Wednesday, 18 September 2013

सोयाबीन पिकाचे वाढले एकरी चार क्विंटलपर्यंत उत्पादन

-राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सोयाबीन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना सुधारित लागवड तंत्रज्ञानाच्या विविध बाबींबाबत अधिक ज्ञानी झाले.
-सुधारित लागवड तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे खडी गावात घेतलेला हा प्रातिनिधिक सोयाबीन प्रात्यक्षिक प्लॉट
-शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन झाले.

मराठवाड्यातील खडी गावच्या शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक तंत्रज्ञान
डॉ. ए. के. गोरे, डी. डी. पटाईत, डॉ. बी. के. आरबाड
सन 2012-2013 मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातर्फे परभणी जिल्ह्यातील विविध गावांत सुधारित लागवड तंत्रज्ञान पद्धती वापराचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात आली. त्यातील खडी (ता. पालम) गावात राबवलेल्या सोयाबीन पीक प्रकल्पातून सोयाबीनचे उत्पादन एकरी चार ते पाच क्विंटलने वाढल्याने निदर्शनास आले. शेतकरी या प्रकल्पातून अधिक ज्ञानी झाल्याने पुढेही सोयाबीनची उत्पादकता वाढण्यास वाव राहणार आहे.

कमी कालावधीमध्ये येणारे, जमिनीची सुपीकता वाढवणारे व निश्‍चित उत्पादन देणारे असलेले सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी अजूनही मोठा वाव आहे.
वाव असूनही उत्पादकता कमी का?

मराठवाडा विभागाबाबत बोलायचे तर जमीन व हवामान सोयाबीन पिकासाठी अनुकूल असूनही बऱ्याच वेळा वाणाची निवड, लागवड तंत्रज्ञान, कीड-रोग व्यवस्थापन अशा विविध टप्प्यांवर होणाऱ्या चुकांमुळे किंवा तंत्रज्ञानाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना पिकाची अपेक्षित उत्पादकता साध्य होत नाही. कृषी विद्यापीठ वा संशोधन संस्थांनी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचविल्यास उत्पादकता निश्‍चित वाढू शकेल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सोयाबीन संशोधन केंद्राने अधिक उत्पादनक्षम, कीड-रोगांना प्रतिकारक्षम विविध वाण व त्यासंबंधीचे लागवड तंत्रज्ञानही विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रकल्पांतर्गत विविध पिकांची प्रात्यक्षिके थेट शेतकऱ्यांच्या शेतावर 50 ते 100 एकर एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहेत. प्रात्यक्षिकांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम, शिवार फेरी, शेतकरी मेळावे घेतले जात आहेत.

...अशी घेतली प्रात्यक्षिके -सन 2012-2013 मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातर्फे परभणी जिल्ह्यात खडी (ता. पालम) येथे सोयाबीन व तूर, सोन्ना (ता. परभणी) येथे कापूस, हिंगोली जिल्ह्यात करंजळा व बोरी सावंत (ता. वसमत) येथे मुगाची प्रत्येकी 100 प्रात्यक्षिके घेण्यात आली.
-यात प्रशिक्षणापासून विद्यापीठ निर्मित बियाणे, संपूर्ण लागवड तंत्रज्ञान (पेरणी ते काढणी) शेतकऱ्यांच्या शेतावर उपलब्ध केले.
-प्रति शेतकरी एक एकर याप्रमाणे एका गावात किंवा दोन ते तीन गावांच्या शिवारात गटाने प्रात्यक्षिके घेतली.

खडी गावातील सोयाबीन उत्पादकता वाढ प्रकल्प परभणी जिल्ह्यात एकात्मिक तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत खरिपात मागील वर्षीच्या खरिपात सोयाबीन पिकासाठी खडी गाव निवडण्यात आले. गावातील शेतकरी सोयाबीन वर्षानुवर्षे घेत होते; परंतु उत्पादन कमी होते. याचे कारण सुधारित तंत्र त्यांच्यापर्यंत पोचले नव्हते. गावातील शेतकरी गट विद्यापीठाच्या संपर्कात होता. गाव निवडताना सुरवातीला विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील शेतकरी गटाशी संवाद साधला.

प्रकल्पातील खडी गाव व सोयाबीन प्रकल्प तपशील -खडी- परभणीपासून सुमारे 95 कि.मी.वर आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 800.
-प्रकल्पासाठी निवडलेले क्षेत्र - एकूण 100 एकर
-प्रात्यक्षिक संख्या - 100
वाण - एमएयूएस-71 (सोयाबीन)
एमएयूएस-71 हा वाण लवकर येणारा, दाणा टपोरा असून, पक्वतेनंतर 10 ते 12 दिवस शेंगा फुटत नाहीत. आंतरपिकास तो योग्य आहे.

प्रात्यक्षिके कार्यक्रम असा राबवला -राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पाची खडी येथे बैठक.
-विद्यापीठाने विकसित केलेल्या वर उल्लेखलेल्या वाणांच्या बियाण्याचे वाटप
-प्रशिक्षण कार्यक्रमास स्थानिक आमदारही उपस्थित.
-विद्यापीठ शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया, पेरणी, पेरणीचे अंतर, आंतरमशागत, खत व्यवस्थापन या बाबींचे नियोजन
-विद्यापीठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व प्रक्षेत्र सहायकांची नियमित भेट महत्त्वाची ठरली.

लागवड तंत्रज्ञान वैशिष्ट्ये - 1) पेरणीची वेळ - एकूण 100 प्रात्यक्षिकांपैकी बहुतांश प्रात्यक्षिकांची पेरणी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात तर काही जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाली.
2) बियाणे - विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति एकरी 30 किलो सोयाबीनचे बियाणे देण्यात आले.
3) बीजप्रक्रिया - सोयाबीनला नत्राची गरज हवेतून त्यांच्या मुळावरील गाठींमार्फत होते. मुळांवर जास्तीत जास्त गाठी येण्यासाठी बियाण्यास रायझोबियम प्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात आली. बियाण्याबरोबर विद्यापीठ निर्मित रायझोबियम जिवाणू संवर्धन देण्यात आले. प्रति 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जापोनिकम वापरण्यात आले. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी हा घटक देऊन बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

4) रासायनिक खते - सर्वसाधारण परिस्थितीमध्ये (मातीपरीक्षण आधारे) भरघोस उत्पादनासाठी पेरणीवेळेस एकरी 15 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 15 किलो पालाशचा सल्ला देण्यात आला. तेलबियावर्गातील पीक असल्याने एकरी 10 किलो गंधक देण्यात आले. खताचे व्यवस्थापन वेळीच व योग्य मात्रा यामुळे पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढली.

पूर्वी या भागातील शेतकरी सोयाबीनला एक ते दोन महिन्यांत युरिया देत असत. त्यात कायिक वाढ अधिक होऊन पिकाचे नुकसानच होण्याचे प्रमाण होते. परंतु विद्यापीठाच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर कोणतेही खत सोयाबीनला देऊ नये. कारण सोयाबीनच्या मुळांवरील गाठींमधील जिवाणू नत्राची खताची गरज भागवतात. ज्यामुळे पुन्हा युरिया देण्याची गरज नाही. साहजिकच पैशाची व नत्राची बचत होऊन पिकाचे संभाव्य नुकसान टाळले जाते. या प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांनी युरियाचा वापर टाळला.

5) पाणी व्यवस्थापन - सोयाबीन पिकाच्या फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची या दोन अवस्था पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. त्यामुळे शक्‍य तिथे शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे या अवस्थांत पाणी दिले. तुषार सिंचनाचा अवलंब केल्या ठिकाणी उत्पादनात सुमारे 30 टक्के वाढ झाल्याचे पुढे आढळले.

6) आंतरमशागत -
तणनियंत्रण योग्य वेळी करणे फार महत्त्वाचे. पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यांनी एक खुरपणी व एक कोळपणी करण्यात आली. पेरणीनंतर इमॅझीथॅपायर तणनाशक एकरी 250 ग्रॅम प्रमाणात वापरण्यात आले. योग्य आंतरमशागतीमुळे तणनियंत्रण झाले. उत्पादनातील घट कमी झाली.

7) कीड व रोगनियंत्रण - उंट अळी - क्विनॉलफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी. एक फवारणी पेरणीनंतर 20 दिवसांनी
-चक्री भुंगा- ट्रायझोफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर--दुसरी फवारणी पेरणीनंतर 50 दिवसांनी.
-पेरणी करतेवेळेस फोरेट दिल्याने खोडमाशी व चक्री भुंगा नियंत्रणात राहिला.
-फोरेट न वापरलेल्या शेतावर चक्री भुंगा मोठ्या प्रमाणात दिसून आला.
-शेंग करपा- मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी
-स्पोडोप्टेरा लिट्युरा- इमामेक्‍टीन बेंझोएट तीन ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी.

वरील सर्व कीडनाशके राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली.

प्रकल्पाचे फायदे - -एकत्रित घेतलेल्या प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांपर्यंत सोयाबीन लागवड तंत्रज्ञान पोचले.
-प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांनी तांत्रिक बाबींची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली
-त्यांचे पीक प्रात्यक्षिक वेगळे दिसून आल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकांना भेट देऊन फरक समजून घेतले.
-लागवडीतील तांत्रिक बाबी उदा. किडींचे प्रकार, त्यांची ओळख, योग्य किडीसाठी योग्य कीडनाशक व मात्रा योग्य पद्धतीने देण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केले.
-खतांचा प्रकार, ती देण्याची वेळ याबाबत काटेकोरपणे आला.
या सर्व गोष्टींच्या वापरातून पीक उत्पादकता वाढण्यास मदत झाली.
----डॉ. ए. एस. ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद गोरे, डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. बी. के. आरबाड, श्री. वाईकर, सौ. आर. जी. लांडगे, सचिन रणेर, राजू नागुला यांनी प्रकल्पासाठी परिश्रम घेतले.

सोयाबीन पिकातील तांत्रिक ज्ञान वाढले दरवर्षी सुमारे तीन एकर सोयाबीन असते. मागील वर्षी प्रशिक्षणातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पेरणीची योग्य वेळ व वाणाची निवड यामुळे पिकाची वाढ चांगली झाली. किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला. या भागात मागील वर्षी चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. परंतु या वर्षी फोरेटचा एकरी चार किलो प्रमाणात पेरणीवेळी वापर केल्यामुळे प्रादुर्भाव झाला नाही.

आंतरमशागत योग्य वेळी केल्यामुळे तणनियंत्रण झाले. रासायनिक खते, जैविक खते यांच्या वापरामुळे पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढली. बीजप्रक्रिया कशी करावी व त्यासाठी जैविक खत कोणते वापरावे हे सांगितल्यामुळे पीक उगवण क्षमता वाढली. पूर्वी एकरी सात क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळायचे. प्रकल्पाच्या माध्यमातून प्रभावी तंत्रज्ञानामुळे हेच उत्पादन 13 क्विंटलपर्यंत पोचले. सद्यःस्थितीत पावसाची परिस्थिती चांगली राहिली तर यंदाही उत्पादन चांगले मिळेल.
रामचंद्र परगे - 7798726771

विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रकल्पात सोयाबीनचा एमएयूएस-71 वाण निवडला.
पूर्वी एकरी आठ एकरपर्यंत असलेले उत्पादन प्रकल्प माध्यमातून 12 क्विंटलपर्यंत पोचले आहे.
कीडनाशक फवारणी करण्याची नेमकी वेळ, फूलगळ कशी टाळावी? खते व पाणी कोणत्या अवस्थेत, किती द्यावीत, मातीचा पीएच आदी गोष्टी शिकायला मिळाल्या.
मनोहर बोबडे- 9763814660

सोयाबीन पिकाला पूर्वी एक ते दोन महिन्यांत युरिया दिला जायचा. त्यामुळे कायिक वाढ अधिक होऊन पिकाचे नुकसानच होण्याचे प्रमाण होते. परंतु विद्यापीठाच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर कोणतेही खत सोयाबीनला देऊ नये असे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे त्याचा त्यानंतरचा वापर बंद केला.
राजेंद्र आलापुरे- 7798726771

या भागात सोयाबीनसाठी अतिरिक्तपणे डीएपीचा वापर व्हायचा. त्यामुळे पिकाला गंधकाचा पुरवठा होत नव्हता व खर्चाचे प्रमाण वाढत होते. शास्त्रज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केल्याने त्यातून गंधकाचा पुरवठा पिकाला झाला. ज्यांनी डीएपीचा वापर केला, त्यांनी त्याबरोबरच गंधकाचा 10 किलो प्रति एकरी याप्रमाणे वापर केल्यामुळे सोयाबीन दाण्याचा आकार व वजन वाढण्यास म्हणजेच उत्पादनात वाढ होण्यात मदत झाली.
शेषराव संभाजी चामले- 7798735225

(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment