Thursday, 29 August 2013

पीक पोषणावर भर देत फुलवली उत्कृष्ट संत्रा बाग

यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर- तुळजापूर महामार्गापासून सुमारे पाच कि.मी. अंतरावर लोणी गाव वसले आहे. कपाशी, सोयाबीन व काही प्रमाणात ऊस परिसरात घेतला जातो. शिवारातील सुमारे 900 एकरांपैकी 200 एकरांवर संत्रा बाग आहे. देवगाव तलावातून मिळणारे कालव्याचे पाणी आणि विहीर ही भागातील सिंचनाची साधने आहेत.

लोणी गावातील रामराव राऊत यांची सात एकर शेती. पूर्वीपासून ते शेती करायचे. मात्र तेवढी ती नफ्याची होत नाही, असे वाटून किराणा दुकान सुरू केले. मात्र फायदेशीर शेतीसाठी त्यांनी पुन्हा मानसिकता तयार केली. किराणा व्यवसायातून निवृत्ती पत्करल्यानंतर संत्रा पीक लागवडीचा निर्णय घेतला. विहीर खोदून सर्वप्रथम पाण्याची सोय केली. गावालगतच्या तीन एकरांवर संत्रा लावला. बाग फळावर येण्यापूर्वी सोयाबीनचे आंतरपीक घेतले. गाव शिवारातच अन्य चार एकर कोरडवाहू शेतीत ते सोयाबीन व तूर घेतात.

संत्रा बाग लागवड सन 2002 मध्ये पावसाळी हंगामात 18 x 18 फूट अंतरावर 375 झाडांची लागवड केली. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजनाघाट येथून नागपुरी वाणाची कलमे आणली. दोन वर्षे "गॅप फिलिंग' (खाडे भरणे) यापैकी 350 झाडे सध्या जिवंत आहेत. पाण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था आहे. 40 हजार रुपये खर्चून शेताला तारेचे कुंपण केले आहे. फळधारणा झाल्यावर झाडाला आधार देण्यासाठी 60 हजार रुपये खर्चून बांबूंची सोय केली आहे. ठिबक आणि कलमांसाठी शासकीय अनुदानाची थोडी मदत मिळाली आहे.

तंत्रज्ञान वापर वैशिष्ट्ये - -सेंद्रिय पद्धतीच्या खत व्यवस्थापन व बागेच्या स्वच्छतेवर भर.
एकरी पाच ट्रॉली शेणखताचा वापर. सर्व शेणखत विकत घेतले जाते. उन्हाळ्यात बागेची नांगरणी करण्यापूर्वी शेणखत पसरवून दिले जाते. रासायनिक खतांचा वापर पूर्ण बंद केला आहे.

झाडाचे पोषण करण्याकडे विशेष लक्ष -मृग बहर का?
* फळगळ कमी होते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
* मे महिन्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. त्यामुळे कमी पाण्यात व्यवस्थापन करता येते
* फळाचा दर्जा चांगला, त्यामुळे दर चांगले मिळतात.

पीक संरक्षण - सायट्रस सायला, फायटोप्थोरा, खोडकीड व डिंक्‍या आदी किडी-रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो. वेळच्यावेळी कीडनाशकांची फवारणी करून नियंत्रण. किडींच्या (स्थानिक भाषेत डास) नियंत्रणासाठी लिंबाच्या पानाचा धूर, प्रकाश सापळ्यांचा वापर. झाडाचे आरोग्य राखण्यासाठी द्रवरूप खतांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर. बोर्डो पेस्टचा वापर होतो. दरवर्षी जून महिन्यापासून फवारण्यांना सुरवात होते. फवारणी झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत होते. फवारणीत खोड पूर्ण ओले होईल याची दक्षता घेतली जाते. बाग तणांपासून स्वच्छ ठेवण्यासाठी तणनाशकाचाही वापर.

पाणी - प्रति झाड दोन ड्रीपर आणि काही मायक्रोट्युबने 80 ते 120 लिटर पाणी दररोज दिले जाते. पाण्याचे वेळापत्रक भारनियमनाच्या वेळा पाहून ठरविले जाते. सकाळी पाणी दिल्याने फळगळ कमी होत असल्याचे राऊत यांचे निरीक्षण आहे. कोणता बहर राखायचा यावरही पाणी व्यवस्थापन अवलंबून असते. मृग बहरासाठी बागेला सप्टेंबरपासून एप्रिल महिना पूर्ण होईपर्यंत पाणी दिले जाते. मेमध्ये ताण दिला जातो. आंबिया बहरात डिसेंबरमध्ये ताण दिला जातो. कृषी विभागातील सदानंद मनवर यांचे सहकार्य त्यांना मिळते.

राऊत यांच्याकडून शिकण्यासारखे काही - * शेतीत कुटुंबाचे सहकार्य घेतात
* चर्चा, वाचनातून माहिती मिळवितात
* कारणमीमांसेवर भर देऊन प्रत्येक गोष्टीचे विश्‍लेषण करतात
* निवृत्तीच्या वयातही जिद्दीने शेतीत कष्ट घेतात

मार्केट व पिकाचा ताळेबंद एकरी सुमारे 125 झाडे आहेत. मात्र प्रत्येक वर्षी उत्पादन देणाऱ्या झाडांची संख्या कमी-जास्त असते.
प्रति झाड सुमारे 800 ते 1200 फळे लागतात. मागील वर्षी एकरी 60 झाडांनीच उत्पादन दिले.
तरी अलीकडील वर्षांची सरासरी सांगायची तर एकरी सहा ते आठ टनांपर्यंत उत्पादन मिळते.
सन 2012 मध्ये तीन एकराची बाग 4,90,000 व 2011 मध्ये 3,60,000 रुपयांना बागवानाला विकली.
प्रत्येक वर्षी बागेचा सौदा वेगवेगळा होतो. त्यामुळे स्थिर दर मिळत नाही. बागेचे दर फलोत्पादनावर ठरतात. परिसरात बागा कमी असल्यास दर जास्त तर उत्पादन चांगले मिळाल्यास सरासरी दर मिळतात. आंबिया बहरापेक्षा मृग बहराला दर अधिक मिळतात. नांदेड, वाशीम, मानोरा, अकोला व अमरावतीचे व्यापारी संत्रा खरेदीसाठी येतात. बाग तोडून नेण्याचा खर्च व्यापाऱ्याचा असतो. बागेची विक्री बहर येताच किंवा संत्रा काढणीला येण्यापूर्वी सुमारे एक महिन्यापूर्वी होते. यासाठी मध्यस्थामार्फत व्यापारी बाग पाहतात. त्यानंतर बागेचा सौदा ठरतो. सौद्यावेळी दोन टक्के मध्यस्थी द्यावी लागतात. सौद्याची सर्व रक्कम हाती आल्याशिवाय बाग तोडू दिली जात नाही.
सन 2011 मध्ये खर्च वजा जाता एकरी 92 हजार, तर 2012 एकरी 1,32 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. यंदा बागेची स्थिती पाहता त्या दरम्यान नफा अपेक्षित आहे.

तुलनात्मकता - अन्य पिकांच्या तुलनेत संत्रा फायदेशीर असल्याचे राऊत म्हणतात. नगदी मिळणारा पैसा, पीक येण्यापूर्वीच किमान एक तृतीयांश रक्कम हाती येते. खर्च कमी करून कमी मेहनतीत संत्रा फुलविता येतो. कपाशी व सोयाबीनमधून कसाबसा उत्पादन खर्च निघायचा. मात्र संत्र्यापासून आर्थिक आवक बऱ्यापैकी वाढली असून एकदा केलेल्या गुंतवणुकीतून अजून 15 वर्षे तरी उत्पन्न मिळत राहील.

समस्या व उपाय - -भारनियमन, पाण्याची अपुरी उपलब्धता.
-संत्रा प्रक्रिया उद्योग परिसरात नसल्याने विक्रीसाठी पूर्णतः व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारी व मध्यस्थांचे सख्य असल्याने शेतकऱ्यांना बागेचा सौदा व्यापारी म्हणतील त्या दरानेच करावा लागतो. मध्यस्थांच्या संपर्कात राहून व्यापाऱ्यांना बाग दाखविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
-सौदा झाल्यावरही अनेक वेळा गारपीट व अन्य कारणांमुळे फळगळ झाल्यास व्यापारी शेतकऱ्यांबरोबरचा सौदा सोडून देतात. अशावेळी तोटा सहन करावा लागतो.

राऊत यांनी दिला सल्ला... -बागेची विक्री बऱ्यापैकी फळधारणा झाल्यावरच करावी. बहर धरल्यावर नको.
*संत्रा बाजारात व्यापारी व मध्यस्थांची एकजूट असल्याने शेतकऱ्याचा स्वतः फळविक्रीचा प्रयत्न हाणून पाडण्याचे प्रयत्न होतात. सौद्यावेळी बाग विक्री रकमेची अर्धी रक्कम देण्याचा व्यापाऱ्याला आग्रह धरावा.
सौद्याची पूर्ण रक्कम हाती आल्याशिवाय बागेची तोडणी नको.

शेजारीपणाचा असाही आदर्श राऊत यांच्या शेताला लागूनच अनिल मोखाडे यांचे शेत आहे. दोघे शेजारी गुण्यागोविंदाने राहतात. दोघांच्या शेताला नाममात्र धुरा असून एकाच प्रवेशद्वारातून शेतात प्रवेश होतो. राऊत यांच्या विहिरीवरून मोखाडेंच्या शेताला पाणी दिले जाते. तर मोखाडेंचे बैल राऊत यांच्या शेतात काम करतात. दोघांनी काही दिवस एकत्रित रेशीम शेती केली आहे. दोघांच्या शेताला एकच तार कंपाउंड असून त्याचा खर्च त्यांनी अर्धा अर्धा वाटून घेतला. असा शेजारधर्म असलेले उदाहरण विरळेच म्हणायला हवे!

संपर्क - रामराव राऊत, 8975955295
लोणी, ता. आर्णी, जि. यवतमाळ

वनशेतीमध्ये लागवडीसाठी उपयुक्त बांबूच्या प्रजाती

बांबूच्या प्रजाती विविध उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून वापरल्या जातात. स्ट्रिक्‍ट्‌स प्रजाती पेपर उद्योग, शेतीकाम, बांबूस प्रजाती-बांधकाम, मंडप इत्यादी, तर स्टाक्‍सई प्रजाती ही बांबू फर्निचर, शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी उपयोगी आहे. पिवळा बांबू लॅण्डस्केपिंगसाठी उपयुक्त आहे.

बाम्बुसा बल्कुआ - अधिवास आणि वितरण - बिहार, झारखंड, ईशान्य क्षेत्र, उत्तरांचल, पश्‍चिम बंगाल.
फुलोरा - भरपूर परंतु मोजक्‍याच ठिकाणी, क्वचित बीजधारणा होत नाही.
फुलोऱ्याचे चक्र - 35 ते 45 वर्षे.

बाम्बुसा बाम्बोस अधिवास आणि वितरण - संपूर्ण देशभर.
स्थानिक नावे - कंटाग
फुलोरा - भरपूर, कधी कधी तुरळक.
फुलोऱ्याचे चक्र - 40 ते 60 वर्षे

बाम्बुसा नूतन्स अधिवास आणि वितरण - हिमाचल प्रदेश, ईशान्य क्षेत्र, ओडिशा, सिक्कीम, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल.
फुलोरा - तुरळक, प्रसंगी भरपूर.
फुलोऱ्याचे चक्र - 35 वर्षे

बाम्बुसा पल्लीडा अधिवास आणि वितरण - ईशान्य क्षेत्र, सिक्कीम, पश्‍चिम बंगाल.
फुलोरा - तुरळक.
फुलोऱ्याचे चक्र - 40 वर्षे

बाम्बुसा पॉलीमॉर्फा अधिवास आणि वितरण - आसाम, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, पश्‍चिम बंगाल.
फुलोरा - भरपूर
फुलोऱ्याचे चक्र - 55 ते 60 वर्षे

बाम्बुसा तुल्दा अधिवास आणि वितरण - बिहार, झारखंड, केरळ, ईशान्य क्षेत्र, ओरिसा, सिक्कीम, पश्‍चिम बंगाल.
फुलोरा - भरपूर/ कधी कधी तुरळक.
फुलोऱ्याचे चक्र - 30 ते 60 वर्षे

(लेखक कृषी वनशेती संशोधन प्रकल्प,
कृषी महाविद्यालय, नागपूर येथे कार्यरत आहेत.)

प्रक्रिया बायोगॅस निर्मितीची

बायोगॅस संयंत्रामध्ये वायू तयार होण्याचा दुसरा टप्पा म्हणजे जे चोथा-पाणी वेगळे होते, त्या चोथ्यामधला म्हणजेच जैवभारामधला पिष्टमय पदार्थ किंवा शर्करा यांचे विघटन होते. हा काही संयुक्त शर्करांचा बंध असतो. ज्याला शास्त्रीय परिभाषेत "पॉलिसॅक्राईड' असे म्हणतात. या संयुक्त शर्करांचे जिवाणूंच्या साह्याने विघटन होऊन एकल शर्करा (मोनो सॅकराईड) तयार होतात. यांच्याच विघटनाच्या पुढच्या टप्प्यात ऍसिटिक ऍसिड (H3CooH) तयार होते. ऍसिटिक आम्ल तयार होत असल्याने या टप्प्याचे नाव "ऍसिडोजेनेसिस' असे आहे. यातूनच या अभिक्रियेत भाग घेणाऱ्या जिवाणूंचे नाव "ऍसिडोजेनिक बॅक्‍टेरिया' असे आहे.

यापुढील टप्पा म्हणजे तयार झालेल्या ऍसिटिक आम्लाचे जिवाणूंच्या साह्याने परत विघटन होऊन वायूंची निर्मिती होते. याआधी म्हटल्याप्रमाणे ऍसिटिक ऍसिडचे रासायनिक गुणसूत्र हे (CH3CooH) असे आहे. मात्र याच्या विघटनात त्यातील सर्वांत शेवटी असलेला हायड्रोजनचा रेणू हा पहिल्या CH3 ला जाऊन मिळतो आणि तयार होतो CH4 म्हणजेच मिथेन वायू आणि उरलेला Coo पासून तयार होतो CO2 म्हणजेच कार्बन- डाय- ऑक्‍साइड हा वायू. या दोन वायूंच्या निर्मितीत मिथेन वायूची मात्रा जास्त असल्याने या अभिक्रियेस "मिथेनोजेनेसिस' म्हणतात आणि भाग घेणाऱ्या जिवाणूंचे नाव "मिथेनोजेनिक बॅक्‍टेरिया' असे असते. वरील उदाहरण देण्याचे मुख्य कारण हे, की पदार्थांपासून वायूनिर्मिती कशी होते ते समजावून घेणे हा उद्देश असल्याने त्यातील सुटसुटीत अभिक्रिया मुद्दाम दिली आहे. याव्यतिरिक्त अन्य अभिक्रिया होतच असतात. ही रासायनिक अभिक्रिया शास्त्रीय परिभाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते ः
CH3CooH मिथेनोजेनिक CH4 + CO2
ऍसिटिक ऍसिड बॅक्‍टेरिया मिथेन + कार्बन- डाय- ऑक्‍साइड

बायोगॅसमध्ये मिथेन आणि कार्बन- डाय- ऑक्‍साइड हे फक्त दोनच वायू निर्माण होतात असं नाही, तर एकूण निर्माण वायूंमध्ये इतर वायूंचे प्रमाण हे अगदी पी.पी.एम. (पार्टिकल्स पर मिलियन) तत्त्वावर मोजले जातात. हे आहेत हायड्रोजन सल्फाईड (H2S), सल्फर डाय ऑक्‍साइड (SO2), आणि अमोनिया (NH3). हे तीनही वायू विषारी आहेत आणि श्‍वसनात प्रमाणापेक्षा जास्त आल्यास गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते. याच्याच जोडीने जैववायूमध्ये अजून एक जोडीदार यांना सामील असतो आर्द्रता (मॉईश्‍चर). मात्र हे प्रमाण "पीपीएम'मध्ये मोजण्याचेच. ज्यांच्याकडे गोबरगॅस संयंत्र आहे किंवा होते, त्यांना या पाण्याचे प्रमाण माहिती असते, कारण बऱ्याच वेळेला वायूधारक नळीतून त्यांना ते काढून टाकावे लागते. वायूवाहक नळीत पाणी थेंबाथेंबाने साचणे जर वाढले तर त्यामुळे वाहत जाणाऱ्या जैववायूला चक्क अडथळा ठरते. याचे एकमेव कारण जैववायू तयार होत असताना असलेली स्थिती हेच आहे.

"एनटीपी' म्हणजे अगदी सामान्य वातावरण आणि त्याच तापमानाला तयार होत असलेला हा जैववायू. मग त्यावरचा दाब किती, असा जर प्रश्‍न पडला तर त्याचं उत्तर प्रेशर गेज लावून मिळत नाही. कारण हा दाब त्याहीपेक्षा कमी असतो. हा मोजायचा ठरवला तर वापरायचा "बॅरोमीटर'. ही एक साधी इंग्रजी "U` या अक्षराप्रमाणे असलेली एक नळी, त्यात भरलेलं पाणी किती मिलिमीटरनं विस्थापित झालं तो आला त्या वायूवरचा दाब. सर्वसामान्य परिस्थितीत जैववायूवराचा दाब हा सहा ते नऊ इंच वॉटर कॉलम इतका किंवा 150 ते 270 मिलिमीटर एवढा संयंत्राच्या प्रकारानुसार असतो आणि म्हणून हा वायू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फार लांब अंतर वाहून नेता येत नाही. कारण त्याच्या वहनामुळे त्यावरील दाब उतरतच जातो आणि शेगडीमध्ये पुरेशा दाबाने त्याचे ज्वलन होत नाही. हे झाले जैववायू संयंत्रामधले प्रमुख टप्पे आणि त्याचे सर्व घटक नेमके लक्षात यावेत यासाठी खालील आकृतीने त्याचे पुरेसे स्पष्टीकरण होईल.

बायोगॅस प्लांटची आकृती निर्मितीसाठी आवश्‍यक घटक 1) पाचक टाकी 1) पिष्टमय पदार्थ/शर्करा
2) वायूधारक टाकी 2) वातावरण
3) इनलेट 3) जिवाणू (बॅक्‍टेरिया)
4) आऊटलेट 4) तापमान (25 अंश C)
5) गॅस कॉक 5) सामू (Ph) @ 7

बायोगॅस बांधताना - भारतामध्ये आणि भारताबाहेरही आज रोजी आणि यापूर्वी अनेक जणांनी अनेक ठिकाणी "जैववायू' अर्थात बायोगॅस यावर काम केले आहे. त्यामुळे सुमारे 40 ते 50 वेगवेगळ्या प्रकारांची संयंत्रे उपलब्ध आहेत. त्यांची नेमकी निवड ही आपण करताना आपली गरज काय, आपण बांधकाम कुठे करणार किंवा त्यामध्ये कोणते पदार्थ वापरणार हे लक्षात घ्यावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तयार होणाऱ्या जैववायूचा नेमका वापर कशासाठी करणार, अशा सर्व प्रश्‍नांच्या एकत्रित उत्तरात दडलेली असते.

अगदी वैयक्तिक वापरापासून ते सुमारे 12-15,000 घनमीटर एवढ्या आकारमानाची जैववायू संयंत्रे देश-विदेशात स्थापित आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर 1000, 1500 लिटरच्या पीव्हीसी टाक्‍या एकमेकांत उलटसुलट बसवून आपण आपल्या घरासाठी जैववायू संयंत्र निर्मिती करू शकतो आणि तत्त्वावर शेतामध्ये मक्‍याची लागवड करून एक ते दोन मेगावॉट एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करू शकतो. अशा पद्धतीचे व्यापारी तत्त्वावर काम करणारे काही परदेशी प्लांट आढळून येतात. ही किमान ते कमाल श्रेणी अवलंबित असताना आज त्यातील वायूनिर्मितीची प्रक्रिया मात्र आता वर्णन केली अशीच असते. थोड्याफार फरकाने त्यामध्ये कमी-जास्त तांत्रिक सुधारणा आढळून येतात. काही व्यावसायिक प्रणाली तर अगदी कायमस्वरूपी तापमान नियंत्रित राहावे म्हणून विशिष्ट रचनाही उभारतात. गोबरगॅस संयंत्रात दिवसातून एक किंवा दोन वेळा शेणकाल्याचा भरणा होत असेल तर अशा मोठ्या क्षमतांच्या बायोगॅस प्लांटमध्येही अगदी प्रतिमिनिटाला भरणा केला जातो. मात्र अशा सुधारणा करत असताना "वायू उत्पादन कमी वेळात जास्त निर्मिती' अशा स्वरूपाचे असल्याने त्यातील विविध घटकांची विशिष्ट वेळी नोंदी ठेवण्याची गरजही आवश्‍यक असल्याने ही प्रक्रिया जास्त तांत्रिक अशी असते.

बायोगॅसला ताव कमी का? ही प्रक्रिया समजून घेताना अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे या वायूच्या एकूण घनभारापैकी (व्हॉल्यूम) सुमारे 60 टक्के एवढा मिथेन असतो. उरलेल्या 40 टक्के भागात कार्बन- डाय- ऑक्‍साइड असतो. इथे हा मुद्दा त्यामुळे महत्त्वाचा ठरतो, कारण गोबर गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करणाऱ्या महिला नेहमी अशी तक्रार करतात, की त्यांच्या गोबरगॅसला ताव नाही आणि याचे मुख्य कारण त्यामधील वायूंची असलेली टक्केवारी हेच आहे. मिथेन हा वायू मुळात "इनर्ट गॅस' किंवा नोबल वायूंच्या जातकुळीतला आणि पेटणारा असा वायू, त्याचे बायोगॅसमधील प्रमाण सुमारे 60 टक्के. त्याच्याच सोबतीने एकूण घनभारापैकी 40 टक्के एवढे आकारमान असलेला कार्बन- डाय- ऑक्‍साइड वायू हा मुळात अग्निशामक वायू. म्हणूनच बायोगॅसच्या ज्वलन प्रक्रियेमध्ये 60 टक्के मिथेन जळण्याचा प्रयत्न करतो, तर त्यातील 40 टक्के कार्बन- डाय- ऑक्‍साइड वायू त्याला विझवायला पाहतो. सरतेशेवटी 20 टक्के मिथेनच पेटलेला असतो आणि म्हणून या इंधनाचा ताव कमी.

परदेशातील बायोगॅसचा अवलंब - परदेशामधील जर्मनी, स्वीडन या देशांमध्ये जैववायू विषयावर बरेच काम झाले आहे आणि तेथील वायूनिर्मिती ही मुळामध्ये जास्त करून वीजनिर्मितीसाठी वापरली जाते. अगदी 12,000 घनमीटर प्रतिदिवस एवढ्या विशाल प्रमाणावर एवढा वायू निर्माण झाला, तर त्यावर सुमारे एक मेगावॉट एवढी वीजनिर्मिती होते. त्याचा अंदाजित खर्चही सुमारे सात ते आठ कोटींच्या घरात जातो. यासाठी विशेष करून मका, शुगरबीट, गोड ज्वारी या इंधन पिकांची लागवड केली जाते.

सोयाबीनच्या पट्ट्यात डाळिंबातून केला पीकबदल

राज्याच्या विविध भागांत शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांऐवजी आपल्या भागासाठी नवी असलेली पिके खुणावू लागली आहेत. डाळिंब हे त्यातीलच एक पीक. वाशीम जिल्ह्यातील वडप (ता. मालेगाव) येथील पांडे कुटुंबीयांनी सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांबरोबर डाळिंबाचीही साथ धरली आहे. त्याचे कारण म्हणजे आर्थिक प्रगतीकडे नेणारे हे पीक असल्याचे त्यांच्या अनुभवास येत आहे.

वाशीम जिल्ह्यात वडप येथील रमेश पांडे यांची वडिलोपार्जित सुमारे 40 एकर शेती आहे, त्यामध्ये ते सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पारंपरिक पिके घेतात. मागील वर्षापर्यंत कपाशी पीकही त्यांच्याकडे होते. मात्र, लाल्या विकृती किंवा अन्य समस्यांमुळे या वर्षी या पिकाचा आसरा त्यांनी घेतलेला नाही.
अंचरवाडी (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील विठ्ठलराव परिहार हे त्यांचे सासरे, त्यांच्याकडे डाळिंब शेती होते. त्यांच्याच प्रोत्साहनातून आपल्याला डाळिंब पिकाकडे वळावे असे वाटल्याचे पांडे म्हणतात.

डाळिंब शेतीचे नियोजन परिहार यांचे मार्गदर्शन घेत घेत डाळिंब शेती सुरू केली. फेब्रुवारी 2011 मध्ये सुमारे पाच एकरांवर भगवा वाणाची लागवड केली, त्याकरिता लागणारी रोपे 15 रुपये प्रति नग याप्रमाणे खरेदी करण्यात आली. नऊ बाय 14 या अंतरावर एकरी सुमारे 320 रोपे, तर पाच एकरांवर सुमारे 1600 झाडे आहेत. रोहयोअंतर्गत असलेल्या फळपिकांच्या लागवडीकरिता 14 हजार 700 रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडून मिळाले.

लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करण्यात आली, दीड बाय दीड फुटाचा खड्डा खोदून ट्रायकोडर्मा (बुरशीनाशक), शेणखत आदी टाकून रोपांची लागवड करण्यात आली. लागवड करताना दोन ओळींमधील रिकाम्या क्षेत्रातील माती रोपांना भरावा म्हणून वापरण्यात आली, जेणेकरून दोन ओळींमध्ये आणि रोपाजवळ अनावश्‍यक साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होईल अशी काळजी घेण्यात आली. सासरे परिहार यांच्या सल्ल्यानुसार डाळिंब पिकाचे खत, पाणी व अन्य व्यवस्थापन केले.

पांडे म्हणाले, की आपल्या गाव परिसरात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे; मात्र या पिकापासून म्हणावा तसा आर्थिक फायदा होत नव्हता. एकरी 10 ते 11 क्विंटल उत्पादन मिळायचे. खर्च वजा जाता तेवढ्या क्षेत्रात 22 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न हाती यायचे. हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनेच डाळिंबाचा प्रयोग केला आहे.

कोरडवाहू क्षेत्र बनवले बागायती पांडे म्हणाले, की आठ ते दहा वर्षांपूर्वी माझी शेती कोरडवाहू होती. पिकांचा विस्तार करण्यासाठी मर्यादा येत होत्या.
विहीर खोदली. वडपपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंबेश्‍वर लघु सिंचन प्रकल्पातून पाणी उपसा केला आहे. पाइपलाइन करून शेतापर्यंत पाणी आणले आहे. आता संरक्षित सिंचनाकरिता विहीर तसेच बोअरवेलचा पर्याय आहे. पाणी उपलब्ध झाले तरी ते काटेकोरपणे वापरणे गरजेचे होते, त्यासाठी ठिबक सिंचन पाच एकरांपर्यंत केले आहे. त्यातूनच द्रवरूप खतेही डाळिंब पिकाला देण्यात येतात.
केवळ रासायनिक खते न देता झिंक, फेरस, मॅग्नेशिअम, बोरॉन आदी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही करण्यात आला आहे.
डाळिंब पिकाचा अनुभव कमी होता. सुरवातीला मृग बहर घेतला. पावसाळी हंगामात पीक व्यवस्थापन करण्यात अनेक अडचणी आल्या. पाच एकर क्षेत्रात सुमारे साडेआठ टन एवढेच उत्पादन मिळाले. सासरे तसेच अन्य व्यक्तींनी व्यापारी शोधून देण्यासाठी मदत केली. पहिल्यावेळी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही; मात्र दर किलोला 70 रुपयांपर्यंत मिळाला. त्यानंतर आंबे बहराचे नियोजन सुरू केले, त्याप्रमाणे नियोजनही सुरू केले. हा बहर मात्र व्यवस्थितपणे झाला. या बहरातील फळकाढणी नुकतीच संपली. पाच एकरांत सुमारे 32 ते 33 टन उत्पादन मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला परिसरातील व्यापाऱ्यांनी डाळिंबाची जागेवरच खरेदी केली, त्याला प्रति किलो 55 ते 60 रुपये दर मिळाला. त्यामुळे वाहतूक खर्च वाचला. सुमारे पाच ते साडेपाच लाख रुपये वजा जाता सतरा लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. काही समस्यांमुळे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले, अन्यथा या उत्पन्नात तेवढी भर पडली असती असे पांडे म्हणाले.
अकोला बाजारपेठ जवळ असल्याने या बाजारपेठेत डाळिंब विक्री करण्याचे नियोजन आहे.

पांडे यांनी या गोष्टींवर दिला भर 1) जमिनीची सुपीकता राखण्यासाठी शेणखत वापरावर भर
2) त्याकरिता दुधाळ जनावरांचे संगोपन
3) संपूर्ण शेतीकरिता ठिबक सिंचनाचा अवलंब
4) ठिबकद्वारेच विद्राव्य खतांचा पुरवठा
5) निरीक्षणाअंती किडी-रोगाच्या प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊनच कीडनाशक फवारणीचा निर्णय
6) संयुक्‍त कुटुंबातील सदस्यच शेतात राबतात, त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते.
7) अनुभवी डाळिंब उत्पादकांच्या सातत्याने संपर्कात राहत असल्याने वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यावर भर दिला.
8) पूर्वी कोरडवाहू शेती असल्याने संरक्षित पाण्याची सोय करण्याला प्राधान्य दिले.

संपर्क - रमेश पांडे - 8378911358
वडप, ता. मालेगाव, जि. वाशीम

मार्केट ओळखून केली कलिंगडाची यशस्वी शेती

अलीकडील काळात शेतकरी वर्षभरातील सण समारंभांचा विचार करून पिकांचे नियोजन करताना दिसतात.
पुढील वर्षी किती क्षेत्रावर कोणते पीक कधी लावायचे आहे हे आधीच ठरवून त्याप्रमाणे उत्पादन घेतात.
जालना जिल्ह्यात चित्रवडगाव (ता. घनसावंगी) येथील गंगाधर अप्पासाहेब सोसे गावचे सरपंच आहेत.

ग्रामपंचायतीची कामे सांभाळून त्यांनी शेतीत लक्ष घातले आहे. त्यासाठी सकाळ व संध्याकाळचा वेळ ते शेतीसाठी देतात. सोसे कुटुंबाची सुमारे 60 ते 65 एकर शेती आहे. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, ऊस, उडीद-मूग आदी पिके घेतली जातात. सुमारे पंधरा ते वीस एकर क्षेत्रावर असलेले उसाचे क्षेत्र पुरेशा पाण्याअभावी त्यांनी दोन वर्षांपूर्वी थांबवले. मात्र यंदा थोडा समाधानकारक पाऊस असल्याने पुन्हा या पिकाचे नियोजन केले आहे. त्यांचे बंधू व आई-वडील हे शेतीत राबतात.
सोसे यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कलिंगड पिकाची कास धरली आहे. अर्ली खरीप तसेच उन्हाळी अशा दोन हंगामांत ते या पिकाची लागवड करतात. रमझान महिना आणि त्या काळातील मागणी लक्षात घेऊन कलिंगडाचे नियोजन ते करतात. दरवर्षी चांगले उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या पिकातील त्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागला आहे.

यंदाचे प्रातिनिधिक उदाहरण मुस्लिम धर्मीयांसाठी रमझान महिन्याच्या सणाचे मोठे महत्त्व असते. साहजिकच विविध फळांची बाजारपेठेत गर्दी होते. ही संधी सोसे यांनी साधली आहे. दरवर्षी 15 ते 20 मेच्या सुमारास ते कलिंगडाची लागवड करतात. यंदा मात्र नियोजन थोडेसे पुढे गेल्याने ही लागवड मे महिन्याच्या अखेरीस झाली. ही लागवड मेच्या पंधरवड्यात झाली तरच रमझान सणाच्या काही दिवस आधी फळे बाजारात आणून त्यांना दर चांगले मिळतात.
सण तोंडावर असतानाच्या काळात हे दर तितके चांगले मिळत नाहीत असे सोसे यांचे म्हणणे आहे.
यंदा त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत त्यांना दर कमी मिळाला.

अर्ली खरीप हंगामात लागवड करतेवेळी पाण्याची उपलब्धता व अन्य पिकांतील कामांची वेळ यांची सांगड घालावी लागते. मराठवाड्याचा विचार करता जास्त उष्णतामान असताना वेलीच्या वाढीवर व पर्यायाने पुढे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस विशेष काळजी घ्यावी लागते, असे सोसे सांगतात.
कलिंगडाचे व्यवस्थापन सोसे यांची जमीन मध्यम स्वरूपाची व निचरा होण्याजोगी आहे. लागवडीसाठी ते सरी पद्धतीचा वापर करतात. यंदाच्या वर्षी त्यांनी लागवडीसाठी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जमीन नांगरून व वखरांच्या दोन ते तीन पाळ्या घालून तयार केली. त्यात शेणखत तीन ट्रॉली वापरले. जमीन व्यवस्थित मिश्रणयुक्त व भुसभुशीत करून घेतल्यानंतर लागवडीपूर्वी ठिबक संच अंथरून घेतले. सहा x एक फूट अंतरावर रोपांची लागवड केली. रोपे उगवून आल्यानंतर त्यास एकरी दोन बॅग 10 :26 :26 व पोटॅश दिले. अलीकडील काळात शेतकऱ्यांनी विद्राव्य खतांच्या वापरावर विशेष भर दिला आहे. त्यानुसार सोसे यांनीही त्यांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केला. तीन वेळेस खुरपणी व निंदणी केली. या वर्षी सतत रिपरिप पाऊस पडत राहिल्याने तणांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे खुरपणी अधिक करावी लागली. ढगाळ वातावरणामुळे या वर्षी रोग व किडींचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा जास्त आढळून आल्याने फवारण्यांच्या संख्येतही वाढ झाली. लागवडीनंतर दोन दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे एक ते दोन तास पाणी दिले. त्यानंतर आठ दिवसांच्या फरकाने पाण्याच्या पाळ्या सुरू ठेवल्या. जून व जुलै महिन्यांत पावसाची रिमझिम सुरू असल्याने पाणी देण्याची गरज भासली नाही.

संततधार पाऊस सुरू असल्याने मालाच्या गुणवत्तेला थोडा फार फटका बसून जवळपास चार ते पाच टन माल खराब झाला. एकूण उत्पादन सुमारे 17 ते 18 टन मिळाले. कलिंगडाला प्रति किलो सात ते साडेसात रुपये दर मिळाला.

मार्केट औरंगाबाद हे सोसे यांना जवळचे मार्केट आहे. मात्र त्या तुलनेत मुंबईच्या वाशी येथील बाजारपेठेत कलिंगडाला चांगली मागणी असल्याने तेथेच माल विकला जातो. पक्वता व रंग यांचा अंदाज घेऊन फळाची काढणी करण्यात येते. फळाचा आकार व वजनाप्रमाणे प्रतवारी करून टेम्पोद्वारे फळे पाठविण्यात येतात. मुंबईला फळविक्रीसाठी आपण स्वतः जात असल्याचे सोसे सांगतात. खर्च वजा जाता सुमारे 90 हजार ते एक लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

दरवर्षी कलिंगड होते किफायतशीर शेतीत हवामान या घटकाची मोठी भूमिका असते. मागील वर्षी तर जालना जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती होती. तरीही उपलब्ध पाणी व ठिबक सिंचनाच्या आधारे आपण कलिंगड घेतल्याचे सोसे यांनी सांगितले.
मात्र यंदाच्या उन्हाळी हंगामात पाण्याअभावी हे पीक घेणे त्यांना शक्‍य झाले नाही. अर्ली खरीप लागवडीतील कलिंगडाचे त्यांना दरवर्षी एकरी 15 ते 18 टनांपर्यंत उत्पादन मिळते. उन्हाळी हंगामात ते तुलनेने कमी असते.
मागील वर्षी रमझान काळात दर किलोला नऊ रुपयांपर्यंत मिळाला होता.
फळाची गुणवत्ता चांगली येण्यासाठी शेणखताचा वापर दरवर्षी एकरी चार ते पाच ट्रॉली करतो. घरी चार ते पाच बैल, पाच म्हशी व अन्य गाई मिळून दहा जनावरे आहेत. गरजेनुसार शेणखत विकतही घेतले जाते.
कलिंगडाचे वजन सुमारे नऊ ते दहा किलो व अगदी 15 किलोपर्यंतही मिळते. आता कलिंगडानंतर त्या जागी कांदा पिकाचे नियोजन केले आहे.
अन्य पिकांच्या उत्पादनाबाबत सोसे म्हणाले, की बीटी कापसाचे एकरी 12 ते 13 क्विंटल, सोयाबीनचे आठ ते 10 क्विंटल उत्पादन मिळते. अन्य ठिकाणी दोन ते तीन गुंठे जमीन खरेदी करून तेथे विहीर खोदली आहे.
तेथून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन करून पाण्याची उपलब्धता केली आहे.
हवामानाच्या परिस्थितीनुसार पिकाचे व्यवस्थापन अवलंबून राहते. मात्र मागील पाच ते सहा वर्षांचा अनुभव आपल्याला उपयोगी पडत असल्याचे सोसे यांचे म्हणणे आहे.

संपर्क - गंगाधर सोसे, 9764514490, 9405527200

वरुण घेवड्याचे पैदासकार काय म्हणतात?


सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्‍यातील महामार्गालगत इंदोली गाव आहे. गावात चांगल्या जमिनीसोबत पाण्याचीही उपलब्धता आहे. येथील अनिल बजरंग गायकवाड आले, केळी यासारख्या पिकांत वेगवेगळ्या आंतरपिकांची निवड करून मुख्य पिकासह आंतरपिकाचे चांगले उत्पादन घेतात. अनिल अभियंता असून, स्थानिक कंपनीत कार्यरत आहेत. ते नोकरी सांभाळून शेती पाहतात. त्यांचे भाऊ सुनील पूर्णवेळ शेती पाहतात. गायकवाड बंधूंना एकूण 12 एकर शेती आहे. सुरवातीस विहिरीचे पाणी कमी असल्यामुळे शेतीत फार लक्ष दिले जात नव्हते. सन 2001 मध्ये त्यांनी तारळी नदीवरून नऊ हजार फूट पाइपलाइन करून शेतात पाणी आणले. यानंतर शेतीत थोडा वेग येऊ लागला. ट्रॅक्‍टर व्यवसाय करीत शेती केली जात होती. सन 2007 मध्ये सर्वाधिक ऊस केला जात होता, त्या वेळी थोड्या प्रमाणात आलेही घेतले जायचे. गायकवाड बंधूंनी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यानंतर पीक पद्धतीत बदल सुरू केला. पट्टा पद्धतीचा अवलंब, उसाची रोपे तयार करून लागवड सुरू केली. उसाचा असमाधानकारक दर, ऊस तुटण्यास विलंब यासारख्या कारणांमुळे हे क्षेत्र कमी करून आले पिकाच्या क्षेत्रात वाढ केली. आडसाली उसाच्या दोन उत्पादनात केळीची तीन उत्पादने मिळू शकतात याचा अभ्यास करून केळीचे क्षेत्र वाढवत नेले. सहा एकर केळी, तीन एकर आले व तीन एकर ऊस असे नियोजन आता केले आहे. ठिबक सिंचनाचा अधिक प्रमाणात वापर केला आहे. सहा एकर केळी व तीन एकर आले पिकास फॉगर यंत्रणेचा वापर केला आहे.

घेवडा आंतरपीक मुख्य पिकात आंतरपीक घेण्यावर गायकवाड यांचा भर असतो. केळी व आले पिकात सोयाबीन, मिरची ही पिके घेतली जात होती. बाजारपेठांचा अभ्यास करताना लक्षात आले, की अन्य हंगामांपेक्षा जुलै व ऑगस्ट महिन्यात घेवड्यास दर तेजीत असतो, यामुळे आंतरपीक म्हणून त्याचा प्रयोग करण्याचे ठरवले. यंदाच्या 15 मेच्या दरम्यान सुमारे 70 गुंठे लागवड केलेल्या आले क्षेत्रात वरुण घेवडा लावला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये 60 गुंठे क्षेत्रावर केळीची लागवड पाच बाय सहा फुटांवर केली आहे. त्याच्याही मधल्या जागेत घेवडा घेतला. एकूण मिळून सुमारे 60 किलो बियाणे लागले. केळीत व आल्यात ठिबकचा वापर असल्याने तसेच पावसाळ्यात पाण्यासाठी वेगळे काही करावे लागले नाही. किडी- रोगांचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी आवश्‍यकतेनुसार फवारण्या दिल्या. लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी घेवड्याचा तोडा सुरू केला. पहिल्या तोड्यास सुमारे 720 किलो, तर पुढील तोड्यांत ते 1500, 1200 किलो असे उत्पादन मिळाले.

पिकाचा ताळेबंद 60 किलो बियाण्यास 100 रुपये प्रति किलोप्रमाणे सहा हजार, मजुरी टोकणीस दोन हजार रुपये, खतांस चार हजार रुपये, कीडनाशके व फवारणी आठ हजार रुपये, तोडणी मजुरी आतापर्यंत दहा हजार रुपये, वाहतूक सहा हजार रुपये असा एकूण 32 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. केळीच्या 60 गुंठ्यांत 103 पोती (प्रति पोते 55 किलो), तर आल्याच्या 70 गुंठ्यांत 35 पोती एवढे उत्पादन मिळाले. आता उर्वरित उत्पादन हे बियाण्यासाठी राखून ठेवले जाणार आहे.

मार्केट स्टडी पहिल्या तोड्यास 35 रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळाला. एकूण हंगामात प्रति दहा किलोचे दर 300 ते 350 रुपये याप्रमाणे राहिले. घेवडा पीक घेण्यापूर्वी आधी मार्केटचा अभ्यास अनिल यांनी केला. दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यांत भाजीसाठी घेवड्याची मागणी मोठी असल्याने त्यास दर चांगला मिळतो. सर्व घेवडा पुणे येथे पाठवला. चांगला दर मिळावा यासाठी "ऍग्रोवन' तसेच मोबाईलवरून संपर्क साधून दरांबाबतची सतत चौकशी केली. मार्केटला पाठवलेला माल एकाच व्यापाऱ्याला न देता चार व्यापाऱ्यांना दिल्याने दराचा अंदाज येतो. अर्थात, या काळात मुळातच घेवड्याची मागणी जास्त असल्याने दर चांगला मिळाल्याचे अनिल म्हणाले.

केळीतील एकरी 85 हजार रुपयांपर्यंत, तसेच आले पिकातील सुमारे एक लाख 70 हजार रुपयांपर्यंत होणारा खर्च (बेण्यावरील खर्च अधिक होऊ शकतो) घेवड्याच्या उत्पन्नातून कमी होण्यास मदत झाली आहे.

व्यवस्थापनातील ठळक बाबी - बीजप्रक्रिया करूनच टोकण
- मुख्य पिकाचा खर्च आंतरपिकातील उत्पन्नातून मिळवण्याचा प्रयत्न
- आंतरपिके कमी कालावधीची निवडली जातात
- जिवाणू खताचा वापर केला जातो
- आले पिकाच्या बेण्यात दरवर्षी बदल केला जातो
- या पिकात गरज व अवस्थेनुसार तीन आंतरपिके घेतली जातात
- दशपर्णी अर्काच्या फवारण्या घेण्यावर भर असतो
- ठिबक संचाद्वारे विद्राव्य खते दिली जातात
- मार्केटचा अभ्यास करून पिकात बदल केला जातो
- मिळणारे उत्पादन - (एकरी) ऊस- 70 टनांपर्यंत, आले- 17 ते 18 टन, केळी- 40 टनांपर्यंत.

समस्या व उपाय शेतात जास्त पाणी झाल्यास पिकाचे नुकसान होते. यामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी लागते. लागवड करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करावी, यामुळे उगवण चांगली होते. पीक फुलात आल्यावर करपासारख्या रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी पिकाची काळजी घ्यावी लागते. रोगाचा प्रादुर्भाव होण्याआधीच प्रतिबंधक फवारणी केली. या पिकाची तोडणी वेळेत होणे आवश्‍यक असते, यासाठी मजुरांची आवश्‍यकता असते. माल काढणी लांबली तर मार्केटमध्ये अडचणी निर्माण होतात. तोडणी व मार्केटला वेळेत माल जाणे हे साधले पाहिजे.

"ऍग्रोवन' मार्गदर्शक ऍग्रोवन नियमित वाचनात असतो. कोणत्या पिकात कुठल्या काळात काय दर असतो, याचा अभ्यास त्यातून होतो. त्याप्रमाणे पिकांचे नियोजन करणे सोपे जाते. अंकातील आवश्‍यक कात्रणे काढून त्यातील माहितीचा वापर प्रत्यक्ष शेतात केला जातो, असे गायकवाड म्हणतात. पिकाबाबतचे निर्णय मी घेत असलो तरी भाऊ सुनील मजुरांचे नियोजन, त्यांच्यावर देखरेख आदी महत्त्वाची कामे करीत असल्यामुळे शेतीतील कष्ट हलके होण्यास मदत मिळते. पत्नी सौ. सुनीता यांचीही मदत होत असल्याचे अनिल सांगतात.

अनिल गायकवाड 8600768998, 9922070465

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग हरेर यांनी वरुण घेवड्याची जात विकसित केली आहे. ते म्हणाले, की हे पीक प्रामुख्याने खरिपाचे आहे. याला पाणी जास्त चालत नाही. निचरा होणारी जमीन लागते. पेरणी 15 जुलैनंतर नको. अर्ली खरिपात पाणी असेल तर मेच्या अखेरीसही लावता येते. जुलैमध्ये पाऊस असेल तर पिकाचे नुकसान होऊ शकते. भाजी म्हणून विकायची असेल तर शेंगा लालसर व ओले दाणे असताना विक्री करावी. ओल्या शेंगा वाफवण्यासाठी हा वाण योग्य नाही.
संपर्क - 9881504845

करार पद्धतीतून झाली प्रगत केळीशेतीकडे वाटचाल

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील कासेगावचे (ता. वाळवा) शिवार लागते. कृष्णाकाठचा हा उसाचा हुकमी पट्टा आता केळी पिकासाठी पुढे येत आहे. उसाचा वाढलेला उत्पादन खर्च व टप्प्याटप्प्याने मिळणारी बिलाची रक्कम हे आर्थिक गणित शेतकऱ्यांना परवडत नव्हते; मात्र तरुणाई शेतीमध्ये राबू लागली. नव्या दिशेने त्यांनी विचार सुरू केला, त्यासाठी केळीचा पर्याय निवडला. निचऱ्याच्या जमिनीची साथ होती. महत्त्वाची गोष्ट होती विक्रीची.

वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्री वेळी मध्यस्थ दर पाडून मागू लागले. बाजारपेठेचा अभ्यास नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल व व्यापाऱ्यांची मात्र चांदी झाली. उत्पादन खर्च अनेक शेतकऱ्यांच्या अंगावर आला. मोठ्या प्रमाणात वाढलेले क्षेत्र झपाट्याने कमी झाले. अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडल्या. पारंपरिक ऊसशेतीच बरी असे वाटू लागले.

सुधारित शेतीचा मिळाला राजमार्ग - हे सर्व खरे असले तरी शेतीत राबणारी तरुणाई प्रयत्नवादी होती. केळी लागवडीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी स्थानिक बाजारपेठेचा नाद सोडला. अकलूज, टेंभुर्णी येथील व्यापाऱ्यांना भेटून माल घेण्यासाठी पाचारण केले, त्यामध्येही अनेक अडचणी आल्या. दरम्यान, राज्याचे माजी कृषी सचिव नानासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली. विक्री व्यवस्थेची फरपट थांबली पाहिजे, शेतकऱ्यांना हक्काचे पैसे विश्‍वासाने मिळाले पाहिजेत, अशी भावना त्या वेळी व्यक्त झाली. त्यातून पुढे गुजरातमधील एका कंपनीशी चर्चा झाली.

संबंधित कंपनीने शेतकऱ्यांसोबत करार करण्यापूर्वी आपल्या अटी, हमीभावाची संकल्पना, मालाची गुणवत्ता, तांत्रिक मार्गदर्शन आदी गोष्टी शेतकऱ्यांसमोर मांडल्या. कंपनीने पॅक हाऊसची उभारणी, कार्यालय, केळी काढणीसाठी सुमारे शंभर मजूर अशी सुविधाही कासेगाव येथे उभारली.

आधी होतो करार, मगच शेती कंपनी केळी उत्पादकांकडून करार पत्र भरून घेते, त्यामध्ये प्रति टन सहा हजार रुपये हमीभावाची बांधिलकी असते. करार केल्यानंतर उत्पादित माल कंपनीला देणे बंधनकारक असते. केळफूल आल्यानंतर घडावरील बहुतांश कामे कंपनीच्या प्रतिनिधींकडून होतात. त्याचा खर्चही कंपनी करते. परिपक्व झालेला माल काढण्यासाठी कंपनीचे मजूर असतात. माल बांधावर पोच करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची असते. तेथून पुढे हा शेतीमाल पुढील प्रक्रियेसाठी कंपनी रवाना करते.
खरेदी- विक्री संघाची स्थापना - कासेगाव येथील शेतकऱ्यांनी कृष्णामाई फळे, फुले, भाजीपाला उत्पादक संघाची स्थापना केली आहे. 13 जणांचे संचालक मंडळ असून 103 सभासद आहेत. त्यातील सुमारे 72 शेतकरी केळी शेतीत असून, सध्या त्यांची शेती विविध टप्प्यांत आहे. प्रत्येकाचे दोन ते चार एकर असे केळीचे क्षेत्र आहे.

1) संबंधित कंपनी करार थेट संस्थेशी, तर संस्था आपल्या सभासदांसोबत करते. संघासाठी कंपनीकडून दोन टक्के व्यवस्थापन खर्च दिला जातो.
2) कंपनीच्या प्रतिनिधींकडून लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले जाते.

सुधारित केळीशेतीने हे बदल साधले - कंपनीतर्फे गुजरातमधील तसेच कंधार आदी ठिकाणचे केळीचे प्लॉट पाहण्याची संधी या शेतकऱ्यांना मिळाली,
त्यातून लागवड व्यवस्थापनात बदल करणे शक्‍य झाले.
- उतिसंवर्धित व ग्रॅंड नाईन रोपांची लागवड होते.
- लागवडीचे अंतर सात बाय पाच फूट ठेवले आहे. किडी- रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच
मशागतीची कामे सुलभ करण्याच्या दृष्टीने हे अंतर आठ बाय पाच फूट करण्याचे नियोजन आहे.
- लागवडीचे मे व ऑगस्ट असे दोन हंगाम निवडले आहेत, त्याचबरोबर सुमारे दोन वर्षांत तीन पिके घेण्याचा प्रयोगही एक एकर क्षेत्रावर घेण्यात आला आहे.
- पूर्वी प्रति घडाला सुमारे 12 फण्या ठेवल्या जायच्या. एक ओळ घड आठ फण्यांपर्यंतच ठेवण्याचा प्रयोग केला. त्यात 21 ते 25 दिवस आधी माल काढणीस आल्याचे आढळले; तसेच 12 फण्या व आठ फण्या यांचे वजनही जवळपास तेवढेच असल्याचे दिसून आले.
- सध्या सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के ठिबक सिंचन केले आहे.
- जमिनीतून खते देण्याबरोबरच विद्राव्य खतांचा वापरही चांगल्या प्रकारे केला जातो.
- प्रति घडाचे वजन सरासरी 25 पासून ते 30 किलोपर्यंत मिळाले आहे.
- घड झाकण्यासाठी स्कर्टिंग बॅगचा वापर होतो.
- दरवर्षी पुढील पीक घेण्यापूर्वी माती व पाणी परीक्षण करून त्याआधारेच नियोजन केले जाते.
- सभासद शेतकऱ्यांना मिळालेले सरासरी उत्पादन - एकरी - 30 ते 35 टन, कमाल 42 टनांपर्यंतही मिळाले आहे.
- मिळणारा दर - लोकल मार्केटपेक्षा किमान एक रुपया अधिक दर दिला जातो. दर पाच दिवसांनी हे दर अपडेट केले जातात. त्यासाठी कंपनी व संघ यांचे प्रतिनिधी एकत्र बसून बाजारपेठेतील दरांचा आढावा घेतात व त्याप्रमाणे दर निश्‍चित करतात. गेल्या आठवड्यात प्रति टन 11 हजार 250 रुपये दर मिळाला. गेल्या दोन वर्षांत हा दर आठ हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे.

केळी उत्पादक व कंपनीचे अधिकारी यांच्यात संवाद साधण्याचे काम खरेदी- विक्री संघाचे संचालक मंडळ करते. त्याद्वारे त्या दिवशीच्या कामाचे नियोजन ठरते. शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांच्या बागेत जाऊन त्यांची अडचण दूर केली जाते.


केळी करार शेतीतून काय बदल झाले? प्रचलित पद्धती
- लागवड तंत्रज्ञान पारंपरिक होते.
- दर्जा व उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शनाचा अभाव होता.
-- व्यापारी शोधण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ व्हायची.
- दरांबाबत शाश्‍वती नव्हती.
- खासगी व्यापारी दर पाडून मागायचे.
- कच्चा माल काढल्यामुळे वजनात घट, पर्यायाने शेतकऱ्यांचा तोटा व्हायचा.
- शिल्लक माल ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने घेत.

करार शेती - सुधारित तंत्रज्ञान व मार्गदर्शन उपलब्ध झाले.
- त्याप्रमाणे
- दरांबाबत निश्‍चिती झाली, त्यामुळे नुकसान वाचले.
- वजनात पारदर्शकता आली.
किरण विलासराव पाटील,
अध्यक्ष, खरेदी- विक्री संघ (मो. 9881804545)

व्यापाऱ्यांची मानसिकता व त्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या विक्री व्यवस्थेच्या त्रासाला कंटाळून केळी लागवड बंद केली होती; परंतु करार शेतीतून विश्‍वास वाटला व नव्याने ही शेती सुरू केली. सध्या पाच एकर केळी आहे. आमचा माल संबंधित कंपनीद्वारे निर्यात केला जातो.
प्रशांत शिवाजीराव पाटील (मो. 7588167207)

सन 2005 पासून केळी लागवडीस सुरवात केली. व्यापाऱ्यांकडून खरेदी वेळी अडवणूक व्हायची, त्यामुळे संघटितरीत्या करार शेतीचा मार्ग स्वीकारला. सध्या माझ्याकडे आठ एकर केळी आहे. हे पीक फायदेशीर करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.

प्रमोद रामचंद्र पवार (मो. 9175018267)
प्रकाश राजाराम पाटील (मो. 9767311250)

Friday, 16 August 2013

मुसळीनं दिला धनाचा घडा

सातपुडा - पारंपरिक पद्धतीनं शेती करणाऱ्या चोपडा तालुक्यातील विरवडे गावातील शेतकऱ्याचं जीवन कृषी प्रदर्शनानं बदलून टाकलं. त्याला सफेद मुसळी या औषधी वनस्पतीची माहिती मिळाली. त्याचं त्यानं भरघोस उत्पन घेतल आणि त्याचं जीवनच बदलून गेलं. कुलदीप राजपूतच्या या यशस्वी प्रयोगानं गावकरी चकित झाले आणि त्यांनीही आपल्या शेतात सफेद मुसळीची लागवड करण्यास सुरुवात केली.


 
आधुनिक शेतीची पाळंमुळं आता हळूहळू रुजताहेत. आजचा तरुण शेतकरी नवनवीन शेतीचे प्रयोग आपल्या शेतामध्ये करून शेतीला नवीन दिशा देतोय. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विरवडे गावातील तरुण शेतकरी कुलदीप राजपूतनं सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर आपल्या उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून हरभरा आणि सफेद मुसळीची लागवड केली. या लागवडीतून पहिल्याच वर्षात चांगलं उत्पन्न आल्यानं त्यानं या पिकाबाबतची संपूर्ण माहिती संबंधित विभाग आणि व्यावसायिकांकडून घेतली. सफेद मुसळीची काढणी आणि त्यासंबंधीची सर्व माहिती मिळवल्यानंतर कुलदीप यांनी पुढील वर्षी सुमारे ३ एकरात आंतरपीक म्हणून पुन्हा एकदा सफेद मुसळीची लागवड केली. यामध्ये सुमारे ४ ते ५ क्विंटल प्रती एकर प्रमाणं पीक आलं आणि त्याला बाजारपेठेत चांगला भावही मिळाला.
आज याच गावातील २० ते २५ प्रयोगशील शेतकरी सफेद मुसळीचं यशस्वी उत्पादन घेत आहेत. सुरुवातीस आंतरपीक असलेल्या सफेद मुसळीची लागवड आता ते मुख्य पीक म्हणून करताहेत. स्वतः कुलदीपनं ५ एकर शेतात केवळ सफेद मुसळीचं पीक लावलंय. सुमारे १० एकरमधील केळी आणि हळदीच्या पिकात सफेद मुसळीची लागवड आंतरपीक म्हणून केलीय. यंदाच्या वर्षी कुलदीपला एकरी ७-८ क्विंटल उत्पादन मिळालंय. कोरड्या आणि स्वच्छ सफेद मुसळीला बाजारपेठेत सुमारे ८५-९५ हजार रुपये क्विंटल एवढा भाव मिळतोय. साधारणतः ४-५ क्विंटल ओली सफेद मुसळी वाळवली असता तिचं वजन सुमारे एक क्विंटल भरतं.
सफेद मुसळीची लागवड कशी कराल?
सफेद मुसळी ही कंदवर्गीय वनस्पती असून, या वनस्पतीसाठी रेतीमिश्रित आणि पाण्याचा निचरा होणारी शेती आवश्यक आहे. याचं उत्पादन सेंद्रीय पद्धतीनंच घ्यावं लागतं, नाहीतर त्यातील औषधी गुणधर्म टिकत नाहीत. त्यामुळं जैविक खतांचा वापर हा फायदेशीर ठरतो. कमी पाणी असणारी शेती या पिकास उपयुक्त आहे. या पिकासाठी उष्ण आणि समशीतोष्ण हवामान चांगलं आहे. शेतीची योग्य मशागत करून पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात आवश्यकतेनुसार सिंचन करून याच्या कंदांची लागवड करावी लागते. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये हे झाड वाळून जातं. वाळल्यानंतर साधारणतः तीन महिन्यांनी या कंदांची काढणी करतात आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून त्यांना उन्हात वाळवलं जातं. वाळलेल्या या कंदांचं साधारणपणे एकरी साडेचार क्विंटल उत्पादन मिळतं, तर कंदांना २००० रुपये प्रती किलो एवढा भाव मिळतो.

लागवडीसाठी लागणारी बियाणं, काढणीसाठी लागणारे कुशल मजूर, तसंच काढणीनंतर स्वच्छ धुऊन, साफ करून ती वाळवण्याची क्रिया अत्यंत महत्त्वाची असते. पारंपरिक पद्धतीनं वाळवत असताना तिच्या वजनात आणि आकारमानासह तिच्या सफेदपणावरही परिणाम होतात. तर तिला बाजारपेठेत नेत असताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. सफेद मुसळी ही वनउपज (वनात उत्पन्न झालेली) असल्यानं पूर्वी तिची वाहतूक करताना वन विभागाकडून परवाने आवश्यक असायचे. परंतु आता राष्ट्रीय वनौषधी आणि फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत अशा परवान्याची आवश्यकता नसतानाही पोलीस, तसंच वन कर्मचारी यांच्याकडून सफेद मुसळी उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत असते.
कंपन्यांकडून करारावर लागवड
येणाऱ्या पिढीला या औषधी वनस्पतीचा फायदा व्हावा यासाठी आता या वनस्पतीचं शास्त्रीय पद्धतीनं लागवड आणि संगोपन करणं गरजेचं झालंय. आज भारतातील अनेक औषध उत्पादक समूह सफेद मुसळीच्या लागवडीकडं वळलेत. आयुर्वेदिक औषधी उत्पादनात महत्त्वाचा घटक असल्यानं तिची लागवड आता अग्रगण्य औषधी कंपन्या करारावर करू लागल्या आहेत.
विविध औषधांमध्ये वापर
सफेद मुसळी ही नामशेष होत चाललेल्या वनौषधींपैकी एक आहे. यात २५ प्रकारचे अल्कोलॉईड जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि आवश्यक खनिजतत्त्व यांचा स्रोत आहे. यात असलेलं सेफोलिन नावाच्या पॉलिसेकेराइडद्वारे सापोझेनिन नावाचं स्टीरॉईड तयार होतं. याचा वापर अनेक आयुर्वेदिक आणि अॅलोपेथिक औषधांमध्ये केला जातो. नवतारुण्य, जोश आणि जोम प्राप्त करण्यासाठीसुध्दा या औषधाचा उपयोग केला जातो. नपुंसकत्व आणि शुक्रजंतूंची कमतरता यासाठी सफेद मुसळीतील स्टीरॉईड रामबाण उपाय आहेत.
सफेद मुसळीचं शास्त्रीय नाव – क्लोरोफायटम बोरिव्हिलानम, कुळ – लिलियसिस , मराठी नाव- पांढरी मुसळी, हिंदी नाव- सफेद मुसली, धोली मुसली, संस्कृत नाव- मुसला. दरवर्षी जागतिक बाजारपेठेत हिचं ५००० मेट्रिक टन एवढं उत्पादन होत असतं. बाजारपेठेत साधारण ४००० ते ५.५०० मेट्रिक टन एवढी मागणी असते. पूर्वी भारतीय जंगलांमध्ये सफेद मुसळी ही गाळप्रवण क्षेत्रात आढळायची. परंतु अनियंत्रित आणि अपरिपक्व सफेद मुसळीच्या तस्करीमुळं, तसंच वाढत्या जंगलतोडीमुळं ही वनस्पती आता दुर्मिळ होत चाललीय.
संपर्क – कुलदीप राजपूत – मोबाईल 9823263474

गोबर गॅस की बायोगॅस?

या अशा शीर्षकाचे कारण एवढेच की यातला नेमका फरक काही असेल तर तो लक्षात यावा एवढेच. मुळात हिंदीमध्ये शेणाला गोबर म्हणतात. याच गोबरपासून जो गॅस तयार होतो त्याला म्हणायचे गोबर गॅस. संपूर्ण देशभर तो गोबर गॅस नावानेच प्रचलित झाला. खरा तर हा एक प्रकारचा बायोगॅस प्लांटच. बायोगॅसची अगदी सुटसुटीत आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर "जैविक विघटनामधून तयार झालेला वायू' अशी करता येईल.

गोबर गॅस सुमारे 1970 च्या दशकात देशात, राज्यात अनेक ठिकाणी दिसायला लागले. खादी ग्रामोद्योग आयोग या निमसरकारी संस्थेने याचा प्रसार आणि प्रचार अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण देशभर केला. मुळात हा धोरणात्मक निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला होता त्याचे खरे कारण ""गोबर गॅस प्लांट'' हे नव्हतेच. उलट जनावरांच्या शेणाची योग्य वासलात लावण्याची एक आदर्श व्यवस्था असे म्हणता येईल. यात मिळणारा गोबर गॅस बोनस होता. पारंपरिक पद्धतीने उघड्यावरच शेण टाकल्यामुळे त्यावर माश्‍या आणि डास बसतात, शेणाच्या विघटनातून वायू निर्माण होतात. या सर्व प्रकारातून रोगराई पसरते. या सर्वांवर प्रभावी उपाय म्हणजे गोबर गॅस प्लांट.

...असा तयार होतो गोबर गॅस गोबर गॅस तयार होणं ही एक शेणाच्या नैसर्गिकरीत्या होणाऱ्या विघटनाची पायरी आहे. जनावरांच्या शेणामध्ये त्यांनी खाल्लेला चारा, कडब्याचे अंश असतात. तसेच त्यांच्या पोटातून बाहेर पडणारे विनॉक्‍सी जिवाणू असतात. हे जिवाणू शेणामध्ये त्यांचे अन्न शोधून उपजीविका करतात. मुळात या जिवाणूचं अन्न काय हे तपासायला लागलो तर लक्षात येतं की हे खातात फक्त पिष्टमय पदार्थ किंवा शर्करा. शेणामध्ये या पदार्थांचं प्रमाण अतिशय अल्प असतं आणि याला कारणही तसंच असतं. गाई, म्हशींना चारा दिल्यावर तीन पदार्थ बाहेर येतात ते म्हणजे मूत्र, शेण आणि दूध. बैलाच्या बाबतीत त्याची ताकद आपल्या उपयोगाची ठरते. गाई, म्हशींच्या दुधाचं पोषणमूल्य लक्षात घेता, बाहेर पडलेल्या शेणात फक्त चोथाच असतो, हे सहजी पटण्यासारखे आहे. तरी त्याच शेणात हे जिवाणू आपले

अन्न शोधत असतात. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर एक किलो शेणापासून सुमारे 40 लिटर बायोगॅस तयार होतो तोही 40 दिवसांत म्हणजे विघटनाचा कालावधी सुमारे सहा ते सात आठवड्यांचा. त्यामानाने गोबर गॅस अगदीच कमी, अगदी एल.पी.जी. गॅसच्या भाषेत सांगायचे झाले तर फक्त 18 ग्रॅम गॅस. साधारणपणे प्रति जनावर दररोज सुमारे 10 ते 12 किलो एवढे शेण मिळते आणि त्यापासून गोबर गॅस तयार होतो सुमारे 400 ते 480 लिटर. हे तयार होण्यासाठी घरातल्या बाईच्याच मागे कामाचा बडगा. एक पाटी पाणी घालून कालवलेले मिश्रण बायोगॅस प्लांटमध्ये ओतायचे. दिवसात किमान एकदा किंवा दोनदा.
जैववायू आणि गोबर गॅस यात तयार होणाऱ्या वायूंचे नाव जरी समान असले तरी संयंत्राच्या आकारमानात, उभारणीत ढोबळमानाने काही फरक करता येतात. जसं की गोबर गॅस प्लांटमध्ये फक्त शेणकाला भरला जातो. त्यात उपलब्ध स्टार्च आणि शुगरच्या प्रमाणावर गोबर गॅस तयार होतो. बायोगॅस प्लांटमध्ये दैनंदिन भरणा करताना जरी शेण वापरत नसले तरी सुरवातीला एकदा शेणकाला भरावाच लागतो आणि दैनंदिन भरणा करायच्या वस्तूंमध्ये स्टार्च, शुगरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अधिक प्रमाणात बायोगॅस निर्मिती.
दुसरा एक महत्त्वाचा फरक म्हणजे धारणा काळ किंवा जैविक अपघटन होण्याचा कालावधी. गोबर गॅस प्लांटमध्ये हा सुमारे 40 ते 45 दिवसांचा असतो. या दोन्हीतील काही इतर फरक खालील तक्ता जास्त स्पष्ट करेल.


...असे असते गोबर गॅस संयंत्र गोबर गॅस संयंत्र नेमके कसे असते हे सोबतच्या आकृतीवरून स्पष्ट होईल. त्यातील घटकांची नावेही त्यांच्या कार्याप्रमाणे ठरलेली आहेत. कोणत्याही संयंत्रात पाच घटक असावे लागतात. त्यांच्या संयुक्त संचाला बायोगॅस प्लांट असे म्हणतात. याशिवाय सोबत पाच असेही घटक आहेत, की जे योग्य नियंत्रणात राखले तरच वायूनिर्मिती होते.
1) डायजेस्टर - पाचक टाकी
2) गॅस होल्डर - वायूधारक टाकी
3) इनलेट - आदान मार्ग
4) आऊटलेट - प्रदान मार्ग
5) गॅस कॉक - वायू नियंत्रक तोटी

गोबर गॅस संयंत्र बंद का पडतात? गेल्या सुमारे 30-35 वर्षांच्या कालावधीत आस्थापित झालेली दोन ते अडीच लाख गोबर गॅस संयंत्रे महाराष्ट्रात आहेत. त्यांची अवस्था मात्र अशी आहे, की केवळ दोन ते तीन टक्के संयंत्रे चालू स्थितीत दिसतात. बाकीची संयंत्रे निरनिराळ्या कारणांमुळे बंद आहेत. ही संयंत्रे नेमकी बंद पडण्याची कारणे काय? याचा खोलात जाऊन अभ्यास केल्यावर काही गोष्टी प्रकर्षाने निदर्शनास आल्या.
1) गेल्या काही दिवसांत सेंद्रिय शेतीला आलेले महत्त्व आणि जमिनीचा कर्ब आणि नत्र गुणोत्तर (C : N रेशो) सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेला शेण किंवा शेणखताचा वापर. या प्रकरामुळे शेण बायोगॅस संयंत्रात न घालता ते उघड्यावर ठेवून त्याचा तसाच शेणखत म्हणून केलेला वापर. आता असे का विचाराल, तर कोरडे शेण शेतात वाहून न्यायला सोपे असते, तर गोबर गॅस संयंत्रातून बाहेर पडणारी शेणाची स्लरी पातळ आणि थोड्या प्रमाणात प्रवाही असते, ती गोबर गॅस प्लांटपासून शेतात नेणं जिकिरीचं होतं.
2) जनावरांची संख्या घटणे हेही गोबर गॅस प्लांट मागे पडण्याचे कारण आहे. काळ्या जमिनीमध्ये केलेले गोबर गॅस बांधकाम, त्याची झालेली सेटलमेंट आणि त्यामुळे बांधकामास गेलेल्या चिरा आणि भेगा यामधून वायू निसटून जायला लागला आणि तक्रारी वाढायला लागल्या, की हे संयंत्र दोन-तीन वर्षे चालते मग बंद पडते. वास्तविक अनुदानापोटी बांधली गेलेली ही संयंत्रे कारागिरांची कुशलता, वापरल्या जाणाऱ्या मटेरिअलची गुणवत्ता आणि काही प्रमाणात बांधकामातील सदोषता ही कारणं मागंच राहिली.
3) कितीतरी ठिकाणी लोखंडी वायूधारक टाक्‍या गंजल्या, पण त्यांना वर्षभरातून एकदा रंगही लावला गेला नाही. असं असतानादेखील अनेक बायोगॅस संयंत्रे आजमितीला अगदी 30 ते 35 वर्षेही उत्तमरीत्या चालू आहेत. याचं खरं कारण म्हणजे, त्यात केला गेलेला दैनंदिन शेणकाल्याचा भरणा आणि वर्षातून त्याची एकदा केलेली देखभाल.

शेण आणि गोबर गॅस प्लांटच्या स्लरीमधील जैविक खताची मात्रा -
गोष्ट उपयोगी जिवाणूंची... इथं एक गोष्ट मुद्दाम सांगाविशी वाटते आपल्या लहानपणी आपले आई-वडील आपल्याला असं सांगायचे, की रस्त्यामध्ये जर गाय दिसली तर तिला नमस्कार करावा. कारण विचारलं तर सांगायचे, की तिच्या पोटात 33 कोटी देव असतात. मी मुळात पुण्याचा मंडई भागामध्ये वाढलो. तिथे रस्त्यानं चिकार गाई फिरायच्या. आमच्या मंडईत गणपतीचं एक देऊळही आहे. "शारदा गजानना'ची ही मूर्तीही विलक्षण, अगदी पोटभर जेवण करून लोडाला टेकून बसलेली. ही मूर्ती पाहिली की मला आमच्या आईचं वाक्‍य आठवायचं आणि प्रश्‍न पडायचा हा एवढा मोठा गणपती जर गाईच्या पोटात बसला तर बाकीच्या देवांना जागा उरतेच कुठे? म्हणून हे प्रकरण मी आमच्या वडिलांच्या कोर्टात नेलं. माझेच वडील ते माझ्यापेक्षा अधिक चतुर. गंभीरपणे ते मला म्हणाले, हे बघ हा प्रश्‍न तुला पडलाय की नाही. मी हो म्हणताच ते म्हणाले, मग मला असं वाटतं या प्रश्‍नाचं उत्तर तूच शोधलं पाहिजेस. वयाच्या आठव्या वर्षात हा नको तो पडलेला प्रश्‍न, पण त्याचं उत्तर सुमारे 30-32 वर्षांनी मी जेव्हा बायोगॅसमध्ये मूलभूत संशोधनाला सुरवात केली तेव्हा मिळालं.
जरा विचार करू या... गाय खाते हिरवा ओला चारा आणि कडबा. जोडीला पाणीही पिते. गाईपासून आपल्याला मिळते सकस दूध, गोमूत्र आणि शेण. म्हणजे तिचं पोट ही जणू काही एक प्रकारची जैव-रासायनिक प्रयोगशाळाच असली पाहिजे. ज्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं रूपांतर दुधामध्ये होतं. जेव्हा ही प्रक्रिया होते त्या क्रियेमध्ये तिच्या पोटात असलेले अनेक जिवाणू काम करतात आणि इथं लख्ख प्रकाश पडला. या सर्व जिवाणूंना एकत्रित करून जर त्यांची संख्या मोजली तर जाते सुमारे 33 कोटींच्या घरात. हे सर्व जिवाणू आपल्या पूर्वजांनी जपण्यासाठी त्यांना चक्क देवरूप मानलं.
...मग मुळात हा जिवाणू कोण? आला कुठून? असे प्रश्‍न पडायला लागले. उत्तरंही सापडली. तीही अगदी सुसूत्र अशीच. मुळामध्ये हा जिवाणू आपल्या पृथ्वीतलावर जन्मलेला पहिला जीव आणि महत्त्वाचं म्हणजे तेव्हा पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती झालेली नव्हती. पुढे जसजसे वायू निर्माण व्हायला लागले, त्यात ऑक्‍सिजनची निर्मिती झाली. हा वायू तुम्हा- आम्हाला जरी जीवनदान देत असला, तरी त्यांना मात्र प्रदूषणकारी ठरला. मग ही जिवाणू जमात चतुर निघाली. त्यांनी लपण्यासाठी जागा शोधल्या. त्याही कुठं? तर चक्क सर्व जनावरांच्या, माणसाच्या पोटातल्या आतड्यात. तिथं ऑक्‍सिजनही नव्हता आणि जनावर जे खातात त्यातलं अन्नही त्यांना मिळत होतं. जगण्यासाठी, एक शोधायला लागलं तर ते सापडता सापडता अजून काही सापडावं अशा अर्थाचंच हे एक बॅक्‍टेरिया पुराण.

केशर आंब्याची सघन लागवडीची "सावळज पद्धत'

सावळज (जि. सांगली) येथे पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे सांगली भागातील द्राक्षपीक अडचणीत येऊ शकते. त्याला पर्याय पीक म्हणून आंबा पिकाचा विचार द्राक्ष शेतीत अग्रणी स्थान असलेले कै. आबा म्हेत्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या चर्चेतून केला. दरम्यानच्या काळात पंतनगर कृषी विद्यापीठात आंब्यावर सघन लागवडीचे प्रयोग सुरू आहेत असे त्यांना समजले. तेथे जाऊन पाहणी केल्यावर डॉ. संतराम यांचे विद्यार्थी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात काम करीत असल्याचे समजले. त्यानंतर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. शंकरराव मगर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्यानुसार डॉ. पुजारी व कै. आबा म्हात्रे व त्यांच्या सहकार्याने सावळज येथील श्री. चिवटे यांच्या शेतावर सघन लागवडीचे तंत्रज्ञान 2002 पासून 2010 पर्यंत अभ्यासले गेले त्याबाबतचे निष्कर्ष 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेत वाचले गेले. त्याचा हा थोडक्‍यात वृत्तांत.

आंब्याची सघन लागवड पद्धत महाराष्ट्राचा विचार केला असता भारतात आंबा लागवडीत राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. उत्पादनाचा विचार करता देशातील आंबा उत्पादनापैकी 5.6 टक्के उत्पादन आपल्या राज्यात तयार होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने केशर, हापूस आणि पायरी या जाती जास्त लोकप्रिय आहेत. आंब्याची लागवड प्रामुख्याने 10 x 10 मीटर अंतरावर केली जाते. राज्याची उत्पादकता पाच टन प्रति हेक्‍टर आहे. इतर फळपिकांच्या मानाने ही उत्पादकता फारच कमी आहे. जर ती वाढवायची असेल तर सघन लागवड तंत्रज्ञान हा उत्तम पर्याय आहे. यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात सांगली जिल्ह्यातील सावळज या गावी शेतकऱ्यांच्या शेतावरच केशर या आंबा जातीवर या तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला. या गावात पाऊसमान 400 मि.मी. असून पाण्याची पातळी 10 मी.च्या खाली आहे. तसेच पाण्याची उपलब्धताही फारच कमी आहे. आंब्याच्या मोहोर आणि काढणी या वेळेमध्ये सरासरी तापमान हे 43 अंश +1 इतकी तर आर्द्रता 24 टक्‍क्‍यांच्या खाली असते.

लागवड- प्रयोगात 2002 मध्ये 5 x 4 मीटर अंतरावर खड्डे खणून केशर आंब्याची लागवड करण्यास आली. तर एका रांगेत 10 x 10 मीटर अंतरावर खड्डे खणून पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात आली. 80 सें.मी. लांब, 80 सें.मी. रुंद व 80 सें.मी. खोल असे खड्डे एप्रिल महिन्यात घेण्यात आले. दोन महिने उन्हात तापल्यानंतर त्यामध्ये 25 किलो शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कीटकनाशक टाकून मातीमध्ये मिसळून खड्डा भरण्यात आला. या खड्ड्यामध्ये ऑगस्ट महिन्यात 90 टक्के केशर आणि 10 टक्के हापूस झाडे लावण्यात आली. झाडांची वाढ झाल्यानंतर बांबूच्या काठीने त्याला आधार देण्यात आला. किडी- रोगांच्या नियंत्रणासाठी वेळेवर उपाययोजना करण्यात आल्या.

वळण आणि छाटणी : डॉ. संतराम, सिंग आणि डॉ. पुजारी यांनी दशहरी आंब्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानानुसार झाडांची छाटणी आणि वळण देण्यात आले. झाडाची उंची एक मीटर झाल्यानंतर झाडाच्या शेंड्याकडील देठ खुडण्यात आले. नवीन आलेल्या फुटव्यांपैकी तीन-चार जोमदार फुटवे ठेवण्यात आले. या फांद्या तयार झाल्यानंतर पुनःश्‍च नवीन फूट आली. त्या वेळेसही शेंड्याकडील फूट खुडण्यात आली. वरील फुटव्यांतील तीन ते चार सशक्त फुटवे ठेवून बाकीचे काढण्यात आले. अशा पद्धतीने झाडाचा आकार छत्री प्रकाराचा करण्यात आला.

पाणी आणि खत व्यवस्थापन - लागवड झाल्यानंतर ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना पाणी देण्यात आले. पहिल्या वर्षी फक्त एक ड्रीपर बसविला. झाडांचे वय वाढत जाईल अशी संख्या सहाप्रमाणे नेण्यात आली. दुसऱ्या वर्षीपासून पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे आणि खतांचा जास्त प्रमाणात निचरा होऊन निघून जाऊ नये यासाठी डिफ्युजरचा वापर करण्यात आला (डिफ्युजर उंची- 25 सें.मी., व्यास 15 सें.मी व जाडी 2.5 सें.मी.)

डिफ्युजर झाडांच्या भोवती खते ज्या रिंगणात दिली जातात त्या ठिकाणी बसविण्यात आले. डिफ्युजर 15 सें.मी. जमिनीत व 10 सें.मी. वरती राहील या पद्धतीने ठेवण्यात आले. आठवड्यातून झाडांना 50 लिटर पाणी देण्यात आले. नत्र स्फुरद व पालाश खतांबरोबरच मॅग्नेशिअम सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, बोरॅक्‍स ही खते डिफ्युजरच्या माध्यमातून देण्यात आली. मोहोर वेळेवर यावा यासाठी चौथ्या वर्षापासून ऑगस्ट महिन्यात चार मि.मी. प्रति झाडाचा विस्तार, तर दुसऱ्या वर्षी दोन मि.मी. प्रति कॅनॉपी झाडांचा विस्तार यानुसार दरवर्षी पॅक्‍लोब्युट्रोझॉल ऑगस्ट महिन्यात देण्यात आले.

पशुपालन, फळबागेतून शेती केली फायद्याची...

डहाणू (जि. ठाणे) येथील प्रशांत शाह हे परिसरातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. शाह यांनी सन 1991 मध्ये बी.एस्सी. बॉटनीची पदवी घेतल्यानंतर शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. डहाणूमध्ये त्यांचा वडिलोपार्जित दूध व्यवसाय होताच. या व्यवसायाच्या बरोबरीने त्यांनी घरच्या 30 एकर जमिनीची लागवडीच्यादृष्टीने आखणी केली. यामध्ये फळबाग, धान्य पिके, चारा पिके असे लागवडीचे नियोजन केले. जमिनीचे व्यवस्थापन करताना जल- मृद संधारणाच्यादृष्टीने बांधबंदिस्ती केली. शेत परिसरातील ओहोळाला आडवा सिमेंट बांध घातला. विविध पिकांच्या लागवडीच्यादृष्टीने कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.

फळबाग ठरली फायदेशीर - फळबाग लागवडीबाबत शाह म्हणाले, की तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मी फळबागेचे नियोजन केले. वडिलांनी 40 वर्षांपूर्वी चिकूच्या कालीपत्ती, क्रिकेट बॉल या जातींची 10 एकर क्षेत्रावर लागवड केलेली होती. त्याचबरोबरीने मी 15 वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने 15 एकर क्षेत्र चिकू लागवडीखाली आणले. या बागेची योग्य पद्धतीने छाटणी, खत व्यवस्थापन, कीड- रोग व्यवस्थापन ठेवले. सध्या जुन्या बागेतून प्रति वर्षी प्रति झाडापासून 200 किलो आणि नवीन लागवडीतून प्रति झाड 150 किलो उत्पादन मिळते. सरासरी सहा ते सात रुपये प्रति किलो असा दर मिळतो. चिकूची प्रतवारी करून स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री केली जाते.
चिकूच्या बरोबरीने पाच एकर क्षेत्रावर वडिलांनी हापूस, पायरी या जातींची लागवड केली होती. या बागेचेही सुधारित पद्धतीने व्यवस्थापन सुरू केले. त्याचबरोबरीने 1999 मध्ये दोन एकर क्षेत्रावर हापूस आणि दोन एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली. या कलमांना शिफारशीनुसार खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड- रोग नियंत्रण केले जाते. या आंबा फळबागेतून यंदाच्या वर्षी 20 टन आंबा उत्पादन मिळाले. फळांची विक्री स्थानिक व्यापाऱ्यांनाच केली जाते. शेताच्या बांधावर 100 बाणवली जातीच्या नारळाची लागवड केली आहे; तसेच दरवर्षी भात काढणी झाल्यावर दोन एकर क्षेत्रावर भाजीपाला व चाऱ्यासाठी मका, ज्वारीची लागवड केली जाते.
1) फळबागांना सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त पुरवठा केला जातो, तसेच गोबरगॅसच्या स्लरीचा देखील वापर केला जातो. दरवर्षी मे- जून महिन्यात प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ शेणाची स्लरी व भाताचा पेंढा गाडून दिला जातो. ऑक्‍टोबर महिन्यात कुजलेले शेणखत बागेला दिले जाते, यासोबत गांडूळ खताचाही पुरेसा वापर केला जातो.
2) फळमाशीच्या नियंत्रणासाठी सापळे लावलेले आहेत. तसेच, गरजेप्रमाणे तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीड व रोग नियंत्रणासाठी कीडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात.
3) पाणी टंचाई लक्षात घेऊन सन 2006 मध्ये शेतात 35 मीटर बाय 30 मीटर बाय पाच मीटर आकाराचे शेततळे खोदले. त्यात प्लॅस्टिक पेपर अंथरूण बागेसाठी संरक्षित पाण्याची सोय केली. शेतीला पाणी व्यवस्थापनासाठी दोन कूपनलिका आणि दोन विहिरी आहेत.
4) आंबा व चिकूच्या बागेमध्ये वर्षभर मधमाश्‍यांच्या सहा पेट्या ठेवलेल्या आहेत. मधमाश्‍यांमुळे आंबा व चिकू पिकाची फळधारणा चांगली होऊन उत्पादनवाढीसाठी मदत होते. दरवर्षी 25 ते 30 किलो मध मिळतो.

अभ्यासातून वाढविला दुग्ध व्यवसाय - साधारणपणे 53 वर्षांपूर्वी प्रशांत शाह यांच्या आई सौ. वनिता शाह यांनी सुरू केलेला दूध व्यवसाय आज नावाजलेल्या वनिता डेअरीत रूपांतरित झाला आहे. डहाणू तालुक्‍यातील दुधाची मागणी लक्षात घेऊन शाह यांनी दूध व्यवसाय मोठ्या स्वरूपात करण्याचे ठरविले.
हवेशीर गोठा -
1) गाई- म्हशींच्या व्यवस्थापनासाठी 114 फूट लांब, बाय 30 फूट रुंदीचा हवेशीर गोठा बांधला. वासरांसाठी स्वतंत्र गोठा बांधला आहे.
2) गोठ्यात जमिनीला खाली दगडाचे पिचिंग करून चारही बाजूंनी हवा खेळती राहील अशी व्यवस्था केली आहे.
3) हवेशीर गोठा, चारा खाण्यासाठी गव्हाण, गाईंचे मूत्र तसेच धुण्याचे पाणी सहज बाहेर निघून जाईल अशा प्रकारे गोठ्याला उतार दिला आहे.
4) जनावरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी 10,000 लिटरची टाकी बांधली.
5) वर्षभर पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी नेपिअर, मका व ज्वारीची दोन एकर क्षेत्रावर लागवड.
6) हिरव्या चाऱ्यासोबत कडबा व भाताच्या पेंढ्यांचा वापर. वाळलेला चारा साठविण्यासाठी स्वतंत्र शेड.

गोठ्याचे व्यवस्थापन - 1) शाह यांच्याकडे 58 मुऱ्हा म्हशी आणि सहा जर्सी, सात होल्स्टिन फ्रिजीयन गाई आहेत. जनावरांची देखभाल करण्यासाठी सात माणसे पूर्णवेळ काम करतात.
2) गोठ्यामधील शेण ताबडतोब उचलले जाते, त्यामुळे दुर्गंधी येत नाही, माश्‍यांचे प्रमाण कमी, जनावरांच्या अंगाला शेण लागत नाही.
3) गाई- म्हशींना उन्हाळ्याच्या दिवसांत रोज दुपारी एकदा आणि हिवाळ्यात तीन दिवसांतून एकदा स्वच्छ पाण्याने अंघोळ.
4) दर सहा महिन्यांनी म्हशींच्या अंगावरील केस कापले जातात.
5) गोठ्यामध्ये प्रकाश सापळा लावला आहे. संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत यामध्ये दिवे लावले जातात. या सापळ्यामुळे जनावरांना त्रास देणाऱ्या माश्‍या अडकून मरतात.
6) रोज ठराविक वेळी गाई- म्हशींना वेगवेगळे संगीत आणि भजने ऐकवली जातात. याचा गाई- म्हशींच्या वर्तनावर आणि दूध देण्यावर सकारात्मक परिणाम होतो, असा त्यांचा अनुभव आहे.
7) गाय- म्हैस व्यायल्यानंतर नर वासरू झाले तरी ते विकले जात नाही, त्याचा योग्यरीत्या सांभाळ केला जातो.
8) गाई- म्हशी धुतल्यानंतर गोठ्यातील शेण- पाणी, मूत्र 13,000 लिटरच्या टाकीत जमा होते. नंतर हे पाणी मर्ड पंपाद्वारे शेतीला दिले जाते.
9) गोठ्याजवळच गोबरगॅस युनिट उभारले. गॅसचा उपयोग स्वयंपाकासाठी केला जातो.

आहार आणि आरोग्य व्यवस्थापन - 1) दुग्ध उत्पादनाच्यादृष्टीने दररोज प्रति जनावर 15 किलो ओला चारा आणि सहा किलो कडबा कुट्टी करून दिला जातो.
2) गाई- म्हशींच्या वाढीच्या गरजेनुसार तूर चुनी, मका चुनी, उडीद चुनी, सरकी पेंड, गव्हाच्या भुश्‍श्‍याचा आहारामध्ये वापर.
3) थंडीच्या काळात जनावरांना ओवा, गूळ, खोबरे, काळे मीठ, काळेजिरे यांचे योग्य प्रमाणात मिश्रण दिले जाते.
4) गाईंच्या माजानुसार कृत्रिम रेतन केले जाते. म्हशींना नैसर्गिक रेतन केले जाते. रेतनासाठी जातिवंत मुऱ्हा रेडा ठेवला आहे.
5) गाई- म्हशींना आराम व रवंथ करण्यासाठी भरपूर वेळ दिल्याने दुधात चांगली वाढ मिळते.
6) गाई- म्हशींना पशुतज्ज्ञांकडून वेळेवर लसीकरण केले जाते. चांगला खुराक, हवेशीर गोठा यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
7) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण; तसेच आणंद येथील अमूल डेअरीला भेट आणि प्रशिक्षण यांतून पशुपालनामध्ये सुधारणा.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री - 1) दररोज पहाटे चार वाजल्यापासून गोठा व्यवस्थापनाला सुरवात. सध्या 22 म्हशी आणि आठ गाई दुधात आहेत. एक म्हैस सरासरी दररोज 12 लिटर, तर गाय 16 लिटर दूध देते. सकाळी आणि संध्याकाळी दूध काढल्यानंतर एक आणि दोन लिटरच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग करून विक्री. स्वतःच्या चार चाकी गाडीतून डहाणूमधील ग्राहकांना घरपोच दूध पिशवीचे वाटप.
2) सध्या दररोज 200 लिटर ताज्या दुधाची विक्री. गाईचे दूध 44 रुपये प्रति लिटर आणि म्हशीचे दूध 54 रुपये प्रति लिटर या दराने विक्री. दर जास्त असला तरी गुणवत्तेमुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद.
3) दुधापासून दही, ताक, लोणी, श्रीखंड व तूप निर्मिती; श्रीखंडाला आगाऊ मागणी.
4) दुभत्या गाई- म्हशीचे खाद्य, मजुरी तसेच इतर गरजेचे व्यवस्थापन धरून दररोज प्रति जनावर 200 रुपये खर्च होतो. सर्व खर्च वजा जाता सरासरी 80 ते 100 रुपये नफा मिळतो.
5) वासरे आणि कालवडींची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली जाते.
6) वर्षाला 80 ट्रक शेणखताची निर्मिती. एक ट्रक शेणखताची 2500 रुपयांनी विक्री. एक पॉवर टिलर ट्रॉली 700 रुपये याप्रमाणे जवळपासच्या शेतकऱ्यांना पोच दिली जाते.
7) डेअरीला भेट देण्यासाठी मुंबईचे पर्यटक तसेच शेतकऱ्यांच्या सहली, त्यामुळे येत्या वर्षात कृषी आणि डेअरी पर्यटनाला सुरवात करण्याचे नियोजन.

प्रशिक्षण आणि सहकार्यातून शेतीत प्रगती 1. शेती करताना सतत शिकत राहिले पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणाला उपस्थिती
2. शेती करताना वेगवेगळ्या पिकांची तसेच जोडधंद्यांची सांगड महत्त्वाची
3. परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
4. शेतीच्या व्यवस्थापनात वडील, आई, पत्नी, भाऊ, वहिनी आणि बहिणीचे सहकार्य
5. कृषी विभागाचा "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार, ठाणे जिल्हा परिषदेतर्फे "प्रगतिशील शेतकरी' म्हणून सन्मानपत्र, भारतीय समाज विकास अकादमीतर्फे "राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप 2012'चे मानकरी म्हणून गौरव

संपर्क :
प्रशांत शाह - 9226044270
प्रा. सहाणे - 8087985890
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे येथे कार्यरत आहेत.)

शेतमजुरी ते शेतमालक... रसाळ कुटुंबाला टरबुजाने दिली ओळख

बारामती (जि. पुणे) येथील अवर्षणग्रस्त भागामध्ये वडिलोपार्जित केवळ दीड एकर क्षेत्र गोरख व सोमनाथ रसाळ यांच्याकडे होते. या क्षेत्रामध्ये कुटुंबाची गुजराण करण्यासाठी मजुरी करावी लागत असे. पुढे 1997 ते 2000 या कालखंडामध्ये गोरख व सोमनाथ रसाळ यांनी आपल्या मामाची दहा एकर शेती अर्धेलीने (अर्ध्या हिश्‍श्‍याने) करावयास घेतली. 2002 या वर्षी अर्धेलीच्या उत्पन्नात आणि कोरडवाहू क्षेत्राची विक्री करून मिळालेल्या रकमेची भर घालून बागायती तीन एकर शेती विकत घेतली. पाण्याची सोय थोडीच असल्याने, त्यातील दीड एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली. त्यातून 15 टन उत्पादन मिळाले. त्या वेळी पुणे व मुंबई मार्केटमध्ये दर अत्यंत कमी (दहा रुपये प्रति किलो) असल्याने रेल्वेने पंजाब येथील लुधियानामधील बाजारात माल पाठवला. पाठविण्यासाठी सहा रुपये प्रति किलो खर्च आला असला, तरी दर सुमारे 26 रुपये प्रति किलो मिळाला. चांगले उत्पन्न मिळाल्याने हुरूप वाढला. द्राक्षशेतीने त्यांना खुणावले. वाइनसाठीची द्राक्ष लागवड केली. त्यामध्ये आंतरपीक म्हणून 2006 मध्ये प्रथम त्यांनी टरबुजाची लागवड केली. वाइनच्या द्राक्षामध्ये त्यांना अपयश आले तरी टरबुजाने मात्र चांगली साथ दिली. आंतरपीक म्हणून सुरवात झालेले टरबूज हळूहळू त्यांचे मुख्य पीक झाले. दरवर्षी हंगामात आणि बिगरहंगामी असे टरबुजाचे पीक ते 2006 पासून घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे चार एकर टरबूज, एक एकर क्षेत्रावर कलिंगड, दोन एकर वांगे हे पीक आहे.

गावामध्ये होत जातोय पीकबदल बोरीबेल (ता. दौंड, जि. पुणे) या गावाची लोकसंख्या सुमारे दोन ते अडीच हजार आहे. जवळ असलेल्या दौंड सहकारी साखर कारखान्यामुळे या गावात वर्षभर उसाचे पीक घेतले जाते. गावामध्ये उसाचे क्षेत्र सर्वाधिक असून, अन्य पिकामध्ये टरबूज आणि कलिंगडाच्या पिकामध्ये वाढ होत आहे. आता या गावात हंगामामध्ये साधारणतः शंभर शेतकरी व बिगर हंगामामध्ये साठ शेतकरी टरबूज व कलिंगडाचे पीक घेत आहेत.

नियोजन, अभ्यासातून साधले टरबुजाचे पीक आंतरपीक म्हणून सुरू झालेला टरबुजाचा हा प्रवास हळूहळू मुख्य पिकापर्यंत पोचला आहे. हंगामी लागवडीसाठी मे महिन्यात मशागत केल्यानंतर आठ फुटांवर वाफे करून त्यावर प्लॅस्टिक आच्छादन केले. त्या वाफ्यावर दोन फुटांवर टरबुजाच्या देठ सुटणाऱ्या वाणांच्या बियांची लागवड केली जाते. बियाण्यांचा खर्च सात हजारांपर्यंत होतो. याचा गर हा भगव्या रंगाचा असून, उत्पादन 12 ते 14 टनापर्यंत मिळते. याचा साठवण कालावधी पाच ते सहा दिवसांचा असतो.
बिगर हंगामी लागवड करताना पावसामुळे देठ खराब होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे देठ न सुटणाऱ्या वाणांची लागवड केली जाते. बियाण्यांचा खर्च सुमारे 11 हजार रुपयांपर्यंत येतो. याचा गर पांढऱ्या रंगाचा असून, उत्पादन 10 ते 12 टनापर्यंत येते. या वाणांचा साठवण कालावधी साधारणतः 15 ते 20 दिवसांचा असल्याचे रसाळ यांनी सांगितले.

शेतातील पिकांचे योग्य प्रकारे नियोजन - सध्या शेतात टरबूज, वांगी, कलिंगड पिके
- सर्व पिकांची प्लॅस्टिक मल्चिंगवर लागवड
- पाणी बचतीसाठी सर्व पिकांची ठिबकवर लागवड
- ठिबकद्वारे विद्राव्य खते पिकांना दिले जातात.
- पाणी साठवणुकीसाठी एक लाख लिटरची टाकी

रोग व किडीचे व्यवस्थापन - - लागवड केल्यानंतर टरबुजाच्या पिकावर प्रामुख्याने मावा, डाऊनी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव
- रोग व कीड नियंत्रणासाठी योग्य त्या आंतरप्रवाही, स्पर्शजन्य कीडनाशकांचा वापर

खत व्यवस्थापन - - टरबुजाची लागवड केल्यानंतर -
वाढीची अवस्था - पहिले तीस दिवस - दिवसाआड 19-19-19 एकरी 25 किलो
- फुलकळी लागल्यानंतर- 30 दिवसांनंतर दिवसाआड 12-61-0 एकरी 25 किलो, 0-52-34 एकरी 25 किलो, 13-0-45 प्रति एकर 25 किलो
- फळे काढणीच्या 10 दिवस अगोदर, तीन दिवसाआड - 0-0-50 एकरी 25 किलो
- या बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो.

टरबूज पिकाचा एकरी खर्च रासायनिक खते - 8,000
विद्राव्य खते - 13,000
प्लॅस्टिक मल्चिंग - 9,000
बियाणे - 8,000
लागवड - 2,000
कीटकनाशके - 12,000
मजूर - 6,000
वाहतूक - 12,000
आडत, हमाली - 15,000
-
झालेला एकूण खर्च- 85,000
आतापर्यंत मिळालेले उत्पादन - 12 टन

टरबुजाची काढणी - - जुलैपासून टरबुजाच्या काढणीस सुरवात
- आतापर्यंत पाच काढण्या पूर्ण
- अजून एक ते दोन काढणी होण्याची अपेक्षा
- आजवर मिळालेला दर - 20 रु. सरासरी प्रति किलो
- एकूण उत्पन्न - 2,40,000

टरबुजाचे विक्रीचे नियोजन - - बाजारामध्ये तालुका व जिल्हा बाजारांचा परिपूर्ण अभ्यास
- पुणे व मुंबई येथील मार्केटमध्ये टरबुजाची विक्री
- निवड करून मालाची विक्री
- वाहतुकीसाठी छोटा टेम्पो व प्लॅस्टिक क्रेटचा वापर

पाणी व्यवस्थापन - सध्या पाण्यासाठी शेतात दोन बोअरवेल आहे. एका बोअरला दीड इंच, दुसऱ्या बोअरला एक इंच पाणी आहे. शेतात एक लाख लिटर क्षमतेची सिमेंट कॉंक्रिटची पाण्याची टाकी बांधली आहे. या टाकीत दोन्ही बोअरचे पाणी एकत्र केले जाते. तिथून पाणी ठिबकद्वारे 12 एकर क्षेत्रासाठी वापरले जाते. गेल्या चार वर्षांपासून हळूहळू सर्व क्षेत्र ठिबकवर आणले आहे. या नियोजनामुळे मागील वर्षीच्या दुष्काळात पाण्याची टंचाई फारशी भासली नाही.

इतरांच्या अनुभवातून शिकायला हवे... विविध प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची गोरख रसाळ यांना आवड आहे. या माहितीचा स्वतःच्या शेतीत वापर करतात. सुरवातीच्या काळात विविध नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत गावातील शेतकरी दत्तात्रय पाचपुते यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्याचे रसाळ यांनी सांगितले. आता त्यांच्याकडेही अनेक शेतकरी माहितीसाठी येतात. आपल्याकडील कोणतीही माहिती सांगण्यात हयगय करायची नाही, असे गोरख रसाळ यांचे धोरण असते. त्यामुळे गावामध्ये खरबूज आणि कलिंगडाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले.

रसाळ यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे... - बाजाराच्या अभ्यासावर केले लागवडीचे नियोजन
- स्थानिक बाजारापेक्षा जिल्ह्याच्या बाजारात चांगला दर मिळत असल्याचा अनुभव.
- पिकांची लागवड, काढणी आणि मजुरांची उपलब्धता यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न.
- आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकलो, तसेच आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना व्हावा हा ध्यास.

संपर्क - गोरख रसाळ, 9763636068

पारंपरिक चिन्हे सांगतात पावसाचा अंदाज

एककेंद्रीय असलेल्या जिवांना स्पर्शातून ज्ञान मिळते. पंचमहाभूतात वायू त्याला कारणीभूत असतो. समजा, भूकंप होणार असेल, तर भूकंपाच्या लहरींचे ज्ञान एकेंद्रीय असलेल्या प्राण्यांना त्यांच्या पायांच्या स्पर्शातून, सरपटणारा प्राणी असेल, तर बरगड्यातून किंवा ज्यांचा पाठीचा कणा जमिनीला समांतर असतो, त्या प्राण्यांना जास्त लवकर होते.

ज्यांना खूर नाही असे प्राणी उदा. कुत्रा, हत्ती, वाघ, सिंह इत्यादींना याचे ज्ञान लवकर होते. थोडक्‍यात, ज्या प्राण्यांच्या शरीराचा भाग जमिनीच्या जवळ अधिक असतो, त्यांना येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे ज्ञान लवकर होते. साप हा जमिनीवर सरपटत असल्याने त्याला भूकंपाच्या लहरींचा अंदाज लवकर येतो. मनुष्यप्राणी असा आहे, की त्याच्या जिवाला धोका असेल किंवा त्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर त्यालाही नैसर्गिक आपत्तीचे ज्ञान लवकर प्राप्त होऊ शकते.

पावसाचे ज्ञान मेंढ्यांना पावसाचा हमखास अंदाज येतो; तसेच गाढव, मुंगी, चतुर, वाळवी, कावळा, चिमणी यांनाही 24 तासांत येणाऱ्या पावसाचा अंदाज बरोबर समजतो. पावसाची शक्‍यता असेल तर मेंढरांना वास येतो. मेंढरं जमीन हुंगायला लागतात. त्यानंतर गोलाकार उभे राहून आतील बाजूला तोंड खुपसताना दिसतात. गाढवाला पाऊस येण्याआधी वास येतो, तेव्हा ते आपले कान खाली करते.

प्राण्यांप्रमाणेच आदिवासी लोकांनाही वास येतो. हे लोक एक दिवस आधी पावसाच्या अंदाजाबाबत सांगतात. जमिनीचे तापमान वाढते, आर्द्रता वाढून जमीन ओली होते, तेव्हा भाजलेल्या बटाट्यासारखा वास येतो, असा वास यायला लागल्यावर त्यानंतर पाऊस पडतो, असे या लोकांचे म्हणणे असते.

पाऊस पडण्याआधी भौतिक चिन्हे अगोदर दिसतात, त्यानंतर जैविक चिन्हे दिसतात. भौतिक चिन्हे 17 आहेत. पावसाची गर्भधारणा होताना जैविक चिन्हे आधी दिसतात, भौतिक चिन्हे नंतर दिसतात. माणसांनाही भौतिक किंवा जैविक चिन्हे दिसतात. त्यानुसार 48 किंवा 72 तासांतील पावसाचा अंदाज देता येऊ शकतो.

जैविक चिन्हे ग्या ज्या वारूळ करून राहतात, त्यांना पावसाच्या आदानाचा (गर्भधारणेचा) अंदाज आधी येतो. मुंग्या वारुळाचे तापमान आणि आर्द्रता स्थिर ठेवण्याचे (वातानुकूलन) काम करतात. ते करण्याकरिता त्या वारुळाच्या भिंतीतील आर्द्रतेत बदल करतात. मातीचे कण वाळविण्याकरिता किंवा थंड करण्याकरिता मुंग्या त्यांना वर आणतात. काही वेळेला जवळपासचा लाकडी भाग, गवत वारुळावर आणून ठेवतात. ज्या वेळी जमिनीत आर्द्रता वाढून पाणी सुटायला लागते, त्या वेळी काळ्या मुंग्यांची जमिनीत हालचाल सुरू होते. पाणी लागल्याने मुंग्यांची अंडी नासतात, त्यामुळे त्या अंडी वर आणायला लागतात. वनस्पतींना फुले येणे, त्यांची फळे खाली पडणे, या अवस्थाही पाऊस येण्याचे संकेत देतात.

पाऊस पडण्याआधी जमिनीचे तापमान वाढायला लागते, त्याचा वास काही प्राण्यांना येतो. हवेची पोकळी व्हायला लागते. त्याचा अंदाज तिथे उडणाऱ्या पक्ष्यांना व कीटकांना येतो. उदा. कावळा नेहमी तीस किंवा त्याहून थोड्या कमी- अधिक फूट उंचीवर उडतो, मात्र पावसाचा अंदाज असला तर तो नेहमीच्या उंचीपेक्षा खालच्या उंचीवरून उडताना दिसतो. म्हणजे सकाळी तो आपल्यापासून पंधरा ते वीस फूट अंतरावर उडत असेल तर तेव्हापासूनच्या बारा तासांत पाऊस पडण्याची शक्‍यता असते. दर तासाला कावळा आपली उडण्याची उंची एक- एक फुटाने कमी करतो. टोळ किंवा चतुर साधारणतः आठ फुटांवर उडताना दिसतात, त्यानंतर आठ तासांत पाऊस पडण्याची शक्‍यता असते. दर तासाला तेही उडण्याची उंची एक- एक फूट कमी करतात.

पाऊस येण्याचा अंदाज असेल तर काही जनावरांना वाऱ्याचा आवाज कळतो, काहींना रंग पद्धतीचा तर काहींना तापमानामधील बदल, काहींना वास तर काहींना चव कळते. जसे की बारीक कीटक (उदा. डास, मच्छर) वनस्पतींच्या शेंड्यावरती येऊन बसतात.

पाऊस येण्याच्या तीन दिवस आधी बकरी कोवळा पाला खात नाही, ती फक्त शेंडे कुरतडते. कोवळा पाला न खाण्याचे कारण म्हणजे, त्याच्या रसायनात बदल होतो, त्याचा वास येतो, त्यामुळे त्या ठिकाणी बारीक कीटक येतात. ते खायला सरडे येतात. सरडे आकाशाकडे तोंड करून बघायला लागतात. काही किडी रंगाकडे आकर्षित होतात, त्या खायला मिळाव्या म्हणून सरडा आपल्या डोक्‍याचा रंग बदलतो. त्यानंतर दोन- अडीच तासांत पाऊस येतो.

पावसाचा नेमका अंदाज बांधणे शक्‍य नाही, कारण जमिनीचा सव्वा किलोमीटर त्रिज्येचा प्रत्येक तुकडा हा पावसाची गर्भधारणा करतो, त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडतो. ही गर्भधारणा ज्या चंद्र नक्षत्रात होते, त्या नक्षत्रापासून पंधराव्या पक्षात चंद्र ज्या वेळी पुन्हा त्या नक्षत्रात येतो, त्या वेळी तिथे पाऊस पडतो. हा पाऊस 24 तास पुढे- मागे पडू शकतो.

नक्षत्र आणि पाऊसमान एकूण 27 नक्षत्रं आहेत; परंतु या नक्षत्रांचा प्रत्यक्ष संबंध त्या विभागाशी नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे उत्तर- दक्षिण ध्रुव तयार होतात.
विषुववृत्तावर 360 अंशांचा सरफेस येतो, त्याचे 27 भाग हे विशिष्ट गुणवत्तेच्या लहरी असताना तिथे निर्माण होतात. त्या गुणवत्तेच्या लहरींना नक्षत्रांचे नाव देण्यात आले आहे, त्यामुळे गुणवत्तेच्या लहरींना खूप महत्त्व आहे.

घोडा, कोल्हा, बेडूक, मेंढा, मोर, उंदीर, म्हैस, गाढव आणि हत्ती ही नक्षत्रांची वाहने आहेत. सूर्य ज्या वेळी एखाद्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्या वेळी चंद्र त्याच्यापासून कितव्या नक्षत्रात आहे, त्याच्यावर वाहन ठरते. समजा, चंद्र त्याच नक्षत्रात असेल तर घोडा वाहन येईल, पुढच्या नक्षत्रात असेल तर कोल्हा वाहन येईल.
नक्षत्रांची वाहने व पाऊसमान

ज्या नक्षत्राचे वाहन हत्ती असते, त्या नक्षत्रात भरपूर पाऊस पडतो. पूर येऊन त्या पुरातून हत्ती पलीकडे जाईल, असेही म्हटले जाते. तसेच म्हैस वाहनाचेदेखील असते.

बेडूक वाहन असलेल्या नक्षत्रात पाऊस इतका फुगतो, की बेडकाची पिल्ले त्या पावसाबरोबर वाहत जाऊन दुसरीकडे पसरतात.

घोडा वाहन असलेल्या नक्षत्रात जो पाऊस येतो, तो ज्या मार्गाने येईल, तो संबंध मार्ग भिजवीत येईल, असा समज आहे.

मोर ज्याप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तसेच हे वाहन असलेल्या नक्षत्राचा पाऊसही एका ठिकाणी पडतो, तर दुसऱ्या ठिकाणी (मधला भाग न भिजविता) पडत नाही.

उंदीर वाहन असलेल्या नक्षत्राचा पाऊस हा स्थानिक असतो, तो सव्वा ते दीड किलोमीटर अंतरातच पडतो.

कोल्हा वाहन हे फसवे असते. ढग येतात, पाऊस पडेल असे वातावरण तयार होते, प्रत्यक्षात पाऊस पडत नाही.

गाढव वाहन असलेल्या नक्षत्रात इतका पाऊस पडतो, की गवताच्या ठोंबाला कोंब फुटतात.

मेंढा वाहन असते, त्या नक्षत्रात सगळ्यात कमी पाऊस पडतो, मेंढ्याच्या अंगावरील लोकरीला पाणी लागले की त्याला सर्दी होते, त्यामुळे या वाहनाचा पाऊस कमी असतो, असे म्हटले जाते.

अपयशाला कष्टाने लाजवले डाळिंबाने यशाचे हास्य दिले

उंचीठाणे, ता. खटाव, जि. सातारा येथील सतीश विष्णू शिंदे याचे शिक्षण बी.एस्सी. ऍग्री झाले आहे. शिक्षणानंतर एका स्वयंसेवी संस्थेत सातारा येथे तीन वर्षे नोकरी केली. मात्र नोकरीत मन रमत नव्हते. घरी वडिलोपार्जित तीन ठिकाणी विभागलेली दोन एकर शेती व पाण्यासाठी विहीर असली तरी त्यात अनेकांचे वाटे, अशी घरची साधारण परिस्थिती होती. शेतीची ओढ असली तरी नोकरी सोडणे हे तसे धाडसाचेच होते. शेती करताना बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारखे पूरक उद्योग करत शेतीचा भार उचलण्याचा प्रयत्न केला. मग वडिलांनी कर्ज घेऊन व्यवसायासाठी ट्रॅक्‍टर घेऊन दिला. ट्रॅक्‍टरही चालवला. कष्टाची कधीही लाज बाळगली नाही, तरी या साऱ्या पूरक व्यवसायात फारसे यश मिळाले नाही. कागदावरची गणिते प्रत्यक्षात उतरताना दिसत नव्हती. मग शेतीवरच पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. दहिवडी (ता. माण) येथील पाहुण्यांकडे असलेल्या डाळिंब पिकांची पूर्ण माहिती मिळवली. आपल्या शेतात हे पीक करण्याचे निश्‍चित केले. याच कालावधीत यळीव (ता. खटाव) येथे वडिलांच्या निवृत्तीनंतरच्या मिळालेल्या रकमेतून साडेचार एकर शेतजमीन खरेदी केली. ही जमीन मुरमाड तसेच चढ-उताराची होती. या जमिनीचे सपाटीकरण करून त्यामध्ये तलावातील गाळ टाकला. या क्षेत्रामध्ये डाळिंब लागवड केली. या शेतीमुळेच पुढे सहा एकर क्षेत्र खरेदी करणे शक्‍य झाले. त्याचबरोबर खंडाने आठ एकर घेतले असून, वडिलोपार्जित दोन एकर अशी सर्व मिळून 16 एकर क्षेत्राचे नियोजन सतीश शिंदे करतात. सध्या साडेसात एकरात उसाची लागवड आहे. दोन एकर क्षेत्रावर नवीन डाळिंबाची लागवड केली.

डाळिंबाची लागवड खटाव तालुका हा दुष्काळी असला तरी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे यळीव गावाच्या परिसरात डाळिंब हे पीक घेतले जात नव्हते. मात्र सतीश शिंदे यांनी येथे खरेदी केलेल्या साडेचार पैकी तीन एकर क्षेत्रावर डाळिंब लागवडीचे नियोजन केले.
- जमीन मुरमाड असल्याने त्यांनी यंत्राच्या साहाय्याने 15 फूट x 10 फूट अंतरावर खड्डे घेतले. त्यामध्ये शेणखत टाकून भगवा जातीच्या 900 रोपाची लागण ऑगस्ट 2009 मध्ये केली. त्यातील रोपे लागवडीच्या दरम्यान 33 रोपांची मर झाली.
- सिंचनासाठी सर्व क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन केले. ठिबकद्वारेच खते दिली जातात.
- रोपाची वाढ चांगली झाल्यावर त्यांनी 14 महिन्यांत पहिला बहर धरला. त्यांना सरासरी आठ टनांचे उत्पादन मिळाले. त्यांनी सर्व माल आटपाडी येथील बाजारातील व्यापाऱ्याला पाठवला. डाळिंबाच्या विक्रीचा अनुभव कमी असल्याने दर कमी मिळाला. -------सात ते आठ रुपयांचे ---------नुकसान झाल्याचे दिसून आले.

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी... - दोन रोपांतील अंतर अधिक ठेवले आहे. त्यामुळे बागेत हवा खेळती राहते. रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात वाढ झाली.
- दोन रोपांतील जागेमध्ये मिरची, बटाटा, आले, गुलछडी, झेंडू यांसारखी आंतरपिके घेतली आहेत.
- फवारणीची प्रणाली एका जागेवर बसवली असून, बागेत अर्धा इंच पाइपलाइन फिरवलेली आहे. जागोजागी व्हॉल्व्ह बसवले असून, सर्व बागेमध्ये दीड तासात फवारणी होते.
- सिंचनासाठी व विद्राव्य खते देण्यासाठी ठिबकचा वापर.
- बागेमध्ये सेंद्रिय खताचा योग्य प्रमाणात वापर करतात. त्यासाठी शेण स्लरी वापरली जाते.
- हवामानातील बदलावर सातत्याने लक्ष ठेवले जाते. त्यावर आधारित प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात.
- डाळिंब पिकामध्ये निरोगी रोपाची लागवड करणे आवश्‍यक आहे, रोपे खात्रीशीर ठिकाणी घ्यावीत.
- बाग निरोगी राहण्यासाठी रोपाचे छाटणी तंत्र महत्त्वाचे आहे. छाटणी करताना फळाला इजा होणार नाही यांची काळजी घेतली.
- छाटणी चांगली झाल्यास हवा खेळती राहते. फवारणीने रोग- किडींचे चांगले नियंत्रण मिळते. फळे तोडण्यास सोपे जाते.

डाळिंब शेतीची वैशिष्ट्ये - शेतीत रासायनिक, जैविक व सेंद्रिय खताचा समतोल साधला जातो.
- बागेत स्वतः गुट्टी कलमे तयार करून नवी दोन एकर डाळिंब लागवड केली.
- मजुराच्या टंचाईवर उपाय म्हणून तीन मजूर व सात महिला या कायमस्वरूपी ठेवल्या आहेत. दरवर्षी त्यांचा गटविमा काढला जातो.

अर्थशास्त्र - तीन एकर क्षेत्रातील प्रति रोप 15 रुपये प्रमाणे 900 रोपांना 13 हजार 500
- यंत्राद्वारे खड्डे काढण्यास 5500 रुपये, शेणखतास 30 हजार रुपये, मजुरी (लागण, खड्डे बुजविणे, खुरपणी) 45 हजार रुपये, ठिबक सिंचन यंत्रणा- एक लाख 10 हजार, कंपोस्ट खत 15 हजार, रासायनिक खते व कीडनाशके 61 हजार रुपये, विद्राव्य खते 30 हजार रुपये, छाटणीसाठी मजुरी 25 हजार रुपये, बांबू नऊ हजार रुपये असा सर्व मिळून तीन लाख 44 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. पहिल्या बहरातून आठ टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले आहे. यास प्रति किलोस सर्वांत कमी 45, तर जास्तीत जास्त 72 असा दर मिळाला. सरासरी 60 रुपयेप्रमाणे त्यांना चार लाख 80 हजार रुपये मिळाले.
- तसेच दुसऱ्या बहरास अडीच लाख रुपये खर्च आला आहे. दुसरा बहरातून त्यांना 20 टनांचे उत्पादन मिळाले आहे. यास सर्वांत कमी 50 रुपये, तर सर्वांत जास्त 80 रुपयांचा दर मिळाला आहे. सरासरी 65 रुपये प्रमाणे 13 लाख रुपयांचे उत्पादन त्यांना मिळाले आहे.

बाजाराच्या अभ्यासातून राबविली विक्री पद्धत - पहिल्या बहरातून मिळालेले डाळिंब आटपाडी येथील व्यापाऱ्याकडे पाठविले. बाजारात चांगला दर असताना, तसेच आपल्या डाळिंबाचा दर्जा चांगला असूनही दर कमी मिळाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले.
- दुसऱ्या बहराच्या डाळिंबाच्या विक्रीचे सतीश शिंदे यांनी वेगळ्या पद्धतीने नियोजन केले.
- त्यांनी कराड येथील फळ विक्रीच्या गाळे, गाड्याच्या चालकाची भेट घेऊन त्यांचा एक गट तयार करण्यास प्रोत्साहन दिले. गाळेधारकांपैकी एकाने शेतावरून माल उचलून अन्य लोकांना पोच केला. त्यामुळे मध्यस्थ वाचल्याने त्यांचा व शिंदे यांचाही फायदा झाला. दर चांगला मिळाला. आडत तसेच वाहतुकीच्या खर्चात बचत झाली.
- सर्व माल फळविक्रेत्यांद्वारे विकणे शक्‍य नव्हते, त्यामुळे उर्वरित माल मुंबई येथील व्यापाऱ्यांना दर ठरवूनच पाठवण्यात आला. यामुळे पहिल्या बहरापेक्षा दुसऱ्या बहरास दर चांगला मिळाला.

फळांचा रस शोषणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी... दुसऱ्या बहराच्या वेळी सप्टेंबर- ऑक्‍टोबर महिन्याच्या दरम्यान फळाचा रस शोषणाऱ्या पतंगाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होतो. हा पतंग अंधार पडल्यापासून मध्यरात्रीपर्यंत फळाचा रस शोषतो. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या फळांतून पाणी गळते व फळ खराब होते. या पतंगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सतीश शिंदे व त्यांचे चार ते पाच मित्र डोक्‍याला बॅटरी लावून हातात मोजे घालून पतंग पकडून मारतात. साधारणतः एक ते सव्वा महिना असे केले जाते. त्यामुळे फळांचा रस शोषणारा पतंगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यात मदत होते.

कुटुंबाच्या पाठिंब्याने मिळाला आत्मविश्‍वास शेती करत असताना शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायात अपयश आले, तरीही आई, वडील पाठीशी ठामपणे उभे राहिले. सतीश यांच्या पत्नी शुभांगी बागेतील मजुरांकडून कामे करून घेतात. आजही आवश्‍यक तिथे आई-वडिलांचा सल्ला घेत असल्याचे सतीश यांनी सांगितले.

सतीश शिंदे
9423807788, 9766580774

केळीच्या काटेकोर व्यवस्थापनातून साधली 31 महिन्यांत तीन पिके

अंबप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील प्रदीप साळोखे यांची वडिलोपार्जित 25 एकर शेती आहे. प्रदीप यांनी पदवीनंतर पशुधन सुपरवायझर (एलएसएस)चा अभ्यासक्रम पूर्ण करून काही काळ नोकरी केली; मात्र 1991 मध्ये त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या शेतीमध्ये दहा एकर ऊस, सव्वादोन एकर केळी, पाच एकर सोयाबीन, दीड एकर आंबा ही पिके आहेत. त्यांच्याकडे पंधरा जनावरे असून जनावरांसाठी अर्धा एकर मका, कडवळ आदी चाऱ्याची पिकेही ते करतात. या सर्व पिकांमध्ये येणाऱ्या अडचणींसाठी विविध तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेत बदल करतात. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शेतकरी मंचामध्येही ते सदस्य आहेत.

पिकाची निवड करताना... पिकाची निवड करताना त्याची बाजारपेठेत काय स्थिती आहे हे पाहणे गरजेचे आहे, असे प्रदीप यांना वाटते. यासाठी प्रथम त्या पिकाचे राज्यातील क्षेत्र किती आहे, यंदा किती क्षेत्रावर याची लागवड होण्याची शक्‍यता आहे, त्यासंदर्भात बियाण्याची विक्री किती झाली आहे, ही विक्री या हंगामात किती होण्याची शक्‍यता आहे, त्यानुसार बाजारपेठेत या पिकास किती वाव आहे याची माहिती ते बियाणे कंपन्यांच्या ऍग्रोनॉमिस्टकडून जाणून घेतात. या माहितीच्या आधारे ते पिकाची निवड करतात, त्याचे क्षेत्र किती ठेवायचे हे ठरवितात. गेल्या सात वर्षांपासून प्रदीप केळीची लागवड करत आहेत. यंदा प्रदीप यांनी केळीची निवड करताना कृषी विभाग, कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञ, टिश्‍यूकल्चर लॅब, बियाणे कंपन्यांतील ऍग्रोनॉमिस्ट, ठिबक सिंचन कंपन्यांतील व्यक्तींकडून पिकाबाबत आढावा घेतला. यंदा उन्हाळ्यात राज्यात दुष्काळी स्थिती होती, त्यामुळे रोपांसाठी करण्यात आलेल्या नोंदणीच्या प्रमाणात त्यांची विक्री झाली नसल्याची माहिती तज्ज्ञांकडून प्रदीप यांना मिळाली. त्यातच रावेर, जळगाव, हिंगोलीमध्ये गारपीट झाल्याने तेथे केळीचे मोठे नुकसान झाले. यंदा सरासरीपेक्षा बऱ्याच प्रमाणात केळीचे क्षेत्र घटले असल्याचीही माहिती मिळाल्याने प्रदीप यांनी नेहमीप्रमाणे एक एकरावर केळीची लागवड न करता सव्वादोन एकरांवर केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

केळीची लागवड लागवडीची पद्धत - जोड ओळ पद्धत
रोपांतील अंतर - दोन ओळींतील अंतर 4.50 फूट, दोन पट्ट्यांतील अंतर नऊ फूट, दोन रोपांतील अंतर पाच फूट (झिगझॅग पद्धतीने लागवड)
केळीची जात - जी 9

31 महिन्यांत केळीची तीन पिके केळीची लावण, खोडवा, निडवा अशी तीन पिके साधारणपणे 36 ते 40 महिन्यांत येतात; पण योग्य व्यवस्थापनाने ही तीनही पिके केवळ 30 ते 31 महिन्यांत घेणे शक्‍य आहे. या पद्धतीत
केळीच्या रोपांची लावण ही एप्रिलमध्ये केली जाते. यामुळे दहा- अकराव्या महिन्यात घड काढणीसाठी तयार होतात. म्हणजे पहिल्या वर्षी काढणी ही मार्चमध्ये होते. या अगोदर एक महिना म्हणजे फेब्रुवारीमध्येच खोडव्याचे व्यवस्थापन केले जाते. खोडवा पीक हेसुद्धा दहा- अकराव्या महिन्यात काढणीस येते. जानेवारीत खोडव्याची काढणी होते. त्याअगोदर एक महिना म्हणजे डिसेंबरमध्येच निडव्यासाठी मुंडवे ठेवले जातात. याची काढणी पुन्हा अकरा महिन्यानंतर म्हणजे साहजिकच ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये काढणी होते. म्हणजे अवघ्या 30 ते 31 महिन्यांत केळीची तीन पिके होतात.

खोडवा- निडवा व्यवस्थापन - मागील वर्षी झिगझॅग पद्धतीने रोपे न लावल्यामुळे मुंडव्यांची वाढ होण्यामध्ये थोडीशी अडचण आली, त्यामुळे एक महिना अधिक लागल्याचे प्रमोद यांनी सांगितले. या वर्षी झिगझॅग पद्धतीने रोपे लावल्याने तो एक महिना वाचू शकेल. 31 महिन्यांऐवजी 30 महिन्यांत तीन पिके घेण्यासाठी ते काटेकोर प्रयत्न करत आहेत.
- पट्टा पद्धतीमध्ये दोन पट्ट्यांतील अंतर नऊ फूट ठेवण्यात येते. रिकाम्या जागेकडे झाड कलण्याचा गुणधर्म असल्यामुळे घड लागल्यानंतर केळीचे झाड हे नऊ फुटांच्या पट्ट्याकडे कलते.
- साहजिकच साडेचार फुटांच्या अंतरावरील दोन ओळींमध्ये भरपूर सूर्यप्रकाश पोचू शकतो, याचाच फायदा घेत घड काढणीस येण्याच्या अगोदर एक ते दीड महिना खोडव्या- निडव्यासाठी मुंडवे ठेवण्यात येतात.
- जोमदार वाढलेले, बुंधा जाड असणारे, तलवारीसारखी पाने असणारे मुंडवे मुख्यतः खोडव्या- निडव्यासाठी ठेवण्यात येतात.
- घडाच्या विरुद्ध दिशेचा मुंडवा खोडव्या- निडव्यासाठी ठेवला जातो.
- घडाची व केळीच्या झाडाची कापणी होते तेव्हा खोडवा- निडवा हा एक ते दीड महिन्याचा असतो, यामुळे या पद्धतीत पिकाचा कालावधी हा कमी केला जातो.

केळीनंतर सुरू ऊस लागवड नोव्हेंबरमध्ये काढणी झालेल्या शेतामध्ये सुरू उसाची लावण केली जाते. हा ऊस पुन्हा अकरा महिन्यांत कापणीसाठी येतो. नेहमीच्या केळी लागवडीमध्ये केळीचा निडवा हा जूनमध्ये काढणीसाठी येतो. यामुळे नेहमीच्या पद्धतीपेक्षा या पद्धतीत आणखी एक पैसा देणारे पीक घेता येणे शक्‍य होते. प्रदीप यांना उसाचे उत्पादन एकरी 60 टनांपर्यंत मिळाले.

केळीचे अर्थशास्त्र - पहिल्या वर्षी लावणीसाठी प्रदीप यांना एकरी एक लाख 20 हजार रुपये खर्च आला. तीन ते चार काढणीमध्ये त्यांना एकरी 40 टन उत्पादन मिळाले. टनाला सरासरी 12 हजार रुपये इतका दर त्यांना मिळाला. खर्च वजा जाता तीन लाख साठ हजार रुपये उत्पन्न मिळाले. खोडवे व निडव्यासाठी साधारणपणे एक लाख रुपये खर्च आला. अनुक्रमे एकरी 32- 35 टन उत्पादन मिळाले.

घड काढणी खर्चातही बचत केळीचे घड काढण्यासाठी टनाला पाचशे रुपये घेतले जातात; पण पट्टा पद्धतीमुळे शेतामध्ये ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह नेता येत असल्याने जागेवरच काढणी केली जाते. नऊ फुटांच्या जागेत ट्रॅक्‍टर सहजपणे नेता येतो. काढणी उत्तमप्रकारे होते. यामध्ये घड मोडण्याचे प्रमाणही कमी असते. साहजिकच मालाची प्रत सुधारते. दरामध्ये याचा फायदा होतो. या पद्धतीत काढणीचा खर्च टनाला शंभर रुपये इतका येतो.

केळीत कोथिंबीर आंतरपीक कोल्हापुरातील बाजारपेठेत 20 मेनंतर जूनच्या अखेरीपर्यंत कोथिंबिरीस चांगला दर मिळत असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रदीप यांनी केळीच्या पिकात 30 गुंठे क्षेत्रामध्ये कोथिंबिरीची लागवड केली होती. एकरी दोन किलो धने त्यांना लागले. त्यांना 18 हजार रुपये कोथिंबिरीतून मिळाले.

प्रदीप यांच्या केळीची वैशिष्ट्ये - - 30-32 महिन्यांत तीन पिके ते घेतात. या पद्धतीने त्यांचे हे दुसरे केळी पीक आहे. कमी कालावधीत अधिकाधिक पिके व उत्पन्न.
- आधारासाठी बांबूऐवजी बेल्टचा वापर. एक बेल्ट साधारणपणे तीन- चार वर्षे टिकत असल्याने खर्चात बचत.
- काढणीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर केल्याने खर्चात बचत.
- केळीच्या कापणीनंतर लगेचच सुरू उसाची लागवड.
- केळीमध्ये आंतरपिकांतूनही उत्पन्न.

प्रदीप शंकरराव साळोखे, 9403781148

शेवग्याने दिला मदतीचा हात वाचली मोसंबी, डाळिंब बाग

मागील वर्षीच्या दुष्काळामुळे औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील बहुतांशी मोसंबीच्या बागा अडचणीत आल्या. पाण्याचे नियोजन करीत काही शेतकऱ्यांनी आपल्या बागा वाचविण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन वर्षांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने विहिरीतच काय, पण शेततळ्यातही पाणी नव्हते. सात वर्षांपूर्वी लावलेली दोन एकर मोसंबी आणि दोन वर्षांपूर्वी लावलेले दोन एकर डाळिंब वाळताना पाहणे शक्‍य नव्हते. कोणत्याही परिस्थितीत बागा वाळू द्यायच्या नाहीत, या ध्यासाने सांजखेडा (ता.जि. औरंगाबाद) येथील ज्ञानेश्‍वर घोडके यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या प्रयत्नामध्ये त्यांनी 2010 मध्ये लावलेल्या शेवग्याने चांगली साथ दिली.

शेवगा शेती ठरली फायदेशीर ज्ञानेश्‍वर घोडके यांच्याकडे सहा एकर शेती आहे. बेंबळा या नदीच्या दोन्ही काठांवर त्यांची शेती आहे. जमीन मध्यम ते काळी आणि कमी निचरा होणारी. कापूस व मोसंबी ही पारंपरिक पिके. घोडके यांनी 2010 मध्ये 38 गुंठे क्षेत्रावर शेवगा लागवड केली. कमी पाण्यावर तग धरणारे हे पीक असल्याने त्यांनी हे पीक निवडले. जमिनीची चांगली मशागत करून 6 x 4 फूट अंतरावर शेवग्याच्या बियाण्याची टोकण केली. शेवग्यासाठी ठिबक सिंचनाची सोय केली. दोन महिन्यांनंतर शेवग्याचे शेंडे खुडल्याने नवीन फांद्या फुटल्या. चार महिन्यांत फुले, तर सातव्या महिन्यापासून शेवग्याच्या शेंगा बाजारात विक्रीसाठी सुरू झाल्या.
- शेवग्याचे सातत्यपूर्ण उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापनही काळजीपूर्वक केले. लागवडीनंतर 150 किलो डीएपी व 150 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत दिले. फुले लागल्यापासून प्रत्येक दोन महिन्याला एवढीच खताची मात्रा दिली.
- शेवग्याचा हंगाम संपताच शेवग्याची झाडे जमिनीपासून एक फूट उंचीवरून कापून टाकण्यात येत होती. खताची मात्रा व पाणी दिले, की शेवगा परत चांगला फुटतो. जमिनीपासूनच त्यास सशक्त धुमारे यावयास सुरवात होते. चांगल्या व्यवस्थापनामुळे उत्पादन वाढत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
- शेवग्यावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी शिफारशीनुसार कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या. किडीच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष केले तर उत्पादनात घट येते.

शेवग्याचे अर्थशास्त्र - - 2010 मध्ये त्यांना 30 टन शेंगांचे उत्पादन मिळाले. त्यातून 20 हजार रुपये प्रति टनाप्रमाणे सहा लाख रुपये मिळाले. उत्पादन खर्च एक लाख रुपये आला.
- 2011 मध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे शेवग्याचे उत्पादन 18 टन मिळाले. त्याला दर 18 हजार पाचशे रुपये प्रति टन इतका मिळाला. तीन लाख 33 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च 50 हजार रुपये झाला.
- 2012 मध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर उत्पादनात घट झाली. आठ टन इतके उत्पादन मिळून 25 हजार रुपये प्रति टन इतका दर मिळाला. दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च 50 हजार रुपये झाला.

शेवग्यात काकडी आंतरपीक - - दर तीन वर्षाने शेवग्याची लागवड बदलावी, असे मत आहे. मात्र या वर्षी पाण्याचा प्रश्‍न बिकट असल्याने शेवगा तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला.
- डाळिंबाची लागवड करण्याच्या उद्देशाने शेवग्याची एक आड एक रांग काढून टाकली. मात्र पाण्याची उपलब्धता पाहता डाळिंब लागवडीचा निर्णय बदलला.
- या वर्षी खरिपामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. रमझानच्या सणामध्ये चांगले दर मिळतील, या उद्देशाने शेवग्यामधील वाढलेल्या अंतरामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडीची लागवड केली. 10 जुलैपासून काकडीचे उत्पादन सुरू झाले. काकडीसाठी विद्राव्य खत 0ः52ः34 दर तीन दिवसांनी चार किलोप्रमाणे दिले जाते.

गंध सापळ्याचा वापर - कीड- रोगाच्या नियंत्रणासाठी त्यांनी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीडनाशकाच्या फवारण्या केल्या. फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकरी आठ गंध सापळे लावले. हे सापळे त्यांनी स्वतः तयार केले. त्यासाठी मक्षीकारी गंध वापरला. कापसाच्या एका बोळ्याला मक्षीकारी. तर दुसऱ्या बोळ्याला कीडनाशक लावून दोन्ही बोळे जवळ जवळच सापळ्यात ठेवले. सापळ्यामध्ये 30 ते 40 पतंग येऊन पडत होते. दर दोन दिवसांनी गंध व कीडनाशक लावलेले बोळे बदलले. त्यामुळे फळमाशींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली.

काकडीचे उत्पादन - आतापर्यंत 70 क्विंटल काकडीचे उत्पादन हाती आले आहे. साधारणतः आणखी एक आठवडा काकडीचे उत्पादन मिळेल. औरंगाबादच्या मार्केटमध्ये काकडीची विक्री केली. या काकडीला सहा ते 15 रु. प्रति किलो दर मिळाला. सरासरी दर 6.25 रु. मिळाला आहे. त्यातून 43 हजार 750 रुपये मिळाले असून, उत्पादन खर्च 15 हजार रुपये झाला आहे.

पाण्यासाठी मोठा खर्च - दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरीमध्ये पाणी नव्हते. पाण्यासाठी तयार केलेले 30 x 30 x 3 मीटर आकाराचे शेततळेही रिकामे होते. बागा जगवायच्या तर पाणी आवश्‍यक होते. शेतामध्ये चार विंधन विहिरी घेतल्या. मात्र त्याला पाणी लागले नाही. त्यासाठी एक लाख 20 हजार रुपये खर्च झाला. पाण्याचा शोध तर सुरूच होता. गावापासून 25 किलोमीटर अंतरावरील भालगावामधील एका विहिरीचे पाणी विकत मिळाले. तिथून पाणी आणण्यासाठी 12 हजार लिटर क्षमतेचा एक टॅंकर प्रति महिना 35 हजार रुपयेप्रमाणे भाड्याने घेतला. ड्रायव्हर, पाण्याचे पैसे व टॅंकरचे भाडे असे पाच महिन्यांत पाण्यासाठी सात लाख रुपये खर्च झाला. या खर्चासाठी शेवग्याच्या उत्पादनाने मोठी साथ दिली. शेवगा होता म्हणून दोन्ही बागा जगविता तरी आल्या. हे समाधान खूप मोठे असल्याचे ज्ञानेश्‍वर यांनी सांगितले.

आर्द्रतेचे प्रमाण राखण्यासाठी वापरले पाणी - मोसंबी व डाळिंब पिकासाठी ठिबक सिंचन केलेले आहे. मात्र बागेतील मोसंबी व डाळिंबाचा दर्जा चांगला येण्यासाठी योग्य प्रमाणात आर्द्रता असण्याची गरज असते. त्यासाठी बागेमध्ये दोन वेळेस मोकाट पाणी दिले.या पाण्यासाठी केवळ बागा वाचविण्यापेक्षा अधिक खर्च झाला, तरी डाळिंब आणि मोसंबीचे चांगले उत्पादन हाती येईल. पिकाच्या उत्पादनातून मिळत गेलेले पैसे पाण्यासाठीच खर्च केल्याचे ज्ञानेश्‍वर यांनी सांगितले. आता मोसंबी आणि डाळिंबाच्या बागा चांगल्या अवस्थेत असून चांगले उत्पादन मिळण्याची शक्‍यता आहे.

शेतकऱ्याकडून शिकण्यासारखे... 1) हिंमत न सोडता संकटाला सामोरी जाण्याची जिद्द
2) जोखीम स्वीकारण्याची हिंमत
3) एका पिकाऐवजी कमी क्षेत्रावर अधिक पिके घेत जोखीम कमी केली. वेळेनुसार व गरजेनुरूप पीक नियोजनात बदल.
4) सतत नवीन नवीन शिकण्याची आवड.


संपर्क - ज्ञानेश्‍वर घोडके, 9881849298
(लेखक अंबड, जि.जालना येथे कृषी विभागामध्ये कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.)

ब्रॉयलर कोंबडीपालनाने दिली शेतीला आर्थिक ताकद

भद्रावती (जि. चंद्रपूर) तालुक्‍यातील धानोली हे आडवळणाचे गाव. या गावातील राहुल विधाते या उच्चशिक्षित तरुणाने मोठ्या अपेक्षेने काही काळ शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले, परंतु हाती निराशाच आली. घरच्या कोरडवाहू शेतीमध्ये वर्षाकाठी जेमतेम उत्पन्न मिळत असल्याने विधाते कुक्कुटपालनाकडे वळले. या बदलाबाबत सांगताना विधाते म्हणाले, की माझ्याकडे 47 एकर कोरडवाहू शेती आहे. दरवर्षी सोयाबीन आणि गहू पिकांची लागवड असते. परंतु संपूर्ण शेती पावसावर अवलंबून असल्याने उत्पन्नाची शाश्‍वती नाही, तसेच मजूर आणि बाजारपेठेची अडचण आहे. त्यामुळे नेमका कोणता पूरक उद्योग करायचा या विचारात असताना नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कुक्कुटपालनशास्त्र विभागातील मांसल कोंबडीपालन प्रशिक्षणासंबंधी माहिती मिळाली. या प्रशिक्षणामध्ये मला पक्षांचे व्यवस्थापन, खाद्य, लसीकरण, आजारांवर औषधोपचार, तसेच बॅंक आणि सरकारी योजनांची माहिती मिळाली. आजूबाजूच्या व्यावसायिक प्रक्षेत्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यातून या व्यवसायातील संधी तसेच अडचणीदेखील समजल्या. बाजारपेठेचा अभ्यास करताना कुक्कुटपालन फायदेशीर वाटले आणि मी करार पद्धतीने ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन सुरू केले. करार पद्धतीमध्ये एक दिवस वयाची मांसल कोंबड्यांची पिल्ले, त्यांना लागणारे खाद्य आणि औषधासाठी लागणारा मोबदला कंपनीकडून मिळतो. व्यावसायिकाला पक्ष्यांचे घर, मजूर, पाणी, वीज, तूस इत्यादींसाठी लागणारा खर्च करावा लागतो.

शेडची उभारणी - 1) विधाते यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 256 फूट लांब,30 फूट रुंद आणि 14 फूट उंच या आकाराच्या दोन शेड उभारल्या.
2) शेडची बांधणी पूर्व-पश्‍चिम दिशेने केली. शेडची मधील उंची 14 फूट, तर बाजूची उंची 10 फूट ठेवली.
3) पक्ष्यांच्या वाढीसाठी शेडमध्ये ताजी हवा खेळती राहण्यासाठी शेडच्या बाजूची भिंत एक फूट उंचीची बांधून त्यावरील छतापर्यंतच्या मोकळ्या जागेत जाळी बसविली.
4) सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे ऊन तसेच पावसाचे पाणी शेडमध्ये थेट येऊ नये यासाठी छताचे पत्रे दीड फूट बाहेर काढले. पावसाळ्यात जाळीवर लावण्यात येणारे पडदे शेडच्या आतूनच खाली वर करता येतील अशी रचना केली आहे.
5) उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा त्रास पक्ष्यांना होऊ नये म्हणून छतावर मिनी स्प्रिंकलर बसविले आहेत.
6) सव्वा फुटाला एक पक्षी अशा पद्धतीने शेडमध्ये जागा मिळते. दोन्ही शेड मिळून 12,000 पक्षी बसतात.
7) पक्ष्यांना खाद्यासाठी सुधारित पद्धतीचे फिडर आणि ड्रिंकर बसविले आहेत. एका ओळीत दर पाच फुटावर एक ड्रिंकर आणि एक फिडर बसविलेला आहे. ड्रिंकरमधील पक्षी जेवढे पाणी पितात, तेवढे लगेच त्यामध्ये जमा होते.
8) शेडच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.

पक्ष्यांचे व्यवस्थापन - विधाते यांनी बाजारातील पक्षी विक्रीच्या चढ-उताराचा अभ्यास करून, तसेच पक्षितज्ज्ञांच्या सल्ल्याने मांस कोंबडीपालनाला सुरवात केली. याबाबत ते म्हणाले, की बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्षात सरासरी पाच ते सहा बॅच घेतो. पिल्ले येण्यापूर्वी शेडचे निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करून शेडला चुना मारून घेतो. शेडमध्ये भाताचे तूस अंथरले जाते. त्यानंतर एक दिवसाची 12,000 पिल्ले शेडमध्ये आणली जातात. पहिले तीन दिवस पिल्लांना ब्रूडिंग करावे लागते. पिल्लांना वाहतुकीचा ताण आलेला असतो, यासाठी त्यांना साखर पाणी पाजले जाते. पिल्लांसाठी खाद्य आणि स्वच्छ पाण्याची सोय केली जाते. पिल्लांच्या बरोबरीने एकूण 30 ते 40 दिवसांमध्ये प्रति पक्षी 3.6 किलो या हिशेबाने खाद्यही एकाचवेळी आणले जाते.

लसीकरण - 1) पक्षितज्ज्ञांच्या सल्ल्याने पक्ष्यांना लागणारे औषध व लसीकरण.
2) एक दिवसाच्या पिल्लास मॅरॅक्‍स लस ही हॅचरीमध्येच दिलेली असते. त्यानंतर शेडमध्ये आलेल्या पक्ष्यांना पाच ते सात दिवसांनी लासोटा, 13-14 व्या दिवशी गंबोराची लस. साधारण 21 दिवशी लासोटा बूस्टर लसीकरण.
3) लसीकरणाच्या आदल्या दिवशी आणि नंतर ताण येऊ नये म्हणून पक्ष्यांना शिफारशीत प्रमाणात जीवनसत्त्व दिले जाते.

खाद्य, पाणी व्यवस्थापन - पक्ष्यांच्या खाद्य व्यवस्थापनाबाबत विधाते म्हणाले, की खाद्य आणि पाणी हे कुक्कुटपालनातील महत्त्वाचे घटक आहेत. पक्ष्यांच्या वाढीनुसार खाद्य दिले जाते. यासाठी शेडमध्ये चार ओळीत फिटर आणि ड्रिंकर बसविले आहेत. प्रत्येक ओळीत दर पाच फुटाला फिडर आणि ड्रिंकर येईल असे नियोजन आहे. यामुळे पक्ष्यांच्या जवळच खाद्य आणि पाणी उपलब्ध होते, त्यांची हालचाल कमी होते, त्याचा वजन वाढीसाठी फायदा होतो. पाण्यासाठीचे ड्रिंकर स्वयंचलित आहेत. त्यामुळे पक्ष्यांनी पाणी प्यायल्यावर लगेच हे ड्रिंकर भरतात. मजुरांची गरज कमी लागते. औषधे पाण्यातूनच दिली जातात. मी विहिरीचे पाणी देत असल्याने पक्ष्यांना पाणी फिल्टर करूनच दिले जाते. त्यामुळे पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पक्षी खाद्याची नासाडी करणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात पक्षी खाद्य दिवसा खात नसल्यामुळे रात्रीच्यावेळी पक्ष्यांना खाद्य द्यावे लागते. कंपनीच्या नियमानुसार कमीत कमी खाद्यापासून जास्तीत जास्त वजन मिळवणे हा प्रमुख उद्देश असतो. पक्ष्यांच्या व्यवस्थापनासाठी तीन मजूर कायमस्वरूपी आहेत.

कुक्कुटपालन फायदेशीर कुक्कुटपालनाबाबत विधाते म्हणाले, की करार पद्धतीने कुक्कुटपालन केले जात असल्याने पिल्ले, खाद्य, लसीकरण, औषधी आणि पक्ष्यांची विक्री कंपनी करते. पक्ष्यांना वाढविण्यासाठी लागणारे व्यवस्थापनाचा खर्च मला करावा लागतो. साधारणपणे 38 ते 42 दिवसांत पक्ष्यांचे लिफ्टिंग सुरू होते. साधारणपणे दोन किलो ते दोन किलो 300 ग्रॅम वजनाचा पक्षी विक्रीस तयार होतो. कंपनी पक्ष्यांची विक्री करते. चार दिवसांत पूर्ण पक्ष्यांची विक्री होते. प्रति किलो सरासरी पाच रुपये याप्रमाणे पक्षी वाढविल्याचा मोबदला मिळतो. बाजारातील भाव एका विशिष्ट रकमेच्या वर असतील आणि कमीत कमी खाद्यात जास्तीत जास्त वजन मिळाले असेल तर कंपनीतर्फे बोनस मिळतो. एका बॅचमध्ये 12,000 पक्ष्यांच्या व्यवस्थापनाचा, तसेच इतर खर्च वजा करता प्रति पक्ष्यामागे सरासरी 10 रुपये नफा मिळतो. शेड पूर्ण रिकामे झाले की भाताच्या तुसाचे तयार होणारे कोंबडी खत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. एक ट्रॉली तीन हजार रुपयांना विकली जाते. खाद्याची रिकामी पोती सरासरी सात ते 10 रुपये दराने विकली जातात. कुक्कुटपालनातील मिळणाऱ्या नफ्यातून आता रेशीम शेतीच्यादृष्टीने तुती लागवडीस सुरवात केली आहे.

विधातेंचे पोल्ट्री प्रशिक्षण केंद्र... चांगल्या पद्धतीने कुक्कुटपालन केले जात असल्याने विधाते यांच्याकडे या भागातील तरुण कुक्कुटपालनाची माहिती घेण्यासाठी येतात. ज्यांना प्रत्यक्ष पोल्ट्रीमध्ये दैनंदिन कामाचा अनुभव हवा असेल त्यांना विना मोबदला काम करण्याची संधी ते देतात.

राहुल विधाते - 9689038423
डॉ. मुकुंद कदम - 8149051060

(लेखक नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे कार्यरत आहेत.)

त्रुटी शोधल्या, सुधारणा केली कांदा पिकाची गुणवत्ता वाढली


सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्‍यातील वैरागपासून सात किलोमीटर अंतरावर दहिटणे येथील शहाजी लिंबाजी काशीद यांनी पारंपरिक पद्धतीत सुधारणा व एकात्मिक पद्धतीचे लागवड व्यवस्थापन करून कांद्याची प्रत व उत्पादन यात वाढ साधली आहे. सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.

दहिटणे गावात प्रामुख्याने कांदा, सोयाबीन, ऊस ही पिके घेतली जातात. गावातील शहाजी काशीद यांचे बीए, बीपीएडपर्यंत शिक्षण झाले. मात्र आवडीतून त्यांनी शेतीवरच भर दिला. त्यांची एकूण 14 एकर जिराईत जमीन आहे. अनेक वर्षांपासून ते नेमाने कांदा शेती करतात. मात्र पूर्वी पारंपरिक पद्धतीची शेती असायची. आता सुधारित पद्धत वापरून त्यांनी कांद्याची गुणवत्ता सुधारून एकरी उत्पादनवाढही साधली आहे.

मागील वर्षी सहा एकर क्षेत्रात त्यांनी कांदा पीक घेतले. दहिटणे येथे सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने (केव्हीके) 2012 मध्ये 20 शेतकऱ्यांचा गट (फार्मर्स क्‍लब) सुरू झाला. तज्ज्ञांच्या सहवासात नेहमी राहिल्याचा फायदा होत असतोच. तसाच तो काशीद यांना झाला. केव्हीकेने त्यांच्या शेतात मागील वर्षी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रयोगाचे प्रात्यक्षिक एक एकर क्षेत्रावर घेतले. तेथे केले जाणारे लागवड व्यवस्थापन थोड्याफार फरकाने अन्य एक एकरातही काशीद यांनी अमलात आणले. प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये केव्हीकेमार्फत माती परीक्षण केले होते.

काशीद यांच्याकडील कांदा प्रयोगाविषयी जमिनीची निवड -
लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडली. जमीन तयार करताना ट्रॅक्‍टरने नांगरणी केली. त्यानंतर दोन महिने ती उन्हात तशीच ठेवली. त्यानंतर दोन वेळा बैलाने फणणी केली. त्यानंतर कुळवणी करून बैलाच्या साह्याने सरी-वरंबे सोडून घेतले. दोन सऱ्यांमध्ये दोन फूट अंतर ठेवले.
रोपवाटिका -
रोपवाटिका तयार करताना बियाणे साऱ्यांमध्ये टाकून घेतले. त्यानंतर झारीने पाणी टाकले व मोकळे पाणी दिले. 15 ते 20 दिवसांनंतर खुरपणी (चिमटून) केली. त्यानंतर 10-26-26 हे खत 10 किलो, युरिया दोन किलो प्रति दोन किलो याप्रमाणे खते दिली. त्यानंतर सात ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी दिले. सुमारे 40 ते 45 दिवसांमध्ये रोपे लागवडीसाठी तयार झाली.

पाणी व्यवस्थापन पुनर्लागवड एक सप्टेंबरच्या सुमारास केली. लागवडी वेळी पहिले पाणी दिले. त्यानंतर दुसरे पाणी तीन दिवसांनंतर दिले. त्यानंतर पावसामुळे साधारणपणे 30 ते 35 दिवसांपर्यंत पाणी दिले नाही. पहिल्या खुरपणीनंतर तिसरे, तर चौथे त्यानंतर आठ ते 10 दिवसांनी व पाचवे दुसऱ्या खुरपणीनंतर दिले. सहावे पाणी काढणीपूर्वी 20 दिवस आधी दिले. रानाच्या उतारानुसार उतारास आडव्या सऱ्या सोडल्या जास्त चढ असेल अशा ठिकाणी वाफे लहान केले.

खत व्यवस्थापन (एकरी) - लागवड करण्यापूर्वी बेसल डोस
-10-26-26 - 50 किलो
-गंधक (90 टक्के, दाणेदार) - 20 किलो
-झिंक- 5 किलो
मॅग्नेशिअम- 10 किलो
-फेरस सल्फेट- 2.5 किलो

अशा प्रकारे सर्व खते एकत्र करून त्यांचा लागवडीपूर्वी सऱ्यांमध्ये वापर केला.

खुरपणीनंतर खताचा दुसरा डोस लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी दिला.

त्यात युरिया व 10-26-26 प्रत्येकी 50 किलो एकत्र करून दिली. त्यानंतर लगेच पाणी दिले.

कांदा पिकातील तणनियंत्रणासाठी ऑक्‍सिफ्लोरोफेन या तणनाशकाचा वापर केला. त्यात सरफॅक्‍टंटचा वापर केला.

पीक संरक्षण - वातावरण अनुकूल असल्यामुळे फुलकिडी, करपा आदी किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी फारशा फवारण्या कराव्या लागल्या नाहीत. विद्राव्य खतांचा वापर केला तो असो.

पहिली फवारणी-लागवडी नंतर 30 ते 31 दिवसांनी- 19-19-19- 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी
दुसरी फवारणी-लागवडी नंतर 45 ते 50 दिवसांनी-00-52-34 - 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी

विक्रीचे नियोजन कांदा काढणीचे नियोजन काशीद बाजारपेठेतील मागणीनुसार करतात. मागील वर्षी प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये एकरी 14 ते 15 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. तर त्याच प्लॉटप्रमाणे नियोजन केलेल्या, अन्य एकर क्षेत्रात 13 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. कांदा 50 किलो गोणीमध्ये भरून बंगळूर मार्केटला ट्रकमधून पाठवला. चांगल्या प्रतीमुळे दर चांगला मिळाला. काही लॉटला क्विंटलला 1800 रुपये, तर काही लॉटला 2200 रुपये दर मिळाला.
काही माल सोलापूर मार्केटला विकला. त्याला 1700 रुपये दर मिळाला.
उत्पादनखर्च एकरी 61 हजार रुपये आला.

कांद्याचे सुधारित व्यवस्थापन पूर्वी
1) लागवड ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात
त्यामुळे पुढे कांदा पावसात सापडायचा.
रोगांचा प्रादुर्भाव व्हायचा.
आता लागवड ऑगस्ट 15 नंतर केली जाते. त्यामुळे पावसाची जोखीम कमी होते.
त्यामुळे नुकसान कमी होते.

2) पूर्वी कीटकनाशक, तणनाशक यांचा वापर नसायचा. कांद्याला काही परिणाम होण्याच्या भीतीने तणनाशकाचा वापर टाळला जायचा.
आता तणनाशकाच्या वापराने तणांचे नियंत्रण वेळीच होते.
कीटकनाशकाच्या वापराने थ्रिप्स रोखला जातो.

3) पूर्वी खताचा बेसल डोस वापरला जात नव्हता.
आता त्याचा वापर केला जातो.

कांद्याला पाणी फार लागत नाही. तसेच बेसल डोसनंतर एक महिना तरी खत नको. लागवडीनंतर 45 दिवसांनी ते द्यावे. त्याआधी दिल्यास पिकाची शाकीय वाढ अधिक होते व किडीचा प्रादुर्भाव होतो. सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचा वापरही महत्त्वाचा आहे.

"ऍग्रोवन'चा उपयोग शेतीत चांगल्या प्रकारे होतो. त्यातील यशकथा उपयोगी ठरतात. एखादा प्रयोग प्रत्यक्ष पाहून मग त्याचा वापर करता येतो. अशा शेतकऱ्यांचे प्रयोग केवळ मी एकटा नाही तर माझ्यासोबत काही सहकारी मित्रांना घेऊन नेहमी पाहून येतो.

कांद्याव्यतिरिक्त काशीद यांच्याकडे सध्या चार एकर ऊस व दोन एकर सोयाबीन आहे. उसाचे एकरी 55 टनांपर्यंत असलेले उत्पादन 70 टनांवर नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. दरवर्षी पीक फेरपालट केली जाते. पूर्वी कांद्याचे एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंतच त्यांचे उत्पादन यायचे. आता टप्प्याटप्प्याने हे उत्पादन 10 टनांपासून 13 ते 15 टनांपर्यंत गेले आहे. मागील वर्षी प्रतिकूल परिस्थितीत कांद्याला क्विंटलला 1800 पासून 2200 रुपयांपर्यंत दर मिळाले होते. सरसकट कांद्याला बंगळूरमध्ये एकसमान दर मिळत असल्याने अन्य मार्केटपेक्षा तेथे विक्री करणे परवडते असे काशीद म्हणाले.

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

संपर्क - शहाजी काशीद, 9527023383
किरण जाधव, 0217-2350359
विषय विशेषतज्ज्ञ-
कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर 0217-2350359