Monday, 10 June 2013

अशा आहेत मत्स्य व्यवसायातील संधी

राज्यात मोठे, मध्यम व लहान असे तीन प्रकारचे जलाशय आहेत. हे जलाशय भाड्याने घेऊन त्यात मासे वाढविता येतात. सध्या जलाशयातील माशांचे सरासरी उत्पन्न 11.11 कि.ग्रॅ./ हेक्‍टर एवढे आहे. अशा जलाशयात केवळ जलद वाढणारे मासे, म्हणजेच रोहू, कटला व मृगळ या माशांची बोटुकली सोडली आणि बोटुकलीचा आकार 10 सें.मी. पेक्षा मोठा असेल तर उत्पादन वाढू शकते. इतर राज्यात असे प्रयोग यशस्वी झाले आहेत. तेथे माशांचे उत्पादन 100 ते 300 कि.ग्रॅ. प्रति हेक्‍टर एवढे मिळाले आहे.

बारमाही तलावात मत्स्य संवर्धन - शेतकरी, उद्योजक, तरुण बेरोजगार यांना एकेकट्याने किंवा एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर तलावात मत्स्य संवर्धन करता येईल यामुळे उत्पन्नाचे चांगले साधन मिळेल. अशा तलावात कटला, रोहू, मृगळ मासे एकत्रितपणे किंवा कटला, रोहू आणि झिंगे (गोड्या पाण्यातील कोळंबी) एकत्रितपणे किंवा मांगूर या माशांचे संवर्धन करता येईल. मत्स्यशेतीसाठी तलाव खोदणे, माशांचे बीज, खाद्य, मजुरी यासाठी खर्च होतो. परंतु नफाही चांगला मिळतो.

गाव-तळ्यातील मत्स्य संवर्धन - विदर्भात माल-गुजारी तलाव, तर राज्याच्या इतर भागांत गावतळी या नावाने बऱ्याच खेड्यांमध्ये अशी तळी किंवा तलाव असतात. हे तलाव सार्वजनिक असतात किंवा काही ठिकाणी ग्राम पंचायतीच्या मालकीची असतात. गावातील लोक एकत्र येऊन येथे मत्स्य संवर्धन करू शकतात. बहुतेक वेळा असे तलाव अत्यंत सुपीक असतात. त्यामुळे येथे माशांचे भरपूर उत्पादन मिळते.

क्षारपड भागात मत्स्य संवर्धन - राज्यात बऱ्याच शेत जमिनी अति पाण्याच्या वापरामुळे क्षारपड किंवा चोपण झालेल्या आहेत. या जमिनी नापिक झाल्यामुळे शेतीला उपयोगाच्या नाहीत. अशा ठिकाणी तलाव खोदून या तलावात झिंगा (कोळंबी) संवर्धन करता येते. अशा प्रकारे तलाव सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत केले असून, त्यात झिंग्याचे चांगले उत्पादन मिळते. झिंग्याला बाजारात 300 ते 500 रु. किलो एवढा दर मिळतो.

शेततळ्यात मत्स्य संवर्धन - शेतीकरिता पाणी साठविण्याकरिता शेततळी करण्याकरिता सरकार प्रोत्साहन देत आहे. या शेततळ्यांचे क्षेत्र 0.05 ते 0.5 हेक्‍टर एवढे असते. यात योग्य पद्धतीने मासे वाढविले तर माशांचे चांगले उत्पन्न मिळते. राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी अशा शेततळ्यांमध्ये कटला, रोहू, पंकज इत्यादी माशांचे उत्पन्न घेतले आहे. तलावाची खोली कमी असेल तर माशांची बोटुकली या शेततळ्यात तयार करता येतात.

चारमाही तलावात मत्स्य संवर्धन - बऱ्याच ठिकाणी पावसाळ्याचे केवळ चार ते पाच महिनेच छोट्या तळ्यांमध्ये पाणी राहते. अशा तळ्यात योग्य व्यवस्थापन केले, तर माशांच्या पिल्लांपासून (मत्स्य जिऱ्यापासून) मत्स्य बोटुकली तयार करता येते. ही बोटुकली मोठ्या तलावांमध्ये किंवा जलाशयांमध्ये वाढण्याकरिता सोडता येते.

एकात्मिक मत्स्य संवर्धन  -मत्स्य संवर्धनाबरोबर पाळीव पशू व पक्षी तसेच धान्य, फळपिके व पालेभाला लागवडीचे नियोजन केल्यास उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर होतो. या पद्धतीत एका उपक्रमातले टाकाऊ पदार्थ व उपपदार्थ हे दुसऱ्या उपक्रमात वापरले जातात. अशा प्रकारे टाकाऊ पदार्थ व उपपदार्थांचा पूर्ण क्षमतेने पुनर्वापर होतो. परिणामी, पर्यावरण संतुलन होते तसेच एकूण उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे पाळीव पशू व पक्षी यांच्यापासून मिळालेले शेण व विष्ठा मत्स्य संवर्धन तसेच फळपिके व धान्यपिके याकरिता खत म्हणून वापरता येते. पिकांसाठी संरक्षित पाण्यासाठी खोदलेल्या शेततळ्यात मत्स्यपालन करता येते.

शोभिवंत मत्स्यपालन - आपल्या देशात तसेच परदेशात रंगीत शोभिवंत माशांना चांगली मागणी आहे. अशा प्रकारचे मासे घरात, कार्यालयात, हॉटेलमध्ये, रुग्णालयांमध्ये ठेवले जातात. त्या ठिकाणची रंगीत मासे शोभा वाढवितात. असे रंगीत मासे मोठे करणे, त्यांची पैदास करणे तसेच त्यांचे खाद्य, त्याकरिता काचेच्या टाक्‍या बनविणे हा एक चांगला व्यवसाय आहे. याकरिता भांडवल, तसेच जागाही कमी लागते आणि म्हणूनच शेतकरी, स्त्रिया व बेरोजगार तरुण यांना चांगला पैसा मिळवून देणारा असा हा व्यवसाय आहे.

मासळीपासून विविध पदार्थ - नदीतून पकडलेली मासळी किंवा मत्स्य तलावातून पकडलेली मासळी ताजी असतानाच विकावी, असे नाही तर मासळी योग्य प्रकारे सुकवून विकता येते किंवा मासळीपासून लोणचे, चटणी, वडा. पापड इत्यादी विविध पदार्थ करून ते विकता येतात. असे पदार्थ जास्त टिकतात, साठविता येतात. चांगला दर मिळेल तेव्हा विकता येतात.

संपर्क - 02351-232995,
डॉ. जोशी - 9423291434
(लेखक मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.)

2 comments:

  1. Job with social work opportunity. We are provide village level technology. So we are recruiting COORDINATOR please call-:7798191319 only for serious person

    ReplyDelete
  2. Very nice imformation. For sucess

    ReplyDelete