Tuesday, 23 July 2013

मत्स्य तलाव: पाणीपुरवठ्याची आखणी महत्त्वाची

तंत्र सुधारित मत्स्यशेतीचे
मत्स्य संवर्धनासाठी तलावांचे बांधकाम करताना तलावाचा उतार, खोली, बांध, पाणीपुरवठा याचा विचार करावा लागतो. तसेच योग्य आकारमानाचे तलाव शास्त्रीय पद्धतीने बांधण्याची आवश्‍यकता असते. पाण्यातील प्राणवायू वाढविण्यासाठी उपाययोजना करून घ्याव्यात.
- डॉ. आशिष मोहिते

मत्स्य तलावाच्या बांधाची पायाजवळची रुंदी 2 मीटर +1 मीटर + 3 मीटर = 6 मीटर ठेवावी. नवीन पाया घालताना त्याला पाया बांधावा. या मापानुसार खोदकाम करावयाचे झाल्यास जमीन पातळीपासून एक मी. खोल, जमीन पातळीवर एक मी. उंच बांध, बांधाचा उतार आतून 3ः1 आणि बाहेरून 2ः1 ठेवावा. बांधमाथा एक मीटर असेल तर जमीन पातळीवर बांधाची रुंदी 3+1+2 = 6 मी. अशी ठेवावी. खोदकाम झाल्यावर तळाजवळ बांधाची रुंदी 6+1+4 = 11 मीटर होईल. खोदकाम सुरू करण्याआधी बांधाची जागा निश्‍चित करावी. बांधाच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा चुन्याने आखून या रेषेपासून आतील (खोदकामाच्या) बाजूस 3.5 मी. व 6.5 मी. आणि बाहेरील बाजूस 2.5 मी. अशा तीन रेषा चुन्याने आखून घ्याव्यात.

खोदकामाच्या आखणीनुसार 6.5 मी. रेषेच्या आतील बाजूस खोदकाम करावे. 15 ते 25 सें.मी. जाडीचा मातीचा थर काढून एका बाजूला ठेवावा. त्यानंतर निघणारी माती आतील 3.5 मी. व बाहेरील 2.5 मी. रेषेच्या आत पसरावी. 15 ते 20 सें.मी. जाडीचा थर झाला, की पाणी टाकून रोलरने दाबून टाकावा. असे एकावर एक थर करत पाणी टाकत रोलरने दाबून घ्यावे. आतील एक मी. खोदकाम झाले, की 5.5 मी. व 6.5 मी. रेषांमध्ये तिरकस खोदकाम करावे. माती चांगली नसेल तर बांधाला पाया घेऊन व मध्यबिंदूच्या दोन्ही बाजूंस (0.5 मी.) काळी/ चिकण माती टाकून बांधाची सुरवात करावी. योजलेल्या रुंदी आणि लांबीचा तलाव होईल. त्याबरोबरच बांध बनतील असे खोदकाम करावे. याचप्रमाणे मोजमाप घेऊन विरुद्ध बांध तयार करावा.

तलावाचे खोदकाम करताना ः
पाणलोट क्षेत्राचा विचार करावा. जाळे योग्यरीत्या वापरता येण्यासाठी शक्‍यतो आयताकृती तलाव असावा.
बांधाची धूप टाळण्याकरिता हरळीसारखे गवत पावसाळ्याच्या सुरवातीला लावावे. मुळे पसरून बांधाला हानी पोचेल अशी झाडे बांधाच्या आतल्या बाजूस लावू नयेत. बाहेरील बाजूस नारळ, केळी, पपई अशी झाडे लावल्यास वाऱ्याचा वेग व त्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांना प्रतिबंध होऊन बांधाची नासधूस टळेल, बाष्पीभवनाचा वेग मंद होईल. 

खोदकाम करताना बाजूला ठेवलेल्या मातीचा थर तलावाच्या तळावर पसरवावा. त्याचा प्लवंग निर्मितीस उपयोग होतो.
तलावाच्या एका बाजूकडील बांधमाथा वाहतूक, मासे/ कोळंबी पकडणे, खाद्यपुरवठा करणे, जाळे ओढून ठेवणे यासाठी दोन ते तीन मी. रुंद असावा. बांधमाथा खडी वा पक्का मुरूम वापरून तयार करावा.

पाणीपुरवठ्याचे नियोजन ः
मत्स्य संवर्धनासाठी विहीर, झरे, कालवे किंवा पाटाचे पाणी वापरता येते. या पाण्याचा सामू सात ते आठच्या दरम्यान असावा. यापेक्षा कमी असल्यास ते पाणी आम्लधर्मी असते. मत्स्य संवर्धनास अयोग्य ठरते. मत्स्य संवर्धन करताना खालील गोष्टींचा पाणी पुरवण्यासाठी विचार करावा लागेल.
अ) प्रत्येक तलावाच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्यासाठी मुख्य चारीची व्यवस्था असावी. एका तळ्याचे पाणी दुसऱ्या तळ्यात मिसळू देऊ नये.
ब) एका तळ्यातून बाहेर जाणारे पाणी व दुसऱ्या तळ्याचे आत येणारे पाणी यांना एकमेकांत मिसळू देऊ नये.
क) पाणी शक्‍यतो उंच पातळीवरून खालच्या तलावाच्या पातळीत येणारे असावे. जमिनीच्या उताराच्या दिशेने पाण्याचा प्रवाह असल्यास चांगले पाणी आत घेणारी मोरी तलावाच्या उथळ भागाकडे व पाणी बाहेर सोडणारी मोरी खोलगट भागाकडे असावी. मोरींची रचना बांध करताना करावी.
ड) प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास पाणी पायऱ्यांवर किंवा अडथळ्यांवर आपटत पडेल अशी रचना करावी. आत येणाऱ्या पाण्यात भक्षक माशांचे येणे टाळण्यासाठी मोरीवर बारीक डाशच्या जाळीचा वापर करावा. (आकृती क्र. 1 पाहा.)
स्पर्धक/भक्षक माशांची पिल्ले, अंडी तलावात येण्याचे टाळण्यासाठी मोरीतून जाळीत येणारे पाणी जाळीदार हाप्यात (तळ्यात लावलेल्या) पडण्याची व्यवस्था करावी.
तळ्यात येणारे पाणी, खडी/वाळू यांचा फिल्टर चेंबरमधून आत घ्यावे.
मोरीवर जाळ्या बसविण्यासाठी दोन-तीन खाचा कराव्यात म्हणजे एका खाचेतील जाळी स्वच्छ करताना दुसऱ्या खाचेत बसवता येते.
इ) पाण्याच्या प्रवाहाचा जोर कमी करण्याच्या दृष्टीने पाणी बाहेर सोडायच्या मोरीची रचना करावी. तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी घडीच्या निस्सारण झडपांची रचना अशी करावी, की पाणी चांगले फिरल्याशिवाय बाहेर पडणार नाही. निस्सारण झडपा एक मीटरपेक्षा रुंद नसाव्यात. कारण त्यापेक्षा रुंदी जास्त असल्यास तलावात जोरदार प्रवाह निर्माण होऊन जमिनीची व बांधाची धूप होण्याची शक्‍यता असते. यामुळे मासे, कोळंबीला इजा होण्याची शक्‍यता असते. (आकृती क्र. 2 पाहा.)
तळे धुऊन काढताना, मासे/ कोळंबी पकडण्यासाठी जाळे फिरवताना, पाण्याची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी या मोरीचा उपयोग करावा. तलावाच्या पाण्याच्या नेहमीच्या पातळीपेक्षा 50 सें.मी. वर या मोरीची रचना असावी. पावसाळ्यात पाण्याची पातळी कायम राखण्यास जादा मोरीचा वापर करावा. या मोरीवरही जाळी लावावी.
या पद्धतीने पाणी काढणे शक्‍य नसल्यास पंपाचा वापर करावा. प्राणवायूसाठी तळ्यात पाणी खळखळत आणि वाहत सोडावे, पाणी बदलावे किंवा तरंगत्या/ बुडत्या पॅडल व्हील, स्प्रिंकलर्स किंवा जेट एअरेशनचा उपयोग करावा.

बांधकामातील इतर बाबी
पाणी शुद्धीकरण तलाव ः संवर्धन तलावातील घाण पाणी निस्सारण कालव्यांद्वारे "पाणी शुद्धीकरण' तलावात घ्यावे. मत्स्य/कोळंबी तलावातील दूषित पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच बाहेर सोडावे. पाणी शुद्धीकरण तलावाचे क्षेत्र एकूण संवर्धन तलावाच्या क्षेत्राच्या 10 टक्के असावे. शुद्धीकरण तलावातील नागमोडी वळणांमुळे पाण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे पाण्यातील तरंगणारे पदार्थ तळाशी बसतात, तसेच कार्बन- डाय- ऑक्‍साइड, अमोनिया इत्यादींचे प्रमाण कमी होते.
गोदाम ः बांधकामाच्या वेळी आवश्‍यक साधनसामग्रीचे संरक्षण करण्यासाठी तसेच साठवणुकीसाठी सर्वप्रथम गोदाम बांधावे. हेच गोदाम नंतर माशांचे खाद्य व इतर सामग्रीसाठी वापरता येते.
पहारेकरी निवास व इतर कामगारांना राहण्याची सुविधा करावी.
प्रयोगशाळा ः संवर्धन काळातील पाण्याचे परीक्षण उदा. प्राणवायू, सामू, तापमान, क्षारता इत्यादी मोजण्याकरिता उपकरणे वगैरेंसाठी सुसज्ज प्रयोगशाळा बांधावी.
पाणमांजरासारखे प्राणी तलावाच्या आसपास असतील तर तलावाच्या सर्व बाजूंनी 60 सें.मी. उंच काटेरी किंवा तारेच्या जाळीचे कुंपण घालावे.
विद्युतपुरवठा ः बांधकाम करतेवेळीच प्रकल्पाला पुरेशा विद्युतपुरवठ्याची व्यवस्था करावी. त्यासाठीचे विद्युत खांब बांधावर व्यवस्थित रोवून घ्यावेत. पूर्ण प्रकल्पाला विजेचा योग्य पुरवठा व्हावा या दृष्टीने जनरेटर रूम, स्वीच रूम, पंप रूम, विद्युत दिवे इत्यादी व्यवस्था बांधकाम करतेवेळीच करावी.
गाळण यंत्रणा ः संवर्धनासाठी आत घेतले जाणारे पाणी खडी, वाळू यांच्या गाळण यंत्रणेद्वारे (फिल्टर) गाळून घ्यावे. त्याचप्रमाणे तलावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या झडपांना गाळणासाठी बारीक व्यासाची जाळी बसवावी.
आपले मत्स्य/कोळंबी उत्पादन क्षमता, पाणीपुरवठा, जमिनीची उपलब्धता लक्षात घेऊन आराखडा मांडून मगच बांधकामाला सुरवात करावी. 

करडांच्या व्यवस्थापनातून वाढवा शेळीपालनातील नफा


शेळीपालनातून अधिक नफा मिळविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने शेळ्या आणि करडांचे व्यवस्थापन आवश्‍यक आहे. उत्तम आनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. गाभण शेळ्यांची तसेच करडाची योग्य पद्धतीने जोपासना करावी. करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी ठेवावी. करडांना भरपूर मोकळी आणि हवेशीर जागा मिळाली पाहिजे.


शेळी व्यायल्यानंतर नवजात करडास स्वतः चाटून स्वच्छ करते. त्यामुळे करडे स्वच्छ होण्याबरोबरच रक्ताभिसरण वाढत असते. शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास करडांचे अंग स्वच्छ जाड्याभरड्या कापडाने स्वच्छ करावे. करडाच्या नाका-तोंडातील चिकट स्राव काढावा जेणेकरून करडांना श्‍वास घेणे सोपे होईल. शेळीने करडाला चाटले तरच ती आपल्या करडास ओळखते, अन्यथा नंतर ती स्वतःच पिल्लांना दूध पिऊ देत नाही.

1) व्याल्यानंतर करडांची नाळ एक ते दीड इंच लांब अंतरावर स्वच्छ व निर्जंतुक कात्रीने किंवा ब्लेडने कापावी. नाळ कापलेल्या ठिकाणी टिंक्‍चर आयोडीनचा बोळा ठेवावा म्हणजे नाळेच्या जखमेद्वारे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होत नाही. हळदपुडीचाही वापर यासाठी केला तरी चालतो.
2) खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल. करडांना काही व्यंग उदा. फाटलेल्या नाकपुड्या, आंधळेपण नसल्याची खात्री करावी.
3) जन्मल्यानंतर करडाचे वजन करावे.

करडांना चीक पाजा - 
1) करडे जन्मल्यापासून सुरवातीचे तीन-चार दिवस जे दूध असते त्यास चीक असे म्हणतात. जन्मजात करडाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. सुरवातीस काही काळ ती विकसित झालेली नसते. म्हणून निसर्गाने त्यांना रोगप्रतिबंधक शक्ती मिळावी यासाठी मातेमार्फत ती व्यवस्था करून ठेवली आहे.
2) चिकामध्ये "गॅमा ग्लोब्युलिन्स' म्हणजे रक्षक प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. जी करडांना अनेक संसर्गजन्य रोगांपासून वाचवतात. तसेच चिकामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त जीवनसत्त्व "अ' चे प्रमाण असून तीन ते पाच पट जास्त प्रथिने असतात. याशिवाय त्यात लोह, तांबे, मॅंगेनीज आणि मॅग्नेशिअम ही खनिजेसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. चिकात सारक गुण असल्याने करडाच्या आतड्यात साठलेल्या मलाचे निस्सारण होण्यास मदत होते.
3) करडे जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाच्या आत त्यांना चीक पाजणे आवश्‍यक असते. साधारणपणे करडाच्या एकूण वजनाच्या 10 टक्के इतका चीक पाजावा. वार पडण्याची वाट न बघता योग्य प्रमाणात चीक दिल्यास निरोगी सशक्त करडे तयार होतात.
4) करडांना चीक देत असताना तो एकाच वेळी न देता दिवसातून तीन ते चार वेळेस विभागून द्यावा.

आईपासून करडांना वेगळे ठेवून वाढविणे -
जन्मलेली करडे चार-पाच दिवसांची असताना त्यांना आईपासून वेगळे करून स्वतंत्र गोठ्यात ठेवावे. करडे शेळीबरोबरच ठेवली तर ती सतत शेळीच्या कासेला झटून दूध पिण्याचा प्रयत्न करतात. अशी करडे लवकर चारा खायला शिकत नाहीत. शेळीलादेखील यामुळे चारा खाण्यास अडथळा होतो. हे सर्व टाळून करडांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांना शेळीपासून वेगळे करून वाढविणे चांगले असते.

करडांना दूध पाजणे -
सुरवातीस एक महिन्यापर्यंत करडाच्या वजनाच्या 10 टक्के या प्रमाणात दूध पाजावे. त्यानंतर एक ते दोन महिने या काळात 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत दूध पाजावे.

करडांचे व्यवस्थापन -
1) करडांच्या वाढीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी दुधाव्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्‍यक आहे. करडे एक आठवडे वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या कोठी पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होते.
2) जसजसे करडे मोठे होतात तसतसे त्यांच्या ओल्या व वाळलेल्या चाऱ्यामध्ये वाढ करावी. यामध्ये प्रामुख्याने हिरवा मका, लसूण घास (लुसर्न) बरसीम, कडवळ, शेवरी, चवळी इत्यादी चारा तसेच हादगा, बोर, अंजन, चिंच, सुबाभूळ, वड, पिंपळ इत्यादींचा पाला द्यावा. वाळलेल्या वैरणीमध्ये ज्वारीचा कडबा, भुईमूग पाला, हरभरा, तुरीचे काड, भूस द्यावे.
3) वाढत्या वयातील करडांना चाऱ्याबरोबरच 50 ते 100 ग्रॅम खुराक द्यावा. जेणेकरून त्यांची वाढ झपाट्याने होईल.
4) वयाच्या दोन ते 2.5 महिन्यांत करडांचे दूध हळूहळू कमी करीत पूर्ण बंद करावे आणि करडांना फक्त चारा आणि खाद्यावर वाढवावे.
5) साधारणपणे दोन ते तीन किलो ओली आणि 1/2 ते एक किलो वाळलेली वैरण करडांना द्यावी. तसेच खुराकाचे प्रमाण 250 ते 300 ग्रॅमपर्यंत वाढवावे. खुराकामध्ये मका, ज्वारी, भुईमूग पेंड, गहू कोंडा, खनिज मिश्रण, मीठ व जीवनसत्त्वे इत्यादींचा समावेश असावा.
6) करडांना स्वच्छ, मुबलक पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
खच्चीकरण करणे -
7) बोकडांचे खच्चीकरण साधारणपणे एक ते दोन महिन्यांत करावे. यासाठी तज्ज्ञ अशा पशुवैद्यकाची मदत घ्यावी. खच्चीकरणामुळे करडांची चांगली वाढ होते, तसेच मांसाची/ मटणाची प्रतदेखील चांगली राखली जाते. त्याचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होतो.

करडांसाठी निवारा -
1) करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी ठेवावी. ओलसर, दमट वातावरण असलेल्या गोठ्यातील करडे आजारांना लवकर बळी पडतात. करडांना भरपूर मोकळी आणि हवेशीर जागा मिळाली पाहिजे.
2) गोठ्याच्या बाहेर थोड्या अंतरावर जाळीदार तारांनी बंदिस्त केलेली जागा असावी. त्यामुळे करडांना फिरावयास जागा मिळते.
3) आपल्याकडे शेळ्या साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये वितात. त्याच काळात कडाक्‍याची थंडी सुरू होते. अधूनमधून बोचरे वारे वाहतात. लहान वयातील करडांचे तीव्र थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्यात ऊबदार वातावरण राहील अशी व्यवस्था करणे योग्य ठरते. त्यामुळे सर्दी, पडसे, न्यूमोनिया यांसारख्या आजारांपासून करडांचा बचाव करता येतो.

आजारांचे नियंत्रण - 
1) शेळ्यांच्या बऱ्याच आजारांची लक्षणे ही सारखीच दिसतात. बऱ्याच वेळेस आजारांचे योग्य निदान होण्याअगोदर करडे, शेळ्या दगावतात. तसेच इतर करडे, शेळ्या संसर्गाने आजारी पडतात. त्यासाठी शेळ्यांना रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले असते.
2) करडे योग्य वयाची झाल्यानंतर त्यांना रोगप्रतिबंधक लसी आणि जंतनाशक औषधे द्यावीत.
3) फुफ्फुसाचा दाह, बुळकांडी, घटसर्प, लाळ्या खुरकूत, आंत्रविषार इत्यादी रोगांची लस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देणे गरजेचे असते.
4) करडे, शेळ्या बाहेर चरावयास जात असल्याने मोठ्या प्रमाणात जंतांचा प्रादुर्भाव त्यांना होत असतो. त्यामुळे जंतांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खालील जंतनाशकांचा वापर करावा.

जंताचा प्रकार +जंतनाशकाचे नाव +महिना
टेपवर्म (फितीसारखे) +ऑक्‍सिक्‍लोझानाईट व लिव्हामिसॉल +जानेवारी व जून
स्ट्रॅगाईल (गोलकृमी) +फेनबेंडाझोल +मार्च व जुलै
लिव्हर फ्ल्यूक (चपटे कृमी) +फेनबेंडाझोल +मे व ऑक्‍टोबर

करडांना होणाऱ्या बाह्य परोपजीवी म्हणजेच गोचीड, पिसवा, डास इत्यादींच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी ब्युटॉक्‍सचे द्रावण गोठ्यात फवारावे. गोठ्यात नेहमी स्वच्छता ठेवावी.

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) म्हणून कार्यरत आहेत.) 

विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण कसे करावे

विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये दहा फूट लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत.
विहिरीपासून पहिला खड्डा दहा फूट लांब, दहा फूट रुंद व दहा फूट खोल घ्यावा.
या खड्ड्याच्या तळाशी एक आडवे छिद्र घेऊन पी.व्ही.सी. चार इंची पाइपद्वारे हा खड्डा विहिरीशी जोडावा.
या खड्ड्याच्या तळाशी 2.5 फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. त्या थरावर 2.5 फूट जाडीचा खडीचा थर भरावा. त्यानंतर 2.5 फूट जाडीचा वाळूचा चाळ भरावा. त्या थरावर धुतलेल्या वाळूचा 2.5 फूट जाडीचा थर भरून घ्यावा.
या खड्ड्यापासून साधारणपणे तीन ते चार फूट अंतरावर पुन्हा दहा फूट लांब, दहा फूट रुंद व तीन फूट खोल दुसरा खड्डा घ्यावा. खड्ड्याच्या तळाशी दोन फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा.
दोन्ही खड्डे चार इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे जोडावेत.
ओढ्यातील पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इत्यादी 10 ु 10 ु 3 फूट या खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाइपद्वारे 10 ु 10 ु 10 फूट या खड्ड्यात जाईल.
दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल.

कूपनलिका भूजल पुनर्भरण 
कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.
कूपनलिकेच्या कडेने 2 ु 2 ु 2 मीटर आकाराचा खड्डा खोदावा.
खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक ते दोन सें.मी. अंतरावर सर्व बाजूने चार ते पाच मि.मी. व्यासाची छिद्रे पाडावीत.
या छिद्रावर नारळ दोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी.
खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगड-गोटे, त्यावरच्या भागात खडी, नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.
अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाऊन पुनर्भरण होईल.

विहीर व कूपनलिका पुनर्भरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी
ओढ्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे.
विहीर पाणी तळापर्यंत पाइपद्वारे पोचवावे.
पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खड्डे असावेत.
पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा.
पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे.
ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल, म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरू नये.
औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरू नये. साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरली जाते, त्या भागातील पाणी वापरू नये. वाळू, गोटे यांनी तयार केलेली गाळणी दोन महिन्यांतून एकदा स्वच्छ करावी.
ः 02426-243134
भूजल संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

जावांच्या श्रमाने बहरली गवारीची शेती

औरंगाबाद शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील वरझडी गावात बहुतांश शेतकरी भाजीपाला घेतात. इथले बहुतांश शेतकरी अल्पभूधारक. त्यामुळे कमी कालावधीचे पीक घेण्याकडे त्यांचा ओढा असतो. याच गावातील रुखमाबाई त्रिंबक पठाडे (वय 47) व मथुराबाई अंकुश पठाडे (वय 45) या दोन जावांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आपल्या अडीच एकर शेतात भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. परंतु पाणी नसल्याने त्यावर मर्यादा होत्या. दुष्काळी स्थितीत सर्व मार्ग बंद असताना भर उन्हाळ्यात बोअरवेलचा एकमेव पर्याय होता. पाणी लागेल की नाही याचा जराही विचार न करता डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अडीच एकर शेतीसाठी बोअरवेल घेतले. अडीचशे फुटांवर पाणी लागले. आता सद्यःस्थितीत त्यांच्याकडे 24 गुंठे कोबी, 10 गुंठे गवार ही पिके आहेत.

शेती गवारीची
गवारीची लागवड मागील मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सऱ्या पाडून पारंपरिक टोकण पद्धतीने केली. दोन जोडओळीत दीड फूट, तर दोन रोपांतील अंतर एक फूट ठेवले. सरी पद्धतीने पाणी देत जमीन कायम वाफसा अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रोपांची वाढ चांगली झाली.

सेंद्रिय खतावर भर
शेतीत सुपीकता आणू व खर्चातही बचत करू असा निर्धार करत रुखमाबाई व मथुराबाई यांनी शेणखताचा वापर वाढविण्यावर भर दिला. दहा गुंठे क्षेत्रासाठी दोन गाड्या शेणखत टाकण्यात आले. शेणखतामुळे गवारीच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचा अनुभव शिवार भेटीवेळी व्यक्‍त केला गेला. रासायनिक खताचेही नेटके व्यवस्थापन केले. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी खते देण्यास सुरवात केली. त्यामध्ये डीएपी एक बॅग व चाळीस दिवसांच्या दरम्यान युरिया 22 किलो दिला.
गवारीवर पांढरी माशी, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. किडीवरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून इमिडाक्‍लोप्रिडची फवारणी केली.

* तुटपुंज्या पाण्यावर भाजीपाल्याचा मळा

उन्हाळ्यात घेतलेल्या बोअरवेलला पाणी लागले असले तरी पंधरा मिनिटेच मोटारपंप चालतो. त्यानंतर तो बंद करून पाणी येण्याची प्रतीक्षा करावी लागते. या पंधरा मिनिटे मिळणाऱ्या पाण्यावर भाजीपाला जगविण्याचे मोठे आव्हान पेलत गवार व कोबीला सरी पद्धतीने पाणी देण्याचे व्यवस्थापन केले. दिवसाआड पाणी दिले जाते. गवार व कोबीच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून ठिबक संच खरेदी करण्याचे नियोजन आहे.

अर्थशास्त्र
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गवारीची तोडणी सुरू झाली. पहिला तोडा सुमारे साडेतीनशे किलोचा झाला. त्यानंतर आजपर्यंत तोडणी सुरू आहे. आजच्या घडीपर्यंत सुमारे ----दहा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. बाजारपेठेचा अंदाज घेत तोडणीचे दिवस ठरलेले आहेत. पहिल्या तोड्याला प्रति किलोला 20 ते 22 रुपये दर मिळाला. दुसऱ्या तोड्यापासून 18 ते 20 रुपये व सद्य:स्थितीत 20 ते 25 रुपये व सरासरी 22 रुपये प्रति किलो असा दर मिळतो आहे. खर्चात बचत करून उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

10 गुंठे गवारीला मशागत, बियाणे, लागवड, खते, कीडनाशके व अन्य असा लागवडीपासून काढणीपर्यंत चार हजार रुपये व वाहतुकीचा सहा हजार रुपये खर्च वजा जाता 20 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. उर्वरित 10 क्‍विंटल विक्रीतून 20 हजार रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे. हंगामाअखेर लागवड, काढणी व वाहतूक खर्च वजा जाता 30 हजार रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळेल असा विश्‍वास पठाडे यांना आहे.

त्रिंबकरावांकडे "मार्केटिंग'ची जबाबदारी
शेतीत राबणाऱ्या रखमाबाई यांचे पती त्रिंबक यांच्याकडे बाजारपेठेची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आहे.
बाजारपेठेचा कानोसा घेत गवार ते स्वतः बाजारपेठेत घेऊन जातात. मथुराबाई यांच्या पतीचे निधन झाले आहे. मात्र खचून न जाता आपल्या जावेच्या मदतीने शेतीची धुरा त्यांनी सक्षमपणे पेलली आहे.

औरंगाबाद मार्केट ठरले फायद्याचे
वरझडी ते औरंगाबाद मार्केटचे अंतर अंदाजे वीस किलोमीटर आहे. गावात भाजीपाला क्षेत्र मोठे असल्याने बहुतांश शेतकरी बाजारात एकत्रित शेतीमाल आणतात. त्यामुळे खर्चातही कमालीची बचत होते. औरंगाबाद बाजारपेठेत गवारीसह भाजीपाल्याचे दर स्थिर असल्याने वरझडीसह शहरानजीकची अनेक गावे आता भाजीपाला शेतीकडे वळू लागली आहेत.

* पिकं बदलली, चित्र बदललं
पारंपरिक पिकातून शेतीतील खर्च आणि उत्पन्न हे गणित कधीच जुळलं नाही. तूर, बाजरी, ज्वारी पिकांतून हाती काहीच उरत नव्हतं. पीक बदल केला तर चित्र नक्‍की बदलेल या विश्‍वासातून भाजीपाला शेतीचा निवडलेला पर्याय पठाडे यांच्यासाठी फायद्याचा ठरतो आहे. कृषी सहायक मंगेश निकम यांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले.

* रुखमाबाई व मथुराबाईंकडून शिकण्यासारखे

1) घरची जबाबदारी सांभाळून शेतीच्या कामांचे चोख व्यवस्थापन
2) कमी क्षेत्रात, कमी पाण्यात भाजीपाला पिकवण्याचे कौशल्य
3) दैनंदिन कामाचे नियोजन केल्याने मजूर नसले तरी समस्या जाणवत नाही.
4) दुष्काळात खचून न जाता प्रयत्नांवर भर
5) कुटुंबातील एका सदस्याकडे बाजारपेठेची जबाबदारी सोपविली.

* गवार शेतीतील ठळक बाबी
1) क्षेत्र- 10 गुंठे क्षेत्र
2) चार महिन्यांचा हंगाम कालावधी
3) दहा हजार रुपये एकूण खर्च
4) सरासरी 2000 रुपये प्रति क्‍विंटल दर

पाण्याच्या नेटक्‍या व्यवस्थापनातून गवारीसह कोबीचेही उत्पादन सुरू झाले आहे. पाणी बचतीसाठी यापुढे ठिबक सिंचनावरच संपूर्ण भाजीपाला शेती करण्याचे नियोजन आहे.
रुखमाबाई त्रिंबक पठाडे

दुष्काळी स्थितीत पाण्यासाठी बोअर घेतला. औरंगाबादचं मार्केट जवळ असल्यानं भाजीपाला पिके घेत आहोत. बाजाराला हवं तेच पिकविल्याने भावही चांगला मिळू लागला. यापुढे खर्चात बचत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मथुराबाई अंकुश पठाडे 

...अशी आहे औरंगाबादची गवार बाजारपेठ 
मराठवाड्याचे मध्यवर्ती केंद्र व औद्योगिक वसाहत अशी औरंगाबादची ओळख. इथल्या भाजीपाला बाजारपेठेत मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांसह महाराष्ट्रातून भाजीपाल्याची आवक होते. गवारीची आवक विशेष करून गुजरात राज्यातून होते. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील गवारीचे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यातील सप्ताहात 100 क्‍विंटलपर्यंत गवार आवकेची नोंद होती. यंदा मात्र हीच आवक 47 क्‍विंटलपर्यंत म्हणजे जवळपास निम्म्याने घटली आहे.

औरंगाबाद बाजारपेठेत गवारीच्या होणाऱ्या एकूण आवकेत औरंगाबाद परिसरातून होणारी आवक तब्बल 50 टक्‍के होती. दुष्काळी स्थितीमुळे यंदा हीच आवक पाच टक्‍क्‍यांवर आली आहे. गवारीला स्थानिक तसेच मराठवाड्यातील बाजारपेठेतून वाढती मागणी असल्याने दरही टिकून आहेत.

सद्यःस्थितीत गवारीला प्रति क्‍विंटल 1800 ते 3000 रुपये तर सरासरी 2400 रुपये दर आहे. गवारीत दरवर्षी मे महिन्यापासून ते थेट जुलैपर्यंत दरात तेजी असते. यंदा दुष्काळी स्थितीमुळे गवारीची आवक घटती व मागणी वाढती राहिल्याने दरातील तेजी टिकून आहे. गवार बाजारपेठेचा हाच अंदाज भर दुष्काळात पठाडे कुटुंबीयांनी बांधला. दुष्काळातील तोटा गवारीतून भरून काढण्यासाठी बाजारपेठेनुसार लागवडीची घेतलेला निर्णय यामुळेच किफायतशीर ठरला.

संपर्क ः त्रिंबकराव पठाडे, 9637086954
मंगेश निकम, कृषी सहायक, 9423875580

"रमझान"चे मार्केट ओळखून दरवर्षी कलिंगडाचे नियोजन

कमी कालावधीत मिळतो आर्थिक आधार 
जालना जिल्ह्यातील विश्‍वंभर तारक यांचा प्रयोग

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील विश्‍वंभर तारक सुमारे आठ वर्षांपासून कलिंगड शेती करतात.
रमझान सणाच्या कालावधीत असलेली मागणी लक्षात घेऊन ते या पिकाचे नियोजन करतात.
सुमारे 10 ते 14 एकर क्षेत्रावरील कलिंगडाच्या लागवडीपासून एकरी 15 ते 20 टन उत्पादन ते घेतात.
सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत हे पीक चांगला आर्थिक आधार देऊन जाते असे तारक यांचे म्हणणे आहे.

शेतीत नियोजनाला खूप महत्त्व असते. एखादी बाब चुकली तर ती दुरुस्त करायला काही कालावधी जावा लागतो.
सध्या अनेक शेतकरी सणसमारंभ आदींचा विचार करून पीक नियोजन करतात. पुढील वर्षी कोणत्या क्षेत्रावर कोणते पीक कोणत्या दिवशी लावायचे आहे हे आधीच ठरविलेले असते. परभणी जिल्ह्यातील एकनाथ साळवे यांचा वर्षातून तीन वेळा कलिंगड पीक घेण्यामध्ये हातखंडा आहे. हेच कौशल्य अंबड तालुक्‍यातील (जि.जालना) आंतरवली सराटी येथील विश्‍वंभर बाबासाहेब तारक यांनीही कमावले आहे.
सुमारे आठ ते दहा वर्षांपासून रमझान सणासाठी कलिंगड लागवड करतात. आपले नियोजन एकदाही "फेल' ठरले नाही असे ते अभिमानाने सांगतात. सुरवातीची दोन ते तीन वर्षे त्यांच्याकडे फक्त पाच एकर कलिंगड होते. क्षेत्र वाढवत तीन वर्षांपासून ते 12 ते 14 एकर क्षेत्रापर्यंत गेले आहे. वर्षनिहाय ते थोडेफार कमी-जास्त होते.

यंदा ते 14 एकरांपर्यंत आहे. काढणीला अद्याप सुमारे आठ ते दहा दिवसांचा अवकाश असून व्यापाऱ्यांशी बोलणी झाली आहेत. सध्या दोन किलोपासून ते सहा किलोपर्यंत वजनाची फळे प्लॉटमध्ये असल्याचे तारक म्हणाले.

रमझान सणासाठीच नियोजन
मुस्लिम धर्मीयांसाठी रमझान सणाचे खूप महत्त्व आहे. फळांचे सेवन करूनच ते उपवास सोडतात. त्यामुळे सर्व प्रकारची फळे या सणानिमित्ताने बाजारपेठेत उपलब्ध होतात. तारक यांनी याच गोष्टीचा विचार केला आहे. रमझान सणाच्या सुमारे 70 दिवस आधी ते कलिंगडाची लागवड करतात. शक्‍यतो एकच वाण संपूर्ण शेतात वापरला जातो. त्यांच्या शेतातील प्रत्येक फळ सरासरी सहा ते नऊ किलो वजनाचे तर काही 12 किलोपर्यंत असतात. या पिकाचा कालावधी केवळ दोन महिन्यांपर्यंत पूर्ण होत असल्याने काढणीनंतर प्लॉट रिकामा होऊन मधुमकासारख्या पिकाची लागवड करणे शक्‍य होत असल्याचे तारक म्हणतात.

प्रत्येक वर्षी रमझानचे उपवास 28 ते 30 दिवस आधी सुरू होतात. त्यामुळे त्या वेळचे वातावरण, पाण्याची उपलब्धता व इतर पिकांच्या कामाची वेळ या सर्वांची सांगड घालत कलिंगडाचे नियोजन करावे लागते. अति जास्त उष्णतामान वा थंडी याचा वेलीच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशा वेळेस विशेष काळजी घ्यावी लागते. दहा वर्षांच्या अनुभवातून अनेक बारीकसारीक बाबी तारक यांच्या लक्षात येऊ लागल्या आणि कलिंगड व्यवस्थापनातील त्रुटी कमी होऊ लागल्या.

वेळ साधून पीक व्यवस्थापन
रमझान संपता-संपता सर्व मालाची विक्री होईल असे नियोजन केले जाते. साधारणतः लागवडीपासून 62 ते 64 व्या दिवसांपासून काढणीस सुरवात करून उर्वरित सहा ते आठ दिवसांत मालाची विक्री केली जाते. तोपर्यंत फळाचे वजन सहा ते नऊ किलोपर्यंत भरते. या वर्षी रमझान ईद सात ऑगस्टला आहे हे लक्षात घेऊन लागवड 27 ते 30 मे दरम्यान केली आहे.

कलिंगडांचे व्यवस्थापन
तारक यांच्या कलिंगड शेतीचे प्रातिनिधिक उदाहरण असे. त्यांची जमीन मध्यम स्वरूपाची असून पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे गादी वाफे केलेले नाहीत. लागवडीसाठी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरवातीलाच जमीन नांगरून व वखराच्या दोन-तीन पाळ्या घालून तयार ठेवली. 10 ट्रॉली (ट्रॅक्‍टर) शेणखत वखराच्या शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत टाकले. त्यामुळे ते जमिनीत व्यवस्थित मिसळले गेले. लागवडीपूर्वीच ठिबक पाइप अंथरून घेतले. त्यानंतर लागवड 10 x 2 फूट अंतरावर केली.
रोपे उगवून आल्यानंतर त्यास एकरी दोन बॅग 18- 46-0, थोडेसे पोटॅश व आठ दिवसांनंतर एकरी एक बॅग युरिया खत दिले. 13ः40ः13, 0ः52ः34 आदी विद्राव्य खतांचा वापरही ठिबकमधून केला जातो. दोन वेळेस खुरपणी व निंदणी केली. पण या वर्षी पाऊस सतत रिमझिम स्वरूपाचा पडत राहिल्याने तणे वेचता न आल्याने ती पुन्हा फोफावली. त्यामुळे खर्च काही प्रमाणात वाढला. ढगाळ वातावरणामुळे या वर्षी रोग व किडींचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा वाढला होता. नेहमीच्या वातावरणात तीन ते चार फवारण्यांऐवजी सहा ते सात फवारण्या झाल्या.

प्रतवारी महत्त्वाची
फळे काढतानाच त्याची पक्वता व रंग याचा अदमास घ्यावा लागतो. एक टिचकी मारून दबदब आवाज येत असेल तर फळ पक्व झाले असे समजून काढणी केली जाते. फळे काढल्यानंतर त्यांचा आकार व वजनाप्रमाणे प्रतवारी केली जाते. एकसमान आकाराची फळे मुंबईच्या वाशी मार्केटला पाठविली जातात. काही वेळा व्यापारी जागेवर येऊन मालाची खरेदी करतात.

पाणी व्यवस्थापन
सुरवातीपासून ठिबक सिंचनावर जोर दिला होता. मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे विहिरीचे उपलब्ध पाणी डाळिंब व मोसंबीलाच अपुरे पडण्याची शक्‍यता होती. त्यामुळे कलिंगड लावण्याचा विचार कमी होता. मात्र दोन किलोमीटर अंतरावरील मांगणी नाल्याजवळील शेतात 35 x 35 फूट आकाराचा व 20 फूट खोलीचा खड्डा घेतला. सुदैवाने त्यास भरपूर पाणी लागले. तेथून पाइपलाइनद्वारे पाणी आणले.
सात ते आठ विहिरी असून त्यातून पाण्याची गरज ठिबक सिंचनाद्वारे भागवली जाते.

कमी कालावधीत परवडणारे पीक
दरवर्षी एकरी उत्पादन 15 ते 20 टन यांच्या आसपास असते. हवामान, जमीन व केलेले व्यवस्थापन यावर ते अवलंबून राहते. एकूण उत्पन्न एकरी एक लाख रुपयांच्या आसपास राहते. दर व मागणीनुसार ते कमी-जास्त होत राहते. दरवर्षी उत्पादन खर्च एकरी सुमारे 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत असतो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन एकरी नऊ टनांपर्यंतच मिळाले होते. कलिंगडाला प्रति किलो साडेसहा, साडेआठ रुपयांपासून बारा रुपयांपर्यंत दर मिळतो. रमझानचा सण तोंडावर येतो त्या काळात कलिंगडाला दर कमी म्हणजे किलोला चार ते पाच रुपये राहतो. ज्या वेळी तापमान उष्ण असते (सप्टें.-ऑक्‍टो.) त्या काळात कलिंगडाला अधिक दर मिळतात. औरंगाबाद हे जवळचे मार्केट असले तरी अधिक प्रमाणात तेथे माल खपवण्यास वाव नाही. आवक वाढलीच तर दरही घसरतात. त्या तुलनेत मुंबई हे चांगले मार्केट आहे. आपले कलिंगडाचे क्षेत्र अधिक असले व त्यात जोखीम अधिक असली तरी कमी कालावधीत हे पीक चांगला आर्थिक आधार देऊन जाते असा आपला अनुभव असल्याचे तारक म्हणाले.

शेतीचा मोठा पसारा
तारक कुटुंबाची तीन भावांची मिळून सुमारे 97 एकर शेती आहे. त्यापैकी पावणेचौदा एकर क्षेत्रावर डाळिंब दोन वर्षांपूर्वीच लावले आहे. मोसंबीची सुमारे दोन हजार झाडे आहेत. उर्वरित क्षेत्रावर कापूस, मका, तूर अशी पिके घेतली जातात. पूर्वी दुग्ध व्यवसायासाठी दुधाळ जनावरे होती. पण पाण्याची टंचाई व अन्य कारणांमुळे जनावरांची संख्या कमी केली आहे. शेणखताचा वापर पिकांसाठी होतो. काही शेणखत बाहेरूनही विकत घेतले जाते. जनावरांचा गोठा बांधताना त्यातील मलमूत्र एकाच ठिकाणी संकलित करण्याची व्यवस्था केली आहे. तेथून ते फळझाडांना दिले जाते.

कृषी विभागाची मदत
रोजगार हमी योजनेअंतर्गत डाळिंब लागवडीसाठी कृषी विभागाचे कृष्णा गट्टूवार व रमेश चांडगे यांनी तारक यांना मदत केली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे नुकतेच खोदण्यात आले आहे.

संपर्क ः विश्‍वंभर तारक, 9922535371

(लेखक अंबड (जि. जालना) येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.) 

अभ्यासू वृत्तीतून झाला छायाचित्रकाराचा शेतकरी

सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील विजय पवार यांची शेतजमीन अत्यंत थोडी होती. मात्र छायाचित्रण व्यवसायातून शेतीशी त्यांची जवळीक वाढली. गावातीलच प्रगतिशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन शेतीला सुरवात केली. आज आले पीक व त्यात पपईचे आंतरपीक ही पद्धत वापरत चांगले अर्थार्जन ते करू लागले आहेत. आज शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय व छायाचित्रणाचा व्यवसाय पूरक ठरला आहे.

सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर महामार्गालगत नागठाणे गावातील विजय पवार हे तरुण शेतकरी. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले विजय यांची स्वतःची अवघी 20 गुंठे जमीन होती. यात सोयाबीन, ज्वारी यांसारखी पिके घेतली जात. जमिनीबरोबर पाणीही थोडेच उपलब्ध असल्याने
शेतीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नव्हते. छायाचित्र व्यवसायामुळे सातत्याने वेगवेगळ्या पिकांची छायाचित्रे काढावी लागत. त्यातून पिकांची जवळीक व ओळख वाढली. शेतीची आवड निर्माण झाली. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून आणखी काही क्षेत्र खरेदी केले.
सध्या असे क्षेत्र 63 गुंठे आहे.

आपल्या शेतात पीक नियोजन करण्यासाठी गावातीलच प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण मनोहर साळुंखे यांचे मार्गदर्शन घेतले. सध्याही त्यांच्या सल्ल्यानुसारच शेतीचे नियोजन केले जाते. सन 2009 मध्ये आले पिकाची लागवड केली. त्यातून चांगले उत्पादन मिळाले. थोडा आत्मविश्‍वास वाढला. चांगली शेती करायची म्हटल्यावर स्वतःकडील पाणी आवश्‍यक आहे. यासाठी बोअरवेल घेतले. त्याला दीड इंच पाणी लागले. टप्प्याटप्प्याने आले पिकाच्या क्षेत्रात वाढ केली. सुरवातीस पाट पाणी, स्प्रिंकलर व त्यानंतर आता ठिबक सिंचन केले आहे. सध्या सुमारे दोन एकर क्षेत्र खंडानेदेखील करावयास घेतले आहे.

-क्षेत्रनिहाय नियोजन असे ः

स्वतःचे क्षेत्र- 20 गुंठे- त्यात आल्याची नवी लागवड
खरेदी केलेले क्षेत्र- 63 गुंठे- त्यात सोयाबीन
खंडाने केलेल्या क्षेत्रापैकी 26 गुंठ्यांत आले व 28 गुंठ्यांत ऊस

आले व आंतरपीक पपई
मागील वर्षाचा अनुभव सांगायचा तर मे महिन्यात 26 गुंठे क्षेत्रात आले पिकाचे नियोजन केले. सुरवातीस चार ट्रेलर शेणखत वापरले. दोन बेड आले पिकाचे, त्यात आठ फुटांचे अंतर, त्यानंतर पपई व पुन्हा आले अशी पद्धत वापरली. पावसाळ्यात आले पिकात पाण्याचा निचरा होणे गरजेचे असते. त्यासाठी दोन्ही बेडच्या मध्ये मोठी चर काढली आहे. वातावरणातील बदल्यात पपई पिकावर लक्ष ठेवावे लागते. आवश्‍यकतेनुसार ठिबक सिंचनाद्वारे खते व किडी-रोगनियंत्रणासाठी फवारण्या केल्या जातात. 

पाणी व्यवस्थापन
आले पिकास उन्हाळ्यात एका तास तर पावसाळ्यात अर्धा तास पाणी ठिबकद्वारे दिले. पपई तीनही हंगामांत एक तास पाणी दिले आहे. रमझान महिन्याच्या काळात पपईचे महत्त्व अधिक असल्याने दर चांगला मिळतो हे लक्षात घेऊनच त्याची लागवड केली होती. सध्या पपईचे सात तोडे झाले असून आल्याचा प्लॉटही संपला आहे.

शेती व्यवस्थापन वैशिष्ट्ये ः
-सर्व क्षेत्राला ठिबकद्वारे पाणीपुरवठा
-सेंद्रिय स्लरी, सेंद्रिय खतांच्या वापरावर विशेष भर
-ठिबकद्वारे खतांचा वापर
-बाजारपेठांचा व सणासुदीचा विचार करून पिकांचे नियोजन
-पिकासंबंधी सर्व नोंदी ठेवल्या जातात.
-प्रगतिशील शेतकऱ्यांचा सल्ला घेऊनच शेती

पिकांचा ताळेबंद
पपई- पपईच्या रोपांना प्रति रोप अकरा रुपयांप्रमाणे सुमारे चार हजार 950 रुपये खर्च आला. मशागत व मजुरी पाच हजार, खते व कीडनाशके 25 हजार रुपये, पाणी व अन्य मिळून एकूण 40 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. जूनच्या पहिल्या आठवड्यात पहिला तोडा केला. त्यास 117 किलो उत्पादन मिळाले. प्रति किलो 12 रुपये दर मिळाला. त्यानंतर दुसऱ्या तोड्यात 270 किलो, तिसऱ्या व चौथ्या तोड्यात अनुक्रमे सुमारे 600, 1100 किलो असे उत्पादन मिळत गेले. आतापर्यंत सुमारे सात तोडे झाले आहेत. प्रति किलो 12 रुपये, -----10,------- किमान दर आठ रुपये तर काही वेळा तो 16 रुपये मिळाला. सरासरी तो 11 रुपये राहिला. अजून काही तोडे बाकी आहेत. हवामानाची परिस्थिती अनुकूल राहिली तर चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.
गावातील तीन जणांकडील पपई मिळून पुणे व मुंबई मार्केटला पाठवली जातो. त्याआधी फोनद्वारे दर निश्‍चित केले जातात. सध्या पपईला किलोला 22 रुपये दर सुरू असल्याचे विजय म्हणाले.

आले- आल्याचे 26 गुंठ्यांतून सुमारे साडेबारा टन (सुमारे 24.5 गाड्या) उत्पादन मिळाले आहे.
प्रति गाडी 500 किलो धरली जाते. आल्याला तीन टप्प्यांत म्हणजे प्रति गाडी 53 हजार 800, 48 हजार व 42 हजार असा दर मिळाला. नागठाणे येथीलच एका व्यापाऱ्याला आले विकले आहे.

आले शेतीत बियाणे, खते, कीडनाशके, शेणखत, निंबोळी खत, करंजी पेंड, गांडूळ खत, रासायनिक खत, कीडनाशक, भांगलण आदी मिळून सुमारे 47 हजार रुपये खर्च झाला. काढणीसाठी प्रति गाडी 1200 रुपये मजुरी खर्च आला. त्या व्यतिरिक्त मजुरांसाठी अन्य खर्चही करावा लागतो. शेतीतील निविष्ठांचे दर कायम स्थिर राहत नसल्याचे जमा-खर्चाचे गणित बदलते. मात्र खर्च कमी कसा करता येईल याकडे विजय यांनी अधिक लक्ष दिले आहे.

बाजारपेठेचा अभ्यास
नागठाणे गावात आल्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने येथे स्थानिक व्यापारी आहेत. यामुळे दराच्या चढ-उताराची माहिती रोजच्या रोज मिळत असते. यामुळे दर वाढला की त्या दिवशी दर ठरवूनच आले काढणी केली जाते. त्याचा फायदा होतो. पपईचे महत्त्व रमझान महिन्यात जास्त असल्यामुळे पपईस दर चांगला मिळतो. अजून सणाच्या पार्श्‍वभूमीवर अपेक्षित दर साधला नसला तरी प्रयत्न सुरू असल्याचे विजय म्हणाले.
......................
विजय यांना शेतीत आईची मोठी मदत होते. शेतजमीन कमी असल्यामुळे आंतरपीक घेऊन मुख्य पिकातील उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आहे. क्षेत्र लहान असले तरी शेतीत सतत लक्ष दिले, अनुभवी, प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत गेले तर शेती नक्कीच यशस्वी होते. आर्थिकदृष्ट्याही परवडते असा अनुभव आपण घेत असल्याचे विजय म्हणाले.

संपर्क ः विजय पवार, 9767996007

1) आले पिकात घेतलेल्या आंतरपीक पपईने रमझान ईदच्या काळात विजय पवार यांना फायदा दिला आहे.

2) प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत विजय पवार यांनी आले व पपईची शेती केली आहे.

3) नवीन लागवड करण्यात आलेल्या आले पिकाने जोम धरला आहे. 

विदर्भातील मातीत रुजवली पौळ यांनी डाळिंब बाग


मांगवाडी येथील शिवाजी पौळ यांच्या संयुक्त कुटुंबीयांची 18 एकर शेती आहे. पैकी शिवाजी यांच्या मालकीची साडेचार एकर जमीन आहे. ही जमीन हलकी आणि मुरमाड असल्याने सोयाबीन, गव्हाचे पीक ते घेतात. सोयाबीनचे एकरी सात ते आठ क्‍विंटल, तर गव्हाचे 10 क्‍विंटल उत्पादन मिळायचे. दोन्ही पिकांपासून तीन एकरांत वर्षाला 70 ते 80 हजार रुपये उत्पन्न मिळायचे. त्यावरच प्रपंच भागवावा लागत असे.

डाळिंबातून पल्लवीत झाल्या आशा हलक्‍या जमिनीत कोणते पीक घ्यावे या विवंचनेत असतानाच डाळिंब शेतीचा निर्णय घेतला. सन 2009 मध्ये कृषी विभागाच्या सल्ल्याने भगवा जातीची कलमे आणून तीन एकर दोन गुंठे क्षेत्रावर त्यांची लागवड 12 x 8 फूट अंतरावर केली. एकरी सुमारे 400 झाडे लावली. सध्या एकूण क्षेत्रात 1100 झाडे आहेत.
शेतात दोन विहिरी व एक बोअर आहे. बागेला पाणी पुरावे म्हणून शासकीय अनुदानाच्या मदतीने मार्च 2012 मध्ये बांधलेल्या शेततळ्याची यंदाच्या उन्हाळ्यात बरीच मदत झाली. त्यामुळेच बाग टिकविता आली. आतापर्यंत पौळ यांनी डाळिंबाचे दोन हंगाम घेतले. यंदा घेतलेला पहिलाच आंबे बहर असून, यापूर्वी दोन्ही वेळा पावसाळी बहर राखला होता.

तंत्रज्ञान वापराची वैशिष्ट्ये - * खत व पाण्याचे चोख व्यवस्थापन.
* सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची पर्ण फवारणी.
* ठिबकने पाणी व खत व्यवस्थापन. (तीन एकरांत ठिबक)
* रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचाही भरपूर वापर.
* आंबे बहर राखण्यावर भर.
* सेंद्रिय स्लरीचा वापर फायदेशीर.

व्यवस्थापनातील काही मुद्दे छाटणी झाल्यावर प्रति झाड निंबोळी खत एक किलो, कोंबडी खत चार किलो व शेणखत 10 ते 15 किलो दिले जाते. सोबत रासायनिक खतांचा बेसल डोस, त्यात डीएपी 250 ग्रॅम, पोटॅश 150 ग्रॅम, सुपर फॉस्फेट 150 ग्रॅम, कॅल्शिअम नायट्रेट 30 ग्रॅम व मॅग्नेशिअम 30 ग्रॅम यांचा समावेश असतो. ड्रीपजवळ खड्डा खोदून त्यात खत दिले जाते. दोन महिन्यांनी 12-61-0 व पुन्हा दोन महिन्यांनी 0-52-34 आणि 13-40-13 खतांचा तिसरा डोस दिला जातो. शेवटच्या दोन महिन्यांत 10-26- 26 व 100 ग्रॅम पोटॅश जमिनीतून, तर फळ फुगवणीसाठी 0-0-50 व कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, बोरॉन व जस्त ड्रीपद्वारे दिले जातात. एका झाडाला आठ लिटरचे दोन ड्रीप लावले आहेत.

पीक संरक्षण - तेलकट डाग रोग, थ्रिप्स, पिठ्या ढेकूण आदींचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यांना वेळीच रोखले जाते. मूळकूज रोगाला अटकाव करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर होतो. उन्हाळ्यात एक दिवसा आड पाणी देतात. झाडे फळावर असताना मात्र पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. 60 ते 80 लिटरपर्यंत पाणी प्रति झाड द्यावे लागते.
डाळिंबाच्या प्रत्येक झाडाला द्विदल पिठाची स्लरी देतात. यात मूग, उडीद, चना, सोयाबीन, गूळ यांच्यासोबत गोमूत्र आणि गाईचे शेण यांचा वापर केला जातो. स्लरीमुळे फळाला चांगला आकार मिळून फळे तजेलदार होत असल्याचे पौळ सांगतात.

डाळिंबाला कोरडे व उष्ण हवामान पोषक असते. उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असल्यास आंबे बहरच धरण्याचा सल्ला पौळ देतात. या बहरात फळाचा दर्जा उत्कृष्ट असतो. रोग-किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असतो. पौळ यांनी अजनाळे (ता. पंढरपूर) येथील राजू एलपल्ले यांची डाळिंब शेती पाहून त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. चांदुले, कृषी सहायक श्री. शिंदे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते.

पौळ यांच्याकडून शिकण्यासारखे... *अनुभवी शेतकरी आणि कृषी विभागाच्या सतत संपर्कात असतात.
* कुटुंबाची मदत घेतात.
* सिंचनाचे साधन संरक्षित करण्यावर भर.
* नवीन पीक घेण्याची, प्रयोग करण्याची आवड.
* कृषी विभागाच्या योजनांची मदत घेतात.

एकरी ताळेबंद पौळ यांच्या एकूण डाळिंब बागेतून आतापर्यंत सुमारे 80 ते 85 टक्के मालाची म्हणजे एकूण पंधराशे क्रेट (प्रति क्रेट 20 किलो) विक्री झाली आहे. फळाचे सरासरी वजन 250 ते 300 ग्रॅम राहिले. नांदेड येथे डाळिंबाला किलोला 35 ते 60 रुपये, पुणे येथे 70 ते 80 रुपये, तर मुंबईला हाच दर 90 रुपये मिळाला आहे. सन 2011 मध्ये पौळ यांना किलोला 40 रुपये, तर 2012 मध्ये 60 ते 70 रुपये दर मिळाला होता. यंदा रासायनिक खते, सेंद्रिय खते, कीडनाशक, आंतरमशागत, फळ तोडणी, मजुरी, ड्रीपचा घसारा, वाहतूक खर्च, मध्यस्थांचे कमिशन धरून एकरी सुमारे एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. यापूर्वी पारंपरिक पिकांमधून वर्षाला केवळ 60 ते 70 हजार रुपयांचे उत्पन्न तीन एकर शेतीपासून मिळायचे. हेच उत्पन्न डाळिंब शेतीमुळे काही पटींनी वाढले आहे.

समस्या व उपाय डाळिंब पीक किडी-रोगांबाबत संवेदनशील असते. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते. जवळपास बाजारपेठेची अनुपलब्धता ही पौळ यांच्यासाठी मोठी समस्या आहे. मुंबई, नाशिक अशा लांबच्या बाजारपेठेत मालाची वाहतूक करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढतो. मात्र संरक्षित पाणी, फवारणी यंत्र, ठिबक अशा आधुनिक सुविधा शेतात दाखल झाल्या आहेत. विद्राव्य खते, सेंद्रिय खतांचा वापर वाढला आहे. त्यातून सोयाबीन, गव्हाचे चांगले उत्पादन मिळू लागले आहे. कुटुंबाचे जीवनमान उंचावले आहे.

"ऍग्रोवन' वाचून मिळाली प्रेरणा - दैनिक ऍग्रोवनमध्ये पंढरपूर तालुक्‍यातील अजनाळे गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची यशकथा वाचली. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी डाळिंब शेती पाहायला निमंत्रित केले. त्यांची शेती पाहून डाळिंब लागवडीचा निश्‍चय पक्का केला.

संपर्क - शिवाजी पौळ, 9767452654

संरक्षित सिंचन व व्यवस्थापनातून वाढले कपाशीचे उत्पादन

"कॉटनसिटी' म्हणून लौकिक असलेल्या अकोला जिल्ह्यात नजीकच्या काळात कापूस उत्पादक शेतकरी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करू लागला आहे. अनेक शेतकरी लागवडीच्या अंतरात बदल करू लागले आहेत. ठिबक सिंचनाबरोबर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, प्रभावी पीक संरक्षण यांचा वापर करू लागले आहेत. अकोला जिल्ह्यातील माझोड येथील संतोष ताले त्यापैकीच एक. कोरडवाहू शेतीत एकरी तीन ते चार क्‍विंटल उत्पादकता असलेल्या ताले यांनी सिंचन सुविधा व व्यवस्थापनाच्या बळावर एकरी 16 क्‍विंटलपर्यंत उत्पादनाची मजल गाठली आहे.

माझोड येथील ताले यांची शेती अकोल्यापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावरील माझोडचे रहिवासी असलेल्या संतोष यांची वडिलोपार्जित 14 एकर शेती. सिंचन सुविधा नसल्याने कोरडवाहू कपाशी, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी यांसारखी पारंपरिक पिके त्यांच्या कुटुंबीयांद्वारे घेतली जात होती. पाच वर्षांपूर्वी याच क्षेत्रात त्यांनी विहीर खोदली. सुमारे 47 फूट खोदलेल्या या विहिरीत पाण्याची मुबलकता आहे. या पाण्याचा उपयोग संरक्षित सिंचनकामी होऊ लागला. त्यामुळे पारंपरिक पिकांचे उत्पादन व पर्यायाने उत्पन्नही वाढीस लागले. कौटुंबिक गरजा भागविल्यानंतरही गाठीशी पैसा जुळू लागल्याने त्यांनी शेती खरेदीवर भर दिला.

शेतीला जोडली शेती वडिलोपार्जित अवघी 14 एकर शेती असताना संरक्षित सिंचनामुळे वाढलेली उत्पादकता व उत्पन्नातून शेती जोडण्यावर भर दिला. आज त्यांचे संपूर्ण क्षेत्र 33 एकरांपर्यंत पोचले आहे. पिकांचे योग्य पद्धतीने नियोजन करण्याच्या हेतूने सुरवातीला तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला. एकूण 33 एकर क्षेत्रांपैकी दहा एकरांवर कपाशीची लागवड व्हायची. सलग दोन वर्षे तुषार सिंचनावर कपाशीचे पीक घेतले. दोन वर्षांनंतर तुषार सिंचनाबरोबरच पाच एकरांवर ठिबक सिंचनाचा प्रयोग केला. ठिबक सिंचनाला योग्य व्यवस्थापनाची जोड दिल्याने हळूहळू उत्पादन वाढू लागले. पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याबरोबरच विद्राव्य खतांचा पुरवठाही ठिबक सिंचनाद्वारे करणे शक्‍य झाले. मजुरी खर्चातही बचत झाली. ठिबक सिंचन फायदेशीर असल्याच्या जाणिवेतून पाच एकरांवरून तब्बल 14 एकर क्षेत्र संतोष यांनी ठिबकखाली आणले आहे.

संतोष यांनी चार x दोन फूट अंतरावर लागवड केली आहे. बियाण्यांवर त्यांना एकरी 1300 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. रासायनिक कीडनाशकांच्या सुमारे चार फवारण्या ते हंगामात घेतात. त्यावर सुमारे 13 हजार 500 रुपये एवढा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. चार रुपये प्रति किलो प्रमाणे एकरी 16 क्‍विंटलच्या वेचणीवर सात हजार रुपये खर्च झाला. मजुरी व इतर व्यवस्थापनावर आठ हजार रुपयांचा खर्च होतो. याप्रमाणे कपाशीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या एकूण व्यवस्थापनावर एकरी 34 हजार 335 रुपयांचा खर्च आला. कपाशीची विक्री 4800 रुपये प्रति क्विंटल दराने वस्त्रोद्योग क्षेत्रातील एका खासगी कंपनीला करण्यात आली आहे. या दरानुसार एकरी 76 हजार 800 रुपयांचे उत्पन्न संतोष यांना मिळाले. खर्च वजा जाता 42 हजार 465 रुपयांचा निव्वळ नफा त्यांना झाला आहे. कपाशीचे फरदड पीक घेतले असते तर उत्पादन व उत्पन्नाचा आलेख वाढला असता. मात्र पीक फेरपालट करण्याची गरज तज्ज्ञ वेळोवेळी व्यक्‍त करतात. त्यामुळेच फरदड घेण्यावर भर दिला नसल्याचे संतोष म्हणाले. वारंवार एकच पीक घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागतो. कपाशीच्या काढणीनंतर काही क्षेत्रावर लसूण व कांदा बीजोत्पादनही त्यांनी घेतले आहे. कांदा बीजोत्पादन असलेल्या पाऊण एकर क्षेत्रातून त्यांना 68 हजार रुपयांचे अर्थार्जन झाले आहे. कपाशी काढणी झाल्यानंतर हे बोनस उत्पन्न ठरल्याचे त्यांनी सांगितले.

तज्ज्ञही सांगतात ठिबकचे फायदे कोणत्याही पिकाच्या संरक्षित सिंचनाची सोय झाल्यास त्याच्या उत्पादकतेत वाढ होते. हाच नियम कपाशीच्या उत्पादकतेलाही लागू आहे. कपाशीला हंगामात 500 ते 600 मिलिमीटर पाण्याची गरज व मध्यम जमिनीची आवश्‍यकता राहते. कपाशीची बोंड भरण्याची अवस्था सप्टेंबर महिन्याच्या सुमारास सुरू होते; या वेळी नेमका पावसाच्या पाण्यात खंड पडल्यास बोंडाचा आकार लहान होणे, बोंडगळसारख्या परिणामांना सामोरे जावे लागते. ही बाब थेट उत्पादकतेवर परिणाम करणारी आहे. बोंड भरण्याच्यावेळी पिकाच्या संरक्षित सिंचनाची सोय असल्यास उत्पादकता वाढते, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन विभागाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. ए. एन. पसलावार यांनी सांगितले. सिंचन सुविधा असल्यास कपाशीची लागवड मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात करणे योग्य, कोरडवाहू शेतीत लागवडीसाठी 100 मिलिमीटर पाऊस होणे गरजेचे आहे. देशी वाण स्वस्त तसेच घरचे बियाणे वापरावर पूर्वी भर होता. त्यामुळे धूळपेरणीची शिफारस केली जात होती. बीटी बियाण्याचे दर वाढीस लागल्याने धूळपेरणीची शिफारस विद्यापीठाद्वारे केली जात नाही. पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी कोरडवाहू बीटी कपाशीसाठी शिफारस असलेल्या खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. लागवडीपूर्वी एकरी दोन टन चांगले कुजलेले शेणखत दिल्यास पिकाला पोषक घटकांचा पुरवठा होतो. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका परिसरात फरदडीनंतर पुन्हा कापूस घेण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. पीक फेरपालट न झाल्याने कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने या भागात उत्पादकता काही प्रमाणात घटली.

संतोष तालेंकडून आत्मसात करण्यासारखे काही... 1) रासायनिक, सेंद्रिय खतांसोबत विद्राव्य खतांचा वापर
2) ठिबकद्वारे पाणी बचतीचा हेतू साध्य
3) कपाशीची फरदड घेण्याऐवजी पीक फेरपालट करण्यावर भर

प्रयोगातून आली सजगता संतोष यांनी पूरक व्यवसायावर भर देण्याचा प्रयोग केला होता. एका ठिकाणाहून त्यांनी दहा नर आणि मादी शहामृग आणले होते. अंडी खरेदीचा करार त्या वेळी करण्यात आला होता. परंतु पुरवठादाराने ऐनवेळी करारातील अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे ताले कुटुंबीयांनी या व्यवसायातून माघार घेणे हिताचे समजले. या व्यवसायात त्यांना 60 ते 70 हजार रुपयांचा तोटा सोसावा लागला. त्यानंतर मात्र असे प्रयोग करण्यापूर्वी व्यवसायाच्या सर्व बाजू अभ्यासण्यावर संतोष यांनी भर दिला आहे. सध्या व्यावसायिक दृष्टिकोनातूनच शेती करण्यावर त्यांचा भर आहे.

संपर्क - संतोष ताले,9049889126
माझोड, जि. अकोला

Monday, 15 July 2013

कलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा


इतरांपेक्षा काही तरी नवीन करून दाखविण्याचे, त्या विषयाबाबत आपली स्वतः ओळख निर्माण करायची, अशी जिद्द बाळगणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. या शेतकऱ्यांपैकीच एक आहेत कलिंगड लागवडीतून स्वतःची ओळख निर्माण करणारे पापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील बाबूराव राऊ भोसले. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. कायम पाण्याची टंचाई असलेल्या भागात शेती असल्याने कमी कालावधीत, कमी खर्चात उत्पादन देणाऱ्या पिकांच्या शोधात ते असतात. त्यांच्या प्रयत्नांना घरच्यांचीही तेवढीच मोलाची साथ असल्याने टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, खरबूज आणि कलिंगडाचे चांगले उत्पादन त्यांनी घेतले आहे. शेतीमधील नवीन प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या शेतावर परिसरातील शेतकऱ्यांचा कायम राबता असतो.

अभ्यासातून साधले कलिंगडाचे पीक कलिंगड लागवडीबाबत अनुभव सांगताना भोसले म्हणाले, की माझी अठरा एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्र मी ठिबकखाली आणले आहे. सध्या माझ्याकडे दोन एकर टोमॅटो, एक एकर ढोबळी, दोन एकर कलिंगड, डाळिंब अडीच एकरावर आहे. मी पहिल्यापासून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन पीक लागवड, व्यवस्थापन आणि बाजारपेठांचा अभ्यास करायचो. आमच्याकडे लिंबाची बाग होती, त्यामुळे विविध बाजारपेठांत लिंबू विक्रीसाठी मी जात असे. त्या वेळी मला कलिंगड, टरबूज फळांच्या मागणीचा आणि दराचा अंदाज आला. सन 2007 मध्ये पहिल्यांदा एक एकरावर जानेवारी महिन्यात कलिंगड लागवडीला सुरवात केली. चांगल्या उत्पादनाच्यादृष्टीने पहिल्यापासून गादीवाफा पद्धतीने लागवड, मल्चिंग पेपरचा वापर आणि ठिबक सिंचनावर भर दिला. त्यातून मग टप्प्याटप्प्याने लागवड क्षेत्र वाढवीत गेलो. मी जूनमध्ये दोन एकर कलिंगड लागवड करतो. त्याची फळे रमझान सणाच्यावेळी मिळतात. परंतु हे उत्पादन पावसाच्या भरवशावर असते. पण दर चांगला मिळतो. त्यानंतर दुसऱ्या क्षेत्रात डिसेंबरमध्ये दीड एकराचे टप्पे करून दर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने सरासरी दहा एकरावर कलिंगड लागवड करतो. ही लागवड मार्चपर्यंत चालू असते. गेल्या वर्षी मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक एकरावर सुधारित पद्धतीने कलिंगडाची लागवड केली होती. या लागवडीसाठी डिसेंबरमध्ये शेताची चांगली नांगरट करून एकरी 20 गाड्या शेणखत मिसळून दिले. त्यानंतर दोन गादीवाफ्यात तीन फुटाचे अंतर येईल या प्रमाणे पॉवर टिलरच्या साहाय्याने अडीच फूट रुंदीचा आणि 10 इंच उंचीचा गादीवाफा तयार केला. गादीवाफ्यामध्ये एकरी 100 किलो 18ः46ः0, 50 किलो पोटॅश, 250 किलो निंबोळी पेंड,10 किलो झिंक सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट,10 किलो मॅग्नेशिअम सल्फेट, तीन किलो फोरेट, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून दिली. गादीवाफा एकसमान करून मधोमध ठिबकची लॅटरल अंथरली. दोन दिवस ठिबक संचातून पाणी सोडून लॅटरल तपासून घेतल्या. त्यानंतर गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा 30 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरला. पेपर गादीवाफ्याला बेडला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची काळजी घेतली. कारण मल्चिंग पेपर ढिला राहिला तर वाऱ्यामुळे फाटण्याची शक्‍यता असते. परागीभवनासाठी शेतात मधमाश्‍यांच्या दोन पेट्या ठेवलेल्या आहेत.

रोप लागवडीच्या आदल्या दिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूंस 15 सें.मी. अंतरावर रोप बसेल अशी छिद्रे पाडली. एका ओळीतील दोन छिद्रांमधील अंतर दोन फूट ठेवले. छिद्रे पाडून झाल्यावर ठिबक सिंचन संच सुरू करून गादीवाफा ओला करून घेतला. वाफसा आल्यावर नंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी 12 दिवस वयाच्या रोपांची लागवड केली. एकरी 6000 रोपे बसली. लागवडीनंतर पहिले सहा दिवस रोज 10 मिनिटे पाणी देण्यास सुरवात केली. त्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन ठेवले. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर आठव्या दिवसापासून दोन किलो 19-19-19 सलग 15 दिवस दिले. त्यानंतर 15 दिवस 12ः61ः0 हे खत दोन किलो दिले. त्यानंतर 15 दिवस 0-52-34 दोन किलो ठिबकमधून दिले. फळे तयार होताना 50 ते 60 दिवसांच्या दरम्यान जर फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी वाटले आणि फळास चकाकी येत नसेल, तर गरजेनुसार 0-0-50 या खताची दोन किलो मात्रा एक किंवा दोन दिवस देतो.

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर भर - कलिंगडावर प्रामुख्याने मावा, फुलकिडे व नाग अळी या किडींचा, तसेच भुरी, करपा, केवडा या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. त्यामुळे लागवडीनंतर सात ते आठ दिवसांनंतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी करतो. त्यानंतर कीड, रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीडनाशकांच्या फवारण्या घेतो. फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी आठ कामगंध सापळे लावतो. फुलकिडी, मावा किडीच्या नियंत्रणासाठी शेतात आठ ठिकाणी पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या 1 x 1.5 फूट आकाराच्या पट्ट्या लावतो. त्यावर ग्रीस लावून ठेवतो. त्यावर किडी चिकटतात. एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रणावर माझा भर असतो.

प्रतवारी करूनच विक्री - फळाची पहिली तोडणी ही लागवडीपासून 60 ते 65 दिवसांनी केली. काढणी करण्यापूर्वी फळांची पक्वता, बाजारपेठ, रंग, आकार या गोष्टींचा विचार करून तोडणी केली. फळांचा आकार तसेच फळांची प्रतवारी करून चांगल्या प्रतीची फळे मोठ्या बाजारपेठेत (मुंबई, पुणे या ठिकाणी) पाठविली, तर मध्यम व कमी दर्जाची फळे स्थानिक बाजारपेठांमध्ये पाठविली. फळांचे वजन सरासरी तीन ते पाच किलोच्या दरम्यान असते. सरासरी प्रति किलो सात ते दहा रुपये असा दर मला मिळाला. प्रति एकरी 32 टन उत्पादन मिळाले. जमिनीची मशागत ते काढणीपर्यंतचा एकरी पीक व्यवस्थापनाचा खर्च 82,500 इतका आला. खर्च वजा जाता निव्वळ नफा मला दोन लाखांपर्यंत राहिला.

शेतकरी गटातून प्रगती -- कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्डच्या सहकार्याने "शिवकृपा नाबार्ड फार्मर्स क्‍लब' अडीच वर्षापासून कार्यरत.
- कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. ला. रा. तांबडे, प्रा. गोंजारी, प्रा. अली यांचे मार्गदर्शन.
- गटशेतीवर भर. खरबूज, आले, कलिंगड, ढोबळी मिरचीची गटशेती. एकत्रित विक्रीचे नियोजन, व्यापारी शेतावर येऊन खरेदी करतात.
- गावात गटाचे कार्यालय, दररोज सकाळी पीक व्यवस्थापनावर चर्चा.
- "शिवकृपा' हा ब्रॅण्ड तयार केला, त्यामुळे बाजारपेठेत गटातील शेतकऱ्यांच्या फळांना वेगळी ओळख, त्यामुळे चांगला दर.
- एकत्रित बियाणे, खते, कीडनाशकांची खरेदी.
- प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर शिवारफेरी, त्यातून पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे नियोजन.

संपर्क - बाबूराव भोसले, 9822920642,
किरण जाधव, 0217-2350359

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

Sunday, 14 July 2013

दुष्काळाशी टक्कर देत फुलविली पपईची बाग


धोंडेवाडी (ता. पंढरपूर जि. सोलापूर) येथील एम.ए.पर्यंत शिकलेल्या धनंजय देठे यांना जळगावमधील शाळेमध्ये क्‍लार्कची नोकरी मिळाली. मात्र त्या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर आपण इथे काय करतोय असा प्रश्‍न पडला. घरची शेतीवाडी सोडून नोकरी करण्यापेक्षा शेतीत लक्ष घातले तर... असा विचार करून 2004 मध्ये धनंजय घरी परतले. त्यांनी वडिलोपार्जित पंधरा एकर शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर करत द्राक्ष, ऊस, केळी अशी पिके घेतली. मागील वर्षी पंढरपूर-सातारा मुख्य रस्त्यालगत असलेली व धोंडेवाडी-जैनवाडी (ता. पंढरपूर) या दोन गावांच्या हद्दीवरील 14 एकर माळरानाची जमीन खरेदी केली. घरच्या ट्रॅक्‍टरचा वापर या शेती वहितीखाली आणण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले. या आधी चार वर्षांपूर्वी एकदा पपई पीक घेतले होते. त्याचा अनुभव चांगला होता. पपईसाठी माळरानाची जमीन चांगली ठरत असल्याने तयार झालेल्या साडेतीन एकर शेतीमध्ये पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासत असल्याने कमी पाण्यामध्ये येणारे फळपीक लावण्याकडे त्यांनी लक्ष दिले. पपईबरोबरच दोन एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आहे. आज आजूबाजूच्या उजाड माळरानावर साडेतीन एकरावरील पपईच्या बाग रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही.

पपईची लागवड व झेंडू आंतरपीक ऑक्‍टोबर 2012 मध्ये पपईची सात x सात फूट अंतरावर एकरी एक हजार रोपांची लागवड केली. उन्हाळ्यात पाणी कमी पडू लागल्यानंतर एकूण पाच कूपनलिका घेतल्या. त्यातील दोन कूपनलिकांना दीड इंच पाणी मिळाले. पाण्याचे व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे केले. त्यासाठी घरातील जुनी इनलाईन ठिबक यंत्रणा वापरली. पपईच्या झाडांमधील जागेमध्ये झेंडूचे आंतरपीक घेतले. झेंडूच्या पिकाचे अडीच टन उत्पादन मिळाले असून, सरासरी दर 20 रुपये मिळाला. एकूण 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असले, तरी झेंडूचा खर्च 10 हजार वजा जाता चाळीस हजार रुपये मिळाले. पपईच्या लागवडीचा खर्च बऱ्यापैकी वसूल झाल्याचे ते सांगतात.

बाग जगविण्यासाठीची लढाई... गेल्या वर्षी पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे कूपनलिकेचे पाणी कमी झाले. अशा वेळी मोठ्या कष्टाने जोपासलेली पपई व डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी दररोज 25 हजार लिटर क्षमतेचे दोन टॅंकर पाणी विकत घेतले. असे 15 दिवस प्रति दिन 2500 रुपये खर्च करून पपई आणि डाळिंबाची बाग वाचविली आहे. या वर्षी द्राक्षाचा बहर धरला नाही. केवळ बाग जगविण्याकडे लक्ष दिले. त्यासाठी प्रति दिन एक टॅंकर पाणी लागत असे. पाण्यावरती 80 हजार रुपये खर्च झाला असला तरी बागा जगल्याचे समाधान मोठे असल्याचे धनंजय यांनी सांगितले.

सेंद्रिय खतांचा अधिक वापर जमीन माळरानाची असल्याने बागेमध्ये लागवडीपूर्वी आठ ट्रेलर शेणखत व पाच ट्रेलर कंपोस्ट खत वापरले. घरी खिलार गाई व म्हशी अशी जनावरे असल्याने शेणखत घरचेच आहे. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत झाली. सेंद्रिय खतांमुळे पपईच्या झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असून, मिलीबग आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाला. तसेच फळावर तेज दिसून येत असल्याने व्यापाऱ्याकडून पपईला मोठी मागणी असते.

उत्पादन - सध्या पपईची तोडणी सुरू झाली असून, 27 जून रोजी पहिला तोडा झाला. त्यामध्ये दीड टन माल निघाला. त्याची व्यापाऱ्याला जागेवरतीच 10 रुपये किलोप्रमाणे विक्री केली. त्यानंतर 5 जुलै रोजी दुसरा तोड केला. त्या वेळी दोन टन माल मिळाला.त्याला 13 रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यानंतर पाच टन माल निघाला. त्याला 27 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. आतापर्यंत त्यांना साडेतीन एकरामधील तीन तोड्यांतून त्यांना दोन लाख 16 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. डिसेंबरअखेर पपईचे उत्पादन सुरू राहणार आहे. तसेच रमझान आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये पपईला आणखी चांगला दर मिळण्याची अपेक्षा धनंजय यांनी व्यक्त केली आहे.

साडेतीन एकर क्षेत्रातील पपईसाठीचा खर्च ट्रॅक्‍टरने नांगरट- सहा हजार रुपये
फण पाळी करणे- तीन हजार रुपये
चर पाडणे- चार हजार रुपये
रोप प्रति नग आठ रुपयाप्रमाणे 3500 रोपांचे 28 हजार रुपये
लागवड मजूर खर्च -चार हजार रुपये
शेणखत (घरचे)- आठ ट्रेलर -20 हजार रुपये
रासायनिक खते आणि औषधे - पाच हजार रुपये
कंपोस्ट खत- 10 हजार रुपये
फळ तोडणी (प्रत्येक तोड्यासाठी - एक हजार रुपये) - आतापर्यंत तीन हजार रुपये
खर्च - आतापर्यंत 74 हजार रुपये

"ऍग्रोवन' ठरला मार्गदर्शक पूर्वी गावात "ऍग्रोवन' येत नसे. मात्र नवी शेती रस्त्यालगत असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून ऍग्रोवन घेतो. शेतीतील सुधारणा, नवी पिके व अन्य माहिती वाचून त्यावर गटामध्ये चर्चा होते. माहिती आणि चर्चा या दोहोंचा चांगला फायदा होत असल्याचे धनंजय यांनी सांगितले.

शेतकरी गटाचा फायदा गावातील दहा शेतकऱ्यांनी एकत्र येत गटाची स्थापना केली आहे. या गटामध्ये शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्र, अडीअडचणी आणि त्यावरील उपायांची चर्चा केली जाते. अधिक चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेतांना भेटी देऊन माहिती जाणून घेण्यावर भर दिला जातो. गटातील नव्या शेतकऱ्यांना अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळते. सेवानिवृत्त शिक्षक श्‍यामराव शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली गटाचे काम सुरू असल्याचे धनंजय देठे यांनी सांगितले.

बहुपीक पद्धतीचा अवलंब पपई, डाळिंब, केळी, द्राक्ष या फळपिकाबरोबरच धनंजय देठे यांनी आपल्या कोरडवाहू जमिनीमधून भुईमूग, मूग, कांदा, भोपळा या पिकांची लागवड केली. केवळ एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा अधिक पिके घेतल्याने धोका विभागला जातो. डाळिंबात त्यांनी मुगाचे आंतरपीक घेतले होते. पपई बागेभोवती शेवग्याची लागवड केली आहे.

शेतकरी संपर्क - धनंजय देठे, मो.नं. 9860555893

दुष्काळी परिस्थितीत मूरघासातून केले गाईंचे पोषण

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे दुधाळ जनावरे जगवण्याचा गंभीर प्रश्‍न होता. पावसाने पाठ फिरवल्याने शेतीमध्ये पेरणी झालेली नव्हती. त्यामुळे दुधाळ गाई, म्हशी हाच आर्थिक उत्पन्नाचा स्रोत हातात शिल्लक होता. त्यांना योग्य पद्धतीने जगविणे हाच एक मार्ग शेतकऱ्यांच्या समोर होता. अशीच काहीशी परिस्थिती जळगाव (कडे पठार) जि. पुणे येथील पांडुरंग मारुतराव वाबळे यांची होती. पण परिस्थितीपुढे हतबल न होता, दुष्काळी परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी उपलब्ध पाण्यावर चारा पिकांची लागवड केली. मार्च ते मे या तीन महिन्यांसाठी दुधाळ गाईंच्या पोषणासाठी मूरघास तयार केले. यासाठी त्यांना बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.

परिस्थितीने शिकविले नवे तंत्र शेती परिस्थिती आणि गाईंच्या व्यवस्थापनाबाबत पांडुरंग वाबळे म्हणाले, की माझी दहा एकर आठमाही बागायती शेती आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून दुग्ध व्यवसाय करतो आहे. सध्या माझ्याकडे आठ होल्स्टिन फ्रिजीयन गाई आणि चार वासरे आहेत. गोठ्यातच चांगल्याप्रकारे कालवडींचे संगोपन करतो, त्यामुळे बाजारातून गाय खरेदी करावी लागत नाही. गाईंसाठी दरवर्षी खरिपामध्ये दोन एकर क्षेत्रावर मका, कडवळ, मेथीघास लागवड असते.

या वर्षी तीव्र पाणी आणि चाराटंचाई जाणवेल याची चाहूल मला सप्टेंबर महिन्यामध्ये लागली होती. आमच्याकडे जेमतेम 400 ते 500 मि.मी. पाऊस पडतो. या वर्षी थोडासाच पाऊस पडला, एकदाच काय ते ओढ्याला थोडे पाणी आले. त्यामुळे विहिरीला थोडासा पाझर राहिला. माझ्याकडे डिसेंबरपर्यंत शेतीला पुरेल एवढेच पाणी पुरणार होते. तेव्हाच मी चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन केले. कृषी विज्ञान केंद्रातर्फे गेल्या वर्षी ओढ्यातील गाळ काढल्यामुळे बंधाऱ्यात पाण्याची साठवण होऊन विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये पाच एकर रब्बी ज्वारी केली. त्याचा कडबा उपलब्ध झाला. परंतु मार्च ते मे महिन्याचा हिरव्या चाऱ्याची कमतरता जाणवणार होती. अशा परिस्थितीमध्ये जनावरांना जगवायचे कसे हा प्रश्‍न होता. या प्रश्‍नाला मला कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांकडून मूरघास करण्याचा सल्ला मिळाला.

मूघासासाठी मका लागवड माझ्याकडे आठ गाई आणि चार वासरे आहेत. प्रत्येक गाईला दररोज 20 किलो मूरघास देण्याचे नियोजन केले. त्यानुसार मला अडीच महिन्यासाठी 15 टन मूरघासाची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन मी सप्टेंबर महिन्यात तीस गुंठे क्षेत्रावर चाऱ्यासाठी मका लागवड ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राने केली. लागवडीसाठी साडेसात किलो मक्‍याचे बियाणे लागले. पेरणीपूर्वी जमिनीत शेणखत मिसळून 50 किलो युरिया आणि 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीत मिसळून दिले. त्यानंतर पेरणी केली. परत 25 दिवसांनी खुरपणी करून 25 किलो युरियाची मात्रा दिली. डिसेंबरमध्ये मक्‍याच्या कणसात दाणे भरल्यानंतर कापणी केली. 30 गुंठ्यांत 12 टन हिरवा चारा मिळाला. चारा उत्पादनाला 2400 रुपये खर्च आला.

...असा तयार केला मूरघास 1) मूरघास तयार करण्यासाठी 20 फूट लांब x 9 फूट रुंद x 5 फूट खोलीचा खड्डा करून त्यामध्ये तळाला तसेच चारही बाजूंनी प्लॅस्टिक कागद लावून घेतला. त्यामुळे मूरघासामध्ये मातीमधील कीटक येण्यास अडथळा तयार झाला.
2) खड्डा भरण्यासाठी कडबा कुट्टी यंत्र खड्याच्या कडेला आणून ठेवले. या कडबा कुट्टी यंत्राच्या माध्यमातून 12 टन कापलेला मका आणि कडवळाची कुट्टी केली. त्याचबरोबरीने तीन टन ऊस वाढे खरेदी करून त्याची मक्‍याच्याबरोबरीने कुट्टी केली.
3) दर सहा इंचाचा थर झाल्यावर एक टन कुट्टीसाठी कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेले एक लिटर सायलेज कल्चर पंधरा लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक थरावर शिंपडले. अशा पद्धतीने थरावर थर रचत खड्डा पूर्ण भरला.
4) खड्ड्याच्या वर एक फुटापर्यंत चाराकुट्टीचा थर करून त्यावरून ट्रॅक्‍टर फिरवला. त्यामुळे चाराकुट्टी खड्ड्यात चांगली दाबून बसली. हवेची पोकळी राहिली नाही. त्यानंतर प्लॅस्टिक कागद अंथरून त्यावर पाचटाचे आच्छादन करून त्यावर माती पसरून पाणी फवारले. त्यामुळे खड्डा पूर्णपणे हवाबंद झाला.
5) साधारणपणे 15 मार्चपर्यंत मूरघास चांगल्या प्रकारे तयार झाले. त्यानंतर दररोज गाईंना मूरघास देण्यास सुरवात केली.

मूरघास गाईंच्या आवडीचा... मूरघासामुळे दुधाळ गाईंना पौष्टिक चाऱ्याची सोय झाली. याबाबत वाबळे म्हणाले, की डिसेंबरनंतर काही प्रमाणात माझ्याकडे मेथी घास, वाडे, मका असा हिरवा चारा होता. मात्र मार्चपासून हिरव्या चाऱ्याची कमतरता मूरघासामधून भरून निघाली. त्यासोबत रब्बी ज्वारीचा कडबा माझ्याकडे होता. दररोज सकाळी गाईंना पाणी पाजून, प्रत्येक गाईला 15 किलो मूरघास द्यायचो. त्यामुळे दुपारपर्यंत चारा देण्याची गरज भासली नाही. मूरघासला गोड चव असल्यामुळे गाई आवडीने खातात. संध्याकाळी पाच किलो मेथी घास आणि पाच किलो कडबा कुट्टी करून देतो. दुभत्या गाईंना रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ मिळून तीन किलो खुराक देतो. मे महिन्याच्या अखेरीस मूरघास संपला. सध्या पावसास सुरवात झाल्याने चाऱ्यासाठी मका पेरला आहे. गाईंना सध्या हिरवा चारा आणि कडबा कुट्टी करून देत आहे. या वर्षी वर्षी 20 टन मूरघास करण्यासाठी पक्का हौद बांधणार आहे.

दर्जेदार दूध आणि कालवडींना मागणी दुग्धोत्पादनाबाबत वाबळे म्हणाले, की माझ्याकडे सध्या चार गाई दुधात तर चार गाई गाभण आहेत. विल्यानंतर पहिले तीन महिने दररोज सरासरी एक गाय दिवसाला 20 लिटरपर्यंत दूध देते, नंतर सरासरी 12 लिटर दूध मिळते. मूरघासामुळे दररोज एक लिटर दुधाची वाढ मिळाली. सध्या दिवसाला 50 लिटर दूध जमा होते. त्यातील 40 लिटर दूध गावातील लोक घरी येऊन घेऊन जातात. 10 लिटर दूध डेअरीला देतो. डेअरीकडून प्रति लिटर 18 रुपये तर ग्राहकांकडून 22 रुपये प्रति लिटर दर मिळतो. दुधाचा चांगला दर्जा आणि चार फॅट असल्याने ग्राहकांकडून दुधाला मागणी असते. महिन्याचा गाईंच्या व्यवस्थापनाचा खर्च वगळून सरासरी आठ हजार रुपये शिल्लक राहतात. दरवर्षी किमान 15 ट्रॉली शेणखत तयार होते. शेतीची गरज भागवून गरजेनुसार शेणखत विकतो. प्रति ट्रॉली चार हजार रुपये शेणखत विक्रीतून मिळतात. दरवर्षी दोन कालवडी विकतो. त्याचे सत्तर ते ऐंशी हजार मिळतात.

वाबळे यांनी सांगितलेले गाईंच्या व्यवस्थापनाचे मुद्दे - जनावरांच्या संख्येनुसार दरवर्षी चारा पिकांची लागवड
- गाई आणि वासरांच्या आरोग्याकडे लक्ष, वेळेवर लसीकरण, जंतनिर्मूलन महत्त्वाचे.
- गोठा दक्षिण- उत्तर बांधल्याने पूर्व- पश्‍चिमेकडून गोठ्यात ऊन येते, गोठा हवेशीर राहतो.
- गाईंची धार काढण्यापूर्वी कास स्वच्छ करावी. धार काढल्यानंतर पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार जंतुनाशकाची कासेवर फवारणी करतो. त्यामुळे कासेचे आजार होत नाहीत.
- गोठ्यातील जमीन एकसमान असावी, खड्डे नसावेत. गोठा स्वच्छ ठेवल्याने माश्‍यांचा त्रास होत नाही.
- चाऱ्यावरील खर्च कमी करण्यासाठी आणि पौष्टिक चाऱ्यासाठी मूरघास फायदेशीर.
- "केव्हीके'तील तज्ज्ञांकडून वासरू आणि कालवडींच्या व्यवस्थापनाचे सातत्याने मार्गदर्शन
- मेथी घास, मका, ज्वारी, मारवेल या चारा पिकांच्या नवीन वाणाची दरवर्षी लागवड.

संपर्क -
1) पांडुरंग वाबळे - 9960439380
2) डॉ. आर. एस.जाधव - 9422519193
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) म्हणून कार्यरत आहेत.)

सघन पद्धतीतून मिळवा दर्जेदार पेरूचे उत्पादन

जमिनीचा प्रकारानुसार लागवडीच्या अंतराचा अभ्यास करताना असे दिसून आले, की अत्यंत हलक्‍या व मध्यम जमिनीमध्ये पेरूची लागवड 7.5 x 7.5 फूट अंतरावर तर भारी जमिनीमध्ये 10 x 10 फूट अंतरावर करावी. यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते. 7.5 x 7.5 फूट अंतरावर लागवड केली तर एकरी 774 झाडे बसतात. 10 x 10 फूट अंतरावर लागवड केली तर 435 झाडे बसतात. अशा पद्धतीने लागवड केली तर एकरी 18 ते 20 टनांपर्यंत उत्पादन मिळते. प्रतीमध्ये चांगली सुधारणा होते.

1) सघन पद्धतीने लागवड केल्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पिकाला गरजेनुसार पाणी देता येते. त्यामुळे जमिनीमध्ये सतत वाफसा राहून उत्पादन आणि गुणप्रतीमध्ये वाढ होते. मिडो ऑर्चर्ड पद्धतीने कृषी विज्ञान केंद्राच्या फार्मवर उत्पादन घेतले असता बिगर हंगामी उत्पादन मिळणे शक्‍य झाले आहे.

2) मे महिन्यात एकदाच चांगली छाटणी केली तर पेरूचे चांगले उत्पादन मिळते. पेरूच्या झाडांची जास्त वाढ होत असेल, तर सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यांत वाढणार शेंडा हाताच्या साहाय्याने एकदाच काढला, तर पुढची वाढ थांबते. त्यामुळे फांदीवर फुलांची संख्या वाढते. पेरूची सर्व फळे जाड फांदी व खोडावर येत असल्यामुळे त्यांचा आकार आणि प्रतही चांगली मिळते. तसेच पेरूची काढणी करणेही सोपे जाते. झाडाची मे महिन्यात छाटणी करताना जाड फांद्या ठेवून बाकीच्या सर्व बारीक काड्या छाटाव्यात. झाडाच्या मुख्य खोडापासून आलेल्या चार ते पाच उपयुक्त फांद्या आणि त्यानंतर आलेल्या लहान फांद्या अशाप्रकारे झाडांना आकार देण्यात येतो. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर किंवा गरजेप्रमाणे पाणी दिल्यानंतर झाडांना फूट येण्यास सुरवात होते. पाण्याची उपलब्धता असेल तर लवकर छाटणी करूनही हंगामापूर्वी फळे बाजारपेठेत पाठविता येतात.

3) पाणी देण्याअगोदर शिफारशीत मात्रेमध्ये शेणखत, रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडाच्या खोडाभोवती रिंग करून द्यावेत.

4) झाडाला पालवी आल्यानंतर सुरवातीला फुले हे झाडाच्या जाड फांद्या आणि खोडावर येतात. या फळांचा आकार, वजन आणि गुणवत्ता चांगली असते. फळांची गोडी इतर लागवड पद्धतीपेक्षा चांगली असते. झाडाला भरपूर फूट येऊन पानांची संख्या चांगली मिळते. नंतरचा बहर हा नवीन आलेल्या शेंड्यांना येतो.

5) पेरूच्या पहिल्या फळांची काढणी सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये होते, तर दुसरी फळे फेब्रुवारी-मार्च किंबहुना त्यानंतरही मिळतात. फळांना चांगला बाजारभाव मिळतो.

6) फळांच्या उत्पादनानुसार झाडांना दोनदा चाळणी करावी. झाडांच्या जुन्या मुळ्या तुटून नवीन पांढरी मुळे येण्यासाठी शेत भुसभुशीत ठेवावे. आंतरमशागतीसाठी पॉवर टिलरचा वापर केल्यामुळे आंतरमशागतीच्या खर्चातही बचत होते. झाडांची उंची जास्तीत जास्त सहा ते सात फूट असल्यामुळे छाटणी, फवारणी आणि फळांच्या काढणी खर्चात बचत होते.

------------------------------------------------------
उत्तर प्रदेशामध्ये मिडो ऑर्चर्ड पद्धतीने 1 मीटर x 1 मीटर किंवा 1 मीटर x 2 मीटर अंतरावर लागवड करतात. परंतु तेथील जास्त थंड हवामान आणि उष्णता यामुळे झाडांची वाढ मर्यादित होते. आपल्या राज्यातील पेरू उत्पादन क्षेत्रामध्ये एक किंवा दोन मीटर अंतरावर लागवड केल्यानंतर वर्षातून दोन ते तीन छाटणी कराव्यात लागतात. विशेषतः भारी जमीन आणि वर्षभर पोषक वातावरणामुळे पेरूची वाढ वर्षभर सुरू असते. त्यासाठी छाटणी जास्त करावी लागते. त्यासाठी मजुरांची जास्त गरज भासते. मजुरांचा अभाव किंवा छाटणीचा होणारा जास्त खर्च याचा विचार करता आपल्याकडे 7.5 x 7.5 फूट अंतरावरील लागवड जास्त उपयुक्त दिसून आलेली आहे.
------------------------------------------------------
पारंपरिक पेरू लागवडीमधील अडचणी ः
1) पारंपरिक पेरू लागवड पद्धतीने 20x20 फूट अंतरावर लागवड केली जाते. लागवड केल्यानंतर चार ते पाच वर्षांनंतर उत्पादनास सुरवात होते. फळांच्या काढणीनंतर छाटणी केली जात नाही.
2) आज अनेक बागांमध्ये छाटणी न केल्यामुळे दाटी झालेली आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. त्यामुळे जमिनी लवकर वाफसा स्थितीत येत नाही.
3) पारंपरिक पाणी व्यवस्थापन पद्धतीमध्ये झाडाभोवती आळे तयार करून जास्त प्रमाणात पाणी दिले जाते. पाणी देण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतरही कमी असते. त्यामुळे बागेमध्ये ओलावा आणि आर्द्रता वाढल्यामुळे फळमाशीचे प्रमाण वाढते.
4) झाडांना शेणखत किंवा सेंद्रिय खतांचा वापर कमी करून रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे जमिनीतील सामू-क्षारांचे प्रमाण वाढते व पांढरी मुळे जास्त वाढत नाहीत. परिणामी, फळांचा आकार वाढत नाही आणि फळे लवकर पक्व होऊन गळतात.
5) बागेत गळालेली फळे उचलली जात नसल्यामुळे फळमाशीचे प्रमाण वाढते. झाडांचा आकार आणि उंची वाढल्यामुळे फळे काढणेही अवघड जाते. तसेच पीक संरक्षण करण्यासाठी फवारणी करणेही शक्‍य होत नाही.
6) झाडांचा आकार मोठा असल्यामुळे छाटणी करणे अवघड असल्यामुळे मजुरी जास्त लागते. त्यामुळे अनेक बागांची छाटणी होत नाही.
7) बागेमध्ये सूत्रकृमीचे प्रमाण वाढत आहे. तसेच फळमाशी, शेंडेअळीचे प्रमाण वाढून झाडांची मर वाढत आहे. उत्पादनात घट येत असताना मिळालेल्या फळांची गुणवत्ता कमी होत आहे.
------------------------------------------------------

संपर्क ः 02422- 252414
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर, जि. नगर येथे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

Tuesday, 9 July 2013

कंपोस्टसाठी उपयोगी पालापाचोळा...

पिंपळ ः पाण्याचा ताण सहन करणारा हा वृक्ष आहे. या वृक्षाची मुळे खूप खोलवर गेलेली असतात. खोल जमिनीतून पाणी आणि सूक्ष्म द्रव्यांचा पुरवठा या मुळांद्वारे होत असतो. पानांत ही द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. याच्या पानांतून चीक निघतो. त्यामध्ये पोटॅशचे प्रमाण चांगले असते. या पानांचा वापर कंपोस्टमध्ये केल्यास पोटॅश विघटन करणारे जिवाणू पोसले जातात. पानांत कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते, ते रोपांना उपलब्ध अवस्थेत असते. शिवाय पानांच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारचे सूक्ष्म जिवाणूही असतात. पिंपळाला ऐन वैशाखात नवी पालवी येते. कोवळ्या पानांत आणि कोंबामध्ये "ऑक्‍झिन' हे संजीवक असते. त्याने पेशी विभाजनास चालना मिळते.
रुईची पाने ः ही झुडपेसुद्धा खूप खोलवरून पाणी आणि अन्न मिळवतात.
समुद्री शेवाळ ः समुद्र शेवाळ्यामध्ये 90 पेक्षा जास्त मूलद्रव्ये असतात. त्यात खनिजे, वाढ संप्रेरके, मौल घटक, जीवनसत्त्वे, संजीवके आणि प्रथिने असतात. तसेच लोह, चुना, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि आयोडीनचा समावेश असतो. ती सारी रोपांना उपयुक्त अवस्थेत आणून सोडणाऱ्या आपापल्या प्रांतातील वेगवेगळ्या जिवाणूंच्या पैदाशीसाठी उपयुक्त ठरतात.
लसूण घास ः यामध्ये खनिजे, वाढ संप्रेरके, मौल घटक व संजीवके असतात. मुळांच्या वाढीसाठी आणि एकूण रोपांच्या वाढीसाठी ती उपयुक्त असतात. त्यामध्ये सूक्ष्म द्रव्यांचे प्रमाणही भरपूर असते. एकूण रोपांच्या वाढीसाठी ती उपयुक्त असतात. त्यामध्ये सूक्ष्म द्रव्यांचे प्रमाणही भरपूर असते. ही सारी रोपांना उपयुक्त अवस्थेत आणून सोडणाऱ्या वेगवेगळ्या जिवाणूंच्या पैदाशीसाठी उपयुक्त ठरतात.
शेवग्याची पाने ः याच्या पाल्यात कॅल्शिअम, लोह, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. अमिनो ऍसिड्‌स, जीवनसत्त्वे, वितंचकांचे चांगले प्रमाण यामध्ये आहे.
* हिरवे गवत ः नत्र आणि सिलिकाचे प्रमाण वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. या दोन्ही गोष्टी स्थिर करणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढते.
भाताचे तूस ः मुख्यतः सिलिका हे द्रव्य जमिनीत मोठ्या प्रमाणावर असते, परंतु ते रोपांना मिळत नाही. भाताच्या तुसातील आणि कडातील सिलिका मात्र रोपांना उपलब्ध अवस्थेत असतो. रोपांच्या वाढीत सिलिकाचा सहभाग नगण्यच असतो. मात्र त्यामुळे रोपातील रोग प्रतिकारशक्ती वाढते.
जिप्सम ः यात कॅल्शिअम 18 ते 23 टक्के आणि गंधक 15 ते 19 टक्के असतो. कंपोस्ट खत निर्मितीमध्ये जिप्सम वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे यामुळे गंधकाचे विघटन करणारे जिवाणू वाढतील. शक्‍यतो नैसर्गिक जिप्सम वापरावे.
* लाकडी कोळसा ः जिवाणूंच्या प्रक्रियेतून सुटी होणारी पोषक द्रव्ये कोळसा साठवून ठेवतो. हवा, पाणी, विषारी द्रव्ये यांचा मोठा संग्रह करून जपून ठेवतो. कोळसा जिवाणूंचे आश्रयस्थान बनतो.
* बोन-मिल ः प्रत्यक्ष कंपोस्ट बनविण्यात याचा सहभाग शून्य असतो. मात्र त्याच्या कणाभोवती पालाश आणि चुना (कॅल्शिअम) पचवणारे जिवाणू-बुरशी वगैरेंच्या वसाहती तयार होतात.
* वाळलेले गवत (किंवा कडबा) ः कंपोस्टमधील नत्र आणि कर्बाचे प्रमाण राखण्याचे महत्त्वाचे काम करते.
*शेत-माती ः रचण्यात आलेल्या कंपोस्ट खड्ड्यात खनिजांशिवाय नुसत्या पालापाचोळ्याला काहीच महत्त्व नसते. खनिजे नसतील तर जिवाणू कार्यरत होत नाहीत. या मातीतून मुख्यत्वे खनिजांचा पुरवठा होतो.
* काड्या-काटक्‍या/लाकडी भुसा ः बाभळ, आंबा, वड, पिंपळ, बोर यासारख्या गोड झाडाच्या पेन्सिल एवढ्या किंवा त्यापेक्षा बारीक वाळलेल्या काटक्‍यांचे साधारण 25 मि.मी.चे तुकडे दोन ते पाच किलो या प्रमाणात वापरावेत.

शेतावरच तयार करा कंपोस्ट खत

पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आपली जमीन संतुलित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुपीक माती रोपास आवश्‍यकता असेल त्या वेळी आणि लागेल तेवढी पोषक द्रव्ये उपलब्ध करून देते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी कंपोस्ट खताचा वापर महत्त्वाचा आहे. कंपोस्ट शक्‍यतो शेतावरच तयार करावे. कंपोस्ट बनवणे ही कला आहे. मी चिन्मय कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत तयार केली आहे. खनिजे, वाढ संप्रेरके, मौल घटक, जीवनसत्त्वे, संजीवके आणि प्रथिने वगैरे रोपांना उपलब्ध अवस्थेत मिळवणे हा या कंपोस्ट खताचा दुय्यम उद्देश आहे. बुरशी, मोल्ड, यीस्ट, ऍक्‍टिनोमायसेट्‌स, गांडुळे वगैरे मित्रजिवाणू आणि जीव मिळवणे हा मुख्य उद्देश आहे.

असे तयार करा चिन्मय कंपोस्ट : प्रत्यक्ष कंपोस्ट लावण्याच्या चार दिवस अगोदर सात घमेली गाईचे शेण, तीन घमेली शेळी आणि मेंढीच्या लेंड्या गोळा कराव्यात. लेंड्या फोडून शेणात मिसळाव्यात. एका पिंपात 60 लिटर पाणी घेऊन त्यात अर्धा किलो गूळ विरघळवून घ्यावा. नंतर त्यात शेण-लेंड्यांचे मिश्रण घालून ढवळावे. ढवळण्याचा क्रम दिवसातून तीन वेळा शेवटपर्यंत राखावा.

गाईचे शेणखत, शेळ्या- मेंढ्यांच्या लेंड्या वापराचे प्रमुख कारण म्हणजे गाय सर्वसाधारणपणे गवत खाणे पसंत करते. शेळ्या मिळेल त्या वनस्पती ओरबाडून खातात, तर मेंढ्या जमिनीलगतचे पिकाचे सुके- ओले अवशेष, खुरटे गवत, बाभळीच्या शेंगा खातात. प्रत्येक प्राण्याच्या पोटात हे पदार्थ पचवणारे वेगवेगळे जिवाणू असतात. यामुळे आपल्या कंपोस्टला विभिन्न प्रकारच्या जिवाणूंचा पुरवठा होतो. सर्वच जिवाणू महत्त्वाचे आहेत, त्यातल्या त्यात सिक (सिलिका) पचवणारे जिवाणू सर्वांत महत्त्वाचे, ते मेंढीच्या लेंडीतून मिळतात.

गुळामुळे उपयुक्त जिवाणू, बुरशी आणि किण्वक (यीस्ट) यांच्या वाढीस चांगलीच चालना मिळते. यीस्टच्या चर्वणातून थोड्या प्रमाणात अल्कोहोल तयार होते.
कंपोस्टसाठी घटक :
पिंपळाची पाने - 15 टक्के (त्यातही 15 ते 20 टक्के कोवळी पाने असावीत), रुईची पाने - 5 टक्के, लसूणघास - 10 टक्के, शेवग्याची पाने - 15 टक्के, हिरवे गवत - 5 टक्के, भाताचे तूस - 15 टक्के, वाळलेले गवत (किंवा कडबा) - 35 टक्के
वरील टक्केवारी केवळ मार्गदर्शक आहे. त्याव्यतिरिक्त आणखी घटक घ्यावेत. यामध्ये केल्प (समुद्री शेवाळाची भुकटी) प्रत्येक टनास अर्धा किलो, बोनमील प्रत्येक टनास दोन किलो, बोरिक पावडर प्रत्येक टनास 20 ग्रॅम फक्त, जिप्सम प्रत्येक टनास 50 ग्रॅम फक्त,
लाकडी कोळसा प्रत्येक टनास 15 ते 20 किलो (कोळशाचे पाच ते दहा मि.मी. एवढे तुकडे/ चुरा घ्यावा). हिरव्या पालापाचोळ्यासाठी वड, शेवगा, हादगा, गिरिपुष्प, धैंचा, ताग, अझोला यांचा वापर करता येतो.

मी जमिनीत खड्डा करून त्यात कंपोस्ट लावणे पसंत करतो, कारण खड्ड्याच्या भिंतींमुळे कंपोस्टमध्ये बराच काळ वाफसा स्थिती राहते, पाणी कमी लागते, वाऱ्यामुळे आणि जनावरांच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान टाळता येते. खड्डा एक मीटरपेक्षा जास्त खोल नसावा. रुंदी दीड मीटर आणि लांबी आपल्याकडे असणाऱ्या कच्च्या मालाप्रमाणे ठेवावी. ती दीड मीटरपेक्षा कमी नसावी. जेवढे खड्डे भरायचे, त्यापेक्षा एक खड्डा जास्त खोदायचा. त्यामुळे कंपोस्ट पालटणे सोपे होते. दुसरा पर्याय आहे तो नॅडप पद्धतीच्या टाक्‍या बांधून त्यात कंपोस्ट लावायचे. यात मुख्यतः वायुविजनावर भर असतो. या पद्धतीने कंपोस्ट लवकर तयार होते.

अर्धबंदिस्त शेळीपालनच फायदेशीर

शेळी द्विदल चारा जास्त पसंत करते. झाडाझुडपांत असलेले टॅनिन व विषारी घटक शेळी चांगल्या प्रकारे पचवू शकते. कडू चव सोसण्याची शेळीची ताकदही जास्त आहे. शेळीची महत्त्वाची सवय म्हणजे इतरत्र फिरून मिळेल ती झाडेझुडपे यांचे शेंडे ओरबाडून खाणे, शेळी आपली 60 ते 70 टक्के भूक ही पाला ओरबाडून भागवते. महत्त्वाची बाब म्हणजे इतर जनावरांच्या तुलनेत शेळ्यांद्वारे तयार होणारे मिथेनचे प्रमाण सर्वांत कमी आहे. शेळी इतरत्र फिरून सर्व प्रकारच्या झाडाझुडपांचे शेंडे खात असल्याने तिचे दूध औषधी आहे. आम्लपित्त, जठरातील व्रण, उच्च रक्तदाब, त्वचेचे विकारावर उपचारासाठी हे दूध वरदान आहे. मातेच्या दुधाला पर्याय म्हणूनही शेळीचे दूध हे सर्वश्रेष्ठ आहे. शेळ्यांचे जुळी करडे देण्याचे प्रमाण हे सरासरी 30 ते 40 टक्के असून, काळ्या बंगालीसारख्या काही जातींमध्ये 70 ते 80 टक्के एवढे जुळ्यांचे प्रमाण आढळते. शेळ्यांचे मांस हे कमी चरबी असलेले आहे.

सर्वसाधारणपणे विक्रीचा दर ठरविताना बाजारातील मटणाचा दर व करड्यांचे वजन यांची सांगड घातली जाते. ढोबळमानाने करडांचा विक्रीदर ठरवावयाचा झाल्यास मटणाचा दर = (करडाचे वजन x 2) या सूत्राने मटणासाठीच्या करडांचा दर निश्‍चित करता येईल. सद्यःस्थितीत मटणाचा दर प्रति किलो 300 रुपये एवढा जरी गृहीत धरला. करडांचे वजन 15 ते 20 किलो धरल्यास करडांचा विक्री दर हा रु. 150 ते 175 रुपये प्रति किलो वजन असा येतो. मात्र बंदिस्त शेळीपालनाचा अवलंब करून शेळीपालन व्यवसाय करणारे प्रकल्प 300 ते 700 रुपये प्रति किलो या दराने विक्री करतात. त्यामुळे प्रथमदर्शी बंदिस्त शेळीपालन फारच किफायतशीर वाटते. मात्र या प्रकल्पाद्वारे विकण्यात येणारी शेळी किंवा बोकड हे पैदाशीसाठी विकले जातात, मटणासाठी नाही. ही मुख्य बाब बरेच शेतकरी लक्षात घेत नाहीत. कालांतराने त्यांचा व्यवसाय तोट्यात जाण्याची शक्‍यता असते.

शेळीपालन हे प्रामुख्याने मोकाट शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन आणि बंदिस्त शेळीपालन शेळीपालन या तीन पद्धतीने केले जाते. या तिन्ही पद्धतींचा बारकाईने अभ्यास केल्यास चराऊ/ मोकाट पद्धतीने शेळीपालन करणे हे अत्यंत फायदेशीर आहे. त्याखालोखाल अर्धबंदिस्त शेळीपालन जेथे चराऊ कुरणांचा तुटवडा आहे, त्या ठिकाणी फायदेशीर आहे.

चराऊ पद्धतीने शेळीपालन - या पद्धतीमध्ये शेळ्या दिवसभर (सहा ते सात तास) मुक्तपणे चरण्यासाठी सोडल्या जातात. मोठे कळप असल्यास शेळीपालक स्वतः शेळ्या चारून आणतात. तर काही गावांमध्ये गावातील सर्व शेळ्या एकत्र करून एखाद्या व्यक्तीस शेळ्या चारून आणण्याचे काम मोबदला देऊन करून घेतले जाते. या पद्धतीने शेळ्या पाळण्यास त्यांच्या आहारावर काहीही खर्च होत नाही. तसेच त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार ते विविध प्रकारचा झाडपाला गवत तिच्या मनाप्रमाणे खाते आणि त्याचा चांगला परिणाम तिच्या शरीरवाढीवर दिसून येतो. तसेच अशा शेळ्यांचे दुधात औषधी गुणधर्मही दिसून येतात.

अर्धबंदिस्त शेळीपालन - बऱ्याचदा अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त शेळीपालन याबाबत शेतकरी संभ्रमात असल्याचे दिसून येते. बंदिस्त शेळीपालन म्हणजे बंदिस्त गोठ्यात ठेवलेल्या शेळ्या किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे गोठ्याची भिंत अर्धी बांधून वरती जाळी लावलेल्या गोठ्यात ठेवलेल्या शेळ्या असा शेतकऱ्यांचा समज असतो. अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे चराऊ कुरणांचे उपलब्धतेनुसार शेळ्यांना पाच ते सात तास बाहेर चारून संध्याकाळी गोठ्यात आल्यावर थोडाफार चारा तसेच पूरक आहार देऊन शेळीपालन करणे. या पद्धतीमध्ये शेळ्यांचा आहारावरचा खर्च 60 ते 70 टक्के कमी होतो. बागायती भागात जेथे चराऊ कुरणांचा तुटवडा आहे तेथे हे शेळीपालन शक्‍य होते.

अर्धबंदिस्त शेळीपालन ठरते फायदेशीर - किफायतशीर शेळीपालनासाठी अर्धबंदिस्त शेळीपालन त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेळीपालनासाठी कुरण उपलब्ध आहे, त्या ठिकाणी चराऊ पद्धतीने शेळीपालन करण्याची शिफारस केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या संशोधनातून असे दिसून आले, की सर्वांत जास्त नफा 453.81 रुपये प्रति शेळी, प्रति वर्ष चराऊ पद्धतीत दिसला. त्यानंतर 208.12 रुपये प्रति शेळी, प्रति वर्ष एवढा अर्धबंदिस्त पद्धतीत नफा दिसून आला. मात्र बंदिस्त शेळीपालनामध्ये 620.53 रुपये प्रति शेळी, प्रति वर्ष एवढा तोटा दिसून आला आहे.

वीस शेळ्या आणि एक बोकड अशा कळपावरील खर्च आणि उत्पन्न - अ) मोकाट/ चराऊ पद्धत -
शेळ्यांचा कळप मोकाट/ चराऊ पद्धतीने पाळल्यास चाऱ्यावर होणारा खर्च पूर्णतः कमी होईल. मोकाट/ चराऊ पद्धतीने शेळी सांभाळल्यास खेळत्या भांडवलापोटी खालीलप्रमाणे खर्च होईल.

खेळते भांडवल -
अ. क्र. तपशील दर रक्कम रु.
1) औषधोपचार 21 शेळ्यांसाठी रु. 500 प्रति शेळी प्रति वर्ष = 500 x 21 = 10,500.00
2) मजुरी खर्च 1 मजूर x 150 रु. प्रतिदिन x 365 दिवस = 54,750.00
3) इलेक्‍ट्रिसिटी, पाणी इ. खर्च प्रति वर्ष 15,000.00
एकूण खर्च रु. 80,250.00

लेंडीखताचे उत्पन्न -
तपशील उत्पन्न रु.
एक शेळीपासून प्रतिदिन 0.5 कि.ग्रॅ. लेंड्या याप्रमाणे एका शेळीचे एका वर्षातील लेंडीखताचे साधारणपणे उत्पादन 182.5 किलो, 182.5 x 21 शेळ्या = 3832 किलो x दर रु. 3/- प्रति किलो या दराने 11,496.00

अ. क्र. जमाखर्च -
अ. क्र. तपशील रक्कम (रु.)
1) करडांचे उत्पन्न 1,20,000.00
2) लेंडी खताचे उत्पन्न 11,496.00
3) एकूण खेळते भांडवल 80,250.00
4) एकूण उत्पन्न 1,31,496.00
एकूण नफा (एकूण उत्पन्न - खेळते भांडवल) 51,246.00

निष्कर्ष - मोकाट पद्धतीने शेळ्या पाळल्यास आपल्याला रु. 51,246 रुपये एवढा नफा मिळेल.

मोकाट/ चराऊ पद्धतीने पाळण्यातील मुख्य अडचण म्हणजे चराऊ रानांची कमतरता, इतर पिकांना होणारा उपद्रव, त्याचबरोबर चराऊ रानांच्या गुणवत्तेत झालेली घट यामुळे चराऊ पद्धतीने शेळ्या पाळणे किफायतशीर असून देखील अंगीकारणे काहीसे कठीण आहे. या दोन पद्धतींचा सुवर्णमध्य साधून किफायतशीर शेळीपालन करायचे ठरल्यास अर्धबंदिस्त शेळीपालन पद्धतींचा अवलंब करावा लागेल.

ब) अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन -
खेळते भांडवल -
अ. क्र. तपशील दर रक्कम
1) हिरवा चारा प्रति शेळी 1 कि. ग्रॅ. x 21 शेळ्या = 21 कि. ग्रॅ. x दर रु. 2.50 प्रति कि. ग्रॅ. = 52.50 x 365 दिवस = 19,162.00
2) पशुखाद्य 21 x 200 ग्रॅम पशुखाद्य प्रतिदिन = 4.2 कि. ग्रॅ. x 365 दिवस = 1533 कि. ग्रॅ. x रु. 12 प्रति कि. ग्रॅ. = 18,396.00
एका करडासाठी सरासरी 80 ग्रॅम पशुखाद्य प्रतिदिन याप्रमाणे 45 करडांना 100 दिवसांसाठी 360 कि. ग्रॅ. पशुखाद्य लागेल. 360 x रु. 12 प्रति कि. ग्रॅ. = 4,320.00
3) औषधोपचार 21 शेळ्यांसाठी रु. 500 प्रति शेळी प्रति वर्ष = 500 x 21 10,500.00
4) मजुरी खर्च 1 मजूर x 150 रु. प्रतिदिन x 365 दिवस 54,750.00
5) इलेक्‍ट्रिसिटी, पाणी इ. खर्च प्रति वर्ष 15,000.00
एकूण खर्च रु. (ब) 1,22,128.00

लेंडी खताचे उत्पन्न -
तपशील उत्पन्न
1 शेळी प्रतिदिन 1.0 कि. ग्रॅ. लेंड्या एका शेळीचे एका वर्षातील लेंडीखताचे साधारणपणे उत्पादन 365 किलो, 365 x 21 शेळ्या = 7665 किलो. 40 करडांपासून 6 महिन्यात लेंडीखताचे साधारणपणे उत्पादन 1750 किलो एकूण 9415 किलो लेंडीखत x दर रु. 3/- प्रति कि. ग्रॅ. या दराने 28,245.00
एकूण रु. 28,245.00

जमा खर्च -
अ. क्र. तपशील रक्कम (रु.)
1) करडांचे उत्पन्न 1,20,000.00
2) लेंडीखताचे उत्पन्न 28,245.00
3) एकूण खेळते भांडवल 1,22,128.00
4) एकूण उत्पन्न 1,48,245.00
एकूण नफा (एकूण उत्पन्न -खेळते भांडवल) 26,117.00
म्हणजेच अर्धबंदिस्त पद्धतीने शेळ्या पाळल्यास 26,117 रुपये एवढा नफा मिळेल.

टीप - उपलब्ध साधनसामग्री व शेळीपालनाच्या पद्धती यांची सांगड घालून शेळीपालन किफायतशीर पद्धतीने करावयाचे झाल्यास जेथे शक्‍य आहे, तेथे चराऊ किंवा मोकाट पद्धतीने शेळीपालन करावे. चराऊ कुरणांची कमतरता असल्यास शेळीपालनासाठी अर्धबंदिस्त शेळीपालन पद्धतीचा वापर करावा.

बंदिस्त शेळीपालनामधील अडचणी - 1) करडांमध्ये हगवणीचे प्रमाण वाढते. करडांकडे वैयक्तिक लक्ष न दिल्यास करडांची वाढ खुंटते.
2) करडांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त दिसून येते.
3) गोठ्यामध्ये ओल राहिल्यास आजाराचे प्रमाण वाढते. पाणी व खाद्यमार्फत आजाराचा प्रसार झपाट्याने होतो.
4) बाह्य परोपजीवी उदा. गोचीड, पिसवांचे प्रमाण वाढून औषधोपचारांचा खर्च वाढतो.
7) मजूर, आहारावरील खर्च वाढतो. चाऱ्याची नासधूस जास्त होते.
9) भांडवली खर्च उदा. गोठ्यावरील खर्च, वीज, इत्यादी सुविधा यावरील खर्च वाढतो.

संपर्क - दिनेश बिरारी - 9421274742
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

शेतावरच तयार करा एक डोळा ऊस रोपे

ऊस रोपे लागणीचे फायदे - 1) एक ते दीड महिन्यापर्यंत रोपे शेताबाहेर (ट्रेमध्ये/ पिशवीत) वाढत असल्यामुळे या काळात जमिनीस विश्रांती मिळते. या काळात हिरवळीच्या खताचे पीक घेण्यास किंवा शेतातील पिकाच्या काढणीस अवधी असल्यास रोपे लागण करून हंगाम साधता येतो.
2) काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसाने वाफसा नसल्याने वेळेवर लागण करता येत नाही, अशा वेळेस ऊस रोपे लागण करून वेळेवर हंगाम साधता येतो.
3) सर्व रोपांना सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी आणि वाढीचे इतर घटक योग्य व सारख्या प्रमाणात मिळाल्यामुळे सर्व उसांची वाढ एकसारखी (ऊस संख्या एकरी 45 ते 50 हजार) होऊन फुटव्यांची मर कमी होते, उत्पादनात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ होते.
4) क्षारपड जमिनीत रोपांची लागण केल्यास रोपांचा वाढीचा जोर चांगला राहून वाढ चांगली राहते.
5) लागवड केलेल्या उसातील नांग्या भरण्यासाठी किंवा खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी रोपांचा वापर फायदेशीर असतो.
6) नवीन वाण प्रसारित झाल्यावर बेणे कमी असल्यास रोपे तयार करून लागवड केल्यास कमी बेण्यापासून जास्त क्षेत्रावर नवीन वाणाची लागवड करता येते. नवीन जातीचा लवकर प्रसार करता येतो. बेण्याची बचत होते.
7) रोपांची वाहतूक कमी खर्चात आणि दूर अंतरावर करता येते.
8) रोपांपासून ऊस लागवड केल्यास दोन ओळींतील अंतर जास्त ठेवता येते, त्यामुळे यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते. दोन ओळींमध्ये आंतरपिके घेता येतात.

अ) प्लॅस्टिक ट्रेमध्ये एक डोळा ऊस रोपे निर्मिती - जागेची निवड -
ऊस रोपे तयार करण्यासाठी पाणथळ, वाळवीचा प्रादुर्भाव असलेली जागा निवडू नये. वर्षभर पाण्याची सोय असावी. ऊन, वारा व जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी जागेवर शेडनेट गृह साधारणपणे रोपांच्या प्रमाणानुसार तयार करावे. एक आर शेडनेट गृहात 2.00 x 1.5 फुटाचे 42 कपांचे प्लॅस्टिक ट्रे वापरल्यास 45 दिवसांत अंदाजे 10,000 रोपे तयार करता येतात.
साहित्य -
1) प्लॅस्टिक ट्रे - 360 मि.मी. x 560 मि.मी. x 70 मि.मी., 42 कप, वजन - 160 ग्रॅम.
2) कोकोपीट  चांगले कुजलेले, पीएच - 6.5 ते 7.5, निर्जंतुक, कर्ब - नत्र गुणोत्तर 20:1, ईसी 600-700(micromohs)
3) रोपे वाहतुकीसाठी प्लॅस्टिक क्रेट्‌स - 60 सें.मी. x 40 सें.मी. x 22 सें.मी., वजन प्रति कॅरेट 1.620 किलोग्रॅम.
4) पाणी देण्यासाठी झारी, रबरी पाइप व शॉवर किंवा सूक्ष्म तुषार संच, पाण्याची टाकी इत्यादी.
5) सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, कार्बेन्डाझिम, ऍसिटोबॅक्‍टर, थायमेट इत्यादी.

बेणे निवड - रोपवाटिकेसाठी बेणे मळ्यातील नऊ ते 11 महिने वयाचे, सुधारित जातीचे शुद्ध, जाड, रसरशीत, लांब कांड्यांचे, निरोगी बेणे वापरावे. बेणे तोडल्यापासून शक्‍यतो 24 तासांच्या आत त्याची लागवड करावी.

प्लॅस्टिक ट्रेमध्ये एक डोळा ऊस लागण - प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात, त्यासाठी ऊस लागणीअगोदर एक महिना ट्रेमध्ये रोपे तयार करावीत.
1) बेणेमळ्यातील बेणे आणल्यानंतर एक इंच लांबीचे एक डोळ्याचे तुकडे करावेत.
2) एक डोळ्याचे तुकडे पाच ते दहा मिनिटे 0.1 टक्का कार्बेन्डाझिमच्या (10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम) द्रावणात बुडवून नंतर ते सावलीत सुकवावेत.
3) बेणे थोडे सुकल्यानंतर जिवाणूसंवर्धनाची बेणेप्रक्रिया करावी, त्यासाठी 10 लिटर पाण्यात एक किलो ऍसिटोबॅक्‍टर + एक किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.) + 1.5 ते 2.0 किलो शेण मिसळून त्यात 30 मिनिटे बेणे बुडवून नंतर पाच मिनिटे सावलीत सुकवून ट्रेमध्ये लागवडीसाठी वापरावे.
4) 25 किलो कोकोपीटमध्ये साधारणपणे दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट + एक किलो युरिया चांगले मिसळून ते प्लॅस्टिक ट्रेमध्ये कपात एकतृतीयांश भरून घ्यावे. नंतर त्यावर एक डोळा कांड्या ठेवाव्यात. त्यावर पुन्हा कोकोपीट टाकून ट्रे पूर्ण भरून घ्यावेत.
5) प्लॅस्टिक ट्रे ठेवताना त्याखाली जमिनीवर थायमेट टाकावे.
6) ऊस लागण झाल्यावर गरजेनुसार झारीने अथवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे.
7) रोपांना दोन- तीन पाने आल्यानंतर शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर शेतात लागणीसाठी वापरावीत.

ब) प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करणे - प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करण्यासाठी एक मीटर रुंद आणि रोपांच्या संख्येनुसार पाच ते दहा मीटर लांब आकाराचे वाफे तयार करावेत. एक ब्रास पोयट्याची माती, चांगले कुजलेले शेणखत (3-1) या प्रमाणात घेऊन यामध्ये 25 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून चांगले मिश्रण करावे. हे मिश्रण 5 बाय 7 इंच आकाराच्या व बाजूने पाच- सहा छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरावे. पिशवीचा वरचा एक ते दीड इंच भाग पाणी देण्यासाठी मोकळा ठेवावा. पिशव्या झारीच्या किंवा पाइपच्या साह्याने चांगल्या भिजवून घ्याव्यात.
एक डोळा ऊस लागण करणे -
8) रासायनिक कीडनाशक आणि जिवाणूसंवर्धकाची बेणेप्रक्रिया केलेले ऊस बेणे पिशवीत लागणीसाठी वापरावे. डोळा असलेला भाग पिशवीत वरच्या बाजूस राहून कांडीचा सर्व भाग मातीखाली झाकला जाईल याची काळजी घ्यावी. या पिशव्यांना गरजेनुसार झारीच्या अथवा पाइपच्या साहाय्याने किंवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे. रोपांना दोन ते तीन पाने आल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. एक ते दीड महिन्यानंतर रोपांना तीन ते चार हिरवी पाने आल्यानंतर शेतात लागवड करावी.

शेतात ऊस रोपांची लागण - 1) साधारणपणे 30 ते 45 दिवसांची रोपे शेतात लागवडीस वापरावीत.
2) रोपांची लागवड शक्‍यतो दुपारनंतर करावी.
3) रोपांसाठी दोन ओळींतील अंतर भारी जमिनीत चार ते पाच फूट व दोन रोपांतील अंतर दोन ते 2.5 फूट ठेवावे. काही ठिकाणी पाच ते सात फूट अंतर ठेवूनही एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मात्र, त्यासाठी पीक व्यवस्थापन वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे.

ठिबक सिंचनाचा वापर करताना दोन ओळींतील अंतर व आंतरमशागतीची पद्धत अ. नं. दोन सरीतील अंतर रोपातील अंतर कुठे वापरात आणावी एकरी लागणारी ऊस रोपे
1) 4 फूट 2 फूट पॉवर टिलरने आंतरमशागत 5,550
2) 5 फूट 2 फूट मिनी ट्रॅक्‍टरने आंतरमशागत 4,450
3) 6 फूट 2 फूट कमी रुंदीचा ट्रॅक्‍टर आंतरमशागत 3,700
4) 8 फूट 2 फूट नेहमीचा ट्रॅक्‍टर आंतरमशागत 2,780
5) जोड ओळ (1.2 मीटर बाय 2.5 मीटर) 2 फूट मजुरांकडून तोडणी व मिनी ट्रॅक्‍टरची मशागत 5,000


4) सरीतील अंतर पाच फुटांपेक्षा जास्त ठेवताना वेळेवर मशागत आणि इतर सर्व बाबी वेळेवर होत असतील तरच अंमलबजावणी करावी, अन्यथा पाच फुटांपेक्षा जास्त अंतर ठेवू नये. रुंद सरीचा वापर करताना पिकाकडे दुर्लक्ष झाल्यास तोटा होण्याचा जास्त संभव असतो.
5) ठिबक सिंचनावरील पिकाची मुळे जास्त खोलवर जात नाहीत, तसेच सरासरी उसाचे वजन दोन ते 2.5 किलो भरते, त्यामुळे हे पीक लोळण्याची शक्‍यता असते. जमिनीखालील (Sub Surface) ठिबक सिंचन पद्धती जास्त दिवस टिकणारी व फायदेशीर दिसून येते; मात्र यासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
6) जास्त रुंदीच्या सरीसाठी कोएम- 0265 आणि को- 86032 या जाती जास्त फुटवे येणाऱ्या असून, त्यांची निवड करावी.
7) जास्त रुंदीच्या सऱ्या वापरताना शेतकऱ्यांमध्ये शंका असते, की जास्त अंतरामुळे अपेक्षित ऊस संख्या मिळणार नाही; परंतु आपण एक डोळा रोपांची लागवड केली तर आपणास निश्‍चित अपेक्षित ऊस संख्या मिळते.


नेहमीची ऊस लागवड पद्धत व एक डोळा रोपे पद्धतीची तुलना  अ. नं. लागवडीची पद्धत अंदाजे हेक्‍टरी ऊस डोळे/ रोपे उगवण टक्केवारी उगवलेली रोपे हेक्‍टरी ऊस संख्या एका रोपापासून मिळणारी उसाची संख्या
1) एक डोळा ऊस रोपे 12,500 (1 मे. टन) ---- ---- 1,00,000 10
2) नेहमीची दोन डोळे टिपरी पद्धत 50,000 (3-4 मे. टन) 50 टक्के 25,000 80,000 3.2

नेहमीच्या पद्धतीत उगवलेले डोळे विचारात घेतल्यास एका रोपास 2.2 फुटवे मिळतात. हेच प्रमाण रोपे लागवडीत एका रोपास नऊ फुटवे मिळतात, त्यामुळे नेहमीच्या दोन डोळे टिपरी पद्धतीत गाळण्यालायक ऊस कमी मिळतात, तर रोपे लावण्याच्या पद्धतीत हेक्‍टरी गाळण्यालायक ऊस जास्त तर मिळतातच, शिवाय प्रत्येक उसाचे वजन आणि साखर उताराही जास्त मिळतो.

संपर्क - 02169 - 265334
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव,
ता. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

तुरीमधील रोगांचा प्रादुर्भाव ओळखा; वेळीच नियंत्रण करा

मर रोग - हा रोग फ्युजेरियम, ऑक्‍सिस्पोरम एफ. उडम या बुरशीपासून होतो.
लक्षणे -
1) रोगाचा प्रादुर्भाव पिकांच्या रोपावस्थेपासून ते पक्वतेपर्यंतच्या काळात केव्हाही होऊ शकतो. झाडांना कळ्या लागल्यापासून ते फुलोरा येणाऱ्या काळात त्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
2) रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथम झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजू लागतात. कालांतराने पाने पिवळी पडतात, जमिनीकडे वळू लागतात, वाळतात. पाने गळून नंतर शेवटी फक्त तूरकाठीच राहते. काही झाडांवर जमिनीपासून ते खोडापर्यंत काही फुटांपर्यंत तपकिरी व नंतर काळा होत जाणारा पट्टा स्पष्ट दिसतो.
3) मुळावर काळे डाग पडल्याचे आढळून येते. खोडाचा उभा छेद घेतल्यास त्याचा मधला भाग संपूर्ण तपकिरी काळा पडल्याचे आढळून येते. हेच या रोगाचे मुख्य लक्षण आहे. शेतात एखाद्या-दुसऱ्या झाडावर रोगाचा प्रारंभ होतो. यानंतर त्या झाडाभोवतीची झाडे रोगग्रस्त होतात, तसेच शेतात ठिकठिकाणी रोगाची लागण झालेली दिसून येते. काही झाडांवर एकाच फांदीवर रोगाची लक्षणे दिसून येतात.
प्रसार - या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त जमिनीतील बुरशी बीजाणूपासून होतो. वर्षानुवर्षे एकाच शेतात रोगाला बळी पडणाऱ्या वाणाची लागवड केल्यास जमिनीमध्ये फ्युजेरियम नावाच्या बुरशीची वाढ होऊन मर रोगाचा प्रसार होतो.
पोषक हवामान -
मर रोगाचा प्रसार हा बियाणे आणि जमिनीत सुप्त अवस्थेत असणाऱ्या बीजाणूमुळे होतो. हे बीजाणू जमिनीमध्ये वर्षानुवर्षे राहतात. जमिनीतील तापमान 25 ते 28 अंश से. ओलावा 20 ते 25 टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणावर दिसतो.
नियंत्रण -
1) पेरणीसाठी प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.(उदा. फुले राजेश्‍वरी, आय.सी.पी. 8836 (मारुती), बी.डी.एन.-1 व 2, बी.एस.एम.आर. - 736, बी.एस.एम.आर. - 853, आय.सी.पी.एल. - 87119 व बी.एस.एम.आर. - 175.)
2) उन्हाळ्यामध्ये शेताची खोल नांगरट करावी व जमीन चांगली तापू द्यावी त्यामुळे मातीतील बुरशी उष्ण तापमानामुळे नष्ट होते.
3) फेरपालटाची पिके घ्यावीत.
4) ज्वारी, बाजरी किंवा मका या तृणधान्याचा तुरीमध्ये आंतरपीक म्हणून समावेश करावा.
5) जमिनीतील मर रोगाची बुरशी कमी होण्यासाठी वर्षानुवर्षे कडधान्य घेण्याऐवजी कडधान्यानंतर तृणधान्य वर्गातील पिके घ्यावीत. उदा. ज्वारी, मका, बाजरी इत्यादी.
6) पेरणीपूर्वी बियाण्यास बेनलेट + थायरम या बुरशीनाशकाची 1 - 1 या प्रमाणात तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी किंवा बियाण्यास ट्रायकोडर्मा या परोपजीवी बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

2) वांझ रोग - हा रोग विषाणूमुळे होतो. विषाणूचा प्रसार कोळी नावाच्या कीटकामार्फत होतो.
लक्षणे -
1) रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व होण्यापर्यंतच्या काळात केव्हाही आढळून येतो. रोपावस्थेत झाडाच्या पानावर प्रथम पिवळे चट्टे पडतात. अशी पाने आकाराने लहान राहतात व कालांतराने आकसतात.
2) पाने पिवळी पडतात अशा झाडाच्या दोन पेऱ्यांतील अंतर कमी होते. त्यांना अनेक फुटवे फुटतात व झाडांची वाढ खुंटते. त्यांना फुले किंवा शेंगा येत नाहीत किंवा फार थोडी फुले व शेंगा येतात. बऱ्याच वेळा काही फांद्यांवरच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.
3) या रोगाचा प्रसार सूक्ष्म विषाणूमार्फत होतो. हे विषाणू कोळी कीटकामार्फत पसरविले जातात. रोग प्रसारक कोळी वाऱ्याच्या साह्याने रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडावर राहून नेले जातात व तेथे विषाणूचा प्रसार करतात.
4) उन्हाळ्यात आपोआप उगवलेल्या झाडावर हे कोळी तग धरून राहतात आणि पुढील हंगामात वाढणाऱ्या तुरीच्या पिकात रोगाच्या प्रसारास कारणीभूत होतात. या रोगाचा प्रादुर्भाव 45 दिवसांनंतर दिसल्यास उत्पन्नात घट येते. तुरीच्या काही जातींमध्ये उदा. आय.सी.पी. 2376 च्या पानावर वांझ रोगाचे बांगडीसारखे गोल ठिपके दिसतात.
पोषक हवामान -
वांझ या रोगाचा प्रसार कोळी या कीटकामार्फत होतो. रोगग्रस्त झाडापासून चांगल्या झाडावर रोग येण्यासाठी एक कोळी (विषाणूग्रस्त) पुरेसा आहे. किमान 20 कोळी एका झाडावर असतील तर ते झाड 100 टक्के वांझ रोगास बळी पडते. कमाल तापमान 20 ते 30 अंश से. आणि किमान तापमान 10 ते 15 अंश से. तसेच आर्द्रता 60 टक्के आणि विषाणूग्रस्त कोळी कीटकांची संख्या वांझ रोग वाढण्यास पोषक असते. जास्त पाऊस व आर्द्रता आणि कमी तापमान असल्यास रोगाचा प्रादुर्भाव होतो.
नियंत्रण -
1) पेरणीसाठी प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. (उदा. फुले राजेश्‍वरी विपुला, बहार, डी.ए. 11, बीएसएमआर - 736, बीएसएमआर - 853, आयसीपी 87119, आयसीपी 175 )
2) पेरणीपूर्वी शेतात आपोआप उगवलेली बांधावरील तसेच बहुवर्षीय तुरीची झाडे उपटून टाकावीत.
3) शेतात वेळोवेळी निदर्शनात आलेली वांझ रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
4) कोळी किडीच्या नियंत्रणासाठी एक मि.लि केलथेन किंवा मेटासिस्टॉक्‍स किंवा डायमेथोएट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मान कुजव्या रोग -
स्क्‍लेरोशियम रॉलफसाय या बुरशीपासून या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
लक्षणे -
1) रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः झाडाच्या रोपावस्थेत होतो. झाडाच्या जमिनीलगतचा भाग कुजतो व झाडाची पाने पिवळी पडतात. रोप कोलमडून अकाली मरतात.
2) ज्या ठिकाणी झाड कुजते त्या ठिकाणी प्रथम कापसासारखी बुरशीची वाढ व नंतर मोहरीसारखी बुरशीचे बीजे दिसून येतात.
3) जमिनीत जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी साठून राहिलेल्या शेतात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त जमिनीतील बुरशीमुळे होतो.
नियंत्रण -
1) जमिनीत गरजेपेक्षा जास्त ओलावा राहणार नाही अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे.
2) रोगग्रस्त झाडांचा समूळ नायनाट करावा.
3) पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची पाच ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

खोड कुजव्या - हा रोग फायटोफ्थोरा ड्रेश्‍चलेरा या बुरशीमुळे होतो. विदर्भातील काही भागातच याचा प्रादुर्भाव आढळून येतो. बरेच दिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. सध्या प्रसारित असलेले सी-11, बीडीएन-1 तसेच इतर वाण या रोगास बळी पडतात.
लक्षणे -
1) रोगाची लक्षणे फक्त झाडाच्या जमिनीलगत भागावरच आढळून येतात. जमिनीखालील खोड व मुळे यांच्यावर या रोगाचा फारसा परिणाम होत नाही.
2) या रोगात जमिनीपासून वरच्या खोडाच्या 10 ते 20 सें.मी. उंच भागावर तपकिरी व नंतर काळे होत जाणारे चट्टे पडतात. सुरवातीला ते उथळ असतात; परंतु कालांतराने ते आत दाबले जातात व खोलवर होतात. फांद्यांवरही असे चट्टे दिसतात.
3) या चट्ट्यांचा उभा छेद घेतल्यास आतील खोडाचा भाग तपकिरी किंवा काळा पडल्याचे दिसते. झाडाची पाने अत्यंत जलदगतीने वाळतात आणि वरच्या दिशेने वळतात.
4) मागील हंगामातील शेतात राहिलेली रोगग्रस्त झाडांची धसकटे व माती यापासून या रोगाचा प्रसार होतो.
नियंत्रण -
1) पेरणीसाठी रोगप्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. (आय.सी.पी. - 87119, बीडीएन - 1 व 2).
2) रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.
3) शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

डॉ. भास्करराव बारहाते - 9420639265
नारायण मुसमाडे - 9665427971
(लेखक वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

लिंबूवर्गीय पिकांतील पानगळ, मूळकूज, खोडकुजीचे नियंत्रण

बीकूज - रोपवाटिकेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोपवाटिकेमध्येच रोगाची वाढ होत असल्यामुळे अशा कलमांची लागवड मुख्य बागेत झाल्यावर अशा जमिनीत रोगाचा फैलाव जलद गतीने होतो. या सर्व रोगांचा कमी- अधिक प्रमाणात लिंबूवर्गीय फळ रोपवाटिकेत प्रादुर्भाव दिसतो. बी वाफ्यामध्ये लावताना बियांना प्रक्रिया महत्त्वाची आहे. प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. बी गादीवाफ्यावरच पेरावे. अशा वाफ्यांना सौरऊर्जेद्वारे संस्कार केल्यास जमिनीतील रोगकारक बुरशीचा नाश होतो, त्यामुळे बीकूज अत्यंत कमी प्रमाणात आढळते.

रोपे कोलमडणे - फायटोप्थोरा, पिथीयम या बुरशींमुळे रोपे कोलमडणे या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. काही वेळा 40 ते 50 टक्केपर्यंत रोपांची मर होते. रोगबाधित रोपांची जाडी डोळा बांधण्यालायक होत नाही. ही रोपे रोगप्रसारास मदत करतात.

मूळकूज - 1) या रोगाची लागण झाल्यास कलमांची पाने मलूल होतात. मुख्य शिरा पिवळ्या होतात. नंतर पूर्ण पाने पिवळी पडून गळतात. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पाने गळून रोपे- कलमे वाळतात.
2) फ्युजारियम या बुरशीमुळे रोपांची मर झाल्यास रोपे उपटून बघितल्यावर मुळांना इजा झालेली आढळत नाही; परंतु कलम चिरून बघितल्यास त्याठिकाणी काळी रेषा आढळून येते. इतर बुरशींमुळे रोपांची मुळे सडतात, त्यानंतर रोपांची मोठ्या प्रमाणावर मर होते.

उपाय योजना - 1) फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या बीकूज, रोप कोलमडणे आणि मूळकूज रोगांच्या नियंत्रणासाठी दोन ग्रॅम फोसेटील एएस किंवा दोन ग्रॅम मेटॅलॅक्‍झील अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यात मिसळून कलमांभोवती ड्रेचिंग करावे.
2) पावसाळ्यात फ्युजारियम, रायझोक्‍टोनिया बुरशींचा प्रादुर्भाव असल्यास 15 दिवसांच्या अंतराने एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण रोपाभोवती टाकावे.
3) रोगाचे नियंत्रण करण्यासाठी एक किलो ट्रायकोडर्मा 100 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून ते रोपवाटिकेतील मातीत मिसळून द्यावे.

बागेतील पायकूज आणि मूळकूज - फायटोप्थोरा बुरशीमुळे हा रोग होतो. हा रोग भारी जमीन, भरपूर पाऊस व अयोग्य निचऱ्याच्या जमिनीत दिसून येतो.
लक्षणे -
1) कलमयुतीचा भाग जमिनीलगत असल्यास किंवा जमिनीत गाडला गेल्यास तेथे रोगाचा प्रादुर्भाव होऊन तो मुख्य मुळावर व खोडावर पसरतो.
2) जमिनीलतच्या बुंध्याभोवतालची साल कुजते, त्याला आंबट वास सुटतो. रोगाचा प्रादुर्भाव जमिनीलगत किंवा खाली होत असल्यामुळे त्याला पायकूज असे म्हणतात.
3) रोगट झाडांची वाढ न होता ती लहान राहतात. अशा झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणात गळतात.
4) पाणथळ, अयोग्य निचऱ्याच्या जमिनीत किंवा दीर्घकाळ पाऊस झाल्यास मुळांना रोगाचा प्रादुर्भाव होतो.
5) तंतुमय मुळांकडून मुख्य मुळाकडे कुजण्यास सुरवात होते. मुळांची साल वेगळी न होता मुळावर अधूनमधून कुजल्याची लक्षणे दिसतात.
6) रोगग्रस्त झाडाची पाने प्रथम मलूल होऊन मुख्य शिरा पिवळ्या पडतात आणि पुढे पाने पूर्ण पिवळी होऊन गळतात. अशा प्रकारे पूर्ण झाड पर्णरहित होऊन वाळते.

उपाय योजना - 1. लागवडीसाठी 22 ते 30 सेंटिमीटर उंचीवर डोळे बांधलेली कलमे वापरावीत.
2. रोगकारक बुरशीची वाढ जमिनीत आर्द्रता असल्यास झपाट्याने होत असल्यामुळे पावसाळ्यात साचलेले जास्तीचे पाणी बागेत उताराच्या दिशेने चर काढून बागेतून काढून टाकावे.
3. झाडांना एकाच वेळी जास्त पाणी देऊ नये. पाणी नेहमी शोषक मुळांच्या परिसरातच द्यावे. ठिबक सिंचनाचा वापर करावा.
4. झाडाच्या बुंध्यास बोर्डो मलम लावावे.
5. झाडाच्या मुळ्या कुजल्यास कुजलेली मुळे खोदून त्यावर दोन ग्रॅम मॅटॅलॅक्‍झील अधिक मॅंकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यात मिसळून वाफ्यात शिंपडावे. या मुळ्या रोगविरहित जागेवरील मातीने झाकून टाकाव्यात.

पानगळ व फळकूज - 1) हा रोग फायटोप्थोरा बुरशीमुळे होतो, त्याचा प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर, सध्याचे ढगाळ वातावरण व सतत रिमझिम पाऊस यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.
2) या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कोवळी पालवी तसेच पानावर काळ्या करड्या रंगाचे, पानावर ज्या ठिकाणी पाणी थांबून राहू शकेल अशा भागावर मोठ्या आकारमानाचे डाग पडतात.
3) साधारणतः पानाच्या टोकाकडे असे डाग पडतात, देठाजवळ पाने पिवळी पडतात. पाने मोठ्या प्रमाणावर गळतात.
4) काही वेळा तर प्रामुख्याने संत्रा बागा पानेविरहित होतात. अशा बागा मुख्यतः अत्यंत भारी जमिनी, चोपण जमिनीत पाहावयास मिळतात. या बागांमध्ये मृग बहराची फळे साधारणतः वाटाण्याच्या आकाराची किंवा त्यापेक्षा लहान आकाराची असताना पूर्णतः काळी पडून गळतात. त्या गळीचे प्रमाण खूपच जलद असते. उपाययोजना न केल्यास पूर्णतः फळे गळतात.

उपाय योजना - 1. बोर्डो मिश्रण 0.6 टक्के किंवा दोन ग्रॅम मेटॅलॅक्‍झील अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 14 दिवसांनंतर दोन ग्रॅम फोसेटील एएल प्रति लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची फवारणी करावी. फवारणीच्या द्रावणात चांगल्या दर्जाचा सर्फेक्‍टंट मिसळावा.
2. ऑगस्ट महिन्यात पुन्हा 0.6 टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
3. या वर्षी ढगाळ व पावसाळी वातावरण बराच काळ राहण्याची शक्‍यता दिसते, त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा शिफारशीप्रमाणे फवारणी घ्यावी.


संपर्क - डॉ. राजेंद्र गाडे - 9850230555
(लेखक उद्यानविद्या महाविद्यालय, अकोला येथे कार्यरत आहेत.)