Friday, 16 August 2013

आदर्श दुग्ध व्यवसाय शिकायचाय? चला मग पाटील कुटुंबीयांकडे...

कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. पहिल्या वेताच्या पाच गाई कोलारहून आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या 70 पर्यंत पोचली आहे. जन्मलेल्या वासरांची योग्य निगा राखल्यानेच हे शक्‍य झाले. गोठ्यात सुमारे पंचाहत्तर जनावरे आहेत. यात चाळीस गाई, तीस कालवडी, तीन मुऱ्हा पंढरपुरी म्हशी, तर दोन जातिवंत वळू आहेत. होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या चाळीस गाई आहेत. त्या प्रति दिन सरासरी 20 ते 36 लिटर दूध देतात.

गोठ्याची आदर्श उभारणी - गोठा पन्नास जनावरांच्या क्षमतेचा. शेजारी मुक्त स्वरूपातील गोठ्यासाठी जागा.
- गोठा बांधताना पिलरऐवजी पाइपचा आधार. सभोवती चार फुटांची भिंत.
- हेड टू हेड (जनावरांची डोकी समोरासमोर) पद्धतीची रचना.
- 75 फूट लांबीची व दोन फूट उंचीची गव्हाण.
- मस्टायटीस, गुडघी, खुरांचा आजार, पाय फासटणे आदी समस्या टाळण्यासाठी जनावरांच्या पायाखाली रबरी मॅट.
- तापमान नियंत्रणासाठी फॉगर सिस्टिम. उन्हाळ्यात चाळीस अंशांपर्यंत तापमान गेले तर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाते.

गोठ्यातील कार्यपद्धती - पहाटेच्या सुमारास कुटुंबातील तिघे व दोन मजुरांच्या साहाय्याने जनावरांची स्वच्छता.
- चारा, पशुखाद्य, पाणी, धारा काढणे ही कामे सकाळी नऊ वाजेपर्यंत.
- दूध काढणीसाठी मिल्किंग मशिनचा वापर.
- सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जनावरांना विश्रांती.
- धारा काढल्यानंतर जनावरांना शेजारील मुक्त गोठ्यात सोडले जाते.
- सकाळी सात ते नऊ या वेळेत जनावरांना व्यायाम.
- गाभण जनावरांना नैसर्गिक वातावरण मिळावे यासाठी मुक्त गोठा परिसरात सोडले जाते. शेजारी कालवडींसाठी स्वतंत्र व्यवस्था.

चारा व अन्य प्रभावी नियोजन - दहा एकर शेतीत सहा एकरांवर ऊस. उर्वरित क्षेत्रावर एक एकर मका व कडवळ, दोन एकर गवत, तसेच मका क्षेत्रात चवळी व लसूण घास अशी वैविध्यपूर्ण चारा पिके
- मजूर खर्च वाचविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून कापणी यंत्राचा वापर. दहा किलो वजनाचे यंत्र दहा रुपयांच्या पेट्रोलमध्ये दोन टन चारा कापते, तो पंचाहत्तर जनावरांना पुरेसा होतो.
- दिवसाला प्रति जनावर 26 किलो ओला व सहा किलो कोरडा चारा मिसळून व दोन टप्प्यांत सकाळी व संध्याकाळी दिला जातो. कोरडा चारा कुट्टीद्वारे दिला जातो.
- नजीकच्या दूध संघाचे पशुखाद्य प्रति लिटरला चारशे ग्रॅम, तर खनिज मिश्रण पावडर दिवसाला शंभर ग्रॅम प्रति जनावर याप्रमाणे दिले जाते.
- वर्षभर पुरेल इतका मुरघास तयार करून गरजेनुसार वापर.
- गव्हाणीत दोन तास चारा व वीस तास कालावधीसाठी समोर पाणी राहील याप्रमाणे नियोजन. जनावरांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे या उद्देशाने हे नियोजन.
- योग्य प्रथिने मिळणारा चारा दिल्याने आजारांचे प्रमाण कमी.
- कृत्रिम रेतन, वेळीच लसीकरण.
- अशा व्यवस्थापनामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी, त्यामुळे औषधोपचारावरील खर्च ऐंशी टक्‍क्‍यांपर्यंत, तर मरतूकही शून्य टक्‍क्‍यापर्यंत कमी झाली आहे.

वासरू संगोपन योजनेत आघाडी शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यातच वासरे तयार करावीत, या हेतूने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) वासरू संगोपन योजना राबविली आहे. त्याअंतर्गत पाटील कुटुंबाकडे 84 कालवडींची नोंद आहे. दूध संघाकडून 40 कालवडींसाठी अनुदान घेणारे हे एकमेव कुटुंब आहे.

अर्थशास्त्र - दिवसाचे दूध संकलन - 400 लिटर (सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोनशे लिटर)
* दुधाचे फॅट - 4.2 ते 4.3
* एस.एन.एफ. - 9
प्रति लिटर दुधाला मिळणारी किंमत - 21 रुपये
- वार्षिक उपलब्ध होणारे शेणखत - सुमारे 125 ट्रॉली
* शेणखताचे उत्पन्न - दोन लाख 50 हजार (प्रति ट्रॉली किंमत दोन हजार रुपये धरल्यास)
* दूध संघाचा बोनस (वार्षिक) - दीड लाख रुपये
* वर्षाला 15 ते 20 गाईंची विक्री, त्यातून पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम
* एकाही जनावरावर विमा नाही

दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली... पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते.

गोठ्याशेजारी "लेक्‍चर रूम' असून आधुनिक बैठक व्यवस्था, साउंड सिस्टिम, फळा, आदर्श दुग्ध व्यवस्थापनाचे तक्ते, वही, पेन आदींची सोय आहे. गोठा पाहणीसह त्याचे व्यवस्थापन, स्वच्छता, रबर मॅटची आवश्‍यकता, पशुखाद्य व्यवस्थापन, औषधे, लसीकरण, जनावरांच्या नोंदी, माजाचा काळ, कृत्रिम रेतन याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. प्रशिक्षणार्थींसाठी स्वयंपाक करताना पाटील कुटुंबातील महिलांचे हात थकत नाहीत. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाते. आलेल्या लोकांवर आपुलकीने लक्ष ठेवण्याचे काम यशवंत यांचे वयस्क आई- वडील करतात. प्रत्येक प्रशिक्षणार्थीमागे एकशे साठ रुपये खर्च येतो. त्यापैकी दूध संघ प्रति व्यक्ती 100 रुपये, तर सदस्य 60 रुपये पाटील कुटुंबाला देतो. अरविंद यांना "जनावरांचे मास्तर' नावानेच ओळखले जाते.

एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील "एकी'शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले.

संपर्क - अरविंद पाटील -
7588064529

8 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. सर कृपया मला नवीन दुग्धव्यवसाय सुरु करावयाचा असल्याने मला आपल्या गोठ्याचे फोटो swap,ahire1992@gmail.com वरपाठवावीत

  ReplyDelete
 3. भाऊ तुमचा लेख वाचला एक प्रकारची स्फूर्ती मिळाली दुग्धव्यवसायाबद्दल विलक्षण प्रेम आहे परंतु दिशा मिळत नव्हती माहीती नाही तुमचे मार्गदर्शनात व्यवसाय सुरू करावा. मनोज पाटील

  ReplyDelete
 4. सर कृपया मला नवीन दुग्धव्यवसाय सुरु करावयाचा असल्याने मला आपल्या गोठ्याचे फोटो PRAVINJAIN333@GMAIL.COM (WHATS APP NO.- 9689333751) वर पाठवावीत

  ReplyDelete
 5. सर कृपया मला नवीन दुग्धव्यवसाय सुरु करावयाचा असल्याने मला आपल्या गोठ्याचे फोटो jambhale.anil7@gmail.com वरपाठवावीत

  ReplyDelete
 6. सर तुम्ही अँड्रॉइड अँप्लिकेशन बनवा

  ReplyDelete
 7. सर मूर घास बनवण्यासाठी लागणारी बॅग कुठे मिळेल त्याचे कृपया मार्गदर्शन करा💐

  ReplyDelete
 8. सर मूर घास बनवण्यासाठी लागणारी बॅग कुठे मिळेल त्याचे कृपया मार्गदर्शन करा💐

  ReplyDelete