Sunday, 30 June 2013

फळबागांसाठी पाण्याचे नियोजन -

फळबागांसाठी ऑनलाइन आणि इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर योग्य पद्धतीने करावा. समांतर पद्धती अथवा रिंग पद्धतीमध्ये झाडाच्या जास्तीत जास्त पांढऱ्या मुळ्यांच्या क्षेत्रात कायम वाफसा ठेवता येतो. यामुळे फळांची संख्या वाढते, वजन वाढते; तसेच फळांच्या गुणवत्तेतही सुधारणा होते.

1) ऑनलाइन पद्धत - सुरवातीला दोन ड्रीपर लावावेत. जसजशी झाडाची वाढ होत जाईल, त्याप्रमाणे दोनचे चार ड्रीपर लावावेत. अशा प्रकारे ड्रीपरची संख्या वाढवावी. 2) समांतर ऑनलाइन पद्धती - या पद्धतीमध्ये पूर्ण वाढलेल्या झाडाच्या खोडापासून एक ते दीड मीटर अंतरावर सावलीच्या क्षेत्रात खोडाच्या दोन्ही बाजूस ठिबकच्या दोन नळ्यांचा वापर करावा. यामध्ये ऑनलाइन ठिबक पद्धतीचा वापर केला जातो. 16 मि.मी. जाडीच्या नळीवर 75 ते 90 सें.मी. अंतरावर तीन ते चार ड्रीपर लावावेत. ड्रीपरचा प्रवाह चार लिटर प्रति तास निवडावा.
3) ऑनलाइन रिंग पद्धत - या पद्धतीत 12 मि.मी. जाडीची नळीची रिंग ठिबकच्या नळीवर बसवावी. या नळीवर 75 ते 90 सें.मी. अंतरावर चार लिटर प्रति तास प्रवाहाचे ड्रीपर बसवावेत. 16 मि.मी. जाडीच्या नळीवर 12 मि.मी. जाडीची रिंग बसवता येते.
4) इनलाइन रिंग पद्धती - या पद्धतीत पूर्ण वाढलेल्या झाडाची दुपारी 12 वाजता पडणाऱ्या सावलीच्या क्षेत्रात कडेला ज्या ठिकाणी पांढरी मुळे वाढलेली आहेत, त्या जागी 12 मि.मी. जाडीच्या इनलाइन नळीची रिंग 16 मि.मी. जाडीच्या साध्या नळीवर बसवून घ्यावी. इनलाइन नळीतील ड्रीपरमधील अंतर 75 ते 90 सें.मी. ठेवावे. ड्रीपरचा प्रवाह चार लिटर प्रति तास निवडावा.

मडका सिंचन - कमी वयाच्या फळझाडांसाठी पाच ते सात लिटर क्षमतेचे आणि मोठ्या फळझाडांसाठी 15 लिटर क्षमतेचे मडके निवडावे. याच्या तळाजवळ लहान छिद्र पाडावे. त्या ठिकाणी कापडाची एक चिंधी बसवून ते मडके ज्या झाडाला पाणी द्यायचे आहे, त्याच्या जवळ मातीत पुरावे. मडक्‍याचे तोंड जमिनीच्या वर राहील अशा प्रकारे पुरून ते पाण्याने भरावे. तोंडावर झाकणी ठेवावी. मडक्‍याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरते. यातील पाणी हळूहळू जमिनीत पसरते. यामुळे जमिनीत ओलावा निर्माण होतो. झाडांना पाणी मिळते.

डिफ्युजर तंत्रज्ञान - ही पद्धत मोठ्या तसेच छोट्या फळझाडांना फारच उपयुक्त आहे. लहान झाड असेल तर दोन पाइप व मोठे झाड असेल तर चार पाइप आळ्यामध्ये खोडावेत. हा पाइप चार ते सहा इंच व्यास आणि 25 ते 30 सें.मी.उंचीचा असावा. पाइपच्या तळाशी खालच्या बाजूने चार ते पाच छिद्रे पाडावीत. पाइपचे फक्त तोंड जमिनीवर दिसेल अशा रीतीने आळ्यात गाडावा. पाइपऐवजी या आकारमानाचे भोक पाडलेले मातीचे भांडेसुद्धा (डिफ्युजर) चालते. या पाइपमध्ये पाणी दिल्यास जमिनीचा वरचा पृष्ठभाग कोरडा दिसतो; मात्र पाणी थेट झाडाच्या मुळाशी जाते व पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर होतो. पाणीही कमी लागते.

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

नियोजन फळबाग लागवडीचे...

ज्या जमिनी हलक्‍या व पडीक आहेत, तेथे कोरडवाहू फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कोरडवाहू फळझाडांची निवड करीत असताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार लागवडीपूर्वीच करावा, त्यामुळे पुढील काळातील नुकसान टळते. फळबाग लागवडीसाठी शिफारस केलेल्या अंतरावर योग्य लांबी-रुंदी आणि खोलीचे खड्डे घेतले असतीलच. या खड्ड्याच्या बुडाला पालापाचोळा व काडीकचरा टाकावा. त्यानंतर खड्डा खोदताना खड्ड्यातील निघालेली वरच्या थरातील माती, शेणखत, शिफारशीत कीडनाशक पावडर, रासायनिक खत आणि निंबोळी पेंडीने खड्डा भरून घ्यावा. लागवडपूर्व काळात संबंधित फळपिकांची रोपे, कलमे कृषी विद्यापीठ किंवा सरकारी रोपवाटिकेतून खरेदी करावीत.

1) डोंगर-उतारावर लागवडीचे नियोजन करताना समपातळीत चर घेऊन शिफारशीत अंतराप्रमाणे खड्डे घ्यावेत. दोन ओळींमध्ये ओळींना समांतर असे 50 ते 60 सें.मी. खोल, 30 सें.मी. रुंद व सोयीनुसार लांबीचे चर खोदून घ्यावेत. पावसाळ्यात या चरांमध्ये पावसाचे पाणी साचून बराच काळ पाणी टिकून राहते. पर्यायाने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. जर चर काढणे शक्‍य नसेल, तर ओळींना समांतर असे मारवेल गवताचे 60 सें.मी. रुंदीचे पट्टे पावसाळा सुरू झाल्यावर लावावेत, यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. बागेतील मोकळ्या जागेत लहान लहान खळगे खोदून घेतल्यास देखील जमिनीत पाणी मुरून ओलावा जास्त दिवस टिकून राहण्यास मदत होते.

2) हलक्‍या माळरानावर लागवड करताना झाडाच्या दोन ओळींमधल्या अंतरानुसार समपातळीचे बांध घालून वरीलप्रमाणे खड्डे घ्यावेत. या बांधांना सोईस्कर अशा मोऱ्या ठेवाव्यात. सेंद्रिय खतांच्या उपलब्धतेसाठी गांडूळ खत किंवा नाडेप पद्धतीने खतनिर्मितीकडे लक्ष द्यावे, यामुळे फळझाडांना पुरेसे सेंद्रिय खत देता येईल.

3) आपणास जी कलमे-रोपे लागवड करावयाची आहेत, ती निरोगी सशक्त, जोमदार व सरळ वाढलेली असावीत. कलमे-रोपे शासकीय, विद्यापीठ किंवा नोंदणीकृत खासगी रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. खरेदी केलेली कलमे-रोपे यांची पावती जपून ठेवावी.

4) कलमे-रोपांची लागवड शक्‍यतो सायंकाळी करावी, त्यामुळे त्यांची मर टाळता येते. लागवड करताना कलमे, रोपांची पिशवी हळूवार काढावी, जेणेकरून मुळांभोवतीची माती मोकळी होणार नाही.

5) कलमांच्या बाबतीत कलम केलेला जोड जमिनीवर 20 सें.मी. उंचीवर राहील अशा बेतानेच लागवड करावी, तसेच कलम केलेल्या डोळ्याची फांदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेच राहील याची काळजी लागवडीच्या वेळी घ्यावी.

6) प्रत्येक कलम-रोप लावताना सरळ, उभे लावावे. त्याभोवतीची माती घट्ट दाबून पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी तिरपी झालेली कलमे-रोपे सरळ करावीत. शक्‍यतो काठीचा आधार द्यावा.

लागवड झाल्यानंतर घ्यावयाची काळजी :
1) नवीन लागवड झाल्यानंतर कलमे-रोपांना वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा. त्यावर झाडाचे खोड सैलसर बांधावे. कलम चांगले वाढू लागल्यावर कलमावरची बांधलेली प्लॅस्टिकची पट्टी सोडून घ्यावी. खोड एकेरी वाढवावे.

2) पुढील वाढीच्या काळात सोसाट्याच्या वाऱ्यापासून फळांचे व झाडाचे नुकसान टाळण्यासाठी बागेभोवती वारा प्रतिबंधक झाडे लावावीत.
3) लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास झाडांना ओलित करावे, तसेच पावसाळा संपल्यानंतर झाडाभोवतालची जागा ताणविरहित करून झाडाभोवती आळे करावे.

4) प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडांना सावली करावी. पावसाळ्यात झाडाभोवती पाणी साचू देऊ नये. झाडाभोवतालची जागा ताणविरहित ठेवावी.

कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्रांचे संपर्क क्रमांक :
1) फोन नं. ः 02426 - 243861
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर
2) फोन नं. ः 02358- 280233, 280558
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
3) फोन नं. ः 0724 - 2259262
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
4) फोन नं. ः 02452 - 229000
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

12 गुंठ्यांत वर्षभर पालक

अकोला महानगरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील चांदूर गाव हे मोर्णा नदीच्या काठावर वसलेले असल्याने गावात पाण्याचे स्रोत भक्‍कम आहेत. विहीर, बोअरवेल यासारख्या पर्यायांचा वापर करीत गावातील शेतकऱ्यांनी शेतीचा वारसा जपला आहे.

निलखन कुटुंबीयांची शेती सिंचन सुविधांच्या बळावर समृद्धीच्या वाटेवर असलेल्या चांदूर गावातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीऐवजी फुले व भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. याच गावचे मुरलीधर निलखन त्यापैकीच एक. बारमाही भाजीपाला म्हणून पालक घेण्यावर त्यांचा भर राहतो. त्यांची जेमतेम बारा गुंठे जमीन धारणा. त्यांचे वडील सूर्यभान कधीकाळी गहू, खरीप ज्वारी यासारखी पिके घेत; परंतु बारा गुंठ्यांतून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबात पत्नी, पाच मुली, दोन मुलांसह असलेल्या संसारात उदरनिर्वाह कसाबसा शक्‍य होत होता. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैशांची सोय सूर्यभान यांना पत्नीसह मजुरीला जाऊन मिळणाऱ्या उत्पन्नातून करावी लागे.

बदलाचे निमित्त.. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काही वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सूर्यभान यांना भाजीपाला पिकातून होणाऱ्या प्रगतीविषयी माहिती मिळाली. त्यानंतर पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकाकडे वळताना त्यांनी पालकाची निवड केली. त्याची शेती चांगली केली. उत्पन्न कमावले. त्यामुळे त्यांच्या दोन मुलांनीही या पिकात सातत्य ठेवले. विशेष म्हणजे सूर्यभान निलखन यांनी सायकलने अकोल्यात पालकाचे मार्केटिंग रोज केले.

निलखन यांच्या पालक लागवडीचा पॅटर्न - एकूण शेती सुमारे 12 गुंठे, त्यातच पालक घेतला जातो.
- बारा गुंठ्यांचे प्रत्येकी चार गुंठे याप्रमाणे तीन भाग केले आहेत.
- प्रत्येक भागातील लागवडीत सुमारे आठ ते दहा दिवसांचे अंतर
- त्यामुळे एका प्लॉटमधील काढणी संपते, त्या वेळी दुसऱ्या प्लॉटमध्ये उत्पादन सुरू असते व ते विकण्यास उपलब्ध होत असते.
- अशा रीतीने वर्षभर हे चक्र सुरू राहते.

लागवड पद्धत - पालकाची लागवड वाफे पद्धतीने केली जाते. उन्हाळ्यात नागमोडी पद्धतीचे वाफे असतात.
शेणखत - वर्षातून 12 गुंठ्याला चार ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. घरी जनावरे नसल्याने शेणखत 2500 रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे विकत घेतले जाते. शेणखताच्या वापरावर अधिक भर असल्याने रासायनिक खतांचा वापर शक्‍यतो कमी केला जातो. पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास कीडनाशकाची फवारणी करावी लागते.

उत्पादन कसे असते? - सुमारे चार गुंठ्यांचा प्लॉट
- एक महिना पिकाचा कालावधी
- प्रति महिना 500 ते 600 किलो पालक मिळतो.
- उन्हाळा व हिवाळ्यात उत्पादन चांगले, तर पावसाळ्यात खराब होत असल्याने 300 किलोपर्यंतही खाली येते.

बाजारपेठ - - अकोला बाजारपेठ सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे. प्लॅस्टिक गोणपाटाचे भारे तयार करून त्यातून पालकाची वाहतूक केली जाते.
- हंगामनिहाय प्रति किलो सरासरी पाच रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंतचा दर मिळतो.
- वर्षभर होत असलेल्या आवकेनुसार दरात चढ-उतार राहतात. सध्या पालकाला किलोला 40 रुपये दर सुरू असल्याचे मुरलीधर म्हणाले.
- महिन्याला सुमारे नऊ हजार ते कमाल 12 हजार, 15 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
- मुख्य खर्चामध्ये बियाणे चार गुंठ्याला दोन किलो लागते. किलोला 120 रुपये या दराने ते घेतले जाते.
- बाकी मुख्य खर्च खतांवर होतो. दररोज 20 ते 25 रुपये रिक्षा वाहतुकीला दिले जातात.
-- वर्षाला बारा गुंठे क्षेत्रात वर्षभर पीक सुरू ठेवून एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

मार्केट मुरलीधर म्हणाले, की उन्हाळ्यातील मे ते जुलै या काळात, तसेच पावसाळ्याच्या सुरवातीला पालकाला दर चांगले मिळतात. पावसाला सुरवात झाल्याने जादा पावसाच्या परिणामी पालक सडण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे तो खराब होतो, परिणामी त्याचे दरही वधारतात. अकोला भाजी बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निलखन कुटुंबाच्या पालकाने दर्जेदार अशी ओळख निर्माण केली आहे.

आर्थिक स्थैर्याकडे नेणारे पीक पालक हेच पीक निलखन कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचे कारण ठरले आहे. यातून मुरलीधर निलखन यांना आपल्या पाच बहिणींचे लग्न चांगल्या प्रकारे करणे शक्‍य झाले. मुरलीधर यांच्यासह त्यांचा भावाचा विवाह देखील याच पीक पद्धतीतून आलेल्या उत्पन्नातून होऊ शकला. हलाखीच्या परिस्थितीत मातीच्या घरात राहणारे हे कुटुंब आज टुमदार बंगलावजा घरात स्थलांतरित झाले आहे. गाठीशी पैसा जुळू लागल्याने सुमारे 50 गुंठे क्षेत्र त्यांनी खरेदी केले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनीही या कुटुंबाप्रमाणे आपल्या शेतीचे नियोजन व गुणवत्तेत सातत्य ठेवले, तर त्यांच्या प्रगतीचे दालन नक्कीच खुले होऊ शकते.

शेतीत राबते संपूर्ण कुटुंब पालकाच्या शेतीत संपूर्ण कुटुंब राबते. विशेषतः पालकाची काढणी घरचे सर्व सदस्य करतात. काढणीपासून ते त्याची स्वच्छता, हाताळणी, वाहतूक अशा प्रत्येक टप्प्यावर घरच्यांकडून योग्य दक्षता घेत असल्यानेच
पालकाची गुणवत्ता टिकवणे शक्‍य होते, असे मुरलीधर म्हणाले. आई पार्वताबाई, बंधू किशोर आदी सर्वांची मदत मोलाची ठरते. मजुरीवर होणारा खर्च कुटुंबाने कमी केला आहे.

निलखन यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये - 1) दरवर्षी शेणखताचा वापर, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत.
2) पालक पिवळसर दिसत असल्यास, जमिनीत नत्राची कमतरता असल्याचे लक्षात आल्यास थोड्या प्रमाणात युरिया खताचा वापर.
3) मजुरांऐवजी कुटुंबीयांद्वारे पालकाची काढणी प्रतवारी करून केली जाते.
4) पालक पिकाला पाण्याची चांगली गरज असते. उन्हाळ्यात एक दिवसाआड, तर हिवाळ्यात तीन ते पाच दिवसांआड पाटाने पाणी दिले जाते.

संपर्क
निलखन
9850597031

लागवड आडसाली उसाची...

उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. जमिनीची मशागत करून सपाट केल्यानंतर रिजरच्या साह्याने भारी जमिनीत 120 ते 150 सें.मी. व मध्यम जमिनीत 100 ते 120 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत. पट्टा पद्धतीसाठी 2.5 - 5 किंवा 3 - 6 फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड करावी. पट्टा पद्धतीचा आंतरपीक आणि ठिबक सिंचन संचनासाठी चांगला उपयोग होतो. पॉवर टिलरचा वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर 120 ते 150 सें.मी. (चार ते पाच फुटांपर्यंत) ठेवावे.

लागवडीचे तंत्र - 1) लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे. तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी.
2) लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. शक्‍यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
3) लागणीसाठी हेक्‍टरी दोन डोळ्यांची 25,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास चार फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दोन फूट ठेवावे किंवा पाच फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांतील अंतर 1.5 फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्‍टरी 13,500 ते 14,000 रोपे लागतील.

सरी अंतरानुसार ऊस लागवड - लांब सरी पद्धत -
या पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवता येते. हलक्‍या जमिनीत तीन फूट अंतरावर सरी पाडावी. भारी जमिनीमध्ये 3.25 ते 4 फूट अंतरावर सरी पाडावी. जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना दोन ते तीन सऱ्यांना एकत्र पाणी द्यावे. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4 टक्‍क्‍यापर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी. उतार 0.4 टक्‍क्‍यापेक्षा जास्त असल्यास उतारावा आडव्या सऱ्या पाडून ऊस लागण करावी.
फायदे -
1) या पद्धतीमध्ये आवश्‍यक तेवढेच पाणी देता येते. त्यामुळे जमीन खराब होण्याचे प्रमाण कमी होते.
2) पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरीमुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो व उत्पादनात वाढ होते.
4) योग्य प्रकारे आंतरमशागत करता येते.

पट्टा पद्धतीने ऊस लागवड (2.5 फूट x 5 फूट किंवा 3 फूट x 6 फूट) - जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्‍या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या साह्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळींत पाच फूट पट्टा रिकामा राहील. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळींत अंतर सहा फूट पट्टा तयार होतो.
फायदे -
1) भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते.
2) पिकावर अनिष्ट परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
3) ठिबक सिंचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे.
4) ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे. या पद्धतीत यंत्राच्या साह्याने ऊस तोडणी करता येते.
5) पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते.
6) बांधणीनंतर दोन ओळींमध्ये एक सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची 30 ते 35 टक्के बचत होते.

बेणेप्रक्रिया - 1) काणी रोगनियंत्रण तसेच कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी बेणेप्रक्रिया महत्त्वाची आहे.
2) बेणेप्रक्रियेसाठी 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मि.लि. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात बेणे 10 मिनिटे बुडवावे.
3) या प्रक्रियेनंतर ऍसिटोबॅक्‍टर 10 किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक 1.25 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी 30 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
4) जिवाणू संवर्धकाच्या बेणेप्रक्रियेमुळे 50 टक्के नत्र व 25 टक्के स्फुरद खतांची बचत होते, उत्पादनात वाढ होते.

माती परीक्षणानुसारच करा खतांचा वापर आडसाली उसासाठी दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्‍टरी 50 ते 60 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन फुलोऱ्यापूर्वी जमिनीत गाडावीत. स्फुरद व पालाशयुक्त खते पेरून द्यावीत. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त खते उसाच्या मुळाच्या सान्निध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत. युरियाचा वापर करताना निंबोळी पेंडीचा 6ः1 या प्रमाणात वापर करावा.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्‍टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅंगेनीज सल्फेट आणि पाच किलो बोरॅक्‍स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

रासायनिक खते - आडसाली हंगामासाठी रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रतिहेक्‍टरी)

अ.नं. +खते देण्याची वेळ +नत्र (युरिया) (कि./हे.) +स्फुरद (सिं.सु.फॉ.) (कि./हे.) +पालाश (म्यु.ऑ.पो.) (कि./हे.)
1 +लागणीच्या वेळी +40 (88) +85 (530) +85 (140)
2 +लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी +160 (350) +-- +--
3 +लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी +40 (88) +-- +--
4 +बांधणीच्या वेळी +160 (350) +85 (350) +85 (140)
+एकूण +400 (876) +170 (1060) +170 (280)

को 86032 ही जात रासायनिक खतांच्या जादा खतमात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रतिहेक्‍टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची 25 टक्के जादा मात्रा द्यावी.

आडसाली उसामध्ये घ्या आंतरपिके - 1) 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान आडसाली उसाची लागण केली जाते. या हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार भुईमूग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला ही आंतरपिके घेता येतात. भुईमुगाच्या फुले प्रगती, टॅग-24, टी.जी.-26 या जाती निवडाव्यात. सोयाबीन आंतरपीक घेतल्यास जे.एस.-335 किंवा फुले कल्याणी या जातींचा वापर करावा.
2) उसाची लागण करताना पट्टा पद्धतीने 2.5 - 5 किंवा 3 - 6 फूट अशा जोडओळ पद्धतीने लागवड केल्यास पट्ट्यामध्ये आंतरपीक चांगल्या प्रकारे घेता येते.
3) उसामध्ये आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण आंतरपिकाच्या ओळीच्या संख्येनुसार व व्यापलेल्या क्षेत्रानुसार ठरवावे. आंतरपिकासाठी त्यांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या त्या पिकाची शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा वेगळी द्यावी.
4) ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो. बाळबांधणीच्या वेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळबांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.

आंतरमशागत व तणनियंत्रण - उसाच्या उगवणीनंतर शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करून आवश्‍यकतेनुसार तणांचे नियंत्रण करावे. कृषिराज अवजाराच्या साह्याने लागणीनंतर तीन महिन्यांनी बाळबांधणी करावी. पीक 4.5 ते 5 महिन्यांचे झाल्यानंतर पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून व नंतर रसायन कुळव चालवून आंतरमशागत करावी. रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या साह्याने मोठी बांधणी करावी. पाणी देण्यासाठी सऱ्या, वरंबे सावरून घ्यावेत.

...असे असावे ऊस लागवडीचे नियोजन प्रत्येक साखर कारखान्याने उसाचे उत्पादन आणि साखर उतारा वाढविण्यासाठी एकूण गळीत क्षेत्राच्या 15 ते 20 टक्के क्षेत्रावर आडसाली ऊस, 30 ते 35 टक्के क्षेत्रावर पूर्वहंगामी ऊस आणि 15 ते 20 टक्के क्षेत्रावर सुरू ऊस लागवड करावी. उर्वरित 30 ते 40 टक्के क्षेत्रावर खोडवा ऊस ठेवून उसाच्या पक्वतेनुसार गाळपाचे नियोजन करावे.

संपर्क - 02169-265336
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांचा वापर -

ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खतेच वापरता येतात. बाजारपेठेमध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये एकत्रित किंवा वेगवेगळी असणारी खते उपलब्ध आहेत.

नत्रयुक्त खते - नत्रयुक्त खते ठिबक सिंचनातून दिल्यास मृदा द्रावणात त्याची जलद हालचाल होऊन ती खते तोटीच्या बाजूस मुळांच्या सान्निध्यात ताबडतोब पसरतात. पिकाची मुळे ती त्वरित शोषून घेतात. पिकाच्या आवश्‍यकतेनुसार ठराविक ओलित क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात, परंतु जास्त वेळा कमी होऊन वापर अधिक कार्यक्षम होतो. अमोनियायुक्त, नायट्रेटयुक्त आणि अमाईडयुक्त अशा चार प्रकारांमध्ये नत्रयुक्त खतांचे वर्गीकरण करता येते.

नत्रयुक्त खते - युरिया हे खत सर्वांत उत्कृष्ट व पाण्यात विरघळण्याची जास्त क्षमता असलेले खत आहे. युरिया खताची पाण्याशी कोणत्याही प्रकारची संयुगे तयार होत नसल्यामुळे ठिबक सिंचनातून देणे अधिक फायदेशीर आहे.
ऊस पिकासाठी नत्रयुक्त खते दर पंधरा दिवसांनी सहा महिने वयाचे ऊस पीक होईपर्यंत दिल्यास उसाची उगवण चांगली होते, फुटवे भरपूर येतात, पिकाची वाढ जोमदार होते. नत्रयुक्त खताची 30 टक्‍क्‍यांपर्यंत बचत करता येते.

स्फुरदयुक्त खते - स्फुरदयुक्त खते ठिबक सिंचनातून देण्याअगोदर पाण्यातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे प्रमाण तपासावे. पाण्याची कॅल्शिअम व मॅग्नेशिअम बरोबर फॉस्फरसची रासायनिक अभिक्रिया होऊन तयार होणारा पांढरा साका ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद करण्यास कारणीभूत ठरतो. उपलब्ध स्फुरदयुक्त खतांपैकी फॉस्फॅरिक आम्लाचा उपयोग ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खत पिकाच्या मुळाजवळ उपलब्ध होऊन त्याचे शोषण कार्यक्षमरीत्या होते.

स्फुरदयुक्त खते - उसासाठी स्फुरदयुक्त खत ठिबक सिंचनातून वापरणे हे अधिक खर्चिक असल्याने स्फुरदयुक्त खतांची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून 50 टक्के लागणीच्या वेळी आणि 50 टक्के मोठ्या खांदणी/भरणीचे वेळी जमिनीमध्ये उसाच्या मुळालगत ओलाव्यामध्ये मिसळून द्यावी. त्याचप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेल्या प्रयोगावरून आपण फॉस्फरिक आम्लाचा वापर स्फुरद खत ऊस पिकास देण्यासाठी करता येतो. त्यामुळे स्फुरद खतमात्रेमध्ये 30 टक्के बचत होते.

पालाशयुक्त खते - पालाशयुक्त खतांचा वापर ठिबक सिंचनातून करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे पोटॅशिअम क्‍लोराईड हे खत उपयुक्त आहे. रेड पोटॅशचा वापर केल्यास त्यातील लोहामुळे ठिबक तोट्या बंद होण्याचा धोका असतो.

खतांच्या ग्रेड्‌स - रासायनिक खते ठिबक सिंचनातून वापरण्यासाठी पाण्यात विरघळणाऱ्या सरळ खतांमध्ये युरिया, अमोनिअम नायट्रेट, डाय अमोनिअम फॉस्फेट, पोटॅशिअम क्‍लोराईड, तर मिश्र खतांमध्ये 20-20-20, 20-9-20, 15-4-15 आणि द्रवरूप खतामध्ये 4-2-8, 6-3-6, 6-4-10, 12-2-6, 9-06 अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत.

ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धती - ठिबक सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणबद्ध आणि मात्राबद्ध पद्धतीने देता येतात. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये स्थिर राहते. खतमात्रा व पाण्याचा प्रवाह सतत एकसारखा राहतो. उदा. एक लिटर खत द्रावण आणि 100 लिटर पाणी या पद्धतीमध्ये खतमात्रा तीव्रतेच्या स्वरूपात म्हणजेच "पीपीएम'मध्ये मोजली जाते. मात्राबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता बदलत राहते. ठिबक सिंचनाद्वारे खत मिश्रित व खत विरहित पाणी पिकाच्या मुळांशी सतत दिले जाते. या पद्धतीमध्ये खतमात्रा कि. ग्रॅम/हेक्‍टर या स्वरूपात मोजली जाते.

खते देण्याची उपकरणे - फर्टिलायझर टॅंक (बायपास टॅंक)-
फर्टिलायझर टॅंकमध्ये खत व पाण्याचे द्रावण तयार होऊन ठिबक संचातील तोट्यांद्वारे पिकाच्या मुळाशी पोचते.

फायदे - 1. देखभालीवरील खर्च कमी, सुलभ वापर.
2. पाण्यात विरघळणारी खते देण्यासाठी उपयुक्त
4) खते देण्यासाठी वाढीव ऊर्जेची आवश्‍यकता नाही.
तोटे -
1) फक्त मात्राबद्ध (क्वांटिटेटिव्ह) पद्धतीने खते देता येते.
2) खतांची तीव्रता एकसारखी राहत नाही, ती कमी होत जाते.
3) पाण्याचा दाब व प्रवाह यातील बदलानुसार खत मात्रा व तीव्रता बदलते.
4) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फर्टिगेशन करण्यासाठी वाहून नेण्यावर निर्बंध येतात.
5) स्वयंचलित सिंचन प्रणालीमध्ये वापरासाठी मर्यादा आहेत.

व्हेंच्युरी इंजेक्‍टर - या उपकरणाच्या साहाय्याने पाइपमध्ये पोकळी निर्माण करून खत द्रावण ओढून घेतले जाते.

फायदे - 1) देखभालीवरील खर्च कमी. वजनाने हलकी व अनेक ठिकाणी वापरण्यास शक्‍य होते.
2) खताची तीव्रता एकसमान राहते.
3) बाहेरील वाढीवर ऊर्जेची आवश्‍यकता नाही.
4) स्वयंचलित सिंचनप्रणालीमध्ये वापरता येते.
तोटे -
1) मोठ्या प्रमाणावर दाबातील घट (हेड लॉस-30 टक्‍क्‍यांपर्यंत)
2) दाबातील फरकानुसार कार्यक्षमतेत बदल होतो.

फर्टिलायझर इंजेक्‍शन पंप - यामध्ये हायड्रॉलिक व इलेक्‍ट्रिक पंपाचा अंतर्भाव होतो. हायड्रॉलिक पंपामध्ये ऍमेआईड व डोसाट्रोन तर इलेक्‍ट्रिक पंपामध्ये डायफ्रॅम व पिस्टन पंपाचा वापर केला जातो.

फायदे 1) प्रमाणबद्ध (प्रपोर्शनल) पद्धतीने खत देता येते. मूळ किंमत व देखभालीवरील खर्च कमी.
2) खतमात्रा अतिशय काटेकोरपणे व एकसमान तीव्रतेने देता येते.
3) पाण्याच्या दाबातील फरकाचा परिणाम होत नाही, हेड लॉस नाही.
4) वजनाने हलका व अनेक ठिकाणी वापर शक्‍य होतो.
5) स्वयंचलित सिंचन प्रणालीसाठी उपयुक्त आहे.
6) बाहेरील वाढीव ऊर्जेची आवश्‍यकता नाही.
तोटे -
1) मूळ किंमत जास्त आहे.
2) काही पंपांसाठी वाढीव ऊर्जा आवश्‍यक असते.

फर्टिगेशन उपकरणांचा तुलनात्मक अभ्यास -

...अशी ठरवा खतांची मात्रा खतांची मात्रा ही जमिनीचा प्रकार, त्यातील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, पीकवाढीच्या आवश्‍यकतेनुसार अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन ठरविता येते. ऊस पिकासाठी खते द्यावयाची असल्यास सहा महिन्यांपर्यंत दर 15 दिवसांनी म्हणजे एकूण तेरा वेळा खते विभागून दिल्यास फायदेशीर ठरतात.
उदा. - एक हेक्‍टर ऊस क्षेत्रास सुरू उसासाठी नत्र, स्फुरद व पालाशची खतमात्रा अनुक्रमे 250ः115ः115 कि./हे द्यावयाच्या झाल्यास दर 15 दिवसांनी युरिया व पोटॅशिअम क्‍लोराईड किती द्यावा लागेल?

पोटॅशिअम क्‍लोराईडमध्ये पालाशचे प्रमाण = 60 टक्के 1. कि. पालाशसाठी = 100/ 60=1.7 कि. पोटॅशिअम क्‍लोराईड
1 हे. क्षेत्रासाठी पोटॅशिअम क्‍लोराईडची गरज = 115 x 1.7 = 195.50 कि./हे.
दर 15 दिवसांसाठी = 195.50/ 13 = 15 कि/ हे./ 15 दिवसांनी.

ऊस पिकासाठी द्रवरूप खताचा वापर करण्यासंदर्भात उदाहरण - ऊस पिकासाठी द्रवरूप खताचे नियोजन (प्रति हेक्‍टर क्षेत्रासाठी)

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ठिबक सिंचनाद्वारे खतांच्या वापराबाबतच्या संशोधनावरून असे दिसून येते, की पाण्यात विरघळणारी अथवा द्रवरूप खते ठिबक सिंचनातून ऊस पिकास दिली असता खताच्या मात्रेमध्ये 30 टक्‍क्‍यांपर्यंत बचत करता येते. उदाहरणादाखल एका प्रयोगाची निरीक्षणे पुढे दिली आहेत.


* टी 1 - ठिबक सिंचनाखाली शिफारशीत खत मात्रा टी 2 - ठिबक सिंचनाद्वारे 100 टक्के शिफारशीत खत मात्रा (4 वेळा)
टी 3 - ठिबक सिंचनाद्वारे 100 टक्के शिफारशीत खत मात्रा (13 वेळा - 15 दिवसांनी)
टी 4 - ठिबक सिंचनाद्वारे 85 टक्के शिफारशीत खत मात्रा (13 वेळा - 15 दिवसांनी)
टी 5 - ठिबक सिंचनाद्वारे 70 टक्के शिफारशीत खत मात्रा (13 वेळा - 15 दिवसांनी)
टी 6 - ठिबक सिंचनाद्वारे 55 टक्के शिफारशीत खत मात्रा (13 वेळा- 15 दिवसांनी)

ठिबक सिंचनातून द्यावयाच्या खतांची निवड आणि कार्यक्षम वापर - 1) खतांच्या द्रावणामध्ये आवश्‍यक अन्नद्रव्याचे प्रमाण जास्तीत जास्त असावे.
2) शेतीतील तापमानास खते पाण्यात लवकरात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत.
3) खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये.
4) खतातील क्षारामुळे गाळप यंत्रणा व ठिबक सिंचनातील तोट्या बंद पडू नयेत, तसेच संचातील कोणत्याही घटकावर खतातील क्षारामुळे गंज चढणार नाही, किंवा इतर अनिष्ट परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
5) खते वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत.
6) खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ व इतर रसायनांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये.
7) एकाच वेळी एकापेक्षा अधिक खते एकत्रित द्यावयाची असल्यास त्यांची आपापसांत कोणतीही रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत.
8) ठिबक संचातील तोट्यांवर खतातील अथवा पाण्यातील क्षार, शेवाळ, लोह, गंधक इ. साचू न देणे जरुरीचे आहे.

संपर्क - अरुण देशमुख - 9822278894
(लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

आडसाली लागवडीसाठी उसाच्या सुधारित जाती

उगवणीपासून ऊस पिकास अनुकूल हवामान व दोन पावसाळे मिळत असल्यामुळे आडसाली हंगामात लावलेले पीक हे जोमदार वाढते. उत्पादन सुरू हंगामाच्या दीडपट येते. आडसाली ऊस लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेल्या सुधारित जातींची माहिती पाहू.

को 86032 (नीरा) - हा वाण 1996 मध्ये को 62198 व को सी 671 या वाणांच्या संकरातून विकसित केला.
- महाराष्ट्रात हा वाण सुरू, पूर्वहंगामी व आडसाली या तीन हंगामांतील लागवडीसाठी प्रसारित.
वैशिष्ट्ये -
- हा वाण मध्यम ते उशिरा पक्व होणारा असून, साखरेचे प्रमाण अधिक आहे.
- तुरा येण्याचे प्रमाण कमी आहे.
- खोडव्यासाठी हा वाण उत्तम आहे.
- काणी व गवताळ रोगास हा वाण मध्यम प्रतिकारक असून, पाण्याचा ताण काही प्रमाणात सहन करतो.
- या वाणाची पाने गर्द हिरवी असून उसाचा रंग अंजिरी आहे. कांड्यावर काही प्रमाणात भेगा आढळतात. पाने सरळ वाढतात.
- या वाणाच्या पानांच्या देठावर कूस नसल्याने वाढ्यांचा उपयोग जनावरांना चाऱ्यासाठी होतो.
- उसाचे व साखरेचे सरासरी उत्पन्न सुरू (106, 14.4 मे. टन), पूर्व हंगामी (139, 19.7 मे. टन) व आडसाली (159, 22.5 मे. टन) अनुक्रमे आहे.

को एम 0265 (फुले 265) - उसाचा नवीन वाण को एम 0265 (फुले- 265), हा को 87044 (मादी वाण) या वाणाच्या जनरल कलेक्‍शनमधून पैदास केला आहे.
वैशिष्ट्ये - हा वाण अधिक ऊस व साखर उत्पादन, तसेच मध्यम साखर उतारा देणारा आहे. मध्यम पक्वता गटात मोडतो.
- या वाणामध्ये गाळपालायक उसाची संख्या, उसाची जाडी व उसाचे वजन जास्त असल्याने हेक्‍टरी ऊस व साखरेचे अधिक उत्पादन मिळते. प्रचलित वाण को- 86032 पेक्षा या वाणाचे दर हेक्‍टरी ऊस उत्पादन 19.45 टक्के, तर साखर उत्पादन 18.74 टक्‍क्‍याने जास्त आल्याचे दिसून आले आहे.
- हा वाण आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तिन्ही हंगामांत चांगला येतो. साखरेचे प्रमाणही (सी.सी.एस. 13.68 टक्के) जवळपास को- 86032 (13.78 टक्के) इतकेच असल्यामुळे हा वाण महाराष्ट्रात तीनही हंगामांत लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आला आहे.
- उसाचे व साखरेचे सरासरी उत्पादन सुरू (150, 20.31 मे. टन), पूर्वहंगामी (165, 22.57 मे. टन), आडसाली (200, 26.82 मे. टन) व खोडवा (130, 17.41 मे. टन) अनुक्रमे येते.
- हा वाण मध्यम ते भारी जमिनीत, तसेच खारवट व चोपण जमिनीतही चांगले उत्पादन देतो.
- पाण्याचा ताण सहन करतो.
- या वाणाची पाने हिरवीगार, तुऱ्याचे प्रमाण अत्यल्प आणि देठावर कूस कमी असल्याने वाढ्यांचा उपयोग चाऱ्यासाठी होतो. या वाणाचे पाचट सहज निघते, त्यामुळे तोडणी करणे सुलभ जाते.
- या वाणाच्या खोडव्याची फूट व वाढ चांगली असल्याने एकंदर उत्पादनही चांगले मिळते.
- हा वाण चाबूक काणी, मर व लालकूज या रोगांना प्रतिकारक आहे, तसेच खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड व लोकरी मावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
- फुले- 265ची रिकव्हरी को- 86032 पेक्षा किंचितशी कमी असली तरी उत्पादकता अधिक असल्यामुळे एक हेक्‍टर क्षेत्रामधून 20 टक्के जादा साखर मिळते. साखर कारखानदार व शेतकरी यांना हा वाण फायदेशीर आहे.

को- व्हीएसआय 9805 (शरद- 1) - ही जात 2008 मध्ये को- 8371 या जातीच्या जी.सी.मधून विकसित करण्यात आली.
- महाराष्ट्रात ही जात सुरू, पूर्वहंगामी व आडसाली या तीन हंगामांत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली.
वैशिष्ट्ये
- ही जात मध्यम ते उशिरा पक्व होणारी असून, साखरेचे प्रमाण अधिक आहे.
- या जातीस तुरा येण्याचे प्रमाण कमी आहे, खोडव्यासाठी ही जात उत्तम आहे.
- उसाचे व साखरेचे सरासरी उत्पादन सुरू (123, 18.45 मे. टन), पूर्वहंगामी (137, 19.69 मे. टन) व आडसाली (165, 24.77 मे. टन) अनुक्रमे आहे.

संपर्क - डॉ. सुरेश पवार, 9423807550
02169- 265337
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आ

उसाला हवा संतुलित खतांचा वापर...

ऊस पिकासाठी शिफारशीप्रमाणे एकरी आठ ते 10 टन शेणखत किंवा कंपोस्टचा वापर करावा. शेणखत किंवा कंपोस्ट उपलब्ध होत नसल्यास ऊस लागणीअगोदर ताग किंवा धैंचासारखी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावीत. याशिवाय कारखान्यातील मळीपासून तयार केलेले बायोअर्थ कंपोस्ट, गांडूळ खत, कोंबडी खत, मासळी खत, हाडाचा चुरा, गळीत धान्याच्या पेंडी, तसेच खोडव्यात पाचटाचे आच्छादन याद्वारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते. ऊस पिकासाठी खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, खत देण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. यामुळे पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

उसासाठी रासायनिक खतमात्रा लागण हंगाम +खत देण्याची वेळ +खतमात्रा (किलोग्रॅम/एकरी) +रासायनिक खते (प्रतिएकरी गोण्या)
+ + +पद्धत - सरळ खते
+ +नत्र +स्फुरद +पालाश +युरिया +सिंगल सुपर फॉस्फेट +म्युरेट ऑफ पोटॅश
आडसाली +लागवडीच्या वेळी (बेसल डोस) 6 ते 8 आठवड्यांनी 12 - 14 आठवड्यांनी मोठी बांधणीच्या वेळी +16 64 16 64 +35 -- -- 35 +35 -- -- 35 +1 3 1 2 +4.5 -- -- 4.0 +1.25 -- -- 1.0
+एकूण +160 +70 +70 +7 +8.5 +2.25

टीप - 1) को-86032 या ऊस जातीसाठी वरीलप्रमाणे शिफारशीत खतमात्रेच्या 25 टक्के मात्रा वाढवून द्यावी.
2) तक्‍त्यात दिलेली रासायनिक खते उदाहरण म्हणून दिली असून, शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि प्रत्यक्ष पिकाला द्यावयाची मात्रा लक्षात घेऊन खतांचा वापर करावा.

खते देण्याची वेळ महत्त्वाची - 1) उसाची उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज कमी असते, तर उगवण, मुळांची वाढ व फुटव्यासाठी स्फुरद व पालाशची गरज जास्त असते.
2) ऊस लागण करताना एकूण शिफारशीत खतमात्रेपैकी 10 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाश देणे फायद्याचे ठरते. फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी नत्राची गरज जास्त असते, म्हणून सहा ते आठ आठवड्यांनी 40 टक्के नत्राची मात्रा द्यावी. जोमदार वाढीच्या अवस्थेच्या वेळी सर्वच अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळी 40 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाशची खतमात्रा द्यावी. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही.
3) गंधकाचा वापर - गंधक हे जरी दुय्यम मूलद्रव्य असले तरी उसासाठी त्याचा वापर महत्त्वाचा आहे. लागणीच्या वेळी एकरी 24 किलो मूलद्रव्यी गंधक शेणखतात मिसळून द्यावे. चुनखडीयुक्त विम्ल जमिनीत मूलद्रव्यी गंधक वापरावा, तर हलक्‍या प्रतीच्या आणि कमी चुनखडीच्या जमिनीत फॉस्फोजिप्सम किंवा कारखान्यातील प्रेसमड केकचा वापर करावा.
4) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर - उसासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्याचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे आहे. माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास लागणीच्या वेळी देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रांबरोबर प्रतिएकरी फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट आठ किलो, मॅंगेनीज सल्फेट 10 किलो व बोरॅक्‍स दोन किलो शेणखतात मिसळून द्यावे.
5) उसासाठी सिलिकॉनचा वापर - जमिनीत सिलिकॉनचे प्रमाण जरी जास्त असले तरी बहुतांशी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. सिलिकॉनची मोनोसिलिसिक आम्ल स्वरूपातील संयुगे क्रियाशील असतात आणि याच स्वरूपात पिकाकडून शोषण होते. शोषण केलेले मोनोसिलिसिक आम्ल पिकाच्या पेशीद्रव्यात सिलिका जेल स्वरूपात साठविले जाते. त्यामुळे पेशी कवच कठीण बनते. पानांतून पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन अवर्षण परिस्थितीत पानांत पाणी टिकून राहते. रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत वाढ होते, जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढते. परिणामी ऊस आणि साखर उत्पादनात चांगली वाढ होते. यासाठी महाराष्ट्रातील मध्यम खोल काळ्या जमिनीत उसाच्या लागण आणि सलग दोन खोडव्यांचे अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी एकरी 160 किलो सिलिकॉन बगॅसची राख किंवा कॅल्शिअम सिलिकेट शेणखतात मिसळून ऊस लागणीच्या वेळेस एकदाच देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मल्टिमॅक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खतांची फवारणी - 1) सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकाची गरज जरी कमी असली तरी या अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे आवश्‍यक असते. यासाठी मल्टिमायक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताच्या उसाच्या पानावर दोन फवारण्या कराव्यात म्हणजे ऊस उत्पादनात आठ ते 10 टक्के वाढ होते.
2) पहिली फवारणी - लागणीनंतर अथवा खोडवा राखल्यानंतर 60 दिवसांनी प्रति एकरी दोन लिटर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक दोन लिटर मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति 200 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.
3) दुसरी फवारणी - लागणीनंतर अथवा खोडवा राखल्यानंतर 90 दिवसांनी प्रति एकरी तीन लिटर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक तीन लिटर मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति 300 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.

खते देताना घ्यावयाची काळजी - सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र 25 ते 30 टक्के, स्फुरद 15 ते 20 टक्के व पालाश 50 ते 60 टक्के पिकास उपलब्ध होतात. हे लक्षात घेता रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
1) खते जमिनीवर पसरून न देता ती मातीत मिसळण्यासाठी चळी घेऊन किंवा खत पेरणी अवजाराच्या साह्याने द्यावीत.
2) युरिया खत देताना निंबोळी पेंडीबरोबर 6 - 1 या प्रमाणात मिसळून द्यावीत.
3) हलक्‍या प्रतीच्या जमिनीत युरियाचा वापर जास्तीत जास्त वेळा विभागून करावा.
4) जमिनीमध्ये वाफसा असताना खते द्यावीत. जमीन कोरडी असल्यास किंवा पाणी दिल्यानंतर लगेच खते देऊ नयेत.
5) ऊस लागणीअगोदर बेणेप्रक्रिया - एक लिटर ऍसिटोबॅक्‍टर डायझोट्रॉफिक्‍स हे जिवाणू खत प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे 10 मिनिटे बुडवून ठेवावे किंवा लागणीनंतर 60 दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खतमात्रेत 50 टक्के बचत होते.
6) स्फुरदयुक्त खते शेणखतात मिसळून मुळांच्या सान्निध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत. जमिनीत स्फुरदाची अविद्राव्य संयुगे तयार होतात आणि स्फुरद पिकास उपलब्ध होत नाही. सेंद्रिय खतातील सेंद्रिय आम्लामुळे स्फुरदाची अविद्राव्य संयुगे विरघळतात. एकरी एक लिटर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खत प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून वाफसा स्थितीत जमिनीत आळवणी केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते. शिफारशीत स्फुरद खतमात्रेत 25 टक्के बचत करता येते.
7) हिरवळीचे पीक घेऊन ऊस लागण करावयाची असल्यास उसासाठीचा स्फुरद खताच्या पहिल्या हप्त्यापैकी 50 टक्के हिरवळीच्या पिकास द्यावा. उरलेला 50 टक्के ऊस लागणीच्या वेळी सरीमध्ये द्यावा.
8) पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा एकरी 50 किलो वाढवून द्यावी.
9) शिफारशीप्रमाणे एकरी 24 किलो गंधकाचा वापर केला असता स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते.
10) पालाशयुक्त खते पाण्याच्या निचऱ्यावाटे वाहून जाण्याचा धोका कमी असतो. ही खतेदेखील सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्‍यतो नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
11) नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची मात्रा युरिया, डायअमोनिअम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतांपासून तयार केलेल्या ब्रिकेटच्या माध्यमातून वाफसा स्थिती असताना पहारीने भोके घेऊन मुळांच्या सान्निध्यात दिल्यास रासायनिक खताची कार्यक्षमता चांगलीच वाढते.
12) ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीत युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ठिबक सिंचनाद्वारे सात ते आठ महिन्यांपर्यंत 12 ते 13 हप्त्यांत पिकाच्या गरजेप्रमाणे विभागून दिल्यास 30 टक्के खतमात्रेत बचत होऊन 10 ते 15 टक्के उत्पादनातही वाढ होते. ठिबक सिंचनाद्वारे दिलेली खते मुळांच्या सान्निध्यात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार गरजेप्रमाणे देता येतात आणि निचऱ्याद्वारे होणारे अन्नद्रव्यांचे नुकसान टाळता येते.

संपर्क - डी. बी. फोंडे - 9850552552
(लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

ऊस शेती सिंचनासाठी वापरू आधुनिक पद्धती

पारंपरिक प्रवाही सिंचन पद्धती सरी-वरंबा ही पारंपरिक प्रवाही सिंचन पद्धत सर्रास उपयोगात आणली जाते. या पद्धतीमध्ये प्रचलित कट वाफे अथवा नागमोडी पद्धत, सुधारित लांब सरी पद्धत, जोडओळ पट्टा पद्धत, एक सरी पट्टा पद्धत आणि समपातळीतील सरी पद्धतीचा समावेश होतो. जमिनीच्या भौमितिक आणि भौगोलिक रचनेनुसार कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब केला जातो. अन्य पद्धतीपेक्षा लांब सरी किंवा जोडओळ पट्टा पद्धतीचा वापर ऊस शेतीमध्ये करणे फायद्याचे आहे.

जोड-ओळ पट्टा पद्धत प्रचलित सरी पद्धतीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे 90 ते 100 सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडतात. (तक्ता क्र. 1) या पद्धतीत दोन सऱ्यांत ऊस लागवड करावी व पुढील एक सरी रिकामी ठेवावी, त्यामुळे उसाच्या दोन ओळीनंतर रिकामा पट्टा राहतो.

दोन सऱ्यांतील व पट्ट्यातील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीचा प्रकार +जोडओळीतील अंतर (सें.मी.) +पट्ट्यातील अंतर (सें.मी)
जास्त खोलीची काळी जमीन +90 +180
मध्यम खोलीची जमीन +75 +150

जोड-ओळ पट्टा पद्धतीचे फायदे - -ऊस लागवडीनंतर चार महिने 80 टक्के क्षेत्रावरच पाणी वापर होतो.
-मोठ्या बांधणीनंतर 40 टक्के क्षेत्रावरच पाणी वापर होतो.
-सरी वरंबा पद्धतीपेक्षा 15 ते 20 टक्के कमी पाणी लागते.
-सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळत असल्याने पिकाची वाढ जोमदार होते.
-आंतरपीक घेण्यासाठी उपयुक्त.
- ठिबक सिंचनाकरिता योग्य.
-आंतरमशागतीकरिता बैल अवजाराचा व लहान ट्रॅक्‍टरचा वापर सुलभपणे करता येतो.
-तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
-पट्ट्यात पाचट आच्छादन करणे सोपे होते.

ब) प्रत्येक पाळीत पाणी किती द्यावे? ऊस पीक बारमाही असल्यामुळे हंगामानुसार प्रवाही सिंचन पद्धतीने सुरू, पूर्वहंगामी व आडसाली पिकासाठी अनुक्रमे 250, 275 व 350 सें.मी. पाण्याची गरज असते. हवामान, जमिनीचा प्रकार, जमिनीची खोली, पिकाचे वय इत्यादी घटकांवर प्रत्येक पाळीतील पाण्याची मात्रा अवलंबून असते. उसाला 25 टक्के सरीच्या बुडातील भाग ओला होईल एवढेच पाणी देणे गरजेचे असते.

प्रत्येक पाळीत पाण्याची मात्रा - "कटथ्रोट फ्ल्यूम' या पाणी मोजण्याच्या साधनाचा वापर करून उसाच्या पाण्यात बचत आणि उत्पादनात वाढ करता येते.
क) पिकाला पाणी केव्हा द्यावे?

जमीन व ऋतुमानानुसार पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर जमिनीचा प्रकार +ऋतुमान +पाण्याच्या पाळीतील अंतर (दिवस)
भारी +पावसाळा हिवाळा उन्हाळा +26 20 13
मध्यम +पावसाळा हिवाळा उन्हाळा +18 14 09
हलकी +पावसाळा हिवाळा उन्हाळा +08 06 04

प्रवाही सिंचनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी - 1) मे महिन्यातील उपलब्ध पाणी विचारात घेऊनच उसाचे क्षेत्र ठरवावे.
2) जमिनीचे सपाटीकरण करून उतार मर्यादित (0.3 ते 0.5 टक्का) ठेवावा.
3) लांब सरी पद्धतीमध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर कमी ठेवावे.
4) जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्‍या जमिनीत प्रत्येक सरीमधून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे 1 ते 1.5, 2 ते 2.5 आणि 2.5 ते 3 लि./ सेकंदाचा प्रवाह विभागून द्यावा.
5) पाचट आच्छादनामुळे पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढते. पाण्याच्या दहा पाळ्या वाचतात.
6) शेताच्या बाहेरच्या बाजूस साधारणपणे एक मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये.
7) अति अवर्षण काळात पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन (10 टक्के) सारख्या बाष्पीभवन विरोधी द्रावणाची 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
8) तणांचा बंदोबस्त वेळीच करावा.
9) अवर्षण काळात पाण्याची टंचाई जाणवत असल्यास नोव्हेंबरपासूनच पाण्याच्या प्रत्येक पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे. शक्‍य तेथे आंतरमशागत करावी. पिकाची मुळे खोलवर जाऊन अवर्षणास तोंड देण्यास समर्थ बनतात. अवर्षणग्रस्त परिस्थितीत पिकाला पोटॅश खताचा 25 टक्के हप्ता अधिक द्यावा. त्यामुळे उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट येत नाही.
10) दोन पाळ्यांतील अंतर तक्ता क्र. 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे ठेवावे.
11) प्रवाही सिंचनाचे मुख्य पाट व दांड स्वच्छ ठेवावे.

ऊस शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धती - - महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू आहे. त्याची व्याप्ती अधिक ऊस क्षेत्रावर होण्याची आवश्‍यकता आहे. ती मोठ्या प्रमाणावर वाढविणे ही काळाची गरज आहे. ऊस शेतीसाठी सूक्ष्मनलिका (मायक्रोट्यूब) पद्धत, दाबनियंत्रण नसणारे ड्रीपर पद्धत, दाबनियंत्रण असणारे ड्रीपर्स पद्धत, लॅटरलच्या आत ड्रीपर्स असणारी (इनलाईन ड्रीप) पद्धती या चारपैकी एका ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करता येतो.

ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे - 1) उत्पादनात वाढ - मुळांच्या कक्षेतील ओलावा (पाणी) व हवा यांचे योग्य प्रमाण साधले जाऊन उत्पादकता 25 ते 30 टक्के वाढते.
2) पाण्याची बचत - पिकाला त्याच्या आवश्‍यकतेनुसार हवे तेवढेच पाणी दिल्यामुळे 45 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत पाण्यात बचत होते.
3) पाण्यात विरघळणारी खते (युरिया व पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश) मुळांच्या सहवासात देता येतात व त्यामुळे खतांच्या मात्रेत 30 टक्के बचत होते.
4) तणांचा प्रादुर्भाव व कमी व पर्यायाने खुरपणीचा/ तणनाशकांचा खर्च कमी येतो.
5) रानबांधणीची आवश्‍यकता नाही.
6) जमीन सपाटीकरणाची आवश्‍यकता नसते.
7) पिकांच्या गरजेनुसारच पाणी दिल्यामुळे कालांतराने जमीन नापिक (खारवट, चोपण) होण्याची शक्‍यता नाही.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस शेतीत ठिबक सिंचनाच्या वापराच्या प्रयोगातील निष्कर्ष (सरी-वरंबा पद्धतीच्या तुलनेत)

विवरण +सरी वरंबा पद्धत +ठिबक सिंचन पद्धत +ठिबक सिंचन वापरल्याचे फायदे उसासाठी एकूण देण्यात आलेले पाणी (हे. सें.मी.) +240 ते 300 +130 ते 150 +पाण्यात बचत - 45 ते 50 टक्के
ऊस उत्पादन (टन/हे.) +100 ते 110 +130 ते 145 +उत्पादनात वाढ - 25 ते 30 टक्के
पाणी वापर क्षमता (टन/हे. सें.मी.) +0.35 ते 0.40 +0.80 ते 1.0 +सरी वरंबा पद्धतीच्या तुलनेत ठिबक सिंचनाची पाणी वापर क्षमता 2 ते 2.5 पट जास्त
पाणी देण्याची कार्यक्षमता (%) +45 - 50 +90 ते 95 +पाणी देण्याच्या कार्यक्षमतेत 30 टक्के वाढ
रासायनिक खतमात्रा (कि.ग्रॅ./हे.) +250 - 115 - 115 +175 - 8- 81 +खतमात्रेत 30 टक्के बचत
योग्य रानबांधणी +लांब सरी/ पट्टा पद्धत +जोडओळ पट्टा पद्धत/ जास्त अंतरावरील (1.5 मी.) सरी पद्धत +जोड ओळ पद्धतीत 0.75 - 1.5 मी. अंतर मध्यम जमिनीसाठी तर 0.90 - 1.8 मी. अंतर जास्त खोलीच्या भारी जमिनीसाठी उपयुक्त
ऊस शेतीत योग्य ठिबक सिंचन पद्धत +-- +-- +पृष्ठभागावरील दाबनियंत्रित ठिबक व इनलाईन ठिबक पद्धत
नफा - खर्च गुणोत्तर +1 - 8 - 1 +2.5 - 1 +ऊस शेतीमध्ये तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या ठिबक सिंचन किफायतशीर

ठिबक सिंचन संच निवडताना काय काळजी घ्यावी -सर्व घटक आय.एस.आय. प्रमाणानुसार असलेल्या संचाचीच निवड करावी.
-गुणवत्तेच्या वर्गीकरणानुसार ठिबक सिंचन संचाच्या किमतीविषयी खात्री करून घ्यावी.
-जमिनीचा प्रकार, उतार व पाण्याच्या प्रतीनुसार इनलाईन किंवा ऑनलाइन तोट्यांची निवड करावी.
-पाण्यात भौतिक पदार्थ जास्त प्रमाणात असल्यास वाळूच्या गाळण टाकीचा समावेश आवश्‍यक आहे.
-उन्हाळ्यात प्रवाही पद्धतीने ओलित होत असलेल्या क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्राकरिता ठिबक सिंचन संचाची निवड करावी.
-ठिबक सिंचन पद्धतीचा वापर जोड-ओळ पट्टा पद्धतीतच करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर.
-इनलाईन ठिबक सिंचन वापरणार असल्यास कमीत कमी वर्ग-2 ची इनलाईन ठिबक संचाची निवड करावी.

सबसरफेस ठिबक भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन पद्धती
जमिनीखाली पिकांच्या मुळांच्या सहवासात थेंबा-थेंबाद्वारे सिंचन करण्याच्या पद्धतीला भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन असे म्हणतात. या पद्धतीतील घटक भूपृष्ठावरील ठिबक सिंचन पद्धतीप्रमाणे असून, इनलाईन इमिटिंग पाइप्स जमिनीखाली 10-15 सें.मी. खोलीपर्यंत घालून सर्व ठिकाणी सारख्या प्रवाहाने पाणी दिले जाते.

फायदे - 1) जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी होते. पाणी वापर क्षमता वाढते आणि पाण्यात बचत होते.
2) जमिनीचा पृष्ठभाग कोरडा राहिल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
3) इनलाईन इमिटिंग पाइप जमिनीत ठराविक खोलीवर (10 ते 15 सें.मी.) घातली असल्याने यांत्रिक पद्धतीने तोडणी करताना अडचण येत नाही.
4) मुळांजवळ गरजेएवढा ओलावा ठेवता येत असल्याने अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.

इमिटिंग पाइप्सवरील ड्रीपरमधील अंतर व प्रवाह - - जमिनीच्या प्रकारानुसार ड्रीपर्समधील अंतर ठेवल्यास पाण्याचे उभे-आडवे प्रसरण योग्य प्रमाणात होऊन पिकास सर्वत्र समान प्रमाणात पाणी मिळते व पिकाची वाढ जोमदारपणे होते.
- हलक्‍या वालुकामय जमिनीसाठी दोन ड्रीपर्समधील अंतर 30 सें.मी. असावे. तर मध्यम खोलीच्या जमिनीसाठी 40 सें.मी. आणि जास्त खोलीच्या चिकणमातीच्या जमिनीसाठी 50 ते 60 सें.मी. असावे.
- ड्रीपरचा प्रवाह जमिनीत पाण्याचे होणारे प्रसरण, तसेच उसाच्या मुळांच्या व्याप्तीवर अवलंबून असते. साधारणपणे 2.5 लिटर प्रति तास प्रवाह देणाऱ्या ड्रीपर्सचा वापर करणे फायदेशीर ठरते.

सबसरफेस ठिबक उभारणी करताना खालील काळजी घ्यावी - इमिटिंग पाइप्सच्या टोकांना एंड कॅप लावण्याऐवजी सर्व टोके कलेक्‍टर पाइपला जोडावीत व त्याची चरामध्ये उभारणी करावी.
- सबमेनच्या खोलीपेक्षा कलेक्‍टर पाइपची खोली थोडी जास्त असू द्यावी व सबमेनपासून कलेक्‍टर पाइपपर्यंत थोडा उतार असू द्यावा.
- सबमेन व कलेक्‍टर पाइपमधील हवा निघून जाण्यासाठी एअर व्हॉल्व्ह बसवावेत.
- सबमेन फ्लश करण्यासाठी फ्लश व्हॉल्व्ह बसवावेत.
- दाब जाणून घेण्यासाठी सबमेनवर दाबमापकाचा अवलंब करावा.

रेनगन तुषार सिंचन पद्धती रेनगन तुषार सिंचन संच नेहमीच्या तुषार सिंचन संचापेक्षा मोठा असून, एकाच वेळेस जास्त क्षेत्र भिजविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या संचामध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या मॉडेलच्या साह्याने एक स्प्रिंकलर साधारणपणे 125 ते 400 फूट इतक्‍या व्यासावर 100 ते 1000 लिटर प्रति मिनिट या प्रवाहाने एका जागेवरून पाणी फवारू शकतो.

वैशिष्ट्ये - - हा संच 3 ते 3.5 कि. ग्रॅम प्रति वर्ग सें.मी. (30 ते 35 मी.) या दाबावर कार्यरत होतो. आवश्‍यक तो (45 ते 50 मी.) दाब निर्माण करण्यासाठी 7.5 ते 10 अश्‍वशक्तीचा पंप वापरावा लागतो.
- नोझलमधून पडणाऱ्या पाण्याचा वेग नियंत्रित करून सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी देता येते. तसेच पृष्ठभागावरून पाणी वाहण्याचा प्रकार थांबविता येतो.
- पूर्ण वर्तुळाकार किंवा विविध अंशांत फिरणारी तुषार तोटी वापरून वेगवेगळ्या मॉडेलच्या साह्याने परिस्थितीनुसार पाणी देता येते.
- संच वजनाने हलका असल्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सिंचन करता येते.
- पी.व्ही.सी. अथवा लोखंडी पाइपला रेनगन सहजपणे जोडता येते. तसेच शेताच्या लांबीप्रमाणे पाणी वाहून नेण्यासाठी नायलॉन होज पाइपचा वापरही करता येतो.
- तुषार सिंचन संच देखभालीच्या दृष्टिकोनातून अतिशय सुलभ आहे.
रेनगन तुषार सिंचन पद्धतीचे फायदे ः
-लहान तुषार सिंचन संचापेक्षा सिंचनासाठी लागणारे मनुष्यबळ व कालावधी यामध्ये बचत होते.
-नायलॉन होज पाइपचा वापर केल्यास एक किंवा दोन रेनगनमध्ये संपूर्ण शेत भिजविता येते.
-पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून पिकाच्या गरजेइतकेच पाणी देता येते. त्यामुळे पाण्याचा होणारा अनावश्‍यक व्यय टाळता येतो.
-जमिनीच्या पाणी शोषण क्षमतेनुसारच पाणी दिल्यास थोड्याशा उंच-सखल जमिनीतही पाणी देता येते. रानबांधणीचा खर्च वाचतो.
-तुषार सिंचनाखाली शेतातील पाचटाचे कंपोस्ट खत लवकर तयार होण्यास मदत होते.
-पाण्यातून विद्राव्य खते देता येतात.
-ठिबक सिंचन पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी येतो.

रेनगन तुषार सिंचन पद्धतीतील मर्यादा - 1) पंप जास्त अश्‍वशक्तीचा लागत असल्यामुळे वीजबिलाचा खर्च वाढतो.
2) आर्थिक गुंतवणूक पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त लागते.

ऊस शेतीसाठी विविध सिंचन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे केला असता खालीलप्रमाणे निष्कर्ष मिळाले ः

सिंचन पद्धत +दिलेले पाणी (हे. सें.मी.) +ऊस उत्पन्न (टन/हे.) +पाणी वापराची कार्यक्षमता (टन/हे. सें.मी.) +सी.सी.एस. (टन/हे.)
ठिबक सिंचन +132.14 +128.64 +0.97 +18.29
रेनगन तुषार सिंचन +175.26 +126.56 +0.72 +17.87
सरी वरंबा +258.45 +104.42 +0.40 +14.71

(लेखक कृषी अभियांत्रिकी विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख या पदावर कार्यरत आहेत.)

अल्पभूधारक महिला झाल्या पोल्ट्री व्यावसायिक

"ति..ति..ति..या..या..' अशी सौ. आशाताईंनी वेगळ्या ढंगाने दिलेली हाक ऐकू येते. दोन ते चार मिनिटांत इतरत्र फिरणाऱ्या कोंबड्या आशाताईंजवळ येऊन थांबतात. पुढ्यात ठेवलेले खाद्य खाण्यासाठी त्यांच्यात स्पर्धाच लागते. काही क्षणात खाद्य संपवून कोंबड्या पुन्हा शिवारात पळतात.

जत तालुक्‍यातील वळसंग (जि. सांगली) गावातील घरासमोर दिसणारे हे दृश्‍य. सौ. आशाताई यांच्यासारख्या सुमारे तीस महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून गावात कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत. पक्ष्यांबरोबर अंडी विकून या व्यवसायात स्थिरस्थावर होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

वीस पक्ष्यांपासून ते दीड हजार पक्षी जत तालुक्‍याचा उल्लेख केवळ दुष्काळी प्रश्‍नासाठी नेहमी येतो. जतपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील वळसंग गाव दुष्काळी पट्ट्यातील. पण गेल्या वर्षाच्या कालावधीत या गावातील महिलांमध्ये मात्र उत्साह संचारला आहे. शेतीपूरक व्यवसाय करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली आहे. श्रद्धराया, केंचराया व जयभवानी या तीन महिला शेतकरी गटांनी कुक्कुटपालनाच्या व्यवसायात आगेकूच केली आहे.

कृषी विभागाच्या "आत्मा" योजनेअंतर्गत येथील महिलांचे तीन गट तयार करण्यात आले. सुमारे तीस महिला (अल्पभूधारक) त्याअंतर्गत कार्यरत आहेत. पूर्वी त्यांच्यापैकी कोणी आपल्याच शेतात, तर कोणी दुसऱ्यांच्या शेतात काम करीत कसाबसा उदरनिर्वाह करीत होत्या. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये "आत्मा"च्या वतीने कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक महिलेने आपल्या कुवतीनुसार हा व्यवसाय सुरूही केला. वीस पक्ष्यांपासून ते दीड हजार पक्षी त्यासाठी विकत घेतले. त्यासाठी बचत गटांतून आर्थिक मदत घेतली. व्यवसायातील सर्व महिला नवख्या होत्या. प्रशिक्षण व एकमेकींशी सल्लामसलत यातून त्यांनी पक्ष्यांचे व्यवस्थापन सुरू केले.

अंडी विक्रीतून नफा एकत्रित अकरा जणांच्या शिंदे कुटुंबाच्या सदस्य असलेल्या सुलोचना, सौ. आशा यांच्याकडे तीस कोंबड्यांचे व्यवस्थापन आहे. घरगुती स्वरूपात व्यवसाय करताना गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी देशी कोंबड्यांची 50 पिल्ले आणली. त्यासाठी केवळ बाराशे रुपयांची गुंतवणूक केली. पिल्ले आणून त्यांचे संगोपन केले. ती मोठी झाल्यानंतर विक्रीचे नियोजन केले. सुमारे अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत प्रति पक्ष्यांची त्यांच्या वयानुसार विक्री सुरू केली. काहींनी उत्पन्नाचा मुख्य स्रोत अंडी हाच ठेवला.

कोंबड्या प्रति आठवड्याला साठ ते सत्तर अंडी देतात. जत शहराचा आठवडी बाजार मंगळवारी असतो. त्यात अंड्यांची पाच रुपयांना प्रति नग दराने विक्री होते. आठवड्याला साडेतीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत रक्कम मिळते.
पक्षी विक्रीपेक्षा अंड्यांच्या विक्रीतून नियमित नफा मिळत असल्याचे आशाताईंनी सांगितले. या कामी त्यांना संपूर्ण कुटुंब मदत करते. माफक नफा असला तरी उदरनिर्वाह स्थिर सुरू होईल इतकी रक्कम नक्कीच मिळत असल्याने पुढील काळात कोंबड्यांची संख्या वाढविण्याचा विचार या महिलांचा आहे.

एकत्रित येऊन केला व्यवसाय यशस्वी मालन पाटील, गोकुळा सावंत व सुरेखा सावंत यांनी एकत्रितपणे सुमारे दीड हजार पक्षी विकत घेऊन त्यांची गावच्या बाहेर मळा भागात जोपासना केली आहे. बचत गटांतून प्रत्येकीने तीस हजार रुपये कर्ज काढले. मालनताईंच्या घराशेजारील शेडमध्ये सुमारे पंधराशे कोंबड्या आहेत. नगर जिल्ह्यातून त्यांनी देशी पक्षी आणले. गेल्या सात महिन्यांत दीड हजार कोंबड्या त्यांनी विकल्या आहेत. आता दुसरी बॅच विक्रीच्या तयारीत आहे. विक्रीच्या पहिल्या बॅचमधून नव्वद हजार रुपयांचा निव्वळ नफा त्यांना झाला.

स्थानिक परिस्थितीनुसार मार्केट ओळखले स्थानिक परिस्थिती पाहून विक्री केली की कसा फायदा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे या महिलांच्या व्यवसायाकडे पाहता येईल. जतमध्ये गेल्या काही वर्षांपासून पवनचक्‍क्‍यांचा व्यवसाय जोमात आहे. त्यांच्या उभारणीच्या निमित्ताने देशभरातून कामगार येथे येतात. गावरान पक्ष्यांसाठी कामगार हेच थेट ग्राहक उपलब्ध झाले आहेत. बहुतांशी घरच्या घरीच पक्ष्यांची खरेदी होते. बाजारभावापेक्षा चांगला दर मिळतो. आता वळसंग व आसपासच्या परिसरात या महिलांच्या कुक्‍कुटपालनाची चांगली प्रसिद्धी झाली आहे. गावरान कोंबड्या कोणत्याही वेळेत मिळत असल्याने घरगुती ग्राहक सहज उपलब्ध होत असल्याचे मालनताईंनी सांगितले.

समन्वय महत्त्वाचा... एकमेकींच्या विश्‍वासावरच कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर बनत असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले. अशीच उदाहरणे अन्य महिलांचीदेखील आहेत. या सर्वांनी उत्पादन खर्च वजा करून आता नफ्यात व्यवसाय सुरू केला आहे.

वळसंगच्या महिलांचे कुक्‍कुटपालन-दृष्टिक्षेपात * कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतल्याने पक्षी व्यवस्थापन सुलभ
* आपापल्या कुवतीनुसार पक्ष्यांची संख्या ठेवणे व जोपासना
* सामूहिकेतवर अधिक भर
* बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत
* स्थानिक परिस्थितीचा फायदा घेत यशस्वी विक्री
* कोंबड्यांबरोबरच अंडीविक्रीतून मिळविला नफा
* एकमेकींच्या विश्‍वासावर फुलविला व्यवसाय


जतसारख्या दुष्काळी तालुक्‍यात या महिलांनी दाखविलेली जिद्द प्रेरणादायी आहे. आम्ही केवळ प्रशिक्षण, तांत्रिक माहिती व आत्मविश्‍वास त्यांना दिला. त्या जोरावर त्यांनी कुक्कुटपालन यशस्वी केले. आज तीस कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न त्यामुळे मिटला आहे. पुढील काळात याला व्यापक स्वरूप देणार आहोत.
-मुकुंद जाधवर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, जत

वळसंगमध्ये महिलांच्या कुक्कुटपालन व्यवसायाच्या संघटनांची जबाबदारी कन्याकुमारी बिरादार यांच्याकडे आहे. त्या म्हणाल्या, की
1) इथल्या महिला अल्पभूधारक व अल्पशिक्षित आहेत. पण त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य दडले आहे. महिन्याला होणाऱ्या बैठकांतून आम्ही अडचणीची देवाण-घेवाण करतो.
2) हा व्यवसाय कोणत्याही कारणाने बंद पडता कामा नये. त्या दृष्टीने कोणाला पक्ष्यांची गरज आहे किंवा अन्य समस्या आहेत त्या जाणून पूर्ण केल्या जातात.
3) परसबागेतील कुक्कुटपालन सांभाळून शेती व घरी लक्ष देणेही महिलांना शक्‍य होत आहे.
शेळीपालन, गटशेतीतून भाजीपाल्याचे प्रयत्न भविष्यात करणार आहोत.

वळसंग पोल्ट्री व्यवसाय दृष्टिक्षेपात -लसीकरण, पक्ष्यांचे आरोग्य यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत घेतली जाते.
-प्रति हजार पक्ष्यांमागे प्रति महिना एक महिला सुमारे दहा हजार रुपयांचे उत्पन्न घेईल असा प्रयत्न आहे.
-आठवड्याला बाजारात एक महिला सुमारे 70 ते 80 अंडी विकते. अंड्यांचा प्रति नग दर पाच ते सात रुपये आहे.
-पक्ष्यांची विक्री वजनावर व मागणीनुसार होते. लहान वयाच्या पक्ष्यांना प्रति नग 150 ते 200 रुपये व मोठ्या पक्ष्यांना 250 ते 300 रुपये दर मिळतो.
-माडग्याळ व जत अशा दोन बाजारपेठा विक्रीसाठी आहेत. गिरिराज व गावरान पक्षी असल्याने त्यांना मागणी चांगली आहे.

जशी मागणी असेल तशा संख्येने कोंबड्या विकतो. नुकतेच एक ग्राहक 50 कोंबड्या एकावेळी घेऊन गेले. प्रति नग 130 रुपयांनी विक्री केली. थेट ग्राहकांना विक्रीतून अधिक फायदा होतो. उर्वरित पक्षी व्यापाऱ्यांना देतो. किलोला 130 रुपये दराने ते विकत घेतात. सुमारे अडीच ते तीन महिने वयाची कोंबडी असेल तर ती 250 ते 300 रुपयांना जाते. सध्या आमच्याकडे 900 पक्षी आहेत.

मालन पाटील

संपर्क - कन्याकुमारी बिरादार, 9764171721
संघटक

पारंपरिक पीक पद्धतीत डाळिंबातून केला बदल

जे करायचे ते मन लावून व आदर्शव्रत करायचे आणि त्यासाठी संपूर्ण वेळ द्यायचा. ही वृत्ती ज्या शेतकऱ्यांची असेल, त्याची शेती उच्च दर्जाचीच असू शकते. जमीन कशीही असली तरी ती कसणारा चांगला असेल आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेतीला आकार देणार असेल तर यश त्याच्यापासून दूर नसते. वरझडी गावचे 31 वर्षीय भारत शिवनाथ पठाडे यांनी हे दाखवून दिले आहे.

औरंगाबाद-जालना महामार्गावर करमाडपासून केवळ 14 किलोमीटर अंतरावरील वरझडी हे कोबी पिकासाठी प्रसिद्ध गाव आहे. येथील सरासरी शेतकऱ्यांकडे कमी जमीन. त्यामुळे जमिनीच्या प्रत्येक कोपऱ्याकडेदेखील लक्ष ते देतात. याच मातीत जन्मलेले, राबलेले भारत पठाडे यांनी फळबागेकडे वळण्याचा विचार केला आणि लावले डाळिंब!

डाळिंब लागवडीची पार्श्‍वभूमी करमाड परिसरात बहरत असलेल्या डाळिंब बागा पाहून गावचे काही काळ सरपंच राहिलेले शिवनाथ पठाडे यांनी डाळिंब लागवडीचा निर्णय घरी सांगितला. पारंपरिक कोबी व भोपळ्याचे बीजोत्पादन सोडून डाळिंबासारखे नवखे पीक घेण्याचा धोका पत्करू नये, असे घरातील सर्वांना वाटत असतानाही याच पिकाचा निश्‍चय त्यांनी केला. त्यांना साथ दिली ती मुलगा भारत पठाडे यांनी.

अनुभवी शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन डाळिंब लागवड करण्याचे नक्की झाल्यानंतर परिसरातील अनुभवी बागायतदारांच्या बागेची पाहणी व चर्चा केली. यात जडगावचे विठ्ठल भोसले, भांबर्ड्याचे शेषराव दौंड, पिंपळखुट्याचे विष्णू घोडके, तसेच टोणगावचे जयाजीराव सरोदे आदींचा अनुभव त्यांच्या उपयोगी आला. सन 2006 मध्ये कृषी विभागाशी संपर्क साधला. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेऊन लागवड केली.

लागवडीतील महत्त्वाचे मुद्दे - बागेचे प्रातिनिधिक नियोजन असे. जमिनीची चांगली मशागत केली. जमीन हलकी व मुरमाड अशी असल्याने प्रथमतः 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे खोदले. त्यात गाळाची माती, चांगले कुजलेले शेणखत व सुपर फॉस्फेट खताचे मिश्रण टाकले. तत्पूर्वी 10 ते 15 ग्रॅम फोरेट टाकले. कृषी विभागाच्या परवान्याच्या आधारे शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून आणलेली भगवा डाळिंब कलमे आणून लावली. ठिबक सिंचन होतेच. सुरवातीला चार तास पाणी दिले. त्यानंतर तीन दिवसाआड दीड ते दोन तास पाणी दिले. एक महिन्याच्या अंतराने विद्राव्य खते दिली. डाळिंबाची वाढ चांगली होत होती. दोनच महिन्यांत झाडाच्या फांद्या जमिनीवर लोळू लागल्या. जमिनीपासून दीड फुटांपर्यंतच्या सर्व फांद्या काढून घेतल्या. इतर फांद्यांचे शेंडेही कापून झाडास योग्य आकार दिला. एक फुटाचे गादीवाफे तयार केले. ते करतानाच त्यात शेणखत टाकले. त्यावर कीडनाशक पावडर टाकली. डाळिंबाची दुसरी छाटणी पहिल्या छाटणीनंतर चार महिन्यांनी केली. त्यामुळे झाडाची अवास्तव वाढ थांबवून त्यास चांगला आकार देता आला. गादीवाफे पुन्हा व्यवस्थित करून घेतले. पाण्याबरोबर रासायनिक व जैविक खतांच्या नियोजनाबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही नियोजन केले. त्यामुळे झाडाची निरोगी व सशक्त वाढ झाली.

एकूण 11 एकर जमिनीचे नियोजन पठाडे यांची एकूण जमीन 11 एकर असून ती दोन ठिकाणी आहे. त्यांची पावणेचार एकर डाळिंब जुनी आहे. त्यातही सहा व चार वर्षे असे बागेचे दोन प्रकार आहेत. नवी तीन एकर बाग असून ती 14 महिने वयाची आहे. लागवडीची अंतरे 11 x 8, 12 x 8, 15 x 8 अशी वेगवेगळी ठेवली आहेत.

अन्नद्रव्य व्यवस्थापन - झाड सशक्त असेल तरच त्यापासून चांगले उत्पादन घेता येते. त्यासाठी रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खताचेही व्यवस्थापन तेवढेच महत्त्वाचे होते. आपल्या शेतातील शेणखत, गोबरगॅस स्लरी व काही विकतचे कंपोस्ट खत आणून ते झाडांना दिले. प्रति 50 झाडांसाठी एक ट्रॉली कंपोस्ट खत हे प्रमाण वापरले. तसेच 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 200 ग्रॅम पोटॅश व एक किलो युरिया तसेच एक ते दीड किलो निंबोळी पेंड प्रति झाड असा वापर केला. त्यानंतर एक दिवसाआड प्रति एकर तीन किलो 19ः19ः19 तसेच 0ः52ः34 व अन्य विद्राव्य खते वाढीच्या शेवटच्या टप्प्यात वापरली. खताच्या मात्रा देण्यापूर्वी पान व देठांचे पृथक्‍करण केले जाते.

सिंचन व्यवस्था - 1) राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 50 लाख लिटर व 75 लाख लिटर क्षमतेची दोन शेततळी घेतली आहेत.
यंदा अद्याप एकच पाऊस झाला असून आता त्याची अधिक प्रतीक्षा आहे. मात्र मागील वर्षी शेततळ्याचा आधार राहिल्याने बाग जगवणे सुलभ झाले. शेतात दोन विहिरी आहेत. एक विहीर नदीच्या काठाजवळ असल्याने पावसाळ्यात ती तुडुंब भरते. त्यातील पाणी उचलून शेततळे भरले जाते. तसेच सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील बनगाव येथील तलावाजवळ जमीन घेऊन तेथे विहीर खोदली व त्यातून पाणी आणले. विहिरीचे पाणी संपले की शेततळ्यातील पाण्याचा उपसा करण्यात येतो. त्यामुळे किती पाणी द्यायचे याचा अंदाज बांधणे सोपे जाते. उन्हाळ्यात दोन वेळेस मोकळे पाणी देऊन आर्द्रता कायम राखण्याचा प्रयत्न केला.
2) नवी डाळिंब लागवड शेततळ्याशेजारी असून पूर्वीची लागवड गावाजवळील शेतात आहे. दोन्ही शेतांतील अंतर सुमारे एक किलोमीटर आहे. पूर्वीच्या डाळिंब बागेपासून शेततळ्याचे अंतर 1000 मीटर आहे. त्यासाठी 160 पाइप वापरून पाइपलाइन केली व डाळिंबासाठी सिंचन केले.

उत्पादन व विक्री एकूण नियोजनातून पठाडे यांनी बागेतून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. सन 2012 मध्ये पावणेचार एकर बागेतून त्यांना एकूण 46 टन उत्पादन मिळाले. त्याला प्रति किलो 45 पासून ते 65 रुपयांपर्यंत दर मिळत राहिला. सुमारे 11 टन नाशिक बाजारपेठेत विकला. उर्वरित सर्व माल व्यापाऱ्यांना जागेवरच दिला.
सन 2011 मध्येही त्यांनी उत्पादन घेतले. त्याला प्रति किलो 52 रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
दरवर्षी आंबेबहर घेण्याचे पठाडे यांचे नियोजन असते. यंदाही या बहराची अवस्था समाधानकारक असून
सन 2012 च्या तुलनेत अधिक उत्पादन आपण घेऊ अशी त्यांना अपेक्षा आहे.
डाळिंबाचा उत्पादन खर्च एकूण उत्पादनयोग्य क्षेत्रात सुमारे सहा लाखापर्यंत येत असल्याचे पठाडे म्हणाले.
सुरवातीच्या 50 गुंठे क्षेत्रातील 625 डाळिंबापासून 16.50 टन उत्पादन वाढत वाढत जाऊन 29 टन उत्पादन मिळाले. परिसरातील डाळिंब उत्पादन हे सरासरी 30 ते 35 किलो प्रति झाड असे आहे. पण योग्य नियोजनामुळे भारत पठाडे यांना 44 पासून 47.20 किलोपर्यंत प्रति झाड उत्पादन मिळाले.

कृषी विभागाची साथ डाळिंब लागवड, शेततळ्याचे खोदकाम व अस्तरीकरण, प्लॅस्टिक आच्छादन व गोबर गॅस संयंत्रासाठी कृषी विभागाच्या अनुदानाची मदत पठाडे यांना झाली. कृषी सहायक मंगेश निकम, तत्कालीन कृषी अधिकारी श्रीकांत देशपांडे, सध्याचे मंडल कृषी अधिकारी कैलास पाडळे व प्रदीप अजमेरा यांनीही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

(लेखक बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत कृषी पर्यवेक्षक आहेत.)

संपर्क - भारत पठाडे, 942518801

राज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजना (फलोत्पादन पिके)

योजनेचे स्वरूप : या योजनेअंतर्गत मंजूर होणारे अनुदान हे राज्यस्तरावरून मंजूर करण्यात येते. सदर मंजूर केलेल्या अनुदानाच्या अधीन राहून 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कीडनाशकांचा पुरवठा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात येतो. या योजनेअंतर्गत लागणारी कीडनाशके ही महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत पुरवठा करण्यात येतात. ही योजना सर्व फळझाडे, भाजीपाला, फुलपिके, मसाला पिके व औषधी व सुगंधी वनस्पती या पिकावर उद्‌भवणाऱ्या कीड, रोगाचे नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात येते.

लाभार्थी निवडीचे निकष : या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इत्यादी) लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येतो. लाभार्थी अल्प भूधारक/सीमांतिक असल्यास प्राधान्य देण्यात येते.

लाभार्थी निवड प्रक्रिया : कृषी विकास अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थी निवड केली जाते.


योजनेअंतर्गत घटक, आर्थिक मापदंड व समाविष्ट जिल्हे : या योजनेअंतर्गत कीडनाशकांचा 50 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येतो. मागणी केलेल्या जिल्ह्यास अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्याकरिता संपर्क अधिकारी : संबंधित जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी

असे आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

"रोहयो' निगडित फळझाड लागवड योजनेमुळे राज्यातील फळपिकांखालील क्षेत्र सुमारे 13.36 लाख हेक्‍टर इतके वाढलेले आहे. उत्पादनक्षम क्षेत्रापासून सुमारे 85.53 लाख मे. टन इतके उत्पादन आहे. राज्यात भाजीपाला लागवड सुमारे 4.00 लाख हेक्‍टर, मसाला पिके लागवड 1.69 लाख हेक्‍टर, फुलपिके लागवड सुमारे 0.09 लाख हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर आहे. देशात फलोद्यान क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जाहीर केलेले आहे. या अंतर्गत केंद्र शासनाने 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

अभियानाची उद्दिष्टे - - वैविध्यपूर्ण कृषी हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, प्रक्रिया, पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे.
- शेतकऱ्याचे आर्थिक राहणीमान उंचावणे, आहारविषयक पोषणमूल्य वाढविणे.
- अस्तित्वात असलेल्या फलोत्पादनविषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.
- पारंपरिक उत्पादन पद्धतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे.
- कुशल आणि अकुशल विशेषतः बेरोजगार तरुणांकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान धोरण - उत्पादकांमध्ये सुधारित तंत्राचा प्रसार, काढणीपश्‍चात हाताळणी, प्रक्रिया व पणन व्यवस्था आणि ग्राहकांमध्ये योग्य साखळी निर्माण करून उत्पादकांना चांगला मोबदला मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न.
- उत्पादन, काढणीपश्‍चात हाताळणी, प्रक्रिया व पणन यामध्ये संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे.

फलोत्पादन क्षेत्र विस्तार व उत्पादकता वाढविण्यासाठी -
अ) पारंपरिक पीक पद्धतीकडून उच्च मूल्यांकित फलोत्पादन पिकांच्या उदा. फळपिके, द्राक्ष बाग, फुलशेती, भाजीपाला पिके इत्यादींच्या लागवडीस प्रोत्साहन देणे.
ब) उच्च मूल्यांकित पिके घेण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये प्रचार करणे.
- पॅक हाऊस, पिकवणगृह, शीतगृह, नियंत्रित वातावरणातील साठवणूकगृह यासारख्या काढणीपश्‍चात सुविधा, तसेच मूल्यवृद्धीसाठी प्रक्रिया सुविधा आणि पणन अशा प्रकारच्या सुविधा स्थापन करण्यासाठी अर्थसाहाय्य करणे.
- संशोधन आणि विकास, प्रक्रिया आणि पणन या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या खासगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये राष्ट्रीय- प्रादेशिक- राज्य तसेच स्थानिक स्तरावर समन्वय, एकात्मिकता आणि एकरूपता आणून तसेच भागीदारीस प्रोत्साहन देऊन विकास साधणे.
- शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून शक्‍य असेल तेथे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची (एन.डी.डी.बी.) संकल्पना राबविणे.
- सर्व स्तरावर क्षमता विकास व मनुष्यबळ विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे.

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

1) पंतप्रधान पॅकेजअंतर्गत दुधाळ जनावरांचे वाटप
ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांत राबविण्यात येते. यामध्ये केंद्र शासनातर्फे 50 टक्के, राज्य शासनातर्फे 25 टक्के अनुदान देण्यात येते.

2) तलंगाचे गट वाटप
पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडणे यासाठी लाभधारकांना 10+1 तलंगाचा गट 50 टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठी सदर तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

3) पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण
पशुपालकांमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वसाधारण पशुपालकांना, तसेच अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभधारकांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण देण्यासाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

4) अनुसूचित जाती-जमातीच्या लाभधारकांना शेळी गटाचा पुरवठा करणे :
पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडणे यासाठी अनुसूचित जाती/जमातींच्या लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर 10+1 शेळी गटाचा पुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

5) वैरण उत्पादनासाठी उत्तेजन
पशुस्वास्थ्य व आरोग्यासाठी शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन देणे या योजनेअंतर्गत वैरण उत्पन्नास उत्तेजन देण्यासाठी खते व बी-बियाण्याचे 100 टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

6) दुभत्या जनावरांना खाद्य अनुदान
दुधाळ जनावरे गट वाटप योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांना भाकड, तसेच प्रगत गर्भावस्थेच्या काळात 100 टक्के अनुदानावर खाद्यपुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

7) अनुसूचित जाती/जमातीच्या लाभधारकांना दुभत्या जनावराचा पुरवठा
पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडण्यासाठी यासाठी अनुसूचित जाती/जमातीच्या लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांच्या गटाच्या पुरवठा करण्यासाठी तरतूद आहे. ही योजना विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

8) देशी गोवंशाची जपवणूक व संवर्धन
देशी गोवंशाची जपवणूक व संवर्धन अंतर्गत लातूर जिल्ह्यातील देवणी जातीच्या कालवडींना खाद्य अनुदान देण्यासाठी तरतूद आहे. नांदेड जिल्ह्यातील गौळ दवाखान्याच्या बांधकामासाठी तरतूद आहे.

9) कृत्रिम रेतन सुविधांचे बळकटीकरण
कृत्रिम रेतन सुविधांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत द्रवनत्रपात्रे खरेदी व यंत्रसामग्री खरेदीसाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

10) सधन कुक्कुट विकास गटाची स्थापन व बळकटीकरण
सदर योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येते. राज्यातील 16 सधन कुक्कुट विकास गटांची स्थापन व बळकटीकरण या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री, साधनसामग्री खरेदी व बांधकामावरील खर्चासाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण योजनेअंतर्गत राबविण्यात येते.

11) विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम
संकरित कालवडी व सुधारित म्हशींच्या पारड्यांनी जोपासना करण्यासाठी व पशुस्वास्थ्य व आरोग्यासाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रमांतर्गत संकरित कालवडी व सुधारित म्हशींच्या पारड्यांना 50 टक्के अनुदानावर देण्यासाठी तरतूद आहे. ही योजना सर्वसाधारण, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील व आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येते.

12) एफएमडी-सीपी
राज्यातील संकरित जनावरांचे जास्त प्रमाण असलेल्या व पशुसंवर्धन विषयक प्रगत असणाऱ्या पाच जिल्ह्यांत केंद्र शासनाकडून एफ.एम.डी.सी.पी. ही योजना 100 टक्के अनुदानावर राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत निवडलेल्या क्षेत्रातील सर्व गायवर्गीय तसेच महिष वर्गीय जनावरांचे लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण केले जाते.

13) गवती कुरणांचा विकास योजना
ही योजना 100 टक्के केंद्र शासनाच्या साहाय्याने राबविण्यात येते. याअंतर्गत 10 हेक्‍टर क्षेत्रासाठी पाच लाख 50 हजार रुपये अनुदान शासकीय, निमशासकीय संस्थांना, तर खासगी संस्थांना 10 हेक्‍टर क्षेत्रासाठी 10 लाख रुपये अनुदान गवती कुरणांचा विकास करण्यासाठी देण्यात येते.

14) वैरणीचे गठ्ठे तयार करणे
वैरण पिकांचे अवशेष 40 टक्के व संहित खाद्य 60 टक्के इत्यादी पोषणमूल्य घटकयुक्त वैरणीच्या विटा तयार करण्याचा प्रकल्प उभारणी करणे, याकरिता सदर योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत वैरणीचे गठ्ठे तयार करण्याच्या एका युनिटसाठी 85 लाख रुपये अनुदान केंद्र व राज्य मिळून देण्यात येते.

15) मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रे व बदक पैदास केंद्र बळकटीकरण
योजनेअंतर्गत पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर ही चार मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रे आणि बदक पैदास केंद्र, वडसा जिल्हा गडचिरोली येथे केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार इमारतीचे बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे, विस्तार प्रशिक्षण, मार्केटिंग व कन्सल्टन्सी तसेच पक्षी खरेदी आणि खेळते भांडवल इ. करिता खर्च करण्यात येतो. सदर योजनेअंतर्गत सुधारित देशी जातीचे गिरिराज, वनराज, कडकनाथ, कॅरी निर्भिक इ. केंद्रीय कुक्कुटविकास अनुसंधान केंद्र, इज्जतनगर यांच्या मान्यताप्राप्त पक्ष्यांचे संगोपन करून एकदिवसीय पिल्ले व उबवणुकीची अंडी क्षेत्रीय स्तरावर मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातात.

16) नामशेष होणाऱ्या जातीच्या शेळ्यांचे/ मेंढ्यांचे संवर्धन करणे
योजनेअंतर्गत माडग्याळ जातीच्या मेंढ्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी महामंडळाच्या प्रक्षेत्रावर या जातीच्या मेंढ्या व नर यांचे संगोपन व पैदास करणे या बाबींकरिता निधी वितरित करण्यात येतो.

17) राष्ट्रीय सहकार विकास निगम (भाग भांडवल) व राष्ट्रीय सहकार विकास निगम (कर्जे)
सदर योजनेअंतर्गत राज्यात कुक्कुट पक्षीपालन व्यवसायाचा सहकाराच्या माध्यमातून विकास व्हावा याकरिता राष्ट्रीय सहकार विकास नियम मार्फत अंड्यावरील कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. यामध्ये बांधकाम, आवश्‍यक यंत्रसामग्री, फीड मिक्‍सिंग युनिट इ.करिता मंजूर अर्थसाहाय्यामधून खर्च करून तो राष्ट्रीय सहकार विकास निगम, नवी दिल्ली यांना संस्थेच्या कामकाजाचा प्रगतिक अहवाल सादर केल्यानंतर शासनास या रकमेची प्रतिपूर्ती होते. राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून मंजूर झालेला निधी शासनाकडून संस्थेला 50 टक्के शासनाकडून कर्ज, 45 टक्के राज्य शासनाचे भागभांडवल व पाच टक्के स्वत:चे भागभांडवल याप्रमाणे पुरविला जातो.

सेंद्रिय शेती योजना प्रोत्साहनपर योजना

अ) गांडूळ खत उत्पादन आणि वापर
ब) सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन

लाभार्थी निवडीचे निकष - 1) लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते.
2) महिलांना प्राधान्य देण्यात येते.
3) सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना लाभ देण्यात येतो.

लाभार्थी निवड प्रक्रिया - तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी निवड केली जाते.

योजनांची अंमलबजावणी/ कार्यपद्धती/ अटी व शर्ती - ही योजना सन 2013-14 मध्ये क्षेत्रीय स्तरावर प्रकल्पाधारित पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 85 प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. सदर योजनेअंतर्गत प्रत्येकी 100 हेक्‍टर क्षेत्राचा एक सेंद्रिय शेती प्रकल्प घेण्यात येणार आहे. त्यामध्ये 20 शेतकऱ्यांचा एक गट याप्रमाणे प्रति प्रकल्पात 10 शेतकरी गट समाविष्ट करण्यात येतात. सदरचे गट नजीकच्या आठ ते 10 गावांमध्ये सलग पद्धतीने असणार आहेत. प्रत्येक प्रकल्पामध्ये 200 शेतकऱ्यांच्या समूहामार्फत सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यात येतो. शेतकरी गटामध्ये 10 कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश असावा.

योजनेअंतर्गत घटक, आर्थिक मापदंड व समाविष्ट जिल्हे - या प्रकल्पामध्ये गांडूळ खत उत्पादन व वापर, बोडायनामिक कंपोस्ट डेपो, सीपीपी कल्चर, निंबोळी पावडर/अर्क अथवा वनस्पतिजन्य सेंद्रिय पदार्थ तयार करण्यासाठी निमपल्वरायझर/ ग्राइंडरचा पुरवठा, बांध, कुंपणावर सलग गिरिपुष्प तसेच शेवरीची लागवड, हिरवळीचे खत बियाणे पुरवठा, शेतीशाळा, इ. घटक राबविण्यात येणार आहेत. तर विभाग व जिल्हा स्तरावर प्रवर्तकांचे प्रशिक्षण, अभ्यासदौऱ्यांचे आयोजन आहे. राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये सदर योजना राबविली जाते.

योजनेचा लाभ घेण्याकरिता संपर्क अधिकारी - संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजना

नवीन तळे बांधकाम - सपाट भागात एकूण खर्चाच्या 20 टक्के व कमाल हेक्‍टरी 60 हजार रुपये.
- अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी 25 टक्के व कमाल हेक्‍टरी 75 हजार रुपये, पाच हेक्‍टर क्षेत्रापर्यंत मर्यादित अनुदान.

तळ्याचे नूतनीकरण - एकूण खर्चाच्या 20 चक्के व जास्तीत जास्त 15 हजार रुपये प्रति हेक्‍टर.
- अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी 25 टक्के व जास्तीत जास्त 18,750/- प्रति हेक्‍टर अनुदान.

निविष्ठा अनुदान - एकूण खर्चाच्या 20 टक्के व जास्तीत जास्त 10 हजार रुपये प्रति हेक्‍टर.
- अनुसूचित जाती- जमातीच्या शेतकऱ्यांसाठी 25 टक्के व जास्तीत जास्त 12 हजार 500 रुपये प्रति हेक्‍टर.

गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन - एकूण खर्चाच्या 20 टक्के व कमाल हेक्‍टरी 36 हजार रुपये.
- अनुसूचित जाती- जमातीच्या लाभार्थीस 25 टक्के व जास्तीत जास्त हेक्‍टरी 45 हजार रुपये.

गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उबवणी केंद्र - खर्चाच्या 10 टक्के व जास्तीत जास्त एक लाख 20 हजार रुपये अनुदान.

गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे उबवणी केंद्र - खर्चाच्या 10 टक्के, परंतु जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये अनुदान.

अवरुद्ध पाण्यात मत्स्यसंवर्धन या योजनेअंतर्गत नवीन तलावांची व नवीन संस्थांची निवड करून एक वर्ष मत्स्य बोटुकली इष्टतम प्रमाणात संचयन केले जाते. विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपाययोजना या अंतर्गत निवडलेल्या तलावात प्रथम तीन वर्षे 100 टक्के इष्टतम प्रमाणात, चौथ्या वर्षी 50 चक्के व पाचव्या वर्षी 25 चक्के बोटुकली संचयन केले जाते. मत्स्यबीज संगोपनासाठी येणाऱ्या खर्चावर अनुदान देण्यात येते.

मासेमारी साधनांच्या खरेदीवरील अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत मच्छीमारांना मासेमारीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक साहित्य सामग्रीवर अर्थसाहाय्य दिले जाते. मच्छीमारी सहकारी संस्थेच्या सभासदांना प्रति सभासद पाच किलो या मर्यादित नायलॉन सूत/जाळी खरेदीवर अनुदान दिले जाते. तसेच संस्थेच्या सभासदांना नवीन बांधलेल्या/खरेदी केलेल्या नौकेवर 50 टक्के अनुदान रु. 3,000 च्या मर्यादित दिले जाते.

मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा विकास नवीन नोंदणीकृत झालेल्या मच्छीमार सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी संस्थेच्या भाग भांडवलाच्या तीन पट किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये मर्यादेत शासकीय भागभांडवल देण्यात येते. याची परतफेड पुढील 10 वर्षांत समान हप्त्यांत करावी लागते. तसेच संस्थेचे व्यवस्थापन व्यवस्थित चालण्यासाठी संस्थेचे दप्तर अद्ययावत ठेवण्याकामी संस्थेने नेमलेल्या प्रशिक्षित सचिवास व्यवस्थापन साहाय्य/मानधनाकरिता प्रथम तीन वर्षे 500 रुपये प्रमाणे व उर्वरित चौथ्या व पाचव्या वर्षी प्रत्येकी 250 रुपये प्रमाणे एकूण दोन हजार रुपये व्यवस्थापन साहाय्य दिले जाते.

राष्ट्रीय कल्याण निधी अंतर्गत मच्छीमारांना घरकुले बांधून देणे
- मच्छीमार सहकारी संस्थेच्या मच्छीमारांना 40 हजार रुपये मर्यादेपर्यंत घरकुल बांधून दिले जाते.

पश्‍चिम घाट विकास कार्यक्रम
डोंगराळ क्षेत्रातील मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभासदांना व संस्थेला या योजनेतून लाभ दिला जातो.
- कोळंबी बीज संचयन : पश्‍चिम घाट क्षेत्रातील सहकारी संस्थेकडे असलेल्या नवीन तलावात पहिली तीन वर्षे 100 टक्के इष्टतम संचयन व चौथ्या वर्षी 50 टक्के आणि पाचव्या वर्षी 25 टक्के इष्टतम संचयन केले जाते.
- सुरक्षण व परिवहन : या योजनेअंतर्गत संस्थेच्या सभासदांना मासळी खराब होऊ नये म्हणून एक शीतपेटी व वाहतुकीसाठी एक सायकल प्रत्येक सभासदाला वाटप करता येते.
- प्रशिक्षण : संस्थेच्या सभासदांना मत्स्य व्यवसाय या विषयाचे एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक प्रशिक्षणार्थीस रु. 300 विद्यावेतन व रु. 75 प्रवास खर्च दिला जातो.

राष्ट्रीय सहकार विकास निगमअंतर्गत एकात्मिक जलाशय विकास संस्थेस मासळी वाहतूक व विक्रीसाठी भागभांडवल दिले जाते. मच्छीमार संकट निवारण निधीअंतर्गत आपद्‌ग्रस्त मच्छीमारांच्या वारसांना एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्डमार्फत जलाशयीन मत्स्य व्यवसाय विकास योजनेतून बोटुकली संचयनावर अनुदान देण्यात येते.

आत्मा या योजनेतून शासकीय, तसेच खासगी क्षेत्रातील सेवाभावी संस्था व मच्छीमार संस्था, ऍग्री बिझनेस प्रशिक्षणार्थी, निविष्ठा पुरवठादार, खासगी कंपन्या यामधील प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी पाठविता येईल.

1) प्रशिक्षण : एकूण 21 दिवसांचा कालावधी असेल
- राज्याबाहेर प्रशिक्षण : प्रति शेतकरी प्रतिदिन रु. 1,000
- राज्यांतर्गत प्रशिक्षण : प्रति शेतकरी प्रतिदिनी रु. 740
- जिल्ह्यांतर्गत प्रशिक्षण : प्रति शेतकरी प्रतिदिनी रु. 400

2) शैक्षणिक सहल :
- राज्यांतर्गत सहल : प्रति शेतकरी प्रतिदिन रु. 300
- जिल्ह्यांतर्गत सहल : प्रति शेतकरी प्रतिदिन रु. 250
- राज्याबाहेर सहल : प्रति शेतकरी प्रतिदिन रु. 600

संपर्क -
सहायक आयुक्त
मत्स्य व्यवसाय, पुणे
मत्स्यबीज, उत्पादन केंद्र, हडपसर, पुणे नं. (020) 26990001

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ

1) एकात्मिक मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादन योजना एकात्मिक मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मधमाश्‍यांच्या वसाहती निर्मिती, लाभार्थी प्रशिक्षण, मध प्रक्रिया व विक्री ही कामे उद्योजक संस्थांमार्फत केली जातात. यासाठी प्रशिक्षक संस्था, व्यक्तींना अर्थसाहाय्य केले जाते.

* वैयक्तिक लाभार्थी पात्रता - किमान एस.एस.सी. पास असावा.
- 21 ते 50 वर्षे दरम्यान वय.
- किमान 50 ते 100 मध वसाहती (सातेरी/ मेलिफेरा) व मध यंत्र युनिट घेणे आवश्‍यक.
- व्यक्तींच्या अथवा कुटुंबातील कोणाही व्यक्तीच्या नावे किमान दोन एकर शेतजमीन असावी.
- लाभार्थींकडे मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

* संस्था लाभार्थी पात्रता - संस्था नोंदणीकृत व कृषी क्षेत्रात कार्यरत असावी.
- संस्था गेली किमान तीन वर्षे फायद्यात असली पाहिजे.
- संस्थेच्या नावे मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाड्याने घेतलेली किमान दोन एकर शेतजमीन असावी.
- प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाड्याने किमान 500 चौ. फूट जमीन असावी.
- संस्थेकडे लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले कर्मचारी असावेत.

व्यक्तिगत लाभार्थी पात्रता - 18 ते 45 वयोगटातील शेतमजूर, शेतकरी, बचत गट, दारिद्य्र रेषेखालील व्यक्ती, महिला, संयुक्त वन व्यवस्थापन गट, शेतकरी गट, समूह गट.
- सदरील पात्र व्यक्ती गट समूहात 10 दिवस प्रशिक्षण घेणे बंधनकारक, प्रशिक्षण विनामूल्य मिळेल.
- लाभार्थींना किमान पाच ते 20 कमाल मध वसाहती मेलिफेरा/ सातेरी युनिट घेणे आवश्‍यक राहील.

अर्थसाहाय्य -
मधपाळांसाठी अनुदानाची मर्यादा प्रकल्पाच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये आहे. राष्ट्रीयीकृत, सहकारी, व्यापारी बॅंका, खादी ग्रामोद्योग, बलुतेदार संस्था, पतसंस्थांमार्फत कर्ज प्रकरण 75 टक्के अर्थसाहाय्यासाठी करता येईल व कर्ज मंजुरीनंतर 25 टक्के रक्कम अनुदान मंडळाकडून देण्यात येईल.

संबंधित युनिटची खरेदी शासन निर्धारित यादीतील उद्योजकांकडून करणे बंधनकारक असेल. पश्‍चिम घाट विकास योजनेतून मधमाशीपालन व्यवसाय करणाऱ्या लाभार्थींना किमान पाच ते 20 कमाल मध वसाहती मेलिफेरा/ सातेरी युनिट घेणे आवश्‍यक राहील.

2) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम याअंतर्गत 10 लाख रुपये भांडवलाचा व्यवसाय व सेवा उद्योग उभारण्यासाठी आणि 25 लाख रुपये भांडवलाचा उत्पादन प्रकल्प किंवा उद्योग पुरविण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाते. सर्वसाधारण गटातील व्यक्तींनी 10 टक्के स्वगुंतवणूक केल्यास शहरी भागात 15 टक्के व ग्रामीण भागात 25 टक्के अनुदान देण्यात येते. इतर प्रवर्गातील व्यक्तींना पाच टक्के स्वगुंतवणूक केल्यास शहरी भागात 25 टक्के व ग्रामीण भागात 35 टक्के अनुदान उपलब्ध आहे.

पात्रता - - उत्पादन युनिटसाठी 10 लाख रुपये व सेवा उद्योगासाठी पाच लाखापेक्षा अधिक आर्थिक साहाय्य मागणी असल्यास आठवी उत्तीर्ण आवश्‍यक. यापेक्षा कमी मागणी असल्यास शैक्षणिक अट नाही.
- वय मर्यादा किमान 18 वर्षे पूर्ण
- अर्जदार लाभार्थी यांनी अर्थसाहाय्य प्रकल्प मंजुरीनंतर एक- दोन आठवडे ई.डी.पी. प्रशिक्षण सत्रात उपस्थित राहून प्रशिक्षण घेणे आवश्‍यक.

आवश्‍यक कागदपत्रे -
1) ग्रामपंचायत ना हरकत दाखला (उद्योग सुरू करण्यासाठी)
2) गावाचा लोकसंख्या दाखला (20 हजार लोकसंख्येच्या मर्यादित)
3) शैक्षणिक, जातीचा दाखला (आवश्‍यकतेप्रमाणे)
4) रेशन कार्ड, रहिवासी दाखला
5) खरेदी करावयाची हत्यारे, अवजारे कोटेशन (मान्यताप्राप्त)
6) योजना प्रकल्प अहवाल (प्रमाणित)
7) ई.डी.पी. उद्योगाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचा दाखला
8) जागेचा उतारा (अकृषिक)
9) जागा भाड्याची असल्यास अधिकृत भाडेकरार (उतारे)
10) उद्योगास विद्युत लागत असेल तर अधिकृत परवाने/ बिल. इ.
(टीप - या योजनेअंतर्गत मद्य, मांस, मच्छी, पशुपालन, शेती लागवड, रिक्षा- टेम्पो वाहन व्यवसाय, वराह- कुक्कुट पालन, पान- तंबाखू हे उद्योग वगळून सर्व उद्योग/ सेवा यांचा समावेश आहे.)

3) विशेष घटक योजना विशेष घटक योजनेअंतर्गत शासनाने 20 कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील कमी उत्पन्न (ग्रामीण भागात 19 हजार 654 रुपये व शहरी भागात 27 हजार 247 रुपये) व दारिद्य्र रेषेखालील व्यक्तींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत वित्तीय संस्थेने दिलेल्या अर्थसाहाय्यावर मंडळातर्फे विशेष केंद्रीय साहाय्यातून 10 हजार रुपयांपर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या 50 टक्‍क्‍यांहून कमी असलेली रक्कम अनुदान देण्यात येते.

आवश्‍यक कागदपत्रे - - विहित नमुन्यातील अर्ज, दोन फोटो
- रेशनकार्ड, रहिवासी दाखला
- तहसीलदार यांचा जातीचा दाखला
- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
- उद्योजकांची जागेची कागदपत्रे
- नवीन घ्यावयाची हत्यारे, अवजारे कोटेशन

4) कारागीर रोजगार हमी योजना ग्रामीण भागात विखुरलेल्या कारागिरांना संघटित करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावर शासनाच्या सहकार्याने 303 बलुतेदार कारागिरांच्या विविध अधिकारी संघाची स्थापना करण्यात आली आहे. तालुका पातळीवर पंचायत समितीत या संस्थांची कार्यालये आहेत. त्यामार्फत कारागिरांना एक रुपया प्रवेश फी व 110 रुपये शेअर्स भरून सभासद करून घेतले जाते. या सभासदांना त्यांच्या गरजेनुसार जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमार्फत नाबार्डच्या योजनेअंतर्गत कर्जपुरवठा केला जातो.

या योजनेतून खनिज आधारित उद्योग, वनावर आधारित उद्योग व कृषी आधारित आणि खाद्य उद्योगांसाठी अर्थसाहाय्य केले जाते. धान्य, डाळी, मसाले पदार्थ तयार करणे, शेवई तयार करणे, पीठ गिरणी, तेलघाणी, लहान तांदूळ गिरणी, ताडी, नीरा व अन्य ताडी उद्योग, गूळ खांडसरी, मिठाई तयार करणे, रसवंती, मधमाशी पालन, फळभाजी प्रक्रिया व प्रशोधन, लोणची बनवणे, मेन्थॉल तेल, तरटी, चटया व हार तयार करणे, औषधी वनस्पती संकलन, मका व रागीपासून पदार्थ बनवणे, काजू प्रक्रिया, द्रोण व पत्रावळी तयार करणे, दुग्ध उत्पादने, पशुचारा व कुक्‍कुट खाद्य बनविणे, खाद्यपदार्थ विक्री आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे.

अन्नप्रक्रिया विभागाच्या योजना

1) मेगा फूड पार्क मेगा फूड पार्कची स्थापना करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 50 कोटी रुपयांच्या मर्यादेत अर्थसाहाय्य देण्यात येईल. प्रकल्प खर्चात जमिनीची किंमत ग्राह्य धरण्यात येणार नाही.

2) एकात्मिक शीतसाखळी सुविधा या योजनेअंतर्गत फलोत्पादकांव्यतिरिक्तच्या उत्पादकांना (दूध, मांस, मत्स्य उत्पादने) वजनकाटा, प्रतवारी करणे, पॅकिंग, पूर्व शीतकरण, नियंत्रित वातावरणातील साठवण, आय.क्‍यू.एफ. पद्धतीने साठवण, विक्रीकरण इत्यादी सुविधांसाठी यंत्रसामग्री व तांत्रिक बांधकाम खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांच्या मर्यादेत अर्थसाहाय्य देण्यात येते.

3) संशोधन व विकास अन्नप्रक्रिया उद्योगाशी निगडित नावीन्यपूर्ण संशोधन, उत्पादन, तंत्र इ. बाबींसाठी शासकीय संस्थांना 100 टक्के, तर खासगी क्षेत्रास यांत्रिकीकरणाच्या किमतीच्या 50 टक्के अर्थसाहाय्य उपलब्ध आहे.

4) गुणवत्ता व्यवस्थापन आय.एस.ओ. 14000, आय.एस.ओ. 22000, हासप, जी.एम.पी. (गुड मॅन्युफॅक्‍चरिंग प्रॅक्‍टिसेस), जी.एच.पी. (गुड हायजिनिक प्रॅक्‍टिसेस) यासाठी शासकीय संस्था, विद्यापीठे व खासगी क्षेत्रातील संस्थांना प्रतिपूर्ती तत्त्वावर सल्ला फी च्या 50 टक्के, कमाल 15 लाख रुपयांच्या मर्यादेत अर्थसाहाय्य देण्यात येते.

5) मनुष्यबळ विकास अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पदवी, पदविका अभ्यासक्रम व ईडीपी आणि अन्य प्रशिक्षण कार्यक्रम चालविण्यासाठी ग्रंथालय, प्रयोगशाळा, मार्गदर्शन केंद्रे इ. पायाभूत सुविधांची निर्मिती नामांकित विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांसाठी (शासकीय/ बिगर शासकीय) 75 लाखांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे.

6) ग्रामीण भागातील मनुष्यबळ विकास (अन्नप्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र) अ) सिंगल प्रॉडक्‍ट लाइन सेंटर - (प्रक्रियेच्या कामातील कोणत्याही एका गटास) स्थिर भांडवली खर्चासाठी चार लाख रुपये व खेळत्या बीजभांडवलासाठी दोन लाख रुपये अनुदान.
ब) मल्टी प्रॉडक्‍ट लाइन सेंटर - (प्रक्रियेच्या कामातील एकापेक्षा अधिक गटांसाठी) स्थिर भांडवली खर्चासाठी 11 लाख व खेळत्या बीजभांडवलासाठी चार लाख रुपये.
क) खाद्यान्न प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण व नवीन प्रक्रिया प्रकल्प उभारणी - भांडवली खर्चाच्या 25 टक्के अनुदान तथापि जास्तीत जास्त रु. 50 लाख सर्वसाधारण विभागासाठी व 33.33 टक्के अनुदान.

6) गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची स्थापना व बळकटीकरण
केंद्र व राज्य शासनाच्या संस्था, आय.आय.टी. व विद्यापीठे यांना प्रयोगशाळा उभारण्यासाठी येणारा साहित्याचा खर्च पूर्णपणे देय आहे; तर बांधकाम खर्चाच्या 25 टक्के अर्थसाहाय्य देय असेल. ब) इतर अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांसाठी प्रयोगशाळा साहित्याच्या खर्चाच्या 50 टक्के व बांधकाम खर्चाच्या 25 टक्के अर्थसाहाय्य देय असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क - अन्नप्रक्रिया विभाग,
पंचशील भवन, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली 110049
दूरध्वनी क्र. - 011- 26492475, फॅक्‍स- 011- 26493228
वेबसाइट - www.mofpi.nic.in

शेतीमाल तारण कर्ज योजनेतून मिळवा लाभ

1) या योजनेत फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्वीकारला जातो. सदरची योजना ही बाजार समित्यांमार्फत राबविली जाते. या योजनेमध्ये तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, भात (धान), सूर्यफूल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा, तसेच हळद या शेतीमालाचा समावेश आहे.
2) तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, भात, सूर्यफूल, करडई व हळद हा शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या गोदामामध्ये ठेवल्यानंतर, ज्या दिवशी हा माल बाजार समितीच्या ताब्यात दिला, त्या दिवसाच्या बाजारभावाच्या 75 टक्के दराने ठेवण्यात आलेल्या मालाच्या होणाऱ्या किमतीनुसार रक्कम शेतकऱ्याला तत्काळ देण्यात येते.
3) शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाऊ रकमेवर सहा टक्के दराने आकारणी, वरील शेतीमाल 180 दिवसांकरिता ठेवू शकतो.
4) ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतीमालाच्या एकूण किमतीच्या 50 टक्के किंवा 500 रुपये प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना दिली जाते.
5) काजू बी करिता कमाल दर 50 रुपये प्रति किलो एकूण किमतीच्या (अथवा प्रत्यक्ष बाजारभावाची किंमत, यापैकी कमी असेल ती रक्कम) 75 टक्के एवढी रक्कम शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने दिली जाते.
6) बेदाणा साठवणुकीसाठी शीतगृह आवश्‍यक आहे. बेदाणा तारण योजनेत प्रचलित बाजारभावाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 50 प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. शीतगृह भाड्याचा खर्च हा शेतकऱ्यांनी करावयाचा आहे.

प्लॅस्टिक क्रेट्‌स खरेदी अनुदान योजना - योजनेचे निकष -
1) राज्यातील सर्व फळ उत्पादक अथवा फळवर्गीय भाजीपाला उत्पादक शेतकरी.
2) एका कुटुंबातील एका व्यक्तीस अनुदान देय आहे, याकरिता रेशनकार्ड ग्राह्य धरण्यात येईल.
3) फळबाग- भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र एक हेक्‍टरपर्यंत असल्यास कमाल 50 प्लॅस्टिक क्रेट्‌स खरेदीसाठी आणि लागवडीखालील क्षेत्र एक हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास कमाल 100 क्रेट्‌स खरेदीसाठी अनुदान मिळते.
4) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति क्रेट्‌स 100 किंवा खरेदीच्या 50 टक्के रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून दिली जाईल.
5) शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत आपल्या क्षेत्रातील बाजार समित्यांमार्फत अर्ज सादर करावा, त्यासाठी समितीस प्रक्रिया शुल्क म्हणून 50 रुपये रक्कम जमा करावी.
6) अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात RTGS/ NEFT सुविधेद्वारे जमा करण्यात येईल.

आवश्‍यक कागदपत्रे -
1) अनुदान मागणी अर्ज
2) फळ- भाजीपाला पिकाची नोंद असलेला 7-12 उतारा,
7-12 उताऱ्यावर नोंद नसल्यास उताऱ्यासह सदर पिकांची लागवड असल्याबाबतचा तलाठ्याचा दाखला.
3) रेशनकार्ड प्रत
4) 8 अ उतारा
5) बॅंक खाते पासबुक प्रत
6) क्रेट्‌स खरेदी केलेल्या मूळ बिलाची प्रत (CST/ BST अथवा VAT सह)
7) हमीपत्र (50 रुपये स्टॅंप पेपरवर)

फळ महोत्सव अनुदान योजना - 1) फळ महोत्सवामध्ये स्टॉल शेतकऱ्यांना देताना एका कुटुंबातील व्यक्तीला एकापेक्षा जास्त स्टॉल दिल्यास त्याचा एक स्टॉल अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल. 2) फळ महोत्सवाचा अंतिम अनुदान प्रस्ताव सादर करताना स्टॉल उभारणी, जाहिरात यांची मूळ बिले (व्हॅटसह) सादर करणे आवश्‍यक आहे.
3) फळ महोत्सवाचा प्रति स्टॉल रुपये 1000 याप्रमाणे अर्थसाहाय्य दिले जाईल.
4) फळ महोत्सवातील किमान 10 व कमाल 50 स्टॉलसाठी अर्थसाहाय्य दिले जाईल.
5) फळ महोत्सवासाठी करण्यात आलेल्या एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 60,000 रुपये महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी दिले जातात. जिल्हास्तरासाठी 20,000 रुपये आणि 10,000 रुपये तालुका स्तरासाठी दिले जातात. यामध्ये कमी असणारी रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते.
6) फळ महोत्सव अनुदान योजना ही फक्त उत्पादकांकरिता आहे.

कृषिमाल निर्यात वृद्धीच्या योजना - 1) आयात-निर्यात परवाना (आय.ई.सी), तसेच अपेडा रजिस्ट्रेशन करून देणे.
2) देशनिहाय व उत्पादननिहाय परदेशातील आयातदारांची यादी उपलब्ध करून देणे.
3) खासगी निर्यातदारांना मागणीनुसार "क्वालिटी स्टॅंडर्डस्‌' उपलब्ध करून देणे.
4) विविध देशांकडून कृषी पणन मंडळास प्राप्त झालेल्या कृषिमाल निर्यातीच्या ऑर्डर्स विविध निर्यातदार संस्थांना देणे.
5) शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांना कृषिमालाची गुणवत्ता तपासणी, ग्रेडिंग, पॅकिंग इत्यादी करून प्रत्यक्ष निर्यात करून देणे.
6) निर्यातदारांना निर्यातयोग्य गुणवत्तेच्या शेतीमालाचा पुरवठा करणे.
7) कृषिमाल निर्यातीबाबतच्या विविध योजनांचे प्रस्ताव करून देणे.
इत्यादी विविध बाबींसंदर्भात कृषी पणन मंडळ किमान सेवा शुल्क आकारून सेवा उपलब्ध करून देते.

युरोपियन देशांसाठी कांदा निर्यात वाहतूक अनुदान योजना - युरोपियन देशांमध्ये महाराष्ट्रातून कांद्याची निर्यात वाढावी याकरिता सहकारी संस्था, खासगी निर्यातदार यांना युरोपमध्ये कांदा निर्यातीसाठी वाहतूक अनुदान देण्यात येते.
योजनेची वैशिष्ट्ये -
1) ही योजना फक्त युरोपियन देशांत महाराष्ट्रातून निर्यात केलेल्या कांद्यासाठी लागू आहे.
2) कांद्याची वाहतूक रेफर कंटेनरद्वारे करणे बंधनकारक आहे.
3) या योजनेअंतर्गत 5,000 रुपये प्रति कंटेनर आणि जास्त रुपये 2,00,000 रुपये एवढे अनुदान प्रति निर्यातदार देय राहील.
4) निर्यातदारांना कांदा निर्यातीसाठी "ना हरकत प्रमाणपत्र' पणन मंडळातून घेणे बंधनकारक आहे.

शेतकरी बाजार - शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, ग्राहकास ताजी फळे व भाजीपाला दररोज निश्‍चित होणाऱ्या योग्य भावात उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची वजावट न करता शेतीमालाची रक्कम ताबडतोब उपलब्ध करून देणे, वजनात होणारी फसवणूक टाळून ग्राहकास योग्य वजनाचा माल उपलब्ध करून देणे; तसेच शेतकरी आणि ग्राहक यांना सर्व मध्यस्थ टाळून एकत्रित आणणे हे या योजनेचे उद्देश आहेत.

शेतकरी बाजारांसाठी निधीची उपलब्धता - कृषी पणन मंडळाकडून बाजार समित्यांना शेतकरी बाजार उभारणीसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम द.सा.द.शे. पाच टक्के व्याजदराने 10 वर्षांकरिता कर्जस्वरूपात मिळू शकते. तथापि त्यासाठी बाजार समित्यांनी कृषी पणन मंडळाच्या नमुना आराखड्याप्रमाणे शेतीमाल विक्रीसाठी ओटे, शेतकरी बाजार कार्यालय, उपाहारगृह, व्यापारी गाळे, स्त्री-पुरुष स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वाहनतळ, भाजीपाला धुण्याची सोय, संपूर्ण शेतकरी बाजार आवारासाठी कुंपण इत्यादी सुविधांसहित आपल्या प्रस्तावाचे नकाशे आणि अंदाजपत्रक सादर करून त्यास कृषी पणन मंडळाची मान्यता घेणे आवश्‍यक आहे. उर्वरित रक्कम बाजार समितीने स्वनिधीतून उभारावयाची आहे.

संपर्क -

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
प्लॉट नं. आर- 7, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे- 37
फोन - 020- 24261190, 24268297
फॅक्‍स - 020- 24272095
E-mail-msamb@vsnl.com
Website - www.msamb.com

Thursday, 20 June 2013

नियंत्रण उसावरील पोक्का बोंग रोगाचे...

पावसाळा सुरू झाल्यानंतर पोक्का बोंग या बुरशीजन्य रोगाची लागण उसामध्ये दिसून येते. त्यानंतर सततच्या पावसामुळे आणि शेतात पाणी साचल्याने पिकांमध्ये सापेक्ष आर्द्रता वाढते, तापमान कमी होते. अशा परिस्थितीत या रोगाची बुरशी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाढून रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. राज्यात कोसी 671, को 86032, कोएम 0265, को 8014, को 94012, कोव्हीएसआय 9805, व्हीएसआय 434, को 7527, को 7219 आणि को 419 या ऊस जातींवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.

रोगाची लक्षणे - 1) पावसामुळे हवेत आर्द्रता वाढल्याने पोक्का बोंग या रोगास कारणीभूत असणाऱ्या फ्युजारियम मोनिलीफॉरमी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीची लागण उसाच्या शेंड्यातील कोवळ्या पानांवर दिसून येते.
2) सुरवातीस पोंग्यातील तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्‍यात (पानाच्या व देठाच्या जोडाच्या ठिकाणी) पांढरट- पिवळसर पट्टे दिसून येतात. रोगाची लागण झालेल्या पानांवर सुरकुत्या पडून पाने आकसतात, तसेच त्यांची लांबी घटते. रोगाची तीव्रता वाढल्यानंतर उसाची पाने सडतात/ कुजतात व नंतर गळून पडतात किंवा एकमेकांत गुरफटतात.
3) पाने कुजल्याने किंवा गुरफटल्याने कांड्यांचे पोषण होत नसल्याने कांड्या आखूड व वेड्यावाकड्या होतात. कधी कधी रोगाची तीव्रता वाढल्यावर पोंगा मर किंवा शेंडा कुज दिसून येते.
4) काही वेळेस रोगग्रस्त उसाच्या कांड्यांवर कांडी काप (नाईफ कट) रोगाची लक्षणे दिसून येतात. शेंडा कुज व कांडी काप (नाईफ कट) झालेल्या उसातील शेंड्याचा जोम नष्ट होतो, त्यामुळे उसावरील डोळ्यातून पांगशा फुटतात, कालांतराने असे ऊस वाळतात.
5) रोगट उसाच्या कांड्या आखूड झाल्याने व पांगशा फुटल्याने उसाच्या उत्पादनात घट येते. रोगामुळे उसाच्या बेटातील रोगग्रस्त उसाचेच नुकसान होते, तथापि बाधित न झालेल्या उसाचे नुकसान होत नाही.

रोगाचा प्रसार - या रोगाचा प्रसार हवेमार्फत तसेच पाणी, पाऊस व कीटकांद्वारे देखील होतो. मात्र, बेण्याद्वारे रोगाचा प्रसार होत नाही.

रोग नियंत्रणाचे उपाय - 1) रोगामुळे शेंडे कुज व पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढून नष्ट करावेत, त्यामुळे रोगाच्या प्रसारास काही प्रमाणात आळा बसतो.
2) पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर लगेचच खाली सुचविल्याप्रमाणे बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात.
अ) मॅंकोझेब 0.3 टक्के (एक लिटर पाण्यात तीन ग्रॅम मॅंकोझेब) किंवा
ब) कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 0.2 टक्के (एक लिटर पाण्यात दोन ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड) किंवा
क) कार्बेन्डाझिम 0.1 टक्के (एक लिटर पाण्यात एक ग्रॅम कार्बेन्डाझिम)
रोगाची लागण दिसून आल्यानंतर वरीलपैकी एका बुरशीनाशकाच्या 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. एक एकरास मोठ्या बांधणीनंतर फवारणीसाठी 200 लिटर द्रावण लागेल. फवारणीच्या द्रावणात सर्फेटन्ट मिसळावा.
3) माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची (मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची) मात्रा वेळेवर व योग्य प्रमाणात द्यावी.
4) शेतात पाण्यामुळे दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी, पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करावा.

संपर्क - 020 - 26902100, 26902268
(लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.) पुणे येथे ऊस रोगशास्त्र विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

भेंडीवरील रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण

भेंडी पिकातील कीड व्यवस्थापनातील महत्त्वाच्या गोष्टी - हिरव्या, लुसलुशीत भेंडीसारख्या भाजीपाल्याच्या उत्पादनात किडींचा मोठा अडसर ठरतो आहे. प्रत्येक चार ते पाच दिवसांनी काढणी करताना कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करणे, जैविक घटकांचा वापर करणे अशा प्रकारच्या उपाययोजना शेतकऱ्यांना कराव्या लागतात. अशा वेळेस एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्‍यक असते. पांढऱ्या माशीसारख्या रसशोषक किडीच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत असल्याने सुरवातीपासून या किडींचा प्रादुर्भाव आटोक्‍यात ठेवणे गरजेचे असते. तुडतुड्यांचा प्रादुर्भावही पहिल्यापासूनच आढळत असल्यामुळे भेंडी पिकात सुरवातीपासूनच अधिक लक्ष देणे आवश्‍यक असते.

काही किडींबाबत माहिती अशी.
रसशोषक किडी - भेंडीची पाने कोवळी, आकाराने मोठी असल्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्तच होत असतो. यात प्रामुख्याने पांढरी माशी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जास्त असतो. फुलकिडे (थ्रिप्स) व मावा यांचा प्रादुर्भाव कमी- अधिक प्रमाणात असतो. पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, मावा या रसशोषक किडी पानांच्या मागील बाजूस राहून कोवळ्या शेंड्यातील, पानांतील अन्नरस शोषण करतात, त्यामुळे पानास अतिसूक्ष्म जखम होऊन त्याद्वारे अन्य सूक्ष्मजिवांचा शिरकाव पिकात होऊन रोगांचा प्रसार होतो. या किडींद्वारे चिकट पदार्थ पानांवर टाकला जातो. अशा स्रावावर आर्द्रतायुक्त वातावरणात कॅप्नोडियम नावाची काळी बुरशी वाढते, त्यामुळे पानांच्या प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो. पानांतील रस शोषण केल्यामुळे पाने वाकडी होतात. फुलांची गळ होऊन उत्पादनात घट येते. या व्यतिरिक्त पांढरी माशी पिवळ्या शिरांच्या विषाणूंचा प्रसार करते, त्यामुळे पाने हिरवी राहून फक्त शिरा पिवळ्या पडलेल्या दिसतात. तसेच, भेंडीची फळेदेखील पांढरी- पिवळी पडतात, त्यामुळे बाजारात अशा भेंडीस मागणी घटते.

रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची प्रमुख कारणे - 1) नत्रयुक्त खतांचा असंतुलित वापर केल्यास कोवळी फूट अवास्तव होऊन रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. कोवळ्या पानांकडे या किडी आकर्षित होऊन या किडी पानांच्या मागे शिरांमध्ये लपून रसशोषण करतात.
2) किडीस पर्यायी खाद्य वनस्पती म्हणजे तणे शेतातच उपलब्ध असल्यास नियंत्रणासाठी फवारणी केल्यानंतर खाद्य उपलब्ध असते.
4) संश्‍लेषित पायरेथ्रॉईड्‌स गटातील कीटकनाशकांच्या अति वापराने किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते.
5) पानांचा आकार मोठा असल्यामुळे सर्वच किडी पानाच्या खालच्या बाजूस लपून राहत असल्याकारणाने स्पर्शजन्य कीडनाशके प्रभावी कार्य करू शकत नाहीत.
6) या किडींचे प्रजनन जलद होत असल्याने एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीचा प्रादुर्भाव सुरूच राहतो.
7) जैविक, यांत्रिक तसेच रासायनिक घटक आदी पर्याय आलटून- पालटून न वापरल्यास किडींचा उद्रेक होऊन ती नियंत्रणाबाहेर जाते.
8) हवामानातील सतत होणारे बदल प्रादुर्भाव वाढविण्यास मदत करतात.

सशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण - 1) पेरणीपूर्वी बियाण्यास इमिडाक्‍लोप्रिड या आंतरप्रवाही कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्याची खात्री करावी, नसल्यास ती करून घ्यावी.
2) फुले लागण्यापूर्वी शाखीय वाढ कमी ठेवावी, तसेच नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा. नत्र दोन-तीन हप्त्यांत द्यावे.
3) सुरवातीच्या अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा पाण्यात विरघळणारे कडुनिंब तेल एक- दोन मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. करंज तेलाचाही चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो.
4) चिकट सापळ्यांचा वापर करावा, त्यामुळे पांढरी माशी, तुडतुडे यांचे प्रभावी नियंत्रण होते.
5) गरजेप्रमाणे आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. फवारणी पानांच्या मागील बाजूपर्यंत पोचेल अशा रीतीने करावी.
8) आर्द्रतायुक्त वातावरण असताना व्हर्टीसिलियम लेकॅनी चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून पाच मि.लि. या प्रमाणात फवारणी करावी. अशा वेळेस रासायनिक बुरशीनाशकांचा वापर टाळावा.

खालीलपैकी कोणत्याही कीडनाशकाची फवारणी आलटून- पालटून करावी - अ.क्र. + कीडनाशकाचे नाव + प्रमाण/10 लि. पाणी
1 + प्रोफेनोफॉस (50 ईसी) + 10 मि.लि.
2 + थायमिथोक्‍झाम 25 डब्ल्यू.जी. + 4 ग्रॅम
3 + इमिडाक्‍लोप्रिड 17.5 एस.एल. + 4 मि.लि.
4 + लॅब्डा सायहॅलोथ्रिन 5% ई.सी. + 5 मि.लि.

(भेंडीवरील अळ्या व नियंत्रण - उद्याच्या भागात)

संपर्क - प्रा. तुषार उगले - 8275273668
(लेखक कीटकशास्त्र विभाग, कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.)