Tuesday, 24 September 2013

बायोगॅस निर्मिती देईल आर्थिक नफा

जैववायू (बायोगॅस) निर्मिती हीही समाजाची रोजची आणि वाढत जाणारी गरज आहे. जैववायू निर्मिती ही कृषिजन्य अवशेषांवर करता येते. हे अवशेष प्रत्येक कृषी हंगामात तयार होतात आणि त्यांची विल्हेवाट गरजेची असते. हे अवशेष कुजत असताना वायूनिर्मिती होतच असते. हे सर्व कृषिजन्य अवशेष संपूर्ण देशभर विकेंद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि हाच जैवभार या व्यवसायाचा कच्चा माल आहे. या जैवभारापासून वायूनिर्मिती करण्याची "कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन' ही इतर व्यवसायांसारखी यंत्रे किंवा मजुरांवर अवलंबून नाही तर वायूनिर्मिती ही प्रक्रिया विनॉक्‍सी वातावरणात जिवाणूंकडून घडवली जाते.
समाजाच्या आर्थिक स्तराप्रमाणे इंधनांची गरज बदलत नाही, बदलली तर त्यातील इंधनांचे स्वरूप जसे, की गरिबांच्या घरात चूल जळेल तर श्रीमंतांकडे द्रवीभूत खनिज वायूवरची शेगडी. एखादा व्यवसाय जर संगणक क्षेत्रातील असेल, तर त्याचा ग्राहक वर्ग हा शिक्षित असेल तसे इंधनाचे नाही. इंधन व्यवसाय अशा परिस्थितीत दैनंदिन गरजेचे ठरतात.

बायोगॅस निर्मिती व्यवसायाची गरज - 1) जैववायू किंवा बायोगॅस मोठ्या प्रमाणावर निर्माण करणे ही काळाची गरज आहे. येथे गोबर गॅस प्लांटची तुलना करता येणार नाही. याला कारण गोबर गॅस प्लांटची सगळ्यांत मोठी आवश्‍यकता असते ती म्हणजे शेण. त्यासाठी गाई- म्हशींचा गोठा हवा. तोही छोटा नव्हे तर किमान दररोज अडीच टन शेण हवे, म्हणजे 2500 किलो शेण तयार होण्यासाठी 250 तरी जनावरे असली पाहिजेत.
2) व्यावसायिक बायोगॅस प्लांट आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी किमान 100 घ.मी. एवढी वायूनिर्मिती रोज व्हायला हवी. 100 घ.मी. म्हणजे एक लाख लिटर गोबर गॅस.
3) इथे वायूनिर्मितीचा नियम आहे. एक किलो शेणापासून 40 लिटर बायोगॅस मिळतो. याच्या निर्मितीचा कालावधी सुमारे 40 दिवसांचा असतो. आजकाल मोठे डेअरी फार्म सोडले तर बहुतांशी शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या घटत चाललेली दिसते. वायूनिर्मितीसाठी दुसरा पदार्थ कोणता असा प्रश्‍न सहजच पडतो, तेव्हा यापूर्वीच्या लेखात चर्चा केलेल्या इंधन शेतीचा संदर्भ उपयोगी ठरेल.
4) मोठ्या प्रमाणावर वायूनिर्मिती होण्यासाठी त्यात जो पदार्थ वापरला जातो, त्यात पिष्टमय पदार्थ किंवा शर्करा यांचे प्रमाण सर्वोच्च असावे लागते. त्यांचा कुजण्याचा कालावधीही कमी हवा. कारण 100 घ.मी. वायूनिर्मितीसाठी गोबर गॅस प्लांटच्या पाचक टाकीचे आकारमान हे 200 घ.मी. म्हणजेच सुमारे दोन लाख लिटर एवढे असते.
5) पाचक टाकी आणि वायूनिर्मिती यांचे प्रमाण 2-1 या गुणोत्तरात असते. याच मापाने वायूनिर्मिती व्यवसाय किफायतशीर व्हायला हवा, तर हे गुणोत्तर त्यापेक्षा कमी म्हणजे 1-1.5 असेसुद्धा येऊ शकते.
6) उदाहरण द्यायचे झाले तर आमच्या संस्थेच्या फलटणमधील बायोगॅस प्लांटची टाकी एक लाख लिटर आहे. पण त्यातून होणारी दररोजची वायूनिर्मिती मात्र 150 घ.मी. एवढी आहे. गुणोत्तराची ही आकडेवारी बदलण्यासाठी खूपच प्रयोगांची मालिका झाली
7) बायोगॅस प्लांटमध्ये आपण जे पदार्थ टाकतो त्याला "फीड' असे म्हणतात आणि ज्या टाकीत हे पदार्थ घातले जातात त्याला "डायजेस्टर' असे म्हणतात. हे जणू काही आपल्या पोटासारखं... पाहा आपण रोज न्याहारीसाठी एक दोन पोळ्या खातो, दुपारच्या जेवणात तीन किंवा चार, संध्याकाळच्या न्याहारीत पुन्हा एक किंवा दोन आणि रात्रीला दोन किंवा तीन म्हणजे दिवसभरात सुमारे 10 ते 12 पोळ्या खातो, पण उद्या जर असं ठरवलं, की या सर्व पोळ्या एकाच वेली खायच्या तर काय होईल, पोट तर बिघडेलच आणि ऍसिडिटीही होईल. याच नेमक्‍या घटना बायोगॅस प्लांटमध्येही घडतात. म्हणूनच नवा विचार पुढे आला "पिरिऑडिक फीडिंग'. म्हणजेच बायोगॅस प्लांटचे खाद्य त्याला एकाच वेळी न देता सहा ते आठ तासांच्या अंतराने द्यायचे.
8) बायोगॅस प्लांटच्या खाद्यासाठी तासांचे अंतर निश्‍चित करण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये 10 ते 12 छोट्या बायोगॅस प्लांटची माळच उभारली होती आणि त्यांना दर 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24 अशा अंतराने फीडिंग देत होतो. यातील 1, 2, 3, 4, 6 हे सर्व बायोगॅस प्लांट पहिल्या तीन चार दिवसांतच ऍसिडिक झाले. मात्र 8, 12, 24 तासांनी फीडिंग होणारे तीनही बायोगॅस प्लांट पुढील महिनाभर व्यवस्थितरीत्या वायूनिर्मिती करीत होते आणि ऍसिडिक झालेल्या बायोगॅस प्लांटमधील वायूनिर्मिती तर थांबलीच, पण सर्व जिवाणूही मरून गेले. याचे एकमेव कारण बायोगॅस प्लांटची वाढलेली ऍसिडिटी. याचा सामू सुमारे 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावी लागते ही आदर्श पातळी 8, 12, 24 या तिन्ही बायोगॅस प्लांटमध्ये कायम होती.
याचाच अर्थ 24 तासांतून एकदा फीडिंग होणारा बायोगॅस प्लांटची क्षमता एक अशी धरली, तर दिवसातून तीन वेळेला म्हणजेच दर आठ तासांनी फीडिंग होणाऱ्या बायोगॅस प्लांटची कार्यक्षमता तीनपट झाली, असं म्हणण्यास पुरेसा वाव आहे. निसर्गाच्या कलाने एखादी गोष्ट केली तर त्यातून मिळणारे उत्पन्न हे टक्‍क्‍यांत न राहता पटीतच मिळते.
9) दर आठ तासांनी फीडिंग होणारा बायोगॅस प्लांट, याची कार्यक्षमता तीन पट होत असल्याकारणाने आमच्या प्लांटचे मूळ उत्पादन जे 50 घ.मी. होत होते, ते 150 घ.मी. होऊ लागले. सुमारे 30 टक्‍क्‍यांनी कार्यक्षमता तर वाढलीच, पण मिळणाऱ्या वाढीव उत्पादनासाठी कोणतीही नवी भांडवली गुंतवणूक करावी लागली नाही. इथं एक नवा निष्कर्ष डोळ्यांसमोर आला, तो म्हणजे निसर्गाचे फायदे आणि नियम समजून जर आपण काही करायला गेलो तर उत्पादनही चक्क पटीनं होतं. मानवनिर्मित यंत्राची उत्पादकता मात्र टक्केवारीतच मोजायला लागते.

शुद्ध वायूची गरज - मोठ्या प्रमाणावर वायूनिर्मिती केल्यावर त्याची साठवणूक करणेही तितकेच गरजेचे असते. मग ही साठवणूक कशी करायची? वायू साठवून कशात ठेवायचा? असे एका पाठोपाठ एक प्रश्‍न निर्माण व्हायला लागले. हे सारं समजावून घेण्यासाठी पहिल्यांदा माहिती करून घेणे गरजेचे ठरते, ते म्हणजे जैववायूमधील विविध वायू आणि त्यांची टक्केवारी. गॅस क्रोमॅटोग्राफ या अत्याधुनिक उपकरणाद्वारे या घटक वायूंची टक्केवारी मोजता येते. मात्र त्यासाठी सुमारे 99.99 टक्के शुद्ध असलेले वायूही आवश्‍यक असतात. गॅस क्रोमॅटोग्राफ या वायू शुद्धता तपासणाऱ्या यंत्रावर जैववायू तपासला असता, सर्वसाधारणपणे वायूंचे प्रमाण असे असते. मिथेन -55 ते 60 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 40 ते 45 टक्के आणि इतर घटक वायू जसे हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया, सल्फर-डाय- ऑक्‍साईड आणि बाष्प म्हणजे पाण्याचा अंश मात्र हे सर्व घटक पीपीएम या तत्त्वावर मोजले जातात.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर हायड्रोजन सल्फाईड 250 पीपीएम म्हणजे एकूण जैववायूचे जर दहा लाख कण असतील तर त्यातील 250 कण हायड्रोजन सल्फाइडचे. यातील विषारी असलेले हे तीन वायू वेगळे करणे हा एक अवघड भाग. इथेही अतिशय साधे, सोपे, व्यवहार्य आणि सर्वांत महत्त्वाचे कोणालाही करता येऊ शकेल, अशी प्रणाली मला विकसित करायची होती. मग यावरचे काम सुरू झाले.

(लेखक बायोगॅस विषयातील तज्ज्ञ आहेत.)

पीक उत्पादनात जमिनीचा सामू महत्त्वाचा

सामू म्हणजे जमिनीची आम्लता, विम्लता दर्शविणारा निर्देशांक. सामूचा जमिनीची सुपीकता पातळी आणि जमिनीची पीक उत्पादनक्षमता यांच्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रत्येक जमिनीचे काही विशिष्ट गुणधर्म असतात. हे गुणधर्म भौतिक, रासायनिक व जैविक स्वरूपाचे असतात. जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचे फूल, निचरा क्षमता, आकार, घनता, हवा व पाणी यांचा अभ्यास करता येतो. रासायनिक गुणधर्माच्या माहितीमुळे अन्नद्रव्य उपलब्धतेचे प्रमाण, विशिष्ट अन्नद्रव्यातील स्थिरीकरण, निरनिराळ्या अन्नद्रव्यांतील आंतरप्रक्रिया याची माहिती होते. जैविक गुणधर्मामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता व त्यांच्या कार्यक्षमतेतील फरकामुळे अन्नद्रव्य उपलब्धतेमध्ये होणारे फेरबदल, हवेतील नत्राचे जमिनीत होणारे स्थिरीकरणाबाबतची माहिती मिळते.

मृद्‌ चाचणी करताना रासायनिक गुणधर्माचा प्रामुख्याने विचार केला जातो. यात सामू, सेंद्रिय कर्ब, क्षारता, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश या घटकांची प्रामुख्याने चाचणी करून अहवाल तयार केला जातो. त्यानुसार शिफारशी दिल्या जातात. या सहा घटकांपैकी सामू या घटकाला विशेष महत्त्व आहे. सामूची माहिती कमी वेळात मिळते, या माहितीवरून जमिनीच्या अनेक अंगाच्या रूपरेषेचा अंदाज येतो.

सामूचे वैज्ञानिक स्वरूप ः
1) पदार्थाच्या द्रावणाचा आम्लपणा हा त्यातील घन विद्युत घटकांवर अवलंबून असतो, तर विम्लपणा हा त्यातील ऋण विद्युत घटकांवर अवलंबून असतो. जमिनीत असणारे सूक्ष्मकण हे कलील स्वरूपाचे असतात. मृणमय कलील कणांच्या पृष्ठभागावर विद्युतभार असल्यामुळे हे कण धन विद्युत व ऋण विद्युत अशा दोन्ही स्वरूपांचा विद्युतभार असलेल्या कणांना धरून ठेवू शकतात.
2) जमिनीचा पाण्याशी संपर्क आल्यावर या विद्युतभार कणांचे काही प्रमाणात विलगीकरण (आयोनायझेशन) होते. या प्रक्रियेमुळे मृणमय कलील कणांचे पृष्ठभागावर ऋण विद्युतभारामुळे धरून ठेवलेले धन विद्युत कण हायड्रोजन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, सोडिअम इत्यादींचे विलगीकरण होऊन ते पाण्यात मुक्तपणे फिरू लागतात. या धन विद्युत कणात हायड्रोजन आयानला अत्यंत महत्त्व असते.
3) द्रावणातील हायड्रोजन आयानाचे प्रमाण मोजणे फार महत्त्वाचे असते. या प्रमाणावरून जमिनीचा सामू किती आहे याची कल्पना येते.

सामूवर ठेवा नियंत्रण ः
1) जमिनीचा सामू उदासीन असणे केव्हाही योग्य असते. आम्ल जमिनीत सामू वाढविण्यासाठी चुनखडी किंवा डोलोमाईटचा वापर करावा लागतो.
2) विम्ल जमिनीत सामू कमी करावा लागतो. त्यासाठी जिप्सम, गंधक, आर्यन पायराईट, प्रेसमड केक यांचा वापर करावा लागतो.
3) जमीन सुधार पदार्थाचा वापर केल्यावर सामू उदासीन पातळीवर यायला कित्येक आठवडे किंवा काही महिने लागतात. कारण जमिनीमध्ये सामूत फार वेगाने बदल होऊ नये म्हणून सामू विरोधक नैसर्गिक शक्ती (बफरिंग कपॅसिटी) असते. या शक्तीमुळे सामूत होणारे बदल अत्यंत किंवा कमी वेगाने घडतात.

सामूचा जमिनीच्या सुपीकता पातळीशी असलेला संबंध ः
सहा ते आठ सामू असणाऱ्या जमिनी सुपीक असू शकतात. मात्र सामू सहाच्या खाली किंवा ाठच्या वर असेल, तर त्या जमिनीत चांगले पीक घेणे अवघड जाते. अशा जमिनी नापिक नसल्या तरी फार सुपीक नसतात. मात्र जमीन सुधार पदार्थाचा वापर करून जमिनीचा सामू उदासीन पातळीवर आणल्यावर ती जमीन मशागतीच्या सर्व कामाला उत्तम प्रतिसाद देते.

सामू आणि जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता ः
1) जमिनीत होणाऱ्या अनेक रासायनिक प्रक्रिया या जैविक स्वरूपाच्या असल्याने त्यांना जैवरासायनिक प्रक्रिया असे म्हणतात. या प्रक्रियेत जिवाणू व कवक हे सूक्ष्म जीव असतात. जिवाणूंना फार आम्लता मानवता नाही, तर कवक गटातील जिवाणूंना फार विम्लता मानवत नाही.
2) सेंद्रिय पदार्थाचे विघटन, युरिया खताना नत्रीकरण, हवेतील नत्राचे स्थिरीकरण या गोष्टी जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहतात.
3) सर्व तऱ्हेच्या सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता, गांडुळांची कार्यक्षमता ही जमिनीचा सामू सहा ते आठ असतानाच जास्त प्रभावशाली असते.

सामू आणि पाऊस, तापमानाचा संबंध ः

1) जसजसे पावसाचे प्रमाण वाढत जाते तसतशा जमिनी लाल अथवा पॉडझालच्या स्वरूपात रूपांतरित होतात. त्या जमिनीचा सामू कमी होतो. पावसाचे प्रमाण जसजसे कमी होत जाते तसतसे त्या जमिनीचा सामू वाढतो. त्या जमिनीत विद्राव्य क्षारांचे प्रमाणही वाढते.
2) जास्त तापमान झाले, की जमिनीतील सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाचा वेग वाढून जमिनीत सेंद्रिय स्वरूपातील आम्ले तयार होण्याची शक्‍यता वाढते. त्याचा परिणाम म्हणून जमिनीचा सामू कमी होतो.

जमिनीचा सामू म्हणजे काय? 1) सामू म्हणजे जमिनीचा आम्लता, विम्लता दर्शविणारा निर्देशांक.
2) सामू नेहमी हायड्रोजन आयन तीव्रतेच्या नकारार्थी लागेरीथमच्या समान असतो. हे मूल्य जितके कमी तितकी जमिनीचा प्रतिक्रिया आम्ल असते. उलटअर्थी हे मूल्य जितके जास्त, तितकी जमिनीची प्रतिक्रिया अल्कधर्मी असते.
3) जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीच्या सामूवर अवलंबून असते. ज्या जमिनीचा सामू सहा ते सात इतका असतो, असा जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक असते. शेतीच्या दृष्टीने अशा जमिनी अत्यंत उपयुक्त असतात.
3) जसजसा सामू वाढेल अथवा कमी होईल तसतशी अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत जाते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या कार्यक्षमतेवरही सामूचा परिणाम होत असतो. आम्ल गुणधर्मीय जमिनीत कडधान्य पिकांच्या मुळावरील जिवाणूंची वाढ समाधानकारक होत नाही. त्यामुळे आम्ल गुणधर्मीय जमिनीत कडधान्य पिके चांगली वाढत नाहीत.
4) ज्या जमिनीचा सामू साधारण नऊ इतका असतो, अशा विम्ल गुणधर्मीय जमिनीत कॅल्शिअमसारखी खनिजद्रव्ये स्थिर होतात, वनस्पतींना ती सहजपणे उपलब्ध होत नाहीत.

...असा मोजा जमिनीचा सामू
1) जमिनीचा सामू मोजण्याकरिता सामूपट्टीचा उपयोग केला जातो. जमिनीचा सामू कमीत कमी एक व जास्तीत जास्त 14 असतो. या पट्टीवर 0 ते 14 आकडे असतात. त्याचा वापर करून उपयुक्त निष्कर्ष काढता येतात.
2) सामूपट्टीवर सात आकडा असला तर ती जमीन आम्लही किंवा विम्लही नसते.
3) सामू सात वरून जसजसा कमी आकड्याने दर्शविला जातो. तशी ती जमीन जास्तीत जास्त आम्ल आहे असे समजायचे.
4) सामू सातपेक्षा जास्त आकड्याने दर्शविला की ती जमीन विम्ल आहे हे दर्शविले जाते.
5) आम्लता किंवा विम्लता फार असणे हे पिकाच्या दृष्टीने अपायकारक मानले जाते. आम्लता अथवा विम्लता कमी करून सामू उदासीन बनविण्याचा प्रयत्न करावा लागतो.
6) सुपीक व निरोगी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असतो.

सामूचा होणारा परिणाम ः 1) जास्त आम्ल जमिनीत आम्लपणामुळे व जास्त विम्ल जमिनीत विम्लपणामुळे पिकांच्या मुळावर व त्याच्या पेशीवर विपरीत परिणाम होऊन ती निकृष्ट बनतात. पेरलेली बी उगवण न होता मरून जाण्याची शक्‍यता असते.
2) आम्ल जमिनीत लोह, ऍल्युमिनिअम, मंगल व ताम्र यांचे प्रमाण वाढते. त्याचा विषारी परिणाम पिकावर होतो. बुरशीजन्य रोग हे आम्ल जमिनीतच होतात. तसेच काही जंतूंमुळे होणारे रोग जास्त आम्ल किंवा विम्ल जमिनीतच होतात. उसावरील केवडा रोग जास्त विम्ल जमिनीतच आढळून येतो.
3) अन्नद्रव्य पदार्थाची उपलब्धतेचा सबंध पिकांना लागणाऱ्या सर्व आवश्‍यक अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्यात जमिनीच्या सामूचा महत्त्वाचा वाटा असतो. जमिनीच्या सामूत बदल झाला तर विशिष्ट अन्नद्रव्यांचा पुरवठा एकदम कमी होतो, त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. सामूतील बदलामुळे सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर बदल होतो.
4) सामू चार ते आठ असताना कवक जिवाणू बऱ्याच प्रमाणात कार्यरत राहतात. बॅक्‍टेरिया व ऍक्‍टिनोमायसेटिस हे सूक्ष्म जिवाणू सामू सहा ते नऊ असताना जास्त कार्यक्षम असतात.
5) नत्र अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीचा सामू सहा ते नऊ असताना जास्त असते.
6) स्फुरद अन्नद्रव्य जमिनीचा सामू सहा ते सात असतानाच सहजपणे मिळू शकते.
7) सामू सहा ते नऊ असताना पालाश व गंधक अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात.
8) जमिनीचा सामू 6 ते 8.5 असताना कॅल्शिअम व मॅग्नेशिअम जास्त प्रमाणात पिकांना घेता येतात.
9) जमिनीचा सामू सहापेक्षा कमी असताना बोरॉन, ताम्र व जस्त ही अन्नद्रव्ये चांगल्या तऱ्हेने मिळतात.
10) जमिनीचा सामू आठच्या पुढे असताना मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला होतो.

पिकांची आम्लता व विम्लता सहन करण्याची क्षमता ः 1) तीव्र आम्लता सहन करून शकणारी पिके- भात
2) मध्यम आम्लता सहन करू शकणारी पिके- गहू, मका, सोयाबीन, टोमॅटो, चवळी.
3) थोडीशी आम्लता व विम्लता सहन करू शकणारी पिके - फुलकोबी, वाटाणा, कोबी, गाजर.

प्रा. पेंडके ः 9890433803
(लेखक अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)

पेरू घन लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

जगामध्ये सध्या फळ लागवडीमध्ये पारंपरिक लागवड पद्धतीऐवजी घन लागवड पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात होतो. फळांचे प्रति हेक्‍टरी उत्पादन वाढविण्यासाठी सघन (दाट) लागवड हा एक उत्तम उपाय आहे. यामध्ये फळझाडांच्या प्रचलित लागवड अंतरापेक्षा कमी अंतरावर फळझाडांची लागवड करून हेक्‍टरी झाडांची संख्या वाढवली जाते. नियमित छाटणी तंत्रज्ञानाचा अवलंब करीत झाडाचा आकार मर्यादित ठेवून त्यावरील फळांची संख्या वाढविली जाते. त्यामुळे उत्पादनात सुरवातीच्या काळापासून भरीव वाढ होते. पेरूमध्ये देखील घन लागवड करून अधिक उत्पादन घेता येते.

पेरूतील घन (दाट) लागवड पद्धतीसाठी बुटक्‍या वाणांचा वापर केला जातो. तसेच छाटणी करत झाडांचा आकार मर्यादित ठेवला जातो. त्यामुळे सूर्यप्रकाश प्रत्येक पानांपर्यंत पोचल्याने प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया वेगाने होते. झाडावरील कार्यक्षम पानांची संख्या वाढते. पर्यायाने फळांची संख्या वाढते. पेरूच्या प्रति एकर उत्पादनात वाढ मिळते.

...अशी आहे शिफारस - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागामध्ये संशोधन संचालक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिरामण शिरसाठ यांनी "पेरू घन (दाट) लागवड' या विषयावर सन 2008 ते 2011 या कालावधीत पीएचडीसाठी संशोधन केले. सदर प्रयोगाच्या निष्कर्षानुसार पेरू घन लागवड तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात आली.
- पेरूच्या बागेतून अल्प कालावधीत (सुरवातीची 3.5 वर्षे) फायदेशीर उत्पादन घेण्यासाठी, पेरू कलमांची 3 x 2 मी. अंतरावर "घन लागवड' करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पेरू बाग-व्यवस्थापनासाठी सुधारित तंत्रज्ञान - * मे महिन्यात शिफारशीत 3 x 2 अंतरावर 50 x 50 x 50 सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. त्यामध्ये पाच किलो शेणखत, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 25 ग्रॅम प्रति ऍझोटोबॅक्‍टर, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा व पोयटा मातीने भरून घ्यावा. त्यात जून ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत पेरू कलमांची लागवड करावी.
* दोन महिन्यांनंतर (सप्टेंबर दरम्यान) रोपांचा शेंडा जमिनीपासून दोन फूट उंचीवर छाटावा व त्यानंतर दोन महिन्यांनी (नोव्हेंबर) प्रत्येक रोपावर चारी दिशेने चार प्राथमिक फांद्या ठेवाव्यात.
* त्यापुढे दोन महिन्यांनी (जानेवारी) या प्राथमिक फांद्यांची 50 टक्के छाटणी करून शेंड्याकडील कोवळी फूट काढावी. सरते शेवटी, पुढील हिवाळ्यात (नोव्हेंबर - डिसेंबर दरम्यान) पेरूचे पहिले फळ - उत्पादन घेण्यासाठी, द्वितीय फांद्यांची मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात 50 टक्के छाटणी करून तळाकडील पक्व भाग राखावा.
* तसेच पावसाळी हंगामात (जून-जुलै दरम्यान) दुसरे फळ उत्पादन घेण्यासाठी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फांद्यांची 50 टक्के छाटणी करावी.
* वर्षातून दोनदा - फळ उत्पादन घेण्यासाठी; प्रत्येक वर्षी दोनदा छाटणी (मे व जानेवारी) तसेच दोनदा खत व्यवस्थापन (जून व जानेवारी) करणे या तंत्रज्ञानासाठी अत्यावश्‍यक आहे.

खत व्यवस्थापन सुरवातीच्या बाग व्यवस्थापनेसाठी (सुरवातीच्या 3.5 वर्षांकरिता) पुढीलप्रमाणे खत व्यवस्थापन करावे.
* प्रथम वर्षी, जून लागवडीनंतर सप्टेंबर व जानेवारी महिन्यांत 75-30-30 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत.
* दुसऱ्या वर्षी 130-75-75 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश व 25 ग्रॅम प्रत्येकी ऍझोटोबॅक्‍टर, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा प्रति झाड या प्रमाणात अन्नद्रव्य खते जून व जानेवारी महिन्यांत द्यावीत. जूनमध्ये पाच किलो शेणखत द्यावे.
* तिसऱ्या वर्षी जून महिन्यात 130-75-75 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश व 50 ग्रॅम प्रत्येक ऍझोटोबॅक्‍टर, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा प्रति झाड या प्रमाणात जैविक खते व पाच किलो शेणखत द्यावे आणि जानेवारी महिन्यात 205-112-112 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड या प्रमाणात अन्नद्रव्य खते द्यावीत.
* चौथ्या वर्षी जून महिन्यात 10 किलो शेणखत व 205-112-112 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश व 50 ग्रॅम प्रत्येक ऍझोटोबॅक्‍टर, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा प्रति झाड याप्रमाणे अन्नद्रव्ये द्यावीत. पेरू घन लागवडीनंतर प्रथम 3.5 वर्षांच्या फळ उत्पादनासाठी, सदर छाटणीचे व खत व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान अमलात आणावे.

घन लागवडीचे फायदे - 1) प्रचलित पारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा प्रति हेक्‍टरी अधिक उत्पादन मिळते.
2) फळांचा दर्जा पारंपरिक लागवडी पद्धतीतील फळांच्या दर्जासारखाच असतो.
3) पारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा घन लागवडीतून निव्वळ नफा जास्त मिळतो.
4) घन लागवड पद्धतीमध्ये झाडांचा आकार लहान असल्यामुळे व्यवस्थापन सोपे असते.
5) फळ काढणी सोपी असते.
6) उत्पादन खर्च कमी असतो.

घन लागवडीतील फळ उत्पादन, निव्वळ नफा व नफा - खर्च गुणोत्तर
लागवडीचे अंतर --लागवडीपासून 3.5 वर्षांतील 5 फळ काढणीचे उत्पादन प्रति झाड (कि) --लागवडीपासून 3.5 वर्षांतील 5 फळ काढणीचे उत्पादन प्रति हेक्‍टर (टन) --निव्वळ नफा रुपये --नफा - खर्च गुणोत्तर
3 x 2 मी.-- 29.54 --49.23 --2,40,978 --1.96
6 x 6 मी. --43.74 --12.11 -- 11,956 --0.91

पेरू लागवडीविषयी अधिक माहिती - - भारतातील फळझाडाखालील एकूण क्षेत्रापैकी सहा ते सात टक्के क्षेत्र पेरूच्या लागवडीखाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र ही राज्ये पेरू लागवडीत आघाडीवर आहेत.
- महाराष्ट्रात जवळ जवळ 34 हजार हेक्‍टर क्षेत्र पेरू फळ पिकाखाली असून, ते प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, बुलडाणा, भंडारा, जळगाव या जिल्ह्यांत आहे.
जमीन आणि हवामानाचा विचार करता महाराष्ट्रात पेरू लागवडीस भरपूर वाव आहे. महाराष्ट्राची पेरू उत्पादकता 7.6 टन प्रति हेक्‍टर एवढी कमी आहे.

संपर्क - डॉ. हिरामण शिरसाठ, 9850544598
(लेखक उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

दर्जेदार तांदूळ उत्पादनातील खणखणीत नाव - गंगाराम धिंदळे

गंगाराम धिंदळे यांच्या शिरपुंजे या आदिवासी भागात कोरडवाहू पारंपरिक शेती केली जायची, बियाणेही घरचेच, त्यामुळे तुटपुंजे उत्पन्न मिळत असे. धिंदळे यांच्या कुटुंबात तीन भावांसह दहा सदस्य आहेत. गंगाराम शालेय जीवनापासून कमवा व शिका योजनेतून शिक्षण घेण्याची जिद्द मनी बाळगून होते. सन 1994-95 मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत चार वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. शिक्षण बी.कॉम., बी.एड. होते. पुढे तांत्रिक कारणांमुळे नोकरी सोडून देणे भाग पडले.

शेतीचा प्रवास सुरू धिंदळे यांची वडिलोपार्जित 18 एकर शेती. नोकरी सोडल्यानंतर आपल्या कोरडवाहू जमिनीत 2004 मध्ये सुधारित बियाण्यांचा वापर करत शेतीस खऱ्या अर्थाने सुरवात केली, त्यासाठी कृषी विभागाचे सहकार्य झाले. संकरित भाताच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळाल्याने आत्मविश्‍वास वाढला. सेंद्रिय शेती करून उत्पादन घेतले अधिक भाव मिळून नफा मिळवता येईल असे त्यांना वाटले. यासाठी मे 2006 मध्ये अकोले (ता. नगर) कृषी विभाग, तसेच कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भाताची सुधारित शेती सुरू केली. आता दरवर्षी भात, कांदा, बटाटा, भुईमूग, गहू अशी विविध पिके ते घेतात.

भाताची उल्लेखनीय शेती - वैशिष्ट्ये - आठ ते दहा एकरांपैकी चारसूत्री पद्धतीने सुमारे 50 ते 60 टक्के क्षेत्र
- त्यात इंद्रायणी, पुसा बासमती, भोगावती आदी जातींचा वापर

40 टक्के पारंपरिक पद्धतीचा वापर - - त्यात तामकुडाई, काळभात, रायभोग, कोळपी, जिरेसाळ आदी देशी जातींचा वापर

- दरवर्षी 10 ते 12 जूनच्या दरम्यान साधारणपणे पाच ते सहा वाणांच्या रोपवाटिका तयार करतात. एक महिन्याने (जुलै 10 ते 15 तारखेच्या दरम्यान) पुनर्लागवड, चारसूत्री व पारंपरिक पद्धतीने.

सहा ते सात एकर क्षेत्र पूर्ण सेंद्रिय आहे. उर्वरित दोन एकरांवर रासायनिक खतांचा वापर होतो.

खत व्यवस्थापन - पूर्णपणे पावसावरच भात घेतला जातो. प्रामुख्याने गांडूळ खत व जैविक खतांचा वापर. रोपांसाठी पोषक म्हणून गोमूत्राचा वापर, त्यामुळे रोग- किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाल्याचा अनुभव.
- दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळात सुमारे 2000 ते 2100 मि.मी. पाऊस पडतो. प्रामुख्याने करपा रोग व खोडकीड यांचे प्रमाण आढळते. नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा वापर न करता गोमूत्र व सुफली वनस्पतीच्या अर्काचा वापर.

सुधारित पद्धतीत या बाबींचा होतो वापर - लागवड - गादीवाफ्यावर
- लागवडीचे अंतर - 15 बाय 25 सें.मी. अंतरावर (नेहमीच्या चुडी पद्धतीचा वापर न करता विरळ रोपांची लागवड)
- भाताच्या पेंढ्याचा (तूस) वापर
- युरिया- डीएपी ब्रिकेट यांचा वापर
- गांडूळ खत, दशपर्णी अर्क, अमृतपाणी, सुफली अर्काचा वापर
- सह्याद्री या भाताच्या संकरित वाणाचाही सेंद्रिय पद्धतीने प्रयोग
- सेंद्रिय खतांसाठी 2006 मध्ये गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केल्याने दरवर्षी सुमारे 350 ते 400 किलो खत उपलब्ध होते, त्याचा वापर दरवर्षी केला जातो, त्यामुळे तांदळाचे वजनदार व दर्जेदार दाणे मिळतात. उत्पादन वाढण्यास मदत होते.

धिंदळे यांच्याकडून शिकण्यासारखे --
अंगात शिक्षकी गुण आहेत, त्यामुळे रासायनिक खताच्या अतिवापराचे दुष्परिणाम व सेंद्रिय खताची निकड ओळखून गांडूळ खतनिर्मितीसाठी शेतकऱ्यांची मानसिकता वळविण्यासाठी धिंदळे यांची सदैव धडपड असते. गावातील अनेक शेतकरी सोबत घेऊन कृषी विभागाच्या माध्यमातून विविध ठिकाणी ते प्रबोधनासाठी जातात. त्यांच्या प्रयत्नांतून 2006-07 मध्ये 54 गांडूळ खत प्रकल्प उभे राहण्यास यश आले. विशेष म्हणजे धामणगाव, शिरपुंजे यांसारख्या दुर्गम भागात त्यांनी हे अवघड काम केले असून, शेतकऱ्यांना 25 टक्के अनुदानही मिळवून दिले.

भात उत्पादन - - दरवर्षी चार सूत्री पद्धतीतून एकरी सुमारे 15 ते 16 क्विंटल उत्पादन
- पारंपरिक पद्धतीतून एकरी 11 ते 13 क्विंटलपर्यंत
- उत्पादन खर्च - सुमारे 10-12 हजार रुपये एकरी

विविध वाणांच्या तांदळाची विक्री - ग्राहकांच्या मागणीनुसार तांदळाचे एक, दोन, पाच, दहा, तीस किलोमध्ये पॅकिंग
- स्थानिक बाजारपेठ, भीमथडी, विविध कृषी प्रदर्शने; तसेच नगर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, मुंबई येथे धान्य महोत्सवात तांदळाची विक्री
- भोगावती, इंद्रायणी वाणाचा तांदूळ - 40 रुपये प्रति किलो
- काळभात, बासमती, हातसडीचा तांदूळ - 60 रुपये प्रति किलो
- जिरेसाळ, वरगळ वाणाचा तांदूळ - 32 ते 35 रुपये प्रति किलो

अधिक उत्पादनासाठी दरवर्षी नवीन वाणांचा प्रयत्न - भाताचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आदींकडे धिंदळे दरवर्षी नवीन वाणाची चौकशी करतात. जुन्या वाणांसोबत या वाणाचे प्रात्यक्षिक घेतात, त्यामुळे कोणत्या वाणाचे उत्पादन अधिक मिळते हे त्यावरून कळण्यास मदत होते. त्यांना बाएफ या स्वयंसेवी संस्थेचेही मार्गदर्शन होते.
गंगाधर धिंदळे - 9823378513

गंगारामभाऊ, तांदूळ मिळेल का? भीमथडी प्रदर्शनात धिंदळे यांना सर्वोत्कृष्ट शेतकरी विक्रेते (बेस्ट सेलर) म्हणून मागील वर्षी पहिले पारितोषिक मिळाले. त्यांनी यात 15 क्विंटल तांदूळ विकला; मात्र केवळ विक्रीसाठी नव्हे, तर ग्राहकांना मालाचे महत्त्व, दर्जा पटवून देणे व चांगला संवाद साधणे याचाही विचार पारितोषिकासाठी केला गेला.

अशा प्रदर्शनांतून त्यांनी ठाणे, घाटकोपर, कोपरगाव, जळगाव, नाशिक आदी भागांतील ग्राहक जोडले आहेत.
"गंगारामभाऊ, तांदूळ आहे का?' अशी विचारणा होते. मग फोनवरून ऑर्डर घेऊन ग्राहकांना माल पाठवला जातो.
वाहतुकीचा खर्च ग्राहक भरतात; मात्र 40 रुपये प्रति किलो दराने ग्राहक गंगारामभाऊंचा तांदूळ खरेदी करतात.
त्यांच्या बॅंकेच्या अकाउंटमध्ये पैसे हस्तांतरित केले जातात.

प्रदर्शने, महोत्सव, ग्राहक यांच्या मागणीतूनच सर्व तांदूळ खपतो. प्रत्येक महोत्सवाचा कालावधी त्यांना आगाऊ माहीत असतो, त्यानुसार त्या काळात आपला माल उपलब्ध करण्याचे नामी नियोजन ते करतात. केवळ आपलाच नव्हे, तर परिसरातील शेतकऱ्यांचा तांदूळही विकण्यासाठी ते पुढाकार घेतात.

मुंबईच्या एका मॉलच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्या तांदळाची प्रशंसा केली आहे व तो विकतही घेतला आहे.

एकात्मिक पद्धतीचा आदर्श सांगणारी बारी यांची शेती

ठाणे जिल्ह्यातील घोलवड परिसर म्हणजे चिकूचे आगार. या भागातील डहाणूस्थित विनायक बारी यांची चिखले (चिंबावे) गावी सुमारे 22 एकर शेती आहे. बारी महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सन 1979 मध्ये बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती करायची असा निर्णय घेऊन त्यांनी पूर्णवेळ शेतीत झोकून दिले. पत्नी सौ. विजया यांची त्यांना शेतीत चांगली साथ लाभली आहे.

चिकूची वाडी - बारी यांचे मुख्य पीक चिकू आहे. कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथून कालीपत्ती जातीची 400 कलमे आणून शेतात लावली. सध्या त्यांच्याकडे 14 एकर चिकूची वाडी आहे. या झाडांची पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने जोपासना केली जाते. गांडूळ खताचे, तसेच बाजूला व्हर्मिव्हॉश (गांडूळ पाणी), दशपर्णी अर्क व जिवामृतचेही युनिट आहे. या सर्व युनिटमधून तयार झालेले सेंद्रिय खत, कीडनाशके वेळच्या वेळी घरच्या शेतीच्या उपयोगात आणली जातात. काही वर्षांपासूनच रासायनिक खते वापरण्याचे बंद केले. प्रति झाड 250 ते 270 किलो, तर हेक्‍टरी सुमारे दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते.

चिकूचे मार्केट - वर्षभर फळे देणाऱ्या झाडाला ऑक्‍टोबर ते मेपर्यंत अधिक चिकू लागतात. पावसाळ्यात ती कमी येतात. फळे विक्रीसाठी डहाणूच्या चिकू मार्केटला (ऑक्‍शन) आणली जातात. शेतकऱ्यांचा महालक्ष्मी फळफळावळ संघ असून, तेथे विक्री होते. ऑक्‍शनला मुंबई व गुजरातच्या व्यापाऱ्यांमार्फत उघड बोली पद्धतीने विक्री केली जाते. आकारानुसार चिकूला सरासरी आठ ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतो.
मोठ्या आकाराच्या चिकूला तो 20 रुपयांपर्यंत मिळतो.

चिकू प्रक्रिया युनिट शेतावरच चिकू प्रक्रिया युनिट आहे. चिकूला बाजारात जेव्हा मागणी किंवा दर कमी (किलोला तीन ते चार रु.) असतात, अशा वेळी चिकू चिप्स, पावडर, लोणचे आदी पदार्थ बनविले जातात. चिप्स 350 ते 400 रुपये प्रति किलो दराने विकले जातात.

आंबा -
सुमारे तीन एकरांत आंबा असून हापूस, राजापुरी व केसरची झाडे आहेत. हापूसचे हेक्‍टरी साडेचार ते पाच टन, तर
उर्वरित दोन आंब्यांचे साडेपाच ते सात टन प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळते. राजापुरी आंब्याचा उपयोग लोणच्यासाठीसुद्धा होतो. हापूसला किलोला 30 ते 35 रुपये, केसरला 20 ते 25 रुपये, तर राजापुरीला 20 रुपये दर मिळतो.

नारळ -
बाणवली जातीची सुमारे 350 झाडे आहेत. प्रति झाड 100 ते 80 नारळ मिळतात. डहाणूचे व्यापारी शहाळी प्रति नग पाच ते आठ रुपये दराने खरेदी करतात. धार्मिक वा सणासुदीच्या निमित्ताने नारळाला 10 ते 12 रुपये दर मिळतो.

सफेद जांबू - 60 सफेद जांबूची झाडे आहेत. फेब्रुवारी- मे दरम्यान फळे लागतात. फळे काढल्यानंतर तीन ते चार दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत, त्यामुळे जवळच्या मार्केटमध्ये विक्री करावी लागते. फळांना सरासरी 80 रु. प्रति शेकडा दर मिळतो. फळे तोडणीच्या वेळी फळमाशीची समस्या उद्‌भवते; मात्र सापळे लावून तिचे नियंत्रण करतात.

बारी यांच्या शेतीची वैशिष्ट्ये - वर्षभरासाठी पीक पद्धती -
- थोडे क्षेत्र हळदीचे. त्यात आंतरपीक कढीपत्ता, पुदिना, गवती चहा, तमालपत्र अशी मसाला पिके.
- वर्षभर शेतीतून काही ना काही उत्पन्न सुरू राहील अशी पीक पद्धती.
- पूर्वी बारी यांचे वडील स्व. रघुनाथ आपल्या शेतात पुदिना, पिंपरमिंट व गवती चहाची लागवड करून रोज रेल्वेने मुंबईला विकायला जायचे. माझे वडील आणि त्यांना साथ देणारी माझी आई स्व. लाडूबाई यांनी केलेल्या कष्टानेच आज हे वैभव बघायला मिळते आहे, असे विनायक आवर्जून सांगतात. आजही या वनस्पतींची मिश्र जुडी दहा रुपयांप्रमाणे विकली जाते. तमालपत्रे 90 ते 80 रुपये प्रति किलो दराने विकली जातात.
- सेंद्रिय शेतीबद्दल बारी म्हणतात, की मी सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण उत्पादन सेंद्रिय असल्याने चांगल्या उत्पादनासोबत फळेही चवदार मिळतात. शेतात मित्रकीटकांचे वास्तव्य असल्याने नवीन किडींचा एकदम उद्रेक होत नाही.
- मधमाशीपालन - पूरक व्यवसायासाठी शेतात मधपेट्या ठेवल्या आहेत, त्यातून वर्षाला 50 ते 60 किलो मध मिळतो. मधमाश्‍यांमुळे नारळ पिकातील परागसिंचन वाढले आहे. फळांची संख्या 20 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. सफेद जांबू, आंबे, लिची, शेवगा व पेरूतही फलधारणा वाढून उत्पादनात फायदा झाल्याचे आढळले.

पाणवनस्पतींची शेती - फिशटॅंकची (घरातील शोभिवंत मासे) शोभा आणखी वाढावी यासाठी शेतात पाण्याच्या टाक्‍या बनवून त्यात बकोपा, लुडविगिया, बेबी टीयर्स ककंबा, ग्रीनग्रास, टेबलस्पून आदी विविध पाणवनस्पतींची लागवड केली आहे. या वनस्पती मागणीप्रमाणे व्यापाऱ्यांमार्फत किंवा थेट ग्राहकांना प्रति काडी तीन ते चार रुपये दराने विकल्या जातात. अशा प्रकारे उत्पन्नात भर घातली आहे.

पुरस्काराने सन्मान - शेतीतील उल्लेखनीय प्रयोगांसाठी बारी यांना 2005 मध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते जगजीवनराम किसान पुरस्काराने सन्मानित केले. सन 2006 मध्ये जिल्हास्तरीय सेंद्रिय चिकू पुरस्कार त्यांना मिळाला.

प्रशिक्षण - कोसबाड, कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत ते आवर्जून सहभागी होतात. सन 2010 मध्ये डहाणू येथे तीन दिवसीय चिकू परिषदेचे आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. गेल्या वर्षी इस्राईल येथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनातही सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाची धुरा बारी 2009 पासून सांभाळत आहेत. संघामार्फत चिकू बागायतदारांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. आदिवासी शेतकऱ्यांसाठी हापूस, केसर आदी आंब्यांची कलमे स्थानिक रायवळ आंब्यावर करून देणे, चिकूला विम्याचे संरक्षण आदी कामे संघाने राबवली आहेत. गावात एकवीरा महिला बचत गटाची स्थापना बारी यांच्या पत्नी सौ. विजया यांच्या पुढाकारातून झाली. गटामार्फत दुग्धोत्पादन, मधुमक्षिका पालन, भाजीपाला लागवड, किराणा दुकान, कोंबडी पालन आदी उपक्रम राबवले जातात.

संपर्क - विनायक बारी - 9423358078, 9226484228
मु. कंक्रडी, पो. वाकी, ता. डहाणू, जि. ठाणे

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे येथे विषय विशेषज्ञ आहेत.
संपर्क - 8087985890)

Sunday, 22 September 2013

रसायनतज्ज्ञ युवक झाला शेतीचा अभ्यासू विद्यार्थी

- दीपक चव्हाण यांनी दर्जेदार आले पिकवण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यात यश मिळवले आहे.
- गादीवाफा व ठिबक पद्धतीने आले पिकाचे नियोजन केले.
- आले पिकानंतर घेतलेल्या कांद्याचेही चांगले उत्पादन घेतले, कांदा चाळही तयार केली आहे.
- भविष्यात स्वयंचलित फर्टिगेशन करण्यासाठी सेंट्रल रूमची सुविधा केली आहे.
- त्यासाठी पाण्याचा साठवण टॅंकही बांधला आहे.  
औरंगाबाद जिल्ह्यातील दीपक चव्हाण यांची प्रसंशनीय शेती

औरंगाबाद जिल्ह्यात सुलतानपूर येथील दीपक चव्हाण या एम.एस्सी. (रसायनशास्त्र) झालेल्या युवकाने कंपनीतील नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. आले, कापूस, हळद, मका अशा विविध पिकांतून त्यांचा शेतीतील अनुभव समृद्ध होत आहे. सुधारित तंत्राचा वापर, उत्पादनाचे लक्ष्य ठेवून पीक व्यवस्थापन करीत अभ्यासपूर्ण शेतीचा प्रत्यय त्यांनी दिला आहे. प्रदीप अजमेरा 


औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद हे गाव झोपलेला भद्रा मारुती या धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध आहे. येथून केवळ 13 किलोमीटरवरील सुलतानपूर येथे दीपक पांडुरंग चव्हाण हा एम.एस्सी. (रसायनशास्त्र) झालेला युवक राहतो. गोवा येथे एका नामांकित औषधनिर्मिती कंपनीत रसायनतज्ज्ञ (केमिस्ट) म्हणून दोन वर्षे नोकरी करून त्यानंतर शेतीत रमला. गेल्या चार वर्षांपासून शेतीतील त्याचा अनुभव आता गाढा होताना दिसत आहे. समजून- उमजून शेती करणारा हा केमिस्ट मातीचेही गुणधर्म तपासून पिकासाठी रसायनशास्त्र व शेती यांची नेमकी सांगड घालू लागला. पीक उत्पादनाचे लक्ष्य निश्‍चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करू लागला आहे.

शेतीची पार्श्‍वभूमी दीपक यांच्या संयुक्त कुटुंबाची शेती 50 एकर आहे. सध्या त्यापैकी 13 एकर क्षेत्र आले (अद्रक) पिकाखाली आहे. पैकी दोन एकर क्षेत्रावर त्याचा खोडवा आहे. उर्वरित 11 एकर क्षेत्रावर यंदाच्या मे महिन्यात लागवड केली आहे. अन्य शेती सांगायची तर अडीच एकरात हळद, सहा एकर ऊस, तर प्रत्येकी आठ एकर कापूस व मोसंबी आहे. उर्वरित क्षेत्रात हिरवळीचे खत म्हणून ताग पेरून दाबला आहे. पाऊसमान ठीक राहिल्यास त्या क्षेत्रावर रब्बीत गहू, अन्यथा ज्वारी व हरभरा पिकांचे नियोजन केले आहे.

आले पिकाचे व्यवस्थापन दीपक यांची जमीन मध्यम ते काळी व पाण्याचा चांगला निचरा होणारी आहे. मागील वर्षी दोन एकरांतील आले पिकातील त्यांचे प्रातिनिधिक नियोजन पुढीलप्रमाणे राहिले. आले पिकासाठी जमीन भुसभुशीत लागते, त्यामुळे उभी- आडवी नांगरट करून घेतली. रोटाव्हेटरच्या साह्याने ढेकळे फोडून घेतली. यंत्राच्या साह्याने गादीवाफे बनवून घेतले. दोन एकर क्षेत्रामध्ये 460 फूट लांबीचे 39 गादीवाफे तयार झाले. त्यानंतर त्यावर चांगले कुजलेले अर्धा ट्रॉली शेणखत टाकले. शेणखतावर लगेचच एकरी पुढीलप्रमाणे रासायनिक खताची मात्रा वापरली. निंबोळी पेंड 200 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो, डीएपी 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलो, बोरॉन 20 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आठ किलो. खते गादीवाफ्यात चांगली मिसळून घेतली. लगेचच ठिबकची जोडणी केली. दोन दिवस ठिबकच्या साह्याने वाफे चांगले भिजल्यानंतर त्यावर 30 ते 35 ग्रॅम वजनाचे आल्याचे बेणे (वाण- माहीम) लावले. लागवडीपूर्वी त्यावर रासायनिक प्रक्रिया केली.

विद्राव्य खतांचा वापर आल्याचे संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणल्याने विद्राव्य खतांचा वापर करणे सोपे झाले. सुरवातीला पीक पोषणासाठी व चांगल्या वाढीसाठी 19ः19ः19 हे खत वापरले. नंतरच्या टप्प्यात 0ः52ः34 व शेवटच्या टप्प्यात 0ः0ः50 वापरले. याशिवाय काही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून तसेच फवारणीद्वारे दिली. सुरवातीलाच शेणखत व निंबोळी पेंड मोठ्या प्रमाणात वापरली असल्याने व रासायनिक खताच्या मात्रा वेळेवर देत गेल्याने पिकाची वाढ चांगली झाली.

सुमारे 12 महिन्यांत आल्याची वाढ होऊन ते विक्रीसाठी तयार होते; मात्र त्या वेळी दर खूप कमी असल्याने काढणी न करता ते जमिनीखालीच ठेवले. त्याचा खोडवा घेण्याचे ठरवले. विद्राव्य खतांच्या वापरावर अधिक भर दिला. सुमारे पंधराव्या महिन्यापासून काढणीस सुरवात झाली. पहिल्या दोन वाफ्यांत प्रत्येकी 11 क्विंटल, तर दहा दिवसांच्या अंतराने काढलेल्या तिसऱ्या वाफ्यात 13 क्विंटल उत्पादन निघाले. आत्तापर्यंत एकूण आठ बेडमधून सुमारे 98 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. सध्या दर प्रति क्विंटल 8500 ते दहा हजार रुपये याप्रमाणे मिळत आहे. आले पिकाचे हे त्यांचे तिसरे वर्ष आहे.

पूर्वी चव्हाण कुटुंब पारंपरिक पद्धतीने म्हणजे सऱ्या पाडून आल्याची लागवड करायचे. त्या वेळी एकरी 40 क्विंटलपर्यंतच उत्पादन निघायचे. सन 2005 मध्ये गादीवाफा पद्धतीचा वापर सुरू झाला. सन 2009 मध्ये उत्पादन आकड्याने शंभरी गाठली. सन 2011 मध्ये एकरी 110 क्विंटल, तर 2012 मध्ये 120 क्विंटल उत्पादन निघाले. या वर्षी सुधारित व्यवस्थापनातून ते दोनशे क्विंटलपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

मागील उन्हाळ्यात आले पिकाला दर अत्यंत कमी म्हणजे क्विंटलला पाचशे ते आठशे रुपये होते. हेच दर जूनमध्ये 1800 ते 4500 रुपयांपर्यंत गेले. यंदा सद्यःस्थितीत मात्र दर चांगले असल्याने काढणी व विक्री सुरू आहे.

अन्य पिकांकडेही काटेकोर लक्ष दीपक यांनी शेतीतील जोखीम कमी करताना हळद, ऊस, कांदा, मका, कापूस अशी पिकांची विविधता ठेवली आहे, त्यामुळे एका पिकातून झालेले नुकसान दुसऱ्या पिकातून भरून काढणे शक्‍य होते.

काही प्रातिनिधिक पीक उत्पादन असे. - ऊस - सध्या बेणेमळ्यासाठी 10 गुंठे क्षेत्रावर पीक उभे आहे. एकरी 130 टन उत्पादनाचे टार्गेट ठेवले आहे.
- हळद - मागील वर्षी वाळवलेल्या हळदीचे एकरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले.
- कापूस - एकरी 15 ते 19 क्विंटलपर्यंत उत्पादकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
- मागील वर्षी आले काढणीनंतर घेतलेल्या दोन एकर कांदा पिकाचे एकूण 300 क्विंटल उत्पादन मिळाले, त्याला दरही किलोला 30 ते 40 रुपयांपर्यंत मिळाला होता.
- मका पिकाचेही 40 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे.

दीपक यांच्याकडून शिकण्यासारखे - - चांगली शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून उत्पादनवाढीचे तंत्र शिकून घ्यायचे व त्याची अंमलबजावणी करण्याची वृत्ती.
- शेतीत अभ्यासूवृत्ती जोपासली.
- ऑटोमेशन सिंचन व फर्टिगेशन प्रणालीकडे वाटचाल.
- पाण्याची कमतरता असल्याने मोकाट पाणी देणे केव्हाच बंद केले, त्याऐवजी आता 100 टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येतो. पाण्यासाठी एकूण तीन विहिरी आहेत. माटेगाव शिवारात असलेल्या 10 एकर क्षेत्रातही विहीर आहे, त्या विहिरीला चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने तेथून पाइपलाइन करून अन्य शिवारात पाणी आणले.
- पाण्याचे छोटेसे "स्टोअरेज टॅंक' तयार केले आहे. त्यात प्लॅस्टिक अंथरले आहे. त्यात सुमारे सहा ते सात लाख लिटर पाण्याची साठवण होऊ शकते. सर्व विहिरींतून त्यात पाणी संकलित केले जाते. शेततळ्याशेजारीच ऑटोमेशन सिंचन व फर्टिगेशनसाठी कंट्रोलरूम बांधली आहे. अद्याप हे तंत्रज्ञान खरेदी केलेले नाही; मात्र तेथून सर्व ठिकाणी सिंचन व फर्टिगेशन होईल अशी व्यवस्था भविष्यात करण्यासाठी प्राथमिक सुविधा तयार केली आहे.

ऍग्रोवन दररोज घरी येतो. त्यातील बाजारभाव व शेतकऱ्यांच्या यशकथा या सर्वांत उपयोगी वाटतात.
शेतकऱ्यांचे त्यात प्रसिद्ध झालेले प्रयोग वाचून गरजेनुसार संबंधित शेतकऱ्यांना दूरध्वनी करतो व त्याप्रमाणे
शेतातील व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो, असे दीपक यांनी सांगितले.
- दीपक यांना वडील व भाऊ यांची मदत शेतीत होते. आपले सारे लक्ष त्यांनी शेतीच्या विकासाकडेच केंद्रित केले आहे. शेतातच छोटेखानी टुमदार बंगला बांधला असून, तेथेच कुटुंब राहत असल्याने प्रत्येकाचेच शेतीकडे जाणीवपूर्वक लक्ष असते.
लेखक अंबड (जि. जालना) येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.
संपर्क - दीपक चव्हाण - 9421305555, 9423808181.

Saturday, 21 September 2013

शोध भुगर्भातील पाण्याचा-५

वारुळे हीच भूजलाची निदर्शके


या भागात आपण पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञांनी भूजलातील पाण्यावर केलेल्या संशोधनाबाबत माहिती घेणार आहोत. वारुळे आणि भूजल साठा यांच्या परस्परसंबंधांविषयी या शास्त्रज्ञांनी अत्यंत महत्त्वाची माहिती उजेडात आणली आहे.
वराहमिहिराने वारूळ व ऍक्‍वीफर (भूगर्भातील पाण्याचा झरा) यांच्यातील अंतर दिले आहे व पाण्याची खोली ३.४३ मी. ते १६० मी. पर्यंत आढळते असे सांगितले आहे. तैत्तरीय अरण्यकात वाळवींचे उपदिका असे वर्णन केले आहे. त्या जेथे खणतात तेथे पाणी मिळते असे सिंडर या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले आहे. वाळवीच्या खोदण्याची खोली पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. कार्ल-फ्रिशन शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनानुसार वारुळामध्ये अनेक उभी बिळे जमिनीमध्ये आढळतात, त्यापैकी एखादे खूप खोल असते. वराहमिहिराच्या अभ्यासावरून असे गृहीत धरता येते, की एक उभे बिळ भूमिगत पाण्यापर्यंत पोचते. काही ठिकाणी वारुळाच्या अगदी खाली पाण्याजवळ जाणारे बिळ उभे असते, असे वॅटसनने दाखविले.

पॉलीकॅली
वारूळ हे अनेक स्वतंत्र लहान-लहान घटकांचे नगरच असते. या घटकांना कॅली असे म्हणतात. जे वारूळ असंख्य कॅलींनी बनलेले असते, त्याला पॉलिकॅली असे म्हणतात. यांच्यामध्ये अंतर्गत रचना ही एकसारखीच असते. या प्रकारच्या वारुळात एक मोठी पोकळी भूजलापर्यंत असते.

मराईसचे निरीक्षण
मराईस या शास्त्रज्ञाने दक्षिण आफ्रिकेतील वॉटरबर्ग जिल्ह्यात अभ्यास केला, त्या वेळी तेथे तीव्र दुष्काळ पडला होता. तो भाग डोंगराळ होता व ४० फूट खोलीपर्यंत पाणी सापडणे तेथे अशक्‍य होते. तेथेच एका टेकडीच्या माथ्यावर वाळवीची वारुळे होती. ती उघडली असता तेथे आश्‍चर्यकारकरीत्या आतील भाग हा दमट आढळला. वाळवींनी पाणी मिळविण्यासाठी कमीत कमी शंभर फूट खोलीपर्यंत खणले होते. पाण्यापर्यंत जाणारी पोकळी वारुळापासून ६५ फूट अंतरापर्यंत होती. नंतर ती दिशेनासी झाली. वारुळात दर दोन-तीन फुटांवर बुरशीचा समूह होता. जो पाण्याचे निदर्शक आहे. वाळव्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात, की त्या खोलीवर विश्‍वास ठेवणे अशक्‍य आहे.

फ्रेटोफाईट्‌स्‌च्या भोवती वाळवीची वारुळे आढळतात. या वृक्षांच्या प्राथमिक मुळांबरोबर वाळव्या खोलवर पाण्यापर्यंत पोचतात व त्यांच्या वारुळाचा विस्तार आडव्या वाढणाऱ्या मुळांसोबत होतो. वृक्षांना (मुळांना) जमिनीत खोल जाण्यात वाळवीच्या पोकळीचा उपयोग होतो. त्या वाळवी मुळांना इजा पोचवीत नाहीत. मुळांमुळे आर्द्रता राखण्यास मदत होते.

वराहमिहिराने वाळवीची वारुळे व त्यांच्या भोवतीची वनस्पती यावरून भूजलाची उपलब्धता यांचे अनुमान काढले. पाण्याच्या उपलब्धतेवर तेथे वाढणाऱ्या वनस्पतींच्या जाळी व उगवणे अवलंबून असते. वृक्षांमुळे वारुळांमधील आर्द्रता राखण्यास मदत होते.

जैविक वातावरण (परिस्थिती) :
वराहमिहिराने वाळव्यांचा बांध (Termite Mound) हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भूजलाचा दर्शक मानला आहे. लाकूड, बांधकामासाठी वापरले जाणारे लाकूड, कागद, कपडे, विशिष्ट वनस्पती व पिकाचे नुकसान वाळवी करतात, तरीसुद्धा त्या मनुष्याच्या उपयोगाच्या आहेत. वाळवी आणि वाळवीयुक्त माती यासंबंधी उल्लेख वैदिक काळापासून प्राचीन संस्कृत वाङमयामध्ये आढळतो. संस्कृत साहित्यात वाळवीला अनेक म्हणजे उपजिका, उपजिविका, उपधिका, देहिका, उपदीपिका, उपदेहिका, उद्देहिका अशा संज्ञा वापरल्या आहेत. जमिनीवर वारुळे करणाऱ्या वाळवींचे अनेक प्रकार आहेत असे बूमफिल्ड (१८८६) या शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

व्हिटनी शास्त्रज्ञाने केलेल्या स्पष्टीकरणानुसार ज्या जमिनीमध्ये मोठी-मोठी वारुळे तयार केली जातात, ते एक प्रकारचे बांध-बंधारे आहेत. या वारुळांमध्ये आर्द्रता असते. त्या आर्द्रतेमध्ये रोग बरा करण्याचा गुणधर्म असतो. आर्द्र वातावरण हे वाळव्यांसाठी पोषक अथवा आरोग्यासाठी चांगले सांगितले आहे. बूमफिल्डच्या मतानुसार वाळवींना निसर्गतः जलनिर्मितीची शक्ती असते आणि ते रोग बरा करणारे औषधी पाणी असते. वाळवींना निसर्गतः खणण्याची किंवा पोखरण्याची शक्ती प्राप्त झालेली असते. त्या शक्तीनुसार त्या उपयुक्त पाणी मिळवतात. वाळवीने निर्माण केलेल्या मातीचे औषधी गुणधर्म हिंदूंच्या प्राचीन ग्रंथात वर्णन केले आहेत. आफ्रिकेमध्ये झिंबाब्वेमध्ये सोन्याच्या खाणीत वाळवीच्या वारुळाचा अभ्यास वॅटसनने केला असता त्याला वारुळे खोदल्यानंतर ७० ते ८० फुटांवर पाणी आढळले.
                                                                                                                                                                           क्रमश:


- डॉ. सौ. रजनी जोशी, बार्शी, जि. सोलापूर ९९२१०७७६२३ (संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)

शोध भुगर्भातील पाण्याचा-४

मातीचे प्रकार सांगतात पाणीसाठ्याचा मार्ग

एखाद्या प्रदेशात गवत, दुर्वा, वृक्ष, झुडपे किंवा वारूळ नसले तरी तेथील मातीच्या किंवा भूमीच्या काही वैशिष्ट्यांवरून भूगर्भात पाणी आहे की नाही हे ओळखता येते. त्याची काही उदाहरणे वराहमिहिराने खाली दिली आहेत:
जर भूमी अतिशय मऊ, खोलगट, थोडी वाळू असलेली किंवा नाद निर्माण करणारी असेल, तर साडेचार किंवा पाच पुरुष खोलीवर तेथे पाणी मिळते.

मऊ व चमकदार पाने असलेल्या वृक्षांच्या दक्षिणेला पाच पुरुष खोलीवर पाणी मिळते.

एखाद्या प्रदेशात जमिनीस उतार असून, त्यावर लोकांच्या रहदारीच्या खुणा असतील तर त्या भूगर्भात साडेसात हात खोलीवर पाणी मिळते.

विविध प्रकारच्या जंतूचे एकही वसतिस्थान आजूबाजूला नसून, फक्त एकाच ठिकाणी जंतूंचा पुंजका दिसत असेल तर त्या भूगर्भात साडेसात हात खोलीवर पाणी असेल.

उष्ण भूप्रदेशात थंड भूभाग किंवा थंड भूप्रदेशात उष्ण भूभाग आढळला, तर साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते.

वरील ठिकाणी जर वारूळ किंवा मासे आढळतील, तर चार हातावरच पाणी मिळते.

अनेक वारुळाच्या रांगेत एखादे वारूळ सर्वांत जास्त उंच असेल, तर त्याखाली चार हातावर पाणी मिळते.

एखाद्या ठिकाणी वनस्पती वाढून आपोआप जळून जातात किंवा अजिबात वाढत नाहीत, त्या ठिकाणी साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते.

जर वड, पळस व औदुंबर किंवा वड व पिंपळ यांची झाडे एकत्र आढळतील तर त्यांच्या खाली तीन हातावर उत्तरवाहिनी जलशिरा आढळते.

हे सिद्धांत सारस्वत ऋषीने केलेल्या "दकार्गला' नावाच्या ग्रंथातून वराहमिहिराने घेतले आहेत. यापुढील सिद्धांत मन नावाच्या ऋषीने केलेल्या ग्रंथातून घेतले आहेत, हे वराहमिहीर स्वतः प्रांजळपणाने कबूल करतो. मनूच्या ग्रंथाचे नावही "दकार्गला' असेच आहे. आता आणखी लक्षणे अभ्यासूया.

एखाद्या भूप्रदेशातील झाडांची पाने जर मऊ व चमकदार असतील किंवा तेथे वेलींच्या जाळी असतील किंवा कमळ, गोक्षुरा(गोखूर), उशीर(वाळा), गुंड्र (गुळवेस), काश, नलिका (दालचिनी) किंवा नल (देवनळ) नावाचे गवत भरपूर प्रमाणात उगवले असेल तर पंधरा हात खोलीवर तेथे पाणी मिळते.

खजूर, जांभूळ, अर्जुन, वेत, हस्तिकर्ण (शिंदणी), नागकेसर, शतपत्र (गजकर्णी), कदंब, करंज, सिंदुवार (निर्गुंडी), बिभीतक (बेहडा) किंवा मदयंतिका (मेहंदी) यांचे वृक्ष एखाद्या प्रदेशात असतील तर पंधरा हात खोलीवर पाणी मिळते.

दोन पर्वतांपैकी/डोंगरांपैकी जो उंच असेल त्याच्या पायथ्याशी पंधरा हात खोलीवर पाणी मिळते.

वराहमिहिराने वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा विचार केला आहे.

एखाद्या प्रदेशाची भूमी (माती) निळी असून, त्यात गोल गोटे आढळतील किंवा तांबडी असून तेथे मुंजा गवत, दुर्वा आणि वेत आढळतील तर त्या ठिकाणी पाणी असते.

भूमी वालुकामय असून, तांब्याच्या रंगाची असेल तर तेथे तीव्र चवीचे पाणी मिळते.

तपकिरी/तांबूस रंगाच्या भूमीत खारे पाणी आढळते.

पांढऱ्या रंगाची भूमी खारट पाणी देते.

निळ्या रंगाची भूमी गोड पाणी देते.

वृक्षांच्या किंवा वेलींच्या पानाला छिद्रे असतील तर त्यापासून दूर अंतरावर पाणी असते.

सूर्य, अग्नी, राख, उंट किंवा गाढव यांच्यासारखा रंग असलेल्या मातीच्या भूमीत पाणी मिळत नाही.

करीर वृक्षातून दूध येत असून, त्याला तांबडे कोंब येत असतील तर त्याच्या खाली पाणी असते.

जर एखादा खडक वैडूर्य (पाचू), हिरवे, मूग, काळा मेघ, नीलमणी, पिकलेले अंजीर किंवा काजळ यासारख्या किंवा तपकिरी रंगाचा असेल तर त्याच्याखाली भरपूर पाणी मिळते.

कबुतर, मध, तूप, रेशीम किंवा सोमलता यासारख्या रंग असलेल्या खडकाच्या खालीदेखील पाणी मिळते.

तांबडा, राखाडी रंगाचा, उंट, गाढव, मधमाशी यांच्यासारखा किंवा काळ्या-तांबड्या फुलासारखा रंग असलेल्या खडकाखाली अजिबात पाणी मिळत नाही.

चंद्र, स्फटिक, मोती, सुवर्ण, नीलमणी, काजळ, हरिताल किंवा उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखा रंग असलेले खडक किंवा दगड पाण्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असतात.

खडक फोडण्याची प्रक्रिया:
भूमिगत पाणी शोधून काढताना पुष्कळदा शेवटी खडक लागतो, याचा उल्लेख लेखात अनेकदा आला आहे. खडक फोडतेवेळी काही वेळेला खडक अजिबात फुटत नाही. हल्लीच्या काळात डायनामाईट किंवा सुरुंगाची दारू लावून फोडतात, परंतु पूर्वीच्या काळी खडक फोडण्यासाठी ज्या काही युक्‍त्या वापरीत, त्या वराहमिहिराने सांगितल्या आहेत.

एखादा खडक फुटत नसेल तर त्यावर तिंदुक (टेंभूर्णी) व पळस यांचे ओंडके तो खडक लाल होईपर्यंत जाळावे. नंतर त्या खडकावर चुनकळीचे पाणी ओतावे व नंतर खोदावे म्हणजे तो खडक फुटतो.

मोक्षक (मोखा) झाडाच्या फांद्या जाळून, त्यांची राख वेत जाळून केलेल्या राखेत मिश्र करावी. हे मिश्रण पाण्यात खूप वेळ उकळावे आणि लेखात वर सांगितल्याप्रमाणे तप्त झालेल्या खडकावर ते मिश्रण सात वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी खडक तापवावा, म्हणजे खडक फुटतो.

ताक, अज्जिक (म्हणजे पिठापासूनच केलेले एक प्रकारचे आंबट द्रव्य) व दारू यांचे कुळीथ व बोरे यांच्याशी मिश्रण करून सात रात्री ते मिश्रण ठेवावे व उपरोक्त पद्धतीने तप्त केलेल्या खडकावर ते मिश्रण आठव्या दिवशी ओतावे म्हणजे खडक फुटतो.

लिंबाची पाने व साल, तिळाचे बुंधे, अपामार्ग (म्हणजे आघाडा) तिंदुक आणि अमृतावेल हे सर्व एकत्र जाळून राख करावी. गोमूत्रात त्याचे मिश्रण करावे. हे मिश्रण तापविलेल्या खडकावर सहा वेळा ओतावे. प्रत्येक ओतण्याचे वेळी खडक तापवावा.

पाणी साठवून ठेवण्याचे उपाय ः
भूगर्भातून आणि आकाशातून मिळालेले पाणी कसे साचवून ठेवावे, कशा तऱ्हेचे तलाव बांधावे यासंबंधीसुद्धा काही सूचना पूर्वाचार्यांनी केल्या आहेत, त्यांची माहिती घेऊ.
आयताकृती तळे करावे. त्याच्या पूर्व व पश्‍चिम दिशेची लांबी दक्षिण-उत्तर दिशेच्या लांबीपेक्षा जास्त असावी, म्हणजे त्यातील पाणी जास्त दिवस पुरते. कारण दक्षिण- उत्तर दिशेची लांबी जास्त असल्यास त्या भिंती सोसाट्याच्या वाऱ्याने लवकर झिजतात. पूर्व-पश्‍चिमेच्या भिंती झिजत नाहीत. जर तलावाची दक्षिण-उत्तर बाजू जास्त लांबीची करावयाची असेल, तर त्या बाजू विटांनी, दगडांनी किंवा लाकडांनी भक्कम बांधून घ्याव्यात. तलावाचा तळदेखील अनेक हत्ती बरेच दिवस चालवून पक्का करावा. जमल्यास तोही बांधून काढावा. तलावाच्या काठी अर्जुन, वड, आंबा, पिंपळ, प्लक्ष(पळस), कदंब, जांभूळ, वेत, ताड, अशोक, मधूक (मोहा) आणि बकुळ हे वृक्ष लावून विहिरीचे सदर झाकून टाकावे, तसेच पाणी जाण्यासाठी तळाशी दगडांनी बांधून काढलेले एक छिद्र असावे.
                                                                                                                                                                          क्रमश:

- डॉ. सौ. रजनी जोशी, बार्शी, जि. सोलापूर ९९२१०७७६२३
(संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)

शोध भुगर्भातील पाण्याचा-3

पर्यावरणाच्या निरीक्षणातून पाणीसाठ्याचा शोध...

आचार्य वराहमिहीर यांची ओळख, इतिहास यांची माहिती आपण यापूर्वीच्या भागांतून घेतली. निसर्ग किंवा पर्यावरणाच्या अत्यंत जवळ जाऊन त्यातील रहस्ये उलगडणे, त्यावरून भुजलातील पाण्याचे स्रोत शोधणे या विषयात वराहमिहीर यांच्या असलेल्या गाढ्या अभ्यासावरून त्यांची विद्वत्ता किती उत्तुंग पातळीवरील होती हे सिद्ध होते. त्यांनी सुचवलेल्या लक्षणांची माहितीही आपण सध्या घेत आहोत. या भागातही आपण काही लक्षणे अभ्यासूया.
एखाद्या निर्जल किंवा निष्कंटक प्रदेशात गवताळ पट्टा किंवा कंटकमय विभाग किंवा याउलट तृणमय व कंटकमय प्रदेश निस्तृण किंवा निष्कंटक विभाग आढळला तर त्याखाली साडेचार हातावर किंवा पश्‍चिम दिशेला तीन हातावर व तीन पुरुष खोलीवर पाणी किंवा धन सापडते.

भूमीवर पाय आपटल्यानंतर जर गंभीर व कर्णसह्य ध्वनी आला तर त्याखाली तीन पुरुष अंतरावर पाण्याचा साठा आढळतो.

एखाद्या वृक्षाची फांदी निस्तेज किंवा खाली लोंबणारी असेल तर त्या वृक्षाखाली पंधरा हातांवर पाणी मिळते.

एखाद्या वृक्षाची फळे, फुले व पाने वाजवीपेक्षा जास्त तेजस्वी दिसत असतील, तर त्याच्या पूर्वेला तीन हातावर व वीस हात खोलीवर पाणी मिळेल. खोदताना प्रथम एक दगड व पिवळी माती मिळते.

जर कंटकारी झाडाला काटे नसतील व पांढरी फुले आली असतील तर भूमीखाली साडेतीन पुरुष खोलीवर पाणी मिळते.

जर निर्जल प्रदेशातील खजुराच्या झाडाला दोन शेंडे आले असतील तर त्याच्या पश्‍चिमेला दोन हातावर तीन पुरुष खोलीवर पाणी सापडते.

कर्णिकार किंवा/आणि पळस वृक्षांना लाल रंगाऐवजी पांढऱ्या रंगाची फुले आली, तर दहा हात खोलीवर पाण्याचा प्रचंड साठा असतो.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर आतून वाफ बाहेर येताना आढळली, तर दहा हात खोलीवर पाण्याचा प्रचंड साठा असतो.

शेतातील वाढलेले पीक वरून पाणी घालूनही आपोआप जळून गेले किंवा त्याची पाने वाजवीपेक्षा जास्त स्निग्ध व चमकदार झाली, तर तेथे दोन पुरुष खोलीवर पाणी मिळते.

ही सर्व लक्षणे जंगलाच्या किंवा माळरानाच्या प्रदेशात लागू पडतात. जेथे मरूभूमी किंवा वाळवंट आहे तेथे पाणी शोधून काढण्यासाठी वेगळी लक्षणे आहेत. वराहमिहिर म्हणतो, की वाळवंटी प्रदेशातील भूगर्भांतर्गत जलशिरा उंटाच्या पाठीसारख्याच वाकड्या असतात. त्या सरळ वाहत नाहीत, तसेच त्या फार खोलीवर असून थोड्या पाण्याच्या व मध्ये खंडित झालेल्या असतात. ज्या वाळवंटी प्रदेशात भूगर्भात जलशिरा आहेत, त्या ठिकाणी भूपृष्ठावर खालील लक्षणे दिसतात ः

पिलू नावाच्या वनस्पतीच्या ईशान्य दिशेला जर एखादे वारूळ असेल, तर पश्‍चिम दिशेला साडेचार हातावर पाच पुरुष खोलीवर पाणी सापडते. खोदताना पहिल्या पुरुष खोलीवर एक बेडूक, नंतर तपकिरी माती, त्याखाली हिरवट रंगाची माती व त्याखाली पाणी मिळते.

पिलू वृक्षाच्या पूर्वेला वारूळ आढळते, तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हातावर सात पुरुष खोलीवर पाणी मिळते. पहिल्या चार हातावर एक काळा व एक पांढरा, हातभर लांब सर्प दिसतो. त्याच्या दक्षिणेला क्षारयुक्त पाण्याची मोठी शीर दिसते.

करीर वृक्षाच्या उत्तरेला जर वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हात अंतरावर दहा पुरुष खोलीवर पाणी मिळते. खोदताना पाच हातावर एक पिवळा बेडूक सापडतो.

रोहितक वृक्षाच्या पश्‍चिमेला वारूळ असल्यास त्याच्या दक्षिणेला तीन हातावर व बारा पुरुष खोलीवर खाऱ्या पाण्याचा पश्‍चिमाभिमुख जलस्रोत भूगर्भात असतो.

सुवर्णक झाडाच्या उत्तरेला वारूळ आढळते, तर त्याच्या दक्षिणेला दोन हातावर पंधरा पुरुष खोलीवर क्षारयुक्त जलवाहिनी आढळते. खोदताना अडीच हातावर एक मुंगूस, नंतर तांब्याच्या रंगाचा दगड, नंतर लाल माती व शेवटी दक्षिणवाहिनी जलशिरा मिळते.
रोहित वृक्ष व बोरीचे झाड जवळ असून त्यांच्यामध्ये वारूळ असेल (असल्यास उत्तम, नसले तरी चालेल) तर त्यांच्या पश्‍चिमेला तीन हात अंतरावर सोळा पुरुष खोलीवर गोड्या पाण्याची जलशिरा मिळते. प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर उत्तरवाहिनी होणारी ही जलशिरा असते. खोदताना पिठासारखा पांढरा दगड, नंतर पांढरी माती व अडीच हातांवर विंचू लागतो.

इंद्रवृक्षाच्या पूर्वेला वारूळ असल्यास पश्‍चिमेला एका हातावर १४ पुरुष पाणी लागते. पाच हात खोदल्यावर एक पिवळा सरडा सापडतो.

बोरीचे झाड व करीर वृक्ष एकमेकात गुंतले असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला तीन हातावर अठरा पुरुष खोलीवर पाणी लागते.
बोरी व पिलू वृक्ष जवळ जवळ आढळल्यास पूर्वेला तीन हातांवर वीस पुरुष खोलीवर खाऱ्या पाण्याचा अखंड झरा आढळतो.

जर करीर व ककुभवृक्ष किंवा बिल्व आणि ककुभवृक्ष जवळ जवळ असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला दोन हातावर पंचवीस पुरुष खोलीवर पाणी सापडते.

जर दुर्वा पांढऱ्या रंगाच्या असतील, तर त्या ठिकाणी २१ पुरुष खोलीवर पाणी मिळते, तेथे विहीर खोदावी.

कदंब वृक्षांनी भरलेल्या भूभागात जर दुर्वा आढळल्या तर कदंबाच्या दक्षिणेला दोन हातावर आणि २५ पुरुष खोलीवर पाणी आढळते.

तीन वारुळांतून उगवलेल्या तीन प्रकारच्या झाडामुळे जर रोहित वृक्षांशी त्रिकोण होत असेल तर उत्तरेला साडेचार हातावर व दोनशे फूट खोलीवर पाणी मिळेल. तळाशी मोठा खडक व त्याखाली पाणी असेल.

गाठी असलेल्या शमीच्या उत्तरेला जर वारूळ आढळले तर पश्‍चिमेला पाच हातावर व पन्नास पुरुष खोलीवर पाणी असते.

जर एकाच ठिकाणी पाच वारुळे आढळली व त्यातील मध्य वारूळ जर श्‍वेतरंगाचे असेल, तर त्या मध्य वारुळाच्या खाली ५५ पुरुष खोलीवर जलशिरा असते.

पळस व शमी एकमेकांजवळ वाढून, एकमेकांत गुंतले असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला पाच हातावर साठ पुरुष खोलीवर पाणी सापडते. अडीच हात खोदल्यावर एक सर्प व नंतर वाळूमिश्रित माती असते, त्याखाली पाणी असते.

जर श्‍वेतरोहित वृक्ष वारुळांनी वेढला गेला असेल तर पूर्वेला एका हातावर सत्तर पुरुष खोलीवर पाणी मिळते.

काटेरी शमीच्या दक्षिणेला एका हातावर ७७ पुरुष खोलीवर पाणी सापडते. अडीच हात खणल्यावर एक साप दिसतो.

वालुकामय प्रदेशातील लक्षणे कमी पाण्याच्या प्रदेशाला लागू पडत नाहीत. जर जांभूळवृक्ष व वेत वालुकामय प्रदेशात आढळले तर मात्र वर सांगितलेल्या खोलीच्या दुप्पट खोलीवर पाणी मिळते.

एखाद्या वारुळावर जांभळाचे झाड व त्यावर किंवा जवळच त्रिवृत्ता, मौर्वी, शिशुमारी, सारिवा, शिवा, श्‍यामा, वाराही, ज्योतिष्मती, गरुडवेगा, सूकरिता, माषपर्णी आणि व्याध्रपदा यापैकी एखादी वेल उगवलेली आढळली, तर वारुळाच्या उत्तरेला तीन हातावर तीन पुरुष खोलीवर पाणी आढळते. जर वालुकामय प्रदेशात अशी स्थिती आढळली तर २५ किंवा ३५ हात खोलीवर पाणी मिळते.
                                                                                                                                                                          क्रमश:

- डॉ. सौ. रजनी जोशी, बार्शी, जि. सोलापूर ९९२१०७७६२३, (संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)

शोध भुगर्भातील पाण्याचा-२

भूगर्भातील पाणी शोधण्याची लक्षणे

दर्कागल अध्यायात वराहमिहिराने पाण्याच्या उपलब्धतेबाबत जी लक्षणे सांगितली आहेत, ती आपण अभ्यासतो आहोत. ती अशी
निर्जल प्रदेशात असलेल्या अंजिराच्या किंवा औदुंबराच्या झाडाच्या पश्‍चिमेस दहा हातांवर खोदकाम करताना पाच हातांवर एक सर्प आणि काजळासारखा काळा पत्थर आढळल्यास भूपृष्ठाखाली साडेचार पुरुष अंतरावर पाणी मिळते. ते गोड पाणी असते.
अर्जुन वृक्षाच्या उत्तरेस वारूळ असल्यास पश्‍चिमेला तीन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाण्याचा झरा सापडतो. खोदतांना तीन हातांवर एक पांढरा सरडा, पाच हातांवर क्रमाने करडी, काळी, पिवळी व पांढरी माती असून, त्याखाली वाळूयुक्त माती मिळते व नंतर भरपूर पाणी सापडते.

निर्गुंडीच्या झाडाजवळ वारूळ असल्यास दक्षिणेला तीन हातांवर दोन पुरुष खोलीवर गोड व अखंड पाण्याचा झरा मिळतो. अडीच हात खोलीवर लाल मासा, तपकिरी रंगाची माती, नंतर वाळूचा पातळ थर व नंतर पाणी असा क्रम असतो.

बोरीच्या पूर्वेला वारूळ असल्यास पश्‍चिमेला तीन पुरुष खोल खोदावे. अडीच हात खोलीवर पांढरा सरडा सापडल्यास निश्‍चित पाणी मिळते.

बोरीचे व पळसाचे झाड जवळ जवळ असल्यास त्यांच्या पश्‍चिमेला तीन हातांवर खोदतांना पाच हात खोलीवर बिनविषारी सर्प आढळल्यास, तीन पुरुष खोलीवर पाणी मिळते.

बेल व औदुंबर यांची झाडे जवळ जवळ असल्यास त्यांच्या पश्‍चिमेला तीन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाणी असते. खोदताना अडीच हातांवर काळा बेडूक आढळतो.

औदुंबराच्या वृक्षाजवळ वारूळ आढळल्यास तीन पुरूष खोलीवर पश्‍चिमाभिमुख वाहणारी जलशिरा मिळते. अडीच हातांवर पांढरा उंदीर सापडून पिवळी माती व पांढरा दगड सापडल्यास अखंड पाण्याचा झरा मिळतो.

निर्जल प्रदेशात कम्पिल्लक (कदंब) नावाचा वृक्ष आढळल्यास त्याच्या पूर्वेला तीन हात अंतरावर व तीन पुरुष खोलीवर एक दक्षिणाभिमुखी वाहणारी जलशिरा मिळते. खोदतांना प्रथम निळी व नंतर पांढरी माती एक हात खोली. बोकडासारखा वास येणारा मासा व क्षारयुक्त थोडे पाणी अशी लक्षणे आढळतात.

शोणाकवृक्षाच्या वायव्य दिशेला दोन हात अंतरावर व तीन पुरुष खोलीवर कुमुदा नावाची जलशिरा निश्‍चित सापडते.

बिब्याच्या झाडाच्या दक्षिणेला जवळच वारूळ असेल, तर वारुळातून पूर्वेला दोन हात अंतरावर दीड पुरुष खोलीवर पाणी मिळते; तसेच पश्‍चिमेला वारूळ असल्यास झाडाच्या उत्तरेला एक हात अंतरावर व साडेचार पुरुष खोलीवर पाणी मिळते. खोदताना पाच हातांवर पांढरा सरडा किंवा विंचू, लाल रंगाचा दगड व त्याखाली पश्‍चिमाभिमुख वाहणारी मोठी जलशिरा असा क्रम असतो; परंतु ही जलशिरा तीन वर्षांनी नष्ट होते.

दर्भांनी भरलेल्या वारुळाच्या ईशान्य दिशेला कोरडाच. झाड असेल तर ते झाड व वारुळ यांच्या मध्यभागी साडेपाच पुरुष खोलीवर भरपूर पाणी मिळते. खोदतांना पाच हातांवर पांढरट रंगाचा साप, त्या खोलीवर पाणी मिळते. खोदताना अडीच हातावर एक हिरवा बेडूक, नंतर हळदीसारखी पिवळी माती आणि त्याखाली मेघासारखा श्‍यामवर्णाचा दगड सापडतो. त्याखाली उत्तराभिमुख अखंड वाहणारी जलशिरा मिळते.

एखाद्या वृक्षाखाली एक किंवा अनेक बेडूक वस्ती करून राहात असतील तर त्याच्या उत्तरेला एक हात अंतरावर साडेचार पुरुष खोलीवर पाण्याचा साठा सापडतो.

करंजीच्या झाडाच्या दक्षिणेला वारूळ असल्यास त्याच्या दक्षिणेला दोन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाणी आढळते. खोदताना अडीच हातावर एक लहान कासव व नंतर पूर्वाभिमुख वाहणारी जलशिरा, नंतर पुन्हा एक उत्तराभिमुख जलशिरा, नंतर एक हिरवा किंवा पिवळा दगड व त्याच्या खाली अखंड पाणी मिळते.

मोहाच्या वृक्षाच्या उत्तरेला वारूळ असल्यास वृक्षाच्या पश्‍चिमेला पाच हातावर साठेआठ पुरुष खोलीवर पाणी असते. प्रथम पाच हातावर एक मोठा सर्प, नंतर तपकिरी माती, नंतर कुळीथाच्या रंगाचा दगड व सर्वांत शेवटी पूर्वाभिमुख वाहणारी फेसाळ पाणीयुक्त जलशिरा मिळते.

तिलक (तीळ) वृक्षाच्या दक्षिणेला दर्भ व दुर्वा यांनी भरलेले चकाकणारे वारूळ असेल तर वृक्षाच्या पश्‍चिमेला पाच हात अंतरावर पंचवीस हातावर पाणी लागते. ही जलशिरा पूर्वाभिमुख असते.

ताडाच्या किंवा नारळाच्या बुंध्याशी वारूळ आढळले तर पश्‍चिमेला सहा हातावर व वीस हात खोलीवर दक्षिणाभिमुख वाहणारा जलस्रोत मिळतो.

कपित्थवृक्षाच्या (कवठ) दक्षिणेला वारूळ असेल तर विरुद्ध उत्तर दिशेला सात हातावर पंचवीस हात खोल खणावे, पाच हातांवर एक चित्रविचित्र ठिपक्‍यांचा साप, नंतर काळी माती, एक कठीण दगड, पुढे पांढरी माती व त्याच्याखाली प्रथम पश्‍चिमाभिमुख व नंतर उत्तराभिमुख वाहणारा जलस्रोत मिळतो.

अश्‍मन्तक वृक्षाच्या उत्तरेला बोरीचे झाड वारूळ असेल तर उत्तरेला सहा हातावर व साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते. खणताना पाच हातावर एक कासव, नंतर निळा दगड, वाळूयुक्त माती नंतर एक दक्षिणवाहिनी जलशिरा व त्यानंतर ईशान्यवाहिनी जलशिरा मिळते.

दारू हळदीच्या झाडाच्या वारूळ असेल तर पूर्वेला तीन हातावर खणल्यास पावणे एकोणतीस हातावर पाणी लागते. खणताना प्रथम पाच हातावर निळा साप, नंतर पिवळी माती, नंतर पाचूच्या रंगाचा दगड, पुढे काळी माती व तिच्याखाली एक पश्‍चिमाभिमुख व नंतर दक्षिणाभिमुख जलशिरा सापडते.

एखाद्या निर्जल प्रदेशात विशिष्ट ठिकाणी दुर्वा किंवा विरळ गवताचा भाग आढळला तर त्याखाली पाच हातावर पाणी मिळते.

एका प्रकारचे वांगे, त्रिवृता, दंती, सूकरपादी लक्ष्मणा (वेलवर्गीय काटेरी) आणि नवमालिका (जुई) या वनस्पती या वेळी जर एखाद्या भागात आढळल्या, तर त्यांच्या दक्षिणेला दोन हातावर व पंधरा हात खोलीवर पाणी मिळते.

एखाद्या भागातील वृक्षांची पाने जर मऊ व चकाकणारी असली, फांद्या लांबवर पसरून लोंबत असल्या तर त्या भागातील भूगर्भात पाण्याचा साठा असतो.

याउलट रूक्ष व निस्तेज पाने, वाळल्यासारखे दिसणारे खोड अशी वृक्षांची स्थिती असेल तर त्या भागात पाणी नाही, असे समजावे.

तिलक, अंबाडी, वरुण, भल्लातक, बिल्व, तिन्दुक, अंकोल, पिंडार, शिरीष, अंजन, परुषक, वंजुल (अशोक) आणि अतिबला या वनस्पतींची पाने स्निग्ध व तेजस्वी असली आणि आजूबाजूला वारूळ असेल तर तेथे उत्तरेला तीन हातावर साडेबावीस हात खोलीवर पाण्याचा साठा असतो.
                                                                                                                                                                          क्रमश:
-डॉ. सौ. रजनी जोशी, बार्शी, जि. सोलापूर ९९२१०७७६२३, (संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)

शोध भुगर्भातील पाण्याचा-१


भूगर्भातील पाणी शोधणारा प्राचीन ऋषी वराहमिहीर

पावसाचा थेंब न्‌ थेंब कसा साठवता येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल, या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. पाचव्या शतकात वराहमिहीर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरणशास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्याविषयी त्याने स्वतः संशोधन केलेच, शिवाय अन्य ऋषींचे संशोधनही आपल्या "बृहत्‌संहिता' या ग्रंथात संस्कृत भाषेत लिहून ठेवले आहे.
बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील अधिव्याख्याता सौ. रजनी जोशी यांना हे संशोधन शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले. आजच्या काळाला त्याची सुसंगत जोड देता येईल किंवा सध्याच्या संशोधनाला त्यातील काही सिद्धांतांचा, नियमांचा उपयोग होऊ शकेल, असा त्यांना विश्‍वास आहे. त्या दृष्टीने त्यांनी आपले लेखन "ऍग्रोवन"च्या वाचकांसमोर ठेवले आहे. आजपासून दररोज मालिकास्वरूपात हे लेखन उपलब्ध करीत आहोत.

पाण्याला संस्कृतमध्ये "जीवन' असे नाव आहे. पावसाचे पाणी पृथ्वीवर पडल्यावर ते चहूवाटांनी इतस्ततः वाहू लागते. ते तसेच वाहू दिल्यास एक तर ते सरळ समुद्रात वाहून जाईल किंवा पृथ्वीच्या गर्भात जिरून जाईल. जिरून गेलेले हे पाणी कसे शोधून काढावे हा मोठा गहन प्रश्‍न आपल्या समोर उभा राहतो. भूगर्भांतर्गत पाणी शोधून काढण्यासाठी काही निरीक्षणे नियम, सिद्धांत, शास्त्रे तयार करावी लागतात. जमिनीत कुठे किंवा कसे खोदावे याचे काही नियम आहेत. भूमीच्या अंतर्भागात असणारे पाण्याचे साठे शोधून काढणे हे मोठे आव्हान भूगर्भशास्त्रज्ञांसमोर पूर्वीही होते, आताही आहे. त्यासाठी बुद्धीची व ज्ञानाची कसोटी लागते. भारत हे प्राचीन राष्ट्र आहे व त्याने एक संस्कृती निर्माण केली आहे. या संस्कृतीचे माध्यम असणारी संस्कृत हीदेखील प्राचीन भाषा आहे. त्यामध्ये आधुनिक विज्ञानाची अनेक बीजे लपलेली आहेत. संस्कृतातील विज्ञान सर्व जगाला थक्क करून सोडणारे आहे.

या भारतभूमीत पाचव्या शतकात एक प्रकांड ज्योतिषी व पर्यावरण शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचे नाव वराहमिहीर. त्याने त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या ज्योतिष शास्त्रज्ञांचे निष्कर्ष सूत्ररूपाने आपल्या "बृहत्‌संहिता' नामक संस्कृत ग्रंथात ग्रथित करून ठेवले आहेत. वराहमिहिराच्या पूर्वीचे ग्रंथवाङ्‌मय आज उपलब्ध नाही, त्यामुळे वराहमिहिराच्या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वराहमिहिराच्या बृहत्‌संहितेत "दकार्गल' नावाचा अध्याय असून, त्यात भूमीवरील लक्षणांवरून भूगर्भांतर्गत पाण्याचा साठा कसा शोधून काढावा याविषयी अत्यंत उद्‌बोधक व शास्त्रीय माहिती दिली आहे. वराहमिहिराच्या प्रत्येक विधानाला शास्त्राचा व सत्याचा पाया आहे. अल्‌-बिरौनी नावाचा अरब शास्त्रज्ञ व प्रवासी म्हणतो,
"Varahamihira has already reveal hismself to us as a man who accurataly knows the shape of the earth. His foot stands firmly on the basis of truth and he clearly speaks out the truth.''

भिन्न-भिन्न प्रदेशात भूगर्भांतर्गत पाणी शोधण्यासाठी भिन्न-भिन्न पद्धती अवलंबाव्या लागतात. वराहमिहिराच्या सिद्धांतांची उपयुक्तता १९८१ मध्ये उन्हाळ्यात आंध्रमध्ये चित्तूर जिल्ह्यात ज्या वेळी पाण्याचा दुष्काळ पडला त्या वेळी दिसून आली. त्या वेळी तिरुपतीच्या श्री. वेंकटेश्‍वर विद्यापीठाने इस्रो (Indian Space Research Organisation) आणि विद्यापीठ अनुदान मंडळ (University Grants Commission) यांच्या मदतीने एक जलसंशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत बोअरवेल खोदल्या होत्या. एकूण १५० विहिरी खोदल्या व प्रत्येक विहिरीला पाणी लागले. या कामासाठी त्यांनी वराहमिहिराने दिलेल्या लक्षणांची मदत घेतली व पाणी शोधून काढले. श्री. वेंकटेश्‍वर विद्यापीठाच्या आवारात विहिरी खोदतानादेखील वराहमिहिराच्या सिद्धांतांचीच मदत घेतली गेली. यावरून आपल्या कटिबंधापुरती तरी वराहमिहिराची योग्यता मोठी ठरते. Science and the Vedas या पुस्तकात लिहिलेल्या Ground Water Science-Need for Reorientaion या आपल्या लेखात (पान ८४) या विषयातील गाढे शास्त्रज्ञ डॉ. ई. व्ही. ए. प्रसाद हा संदर्भ सांगून लिहितात.

"These bore-weels provide two lakh gallons of water per day. These and several other field operations have proved, beyond doubt, the excellence and efficacy of Varahamihira's Methods for rapidly and successfully locating ground water resources.''

वराहमिहिराच्या "दकार्गल' या अध्यायाचा अभ्यास करून मी पुणे येथील वाडिया महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विषयाचे प्रमुख डॉ. उदय कुलकर्णी, त्याच विभागातील डॉ. आय. ए. खान, डॉ. अजित वर्तक आदी तज्ज्ञांची मदत घेतली. त्याआधारे Rejestivity पद्धतीने वराहमिहिराच्या दकार्गलमधील जलसंशोधन पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील पाण्याची पाच स्थाने (स्पॉट) पाहिली व वराहमिहिराच्या जलसंशोधन पद्धतीची यशस्विता अनुभवता आली. हे करीत असतांना त्याने सांगितलेले खडकांचे, तसेच मातीचे प्रकार, वृक्षवनस्पती, वारुळे या सर्वांचा विचार केला.

सोलापूर जिल्ह्यात बार्शी-सोलापूर कारंबा रोडवरील येथे दोन स्पॉट, कासारवाडी येथील एक स्पॉट, उस्मानाबाद जिल्ह्यातील माणकेश्‍वर व गुरुकुल येडशी येथील दोन स्पॉट अशा एकूण पाच स्पॉटमध्ये वराहमिहिर पद्धतीने यशस्वी जलसंशोधन करता आले. आजच्या विज्ञानयुगात पाचव्या शतकातील वराहमिहिराचे सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येणे शक्‍य आहे, हे मी माझ्या छोट्या प्रयत्नांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.

वराहमिहिराच्या "दकार्गल' अध्यायाचे यश हे या सिद्धतेच्या रूपात लपले आहे असे मला वाटते. या कामी पुणे येथील डॉ. मनोहर देवकृष्ण पंडित यांच्या प्राचीन भारतीय जलशास्त्र व मुंबईच्या कॅप्टन आनंद बोडस यांच्या चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचे प्रणेते आचार्य वराहमिहीर या पुस्तकांचा, तसेच डॉ. ए. व्ही. प्रसाद यांच्या संशोधनाचा फार उपयोग झाला. श्री. शिवाजी महाविद्यालयाचे (बार्शी) प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांच्याकडून प्रथम प्रेरणा मिळून संशोधनाचे हे काम पूर्ण करता आले. या प्रयत्नात डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. वर्तक, डॉ. खान यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. याशिवाय माझे पती रा. वा. जोशी, कुटुंबीय तसेच अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ओळख वराहमिहिराची
पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजेच इ. सनाच्या सहाव्या शतकाच्या आरंभी अवंति या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशावर सम्राट विक्रमादित्याची सत्ता होती. या प्रदेशाची राजधानी उज्जयिनी म्हणजे आज उज्जैन नावाने प्रसिद्ध असलेले शहर होय. हे शहर इंदूरच्या उत्तरेला आहे. अवंती प्रदेशात त्या काळात कांपिल्लक नावाचे गाव होते. ते आता काल्पि अथवा कायथा नावाने ओळखले जाते. या कांपिल्लक गावात सूर्योपासनेसाठी प्रसिद्ध असलेल्या कुटुंबात आचार्य वराहमिहीर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आदित्यदास होते. आदित्यदास हे वेद-शास्त्रांचे जाणकार पंडित होते. वेदाभ्यास, शास्त्राभ्यास, ज्ञानार्जन आणि अध्यापन ही त्यांची जीवनवृत्ती होती. आदित्यदासांनी आपल्या मुलाचे नाव "वराहमिहीर' ठेवले. वराहमिहीर हे सूर्यदेवतेचे नाव आहे.

आचार्यांच्या ग्रंथात स्वतः आचार्यच आपण आदित्यदासाचे पुत्र वराह-मिहीर असल्याचे सांगतात. "वराह' या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. श्रेष्ठ मिहीर देदीप्यमान व भगवान विष्णू या अर्थापैकी श्रेष्ठ व देदीप्यमान या अर्थाने वराह शब्द मिहीर (सूर्य) या नावाला लावून आचार्यांच्या वडिलांनी वराहमिहीर असे आपल्या मुलाचे नामकरण केले.

त्यांचा जन्म चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी या दिवशी शके ४२७ मध्ये झाला. हा जन्मदिन तारीख २० मार्च ५०५ (इ.स.) असा लिहिता येतो. त्यांच्या जन्माविषयी थोडे फार मतभेद असले तरी, बहुतांश भाष्यकारांनी व अभ्यासकांनी इ.स. ५०५ हेच वर्ष स्वीकारले आहे. वराहमिहिरांचे घराणे परंपरेने सूर्योपासक होते. त्यांचे वडील आदित्यदास हे त्यांचे ज्ञानगुरू होते. घराण्यामध्ये परंपरेने चालत आलेल्या सूर्योपासनेला तत्कालीन शिक्षण पद्धतीप्रमाणे केलेल्या ऋग्वेदाच्या अध्ययनामुळे तात्त्विक व शास्त्रशुद्ध आधार मिळाला असावा. ऋग्वेदात सूर्याला आदर्श देवता मानले असून, त्याच्यावर अनेक सूत्रे रचली गेली आहेत. गायत्री मंत्र हा तर सूर्योपासनेचा अद्वितीय मंत्र आहे. प्राचीन काळी उदयाला आलेली भारतातील खगोलशास्त्र व फलज्योतिषशास्त्रही सूर्याला विश्‍वाचे केंद्र व विश्‍वातील घडामोडींचे आद्यकारण मानतात. साहजिकच सूर्योपासक वराहमिहिराचे या दोन शास्त्रांच्या अध्ययानाकडे लक्ष वेधले गेले. वराहमिहिराने या अध्ययनाला आपले जिवितकार्य मानले व इ.स. ५८७ मध्ये मृत्यू येईपर्यंत ते अविरतपणे चालू ठेवले. त्यांचा बृहत्संहिता हा ग्रंथ त्यांच्या या प्रदीर्घ, सखोल व व्यासंगपूर्ण अध्ययनाचा एक अमोल ठेवाच आहे.

वराहमिहिराची ग्रंथसंपदा
निसर्गातील प्रत्येक घटकाचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. निसर्गाच्या भूतकाळातील, तसेच वर्तमानकाळातील स्थितीचा अभ्यास, निरीक्षण केल्यास मानवी जीवनाचा वेध घेता येतो. त्याच अनुषंगाने आचार्य वराहमिहिरांनी या क्षेत्रात केलेले कार्य अचंबित करणारे आहे. खगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूगर्भशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हवामानशास्त्र, प्राणिशास्त्र, जलशास्त्र या व अन्य शास्त्रांचा परस्परसंबंध आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास व विवेचन आचार्य वराहमिहिरांनी त्यांच्या ग्रंथात केलेले आहे.

आचार्य वहारमिहिरांची ग्रंथसंपत्ती विपुल आहे. वराहमिहिराने ग्रहांप्रमाणेच भू- गोलाची, तेथील प्राणी, वनस्पती, पर्जन्य, वास्तू आदी विषयांवर चिंतन केले आहे. वराहमिहिराच्या पूर्वसुरींनी व स्वतः त्यांनी पाण्याविषयी संशोधन करून जे शास्त्रीय सिद्धांत आपल्या बृहत्संहितेत ग्रंथित केले त्यांचा विचार आधुनिक काळात उपयुक्त आहे.

"पाणी' या विषयावर बृहत्‌संहितेत विस्ताराने विचार आला आहे. त्यात मेघवर्णन, मघोपत्ती, जलगर्भधारणा, पर्जन्यवृष्टी, तिचा काळ व प्रकार, पृथ्वीवर पडलेले पाणी, जमिनीच्या अंतर्भागात जिरून गेल्यावर तो कसे व कोणत्या साधनांनी आणि लक्षणांनी शोधून काढून मानवास जीवनासाठी उपलब्ध करून द्यावे. पाणी कसे साठवावे व शुद्ध राखावे इ. पाण्यासंबंध सर्व सिद्ध दिलेले आहेत. बृहत्संहितेत पाण्याविषयी असलेले अध्याय खालीलप्रमाणे आहेत - १) गर्भलक्षणाध्याय, २) गर्भधारणाध्याय, ३) प्रवर्षणाध्याय, ४) दकार्गलाध्याय.

आकाशात जे पाणी तयार होते, त्याविषयी बलदेव, गर्ग, कश्‍यप व देवल हे ऋषी तज्ज्ञ मानले गेले. भूगर्भातून पाणी कसे शोधून काढावे याविषयी सारस्वत व मनू हे ऋषी प्रमाणभूत मानले गेले. त्यांच्यानंतर उत्पल नावाच्या ऋषीने या शास्त्रशाखेत खूपच प्रगती केली. वराहमिहिराने हे सर्व सिद्धांत बृहत्संहितेत एकत्रित केले.

बृहत्‌संहिता - विशाल ज्ञानसागरच!
वराहमिहिराचा बृहत्‌संहिता हा ग्रंथ छंदोबद्ध असून, त्याची भाषा सुंदर व काव्यमय आहे. वराहमिहिराने जागोजागी विविध ऋषींचे संदर्भ दिले आहेत. ग्रंथातील "दकार्गल' हा अध्याय पाणी या विषयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जमिनीतील पाणी कसे शोधावे याचा सांगोपांग अभ्यास त्यात केला आहे. पाणी शोधत असताना भूगर्भातील जलशिरांचा विशेष अभ्यास या अध्यायात दिसून येतो.
                                                                                                                                                                          क्रमश:
संपर्क - डॉ. सौ. रजनी जोशी
९९२१०७७६२३ (संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)

Wednesday, 18 September 2013

शेततळ्यात मत्स्यसंवर्धन करा उत्पन्न वाढवा

विविध प्रकारच्या तलावात, जलाशयात मत्स्यशेतीचे तंत्रज्ञान विकसित आहे. सामान्य शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या तलावांचा बांधकाम खर्च परवडत नाही आणि जलाशयांची उपलब्धता मर्यादित असते. मात्र आता शेततळ्यात सामान्य शेतकऱ्यालाही मत्स्यशेती करणे शक्‍य आहे. शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन प्रकल्पांतर्गत, रोजगार हमी योजनेअंतर्गत पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवणूक करून, ते उन्हाळ्यात जसजशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाईल तेव्हा शेतीसाठी, फळबागांसाठी शाश्‍वत पाण्याचा पुरवठा करता यावा या हेतूने शेतकऱ्यांकडील उपलब्ध क्षेत्रफळानुसार विविध आकारांची शेततळी निर्माण करण्यात येत आहेत. या शेततळ्यांतून साधारण जुलै-फेब्रुवारी या काळात जलसाठा करून ठेवला जातो. हा पाणीसाठा मार्च-जून या कालावधीत शेतीसाठी आवश्‍यकतेप्रमाणे वापरला जातो. कोकणात जांभ्या दगडापासून तयार झालेल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते. अशाच प्रकारे मुरमाड जमिनीतही पाणी वेगाने झिरपते. अशा भागात प्लॅस्टिक कागदाचे अस्तर असलेली शेततळी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहेत. अशा शेततळ्यांत मत्स्यशेतीस चांगला वाव आहे.

मत्स्यशेतीसाठी शेततळी बांधताना - 1) शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याबरोबर खेकडे, वाम, बेडूक, वाम, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत, यासाठी व्यवस्था करावी.
2) शेततळ्यात खाद्य व्यवस्थापनासाठी सुविधा करावी.
3) पाणी काढल्यानंतर माशांची काढणी करण्यासाठी तळ्यात (विशेषतः प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या) सहज चढ-उतर करण्यासाठी पायऱ्यांची सोय करावी.
4) सर्वसाधारणपणे मातीच्या तलावात माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यासारख्या सेंद्रिय पदार्थांचे मातीतील जिवाणूंमुळे सहज विघटन होते. मात्र प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या तलावात असे होत नाही. यामुळे या तळ्यातील पाणी लवकर खराब होते, तसेच प्लॅस्टिक अस्तर, लहान आकार इ. कारणांमुळे शेततळ्यातील पाण्याचे गुणधर्मही (उदा. तापमान, सामू इ.) सतत बदलत असतात. याशिवाय डिसेंबर-जानेवारीनंतर शेततळ्यांतील पाण्याची पातळी कमी होत जाते, उन्हाळा सुरू होताना तापमान वाढते, साठवणूक केलेल्या माशांची वाढ झालेली असल्याने खाद्य जास्त प्रमाणात द्यावे लागते. त्या अनुषंगाने माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शेततळ्यातील पाण्याची प्रत मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची शक्‍यता असते. अशावेळी शेततळ्यातील पाणी शेतीला देणे, शेततळ्यात नवीन पाणी भरणे आवश्‍यक ठरते.
5) सर्वसाधारणपणे शेततळ्यांची खोली दोन ते तीन मीटर असते. या अनुषंगाने माशांची काढणी करण्यासाठी पुरेशा उंचीची (किमान पाच मीटर) ओढ-जाळी असावी.
6) पावसाळ्यात शेततळी भरून वाहतात. अशावेळी ओव्हर-फ्लोमधून साठवणूक केलेले मासे वाहून जाणार नाहीत, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच जनावरे शेततळ्यांत जाऊन प्लॅस्टिक कागद फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.

मत्स्य जातींची ओळख - 1) भारतीय प्रमुख कार्प मासे - कटला, रोहू, मृगळ या तीन मत्स्य जातींना भारतीय प्रमुख कार्प मासे म्हणतात. झपाट्याने होणारी वाढ व आकाराने खूप मोठ्या होत असल्याने मत्स्यशेतीकरिता या जाती फायद्याच्या ठरतात. या जाती उत्तर भारतातील गंगा नदी व तिच्या उपनद्यांमध्ये आढळतात.
2) चिनी कार्प : चंदेरा व गवत्या यांचे मूळ वास्तव्य चीनमधील नद्यांमधले असले तरी भारतासह कित्येक देशात यांची मत्स्यशेती केली जाते.
3) भारतीय प्रमुख कार्प मासे हे परंपरागतरीत्या नैसर्गिक तळी व कृत्रिम तलावामध्ये वाढविले जातात. नैसर्गिक अन्न आणि जागेसाठी या तीन जातींची पूरकता असल्याकारणाने त्यांचे तलावामध्ये एकत्रित संवर्धन केले जाते. या संवर्धन पद्धतीला मिश्र मत्स्यशेती असे म्हणतात.
4) मिश्र मत्स्यशेतीमध्ये कटला पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या प्राणी प्लवंगांचा अन्न म्हणून वापर करतो. रोहू मधल्या थरातील अन्न खातो, तसेच मृगळ तळाशी असलेले अन्न खातो. चांगली वाढ आणि उत्तम मागणी असल्यामुळे मिश्र मत्स्यशेती फायदेशीर ठरते.

गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी - जलद वाढ, चांगली रोगप्रतिकारक शक्ती व इतर माशांबरोबर संवर्धन करता येत असल्याने गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी ही संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी प्रजाती आहे. "स्कॅंपी' या नावाने ओळखली जाणारी ही प्रजाती गोड्या पाण्यातील तळी, सरोवरे, नद्या व खाडीच्या भागात प्रामुख्याने आढळते. या कोळंबीला "झिंगा', "पोचट' व "खटवी' असेही संबोधिले जाते.

नर-मादीमधील फरक - 1) नर हा मादीपेक्षा आकाराने मोठा असून डोके व पाय मोठे असतात. नर कोळंबीमध्ये जननेंद्रीय हे पाचव्या चलपादाच्या तळाला असतात. मादीचा पोटाकडील भाग नरापेक्षा रुंद असतो. वयाने लहान असलेल्या कोळंबीमध्ये नराच्या ऍबडॉमनच पहिल्या भागाच्या खालच्या बाजूला टोक असते. तर मादीमध्ये हे आढळत नाही.
2) "स्कॅंपी' या कोळंबीच्या जीवनचक्रामध्ये प्रामुख्याने चार अवस्था आहेत, त्या म्हणजे अंडी, पिल्ले (11 अवस्था), पोस्ट लार्व्हा व पूर्ण वाढ झालेली कोळंबी या होत. लार्व्हाच्या वाढीकरिता सुमारे 12-14 पीपीटी क्षारतेच्या (निमखारे पाणी) आवश्‍यकता असते. तर पोस्ट लार्व्हा गोड्या पाण्यात वाढते. पूर्ण वाढ झालेल्या अंडीवाल्या माद्या खाडीच्या भागात स्थलांतर करतात. पिल्लांची वाढ ही खाडीच्या भागातच होते.

पॅंगॅशिअस मासा - 1) हा मासा रिव्हर किंवा सिल्व्हर स्ट्रिप्ड कॅटफिश, सियामिज शार्क, सूची-कॅटफिश किंवा कॅटफिश या सर्वसाधारण नावाने तर महाराष्ट्रात "पंकज मासा' या नावाने ओळखला जातो. मूळतः मेकॉंग नदीच्या खोऱ्यात हा मासा सापडतो.
2) उत्तम वातावरण मिळाल्यास या माशाची वाढ जोमाने होते. पांढऱ्या रंगाच्या खोऱ्यात हा मासा सापडतो. उत्तम वातावरण मिळाल्यास या माशाची वाढ जोमाने होते.
3) पांढऱ्या रंगाच्या (फॅटयुक्त) फिलेट होतील असा दोन किलो वजनाचा मासा एका वर्षात वाढतो.
4) मत्स्यशेतीसाठी पॅंगॅशिअस माशाची मागणी वाढते आहे. कारण या माशाची 20 ग्रॅ. वजनाची बोटुकली 1.5 गुणांकासह (FVR) एक किलोपर्यंत वाढते.
5) इतर कॅटफिशप्रमाणे, पॅंगॅशिअस माशाचे शरीर लांबट, दंडगोलाकार, पाठीकडचा भाग करड्या रंगाचा तर पोटाकडील भाग पांढरा व शेपटी दुभंगलेली असते. डोळे मोठे व तोंडाचा आकार लहान असतो. पूर्ण वाढ झालेले मासे लांबीने 130 सें.मी. (चार फूट) आणि 44 किलो वजनापर्यंत वाढू शकतात. मोठे मासे नदीच्या खोल पाण्यात राहणे पसंत करतात. निसर्गतः पॅंगॅशिअस मासे शाकाहार व मांसाहारी असतात.

शेततळ्यात मत्स्यबीज संचयन आणि संवर्धन - संवर्धन पूर्वतयारी -
1) शेततळे सुकविणे किंवा कोरडे करावे.
2) प्लॅस्टिक अस्तर नसलेले शेततळ्याची नांगरणी करावी त्यामुळे मातीतील विषारी आणि निरुपयोगी वायू मुक्त होतील.
3) शेततळ्यात चुना योग्य प्रमाणात मिसळावा -
चुन्याचे प्रमाण हे शेततळ्यातील पाण्याच्या/ मातीच्या सामूवर अवलंबून असते. पाण्याच्या/ मातीचा सामू सहापेक्षा जास्त असेल, तर चुन्याची मात्रा 1000 किलो प्रति हेक्‍टरपेक्षा कमी वापरावी, जर पाण्याच्या/ मातीचा सामू पाच ते सहा असेल तर चुन्याची मात्रा 2000 किलो/ हेक्‍टरपेक्षा कमी असावी. जर सामू पाचपेक्षा कमी असेल, तर चुन्याची मात्रा 3000 किलो प्रति हेक्‍टरीपेक्षा कमी असावी.
4) शेततळ्यातील निकृष्ट जातीचे मासे काढून टाकावेत.
5) शेततळ्यातील पाण्याची पातळी किमान एक ते दोन मीटर राखावी.
6) शेततळ्यात नैसर्गिक खाद्य निर्माण होण्यासाठी शिफारशीत मात्रेमध्ये खतांचा वापर करावा. शेततळ्यात मत्स्य बीज संचयन करण्यापूर्वी त्यात प्लवंगाची निर्मिती योग्य प्रकारे झाली आहे, हे पाहणे गरजेचे असते.
6) मत्स्यबीज संचयनाचे प्रमाण : प्रति हेक्‍टरी 5000 नग बोटुकली आकाराचे बीज शेततळ्यात सोडावे. मत्स्यबीज शेततळ्यात सोडताना ते सकाळी किंवा सायंकाळी सोडावे. बीजाची वाहतूक शक्‍यतो हवा थंड असल्याचे वेळी करावी.
1) पाण्याचा सामू (पी.एच.) 7.00 ते 8.00
2) पाण्यातील विद्राव्य प्राणवायूचे प्रमाण 4.00 पीपीएम
3) पाण्याचे तापमान 24 ते 35 अंश से.
4) पाण्याची पारदर्शकता 15-20 सें.मी.पर्यंत
5) पाण्याचा रंग हिरवट
6) प्रदूषण- प्रदूषणाणासून मुक्त असावे.

खताची मात्रा - 1) मत्स्य बीज पाण्यात सोडल्यानंतर देखील खताची गरज असते. मत्स्यबीज पाण्यात सोडताना ते उपाशी असते, म्हणून पाण्यात तयार असलेले प्लवंग ते लगेच खायला सुरवात करतात. त्यामुळे प्लवंगाचे प्रमाण कमी होऊन बीज सोडल्यावर दर आठवड्याला एका गुंठ्याला 10 किलो ताजे शेण व अर्धा किलो सुपर फॉस्फेटचा वापर करावा लागतो.
2) मात्र वनस्पती प्लवंग बेसुमार वाढले तर खतांचा वापर बंद करावा. प्लवंगाचे प्रमाण अति नसल्यास खताचा वापर चालू ठेवावा.

माशांच्या वाढीची पाहणी - 1) शेततळ्यातील मासे यांचा साठा व त्यांची वाढ याचा अंदाज घेऊन पूरक खाद्य मात्रा कमी- अधिक करता येते. माशांच्या वाढीची पाहणी 15 दिवसांतून एकदा तरी नियमितपणे करणे आवश्‍यक असते.
2) नोंदवहीत पाहणीत आढळणारी परीक्षणे यांची नोंद ठेवावी. मत्स्यबीज प्रति घनमीटर अधिक घनतेने साठविलेले असल्यास तलावातील खाद्यपुरवठा, पाण्याचा सामू, विरघळलेला वायू पाण्याचे तापमान इत्यादी परीक्षणे नियमित करणे व त्याचे आवश्‍यक प्रमाण तळ्यात राहील ते पाहणे आवश्‍यक असते.
3) तळ्यातून जाळे फिरविल्याने माशांना व्यायाम मिळतो, माशांच्या वाढीला मदत होते.

संपर्क : रवींद्र बोंद्रे : 9423049520

नोंदीतूनच कळेल मत्स्यशेतीचा नफा - तोटा

मत्स्यशेती करताना तलाव आणि माशांच्या वाढीचे निरीक्षण करून त्यांची नोंदणी ठेवावी. या नोंदणीच्या आधारावर तलावाची मशागत कधी करावयाची, खते केव्हा मिसळायची, माशांची पिल्ले केव्हा सोडायची, माशांना किती खाद्य द्यायचे, माशांची वाढ नीट होत आहे किंवा नाही हे समजते.

1) मत्स्यशेती / कोळंबी संबंधी नोंदी - उपलब्ध जमिनी संदर्भात आपल्याकडे नोंद ठेवली असल्यास आपणास शासकीय कामाकरिता तसेच भविष्यातील नियोजनाकरिता माहिती सहज उपलब्ध राहील.

2) मत्स्यशेती/ कोळंबी तलाव पूर्वतयारी संबंधी नोंदी - शेतात कोणतेही पीक घ्यायचे असल्यास आधी शेतीची मशागत करणे जसे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे मत्स्य संवर्धनासाठी तलावाचीसुद्धा मशागत करणे अत्यावश्‍यक असते. तयारी दरम्यान केलेल्या कामाची नोंदणी ठेवल्यास उपयोग होतो. नोंदणीचा तपशील खालील दिल्याप्रमाणे तयार करता येतो. प्रत्येक तलावासाठी तो वेगळा असला पाहिजे.


खतांच्या वापराच्या नोंदी - खाली दिलेल्या तक्‍त्यामध्ये वापरलेली खते, त्यांची मात्रा मत्स्य तलावात दिल्यानंतर पाण्यात झालेला बदल याविषयांची सर्व नोंदी ठेवाव्यात. हिरवा रंग जास्त असल्यास प्लवंगाची मात्रा जास्त असते, हिरवट तपकिरी असल्यास प्राणी प्लवंगाचे प्रमाण जास्त असते. माशांच्या वाढीसाठी दोन्ही प्लवंगांची आवश्‍यकता असते.

3) माशांची / कोळंबीची वाढ मोजण्यासंबंधी नोंदी - मत्स्यशेती संवर्धनाचे दरम्यान माशांची वाढ योग्य प्रकारे होते किंवा नाही हे वारंवार तपासून पाहावे. माशांच्या वाढीची नोंदीमध्ये संवर्धनाचे दिवस व प्रत्येक महिन्यातील वजन (ग्रॅममध्ये) व लांबी (सें.मी. किंवा मीटरमध्ये) घ्यावी.

4) खाद्यविषय नोंद - 1) मत्स्यशेती करतेवेळी 50 ते 60 टक्के एवढा खर्च खाद्यावर होतो. म्हणूनच खाद्याचा वापर अतिशय काटकसरीने आणि योग्यपणे करावा.
2) मत्स्य पीक घेतले त्या दरम्यान माशांना किती खाद्य दिले याची नोंद ठेवावी. तसेच माशांचे खाणे, खाण्यात काही बदल वाटल्यास तो "शेरा'मध्ये नोंदवावा; असे केल्यामुळे खाद्यात बदल करायचा का, म्हणजे खाद्य कमी किंवा जास्त टाकायचे ते ठरवता येते. तसेच संपूर्ण पिकाच्या दरम्यान खाद्य कसे कसे संपेल ते समजते.
3) माशांच्या वाढीशी त्याचा ताळमेळ घातल्यास खाद्यीय रूपांतर गुणांक FCR (Food conversion Ratio) काय आहे? खाद्याचा किती विनियोग झाला? पुढच्या पिकाच्या वेळी खाद्य देण्यात काही बदल करावयाचा किंवा कसे ते ठरविता येते. माशांच्या वाढीच्या दरम्यान काही चुका झाल्यास त्या दुरुस्त करता येतात. कमी खाद्य दिल्यास माशांची वाढ होत नाही, जास्त खाद्य दिल्यास खाद्य वाया जाते व त्यामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते.


तलाव क्र. ---------- क्षेत्रफळ------------- प्रति/हे. मत्स्य/प्रति/हे. मत्स्य/कोळंबी साठवणूक संख्या------------ बीज आकार-------------- साठवणूक प्रमाण-------------- साठवणूक दि. ------------- साठवणूक वेळ ---------------- बीजाचे आरोग्य------------------

1) एकूण मत्स्य/कोळंबी संवर्धनामध्ये खाद्यावर 40 ते 50 टक्के खर्च होतो. व्यवस्थित खाद्य व्यवस्थापन केल्यास हा खर्च कमी करता येतो.
2) खाद्यविषयक सर्व नोंदी ठेवाव्यात. खाद्य माशांच्या एकूण वजनाच्या प्रमाणात द्यावे.
3) सुरवातीस एकूण वजनाच्या 10 टक्के खाद्याची मात्रा द्यावी. नंतरच्या काळात ती तीन ते एक टक्कापर्यंत असावी.
4) काही वेळेस खाद्य तलावात मिसळणे शक्‍य नसेल किंवा खाद्य टाकण्यास उशीर झाला असेल ती नोंद ठेवणेसुद्धा आवश्‍यक आहे.
5) कोळंबी शेती करताना चेक ट्रेचा वापर करून कोळंबीने किती खाद्य, किती वेळात संपविले याची नोंद वेगळ्या तक्‍त्यामध्ये ठेवावी. कोळंबी संवर्धनाच्या काळात तीस दिवसांनंतर चेक ट्रेचा वापर करावा.
उदाहरणार्थ -

5) पाणी दर्जाविषयी निरीक्षण - 1) पाण्याचा दर्जा हा चांगला आहे हे माशांच्या वागण्यावरून समजते. माशांचे आरोग्य हे तलावातील पाण्याच्या दर्जावर अवलंबून असते, म्हणूनच तलावातील पाण्याचा दर्जा तपासून त्याची नोंद ठेवणे आवश्‍यक आहे. असे केल्यामुळे पाण्याचा दर्जा घसरत असेल तर ते वेळीच लक्षात येते. पाण्याचा दर्जा सुधारण्याचा उपाय करता येतो.
2) माशांचे पीक पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा दर्जा, खाद्य आणि माशांची वाढ या सर्व बाबी एकत्र घेऊन त्याचा अभ्यास केल्यास वाढ नीट न झाल्यास ती का झाली नाही हे समजू शकते. वाढ चांगली झाल्यास त्या वेळी पाण्याचा दर्जा कसा होता इत्यादी गोष्टी तपासून पाहता येतात. तसेच पाण्याचा दर्जा पुढील पिकांमध्ये राखून पीक घेता येते.


6) मत्स्यशेती दरम्यान घेतलेल्या पाण्याच्या नोंदी - मत्स्यशेती दरम्यान तलावात एकतर कॅनॉलमधून झडपा उघडून पाणी आत घेतले जाते किंवा ते शक्‍य नसेल तर पंपाने पाणी आत घेतात, पण यासंबंधीचा सर्व तपशीलवार नोंदी असल्याच पाहिजे कारण त्यावरून पुढच्या पिकाचे गणित बसविता येते. ही नोंद खालीलप्रमाणे ठेवावी. पाण्याची पातळी समजण्याकरिता सर्वसाधारण मध्यभागी किंवा गेट जवळ पाण्याची पातळी नमूद केलेला खांब लावून ठेवावा.

जमा-खर्च नोंदी मत्स्य कोळंबी संवर्धन करण्यादरम्यान जमा- खर्चाबाबत नोंदी ठेवल्यास आपणास किती खर्च झाला व किती उत्पन्न मिळाले हे कळते.

इतर नोंदी - - प्रत्येक तलावाची वेगळी आखणी असावी.
- कुठल्या जातीचे मासे संवर्धनासाठी वापरले, प्रत्येक जातींच्या माशांच्या वाढीची नोंद ठेवावी.
- संचयन घनता जास्त झाली असल्यास मोठे माशांची विक्री करावी व विक्री केलेल्या माशांची नोंद ठेवावी.
- माशांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे.
- प्रत्येक महिन्यात विकलेल्या माशांची नोंद ठेवावी.

नोंदी ठेवण्याचे फायदे - 1) वेळच्या वेळी व व्यवस्थित नोंदी ठेवल्यामुळे त्या वेळी तलावात काय काय समस्या आल्या व त्यावर कशी मात केली ते कळते.
2) माशांची वाढ कशी होत गेली ते कळते व पुढील पीक घेताना त्याचा उपयोग होतो.
3) पूर्वीच्या नोंदी चाळल्यास पूर्वी संवर्धन करताना काय काय अडचणी आल्या, काय चुका झाल्या ते कळते. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेता येते.
4) उत्पन्न व खर्च यांची व्यवस्थित नोंद ठेवल्यामुळे कोठे अनावश्‍यक खर्च झाला का, हे कळते. पुढील पिकाच्या वेळी अनावश्‍यक खर्च टाळता येतो.
5) खर्चाची जुळवाजुळव करणे सोपे जाते.
6) अंदाजे पीक किती होईल व केव्हा काढायचे हे समजते.
7) आपल्या मत्स्यशेतीची व्यावहारिक स्थिती लक्षात येते.


संपर्क - 9867056942
(लेखक सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, पेठकिल्ला, रत्नागिरी येथे जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

कंदमाशी, पानांवरील करपा यांना रोखा, हळद वाचवा

कंदमाशी - 1) कंदमाशी काळसर रंगाची, मुंगळ्याच्या आकाराची असते. कंदमाशीचे पंख तिच्या शरीरापेक्षा लांब असून ते पातळ आणि पारदर्शक असतात. कंदमाशी हळदीच्या खोडाच्या बुंध्याजवळ अंडी घालते.
2) अंड्यांमधून पाच ते सात दिवसांत लालसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात आणि शेतातील उघड्या पडलेल्या कंदांमध्ये शिरतात. अळीने पोखरल्यामुळे कंदाला झालेल्या जखमेमधून फ्युजारियम, पिथियम यांसारख्या रोग निर्माण करणाऱ्या बुरशींचा प्रादुर्भाव होतो.
कंद मऊ पडून कुजू लागतात.
3) हळद कंदांचे नुकसान करणारी ही एक महत्त्वाची कीड असून, जास्त प्रादुर्भाव झाल्यास हळदीचे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान होते. किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबर- ऑक्‍टोबरपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत आढळून येतो.

नियंत्रणाचे उपाय - - हळद लागवडीकरिता निरोगी मातृकंदांची निवड करावी.
- हळद लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करावी, त्याकरिता क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) 20 मि.लि. + कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून हळदीचे बेणे त्यात 30 मिनिटे बुडवून लागवड करावी.
- प्रति एकरी चार किलो दाणेदार फोरेट हळदीच्या बुंध्यापासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर पाच ते सात सें.मी. खोलीवर जमिनीत मिसळावे. आवश्‍यकता असल्यास पेरणीनंतर 110 ते 120 दिवसांनंतर पुन्हा अशाचप्रकारे फोरेटचा वापर करावा.

खोडकिडा - 1) किडीचा पतंग लहान आकाराचा, पिवळसर रंगाचा असून, पंखावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. मादी पतंग हळदीच्या रोपाच्या कोवळ्या भागांवर गुलाबीसर रंगाची अंडी एकेकट्या पद्धतीने किंवा समूहाने घालते.
2) अंड्यांमधून बाहेर पडलेली अळी खोडाचा वाढणारा शेंडा आणि खोड पोखरते आणि खोडाला छिद्र करून आत शिरते.
3) खोडाला छिद्र केल्यामुळे पानांवर एका रांगेत गोल छिद्रे पडलेली दिसतात.
नियंत्रणाचे उपाय -
- प्रथम प्रादुर्भाव दिसताच दाणेदार फोरेट चार किलो या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
- 25 मि.लि. क्‍लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) किंवा 15 मि.लि. डायमेथोएट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- प्रादुर्भावग्रस्त झाडे नष्ट करावीत.

कंदावरील खवलेकीड - 1) खवलेकीड हळदीच्या कंदामधून रस शोषण करीत असल्याने झाड कोमेजलेले आणि पिवळसर दिसते. जास्त प्रादुर्भाव असल्यास झाड पूर्णपणे वाळते.
2) हळद काढणीच्या वेळेस पिवळसर रंगाची खवलेकिडीची पिल्ले कंदावर फिरताना दिसून येतात. येथून त्यांचा इतर कंदांवर प्रसार होतो.
3) साठवणुकीतील कंदांवर प्रथम पांढऱ्या रंगाची खवलेकीड आढळून येते. कालांतराने कंदाच्या डोळ्याजवळ कीड एकत्रित होते आणि रस शोषण करते. प्रादुर्भाव जास्त असल्यास कंद कोमेजतो आणि शेवटी वाळतो.
नियंत्रणाचे उपाय -
- खवलेकीड प्रादुर्भावग्रस्त कंदांची साठवणूक करू नये.
- लागवडीकरिता कीडविरहित सुदृढ कंदांचाच वापर करावा.
- प्रादुर्भाव असल्यास साठवणुकीपूर्वी आणि लागवडीपूर्वी कंदास बेणेप्रक्रिया करावी (क्विनॉलफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी).
- जमिनीत चांगले कुजलेले दोन टन लेंडीखत किंवा कोंबडी खत प्रति हेक्‍टरी या प्रमाणात दोन भागांत मिसळावे, त्यानंतर डायमिथोएट दोन मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

हळदीवरील रोग -
कंदकूज किंवा मूळकूज -
1) रोगग्रस्त कंदांपासून या रोगाचा प्रसार होतो. या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या कडा वाळण्यास सुरवात होते व कालांतराने पूर्ण पानच वाळून जाते. झाडाचा बुंधा ओलसर होतो, नरम पडतो आणि झाड कोलमडते.
2) रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास कंदावरदेखील बुरशीची वाढ होते आणि कंद कुजतो.
नियंत्रणाचे उपाय -
- लागवडीकरिता रोगमुक्त कंदाची निवड करावी.
- पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या मध्यम ते हलक्‍या जमिनीमध्ये सरी- वरंब्यावर हळदीची लागवड करावी.
- पावसाळ्यात शेतामध्ये पाणी साचू देऊ नये.
- कंद लागवडीपूर्वी तीन ग्रॅम मॅन्कोझेब किंवा एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात 30 मिनिटे कंद बुडवून बेणेप्रक्रिया करावी.
- रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच मॅन्कोझेब 30 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम किंवा मॅटॅलॅक्‍झील अधिक मॅंकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रणाचे द्रावण तयार करून रोगग्रस्त भागातील मुळाजवळ जिरवावे.

पानांवरील ठिपके - 1) हा रोग कोलेटोट्रिकम कॅप्सिसी या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात होतो.
2) पानाच्या दोन्ही बाजूस करडे वलय असलेले व मध्यभागी राखाडी रंगाचे लांबट ठिपके दिसतात. कालांतराने दोन किंवा अधिक ठिपके एकत्र येऊन मोठे चट्टे पडतात.
3) ठिपक्‍यांचा मध्यभाग पातळ होतो व पान वाळण्यास सुरवात होते.
4) जास्त प्रादुर्भाव असल्यास बुंध्यावर आणि कंदावरही ठिपके दिसून येतात आणि काळ्या रंगाची बुरशी आढळून येते.
नियंत्रणाचे उपाय -
- रोगमुक्त क्षेत्रातील सुदृढ बेणे लागवडीकरिता निवडावे.
- लागवडीपूर्वी कंदास बुरशीनाशकाची बेणेप्रक्रिया करावी.
- रोगाची लक्षणे दिसून आल्यास मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारणी करावी.
- रोगाचा पुढील प्रसार टाळण्याकरिता रोगग्रस्त झाडाची पाने गोळा करून जाळून टाकावीत.

पानांवरील करपा (लीफ ब्लॉच) - 1) टॅफरिना मॅक्‍युलन्स या बुरशीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
2) रोगाचा प्रादुर्भाव ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. वातावरणातील 80 टक्के ओलावा आणि 21 ते 23 अंश सेल्सिअस तापमान या रोगाच्या प्रसारास पोषक असते.
3) रोगाची लक्षणे म्हणजे एक ते दोन मि.मी. आकाराचे चौकोनी ठिपके एका रांगेत पानाच्या शिरांच्या बाजूने पानाच्या दोन्ही बाजूस आढळतात.
4) पानाच्या वरच्या बाजूस ठिपक्‍यांचे प्रमाण जास्त असते. कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून अनियमित आकाराचे मोठे डाग पानांवर पडतात. या पानांवर असलेल्या बुरशीबीजांपासून नवीन पानांवर प्रादुर्भावास सुरवात होते.
5) नव्या पानांवरील दुय्यम प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते. या रोगाचे बीजाणू वाळलेल्या पानांमध्ये पुढील हंगामापर्यंत जिवंत राहतात.
नियंत्रणाचे उपाय -
- पानांवरील ठिपके रोगाप्रमाणेच करपा रोगाचे व्यवस्थापन करावे. कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास करपा रोगाचे नियंत्रण होते.

संपर्क - डॉ. चारुदत्त ठिपसे - 8275412062
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) म्हणून कार्यरत आहेत.)

बायोगॅस बांधकाम आणि व्यवस्थापन कसे करावे?

1) बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा.
2) बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.
3) केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन बायोगॅसच्या बांधकामाचे नियोजन करावे.
4) ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे. ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री- फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत.
5) बायोगॅस संयंत्रास आय.एस.आय. मार्क असलेली शेगडी जोडणे आवश्‍यक आहे. शेगडीची छिद्रे अधूनमधून स्वच्छ करावीत.
6) खताचा खड्डा मधूनमधून साफ करावा. खताचे किमान दोन खड्डे करावेत. त्यांचा आळीपाळीने वापर करावा. खड्ड्यातील शेणाची पातळी नेहमी आऊटलेटमधून शेण बाहेर पडण्याच्या सांडीपेक्षा कमी असावी म्हणजे शेणाची रबडी सहजरीत्या बाहेर पडेल.
7) संयंत्राच्या आऊटलेटवर फरशीचे झाकण घालणे बंधनकारक आहे, कारण संयंत्राचे आऊटलेट उघडे राहिल्यास त्यामध्ये पशू-पक्षी, माणसे वगैरे पडून धोका होण्याची शक्‍यता असते.
8) आपणाकडे उपलब्ध असलेली जनावरे, व्यक्ती यांचा विचार करूनच संयंत्राची क्षमता ठरविण्यात यावी.
9) दररोज आपणाकडे उपलब्ध असलेले शेण व तेवढेच पाणी घालून त्याचा शेणकाला करून संयंत्रामध्ये सोडावा. थंडीच्या दिवसांत शक्‍यतो कोमट पाण्याचा वापर करावा.
10) शेणाशिवाय स्वयंपाकघरातील खरकटे, भाजीपाल्याचे अवशेष यांचे लहान भाग करून घातले तरी चालू शकते.
11) गॅसवाहक पाइपमध्ये हवेचा गारवा लागल्यास पाणी होते, त्यासाठी गॅसवाहक पाइप शक्‍यतो एका बाजूने उतरता जोडावा. ज्या ठिकाणी गॅसवाहक पाइप वाकलेला (बेंड झालेला) असेल, त्या ठिकाणी पाणी काढण्याची नळी जोडावी व नळीतून मधूनमधून नियमित पाणी काढावे.
12) गॅस वापरते वेळी शेगडी भडकू लागली अगर निळ्या ज्योतीऐवजी ज्योत तांबडी पेटू लागली किंवा भांडी काळी पडू लागली, तर पाइपमध्ये पाणी साठलेले आहे असे समजावे व त्वरित पाणी बाहेर काढून घ्यावे.
13) बायोगॅसला शौचालय जोडलेले असल्यास ते स्वच्छ करताना फिनेल, जंतुनाशके, साबण, सोडा, डिटर्जंट पावडर इत्यादी रासायनिक द्रव्यांचा वापर करू नये. राखेने शौचालय स्वच्छ करावे.
14) शेगडी वापरात नसेल तेव्हा किंवा रात्री संयंत्रावरील मुख्य व्हॉल्व्ह बंद करावा.
15) स्वयंपाक करून गॅस शिल्लक राहात असेल तर बायोगॅसवर चालणाऱ्या दिव्याचा वापर करावा. स्वयंपाकाशिवाय प्रकाश, वीजनिर्मितीकरिताही बायोगॅसचा वापर करता येतो.
16) बायोगॅस संयंत्रापासून मिळणारे खत हे एक उत्तम सेंद्रिय खत आहे. याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारे खत आपण लागलीच द्रवरूपात पिकास देऊ शकतो. हे खत पीकवाढीसाठी फायदेशीर ठरते.
संपर्क - श्री. आजगेकर - 9421472229.
जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे कृषी अधिकारी (बायोगॅस)

दर्जेदार कांदा उत्पादनाने दिली पंडितरावांना पंचक्रोशीत ओळख

नाशिक जिल्ह्यातील बार्डे (ता. कळवण) हे गाव गौतमी गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात असले तरी अंतर अधिक असल्याने पाणी उपलब्धतेच्या अभावी विकासापासून दूरच आहे. मात्र, येथील जिद्दी शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरही आपली शेती व पूरक उद्योग फुलविले आहेत. त्यातील पंडितराव रामभाऊ वाघ हे एक शेतकरी. त्यांच्याकडे 28 एकर शेती असून, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रयोग करत पंडितराव यांनी आपली प्रगती साधली आहे. शेडनेट, शेततळे, कांद्याबरोबरच भाजीपाला, डाळिंब, गळीत धान्ये, कुक्कुटपालन यासारखे शेती आणि पूरक उद्योग राबविले आहेत.

कांदा उत्पादनात राखले आहे सातत्य रोपवाटिका - आपल्या कांदा लागवडीविषयी माहिती देताना पंडितराव यांनी सांगितले, की कांदा लागवडीत रोपवाटिका सर्वांत महत्त्वाची असून, सहा फुटी रुंदीच्या गादीवाफ्यावर विरळ बियाणे पेरतो. एक एकराच्या लागवडीसाठी अडीच किलो बियाणे याप्रमाणे एकाच वेळी बियाणे टाकतो. एकाच वेळी लागवड शक्‍य होते. काढणीतही कांदे एकसारख्या आकाराचे निघतात. रोपवाटिकेसाठी तुषार सिंचन पद्धती वापरतो.

लागवडीची योग्य वेळ - रब्बी हंगामात दरवर्षी 15 डिसेंबरला लागवड करतो. या आधी लागवड झाल्यास वाढीच्या टप्प्यात अधिक थंडी असल्याने कांदा नीट पोसत नाही. 15 डिसेंबरपेक्षा अधिक उशिरा लागवड केल्यास वाढीच्या टप्प्यात योग्य वातावरण न मिळाल्याने कांद्याची वाढ नीट होत नाही. लागवडीच्या 50 दिवसांपर्यंत जास्तीची थंडी पातवाढीच्या अवस्थेत कांद्याला लाभदायक ठरते, शिवाय 15 डिसेंबरला लागवड झाल्यास कीड- रोगांचे प्रमाण कमी असते, असा पंडितराव यांचा अनुभव आहे. फक्त काढणीच्या 22 दिवस अगोदर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी केली जाते.

गरजेनुसार पाण्याचे नियोजन लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी पाणी दिल्यानंतर व तिसरे पाणी देण्यापूर्वी तणनाशकाची फवारणी करतो. या काळात तणाचे बीज विकसित होण्याच्या स्थितीत असल्यामुळे तणनाशकाचे चांगले परिणाम मिळतात. या दरम्यान "थ्रीप्स'चा प्रादुर्भाव वाढतो. या काळात शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी केली जाते. लागवडी दरम्यान हलक्‍या थंडीचा काळ असतो. नवीन लागवडीत पहिल्यांदा तीन एकरांवर ठिबक सिंचन करायचे ठरविले आहे. लागवडीच्या अगोदर वाफे तयार झाल्यानंतर एकरी 100 किलो डीएपी (18:46:00) आणि 20 किलो गंधकयुक्त खत दिले जाते. त्यानंतर एक महिन्याने निंदणी झाल्यानंतर 10:26:26 हे खत 50 किलो आणि युरिया 25 किलो या प्रमाणात देतो.

काढणीपश्‍चात तंत्रज्ञानावर अधिक भर सव्वा तीन महिन्यांत कांदा काढणीला येतो. कांद्याची पात पिवळसर होऊन 50 ते 60 टक्के जमिनीवर पडल्यावर काढणी होते. काढणी झाल्यानंतर कांदा दक्षिणोत्तर दिशेने 60 फूट लांब आणि 4.75 फूट रुंद असा शेतात पोळ लावून वरून कांद्याच्याच पातीने झाकून आठ दिवस शेतात सुकविला जातो. या काळात कांद्याला थेट ऊन लागणार नाही याची दक्षता घेतली जाते. पावसाचे वातावरण नसल्यास शेतात कांदा जास्त काळ ठेवला जातो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून गंधकाची धुरळणी केलेल्या चाळीत वेगवेगळा साठवला जातो. त्यासाठी पाच फूट बाय 35 फूट आकाराच्या पाच कांदा चाळी आहेत. त्यामध्ये साधारणपणे 1200 क्विंटल कांदा साठविता येतो.

साठवणुकीत चांगली काळजी घ्या कांद्याची चाळ उभारताना मोकळी हवा, योग्य वायुविजन, योग्य तापमान यांचा विचार केला आहे. तापमान व आर्द्रता यांचे योग्य गुणोत्तर असल्यास कांद्याची टिकवणक्षमता वाढते. आर्द्रतेचे प्रमाण 60 ते 70 टक्के या प्रमाणात ठेवले जाते. चाळीच्या बाहेरून पडद्याची व्यवस्था केली असून, पावसाळ्यात हे पडदे खाली सोडले जातात, त्यामुळे कांदा मे महिन्यापासून ते ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत टिकतो. मागील चार वर्षांत एकरी किमान 125 क्विंटल ते कमाल 175 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. प्रति एकर सरासरी उत्पादन 150 क्विंटल मिळाले आहे.

कांदा विक्रीचे नियोजन प्रतवारी केल्यानंतर चांगला कांदा चाळीमध्ये साठवला जातो. आकाराने लहान, जोड कांदा जून- जुलैपर्यंत बाजारात पाठवला जातो. चाळीमध्ये कांदा पाच महिन्यांपर्यंत चांगला टिकतो. त्यामुळे कांदा विक्रीचे नियोजन पुढील पाच महिन्यांच्या कालावधीत करतो. या वर्षी साठवणीतील कांद्याला प्रति क्विंटल किमान दर 550 रुपये व कमाल दर 5600 रुपये मिळाला आहे. सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

पंडितराव वाघ याची शेती दृष्टिक्षेपात प्रकार : मध्यम (मातीचा सामू 7.5)
पाण्याचे स्रोत : शेततळे, दोन विहिरी
कांदा : सात एकर (रब्बी)
खरीप मका : तीन एकर
डाळिंब : तीन एकर (आंतरपीक म्हणून सोयाबीन दोन एकर, भुईमूग एक एकर, सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी झेंडू लागवड)
ऊस : चार ते आठ एकर
मिरची : एक एकर (शेडनेटमध्ये)
कोथिंबीर, मेथी : दोन एकर (हंगामी)
पोल्ट्री आणि ब्रीडर फार्म : 14 हजार पक्षी

शेतकऱ्याकडून शिकण्याजोगे... बियाणे, हवामानाचा अभ्यास उपयुक्त
लागवडीच्या किमान 15 दिवस अगोदर नियोजन हवे
माती, पाण्याचे नियमित परीक्षण
तणनाशक, पाणी आणि वेळेचे अचूक नियोजन
काढणीनंतर योग्य काळजी व साठवणूक
- पिकातील प्रत्येक बाबीची ठेवली जाते नोंद

पूरक उद्योग पंडितराव वाघ यांच्याकडे 14 हजार पक्षी क्षमतेची पोल्ट्री आहे. अलीकडेच त्यांनी ब्रीडर फार्मही वाढविला असून, ब्रॉयलर कोंबडीची 12 हजार मादी व दोन हजार नर इतके पक्षी आहेत. शेतीकडे लक्ष देता यावे या उद्देशाने पोल्ट्रीसाठी स्वतंत्र व्यवस्थापक नेमला आहे.

पाण्याच्या सुरक्षेसाठी शेततळे 2004 मध्ये शासनाच्या सामूहिक शेततळे योजनेतून शेतजमिनीच्या उंच भागात डोंगराच्या पायथ्याशी 44 मीटर बाय 44 मीटर आकाराचे शेततळे तयार केले. यात एक कोटी लिटर पाणी साठते. वीजपुरवठा बंद असतानाही "सायफन' पद्धतीने थेट सिंचन करता येते.

अभ्यासाचा सतत ध्यास! पंडितराव वाघ यांचे शालेय शिक्षण फक्त दहावीपर्यंतचेच! 1992 मध्ये शाळा सोडली; मात्र शेतीतील शिक्षण सुटले नाही. कांदा पिकाइतकेच डाळिंब, मिरची, कोबी यासारख्या पिकांचे सूक्ष्म नियोजन ते करतात. अभ्यासू दृष्टिकोनातून प्रत्येक पिकाच्या संपूर्ण नोंदी ठेवल्या असून, प्रत्येक अनुभवाची तपशीलवार नोंद केली जाते.

"ऍग्रोवन'साठी चार किलोमीटर चालतो... पंडितराव म्हणाले, की शेतात पेपर येत नाही. रोज सकाळी चार किलोमीटर अंतरावरून गावातून "ऍग्रोवन' आणून संपूर्ण वाचतो. त्या काळात घरातील लहान मुलांकडूनही व्यत्यय येणार नाही, इतकी काळजी कुटुंबातील सदस्यही घेतात. तसेच, कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले ज्येष्ठ बंधू मोहन वाघ यांनी नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी नमूद केले.


संपर्क : पंडितराव वाघ, 9673967731