाऊ देवरे. वयाच्या सत्तरीतही नातवंडांना सांभाळण्याबरोबरच ते घरादाराला मार्गदर्शन करतात. सुभाष आणि दादाजी ही त्यांची दोन मुले. यापैकी सुभाष यांचे 2000 मध्ये अपघाती निधन झाले. त्यामुळे घराची प्रमुख जबाबदारी दादाजींवर. सुभाष यांच्या पत्नी कल्पना, मुलगा प्रशांत, दादाजी, दादाजी यांच्या पत्नी चंद्रकला, मुलगा किशोर, मनीष तसेच रेणुका व राजश्री या सुना, असे घरातील सर्व सदस्य रोज सकाळी लवकर नियोजन करून शेतात राबतात. सायंकाळी जेवणानंतर रोजच्या कामांचा आढावा घेतला जातो. परस्परातील सामंजस्य, प्रोत्साहनामुळे प्रत्येक कामाचा "परफॉर्मन्स' उंचावतो. परिणामी, प्रत्येक विभाग निश्‍चित केल्याप्रमाणे उद्दिष्ट साध्य करतो, असे दादाजी म्हणतात.
--
देवरे कुटुंबाची शेती दृष्टिक्षेपात
डाळिंब 13 एकर, कांदे 12 एकर, मिरची चार एकर, ऊस दोन एकर
सिंचन ः गिरणा नदीवरून चार किलोमीटर वरून दोन पाइपलाइन, विहीर

दादाजी म्हणाले, की 1994 मध्ये सुरवातीला 24 एकरांवर गणेश डाळिंब होते. एकरी आठ ते 10 टन उत्पादन निघायचे. दरम्यान, सुधारित भगवा वाणाची माहिती झाल्यानंतर 9 x 6 फूट लागवड अंतर बदलून ऑगस्ट 2011 मध्ये 14 x 9 फूट अंतरावर नऊ एकरांवर लागवड केली. सुरवातीला घरच्याच गोठ्यातील शेणखत व गांडूळ खताचा वापर केला. खोल काळी जमीन असल्याने पाण्याचे योग्य नियोजन केले. लागवडीपासून एकरी आठ तास पाणी देण्याची क्षमता असलेल्या ठिबक संचातून रोज एक तास व फुलोरा ते पक्वता काळात दोन तास पाणी दिले. लागवडीनंतर दर दोन दिवसांनी प्रत्येकी दोन किलो या प्रमाणे विद्राव्य खते दिली. नव्याने जानेवारी 2013 मध्ये भगवा वाणाची लागवड केली आहे. आंबे बहरावर भर असतो. या काळात एकसारखी फळधारणा होते. बहुतांशी वातावरण कोरडे असल्याने किडी-रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. फळ पक्वतेच्या सुरवातीच्या स्थितीत बऱ्याचदा सुरसा अळीचा प्रादुर्भाव होतो. बारकाईने लक्ष ठेवून प्रादुर्भाव होण्याआधीच कीटकनाशकांचा वापर होतो. पावसाळ्यात रोग आटोक्‍यात ठेवणे मुश्‍कील बनते. या काळात बोर्डो मिश्रण, स्ट्रेप्टोमायसीनवर आधारित जिवाणूनाशक, अन्य बुरशीनाशकांचा गरजेनुसार वापर होतो. रोगनियंत्रण आटोक्‍याबाहेर गेले तर हस्त बहर धरतो. छाटणीनंतर बागेत रोगग्रस्त काडीकचरा साचून राहणार नाही याची काळजी घेतो.
--
डाळिंबाला गणेश चतुर्थी व ईद सणांच्या काळात मागणी वाढते. कमाल 100 रुपये प्रति किलोपर्यंत दर वाढतात. तरीही आमच्या डाळिंबाला सरासरी 50 रुपये दर मिळाला आहे. एकरी सात टन सरासरी उत्पादन आहे. एकरी खर्च एक लाख 25 हजार रुपये वजा जाता 10 लाख 75 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
-----
कांदा हे देवरे कुटुंबाचे पारंपरिक पीक. सप्टेंबरमध्ये लागवड होते. मागील दहा वर्षांपासून एकरी सरासरी 150 क्विंटल उत्पादन राहिले आहे.
--
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी..
पिकाच्या गरजेनुसार पाणी नियोजन
वाढीच्या अवस्थेत "थ्रिप्स'चे नियंत्रण
शेणखताचा प्रमाणित वापर
पात पक्व होताना क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड (प्रमाण : एक लिटर पाण्यास अर्धा मि.लि. )+ 00:00:50 विद्राव्य खत (प्रति लिटर पाण्यास पाच ग्रॅम) ही फवारणी उपयुक्त ठरली.
--
उत्तम पोल्ट्री व्यवस्थापन
देवरे कुटुंबाने उद्योजक उद्धव अहिरे यांच्या आनंद हॅचरीज कंपनीशी करार करून 8000 पक्षी क्षमतेचे दोन शेड उभारले. दादाजी यांचे पुत्र मनीष व सूनबाई सौ. राजश्री यांच्याकडे पोल्ट्रीची जबाबदारी आहे. सुरवातीपासूनच मनीष ऐकू व बोलू शकत नाही. मात्र पक्ष्यांची भाषा त्यांनी चांगली अवगत केल्याचे त्यांच्या पोल्ट्री व्यवस्थापनावरून जाणवते. आहार, पाणी, लसीकरण आदी व्यवस्थापन वेळेवर असल्याने 45 दिवसांत वाढ झालेल्या पक्ष्यांचा फूड कन्झम्शन रेशो (एफसीआर) चांगला असल्याने करार केलेल्या कंपनीकडून पक्ष्यांना चांगले दर मिळतात. 45 दिवसांच्या प्रत्येक बॅच मधून 60 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 20 हजार रुपये खर्च वजा जाता 40 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. वर्षातून सुमारे पाच बॅच निघतात. पोल्ट्रीतून वर्षाला दोन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. 2009 मध्ये बांधलेल्या दोन शेडच्या बांधकामासाठी एकावेळी पाच लाख रुपये कायमस्वरूपी खर्च झाला आहे.
---
मका व कांदा यांची फेरपालट केली जाते. गेल्या वर्षी मक्‍याचे एकरी 30 क्विंटल उत्पादन मिळाले. क्विंटलला 1300 रुपये दर मिळाला. दहा एकरातून एकूण तीन लाख 90 हजार रुपये मिळाले.
---
कांद्याला मागील दोन वर्षांत सरासरी 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. हा दर परवडणारा नाही. यातून खर्च निघत नाही. कांद्याच्या बाजाराची चढ उताराची स्थिती वर्षानुवर्षे राहिली आहे. कांदा साठवून ठेवता येतो. बाजाराच्या स्थितीनुसार विकता येतो. कांद्याला दर कमी मिळाले तरी अन्य पिकांसाठी, सण, लग्न आदींसाठी लागणारे खेळते भांडवल मिळते ही कांदा शेतीची जमेची बाजू.
---
ऊस चार एकरात आहे. चार फुटांची सरी, इनलाईन ठिबक, मल्चिंग पेपर, सेंद्रिय खतांचा वापर या पिकात होतो. गेल्या चार वर्षांत एकरी उत्पादन 40 टनांवरून 60 टनांपर्यंत वाढले आहे.
--
पशुपालनाचा शेतीला आधार
गोठ्यात सहा म्हशी, दोन गाई, दोन बैल आहेत. आठ उस्मानाबादी शेळ्या, दोन बोकड व करडे आहेत. आठ वर्षांपासून पशुपालन केले जाते. गाईंपासून घरातील सदस्यांपुरतेच दूध काढले जाते. जनावरांपासून मिळणारे खत ही महत्त्वाची उपलब्धी मानली जाते. थोड्याशा गाभण म्हशींची खरेदी करून त्यांची काही महिने काळजी घेऊन वेताअगोदर विक्री केली जाते. 25 हजाराला खरेदी केलेल्या बऱ्याच म्हशींना विक्रीवेळी 50 हजारांचा दर मिळाला आहे. सुमारे पाच ते 20 हजारांचे निव्वळ उत्पन्न प्रति म्हशीच्या व्यवहारातून मिळते.
-----

देवरे कुटुंबाकडून शिकण्यासारखे...

*यशासाठी "टीमवर्क' खूप महत्त्वाचे
*व्यावसायिक दृष्टिकोन अत्यावश्‍यक
*सदस्यांच्या क्षमतेनुसार जबाबदारीचे वाटप
*मिश्रपीक पद्धती फायद्याची
*काळानुरूप शेतीत बदल आवश्‍यक
*उत्तम नियोजन हा यशाचा पाया
--------
संपर्क :
दादाजी श्‍यामभाऊ देवरे, 7588096083
प्रशांत सुभाष देवरे, 7588096082
किशोर दादाजी देवरे, 7588096084

डाळिंबाने दिली दुष्काळात उभारी

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानेश्‍वर गायकवाड यांचा प्रेरणादायी प्रयोग
...

कमी पाण्यात घेतले डाळिंबाचे पीक
बुलडाणा या अवर्षणप्रवण तालुक्‍यात यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. तालुक्‍यातील गिरडा येथील ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी अत्यंत कमी पाण्यात सोयाबीन, हरभरा यांच्यासह तीन एकरांत डाळिंबाची बाग जोपासली. एकरी सात टन उत्पादन घेताना बाग हातातून जाऊ दिली नाही. परिस्थितीला शरण न जाता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये त्यांनी आपल्या प्रयोगातून उभारीच देण्याचा प्रयत्न केला आहे.

गोपाल हागे
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी, भूजल पातळीही घटत चालली आहे. बुलडाणा तालुका तर अवर्षणप्रवण असल्याने या तालुक्‍यात सातत्याने पाण्याची समस्या भेडसावते. यंदा दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत काही शेतकरी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके घेण्यासाठी धडपडत आहेत. याच तालुक्‍यातील गिरडा येथील ज्ञानेश्‍वर जगदेवराव गायकवाड यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत सोयाबीन, हरभरा पिके जगवताना तीन एकरांत डाळिंबाची बागही जगवली. उत्कृष्ट पद्धतीने पिकविलेल्या डाळिंबाला भले त्याला दर समाधानकारक मिळाला नसेल, पण खचून जाणारे आम्ही शेतकरी नाही हे त्यांनी सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नवी उमेदच देण्याचा व त्यांचा आत्मविश्‍वास वाढविण्याचे काम या प्रयोगातून गायकवाड यांनी केले आहे.

गायकवाड परिवाराची संयुक्त 40 एकर कोरडवाहू शेती आहे. त्यामध्ये पारंपरिक पिके घेतली जातात.
पूर्वी कापूस हे पीक गावात घेतले जायचे. मात्र उत्पादनाच्या तुलनेत न परवडणारा दर पाहता हे पीक इथल्या शेतकऱ्यांनी कमी केले. गायकवाडही त्यापैकीच एक. सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांनी चाकोरी सोडून नव्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला. सोयाबीन, तूर, हरभरा आदी पिके घेणाऱ्या या शेतकऱ्याच्या डोक्‍यात डाळिंब लावण्याचे चक्र फिरू लागले. त्याआधी राज्यभरातील अनुभवी डाळिंब उत्पादकांच्या भेटी त्यांनी घेतल्या. कुठेही कार्यशाळा असेल तर त्यासाठी उपस्थिती लावली. ज्ञान मिळवले. पाडळी येथील रमाकांत पवार यांच्याशी चर्चा केली.

कष्ट करण्याची व पैसे गुंतविण्याची तयारी असेल तर लागवड करा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंभोडा येथील सुनील तायडे यांना सोबत घेऊन जिल्ह्यात चिखली परिसरातील राजेश चव्हाण, प्रकाश सुरोशे, विठ्ठल परिहार यांच्या डाळिंब बागांना त्यांनी भेटी दिल्या. परिहार यांच्याकडून कलमे घेतली. अखेरीस 15 ऑगस्ट 2010 रोजी 12 x 8 अंतरावर लागवड केली. सुमारे 1278 झाडे बसली. ही जमीन अतिशय हलक्‍या प्रतीची आहे. आज ज्या शेतात डाळिंब बाग उभी आहे ते शेत वडिलांनी 10 वर्षांपूर्वी विक्रीला काढले होते. पण यात हस्तक्षेप करून ज्ञानेश्‍वर यांनी व्यवहार थांबविला होता. त्यामुळेच आज बागेचे आशादायक चित्र गायकवाड पाहू शकले. लागवडीसाठी गादीवाफ्याचा वापर केला.

पाणी व्यवस्थापन
गायकवाड यांच्याकडे पाण्याची अत्यंत कमतरता आहे. यंदा पाऊसही अत्यंत अल्प झाला. शेतात वेगवेगळ्या ठिकाणी पाच विहिरी आहेत. मात्र कुठल्याच विहिरीला सध्या मुबलक पाणी नाही. त्यामुळे सुमारे 750 छोटे पाइप वापरून विहिरींचे पाणी संकलित करण्याचे ठरवले. उन्हाळ्याच्या दिवसांत कुठलीही विहीर पाच ते 10 मिनिटांपेक्षा जास्त पाणी उपसा देत नाही. परिणामी, सर्व पाणी एकत्र करून बागेजवळ असलेल्या विहिरीत आणले.
गायकवाड म्हणाले, की आमचा जिल्हा विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी आहे. कृषी विभागाकडून 44 x 44 मीटर क्षेत्रफळाचे शेततळे शंभर टक्के अनुदानावर दिले आहे. शेततळ्यातील क्षेत्रफळात थोडी वाढ केली आहे. मात्र आता पाऊस येईल त्या वेळीच ते भरेल. त्याचा उपयोग पुढील काळासाठीच होणार आहे.

सध्या तीन विहिरींमधून दर चौथ्या दिवशी दीड तास ठिबक संच चालवला जातो. काही पाणी शेजाऱ्यांकडून घेतले जाते. दोन विहिरींमध्ये जे काही पाणी शिल्लक आहे ते साठवून ठेवण्यात आले असून बहर व्यवस्थापनासाठी ते राखून ठेवण्यात आले आहे.
कृषी विभागाने "आत्मा' योजनेअंतर्गत आयोजित शेतकरी सहलीत गायकवाड यांचा समावेश होता. सांगोला, पंढरपूर या भागांत डाळिंब बागांना भेट दिली असता तिकडेही पाण्याची टंचाई दिसून आली. टंचाई असतानाही ते चांगले उत्पादन काढू शकतात तर आपण का नाही, असा प्रश्‍न त्यांच्या मनात येत होता. त्यातून प्रोत्साहनही मिळत होते.

मार्गदर्शन ठरले मोलाचे
डाळिंबाची बाग फुलविताना बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बारामतीचे अशोक तावरे, जेजुरीचे राहुल भोसले, पटेल काका, श्री. गोरे. किरण सुपे आदींचे मार्गदर्शन मिळाले. खते, कीडनाशके, कडधान्याची स्लरी, जिवाणू कल्चर या बाबींचा फायदा झाला.

मित्रांच्या सहकार्याने उभा राहिला "आकाशझेप' फॉर्म
गायकवाड यांनी आपल्या फार्मचे नाव आकाशझेप ठेवले आहे. डाळिंब बाग लावण्याच्या वेळी पदरी फारसे पैसे नव्हते. मात्र निविष्ठा, बागेला कुंपण, ठिबक या गोष्टींसाठी गायकवाड यांच्या मित्रपरिवाराने मोलाची मदत केली. पत्नी सौ. अनिता, भाऊ दिलीप, भावजय भाग्यश्री, वडिलांनी वेळोवेळी साथ दिली. बुलडाणा कृषी विभागातील अधिकाऱ्यांचेही सहकार्य झाले.

"ऍग्रोवन' दिशादर्शक
गायकवाड यांना शेतीतील प्रयोगांसाठी सतत प्रोत्साहन देण्याचे काम "ऍग्रोवन'मधील यशकथांनी केले आहे. डाळिंबासंदर्भात "ऍग्रोवन'मध्ये आलेली प्रत्येक बातमी, यशकथा यांचे कात्रण करून गायकवाड यांनी त्याची फाइल बनविली. ज्या ज्या गोष्टीची अडचण भासली तेव्हा "ऍग्रोवन' वाचून त्यावर मात केली. गिरडासारख्या छोट्याशा गावात आज ऍग्रोवन पोचला असून, तेथील गावकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्यातही गायकवाड यांचा पुढाकार राहिला आहे. साहजिकच अन्य शेतकरीही नव्या पिकांकडे वळू लागले आहेत.

उत्कृष्ट दर्जाचे डाळिंब
गायकवाड यांना तीन एकरांत सुमारे 21 टन म्हणजे एकरी सात टन माल प्रतिकूल परिस्थितीत मिळाला आहे.
त्यांना जागेवरच सांगोला येथील व्यापाऱ्यांनी बहुतांश मालाला 50 रुपये प्रति किलो भाव देऊन तो जागेवरच खरेदी केला. उर्वरित काही मालाला 47 रुपये भाव मिळाला. तीन एकरांतील बागेतून सुमारे दहा लाख रुपये उत्पन्न मिळाले. मात्र उत्पादन खर्चाबरोबर कुंपण, ठिबक सिंचन, स्लरी आदी गोष्टी जमेत धरून खर्च सुमारे साडेसात ते आठ लाख रुपये आला. यातील काही गोष्टींवरील खर्च हा दीर्घकाळ स्वरूपासाठीचा आहे. सध्या बागेची पुढील जोपासना सुरू असून नोव्हेंबरच्या दरम्यान मालकाढणी सुरू होईल. दुष्काळातही डाळिंब पिकाने उभारी दिल्याने गायकवाड यांचा हुरूप वाढला असून, पुढील हंगामात अधिक जोमाने काम करण्याचे गायकवाड कुटुंबाने ठरविले आहे.
...

गायकवाड यांच्या शेतीतील काही नियोजन
- शेणखतावर अधिक भर, त्याचा एकरी 10 ट्रॅक्‍टर ट्रॉली वापर
- हौद बांधून त्यात कडधान्याची स्लरी तयार करून त्याचा डाळिंब झाडांना वापर
- जिवाणू खते तसेच ट्रायकोडर्मा यांचाही स्लरीतून वापर
- प्रति डाळिंबाचे वजन 250 ते 300 ग्रॅम
- यंदाच्या वर्षी सोयाबीनचे एकरी सात क्विंटल तर 30 एकरांत 200 क्विंटलपर्यंत उत्पादन,
3100 रुपये प्रति क्विंटल दर
- काबुली हरभऱ्याचे एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन, दर क्विंटलला 5100 रुपये.
हरभऱ्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला जात आहे.
...

ज्ञानेश्‍वर गायकवाड, 9767827156
गिरडा, पो. पाडळी, ता.जि. बुलडाणा

मधमाशीपालनातील "मधुकर'

कोल्हापूर जिल्ह्यात उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या जंगली भागात नाईक यांचा पूरक व्यवसाय
पश्‍चिम घाटमाथ्यावरील जैवविविधता, तसेच तेथील कुटीर उद्योगांचीही जोपासना गरजेची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव (ता. भुदरगड) येथील मधुकर नाईक अनेक वर्षांपासून मधमाशीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी शेतीला हा पूरक व्यवसाय त्यांना किफायतशीर ठरला आहे.
राजेंद्र घोरपडे
पाटगाव येथील मधुकर संभाजी नाईक यांची तशी चार एकर शेती असली तरी त्यातील बरीच पडीक. भात व नाचणी ही त्यांची मुख्य पिके. त्यातून घरी खाण्यापुरते उत्पादन मिळते. मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे अर्थार्जन अजून होण्याची गरज होती. पाटगाव परिसरात जंगल असल्याने तेथे सातेरी जातीच्या मधमाश्‍या आढळतात. त्यांच्यापासून मधसंकलनाचा व्यवसाय करण्याचे नाईक यांनी ठरवले. सुरवातीला मधसंकलनासाठी रोजंदारी केली. सन 1970 मध्ये महिन्याला 30 रुपये मजुरी मिळायची. पुढे ही कला अवगत झाल्यानंतर त्यांनी स्वतःच हा व्यवसाय सुरू केला. सध्या यावरच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो.

अनेक चढ-उतार येऊनही त्यांनी हा व्यवसाय सोडला नाही. शहराचा रस्ता पकडला नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड देत आपली वाटचाल सुरूच ठेवली. या व्यवसायात आता मुलगा विनायक याचीही साथ मिळत आहे.

दहा वर्षे रोजंदारी केल्यानंतर 1980 पासून मधुकर यांनी व्यवसायात स्वयंपूर्णता मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या काळात वर्षाला 150 ते 200 किलो इतका मध ते गोळा करत. पाटगावात तेव्हा सहकारी तत्त्वावर मध उत्पादक संस्था होती. किलोला 30 रुपये दर सोसायटीकडून मिळत होता. सन 1994 पर्यंत या व्यवसायात चांगले उत्पन्न मिळत होते. 1994 मध्ये 28 हजार किलो इतके उच्चांकी मधसंकलन सोसायटीमध्ये झाले होते.

थायी सॅक ब्रुड रोगाचा प्रादुर्भाव सन 1994 नंतर थायी सॅक ब्रुड रोगाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायावर जवळपास गंडांतरच आले. अंडीकोषातच मधमाश्‍या मरायच्या. मरतूक मोठी असल्याने मधमाश्‍यांच्या वसाहतीच नष्ट झाल्या. वर्षाला केवळ 20 ते 25 किलो इतकेच मधसंकलन व्हायचे. यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडला. पाटगाव येथील मध उत्पादक सहकारी संस्थाही मोडकळीस आली. पण तरीही मधुकर यांनी हा व्यवसाय सोडला नाही. त्यांनी जिद्दीने तो पुढे सुरू ठेवला.

मध संकलन कसे चालते? सातेरी जातीच्या मधमाश्‍यांपासून मध काढला जातो.
-मुख्यतः फेब्रुवारी ते मे या कालावधीत संकलन चालते.
-मधमाश्‍यांच्या वसाहती असलेल्या पेट्या जंगलात योग्य ठिकाणी ठेवाव्या लागतात.
-फेब्रुवारीनंतर अनेक जंगली वनस्पती फुलोऱ्यावर येतात.
-कोणत्या कालावधीत कोणत्या वनस्पती फुलोऱ्यावर येतात, कोणत्या भागात या वनस्पतींची संख्या अधिक आहे. याची पाहणी करून तसे पेट्या ठेवण्याचे नियोजन मधुकर करतात.
त्यांच्याकडे मधसंकलन करणाऱ्या सुमारे 30 ते 35 पेट्या आहेत.
- वसाहतींची संख्या, हवामान व फुलोरा या बाबींवर आधारित मधाचे उत्पादन अवलंबून असते.
- वर्षाला सुमारे 250 ते 300 किलो इतका मध संकलित होतो.

-उत्पन्न दरवर्षी सुमारे 15 पेट्या तरी मधुकर यांना नव्याने कराव्या लागतात. प्रति पेटी एक हजार रुपये खर्च येतो. पेटी आणि मध संकलनासाठी मजुरीचा असा सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. सध्या 250 रुपये प्रति किलो दराने मधाची विक्री होते. परिसरातील, कोल्हापूर तसेच मुंबई भागातील ग्राहक घरी येऊन मध घेऊन जातात.
मधाची क्वालिटी चांगली असल्याने दरवर्षीचे ग्राहक तसेच नव्यानेही ग्राहक जोडले जातात.
मध यांत्रिक पद्धतीने काढला जातो, तसेच तो फिल्टर केला जातो. त्याची गुणवत्ता चांगली ठेवली जाते.
वसाहतींचीही विक्री केली जाते. गेल्या वर्षी मधुकर यांनी 16 वसाहतींची विक्री केली. प्रति वसाहत 900 रुपये दर मिळाला. या व्यवसायातून वर्षाला सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचे उत्पन्न खर्च वजा जाता मिळते. पाटगावसारख्या जंगली भागात उत्पन्नाचे प्रभावी स्रोतच नसल्याने तसेच परिसरातील कोणताही व्यवसाय इतका रोजगार देत नसल्याने मधुकर यांना हा व्यवसाय सर्वाधिक फायदेशीर वाटतो.

वसाहतींचे नियोजन डिसेंबरमध्येच मधमाश्‍यांच्या वसाहती पेट्यात भरण्याचे काम चालते. जुन्या पेटीतील राणीमाशी योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलली जाते. मधाचे संकलन योग्य प्रकारे होण्यासाठी पोळ्यांचा रंग पांढरा आहे का? वसाहतीतील मधमाश्‍यांचे काम नियमित चालू आहे का? खाद्याची कमतरता आहे का? आदींची पाहणी करणे गरजेचे असते. पेटीत दोन कप्पे असतात. या दोन्ही कप्प्यात माश्‍या पोळी तयार करतात. खालचा कप्प्यातील मध हा माश्‍यांसाठी खाद्य म्हणून ठेवण्यात येतो तर वरच्या कप्प्यातील मध काढून घेण्यात येतो.

मधासाठी आवश्‍यक वनस्पती मधाच्या संकलनासाठी जंगलामध्ये शिकेकाई, रामरक्षा, जांभूळ, मोरआवळा, हुरा, रान पेरव, पांगिरा, सावर, हेळा, नाना, सोनवेल, गेळा, कुंभा आदी वनस्पतींची संख्या अधिक असणे आवश्‍यक आहे. अशा भागातच मध संकलन अधिक होते. जंगलातील या वनस्पतींचे संवर्धन यासाठी गरजेचे आहे असे मधुकर यांना वाटते. मधमाशीपालनाच्या या व्यवसायामुळेच या वनस्पतींचे संवर्धन पाटगाव परिसरात केले जात आहे.

कर्ज काढून पेट्यांची खरेदी दोन वर्षांपूर्वी मधुकर यांनी खादी ग्रामोद्योगच्या योजनेतून तीन वर्षांसाठी कर्ज काढून 25 पेट्यांची खरेदी केली. एका पेटीची किंमत 1500 रुपये असून, यासाठी खादी ग्रामोद्योगचे 25 टक्के अनुदान मिळाले. वर्षाला दहा हजार रुपयांचा हप्ता व चार हजार रुपये व्याजापोटी भरावे लागतात. कर्ज काढून व्यवसाय करण्याचे धाडस मधुकर यांनी केले खरे, पण मध संकलनाची चिंता नेहमीच सतावते. जर योग्य संकलन झाले नाही, रोगाचा प्रादुर्भाव झाला तर हप्ता कसा फेडणार याची चिंता असते. महाबळेश्‍वर येथील मध संचालनालय, खादी ग्रामोद्योग व जिल्हा कृषी विभागाने घाटमाथ्यावरील मध उत्पादकांसाठी वेगळी योजना तयार करण्याची गरज त्यांना वाटते.

- मधुकर संभाजी नाईक, 9405265639
पाटगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गेल्या वर्षी 40 शेतकऱ्यांना खादी ग्रामोद्योगतर्फे मधमाशीपालनाचे प्रशिक्षण व अनुदानावर 120 पेट्यांचे वाटप केले. हे लाभार्थी पाटगाव, तांब्याची वाडी, मानी, मठगाव परिसरातील आहेत. यंदाही 40 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- महावीर लाटकर, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड

Sunday, 24 March 2013

संरक्षित शेती : हरितगृहाची उभारणी

हरितगृहासाठी जागेची निवड करताना योग्य प्रकारची माती व पाणी या मूलभूत गोष्टींचा विचार करावा; तसेच सांगाडा व आच्छादनातील गुणविशेषांची आपल्या खर्चाच्या पातळीशी समन्वय साधण्याची आवश्‍यकता असते. या बाबींविषयी आजच्या लेखात अधिक माहिती घेऊ.

पॉलिहाऊस किंवा ग्रीनहाऊस (हरितगृह) या दोन्ही एकच गोष्टी आहेत. पूर्वी हरितगृहे लाकडी सांगाड्यावर आच्छादनासाठी काच वापरून उभी केली जात असत. आता प्लॅस्टिक तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणांमुळे काचेऐवजी प्लॅस्टिक वापरले जाते. काचेच्या तुलनेत पॉलिथिनचा वापर हा स्वस्त असल्याने पॉलिथिन आच्छादने लोकप्रिय झाली आहेत, त्यामुळे आता हरितगृहांना पॉलिहाऊस असेही म्हटले जाते.

हरितगृह हे सांगाड्यांच्या रचनेला पारदर्शक साहित्याने आच्छादित केले जाते, त्यामुळे हरितगृहातील पिकांचे वारा, पाऊस, किरणोत्सर्ग इत्यादींपासून संरक्षण होईल अशी रचना असते. सर्वसाधारणपणे फुले, भाज्या व फळे हरितगृहात घेतली जातात. संरक्षित वातावरणामध्ये पिकांच्या चांगल्या वाढीसाठी योग्य असे वातावरण तयार केले जाते. तसेच, रात्रीच्या वेळी पिकाने हवेत सोडलेला कार्बन- डाय- ऑक्‍साईड वायू हरितगृहात अडविला जातो, तोच सकाळी पिकांकडून शोषला जातो. त्यामुळे बाहेरील वातावरणापेक्षा हरितगृहामध्ये अधिक उत्पादन मिळते.

हरितगृहामध्ये प्रामुख्याने स्टीलचा सांगाडा, आच्छादन साहित्य, पाणी जाण्यासाठी गटार व वायुविजन यंत्रणा; तसेच हवामान नियंत्रण यंत्रणा बसविलेल्या असतात. आता आपण हरितगृहाची निर्मिती करण्यासाठी आवश्‍यक बाबींची, निकषांची माहिती घेऊ.

हरितगृहासाठी जागेची निवड :
हरितगृहाची उभारणी कोणत्या शेतात करावी, त्याची जमीन कशी असावी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात येतो, त्यामुळे हरितगृहासाठी
जागा निवडताना पुढील मुद्दे विचारात घ्यावेत :

1) मातीचा सामू 5.5 ते 6.5 व ई.सी. (विद्युतवाहकता) 0.5 ते 0.7 Ms/ cm असावा. अशी माती शेतात उपलब्ध नसल्यास अन्य ठिकाणावरून वरील वैशिष्ट्ये असलेली, पाण्याचा निचरा होणारी लाल माती आणून त्यात वाफे करावेत.

2) पाण्याची उपलब्धता - चांगल्या प्रतीचे पाणी वर्षभर उपलब्ध असावे. शक्‍यतो नदीचे किंवा ओढ्याचे वाहते पाणी असल्यास उत्तम.

3) सिंचनाच्या पाण्याचा सामू 5.5 ते 7.0 व ई.सी. 0.1 ते 0.3 Ms/cm असावा.

4) उभारणीची जागा आजूबाजूच्या परिसरापेक्षा उंचावर असावी.

5) निवडलेली जागा प्रदूषणमुक्त असावी.

6) वाहतुकीसाठी व बाजारात माल पाठविण्यासाठी उत्तम अंतर्गत रस्ते असावेत.

7) आगामी विस्ताराच्या दृष्टीने जागा पुरेशी मोठी असावी.

8) मजूर सहज व स्वस्त उपलब्ध असावेत.

9) जागेवर दळणवळणाच्या चांगल्या सोयी असाव्यात.

...अशी असावी हरितगृहाची दिशा
प्रकाशाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग व दिशा याप्रमाणे हरितगृह उभारणी व बांधणी करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात :
1) हरितगृहाच्या वरच्या व्हेंट (खिडकी)चे तोंड पूर्वेकडे असावे.

2) गटर दक्षिणोत्तर असावे.

3) गटरजवळ 1.25 ते 2.50 टक्के इतका उतार असावा.

4) हरितगृहाच्या भिंतीकडे (गॅबल) 0 ते 2.00 टक्के इतका उतार असावा.

हरितगृहात नियंत्रित केले जाणारे घटक
- संरक्षित लागवडीत झाडाला सर्व प्रकारचे भौतिक संरक्षण दिले जाते. या प्रकारच्या शेतीमध्ये संरक्षणाबरोबरच पिकांची वाढ, विकास यासाठी आवश्‍यक बाबी पिकांच्या पूर्ण कालावधीसाठी असतील, असे पाहिले जाते.

- हरितगृह उभारताना त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचा टिकाऊपणा, मजबुती, आच्छादनातून सूर्यकिरणांचे पार होण्याचे प्रमाण, त्याची उष्णतारोधकता, हरितगृहाची वायुविजन क्षमता व आतमध्ये, तसेच हरितगृहावर काम करण्यातील सुलभता यांच्यासोबतच होणारा खर्च या सर्व घटकांचा सुवर्णमध्य साधावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून हरितगृहाच्या विविध प्रकारांतील एक प्रकार निवडावा.

- हरितगृहामध्ये काच अथवा प्लॅस्टिकचे आच्छादन असल्याने बाह्य वातावरणापेक्षा आतमध्ये कृत्रिम वातावरण निर्मिती शक्‍य असते. मात्र, मर्यादित वायुविजन होत असल्याने हरितगृहातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा अधिक होते. पिकांच्या उत्पादन आणि अन्ननिर्मितीसाठी प्रकाशसंश्‍लेषण व बाष्पोत्सर्जन या दोन महत्त्वाच्या क्रिया आहेत. या क्रिया पिकांचे उत्पादन व दर्जावर परिणाम घडवून आणतात. यासाठी हरितगृहात हवामानाचे खालील
पाच घटक नियंत्रित केले जातात.

1) सूर्यकिरण (प्रकाश).
2) तापमान.
3) कार्बन- डाय- ऑक्‍साईड.
4) आर्द्रता.
5) हवेची हालचाल.

या बाबी नियंत्रित करण्यासाठी हरितगृहाची उभारणी व सिंचन प्रणाली करतानाच विचार करण्यात येतो. आच्छादनाच्या पारदर्शकपणाइतकेच उन्हाळ्यात प्रकाशाची तीव्रता कमी करण्याची आवश्‍यकता असते, त्यासाठी औष्णिक व सावलीच्या स्क्रीन्स/ जाळ्या वापरल्या जातात. तसेच, सूर्यकिरण कमी प्रमाणात हरितगृहात आल्याने आतील उष्णता वाढत नाही.

हरितगृहांचे प्रकार
हरितगृहांचे त्यांच्या रचनेवरून, त्यात वापरलेल्या साहित्यावरून, आच्छादनावरून विविध प्रकार पडतात.
I) रचनेच्या आकारावरून
टनेल प्रकार,
मॅक्‍सिव्हेंट प्रकार,
सॉ टूथ (करवतीच्या दात्यांप्रमाणे) प्रकार,
गटर ओपनिंग

II) सांगाड्याच्या साहित्यावरून
1) गॅल्व्हनाइज्ड स्टील (जी.आय. व काही भाग ऍल्युमिनिअमचे)
2) माइल्ड स्टील (एम.एस.) रचना.
3) लाकडी पॉलिहाऊस.

III) आच्छादनाच्या प्रकारावरून
1) लवचिक आच्छादन प्रकार (प्लॅस्टिक उदा. पॉलिहाऊस)
2) घट्ट/ ताठ (रिजिड) आच्छादन प्रकार (उदा. काच, एफआरपी शिट्‌स)
3) शेडहाऊस - शेडनेट.

आच्छादन साहित्याचे गुणविशेष
आच्छादनासाठी वापरावयाच्या साधनांमध्ये खालील गुणधर्म असणे आवश्‍यक असते.

1) प्रकाश पारदर्शकता व प्रसारण :
आच्छादनाचा सर्वांत महत्त्वाचा गुणविशेष प्रकाशाचे प्रसारण करण्यासंदर्भात तपासला जातो. आच्छादनाने हरितगृहात सर्वाधिक उजेड प्रसारित करतानाच पिकासाठी हानिकारक ठरणाऱ्या घटकांना (अतिनील, अवरक्त किरणे) रोखले पाहिजे. सूर्यप्रकाशात विविध तरंग लांबीचे किरण असतात व त्यात मानवाला तसेच झाडांसाठी उपयुक्त असणारे किरण 400 ते 700 नॅनोमीटर या तरंगलांबीचे असतात. म्हणून हरितगृहासाठी वापरली जाणारी पॉलिथिन बनविताना ती केवळ प्रकाशसंश्‍लेषणासाठी लागणारे किरणच प्रसारित करेल अशी असावी लागते.

2) दीर्घकाळ टिकाऊ क्षमता
- फिल्मच्या पॉलिथिनवर सूर्यकिरणातील अतिनील किरणांचा परिणाम होतो. या घटकापासून संरक्षण करण्यासाठी फिल्ममध्ये काही विशिष्ट रसायने मिसळली जातात. या रसायनांमध्ये अतिनील किरण शोषून घेणारे किंवा अतिनील किरणांचे स्थिरीकरण करणारे घटक असतात. या रसायनामुळे पॉलिथिनच्या विघटनाचा वेग कमी करता येतो.
- टिकाऊपणास कारणीभूत असलेला दुसरा घटक म्हणजे त्याची जाडी. अधिक जाड फिल्म लवकर खराब होत नाही.

3) धुके प्रतिबंधकता
फिल्मवर काही धुके प्रतिबंधक घटकांचा वापर केलेला असतो. हे घटक फिल्मवर साबणासारखे काम करतात, ज्यामुळे दवामुळे फिल्मवर साचलेले पाणी तिथेच टपकण्याऐवजी फिल्मवर पातळ थर निर्माण करतात, त्यामुळे पाणी ठिबकणेही थांबते.

4) धूळ प्रतिबंधक
हरितगृहाच्या फिल्म्सवर धूळ जमा होऊन प्रकाशाचे प्रसारण कमी होते. हे होऊ नये, यासाठी विशिष्ट घटक वापरून फिल्म गुळगुळीत केली जाते, त्यामुळे फिल्मवर धूळ चिकटणे काही प्रमाणात कमी होते.

5) पाकळ्यांच्या काळपटपणास प्रतिकारकता
सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे काही लाल गुलाबांच्या जातीच्या पाकळ्या काळपट होतात. ही विकृती कमी करण्यासाठी अतिनील रोधक फिल्म्स वापरली जाते.

6) शैवाल प्रतिकारकता
पावसाळ्यात फिल्मवर शेवाळ तयार होऊन प्रकाशाचे प्रसारण कमी होते, त्यावर शैवाल प्रतिकारक घटक वापरून हा त्रास कमी करता येतो.

हरितगृहाची देखभाल
- हरितगृहाची दारे, शेडनेटची चाके, रॅक्‍समोटर व गिअर असेंब्ली भागांना महिन्यातून एकदा ग्रिसिंग (वंगण) करणे आवश्‍यक आहे.
- बाजूच्या व्हेंट्‌ची हॅंडल्स ः कडेच्या व्हेंट्‌समध्ये त्यांच्या हॅंडल्सना महिन्यातून एकदा वंगण करावे, यामुळे व्हेटच्या उघडझापीला कमी दाब लागतो.
- वरील प्लॅस्टिकची स्वच्छता - प्लॅस्टिकवर धुळीचे कण जमा झाल्यास प्रकाशाचे प्रसारण सुमारे 15 टक्‍क्‍यांनी कमी होते. जास्त प्रकाश प्रसारित होण्यासाठी प्लॅस्टिकचे वरील आच्छादन योग्य वेळी साफ करणे आवश्‍यक आहे.
- डिस्टेंपर किंवा चॉकचा वापर - विशेषतः उन्हाळ्यात उष्ण हवामानात हरितगृहातील तापमान किंवा प्रकाशाची तीव्रता कमी करण्यास चॉक/ डिस्टेंपरचा वापर करावा लागतो.
- एम. एस. पॉलिहाऊसमध्ये दोन वर्षांतून एकदा चंदेरी रंग लावल्यास गंजणे थांबते.

रवींद्र देशमुख, 9822499265 - 02114 - 223980
(लेखक हॉर्टिकल्चरल ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, जि. पुणे येथे व्यवस्थापकपदी कार्यरत आहेत.)

माशांना द्या गुणवत्तापूर्ण खाद्य

गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनामध्ये माशांची वाढ ही तळ्याची उत्पादकता, आकार आणि किती दिवसांतून त्यातून बीज काढणे शक्‍य होईल यावर अवलंबून असते. तळ्यांच्या नैसर्गिक सुपीकतेला जोड म्हणून खते वापरून तळ्याची उत्पादकता वाढविणे फायदेशीर ठरते. याचबरोबर तलावात मत्स्यबीज साठवणुकीपूर्वी पाणवनस्पतींचे निर्मूलन करणे आवश्‍यक आहे. शार्दूल गांगण, डॉ. के. डी. पाटील, डॉ. राम निर्मळे
गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला आता व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रगत तंत्राचा वापर केल्यास दर वर्षी हेक्‍टरी 3500 कि.ग्रॅ. किंवा त्याहून अधिक उत्पन्न येऊ शकते. भारतीय जातींच्या जोडीला चिनी जातीच्या माशांचा वापर करून उत्पादनात वाढ करणे शक्‍य आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनामध्ये माशांच्या वाढीसाठी तीन प्रकारची तळी असतात -
(1) संगोपन तळे - या तळ्याचा आकार सामान्यतः 12 x 6 x 1 मी. असतो. या तळ्याचा उपयोग मत्स्य जिऱ्यांच्या वाढीसाठी दोन ते तीन आठवड्यांसाठी होतो. या तलावात पाण्याची खोली साधारणपणे एक मी. एवढी आहे.
(2) संवर्धन तळे - या तळ्याचा आकार हा 25 x 12 x 1 मी. असतो. या तळ्याचा उपयोग मत्स्यबीजाच्या वाढीकरिता एक ते दोन महिन्यांच्या कालावधीसाठी होतो.
(3) उत्पादन तळे - मत्स्यबोटुकलीचे मोठे मासे होईपर्यंत ती या तलावात वाढविली जाते. तलावाचा आकार 1,000 ते 20,000 चौरस मी. एवढा असतो. तलावाची खोली ही दोन ते तीन मी.पर्यंत असते.

तलावातील पाणवनस्पतींचे निर्मूलन - तलावात मत्स्यबीज साठवणुकीपूर्वी पाणवनस्पतींचे निर्मूलन करणे आवश्‍यक असते. तलावात विविध प्रकारच्या पाणवनस्पती आढळतात. उदा. तरंगत्या पाणवनस्पती (वॉटर हायसिंथ, वॉटर लेट्यूस, डकवीड्‌स इ.), मुळे असणाऱ्या व पाने-फुले पाण्याच्या वर येणाऱ्या (कमळे, वॉटर लिली इ.), पूर्णपणे बुडालेल्या (हायड्रिला, नजास इ.) आणि तलावाच्या काठाकाठावर उगवणाऱ्या (सेजिस, वॉटर प्रिम्रोज, आयपोमिया, पाणगवत इ.)
या पाणवनस्पतींचे बरेच तोटे आहेत,
- या वनस्पती अनावश्‍यक माशांना आश्रय देतात.
- मासेमारीला अडथळा निर्माण होतो.
- प्लवंग निर्मितीला अडथळा येतो.
- पाण्यामध्ये प्राणवायूची कमतरता निर्माण होते.

... असे करा पाणवनस्पतींचे नियंत्रण - या वनस्पती थोड्या प्रमाणात व विखुरलेल्या असतील तर मनुष्याच्या मदतीने त्या काढून टाकाव्यात. ते शक्‍य नसल्यास खुरपीसारख्या छोट्या हत्यारांनी काढून टाकावी.
- वनस्पती जर दाट असतील तर योग्य रसायनांचा वापर करावा. उदा. टॅफिसाइड, हेक्‍झामार, फर्निक्‍झोन यांसारखी रसायने प्रति हेक्‍टरी आठ ते 10 कि.ग्रॅ. प्रमाणात वापरावीत. तसेच द्रवरूप अमोनिया दर दशलक्ष पाण्यात 15 ते 20 भाग वापरून मुळे धरणाऱ्या वनस्पती नष्ट करता येतात.
- जीवशास्त्रीय पद्धतीनेही पाणवनस्पतींवर नियंत्रण ठेवता येते. तळ्यामध्ये गवत्या मासा, तिलापिया आणि सिप्रिनस कार्प जातींच्या माशांची साठवणूक करून पाणवनस्पतींवर नियंत्रण ठेवता येते. साधारणपणे एक किलो वजनाचे 1200 गवत्या मासे 10 दिवसांत 11 टन हायड्रिला खाऊ शकतात.

(1) मत्स्यजिऱ्यांची आणि मत्स्यबीजांची साठवणूक - संगोपनासाठी मत्स्यजिरे सोडण्याचे प्रमाण हे संगोपन तळ्याची उत्पादकता, आकार आणि किती दिवसांतून त्यातून बीज काढणे शक्‍य होईल यावर अवलंबून असते.
- चांगली उत्पादकता असणाऱ्या आणि 200 ते 1000 चौरस मी. आकाराच्या तळ्यात 10 ते 15 दिवस संगोपन करून 15 ते 25 मि.मी. लांबीचे बीज काढावयाचे असल्यास हेक्‍टरी 50 ते 60 लाख मत्स्यजिरे सोडता येते. जर 12 ते 15 मि.मी. लांबीचे मत्स्यबीज बोटुकलीपर्यंत वाढविण्यासाठी सोडावयाचे असल्यास त्यांचे प्रमाण हेक्‍टरी पाच लाख बीजे एवढे असावे.
- 900 चौरस मी. आकाराच्या शेततळ्यामध्ये सहा ते आठ सें.मी. आकाराची 650 बोटुकली साठवावी.
तळ्यातील मूळच्या तसेच खत योजनेने वाढविलेल्या नैसर्गिक खाद्याच्या जोडीला असलेले पूरक खाद्य, मत्स्यजिऱ्याला किंवा बीजाला दिल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. भाताचा कोंडा आणि शेंगदाण्याची पेंड यांचे समप्रमाणात मिश्रण हे पूरक खाद्य म्हणून वापरता येते. मत्स्यसंवर्धनामध्ये वापरावयाच्या पूरक खाद्याचे प्रमाण हे संवर्धनाच्या सुरवातीला माशांच्या वजनाच्या दहा टक्के तसेच शेवटी एक ते दोन टक्के एवढे असावे. हे प्रमाण खालील बाबींवर अवलंबून असते.
- साठवणुकीचे प्रमाण
- बोटुकलीची वाढ
- संवर्धनाचा कालावधी

(2) संवर्धन तलावाचे व्यवस्थापन - संवर्धनासाठी मत्स्यबीज सोडण्याचे प्रमाण हे संवर्धन तळ्याची उत्पादकता व आकार, किती दिवसांत त्यातून मत्स्यबोटुकली बीज काढणे शक्‍य होईल यावर अवलंबून असते. चांगली उत्पादकता असणाऱ्या आणि 50 ते 100 चौरस मी. आकाराच्या तळ्यात 1.5 ते 2.5 महिने संगोपन करून 60 ते 70 मि.मी. लांबीची बोटुकली काढावयाची असल्यास हेक्‍टरी 80 हजार ते एक लाख बीजाची साठवणूक करता येते.

(3) उत्पादक तलाव व्यवस्थापन -
तळ्यांच्या नैसर्गिक सुपीकतेला जोड म्हणून खते वापरून तळ्याची उत्पादकता वाढविणे फायदेशीर ठरते. जमिनीचा दर्जा आणि सामू लक्षात घेऊन प्रति हेक्‍टरी 200 ते 500 कि.ग्रॅ. चुना एकदाच वापरावा.
सेंद्रिय व रासायनिक खतांचे प्रमाण सामान्यतः खालीलप्रमाणे असावे.

मोहाची पेंड वापरली असेल तर पहिल्या महिन्यात शेण देण्याची आवश्‍यकता नाही. कारण पेंड हेच उत्कृष्ट खत आहे. निवडक जातीची बोटुकली तळ्यात 10 ते 15 सें.मी. लांबीची असताना सोडावी. तळ्यामध्ये संहारक मासे नसतील तर बोटुकली लहान (सहा ते आठ सें.मी.) असली तरी चालतात. बोटुकली दूरवरून आणली असल्यास प्रथम ती हाप्यामध्ये 24 ते 48 तास ठेवावी. नंतर त्यामधील निरोगी बोटुकली निवडून व मोजून तळ्यात सोडावीत. रोगट व जखमी बोटुकली तळ्यात सोडू नयेत. मत्स्य बोटुकली तळ्यात सोडण्यापूर्वी ती तीन टक्के तीव्रतेच्या मिठाच्या द्रावणात किंवा फिकट गुलाबी पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणात दहा मिनिटे ठेवून मगच सोडणे अधिक चांगले ठरते. वरील आकाराची बोटुकली पाच ते दहा हजार नग प्रति हेक्‍टर या प्रमाणात तलावाच्या उत्पादकतेनुसार साठवणूक करावी.
उत्पादक तलावात माशांची साठवणूक खालीलप्रमाणे करावी.

उत्कृष्ट मत्स्यशेतीसाठी आणि अधिकाधिक मत्स्य उत्पन्नासाठी केवळ नैसर्गिक उत्पादकतेवर अवलंबून राहून चालत नाही. नैसर्गिक खाद्याबरोबर पूरक खाद्यही देणे अत्यंत आवश्‍यक आहे. शेंगदाणा पेंड आणि भाताचा कोंडा यांचे समभाग मिश्रण माशांना पूरक खाद्य म्हणून वापरतात. हे पूरक खाद्य माशांना दररोज ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळीच द्यावे. म्हणजे माशांना त्याची सवय होऊन ते त्या वेळी खाण्यासाठी जमतील आणि अन्न वाया जाणार नाही. पेंड आणि भाताचा कोंडा काही तास पाण्यात भिजवून त्याचे घट्ट गोळे बनवून माशांना द्यावेत.

साधारणपणे तीन ते चार महिन्यांपासून माशांच्या आवश्‍यकतेनुसार तीन ते चार दिवसांचे खाद्य म्हणजेच शेंगदाण्याची पेंड आणि भाताचा कोंडा एकत्रित करून एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरावा. त्या बॅगेला करंगळीच्या आकाराएवढी भोके पाडावीत. त्यानंतर या पिशवीच्या दोनही बाजूंना दोरी बांधून ती तलावाच्या मध्यभागी राहील अशी ठेवावी. माशांना खाद्याची सवय झाल्यावर मासे पिशवीला असलेल्या भोकातून येणारे खाद्य खातात. खाद्य संपून पिशवी पाण्यावर तरंगती दिसल्यास त्यामध्ये पुन्हा खाद्य भरून द्यावे. अशा प्रकारे खाद्य दिल्यास ते कमी वाया जाते, तसेच बाजारामध्ये विविध कंपन्यांचे पाण्यावर तरंगणारे कृत्रिम खाद्य उपलब्ध आहे.
माशांना पूरक खाद्याचे प्रमाण खालीलप्रमाणे द्यावे.

संपर्क - 022 - 27452775
(लेखक शार्दूल गांगण, डॉ. के. डी. पाटील हे खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथे आणि डॉ. राम निर्मळे हे मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, जिल्हा रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)

Wednesday, 20 March 2013

सुयोग्य व्यवस्थापनातून "एकरी 105' टन ऊस

पुणे जिल्ह्यातील मुखई (ता. शिरूर) येथील तरुण अभियंता दीपक हिरवे यांनी सोळा एकर सुरू उसाला सबसरफेस या आधुनिक ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला. शिक्षणाचा पुरेपूर वापर करत ऊस शेतीचे व त्यातही पाणी व खतांचे सुयोग्य व्यवस्थापन करीत एकरी एकशे पाच टन उत्पादन त्यांनी घेतले आहे. अमोल बिरारी
दीपक हिरवे (बीई- सिव्हिल) यांनी सुरवातीला काही दिवस पुण्यात नोकरी केली. परंतु शेतीची मनापासून आवड असल्याने 2003 पासून पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे एकूण 23 एकर क्षेत्र आहे. घेतलेल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर शेतीत करत त्यांनी ऊस शेतीचे केलेले व्यवस्थापन वाखाणण्याजोगे आहे. दररोज ठिकठिकाणचे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी येतात. संरक्षित पाण्याची सोय म्हणून 75 लाख लिटरचे शेततळे त्यांनी केले आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता येते, त्यासाठी पिकाला लागतं तेवढंच पाणी दिलं पाहिजे, असं हिरवे म्हणतात. त्यांच्याकडे पावणेचार एकरात निडवा होता, त्याचेही प्रति एकरी 85 टन उत्पादन त्यांनी घेतले आहे.

लागवडीचे नियोजन - हिरवे यांनी गेल्या वर्षी तीन व 12 फेब्रुवारी आणि 28 मार्च रोजी सुरू उसाची फिनोलेक्‍स कंपनीच्या सबसरफेस ठिबक तंत्रज्ञानाने लागवड केली. लागवडीसाठी जोडओळ पट्टा पद्धतीचा अवलंब केला. दहा फुटांचा पट्टा, दोन ओळींतील अंतर दोन फूट, तर दोन बेण्यांमधील अंतर दीड फूट ठेवले. "को 86032' वाणाच्या दोन डोळा पद्धतीचा वापर बेण्यासाठी केला. 16 एमएम x 0.40 मीटर x 2.1 लिटर प्रति तास पद्धतीने सबसरफेसची मांडणी असून, सबसरफेसची लॅटरल सात इंच खोलीवर आहे. याबाबत हिरवे म्हणाले, की पूर्वी सरफेस ठिबकद्वारे ऊस घेत होतो. उत्पादन एकरी 70 ते 85 टनांपुढे जात नव्हते. मात्र सबसरफेसच्या वापरामुळे कमी पाण्यात वाफसा स्थिती टिकून राहिली, फुटव्यांची संख्या योग्य राखता आली. पिकाच्या वाढीनुसार पाणी देणे शक्‍य झाले. एकरी गाळपयोग्य सुमारे 42 हजार ऊस राखता आल्याने उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ झाली. लागवडीपूर्वी शेतात पाचट कुजविणे तसेच जैविक खतांच्या वापराचाही फायदा झाला. सबसरफेससाठी एकरी 28 हजार रुपये खर्च झाला.

सुरवातीला जमिनीची उभी- आडवी नांगरट करून आठ दिवसांनी ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने कल्टिव्हेटर वापरले. चार-पाच दिवसांनी रोटाव्हेटरचा वापर करून एकरी चार ते पाच टन चांगले कुजलेले शेणखत शेतात मिसळून दिले. जमीन मऊ, बारीक व भुसभुशीत केली. ठिबकची ड्रीपलाइन ज्या अंतरावर पसरायची होती, त्या ठिकाणी दोन फुटांच्या पट्ट्यामध्ये एकरी 100 किलो डीएपी, 100 किलो एमओपी, 50 किलो निंबोळी पेंड, तीन किलो गंधक युक्त खत, तीन किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, तीन किलो झिंक सल्फेट, तीन किलो फेरस सल्फेट मातीत चांगले मिसळले. खत दिलेल्या पट्ट्यावर सबसरफेसची लॅटरल टाकली.
लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करताना एक ग्रॅम कार्बेन्डाझिम, तीन मि.लि. मॅलॅथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावणामध्ये 15 मिनिटे बेणे बुडवून ठेवले. सावलीत सुकवून अर्ध्या तासाने जैविक बेणेप्रक्रिया केली. त्यात 300 ग्रॅम ऍझेटोबॅक्‍टर, 300 ग्रॅम पीएसबी प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बेणे तीस मिनिटे बुडवून सावलीत सुकवले. जोड ओळ पट्टा पद्धत वापरायची असल्याने दहा फुटांवर लॅटरल टाकून त्याच्या दोन्ही बाजूला लागवड केली. त्यानंतर 60 ते 65 दिवसांनी छोट्या ट्रॅक्‍टरने व त्यानंतर 90 ते 95 दिवसांनी पुन्हा भर लावली. दोन्ही वेळेस पट्ट्यातील तणांचे नियंत्रण चांगले झाले. मोठी बांधणी करताना एकरी फुटव्यांची संख्या योग्य ठेवण्यावर लक्ष दिले.

...अशी दिली खतमात्रा मुख्य बांधणीवेळी एकरी 75 किलो डीएपी, 75 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 100 किलो युरिया, सहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, झिंक सल्फेट सहा किलो, आठ किलो फेरस सल्फेट आणि 100 किलो सेंद्रिय खत वापरले. ही सर्व खते ओळीत टाकून मातीत मिसळून घेतली. त्यानंतर बांधणी करून 15 दिवसांनी ठिबकद्वारे एकरी एक लिटर ऍसिटोबॅक्‍टर, एक लिटर पीएसबी आणि एक लिटर केएसबी दिले.

ठिबकद्वारे खताचे वेळापत्रक - (प्रति पाच एकर प्रति पाच दिवस) 13-0-45-------10 किलो- 15 ते 60 दिवसांदरम्यान
12-61-00-----10 किलो- 60 ते 90 दिवसांदरम्यान
19-19-19-----15 किलो-90 ते 120 दिवसांदरम्यान
0-0-50--------10 किलो- 120 ते 280 दिवसांपर्यंत

पाणी देण्याचे वेळापत्रक - लागवडीनंतरचे महिने------एमएम प्रति एकर
एक ते दोन--------------दोन ते अडीच
तीन ते पाच-------------अडीच ते तीन
सहा ते दहा-------------दोन ते अडीच
दहा ते बारा-------------चार ते साडेचार

लागवडीनंतर दीड महिन्याने एकरी दोन लिटर ह्युमिक ऍसिड दोन वेळा दर दहा दिवसांनी दिले. लागवडीनंतर चौथ्या, पाचव्या व सहाव्या महिन्यात फिनोलेक्‍स कंपनीचे ड्रीपझाईम एक लिटर प्रति एकरी ड्रीपद्वारे दिले. तणनियंत्रणासाठी ऍट्राझीन व 2-4, डी तणनाशकांचा वापर केला. पिकाच्या पाणी व्यवस्थापनात हिरवे यांना फिनोलेक्‍सचे संचालक (मार्केटिंग) डॉ. नरेंद्र राणे आणि सहायक व्यवस्थापक (कृषी) विठ्ठल गोरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

तंत्रज्ञान वापर हायलाईट्‌स - - सबसरफेसमध्ये प्रेशर क्रॉम्प्रेन्सिव्ह नॉन ड्रेन (पीसीएनडी) ड्रीपलाइन वापरली. यामुळे मुळांच्या कक्षेत 40 सें.मी.पर्यंत सतत वाफसा स्थिती राहिली. पाणी व खतांची उपलब्धता समान प्रमाणात झाली.
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढली. मुळे सक्षम राहिल्याने खते व पाण्याचा कार्यक्षम वापर झाला.
- पिकाच्या अवस्थेनुसार तसेच वयानुसार योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे शक्‍य झाले. त्याचा परिणाम रोपांची एकरी संख्या मर्यादित ठेवता आली.
- दुष्काळी परिस्थितीत विहीर तसेच बोअरचे पाणी कमी पडले असता केवळ सहा ते सात हजार लिटर प्रति एकरी पाणी देऊनही ऊस जोपासता आला. त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता पेऱ्यांची संख्या सहा ते आठ इंचापर्यंत आणि कांड्यांची संख्या 28 ते 32 पर्यंत गेली.
- प्रति उसाचे वजन सरासरी अडीच ते तीन किलो भरले. एकरी सरासरी 105 टन उत्पादन मिळाले.
साखर कारखान्याकडे सुमारे पाच एकरातील ऊस गेला असून त्याला प्रति टन 2300 रुपये दर मिळाला आहे.

तंत्रज्ञान वापरल्याचे फायदे - - जमिनीत वाफसा टिकून राहिला
- सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत झाली
- अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली
- नियंत्रित पाण्यामुळे द्रव स्वरूपातील सामू आणि ईसी चांगला राहिला

हिरवे यांच्याकडून शिकण्यासारखे - - कमी मनुष्यबळात शेतीचे व्यवस्थापन
- उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर
- तंत्रज्ञान माहितीसंदर्भात मोकळेपणाने देवाण-घेवाण
- शिक्षणाचा शेतीत पुरेपूर वापर

उत्पादन खर्च (प्रति एकरी, रू.) - जमीन तयार करणे- -------4400
बेसल डोस (शेणखत पाच टन, जैविक, रासायनिक खते)------8,000
बेणे (प्रक्रिया आणि लागवड)-----------------------4400
बांधणी व रासायनिक खते----------9,000
दोन वेळा खुरपणी---------------------------1200
ठिबकद्वारे खते- ------------------------12,000
किरकोळ खर्च -------------------------3000
एकूण-------------------------------------42,000 रु.

केळीच्या पट्ट्यात डाळिंबाच्या बागा

रावेर तालुक्‍यातील कुंभारखेडा येथील युवकांचा डाळिंब शेतीचा प्रयोग जळगाव जिल्ह्यातील कुंभारखेडा येथील युवकांनी केळी पिकातील विविध समस्या लक्षात घेऊन पर्याय म्हणून डाळिंबाची शेती सुरू केली आहे. यात त्यांनी उतिसंवर्धित रोपांचाही वापर केला आहे. सध्या उत्पादन सुरू झाले असून, त्याची गुणवत्ता चांगली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास खानदेशाला डाळिंब पिकाचा नगदी पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असे सकृतदर्शनी म्हणता येईल. दिलीप वैद्य
जळगाव जिल्हा संपूर्ण भारतात केळीसाठी प्रसिद्ध आहे. येथील हवामानही केळीसाठी अनुकूल ठरलेले आहे. मात्र, बदलत्या हवामानानुसार तसेच बदलती बाजारपेठ लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकरी अन्य पिकांकडे नगदी पीक म्हणून पाहताना दिसत आहेत, तसा पीकबदल प्रयोगही ते करताना दिसत आहेत. रावेर तालुक्‍यातील कुंभारखेडा येथील युवकांनी केळी पिकातील समस्या लक्षात घेऊन डाळिंबाचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे केळीचे पारंपरिक काही क्षेत्र कमी करून डाळिंबाची लागवडही केली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात डाळिंब शेती चांगल्या प्रकारे विकसित झाली आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपली डाळिंब शेती विकसित करण्याचा या युवकांचा प्रयत्न आहे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही त्यांनी सुरू केला आहे. नाशिक- पुण्यातील व्यापारी या शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत. कुंभारखेड्याप्रमाणेच तालुक्‍यात केऱ्हाळा, ऐनपूर, दसनूर, बलवाडी या भागातही आता डाळिंब लागवड झाली आहे. डाळिंबाचे पीक या भागात चांगले यशस्वी झाले तर युरोपीय बाजारपेठेचा मार्गही उपलब्ध होणार आहे. या पिकाच्या अधिक प्रगतीसाठी शासनाने डाळिंबाच्या टिश्‍यू कल्चर रोपांवर (उतिसंवर्धित) अनुदान देण्यासह निर्यातीसाठी मदत करण्याची या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

गेल्या आठ वर्षांत रावेर तालुक्‍यात केळी पिकाला दहाहून अधिक वेळा नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. यामुळे शेतकरी पर्यायी पिकाच्या शोधात होते. तसेच, केळीच्या तुलनेने डाळिंबाला कमी पाणी लागते, असे निखिल पाटील, अतुल राणे, अतुल अशोक पाटील, युवराज विठ्ठल पाटील आदी युवकांच्या लक्षात आले. त्यांनी डाळिंबाची शेती सुरू केली. जैन इरिगेशन कंपनीचे अधिकारी के. बी. पाटील यांचे मार्गदर्शन घेण्यास सुरवात केली. या शेतकऱ्यांनी जैन टिश्‍यू कल्चर रोपांसह सोलापूर, सांगली भागातून रोपे (गुटी) आणली व लागवड केली, भगवा वाणाची निवड केली.

डाळिंब शेतीचा प्रयोग या युवकांसाठी नवा असल्याने त्यांनी राज्यातील विशेषतः सटाणा तालुक्‍यातील अनुभवी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना; तसेच पंढरपूर, मालेगाव, सांगली, सातारा या भागातील डाळिंब बागांना भेटी दिल्या. त्यांच्याकडून डाळिंब शेतीचे तंत्र समजावून घेतले. याच तालुक्‍यातील नामपूर येथील एका अनुभवी डाळिंब बागायतदाराचे मार्गदर्शन सध्या त्यांना सुरू आहे.

त्यांच्या सूचनेवरून डाळिंबासाठी खते, पाणी, कीडनाशके, बहर व्यवस्थापन, काढणीचे व्यवस्थापन केले जात आहे.
कुंभारवाड्यातील या शेतकऱ्यांनी हस्त बहर घेण्याचे नियोजन केले आहे. झाडांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांनी पहिला बहर घेणे टाळले. लागवडीपासूनच रोपांना ठिबक सिंचन संचाने पाणी दिले. लागवडीपूर्वी शेताची खोलवर नांगरणी, वखरणी केली. एकरी पाच ब्रास शेणखत टाकून मिसळले. गांडूळ खताचा वापर एकरी एक टन याप्रमाणे केला. निंबोळी खत प्रति झाड दोन किलो मातीत मिसळले. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कार्बोफ्युरॉनसारख्या कीटकनाशकाचा वापर केला. लागवडीनंतर साडेचार महिन्यांनी पहिली व त्यानंतर आठ दिवसांनी तीन वेळा कीटकनाशकाची फवारणी केली. झाडाची मुळे बळकट होण्यासाठी ह्युमिक ऍसिड वापरले. रोपांच्या वाढीसाठी 19-1919, युरिया, डीएपी यांचा वापर केला.

उत्पादनाला सुरवात - सुमारे फेब्रुवारी 2011 च्या दरम्यान लागवड झालेल्या डाळिंबाचे उत्पादन घेणे या शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. उत्पादन व काढणी नुकतीच सुरू झाली आहे. लागवडीचे अंतर 14 बाय 10 फूट ठेवले असून, एकरात सुमारे तीनशे झाडे आहेत. प्रति झाड 10 ते 20 किलोच्या प्रमाणात फळे घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. सध्या सुरू झालेल्या मालाची गुणवत्ता चांगली असून, प्रति फळाचे वजन 200 ते 300 ग्रॅमपर्यंत आहे. सध्या काही ना काही प्रमाणात निघालेल्या उत्पादनाची विक्री सुरू झाली असून, व्यापाऱ्यांनी जागेवर येऊन मालाची खरेदी केली आहे. किलोला 80 ते 85 रुपये असा दर देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पुढील माल विक्रीला जाणार आहे.

टिश्‍यू कल्चर रोपे फायदेशीर - तेलकट डागाचा प्रसार हा निकृष्ट रोपांच्या माध्यमातून वाढत असल्याचे यापूर्वीही अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
मात्र, या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याचा या युवकांचा प्रयत्न आहे. अतुल पाटील, अतुल राणे व निखिल पाटील यांनी उतिसंवर्धित डाळिंब रोपांची लागवड केली आहे. येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या टिश्‍यू कल्चर रोपांबरोबरच सटाणा व मालेगाव भागातून आणलेली पारंपरिक रोपेही (गुटी) वापरली होती, त्यात गुटी रोपांच्या तुलनेत टिश्‍यू कल्चर रोपांची वाढ चांगली जाणवली व तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भावही जाणवला नाही, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कुंभारखेड्याच्या डाळिंबाच्या बागांना सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रामकृष्ण पाल, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक व संशोधक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. नवलाखे, डॉ. ठोंबरे, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक नागरे, तालुका कृषी अधिकारी विजय भारंबे, जैन इरिगेशनचे राहुल भारंबे आदींनी भेटी दिल्या आहेत. बाजीराव गोलाईत (जि. नाशिक) यांनी या शेतीसाठी प्रेरणा दिली आहे.
सुधारित तंत्रज्ञानामध्ये ठिबक सिंचन, उतिसंवर्धित रोपे, विद्राव्य खते यांच्या वापराबरोबर काही शेतकऱ्यांनी गादीवाफा पद्धतीचा वापर केला आहे.

संपर्क -
अतुल पाटील - 9922697527
अतुल राणे - 9049266366
निखिल पाटील - 9823322628
चंद्रकांत बोदडे - 9921039851
युवराज पाटील - 9970549222

कुंभारवाड्यातील युवकांचे डाळिंबाचे क्षेत्र -
अतुल पाटील - सुमारे सात एकर
अतुल राणे - सहा एकर
निखिल पाटील - अडीच एकर
युवराज पाटील - चार एकर
चंद्रकांत बोदडे - तीन एकर

आतापर्यंत निघालेले उत्पादन - अतुल पाटील - सुमारे 17 टन
अतुल राणे - 16 टन
निखिल पाटील - तीन ते साडेतीन टन
युवराज पाटील - दहा टन
चंद्रकांत बोदडे -

डाळिंबाचा पर्याय अनुभवतो आहे हा भाग पारंपरिक केळीचा आहे; मात्र केळीकडून डाळिंब पिकाकडे वळतानाची कारणे सांगताना अतुल राणे व निखिल पाटील म्हणाले, की केळी हे आमचे पूर्वापार पीक असून, त्याची शेती सुरूच आहे; मात्र या पिकामध्ये विविध समस्या दिसून येत आहेत. केळीमध्ये सिगाटोका सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मजूर समस्या मोठी आहे. केळीतील उत्पादन खर्च वाढला आहे. केळीचे दर स्थिर नाहीत, ते सतत बदलतात. शिवाय, केळी पिकाला अन्य पिकांच्या तुलनेत पाणीही जास्त लागते. अशा सर्व कारणांचा विचार केल्यास डाळिंबाचा पर्याय वापरून पाहण्याचे ठरवले, त्या दृष्टीने केळीचे काही क्षेत्र कमी करून ते डाळिंब पिकाला द्यायचे ठरवले. सध्या आम्ही डाळिंबाची प्रायोगिक शेती करतो आहोत. आत्ता कुठे उत्पादन सुरू झाले आहे. पुढील आठवड्यात अजून काही मालाची काढणी सुरू होईल. थोडा व्हॉल्यूम हाती आल्यानंतर हे पीक आर्थिकदृष्ट्या कसे परवडते हे कळून येईल. सध्याची पीक परिस्थिती पाहता डाळिंबाची गुणवत्ता चांगली दिसली आहे.

बीजोत्पादन दाखवते मार्ग आर्थिक उन्नतीचा


बियाणे क्षेत्रातील कंपनी व शेतकरी यांच्यात संकरित भाजीपाला बीजोत्पादन कार्यक्रम कसा चालतो याबाबत काही माहिती आपण कालच्या भागात घेतली. मराठवाड्यात बीजोत्पादनाचे असे अनेक पट्टे पाहायला मिळतात. सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत ही बीजोत्पादन शेती शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी ठरली आहे. जालना जिल्ह्यातील पोखरी (सिंदखेड) गावचे शेतकरी काही वर्षांपासून खासगी कंपन्यांसाठी बीजोत्पादन घेतात. त्यातील काही निवडक प्रातिनिधिक उदाहरणे.

दुष्काळातही मिरचीने वाचवले दत्ता जगन्नाथ खरात यांच्या टोमॅटो बीजोत्पादन प्लॉटविषयी माहिती कालच्या भागात पाहिली. दुष्काळी स्थितीतही अन्य पिके जगवणे जिथे मुश्‍कील झाले होते तिथे खरात यांनी टोमॅटोसोबत मिरचीचाही बीजोत्पादन प्लॉट चांगल्या प्रकारे निभावण्याचा प्रयत्न केला होता.

जानेवारीतील त्यांच्या सुमारे 10 गुंठे मिरची प्लॉटची ही परिस्थिती- -या वेळी मिरचीचे हार्वेस्टिंग जवळपास संपले होते.
-दोन ओळींतील अंतर पाच फूट, तर दोन झाडांतील अंतर तीन फूट.
-बेड अडीच फुटाचा असून लांबी 110 फूट.
-प्रत्येक नेटचा आकार ठरलेला. 120 फुटांत बेड घेतला तर लांबी 110 फूट मिळते.
पाच फूट प्रत्येकी दोन्ही बाजूंस सोडली जाते.
-रोपांची संख्या- मादी 600, नर- 300 प्रति 10 गुंठे

बीजोत्पादन कालावधी- मिरची- सहा ते सात ते आठ महिने, टोमॅटो- चार ते पाच महिने.

बीजोत्पादनातून आर्थिक उन्नती
राजीव खरात यांचा बीजोत्पादन कार्यक्रम दृष्टिक्षेपात.

-एकूण शेती सात एकर, त्यातील बीजोत्पादन क्षेत्र दोन एकर.
-दोन हंगामांत बीजोत्पादन कार्यक्रम (यात पाच वर्षांचा अनुभव)
त्यातील पिके- टोमॅटो, मिरची, काकडी- (क्षेत्र प्रत्येकी सुमारे 10 गुंठे )
-व्यापारी शेतीच्या तुलनेत बीजोत्पादनातून दुपटीपर्यंत फायदा होऊ शकतो.

-बीजोत्पादनातील दर प्रति किलो (वाणानुसार बदलतात) मिरची- प्रति किलो- 2000 ते 2300 रु.
टोमॅटो- 12 ते 14 हजार रु.

-किमान 10 गुंठ्यांत टोमॅटोतून उत्पन्न- एक लाखापर्यंत, उत्पादन खर्च- 40 हजार रु.
-या वर्षी दुष्काळ होता. मात्र विहिरी, बोअरवेल यातून प्रयत्न करून पाणी कमी पडू दिले नाही.
-टोमॅटो, मिरचीसोबत काकडीचाही बियाणे प्लॉट होता. दुष्काळात बीजोत्पादनाने साथ दिली. पिकांची अवस्था चांगली राहिली.
-बियाणे कंपनीशी लेखी करार असतो. धोका काही नाही.
-पॉलीनेशन किंवा सर्व तांत्रिक बाबींमध्ये कुशलता मिळवली आहे.

दत्ता खरत- -एकूण क्षेत्र 10 एकर, बीजोत्पादन- दोन एकर
-पावसाळ्यात काकडी, ढोबळी मिरची व टोमॅटो
-सात वर्षांपासून बीजोत्पादन. एका कंपनीसोबत पेमेंटबाबत अडचण आली, त्यानंतर त्या कंपनीसोबत काम करणे बंद केले.

बीजोत्पादनासाठी रेट असे मिळतात. (प्रति किलो)
काकडी- 2200 रु.
साधी मिरची- 1900 रु.
सिमला मिरची- 11,000 रु.
टोमॅटो- 14, 000 रु.

उत्पादन खर्च असा असतो. (10 गुंठे) काकडी- 30 ते 35 हजार रु., टोमॅटो- 50 हजार, तिखट मिरची-70 ते 80 हजार रुपये.
स्वीट पेपर- 30 ते 35 हजार रु.

उत्पादन- 10 गुंठे- तिखट मिरची- सुमारे एक क्विंटल 30 किलो
सिमला मिरची- दुष्काळी परिस्थितीत 25 किलो उत्पादन अपेक्षित.
टोमॅटो उत्पादन- 10 ते 20 किलो (वाणानुसार)

यंदा पाण्याची झळ जोरात बसली. काकडीला पाणी पुरले नाही. त्यानंतर थोडा पाऊस आल्यावर त्यात थोडे भागवले. त्यानंतर बोअर घेतले. बियाणे प्लॉटला पाणी कमी पडू दिले नाही. ड्रीपसोबत मल्चिंगही केले तर मध्यम प्रमाणातील पाणीही पुरते.
-अजूनपर्यंत कंपनीकडून फसवणुकीचा अनुभव नाही. मात्र पॉलीनेशन वा बियाणे वेगळे करण्याची प्रक्रिया योग्य पार पाडली नाही तर प्लॉट नापास होऊ शकतो.
-नेहमीच्या शेतीत बाजारभावांचे काही खरे नाही. त्या तुलनेत बीजोत्पादन परवडते. यात मार्केट ढासळण्याची भीती नाही. 10 गुंठ्यांत नेहमीच्या शेतीत 10 हजार रुपये मिळतील याची गॅरंटी नसते. त्याचवेळी 10 गुंठ्यांत बीजोत्पादन एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देते. काहीवेळा जास्तही रक्कम मिळते. भावाची हमी असते.
-सात वर्षांपासून बीजोत्पादनात कुशल झालोय.

यंदा दुष्काळातही बीजोत्पादन फेल गेले नाही. बोअर, ड्रीप, मल्चिंग केले आहे. शेततळे करणार आहे. बीजोत्पादनात हमी भाव असतो. दुसरी बाजू म्हणजे मजूर जास्त लागतात. पॉलीनेशनपासून ते बी काढणीपर्यंत विविध टप्पे असतात. दरवर्षी महागाई वाढते. तुमचे एकाच कंपनीसोबत कायमचे संबंध असतील तर कंपनीच शे- दोनशे रुपये रेट दरवर्षी वाढवतेही.

बीजोत्पादनातून शेतकरी काय शिकले? -योग्य उत्पादनासाठी हवामान चांगले निवडावे.
-पॉलीनेशन, बी वेगळे करणे, प्रूनिंग, रोग-कीटक पाहिल्याबरोबर त्वरित उपाययोजना. रोगांची ओळख होणे गरजेचे. शेतात पालापाचोळा तसाच न ठेवता ताबडतोब त्याची विल्हेवाट लावणे.
-रोपांत भेसळ होऊ नये यासाठी दोऱ्यांचे टॅग. योग्य विलगीकरण अंतर
शेडनेटच्या अँटी चेंबरमध्ये हात, पाय विशिष्ट द्रावणाने निर्जंतुकीकरण करून मगच शेडनेटमध्ये प्रवेश
-शेडनेटमध्ये हिरवा ऍप्रन घालावा लागतो.
पोखरी गावात बहुतांश शेतकरी बीजोत्पादन करतात.

अंबाडीपासून जॅम, सरबत... राजगुरेंच्या उद्योगाची खासियत

अंबाडी हे तसे दुर्लक्षित पीक. वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्याची फुले, पाने, बिया यांपासून लोणचे, जॅम, जेली, सरबत आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ त्यांनी तयार केले आहेत. प्रदर्शने व दुकानांमधून त्यांची विक्री करून त्याची बाजारपेठ वाढवण्याचेही प्रयत्न त्यांनी केले आहेत. देवेंद्र वानखेडे

अंबाडीची भाजी आणि भाकरी आजही चवीने खाल्ली जाते. पावसाळ्यात येणारी अंबाडी कालांतराने "जंक फूड'च्या जमान्यात हरवत गेली. शहरातील बाजारांतून कधीकाळी दिसणारी लाल फुले कशाची आहेत, असे विचारणाऱ्यांची संख्याच अधिक. याच अंबाडीवर वर्धा येथील विनोद मारोतराव राजगुरे यांनी व्यावसायिक दृष्टीने पाहता वर्धा शहरालगत कार्ला येथे अन्नप्रक्रिया उद्योगही सुरू केला. बी.ई. (प्रॉडक्‍शन)ची पदवी घेतल्यानंतर अभियंता म्हणून त्यांनी काही काळ नोकरी केली. यानंतर वाहनांना लागणारे क्‍लच तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचे सुरवातीला ठरवले होते. त्याच वेळी त्यांचा संपर्क वर्धा येथील सीएसव्ही (सेंटर ऑफ सायन्स ऑफ व्हिलेजेस) या संस्थेशी आला. तेथे 15 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात त्यांनी ग्रामीण भागात उपलब्ध वस्तूंपासून खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. यातच अंबाडी या पिकाची ओळख व बहुपयोग पाहता आपण विविध पदार्थ तयार करू शकतो व त्यातून रोजगारनिर्मिती करू शकतो असे त्यांना वाटू लागले. घरची आर्थिक परिस्थिती स्थिर होती, तसेच पत्नीचीही नोकरी असल्याने ते प्रक्रिया उद्योगातील जोखीम उचलण्यास तयार झाले.

प्रक्रिया उद्योगाचा प्रवास राजगुरे यांनी अंबाडीची सखोल माहिती व त्यातील औषधी गुणांचा अभ्यास केला. इतकी महत्त्वाची वनस्पती दुर्लक्षित असून तिला ऊर्जितावस्थेत आणण्याचा ठाम निश्‍चय केला. सीएसव्ही संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प अहवाल तयार केला. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या साह्याने तब्बल 10 लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम उभारण्यात आली. सुरवातीला फुलांच्या पाकळ्यांपासून फक्‍त सरबत आणि जॅम हे दोनच पदार्थ तयार करायचे होते. यासाठी कुठलीही यंत्रसामग्री तयार नसल्याचे त्यांना कळले. याच वेळी त्यांचे तांत्रिक ज्ञान कामी आले. पल्वलायझर यंत्र त्यांनी इंदूर येथून घेतले. मिक्‍सर वर्धा येथेच डिझाईन करून बनवून घेतला. अन्य छोटी यंत्रेही बनवून घेतली.

अंबाडीची लागवड.... अंबाडी लागवडीसाठी खर्च फारसा असा येत नाही. ही वनस्पती नैसर्गिक पद्धतीने चांगल्या प्रकारे वाढते व उत्पादन देते. राजगुरे यांच्याकडे शेती नाही. त्यांनी काही शेतकऱ्यांना हाती धरून अंबाडीची लागवड करण्याची विनंती केली. माल खरेदी करण्याचा करार केला. राजगुरेंचा व्यवसाय नवीन असल्याने अंबाडी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मर्यादित आहे. अंबाडी झाडाचे महत्त्वाचे भाग (उदा. बिया, फुले, पाने) विकली जाऊ शकतात व आपण ते घेऊ, हे त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. फुलांपासून जॅम व जेली, पानांपासून लोणचे, बियांपासून बेसन आणि फुलांपासून चटणी तयार करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. सुरवातीचे बियाणे राजगुरे यांनी उपलब्ध करून दिले. एकरी अडीच ते तीन क्‍विंटल फुलांच्या पाकळ्यांचे उत्पादन झाले. शेतकऱ्यांना त्यांनी 18000 रुपये प्रति क्‍विंटल असा वाळल्या फुलांना दर दिला. बियांचे उत्पादन एकरी तीन ते चार क्‍विंटल झाले. या बियांना त्यांनी 2000 रुपये प्रति क्‍विंटल दर दिला. पानांपासून लोणचे प्रयोगाचे राजगुरेंचे पहिलेच वर्ष. 500 किलो पाने त्यांनी विकत घेतली, त्याला 20 रुपये प्रति किलो म्हणजेच 2000 रुपये प्रति क्‍विंटल दर दिला. अंबाडीच्या खोडापासून धागे निघतात. हा प्रयोग एका उद्योजकाने केला असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. तो यशस्वी झाल्यास त्यापासूनही उत्पन्न स्रोत मिळू शकेल यात शंका नाही. सध्या उद्योग सुरू करून सुमारे अडीच वर्षे झाली आहेत. अंबाडीवर आधारित पदार्थांचा प्रसार अजून होण्याची व त्यांना मार्केट मिळण्याची गरज राजगुरे यांनी व्यक्त केली.

अंबाडीचे प्रकार अंबाडीचे गावरानी, देव अंबाडी आणि पिवळी अंबाडी असे प्रकार आढळतात. राजगुरे यांनी आपल्या उद्योगासाठी देव अंबाडीचा उपयोग केला आहे, त्याला येणारी लाल फुले आणि हिरवी पाने उपयुक्‍त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
: विनोद राजगुरे, 9765599359
...असे आहेत पदार्थ
(पॅकिंग 100, 200 ग्रॅम असे असले तरी दर किलोत दिले आहेत.)

-जॅम (फुलांच्या पाकळ्यांपासून)180 रु.
-जेली (फुलांच्या पाकळ्यांपासून)160 रु.
-लोणचे (पानांपासून)200 रु.
-बेसन (बियांची व हरभरा पावडर एकत्रित)100 रु.
-चटणी200 रु.
-सरबत100 रुपये प्रति बॉटल

विक्री कोठे? राजगुरे यांनी सध्या अंबाडीवर आधारित सरबत, जॅम, जेली, बियांपासून मुखवास, बेसन असे पदार्थ तयार केले. त्यांनी या वर्षी 500 किलो लोणचे तयार केले. हे चवदार पदार्थ ग्राहकाला नवीन असल्याने सुरवातीला कुठलाही दुकानदार ते विक्रीसाठी ठेवण्यास तयार नव्हता. यावर राजगुरे यांनी उपाय शोधून देशभरात जेथे कृषी, क्राफ्ट यांचे प्रदर्शन भरते, तेथे जाऊन स्टॉल लावून विक्री सुरू केली. प्रदर्शन कुठल्याही विभागाचे असो, राजगुरे तेथे उपस्थित राहतातच. यामुळे अनेक ग्राहकांपर्यंत त्यांना आपला माल पोचवता आला.
विविध शहरांतील दुकानदारांकडे माल ठेवला आहे. वर्ध्यात पाच, अमरावतीत चार ते पाच, यवतमाळ दोन, नागपूर सात अशी ढोबळ संख्या आहे (ग्राहकांकडून पदार्थांना चांगला प्रतिसाद आहे; मात्र तो वाढणे गरजेचे आहे).
उद्योगाची वार्षिक उलाढाल - सुमारे 10 ते 12 लाख (ही प्रति महिना व्हावी अशी राजगुरे यांची अपेक्षा आहे).
सध्या महिन्याला प्रति दुकान 2000 ते 5000 च्या रेंजमध्ये पदार्थांना मागणी असते.
वर्षभर उद्योग सुरू असतो. महिन्याचे वीस दिवस तरी काम राहतेच.
वर्षाला सुमारे 800 किलो अंबाडीची फुले कच्चा माल म्हणून लागतात, तर अर्धा टनपर्यंत बिया लागतात.
आतापर्यंत वर्धा, यवतमाळ, नागपूर, रायपूर, नाशिक, मुंबई तसेच अन्य मिळून 100 ठिकाणच्या प्रदर्शनांतून भाग घेतला आहे.

व्यवसायातील जोखीम खाद्यपदार्थ टिकण्याची मुदत सुमारे सहा महिन्यांचीच गृहीत धरल्याने एकाच वेळी सर्व माल तयार करून ठेवता येत नाही. यंत्रसामग्री अत्याधुनिक नसल्याने अधिक मालाच्या निर्मितीसाठी अंबाडी लागवडीचे प्रमाण वाढवणे अद्याप जमलेले नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रीसाठी सध्या विविध ठिकाणी फिरावे लागते. दुकानांतून या पदार्थांची विक्री वाढण्याची गरज आहे. अंबाडीवर भर देण्याचे कारण सांगताना राजगुरे म्हणाले, की या पिकाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व इंटरनेट व पुस्तकांच्या माध्यमातून समजून घेतले, त्यातून या वनस्पतीत विविध औषधी गुणधर्म असल्याचे माहीत झाले आहे. अंबाडीचा उपयोग हृदयरोग, उच्च रक्‍तदाब नियंत्रणास मदत, रक्‍तवाहिन्यांचे काम सुधारणे तसेच शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी होतो, यावर अजून अभ्यास सुरू आहे.