Wednesday, 30 October 2013

जनावरांचे निरीक्षण करा, आजार ओळखा...

पशुपालकांनी सकाळी तसेच संध्याकाळी दोन तास गोठ्यातील जनावरांचे निरीक्षण करावे. नियमित निरीक्षणातून आपल्या गोठ्यातील गाई, म्हशी, वगारी, कालवडी, वासरे आरोग्यसंपन्न आहेत का ? हे ओळखता येईल. प्रत्येक गोठ्याची स्वच्छता असावी. गोठ्यात थर्मामीटर पाहिजे, थर्मामीटरच्या साह्याने जनावरांच्या यांच्या शरीराचे तापमान मोजता आले पाहिजे, नाडी परीक्षा करता आली पाहिजे.

जनावरांच्या चांगल्या आरोग्याची लक्षणे - - गाई, म्हशी, कालवडी, वगारी, वासरे "सावध' असली पाहिजेत. "हुशार' असली पाहिजेत. म्हणजेच तुम्ही केलेल्या कृतीस ती साथ देतात. उदा. जनावरांना नाव घेऊन बोलविले असता आपल्याकडे पाहणे, वैरण टाकत असताना वैरण खाण्यासाठी धडपड करणे ही सावध असण्याची लक्षणे आहेत.
- चांगले आरोग्य असणाऱ्या जनावराची नाकपुडी ओलसर असते. जिभेने नाक साफ करण्याची प्रक्रिया चालू असते.
- रवंथ करताना तोंडात घास असतो. रवंथ करताना पांढरा फेस येतो. चांगले आरोग्य असणारी जनावरे किमान आठ तास रवंथ करतात.
- शेण, मूत्र टाकताना मोकळेपणा असतो, अवघडलेपणा नसतो.
- जनावर उभे राहताना, उठताना, बसताना मोकळेपणा असतो. सांभाळून उठत-बसत नाहीत. उभे असताना चारी पायांवर सारखे वजन देतात.
- शेणाला घास वास नसतो. शेणाची बांधणी घट्ट खीर, लापशीसारखी असते. शेण खाली पडल्यावर उडते हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
- चांगले आरोग्य असणाऱ्या जनावराचे मूत्र स्वच्छ, पारदर्शक असते. मूत्राला अमोनियासारखा वास असतो.
- चांगले आरोग्य असणाऱ्या जनावराचे शरीराचे तापमान 98.5 फॅ. ते 102 फॅ. असते, तर संकरित जनावरांचे तापमान 99.5 फॅ. ते 102 फॅ. असते.
- चांगल्या प्रकृतीच्या जनावरांची नाडी प्रतिमिनिट 40 ते 45 असते.
या सर्व बाबींचे निरीक्षण बारकाईने केले, तरच आजारी असलेली जनावरे ओळखता येतात. आजाराची तीव्रता प्राथमिक अवस्थेत असताना पशुतज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

पशुपालकांनो, इकडे लक्ष द्या - अ) गाई, म्हशी दुधात असताना, बैल ओढकाम करत असताना, अन्नपचन करत असतानाच्या वेळेस त्यांच्या शरीराचे तापमान नेहमीपेक्षा 1/2 फॅ. ते 1 फॅ.ने वाढते, हे नैसर्गिक आहे. ही दैनंदिन काम करत असताना अशा कामातून उष्णता निर्माण होते. जर गोठा सावलीत, गोठ्यात खेळती हवा, भरपूर प्रमाणात थंड पाणी उपलब्ध असल्यास श्‍वासाद्वारे उष्णता बाहेर पडते आणि शरीराचे तापमान सामान्य होते.
ब) ज्या वेळेस जनावराचे तापमान वाढते त्या वेळेस त्यास ताप आलेला आहे असे समजावे. विषाणू, जिवाणू, एकपेशी जंतूचा जनावरांमध्ये प्रादुर्भाव झाल्यास खालीलप्रमाणे ताप दिसून येतो.

1) सौम्य ताप - ज्या वेळेस शरीराचे तापमान 101 फॅ. ते 103 फॅ.च्या दरम्यान असते, त्यास सौम्य ताप असे म्हणतात. जर जनावरास सौम्य ताप असेल तर कासेचा दाह, श्‍वसनसंस्थेचा दाह, मूत्रमार्गाचा दाह, कॉक्‍सीडिया, पोटदुखी, गर्भाशयाचा दाह असे संभाव्य आजार असू शकतात. अशा वेळी जनावरांचे बारकाईने निरीक्षण करावे. लक्षणांवरून तुम्ही प्राथमिक अवस्थेत असणारे आजार ओळखू शकता.

कासेचा दाहाची लक्षणे - - गाई, म्हशीचे तापमान घ्या. गाई, म्हशींना 101 फॅ. ते 103 फॅ.च्या दरम्यान तापमान आहे का? असल्यास दुधात गाठी आहेत का?
- दूध लालसर, रक्तमिश्रित वाटते का? कास गरम वाटते का?
- कास थोडी दाबली असता दुखते का? गाई, म्हैस लाथ मारेल, कासेला हात लावू देणार नाही.
- गाई, म्हशीचे दूध खराब झालेले आहे का?
- या सर्वांचे उत्तर होय असेल तर कासेचा दाह झालेला आहे असे समजून त्वरित पशुतज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

2) श्‍वसनसंस्थेचा दाह - - प्रथम पशुधनाचे तापमान घ्या. पशुधनाचे तापमान 101 फॅ. ते 103 फॅ.च्या दरम्यान आहे का?
- नाकातून पाणी येते का? नाकातून शेंबडासारखा स्राव येतो का? पशुधन नाकपुड्या विस्तारून श्‍वास घेतात का?
- जनावर तोंड उघडे ठेवून श्‍वास घेतात का?
- सर्वांचे उत्तर होय असेल तर श्‍वसनसंस्थेचा दाह झालेला आहे असे समजून त्वरित पशुतज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

3) मूत्रमार्गाचा दाह - - लघवी थांबून-थांबून, थोडी-थोडी होते का?
- लघवी करताना पाठीची कमान होते का? लघवी रक्तमिश्रित, पूमिश्रित आहे का?
- शरीराचे तापमान 101 फॅ. ते 103 फॅ.च्या दरम्यान आहे का?
- आपल्या गाई, म्हशी नुकत्याच व्यालेल्या आहेत का? कारण हा आजार गाई, म्हशींमध्ये व्याल्यानंतर दिसून येतो.
- या सर्वांचे उत्तर होय असेल तर मूत्रमार्गाचा दाह आहे असे गृहीत धरून त्वरित पशुतज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

4) कॉक्‍सीडिया -- गाई, म्हशी, वासरे यांना जुलाब होतात का?
- जुलाबाला घाण वास आहे का? जुलाबात रक्तमिश्रित शेम दिसते का?
- जुलाबात रक्त ठिपक्‍यासारखे दिसते का?
- गाई, म्हशी कमी खातात का? दुधाचे प्रमाण कमी झालेले आहे का?
- शरीराचे तापमान 101 फॅ. ते 103 फॅ.च्या दरम्यान आहे का?
- वासरे खाली मान करून राहतात का? वासरे थरथर कापतात का? वासरे कावरीबावरी, घाबरलेली दिसतात का?
- यांची उत्तरे होय असल्यास कॉक्‍सीडियाचा आजार गृहीत धरून त्वरित पशुतज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

5) गर्भाशयाचा दाह - - गाई, म्हशी व्याल्यानंतर वार अडकला होता का? वार ओढून काढला होता का? वार पडण्यासाठी जड वस्तू वारास बांधली होती का?
- गाय, म्हैस गाभडली होती का? मायांग अंग बाहेर पडले होते का?
- शरीराचे तापमान 101 फॅ. ते 103 फॅ. च्या दरम्यान आहे का?
- वासरू अडले होते का? वासरू ओढून काढले होते का?
- अशा वेळेस गर्भाशयात रोगजंतू जाऊन गर्भाशयाचा दाह होतो. लगेचच पशुतज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

6) पोटफुगी - - जनावरे अजिबात खात नाहीत का?
- जनावरे उठताना, बसताना सांभाळून बसतात का?
- जनावरे उभे असताना पाठीची कमान करून राहतात का?
-जनावरांच्या डाव्या कुशीची तपासणी करा, ती फुगलेली आहे का? जनावरांना सतत पोटफुगीचा त्रास होतो का?
- जनावराचे तापमान घ्यावे. तापमान 101 फॅ. ते 103 फॅ. च्या दरम्यान असते का?
- जनावरांनी अखाद्य वस्तू जसे प्लॅस्टिक, चपला, खिळे, स्क्रू, तार, सुई, दाभण, रबर चुकून खाल्ले असेल तर पोटफुगीचा आजार संभवतो.
- यांची उत्तरे होय असल्यास पोटदुखी, पोटफुगीचा आजार असण्याची शक्‍यता आहे. पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
डॉ. श्रीकांत सरदेशपांडे
( लेखक सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी आहेत)

देखभालीतून वाढवा बायोगॅस संयंत्राचा कार्यकाळ

बायोगॅसच्या आकारानुसार (घ.मी.) प्रत्येक दिवशी लागणारे शेण (कि. ग्रॅ.) वापरावे. शेण व पाणी समप्रमाणात घेऊन मिसळावे. बायोगॅस बांधणीसाठी लागणारे साहित्य हे उत्तम दर्जाचे असावे शिवाय बांधणारा गवंडी कुशल कारागीर असावा. बायोगॅसमुळे एलपीजी व इतर पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर कमी होतो. प्रा. प्रकाश बंडगर, प्रा. सोनम मेहेत्रे
ग्रामीण भागातील इंधनटंचाईच्या काळात बायोगॅस हे इंधन गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासन 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत कौटुंबिक बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन हा कार्यक्रम राबवत आहे. बायोगॅस दीर्घकाळ चालण्यासाठी त्याची वेळोवेळी देखभाल महत्त्वाची आहे. जनावरांचे शेण, मानवी विष्ठा व तत्सम सेंद्रिय पदार्थांचे बंदिस्त घुमटात (डोम) कुजविण्याची प्रक्रिया होऊन त्यापासून बायोगॅस तयार होतो. बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे बायोगॅसचे प्रकार आहेत.

तरंगती टाकीचा बायोगॅस चांगला चालतो; पण त्यासाठी बराच खर्च येतो. संयंत्रावर तरंगणारी लोखंडी टाकी गंजल्यास किंवा काही कारणांनी निकामी झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बराच खर्च येतो. सध्या महाराष्ट्रात स्थिर घुमट संयंत्र प्रकारातील दीनबंधू बायोगॅस बांधले जातात. बायोगॅस बांधणीसाठी लागणारे साहित्य हे उत्तम दर्जाचे असावे शिवाय बांधणारा गवंडी कुशल कारागीर असावा. बायोगॅसमुळे एलपीजी व इतर पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर कमी होतो. सेंद्रिय खतांची उपलब्धता वाढते. बायोगॅस संयंत्र शौचालयास जोडल्यास स्वच्छता राखण्यास मदत होते.

बायोगॅस संयंत्राचे बांधकाम  -1) बायोगॅस बांधण्यासाठी घराजवळची उंच, मोकळी, कोरडी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी.
2) जागा शक्‍यतो गोठ्याजवळ किंवा घराजवळ असावी.
3) जमिनीखालील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी.
4) निवडलेल्या जागेजवळ पाण्याची विहीर व हातपंप नसावा, शिवाय झाडे नसावीत.

जनावरांची संख्या व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे.

अ. क्र. + जनावरांची संख्या + कुटुंबातील व्यक्तींची संख्या + प्रत्येक दिवशी लागणारा शेणकाला (कि.ग्रॅ.) + बायोगॅसचा आकार (घ.मी.)
1) 2 ते 3 + 3 ते 4 + 25 + 1
2) 4 ते 5 + 5 ते 8 + 50 + 2
3) 6 ते 7 + 9 ते 12 + 75 + 3
4) 8 ते 9 + 13 ते 16 + 100 + 4

बायोगॅसपासून मिळणारे खत - अ. क्र. + मूलद्रव्य + कंपोस्ट खत + बायोगॅस खत
1) नत्र +0.5 ते 1.0 टक्के +1.5 ते 2.0 टक्के
2) +स्फुरद +0.5 ते 0.8 टक्के +1.0 टक्के
3) +पालाश +0.5 ते 0.8 टक्के +1.0 टक्के

एका बायोगॅस संयंत्राचे फायदे - 1) दर वर्षी किमान 10 एलपीजी सिलिंडरची बचत करू शकते.
2) दर वर्षी 2 ते 3 टन सेंद्रिय खत निर्मिती होते.
3) दर वर्षी एका वृक्षाची तोड थांबवते.
4) चुलीवरील स्वयंपाकाऐवजी बायोगॅसवर स्वयंपाक केल्यास 50 टक्के वेळेची बचत होते.
5) शौचालयास जोडल्यास स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागतो.

बायोगॅस संयंत्राची निगा व देखभालीबाबत सूचना - 1) बायोगॅसच्या आकारानुसार (घ. मी.) प्रत्येक दिवशी लागणारे शेण (कि. ग्रॅ.) वापरावे. शेण व पाणी सम प्रमाणात घेऊन मिसळावे. त्यातून गोटे, रेती काढून संयंत्रामध्ये सोडावे. थंडीच्या दिवसात शक्‍यतो कोमट पाण्याचा वापर करावा.
2) संयंत्राच्या प्रवेश कक्षावर व निकास कक्षावर उघडझाप करणारी झाकणे बसवावी, जेणेकरून त्यातून माणूस, प्राणी इत्यादींचा आत प्रवेश होणार नाही याची काळजी घ्यावी.
3) संयंत्राच्या निकास कक्षातून पाचक यंत्रामधील द्रावण हलवावे, जेणेकरून शेणावर जमा होणारी साय ढवळली जाईल.
4) घुमटाला नेहमी मातीने झाकून ठेवावे.
5) संडास जोडला असल्यास संडास स्वच्छ करताना रासायनिक पदार्थांचा वापर करू नका. शक्‍यतो राखेचा वापर करावा.
6) पाइपलाइनमध्ये पाणी साचू नये म्हणून पाणी काढण्याच्या नळीतून नियमित पाणी काढावे.
7) बायोगॅसचा वास घेण्याचा प्रयत्न करू नका.
8) दररोज रात्री शेगडी वापरात नसेल तर तेव्हा गेट व्हॉल्व्ह बंद करा.
9) शेगडीची छिद्रे अधूनमधून स्वच्छ करावीत.
10) भांड्याच्या तळाला ज्वाला लागतील इतपतच शेगडीचा कॉक उघडावा. भांड्याच्या बाजूने ज्वाला फैलावल्यास गॅस वाया जातो.
11) शेगडीची हवा नियंत्रक चकती योग्य प्रकारे फिरवून जेथे गॅसच्या ज्वाला तेजदार असतील तेथे तिला कायम ठेवावे.
12) खोलीमध्ये गॅसची गळती आहे असे समजल्यास अशा वेळी सर्व दारे, खिडक्‍या उघडून न जळालेला गॅस घराबाहेर घालवावा.
13) संयंत्राच्या निकास कक्षातून सुलभपणे खत बाहेर पडत नसल्यास जितके शेण पाणी प्रवेश कक्षातून आत घातले जाते, तितके खत निकास कक्षातून बादलीच्या साह्याने काढावे.
14) खताचा खड्डा दोन ते तीन फुटांपेक्षा जास्त खोल खोदू नये. ओल्या खतामध्ये कोणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी खड्ड्याभोवती कुंपण करावे.

प्रा. प्रकाश बंडगर - 9764410633
(लेखक अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग, पद्‌मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे कार्यरत आहेत)

वनवृक्षांच्या वाढीवर ठेवा लक्ष

जगातील वनांची उत्पादकता 2.5 घनमीटर प्रतिहेक्‍टर प्रतिवर्ष तर भारतामध्ये वनांची उत्पादकता 0.5 घनमीटर प्रतिहेक्‍टर प्रतिवर्ष इतकी आहे. जलद वाढणाऱ्या तसेच लवकर तयार होणाऱ्या वृक्षजाती वनांची उत्पादकता वाढविण्यासाठी उत्तम समजल्या जातात. या वृक्षांच्या चांगल्या वाढीसाठी लागवडीपासून खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
1) वनवृक्षांना द्यावयाची खताची मात्रा ही वनवृक्षांची जात व वयानुसार बदलत असते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात खड्डा करून सागाची लागवड केली असल्यास लागवडीपासून पहिल्या व दुसऱ्या वर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात 15 दिवसांच्या अंतराने 25 ग्रॅम नत्र, 15 ग्रॅम स्फुरद यांची मात्रा आपण दिलेली असेल. झाडांना खते दिल्याने त्यांच्या वाढीला जोम मिळतो.
2) साधारणपणे 3 ते 5 वर्षांपर्यंतच्या झाडांना 50 ग्रॅम नत्र, 30 ग्रॅम स्फुरद प्रतिझाड अशी खत मात्रा द्यावी. झाडांना बांगडी पद्धतीने आळी करून त्यात खत व माती झाकून रासायनिक खताची मात्रा द्यावी. पावसाच्या काळात खते देणे फायदेशीर ठरते. खतांचा पहिला हप्ता पावसाच्या सुरवातीला द्यावा. दुसरा हप्ता दोन महिन्यांने द्यावा.
3) लागवड केलेली रोपे वारा, पाऊस यामुळे वारंवार झुकत असल्यास रोपांना थोडासा बाक निर्माण होतो, त्यामुळे झाडे वेडी वाकडी वाढतात. हे टाळण्यासाठी रोपांची लागवड केल्यानंतर त्याच्या जवळ 2 ते 3 फूट उंची बांबूची काठी जमिनीत घट्ट बसवावी. रोपांचे खोड उभ्या केलेल्या काठीला सुतळीने बांधून घ्यावे.
4) झाडांची वाढ जलद व उत्तम प्रकारे व्हावी म्हणून झाडांची किडी रोगांपासून संरक्षण करावे. वनवृक्षावर सर्वसाधारणतः पाने खाणाऱ्या अळ्या, बुंधा व शेंडे पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जाणवतो. यापैकी बुंधा व शेंडे पोखरणाऱ्या अळ्या किडीच्या प्रादुर्भावाने झाडाची वाढ खुंटते, लाकडाची प्रत कमी होते, त्यामुळे अशा किडीच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियंत्रणाचे उपाय करावेत. वनीकरण केलेल्या परिसरात वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
5) सलग लागवडीमध्ये झाडे दाटीने वाढत असतात. खालच्या फांद्यांना सूर्यप्रकाश कमी उपलब्ध होतो, त्यामुळे खालच्या फांद्या आपोआप गळून पडतात. यालाच नैसर्गिक छाटणी असे म्हणतात. नैसर्गिक छाटणीमध्ये झाडे सरळ उंच वाढतात. मात्र झाडाची गोलाईची वाढ कमी असते.
6) कृषिवन शेतीच्या पद्धतीमध्ये ओळीत किंवा बगीच्या सभोवती वनवृक्षांची लागवड केली असल्यास झाडाच्या सभोवती भरपूर मोकळी जागा असते, त्यामुळे फांद्या अवास्तव वाढतात, त्यामुळे झाडाची उंची व गोलाई स्थिर राहते, पिकांच्या उत्पादनात घट येते.
7) छाटणी न करता वाढवलेल्या वृक्षांच्या सावलीमुळे आंतरपिकाच्या उत्पादनात 25 ते 50 टक्के घट होत असल्याचे दिसून आले आहे. छाटणी करताना करवतीचा वापर करावा. फांदीची छाटणी करताना खोडापासून फांदीचा 1 ते 1.5 उंच भाग सोडून छाटणी करावी. कापलेल्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी.

तज्ज्ञांच्याकडून करून घ्या मूल्यांकन ः
8) शेतबांधावर वाढणाऱ्या वनवृक्षांच्या विक्रीच्या उद्देशाने योग्य मूल्यांकन तज्ज्ञ मंडळींकडून करून घ्यावे. बहुतांशी शेतकऱ्यांना याबाबतीत पुरेसे ज्ञान नसल्यामुळे शेतातील वनवृक्षांचे चुकीचे मूल्यांकन होऊन अत्यल्प मोबदला मिळत असल्याचे दिसून आले आहे. इमारती लाकडासाठी लावलेल्या साग, शिरस, अर्जुन, तिवस, शिवन, बीजा या प्रकारच्या वृक्षांची विक्री प्रतिघन फूट या परिमाणानुसार होत असते, तर निलिगिरी, सुबाभूळ, रोहन, चिचवा, सुरू, हेटी, पळस इत्यादी वृक्षांची विक्री ही प्रतिटन या परिमाणानुसार होत असते, त्यामुळे तज्ज्ञांकडून मूल्यांकन करून योग्य मोबदला मिळवावा.

संपर्क ः 0712- 2521276
(लेखक कृषी वनशेती संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, नागपूर येथे कार्यरत आहेत)

सुधारित पद्धतीतून वाढवा उसाचे उत्पादन ...

रुंद सरीपद्धतीने दोन उसाच्या ओळीतील अंतर मध्यम जमिनीमध्ये 120 सें.मी., तर भारी मगदुराच्या जमिनीत 135 ते 150 सें.मी. ठेवावे. उतारानुसार सरीची लांबी 50 ते 60 मीटरपर्यंत ठेवावी. उतार जास्त असल्यास सरीची लांबी कमी ठेवावी. योग्य अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत. यामध्ये पॉवर टिलरचा चांगला उपयोग करता येतो.

1) या पद्धतीमुळे उसाची जोमदार वाढ होते. सरीतील अंतर वाढल्याने बेणे कमी लागते, लागवडीस मजूर कमी लागतात. आवश्‍यक तेवढेच पाणी देता येते.
2) सरीमधील रिकाम्या जागेत आंतरपिके घेता येतात. ठिबक सिंचन करता येते. खोडव्यामध्ये पाचट आच्छादन करता येते.

जोड ओळ, पट्टा पद्धत - 1) मध्यम जमिनीमध्ये 75 सें.मी. अंतरावर सलग सऱ्या सोडाव्यात. ऊस लागण करतेवेळी दोन सऱ्यात लागण करून तिसरी सरी रिकामी सोडावी म्हणजे 75 सें.मी. रुंदीची जोडओळ तयार होते आणि 150 सें.मी. रुंदीचा पट्टा तयार होतो. (75-150 सें.मी.).
2) भारी मगदुराच्या जमिनीमध्ये 90 सें.मी. अंतरावर सलग सऱ्या सोडाव्यात. ऊस लागण करतेवेळी दोन सऱ्यात लागण करून तिसरी सरी रिकामी सोडावी म्हणजे 90 सें.मी. रुंदीची जोडओळ तयार होते आणि180 सें.मी. रुंदीचा पट्टा तयार होतो (90-180 सें.मी.)
3) या पद्धतीमुळे उसाची वाढ जोमदार होते. आंतरपिकाचे उत्पादन मिळते. ठिबक सिंचन पद्धतीसाठी योग्य वापर करता येतो. पॉवर टिलर, छोट्या ट्रॅकटरने पट्ट्यात मशागत करता येते. मोठ्या बांधणीनंतर दोन ओळीमध्ये एकच सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजवता येतात.

कोरडी लागवड - 1) मध्यम, भारी मगदुराच्या जमिनीमध्ये कोरडी किंवा वाफशावरची लागण करावी. बेसल डोस, सूक्ष्म अन्नद्रव्ये व 500 किलो सेंद्रिय खत एकत्र मिसळून सरीमध्ये मिसळावे. बळिराज नांगर चालवून खते मातीआड करावीत. सरीत चळी पडते, त्यामध्ये टिपरी ठेवून मातीने झाकावित.
2) पाणी देताना पहिल्या 2 ते 3 पाण्याच्या पाळीवेळी हलके पाणी द्यावे. ऊस उगवण होईपर्यंत कांड्या उघड्या पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. वाफशावरची लागण केल्याने 20 ते 25 दिवसांत उगवण लवकर होते. लवकर उगवणीने कोंब जोमदार येतो.

गरजेनुसारच द्या पिकाला पाणी - सरी वरंबा पद्धत -
1) लांबसरी पद्धतीने 2 ते 3 सऱ्यांना एका वेळी पाणी द्यावे. लागणीनंतर त्वरित हलके पाणी घ्यावे व त्यानंतर चार ते पाच दिवसांनी दुसरे पाणी घ्यावे; तिसरे पाणी 8 ते 10 दिवसांनी द्यावे. उगवणीच्या कालावधीमध्ये म्हणजे लागणीपासून दीड महिन्यापर्यंत हलके पाणी द्यावे (25 टक्के सरी भरेपर्यंत).
2) फुटवे फुटण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 1.5 महिन्यापासून चार महिन्यांपर्यंत (मोठी खांदणीपर्यंत) 50 टक्के सरी भरेपर्यंत पाणी द्यावे.
3) मोठ्या बांधणीपासून ऊस तोडणीपूर्वी दोन महिन्यांपर्यंत 75 टक्के सरी भरेपर्यंत पाणी द्यावे. ऊस तोडणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे. हंगामानुसार पाण्याच्या पाळीतील अंतर ठेवावे. उन्हाळ्यात 8 ते 10 दिवस, हिवाळ्यात 15 ते 17 दिवस व पावसाळ्यात आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. जमिनीत सतत वापसा राहील, याची काळजी घ्यावी.

ठिबक सिंचनाचा वापर - 1) ऊस लागण करण्यापूर्वी ठिबक सिंचन संच बसवून जमीन वाफशावर येईपर्यंत म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार 48 ते 72 तास ठिबक संच चालवावा.
2) उसाला इनलाईन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. (ड्रिपरमधील अंतर 40 ते 50 सें.मी., प्रवाह 2.5 ते 3 लिटर प्रतितास)
3) लागणीनंतर ठिबक सिंचन संच उन्हाळ्यात तीन तास, हिवाळ्यात दोन तास, तर पावसाळ्यात गरजेनुसार चालवावा. ठिबक सिंचन पद्धतीने पूर्वहंगामी ऊस पिकास हेक्‍टरी 140 ते 145 हे. सें.मी. पाणी लागते. जमिनीची सुपिकता कायम राखून पीक उत्पादन क्षमता वाढवता येते. ठिबक सिंचनामुळे 45 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत पाण्यात बचत होऊन उत्पादकता 25 ते 30 टक्के वाढते.
4) पाण्यात विरघळणारी खते ठिबकमधून देता येतात. त्यामुळे खतांच्या मात्रेत 30 टक्के बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

संपर्क - श्री. माने पाटील - 9922321019
( लेखक वसंतदादा शुगर इस्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे येथे कार्यरत आहेत)

नियोजन पूर्व हंगामी उसाचे...

1) ऊस लागवडीसाठी मध्यम ते भारी मगदुराची उत्तम निचऱ्याची जमीन असावी. सामू 6.5 ते 8.5 असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.50 ते 0.75 च्या पुढे असावे. चुनखडीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे. क्षारता 0.8 पेक्षा कमी असणारी जमीन ऊस पिकासाठी चांगली असते. खारवट, चोपण, चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये.
2) जमिनीत उसाची मुळे खोलवर जावीत. त्यांनी कार्यक्षमतेने अन्न व पाणी शोषून घ्यावे यासाठी खोलवर (45 सें.मी.पर्यंत) चांगली पूर्व मशागत करावी. उष्ण वातावरण (ऑक्‍टोबर हीट) असल्यास शक्‍यतो पहिल्यांदा सबसॉयलरचा वापर करावा. दोन तासातील अंतर 150 सें.मी. ठेवून 45 ते 60 सें.मी. खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. यामुळे खोलवर मशागत होते. पूर्वीच्या पिकाची घसकटे जास्त असल्यास सुरवातीस रोटाव्हेटरचा वापर करावा. पहिली नांगरट आडवी केली असेल तर दुसरी उभी करावी. दोन वेळा आडवा व उभा कल्टिव्हेटर चालवून जमीन भुसभुशीत करावी.
3) भारी जमिनीस 0.5 टक्के, मध्यम जमिनीस 0.4 टक्के व रेताड/ हलक्‍या जमिनीस 0.3 टक्के उतार चांगला असतो. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4 टक्‍क्‍यांपर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी. जमिनीचा उतारा 0.4 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्यास उतारास आडव्या सऱ्या पाडून ऊस लागण करावी. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4 टक्‍क्‍यांपर्यंत असल्यास सरीची लांबी 40 ते 60 मीटर ठेवावी. उतार जास्त असल्यास सरीची लांबी कमी आणि आडवे पाण्याचे पाट करावेत.
4) ऊस उगवणीसाठी सरासरी 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान चांगले असते. जास्त थंडीच्या कालावधीमध्ये (11 ते 15 अंश सेल्सिअस) ऊस लागण करू नये. त्याचा उसाची उगवण, फुटवे व वाढीवर परिणाम होतो. ऑक्‍टोबरमधील उष्णतेचा फायदा ऊस उगवणीसाठी चांगला होतो.

भरखते/ सेंद्रिय खताच्या मात्रा - दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्‍टरी 25 ते 30 टन (12 ते 15 ट्रॅक्‍टर ट्रॉली) चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खताचा वापर करावा. हुमणी नियंत्रणासाठी एक टन सेंद्रिय खतासोबत दोन किलो मिथील पॅराथिऑनची भुकटी (2 टक्के) मिसळावी. यानंतर कुळवणी (कल्टिव्हेटर) करून सऱ्या सोडाव्यात.

हिरवळीच्या पिकाची लागवड - ऊस लागवडीनंतर 1.5 ते 2 महिन्यांनी दोन सऱ्यांच्या मधील रिकाम्या जागी हेक्‍टरी 30 ते 35 किलो ताग/धैंचा बियाणे पेरावे. मोठी बांधणी करतेवेळी ताग, धैंचा उसाच्या सरीत गाडून मोठी बांधणी करावी. ताग/धैंचा हिरवळीच्या पिकामुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक सुपीकता सुधारते; तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

1) ऊस जातीची निवड - को 86032, कोव्हीएसआय 9805, व्हीएसआय 434, कोसी 671, फुले 265, को 94012
2) बेणे प्रक्रिया - कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण, तसेच मूळकुज, कांडीकुज, पायनॅपलसारख्या रोग नियंत्रणासाठी बेणे प्रक्रिया करावी. एक हेक्‍टरसाठी लागणाऱ्या बेण्याच्या प्रक्रियेसाठी 250 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 750 मि.लि. मॅलॅथिऑन किंवा 750 मि.लि. डायमिथोएट प्रति 250 लिटर पाण्यामध्ये मिसळून टिपरी 10 मिनिटे बुडवून बेणे प्रक्रिया करावी.

बेणे निवड - बेणे मळ्यातील 9 ते 10 महिन्याचे, लांब कांड्याचे, शुद्ध, जाड, रसरशीत, सशक्त तसेच रोग व कीडमुक्त बेणे वापरावे. आखूड कांड्याचे, पांगशा फुटलेले, तुरा आलेले, मुळ्या फुटलेले, खोडव्यातील तसेच निडव्यातील बेण्याचा वापरू नये. लहान ऊस, कीडग्रस्त ऊस, बुडाकडील एक-दोन कांड्या काढून टाकाव्यात. तीन ते चार वर्षांतून एकदा बेणे बदल करावा.

टिपरीची निवड - अ) दोन डोळा टिपरी -
टिपरी तयार करताना डोळ्यांच्या वरचा भाग 1/3 व खालचा भाग 2/3 ठेवावा. दोन टिपरांतील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवून डोळे बाजूला येतील अशी लागण करावी. फुटव्यांचे प्रमाण कमी असणाऱ्या जातीमध्ये दोन टिपरांतील अंतर कमी ठेवावे. को 86032, फुले 265 जातीमध्ये दोन टिपरांमध्ये अंतर 30 सें.मी.पर्यंत वाढविण्यास हरकत नाही.
रुंद सरी पद्धतीमध्ये (120 ते 150 सें.मी.) हेक्‍टरी 18,000 ते 22,000 टिपरी बेणे लागते, तर जोडओळ पट्टा पद्धतीमध्ये (75 - 150 सें.मी. किंवा 90 - 180 सें.मी.) हेक्‍टरी 19,500 ते 23,500 टिपरी बेणे लागते. दोन डोळा पद्धतीमध्ये ऊस संख्या नियोजन आपोआप होते; मोठ्या क्षेत्रावर लागवडीस ही योग्य पद्धत आहे.

ब) एक डोळा टिपरी -
एक डोळा टिपरी तयार करताना डोळ्याच्या वरचा भाग 1/3 व खालचा भाग 2/3 ठेवावा. टिपरी तयार करताना काळजी घ्यावी. दोन डोळ्यातील अंतर 30 ते 45 सें.मी. ठेवावे. लागण करताना डोळा वरती येईल याची काळजी घ्यावी. टिपरी सरीला समांतर ठेवावी म्हणजे उगवणीनंतर मशागतीस अडचण येत नाही. 15 ते 20 दिवसांत उगवण पूर्ण होते. लागणीनंतर 20 ते 30 दिवसांच्या आत नांग्या भराव्यात. यासाठी प्लॅस्टिक पिशवीत अथवा ट्रेमध्ये रोपे तयार करावीत किंवा प्रत्येक पाचव्या सरीच्या बगलेला एक डोळा टिपरीची जादा लागवड करून नांग्या भरण्यासाठी उपयोग करावा.
एक डोळा लागणीसाठी हेक्‍टरी 18,000 ते 22,000 टिपरी पुरेशा होतात. लागणीनंतर 60 ते 65 दिवसांनी जेठा कोंब मोडावा. या पद्धतीमध्ये दोन डोळा टिपरीच्या तुलनेने 50 टक्के बेणे व खर्चामध्ये बचत होते. सुरवातीपासून अपेक्षित ऊस संख्या राहिल्याने उत्पादनात वाढ होते.

क) एक डोळा रोप लागण -
एक डोळा टिपरीपासून प्लॅस्टिक पिशवीत (6'' x 4'' पिशवीचा आकार) अथवा पॉली ट्रे (3'' x 2'' कपाचा आकार) मध्ये रोपे तयार करावीत. 25 ते 35 दिवसांत रोप शेतात लावण्याच्या योग्यतेचे होते. सरीतील अंतर 4 ते 4.5 फूट असेल तर दोन रोपांतील अंतर 2 फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्‍टरी 12,000 ते 13,500 रोपे लागतात. सरीतील अंतर पाच फूट असेल तर 1.5 फूट अंतरावर रोप लावावे. या पद्धतीने हेक्‍टरी 14,500 रोपे लागतात. रोप लागणीअगोदर सऱ्यांना हलके पाणी देऊन वाफशावर रोपांची लागण करावी. रोप लागणीनंतर लगेच पाणी द्यावे म्हणजे रोप मरण्याचे प्रमाण कमी होते. एक रोप तयार करण्यास 1 ते 1.5 रुपये खर्च येतो.


संपर्क - एस. बी. माने पाटील - 9922321019
(लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे कार्यरत आहेत)

वसुबारस--गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस

गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस भारतीय संस्कृतीत गो-मातेला फार महत्त्व आहे. ’वसुबारस’ असे मराठीत दिवाळीच्या या पहिल्या दिवसाचे नाव. संस्कृतमध्ये यालाच म्हणता गो-वत्स द्वादशी. आश्विन कृष्ण द्वादशीचेच नाव आहे गोवत्स द्वादशी. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त सहा ते सव्वासहाच्या दरम्यान असल्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या थोडेसे आधीच साडेपाच-पावणेसहापूर्वीच सर्व गोशाळा (गोठे) स्वच्छ करून रांगोळ्या, तोरणे यांनी सजवून,पणत्या, दीपमाला यांनी प्रकाशित करून मोठ्या प्रेमाने, आदराने आणि भक्तीने गोवंश (गायवासरू) पूजन करायचे आहे. यावेळी ताम्रकलश (तांब्याचा लोटा/ताम्रपात्र, तांब्याच फुलपात्र, पंचपात्री, पेला) पाण्याने भरून घेऊन गायवासरांच्या पायावर (डाव्या हातातील पाणी उजव्या हातातून) पाणी सोडावे. यालाच म्हणतात अर्घ्य.
हे अर्घ्य देताना म्हणावयाचा मंत्र असा-
क्षीरोदार्णव-संभूते सुरसुर -नमस्कृते ।
सर्व-देव-मये मातर्‍ गृहाण अर्घ्यं नमोस्तुते॥
अर्थ - क्षीरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या सर्व देवस्वरूप अशा (कामधेनू) माते, मी देत असलेल्या या सत्काराचा स्वीकार कर. तुला आमचे अनंत प्रणाम.!
ज्या गायवासरांचे पूजन करायचे ती शक्य तर एका वर्णाची असावीत. गाय भरपूर दूध देणारी असावी. तिची गंध, कुंकूम, अक्षता वाहून, पुष्पहार घालून आणि अर्घ्य देऊन पूजा केल्यावर तिला उडीद (संस्कृत -माष) वडे (कानडी भाषेतील मेदूवडा) खायला घालावेत.या वेळी तिची-गोमातेची प्रार्थना करावी-
सर्व-देव-मये देवि । सर्व-देवैर अलंकृते ।
मातर्‍ मम अभिलषितं सफलं कुरु नन्दिनी ॥
(अर्थ - सर्वांना आनंद देणार्‍या हे नंदिनी गोमाते ! सर्वदेव तुझ्या ठायी निवास करतात म्हणून तू सर्वदेवमयी. सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे. तेव्हा हे आई, आमच्या इच्छा पूर्ण कर.)
या दिवशी आपण गायीचे दूध, दही, तूप, ताक; तसेच तेलात तळलेले वडे इ. पदार्थ वर्ज्य करावेत. याच गोवत्स द्वादशी- वसुबारसेपासून पाच दिवस (पाडव्यापर्यंत) देव, विद्वन, गुरुजन, गाई, घोडे, वडीलधारी मंडळी, मुलेबाळे (ज्येष्ठ-श्रेष्ठ-कनिष्ठ) या सर्वांचे घरातील माताभगिनींनी नीरांजनाने ओवाळून औक्षण (दीर्घायुष्यचिंतन) करावे, असे नारदवचन आहे.
वसुबारसनिमित्त अशी प्रार्थना करा
या लक्ष्मी सर्वभूतानां या च देवेषु संस्थिता ।
धेनुरूपेण सा देवी मम शान्ति प्रयच्छतु ।
चतुर्मुखस्य या लक्ष्मीर या लक्ष्मीर धनदस्यच ।
लक्ष्मीर या लोकपालानां सा धेनुर वरदास्तु मे ।
स्वधा या पितृमुख्यानां स्वाहा यज्ञभुजांच या ।
सर्व-पाप-हरा धेनुस तस्मात्‍ शान्ति प्रयच्छ मे ।
विष्णोर वक्षसि या लक्ष्मीः स्वाहा या च विभावसो ।
चन्द्रार्क-शक्र-शक्तिर या धेनु-रूपास्तु सा श्रिये ॥
(सर्व देवस्वरूप गोमाता मला शांती, वर लक्ष्मी देवो!)
दिन-दिन दिवाळी ।
गाईम्हशी ओवाळी ।
गाई म्हशी कोणाच्या ।
गाई-म्हशी लक्ष्मणाच्या ॥
याच वेळी बाळगोपाळ आनंदीत होऊन फुलबाज्या गोल गोल फिरवून गाणे म्हणत असतात.
या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. घरावर आकाशकंदिल लावतात.  स्त्रीया अंगणातील तुळशीवृंदावनापुढे पणती लावतात. सर्व घरांमध्ये लाडू, करंज्या, चकल्या, शेव, चिवडा असे पदार्थ केले जातात.
दिवाळी हा सणच मुळी दिव्यांचा आहे, म्हणून सर्वजण आपापल्या दारासमोर पणत्या लावतात. अंगणांत रांगोळया काढतात या रांगोळया विविध प्रकारच्या असतात. कोणी ठिपक्यांच्या काढून यात आकर्षक रंग भरतात. कोणी फुलांची, तर कोणी धान्याची रांगोळी काढतात. रांगोळयांमुळे अंगी असलेली कला दाखवण्यास वाव मिळतो. प्रत्येकाच्या दारावर वेगवेगळया आकारातील आकाशकंदिल लावलेले असतात. सुबक रांगोळया, टांगलेले आकाशकंदिल, तेवणार्‍या पणत्या आणि फटाक्यांची, रोषणाई यामुळे सगळे वातावरण उत्साही आणि आनंदी होते.
लहान मुले मातीचे किल्ले बांधतात. वर्षभराचे कष्ट विसरून आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.Wednesday, 23 October 2013

ती झालीय 60 लाखांची धनी..

कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानंतर परिवाराची कशी वाताहत होते, हे चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची तर दैनावस्था झालीय आणि त्यामुळं वेगळेच सामाजिक प्रश्न निर्माण होतायत. अशा परिस्थितीत मोठ्या हिकमतीनं मशाल पेटवून काळोखावर मात केलेल्या महिलाही पाहायला मिळतात. वाशीम जिल्ह्यातील वनोजा इथल्या वैशाली राऊत त्यापैकीच एक. त्यांनी फुलवलेली 25 एकरातील संत्र्याची बाग हा सर्वत्र औत्सुक्याचा विषय झालाय. ही बाग किती मिळवून देणारंय माहितेय...पुरे 60 लाख रुपये!25 एकरवर बाग
वैशालीताईंकडं ३० एकर शेती आहे. ५ वर्षांपूर्वी राऊत दाम्पत्यानं २५ एकर क्षेत्रात संत्रा पिकाची लागवड केली. मात्र, लागवडीनंतर काही महिन्यांतच वैशाली यांचे पती सुनील राऊत यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली निधन झालं. त्यानंतर हिंमत न खचता पदवीधर असलेल्या वैशालीताईंनी कुटुंबाबरोबरच शेतीकडं लक्ष केंद्रित केलं. काहीही झालं तरी पतीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करून पदर खोचून त्या कामाला लागल्या.


santraमाळरान फुललं

पतींनी मोठ्या जिद्दीनं संत्र्याची बाग फुलवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शेत पूर्णपणं कोरडवाहू होतं. त्यासाठी त्यांनी सरकारी योजनेतून शेततळ साकारलं, तसंच एक विहीरही खोदली आणि संत्र्याच्या रोपांची लागवड केली. आज सर्व बागेला ठिंबक सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं. त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यानंतर किमान पाच वर्षं ही एवढी मोठी बाग जगवण्याचं आव्हान वैशालीताईंच्या पुढे होतं. त्यासाठी त्यांनी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या सूचनेबरहुकूम त्यांनी औषध फवारणीसह बागेची निगा राखली. पाच वर्षात त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. परंतु पदरी असलेल्या दोन मुलांकडं लक्ष देत त्यांनी त्यावर यशस्वी मात केली. पती सुनील यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या मित्रमंडळींचं चांगलं सहकार्य लाभल्याचा आवर्जून उल्लेख वैशालीताई करतात.
25 महिलांना रोजगार मिळाला
ही बाग फुलत असताना पंचक्रोशीतील 25 हून अधिक आयाबायांच्या हाताला काम मिळालं. त्यांनीही वैशालीताईंना मनापासून मदत केली. काही काही बायका तर सलग 5 वर्षांपासून बागेत नियमितपणं रोजगारावर काम करीत आहेत. आज ही बाग फुललेली पाहताना त्यांचा आनंदही गगनात मावत नाही. नवऱ्याच्या माघारी खचून न जाता वैशालीताईंनी ही कामगिरी केली याचं त्यांनाही अप्रूप आहे.
स्वप्न साकार झालं
आज २५ एकरवरील ही बाग रसरशीत संत्र्याच्या फळांनी बहरलीय. त्याकडं पाहताना पतीसोबत पाहिलेलं स्वप्न साकार झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. हाताशी आलेल्या दोन्ही मुलांना आईच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो. आता ही बाग त्यांना गेल्या पाच वर्षांपासूनच्या कष्टाची परतफेड करणार आहे. आजमितीला बागेतून 65 लाखांचं उत्पन्न अपेक्षित असून 45 लाखांवर निव्वळ नफा होणार आहे. आज कुटुंबीयच नव्हे तर अवघा समाज त्यांच्याकडं मोठ्या कौतुकानं पाहतो.
संपर्क : वैशाली राऊत - 9604650065

वर्ध्यात बहरला जिद्दीचा मळा

ही आहे, वर्धा जिल्ह्यातील हळदगावच्या एका जिद्दी महिलेची कथा. पतीच्या पश्र्चात तिनं पदर खोचून शेती केली आणि मातीतून मोती पिकवलं.


शेतीचा गंधही नसलेल्या लता यांनी त्यांचे पती रमेश पाटील यांच्या अपघाती निधनानंतर शेतात जाण्यास सुरुवात केली. शेतीची काहीच माहिती नसल्यानं त्यांनी प्रथम शेतीबाबतच्या सर्व गोष्टींची माहिती करून घेतली. आपली दोन मुलं आणि घर सांभाळून लता यांनी इतर पिकांसोबतच फळशेतीचीही परिपूर्ण माहिती घेतली आणि या फळबागांची लागवड आपल्या शेतात करण्यास सुरुवात केली. आज लता यांना या फळांच्या शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतंय, तसंच त्यांची ही शेती गावात चर्चेचा विषय ठरलीय.

वर्षाला २० ते २२ लाखांचं उत्पन्न

केवळ शेतीपुरतंच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं नाही तर घर सांभाळून शेतमजुरांवर लक्ष ठेवणं, उत्पादित केलेला माल बाजारात पोहोचवणं यांसारखी बाहेरची कामंसुध्दा लता स्वतःच करतात. या सगळ्या शेतीतून लता यांना सर्व खर्च जाऊन वर्षाला २० ते २२ लाखांचं उत्पन्न मिळतं, एवढंच नाही तर ज्या पध्दतीनं लता फळांची लागवड करतात त्यापद्धतीनं संपूर्ण वर्धा जिल्ह्यात अशी शेती कोणीच करत नाहीये. त्यामुळं त्यांची ही शेती एक आदर्श शेती म्हणून पाहिली जातेय.
                                                                                                           Mahila Shetkari Wardha bharat4india.com
विविध जातींची सीताफळं
आपल्या ३५ एकर शेतामध्ये लता यांनी २ एकरमध्ये सीताफळ, ४ एकरमध्ये चिकू, ४ एकरमध्ये लिंबू, तर उर्वरित जागेवर आवळा, संत्री आणि मोसंबी लावली आहे. त्यांचा मुलगा पंकज नागपूरमध्ये शिक्षण घेतोय, शिवाय आईला शेतीतही मदत करतो. लतांच्या या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पपई आणि सीताफळाची नर्सरी पंकजनं तयार केलीय.
यामध्ये वेगवेगळ्या जातींची सीताफळं असून सीताफळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेतलं जातं. त्याचप्रमाणे पपईच्या रोपांची लागवडसुद्धा या नर्सरीत केली जाते. त्यांनी तयार केलेल्या रोपांना बाजारात विशेष मागणी आहे. त्याचप्रमाणं लिंबू, आवळा या पिकांमुळंही त्यांना बऱ्यापैकी पैसा मिळतोय.
सेंद्रीय खतांचा वापर
लता या शेतीत कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. त्याउलट त्या शेण, गोमूत्र, गूळ यांपासून नैसर्गिक खत तयार करतात. त्यामुळं येणारं फळ उत्पादन अत्यंत उत्तम प्रकारचं असतं. शिवाय या खतामुळं फळझाडांची वाढही चांगली होते. पती रमेश पाटील यांनी लावलेल्या या फळबागेला आज सहा वर्षांनंतरही लता यांनी फक्त जगवलंच नाही, तर या बागेला एका आदर्श बागेचं स्वरूप दिलंय. त्यांचे हे प्रयत्न जिल्ह्यातील तसंच राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी एक आदर्श उदाहरण बनलंय.
संपर्क :  लता पाटील - 9822363402

Monday, 21 October 2013

रब्बी कांद्याच्या शिफारशीत जाती निवडा....

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात बी पेरून कांदा रोपांची लागवड डिसेंबर - जानेवारी महिन्यात केली जाते. कांदा पोसण्याचा बराचसा कालावधी उन्हाळ्यात येत असल्यामुळे या लागवडीस उन्हाळ कांदादेखील म्हणतात. नोव्हेंबर महिन्यात शेवटी लागवड केली तर कांदे एप्रिलमध्ये काढणीस येतात. पातीची आणि कांद्याची सुकवण चांगली होते. सुकवलेला कांदा साठवणीत चांगला टिकतो.
1) रब्बी कांद्याची लागवड जसजशी उशिरा होत जाते तसतशी उत्पादनात घट होते. कांदे आकाराने लहान होतात. काढणी उशिरा म्हणजे मे किंवा जून महिन्यात होते. कांदा काढणीस तयार झाला आणि वळवाचा पाऊस झाला तर काढलेला कांदा नासतो. सुकवण नीट होत नाही. असा कांदा साठवणीत सडतो. एप्रिल ते जूनपर्यंत रब्बी कांद्याची काढणी होत असते.
2) रब्बी कांद्याखाली क्षेत्र जास्त असल्यामुळे आणि उत्पादनही जास्त असल्यामुळे मे ते ऑगस्ट या महिन्यांत भाव कमी असतात. अशा परिस्थितीत कांदा साठवला तरच भाव चांगले मिळतात आणि साठवण व्हायची असेल तर लागवड नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी करणे फायद्याची ठरते.

जमिनीची निवड ः
1) कांद्याची मुळे 25 सें.मी. खोलीपर्यंत वाढतात. मुळाभोवती प्रमाणित ओलावा आणि हवा असेल तर मुळांची वाढ चांगली होते. म्हणून कांद्यासाठी उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम भारी जमीन लागते. हलक्‍या मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असेल तर उत्पादन चांगले येते.
2) उत्तम वाढीसाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.0 या दरम्यान असावा. तथापि कांदा पीक तुलनेने अधिक सामू असणाऱ्या जमिनीत येऊ शकते. चोपण, क्षारयुक्त जमिनीत कांदा चांगला पोसत नाही. अशा जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगांचे प्रमाण वाढते.

जातींची निवड महत्वाची ः
1) कांदा आकाराने गोल असावा. बुडख्याचा किंवा मुळाचा भाग आत दबलेला नसावा. आकार मध्यम (जाडी 4.5 ते 5 सें.मी.) असावा. लाल, गुलाबी, विटकरी, पांढरा इत्यादी रंगांची चकाकी साठवणीत टिकून राहावी.
2) कांद्याची मान बारीक असावी. आतील मांसल पापुद्रे गोलाकार आणि एकमेकांना घट्ट चिकटलेले असावेत. कांदा चवीला तिखट आणि मध्यम तिखट असावा; परंतु त्याला उग्र वास नसावा.
3) कांदा आडवा कापला असता त्यात एकच डोळा असावा. अशा जातींची उत्पादन क्षमता कमीत कमी प्रतिहेक्‍टरी 30 ते 35 टन असावी.
4) काढणीसाठी सर्व कांदे एकाच वेळेस तयार व्हावेत आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी, तसेच कांदा साठवणीत चांगला टिकून राहावा. त्याला कोंब येता कामा नये आणि वजनातील घट झपाट्याने होता कामा नये.
5) पावडर किंवा काप करून सुकवण्यासाठी कांद्यामध्ये विद्राव्य घनपदार्थ 20 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असावेत. त्यात तिखटपणा चांगला असावा आणि जात शक्‍यतो पांढऱ्या रंगाची असावी. कारण अशा जातीची पावडर किंवा वाळलेले काप चांगल्या दर्जाचे आणि रंगाचे तयार होतात.

रब्बी हंगामासाठी जाती ः
कांदे गोलाकार आणि मध्यम ते मोठे असतात. रंग विटकरी असून, चव तिखट असते. या जातीची साठवणक्षमता अत्यंत चांगली आहे. साठवणीत कांद्यावर एक प्रकारची चकाकी येते. 5 ते 6 महिन्यांपर्यंत कांदे चांगले टिकतात. विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण 13 ते 14 टक्‍क्‍यांपर्यंत असते. लागवडीनंतर कांदे 120 दिवसांनी काढणीला येतात. हेक्‍टरी 30 ते 35 टन उत्पादन येते. ही जात जांभळा करपा या रोगाला व फुलकिड्यांना सहनशील आहे.

भीमा किरण ः
कांद्यास काढणीनंतर कमी वेळातच भुरकट, लाल रंग येतो, कांदे आकाराने मध्यम, गोल असून, डेंगळ्यांचे प्रमाण कमी असते, तसेच रब्बी हंगामात कांद्याचे प्रमाण कमी असते. कांदे बारीक मानेचे असून, त्यातील एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण 12 टक्के असते. कांद्याची साठवणक्षमता चांगली असल्याने पाच-सहा महिन्यांपर्यंत साठवले जाऊ शकतात. कांदा लागवडीनंतर 130 दिवसांत काढणीस येतो. रब्बी हंगामात विक्रीयोग्य कांद्याचे उत्पादन 41.5 टन प्रतिहेक्‍टरी येते.

भीमा शक्ती ः

ही जात रांगडा व रब्बी या दोन्ही हंगामासाठी फायदेशीर आहे. कांद्यास काढणीनंतर आकर्षक लाल रंग येतो. कांदा आकाराने गोल असून, डेंगळे व जोड आणि कांद्याचे सरासरी प्रमाण दोन्ही हंगामात अत्यल्प म्हणजे चार टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते. कांद्यात एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण सरासरी 11.8 टक्के असते. कांद्याची मान बारीक ते मध्यम जाडीची असून, रब्बी हंगामात एकाच वेळेस माना पडतात. रांगडा हंगामात सरासरी 70 टक्के कांद्याच्या माना एकाच वेळेस पडतात. कांदा लागवडीनंतर 130 दिवसांत काढणीस येतो, तसेच त्याची साठवण क्षमतादेखील चांगली आहे. ही जात फूलकिड्यांसाठी सहनशील आहे.

अरका निकेतन ः
कांदे गोलाकार व बारीक मानेचे आणि आकर्षक गुलाबी रंगाचे असतात. चव तिखट असून, साठवणीसाठी चांगला, सर्वसाधारण तापमानात कांदे 5 ते 7 महिने उत्तम टिकतात. लागवडीनंतर 110 ते 120 दिवसांत कांद्याची काढणी होते. हेक्‍टरी उत्पादन 30-40 टन येते. रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात लागवड करता येते.

ऍग्रिफाऊड लाईट रेड ः
कांदे गोल, मध्यम ते मोठे असतात. चव तिखट व विद्राव्य घनपदार्थ 13 टक्के असते. लागवडीपासून 120 ते 125 दिवसांत कांदा तयार होतो. हेक्‍टरी 30 ते 35 टन उत्पादन मिळते. कांद्यात डेंगळ्याचे प्रमाण कमी असते. साठवणीसाठी ही जात चांगली आहे.

प्रक्रिया उद्योगासाठी जाती ः
कांद्याचे वाळलेले काप किंवा पावडर यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लहान आकाराचे गोल कांदे (20 ते 25 मि.मी. व्यासाचे) व्हिनेगर किंवा मिठाच्या पाण्यात प्रक्रिया करून निर्यात करण्यास मोठा वाव आहे. या उद्योगाकरिता पांढऱ्या रंगाच्या जातीची आवश्‍यकता आहे.
1) आकार गोलाकार असावा, रंग चमकदार पांढरा असावा, कांद्यामध्ये विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांपर्यंत असावे, तसेच काळी बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव कमी असावा. कांदा काढणीनंतर कमीत कमी 2-3 महिने साठवण चांगली व्हावी, कांद्यांना हिरवा रंग येऊ नये, तसेच कोंब लवकर येता कामा नयेत.
2) देशात उपलब्ध असणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या जातींमध्ये विद्राव्य घनपदार्थ 13 ते 14 टक्‍क्‍यांपर्यंत असल्यामुळे तितक्‍या पूरक ठरत नाहीत. परदेशातील जातींमध्ये विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांपर्यंत असते; परंतु या जातींना 13 ते 14 तास सूर्यप्रकाश व थंड हवामान लागते त्यामुळे आपल्या राज्यात त्यांच्या कांद्याची वाढ नीट होत नाही. कांदे लांबुळके तयार होतात. कांदा भोवऱ्यासारखा गोल नसेल तर मशिनमध्ये त्याचे काप करताना बराचसा भाग वाया जातो व नुकसान वाढते.

फुले सफेद ः
रांगडा आणि रब्बी हंगामासाठी या जातीची शिफारस आहे. कांदे मध्यम व गोल असतात. रंग पांढरा व चमकदार असतो. विद्राव्य घनपदार्थाचे प्रमाण 13 ते 14 टक्‍क्‍यांपर्यंत असते. साठवणक्षमता साधारणपणे 2-3 महिने असते. प्रतिहेक्‍टरी 20 ते 25 टन उत्पादन येते. जानेवारीत रोपांची लागवड 10 बाय 10 सें.मी. अंतरावर केली, तर व्हिनेगर किंवा मिठाच्या प्रक्रियेसाठी लागणारे लहान आकाराचे गोल कांदे मिळू शकतात.
याशिवाय उदयपूर 102, भावनगर लोकल, निमार लोकल इत्यादी स्थानिक वाण पांढऱ्या कांद्याच्या लागवडीसाठी वापरले जातात.

रब्बी हंगामासाठी या जातीची शिफारस आहे. या आयात वाणाची विद्राव्य घनपदार्थांची मात्रा 18 टक्‍क्‍यांच्या दरम्यान असते. कांदे शुभ्र पांढरे व गोल असतात, पानांचा रंग गर्द हिरवा असतो. हेक्‍टरी 35 ते 40 टन उत्पादन येते.

भीमा श्‍वेता ः
कांदे आकर्षक, पांढऱ्या सफेद रंगाचे असून, आकाराने गोल असतात. रब्बी हंगामात डेंगळ्यांचे प्रमाण खूपच कमी असते. कांदे बारीक मानेचे असून, त्यात एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण सरासरी 11.5 टक्के असते. कांदे लागवडीनंतर 120 दिवसांत काढणीस योग्य होतात. साठवणक्षमता मध्यम असून, रब्बी हंगामात तीन महिन्यांपर्यंत साठवले जाऊ शकतात. ही जात फुलकिड्यांसाठी सहनशील आहे. रब्बी हंगामात विक्रीयोग्य कांद्याचे उत्पादन 35 टन प्रतिहेक्‍टर येते.

संपर्क ः डॉ.महाजन ः 9421005607 ( लेखक कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे येथे कार्यरत आहेत)

दर्जेदार कांदा रोपांसाठी सुधारित रोपवाटिका

एक हेक्‍टर कांदा लागवडीसाठी 10 ते 12 गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते. लव्हाळा किंवा हरळी यांसारखे गवत असणारी, तसेच पाणी साचणारी सखल भागाची जमीन रोपवाटिकेसाठी टाळावी. रोपवाटिका नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी करावी. शेणखतामधून रोपवाटिकेत तण होण्याची शक्‍यता असल्यास वाफे बी पेरण्यापूर्वी भिजवून घ्यावेत. तणाचे बी उगवून आल्यानंतर खुरपणी करून त्यानंतर कांद्याचे बी पेरावे.

1) रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. वाफे एक मीटर रुंद व तीन ते चार मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची 15 सें.मी. ठेवावी.
गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजत नाहीत. लागवडीच्या वेळी रोपे सहज काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
2) वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत आणि 50 ग्रॅम मिश्र खत मिसळावे. गादीवाफा सपाट करावा. रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात. त्यात बी पातळ पेरून मातीने झाकून टाकावे, नंतर झारीने पाणी द्यावे, पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे.
3) बियांची उगवणक्षमता चांगली असेल तर एक हेक्‍टर लागवडीसाठी सात किलो बी पुरेसे होते. साधारणपणे प्रत्येक चौरस मीटरवर 10 ग्रॅम बी पेरावे, म्हणजे एका वाफ्यावर 30 ग्रॅम बी पेरावे. बी उगवताना व उगवल्यानंतरही त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगनियंत्रणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी.
4) गादीवाफ्यावर बी ओळीत पेरावे, त्यामुळे दोन ओळींतील अंतर समान राखता येते. बी पातळ पेरल्याने दोन रोपांतील अंतर योग्य राखण्यास मदत होते. एकसारखी जागा आणि वाव मिळाल्यामुळे रोपे एकसारखी वाढतात. पुनर्लागवडीच्या वेळी रोपे वाफ्यामधून सहज उपटून काढता येतात.
5) बी पेरल्यानंतर शक्‍यतो पहिले पाणी झारीने द्यावे म्हणजे बी जागच्या जागी राहते, वाहून जात नाही. परंतु वाफ्याचे एकूणच प्रमाण जास्त असल्याने झारीने पाणी देणे जिकिरीचे होते, तेव्हा पाटानेच पाणी देणे सोयीचे ठरते. पाणी देताना त्याचा प्रवाह कमी ठेवावा. तसेच वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवावी, म्हणजे पाण्याचा जोर कमी होईल आणि बी पाण्याबरोबर वाफ्याच्या कडेला वाहून जाणार नाही.
6) बरेच शेतकरी गादी वाफे करण्याचा कंटाळा करतात. जमिनीच्या उताराचा विशेष अंदाज न घेता लांबच्या लांब सपाट वाफे करून त्यात बी फेकून पेरतात आणि पाणी देतात. अशा पद्धतीने बी पाण्याबरोबर वाहत जाऊन वाफ्याच्या कडेला जमा होते. त्यामुळे रोपांची दाटी होऊन रोपे कमकुवत राहतात. गादी वाफा करता न आल्यास नेहमीप्रमाणेच सपाट वाफे करावेत. वाफ्याची रुंदी एक मीटर आणि लांबी चार मीटर ठेवावी. त्यात वरीलप्रमाणे शेणखत आणि रासायनिक खत मिसळून बी फोकून न देता सपाट वाफ्यातच रुंदीशी समांतर खुरप्याने रेघा पाडून त्यात पेरून पाणी द्यावे.
7) पहिल्या पाण्यानंतर रोप उगवत असताना किंवा त्याची तोंडे दिसत असताना लगेच हलके पाणी द्यावे, कारण त्यामुळे त्याची उगवण सुलभ होते. त्यानंतर पाणी बेताने आणि सात ते आठ दिवसांच्या अंतराने द्यावे, गवत असल्यास खुरपणी करावी. तसेच रोपांच्या ओळीमध्ये माती हलवून घ्यावी म्हणजे रोपांच्या मुळांभोवती हवा खेळती राहील.
13) पुनर्लागणीच्या अगोदर पाणी कमी करावे म्हणजे दोन पाळ्यांमधील अंतर वाढवावे, त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर पाणी द्यावे. त्यामुळे रोप काढणे सोपे होते.
14) रोप तयार होत असताना त्यावर फुलकिडी प्रादुर्भाव होतो. तसेच शेंडा जळणे या रोगाचा प्रादुर्भाव काही वेळा दिसतो. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करावी.
15) रोपे तयार होण्यास 50 ते 55 दिवस लागतात. योग्य वाढीची रोपे लागवडीसाठी आवश्‍यक असतात, कारण कोवळी रोपे लावली तर त्यांची मर होते. शिवाय कांदा उशिरा तयार होतो आणि बऱ्याच वेळा त्याची चिंगळी कांदा म्हणूनही काढणी करावी लागते. फार जुनी रोपे लावली तर कांदा काढणीला लवकर तयार होतो, परंतु त्याची वाढ मर्यादित राहते. कांदे पोस्त नाहीत. आकाराने लहान राहतात आणि उत्पादनात घट येते.

रोपवाटिकेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा प्रयोग - 1) ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने एक मीटर रुंद, 60 मीटर लांब आणि 15 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. त्यावर ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल 60 सें.मी. अंतरावर ओढून घ्याव्यात.
2) तुषार सिंचनाचा वापर करायचा असल्यास दोन नोझलमध्ये 3 x 3 मीटरचे अंतर ठेवावे.
3) वाफ्यावर रुंदीशी समांतर 10 सें.मी. अंतरावर रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे. प्रत्येक चौरस मीटरला ठिबक व तुषार सिंचनासाठी 8.5 ग्रॅम बी लागते. तर नेहमीच्या पद्धतीत 12 ग्रॅम बी पेरावे लागते.
4) ठिबक सिंचन पद्धतीने लागवडीलायक रोपांची संख्या 1080 तर तुषार सिंचन पद्धतीने लागवडीलायक रोपांची संख्या 1172 मिळाली. नेहमीच्या पद्धतीमध्ये लागवडीलायक रोपांची संख्या 1059 मिळाली.
5) ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपे तयार केली, तर एकरी दोन किलो बी पुरेसे होते. तर नेहमीच्या पद्धतीमध्ये 3.5 किलो बी लागते. म्हणजे एकरी 1.5 किलो बियाण्याची बचत होते. याशिवाय पाण्यातदेखील 30 ते 40 टक्के बचत होते. तसेच पाणी देण्याच्या मजुरीमध्ये प्रति एकरी 550 रुपयांची बचत होते.

...अशी करा कांद्याची पुनर्लागवड 1) जमिनीची योग्य मशागत करून हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरून कुळवणीद्वारे जमिनीत चांगले मिसळावे.
2) मध्यम भारी आणि भुसभुशीत किंवा नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत सपाट वाफे पद्धतीने कांद्याची लागवड करावी. कारण अशा वाफ्यातून सरी- वरंबा पद्धतीपेक्षा 30 टक्के रोपे जास्त लागतात आणि मध्यम व सारख्या आकाराचे कांदे मिळू शकतात. वाफ्याची लांबी-रुंदी जमिनीच्या उतारावर अवलंबून असते. 1.5 ते 2 मीटर रुंद आणि चार ते सहा मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करावेत. वाफ्याची लांबी जमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने असावी. जमीन जास्त चढ-उताराची असल्यास 1.5 x 3 मीटर आकाराचे लहान वाफे तयार करावेत.
3) भारी जमिनीत सरी-वरंबा पद्धतीने कांदा लागवड करावी. म्हणजे जास्त झालेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. या पद्धतीत सऱ्या उताराच्या आडव्या दिशेने 30 ते 45 सें.मी. अंतरावर काढाव्यात, नंतर जमिनीच्या उताराप्रमाणे चार ते सहा मीटर अंतरावर सऱ्यांना आडवे पाट टाकून 2 x 4 मीटर किंवा 2 x 6 मीटर आकाराचे लहान वाफे तयार करावेत.
4) पाणी देण्याच्या दृष्टीने पाटाचे आणि वाफ्याचे दंड/ वरंबे थोडे जाड आणि उंच करावेत. या पद्धतीत वरंब्याच्या दोन्ही बाजूने कांदा लागवड करतात. सरी-वरंबा पद्धतीत कांद्याची संख्या सपाट वाफा पद्धतीपेक्षा कमी असते. तसेच कांद्याची वाढ एकसारखी होत नाही, त्यामुळे उत्पादनात घट येते.

ठिबक, तुषार सिंचनावर कांदा लागवड - 1) ठिबक व तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी रान बांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते. लागवडीसाठी 120 सें.मी. रुंद, 40 ते 60 मीटर लांब व 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे ट्रॅक्‍टरचलित सरी यंत्राने तयार करावेत.
2) सरी यंत्राच्या फाळाची दोन टोके 165 सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्‍टर चालवला तर 120 सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो. वाफ्याच्या दोन्ही कडेला 45 सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, पिकांचे निरीक्षणासाठी होतो.

संपर्क - डॉ. विजय महाजन - 9421005607
(लेखक कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)

ज्वारी लागवडीसाठी कोणते यंत्र वापरावे?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीसाठी सुधारित पेरणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे एकाच वेळी आठ ते 10 सें.मी. खोलीवर बियाणे आणि 15 सें.मी. खोलीवर (बियाण्याच्या खाली साधारणपणे पाच सें.मी.) रासायनिक खते जमिनीमध्ये पेरता येतात.

यांत्रिक पेरणी यंत्राचा वापर करून पेरणी केल्यामुळे जमिनीचा वरचा थर (पाच सें.मी.) जरी कोरडा असला, तरी बियाणे खोलवर, ओलसर भागात पेरल्यामुळे उगवण होऊन उत्पादनाची शाश्‍वती मिळते.

-रासायनिक खते खोलवर ओलाव्यात, पिकाच्या मुळांजवळ दिल्यामुळे या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होते.
-या पद्धतीने पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी रासणी करू नये.
-पेरणी यंत्राने जेव्हा ज्वारी पेरणी केली जाते, तेव्हा पेरणी यंत्रामागे जमिनीवर छोट्या उथळ सऱ्या तयार होतात. ऑक्‍टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी या छोट्या छोट्या सऱ्यांमध्ये जमा होते. या पाण्याचा पिकाच्या वाढीस फायदा होतो. यासाठी खोलवर पेरणी नंतर रासणी करू नये.

यंत्राने पेरणी करताना -सुधारित पेरणी यंत्राद्वारे पेरणी करण्यापूर्वी व अधून मधून बियाणे योग्य खोलीवर (जमिनीच्या ओलसर भागात) आणि योग्य अंतरावर पडते आहे याची खात्री करून घ्यावी.
-पेरतेवेळी बियाणे व रासायनिक खते वेगवेगळ्या खोलीवर पडत असल्याची खात्री करून घ्यावी.
-यंत्राने पेरणी करताना बियाणे व खते यामध्ये पातळ मातीचा थर असावा.
-जिरायती पद्धतीने रब्बी पिकांची पेरणी करताना खताची संपूर्ण मात्रा पेरतेवेळी द्यावी.
-बागायती पिकांसाठी नत्रयुक्त खतांची मात्रा विभागून दोन वेळेस म्हणजेच पेरणीच्यावेळी निम्मे नत्र आणि उरलेले निम्मे नत्र पेरणी नंतर 30 दिवसांनी द्यावे. संपूर्ण - स्फुरदाची मात्रा पेरते वेळी द्यावी.
राज्यातील जमिनीमध्ये पालाश भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे पालाश वेगळ्या खतांमधून देण्याची गरज भासत नाही.
माती परीक्षणानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर करावा.

 प्रा. पंडित मुंढे - 7588082072
प्रा. मदन पेंडके : 9890433803
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

रब्बी ज्वारी उत्पादनवाढीची पंचसूत्री

1) जमिनीची निवड, मशागत आणि ओलावा साठवण - मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी व पाणी साठवून ठेवणारी जमीन निवडावी. मूग/उडीद पीक काढल्यानंतर वखराच्या साह्याने उतारास आडवी मशागत करावी.
अ) सरी काढून त्यात पेरणी करणे
मध्यम ते भारी जमिनीवर (60 ते 90 सें.मी. खोल) कोरडवाहू रब्बी ज्वारीचे अधिक धान्य आणि कडबा उत्पादन तसेच जास्तीचा आर्थिक नफा मिळविण्यासाठी बळिराम नांगराने दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. किंवा 60 सें.मी. किंवा सुधारित वखराने 45 सें.मी. अंतर ठेवून पेरणीपूर्वी 15 दिवस अगोदर सऱ्या काढाव्यात आणि त्यात तिफणीच्या साह्याने पेरणी करावी. सरीमध्ये पेरणी केल्यानंतर रासणी करू नये.
ब) बियाणे आणि रासायनिक खताची खोल पेरणी ः
रासायनिक खताची अधिक खोलवर म्हणजेच जवळ जवळ 15 सें.मी. खोलीवर पेरणी केल्यास जमिनीतील खोलवर असलेल्या ओलाव्याचा फायदा मिळून त्याची उपलब्धता पिकास जास्तीत जास्त प्रमाणात आणि शेवटपर्यंत होत राहते, तसेच बियाण्यांची पेरणी 10 ते 12 सें.मी. खोलीवर केल्यास मुळाची संपूर्ण वाढ ओल असलेल्या थरामध्येच होते. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते, तसेच पीक परिपक्व होईपर्यंत हिरवेगार राहत असल्यामुळे आपणास 20 ते 30 टक्के अधिक उत्पादन आणि चांगल्या प्रतीचा कडबा मिळतो.

2) पेरणीचा कालावधी व बीजप्रक्रिया - खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व भरपूर उत्पादन मिळण्यासाठी ऑक्‍टोबरचा पहिला पंधरवडा हा कालावधी सर्वांत चांगला आढळून आला आहे. कारण लवकर पेरणी केली तर खोडमाशीमुळे मोठ्या प्रमाणावर पोंगेमर होते, तर उशिरा पेरणी केल्यावर जमिनीचा ओलावा कमी झाल्यामुळे बियाण्याची उगवण कमी होऊन ताटांची संख्या राखता येत नाही आणि उत्पादनात घट होते.
पेरणीपूर्वी बियाण्यास 300 मेश पोताच्या गंधकाची चार ग्रॅम किंवा थायरमची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तीन ग्रॅम थायामिथॉक्‍झाम (70 टक्के) प्रतिकिलो बीजप्रक्रिया केल्यास खोडमाशीमुळे होणारी पोंगेमर कमी होऊन झाडाचा जोम वाढण्यास मदत होते.

3) ताटांची योग्य संख्या, रुंद पेरणी आणि तणनियंत्रण - जमिनीतील उपलब्ध ओलाव्यानुसार 1.25 ते 1.35 लाख/ प्रतिहेक्‍टरी एवढी ताटांची संख्या असावी. हलक्‍या ते मध्यम जमिनीवर दाट पेरणी केल्यास कणसे बाहेर न पडणे किंवा कणसात दाणे न भरणे यामुळे उत्पादन कमी येते. जिरायती रब्बी ज्वारी जमिनीत असलेल्या ओलाव्यावरच वाढते. या ओलाव्याला कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. (18 इंच) आणि हेक्‍टरी 10 किलो प्रमाणित बियाणे वापरून पेरणी करावी. सर्वसाधारणतः शेतकरी रब्बी ज्वारीची पेरणी कमी अंतरावर आणि दाट करतात त्यामुळे उत्पादन येते.

4) रासायनिक खतांचा वापर - 1) पेरणी करताना हेक्‍टरी 40 किलो नत्र + 20 किलो स्फुरद (100 किलो 20ः20ः00 मिश्र खत व 40 किलो युरियाच्या माध्यमातून) खोल पेरून दिल्यास उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ होते.
2) खत आणि बियाणे खोल (12 सें.मी.) पर्यंत पेरून दिल्यास त्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वाढ होते.
3) ओलिताची सोय असल्यास 80 किलो नत्र ः40 किलो स्फुरद ः40 किलो पालाश किलो प्रतिहेक्‍टरी (150 किलो 10ः26ः26 आणि 50 किलो युरियाच्या माध्यमातून पेरणीच्या वेळी तर 85 किलो युरिया पेरणीनंतर 30 दिवसांनी) एवढी खताची मात्रा द्यावी.
4) पेरणीपूर्वी 750 किलो शेणखत आणि 20 किलो नत्र/ हेक्‍टरी दिल्याससुद्धा चांगला फायदा होतो.

5) आंतरमशागतीद्वारे ओलावा साठवणूक 1) पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर, तर दुसरी व तिसरी कोळपणी पीक क्रमशः पाच व आठ आठवड्यांचे झाल्यानंतर करावी.
2) जिरायती रब्बी ज्वारीमध्ये 40 ते 50 दिवसांचे होईपर्यंत किमान तीन कोळपण्या कराव्यात. यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व ओलावा साठवण्यास मदत होते, तसेच कणसे बाहेर पडण्याच्या व दाणे भरण्याच्या वेळेस पिकाला ओलावा उपलब्ध होतो.
3) दोन ओळींच्या मध्ये मूग/ उडीद/ सोयाबीन या पिकाचे काड आच्छादन म्हणून वापरल्यास जमिनीतील ओलावा टिकतो.

रब्बी ज्वारीचे सुधारित वाण -परभणी मोती (एसपीव्ही-1411) -
- उंच वाढणारा वाण, जिरायतीसाठी शिफारस, टपोरा मोत्यासारखा चमकणारा दाणा.
- दाणे, भाकरी व कडब्याची प्रत प्रचलित वाणापेक्षा सरस.
- 125 ते 128 दिवसांत तयार होणारे वाण.
- मध्यम गच्च आकार व वरच्या भागात मोकळ्या आकाराचे कणीस, दाणा मोत्यासारखा चमकदार मोठा.
- 18-20 क्विं./हे. धान्याचे, तर 70-75 क्विं./हे. वाळलेल्या कडब्याचे उत्पादन.

परभणी ज्योती/एसपीव्ही 1595 (सीएसव्ही 18) - - मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस.
- उंच वाढणारे पण जमिनीवर लोळण्यास प्रतिकारक्षम.
- भाकरी आणि कडब्याची प्रत इतर प्रचलित वाणाच्या तुलनेने सरस.
- मावा किडीस प्रतिकारक्षम.
- भरपूर कडबा आणि दाण्याचे उत्पादन.
- ओलिताखाली पाण्याच्या दोन ते तीन पाळ्यांवर जिरायतीपेक्षा दोन ते तीन पटींनी अधिक दाण्याचे उत्पादन.
- ओलिताखाली 35-37 क्विं./हे. धान्याचे, तर 85-90 क्विं./हे. वाळलेल्या कडब्याचे उत्पादन.

फुले वसुधा - - मध्यम ते भारी जमिनीवर लागवडीसाठी शिफारस.
- 116-120 दिवसांत तयार होणारा वाण.
- मध्यम ते भारी जमिनीवर जिरायती तसेच ओलितासाठी योग्य वाण.
- भाकरी व कडबा प्रत मालदांडीसारखी.
- खोडमाशी, खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
- 20-22 क्विं./हे. धान्याचे, तर 55-60 क्विं./हे. कडबा उत्पादन.

अकोला क्रांती/एसपीव्ही 1549 - मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस.
- मध्यम गच्च आकाराचे कणीस, पांढरा टपोरा दाणा.
- पाणी आणि खताच्या मात्रेस प्रतिसाद देणारे वाण.
- खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
- 120 ते 122 दिवसांत तयार होणारे वाण.
- 18-20 क्विं./हे. धान्याचे, तर 75-80 क्विं./हे. वाळलेल्या कडब्याचे उत्पादन.

फुले चित्रा - - अवर्षणप्रवण भागात लागवडीसाठी शिफारस.
- मध्यम जमिनीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रासाठी लागवड शिफारस, तर मराठवाड्यात मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस.
- 118 ते 122 दिवसांत तयार होणारे वाण.
- दाण्याचा रंग पांढराशुभ्र व चमकदार.
- पाण्याचा ताण, खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
- मालदांडी व फुले माऊलीपेक्षा अधिक उत्पादकता.
- 18-20 क्विं./हे. धान्याचे, तर 55-60 क्विं./हे. कडब्याचे उत्पादन.

एसजीएस 8-4 (हुरड्यासाठी) - - दुधाळ अवस्थेत दाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा गोडवा (साखरेचे प्रमाण अधिक).
- दुधाळ अवस्थेत दाणे कणसापासून सहजरीत्या वेगळे काढता येतात. (गोंडर सोबत येत नाहीत.)
- खोडमाशीस मोठ्या प्रमाणावर प्रतिकारक्षम.
- सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विशिष्ट अंतराने पेरणी केल्यास पूर्ण हंगामात हुरड्यापासून शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

संपर्क -
(लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)

नामदेवरावांसाठी ठरतेय लसूण नगदी पीक -


अकोला जिल्ह्यात देऊळगाव हे दोन हजार लोकसंख्येचं छोटंसं गाव. शेती हाच गावचा प्रमुख व्यवसाय. गावात 25 टक्‍के शेती हंगामी ओलिताखाली, पिकेही पारंपरिक; परंतु खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याने तोट्याचे गणित शेतकऱ्यांना परवडणारे नव्हते. साहजिकच ते नैराश्‍याच्या गर्तेत होते. दरम्यान, गावातील नामदेवराव अढाऊ हे नव्या पिकांच्या शोधात भटकंती करत होते. राज्यभरातील विविध प्रयोगांची पाहणी करून आपल्या गावातही हा प्रयोग करू, याच प्रयत्नातून त्यांनी कांदा व लसूण शेतीचा प्रयोग केला. तुटपुंज्या पाण्यावर केलेल्या प्रयोगाला यश आले अन्‌ क्षेत्र वाढू लागले.

अढाऊ यांची वडिलोपार्जित एक हेक्‍टर जिरायती शेती होती. वडील दुसऱ्यांच्या शेतावर काम करून आपली शेती सांभाळायचे. दिवस-रात्र एक करून संपूर्ण परिवाराचा गाडा वडिलांना ओढावा लागे. वडिलांच्या कष्टाला नामदेवरावांनी हातभार लावला व ते शेतीत रमले. सन 1972 पर्यंत जिरायती शेती कसली. खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळत नव्हते. शेतीत प्रगती करायची तर पाण्याची व्यवस्था करणे आवश्‍यक असल्याने नजीकच्या ओढ्याचे पाणी वळविले अन्‌ शेती ओलिताखाली आणली. मिरचीपासून सुरवात केली, पैसा मिळू लागला. याच पैशांवर करार पद्धतीने शेती करू लागले. या शेतीने चांगली साथ दिली. मिळत असलेल्या उत्पन्नातून 2002 मध्ये बारा एकर शेती विकत घेतली. आज हे क्षेत्र पंधरा एकर झाले आहे.

त्यांचे कांद्याचे सरासरी क्षेत्र अडीच एकर तर लसणाचे क्षेत्र एक एकर असते. लसूण पिकाचा त्यांचा तीन वर्षांचा अनुभव आहे. कांदा पिकात त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. गादीवाफा लागवड पद्धत ते वापरतात.

कांद्याच्या यशानंतर लसूण शेतीकडे बारा एकर शेती विकत घेतल्यानंतर पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने लसूण प्रयोगाला सुरवात केली. प्रथम शेतीची बांधबंदिस्ती, नाल्यावर दगडीबांध, विहीर पुनर्भरण व जलसंधारणाच्या प्रयोगामुळे पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली. शेतीनजीक वाहत जाणाऱ्या ओढ्याला अडविल्याने बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता झाली. नव्या पिकाचा शोध सुरू झाला. कृषी साहित्याचा अभ्यास, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट, कृषी प्रदर्शनातून माहिती, कृषी चर्चासत्रात सहभाग अन्‌ राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा- लसूण संशोधन संचालनालयाला भेटी देत शास्त्रज्ञांशी चर्चा करून या पिकांच्या लागवडीचा निर्णय घेतला.

लसूण शेतीचे व्यवस्थापन
दरवर्षीचे नियोजन या पद्धतीने होते -
- दरवर्षी माती परीक्षण करतात, त्यानुसारच खतांचे व्यवस्थापन केले जाते.
- लागवडीसाठी जमीन तयार करण्यापूर्वी शेतात हिरवळीचे खत म्हणून बोरू व धैंचा या पिकांची लागवड केली जाते. चाळीस दिवसांनंतर ही पिके शेतात गाडून टाकली जातात.
- त्यानंतर जमीन तयार करून लसणाची लागवड केली जाते.

बियाणे निवडीसाठी प्रयत्न लसणाच्या चांगल्या जातींच्या शोधात नामदेवराव होते; पण मनासारखे बियाणे उपलब्ध होत नव्हते.
एकदा इंदूर बाजार समितीत (मध्य प्रदेश) ते गेले असताना त्यांची भेट या राज्यातील हातोल गावचे रामकृष्ण राठोड यांच्याशी झाली. त्यांच्याकडील दर्जेदार व मोठ्या प्रमाणात असलेला लसूण पाहता आपण व्यापारी आहात का, असा प्रश्‍न त्यांना नामदेवरावांनी विचारला. त्यावर आपण शेतकरी असून सुमारे 28 एकरांत लसूण घेतो असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नामदेवराव त्यांच्या गावी शेतात गेले. परिसरातील शेतीही पाहिली. त्यानंतर हे बियाणे पसंत पडून राठोड यांच्याकडून बियाणे खरेदी केले.
पाच शेतकऱ्यांनी समूहाने पंधरा क्‍विंटल बियाण्याची 13 हजार 500 रुपये प्रति क्‍विंटल दराने खरेदी केली.

आता दरवर्षी याच वाणाची लागवड नामदेवराव करतात, त्यांना एकरी 40 ते 60 क्विंटलपर्यंत लसणाचे उत्पादन मिळते. त्यांच्या बियाण्याला परिसरातील शेतकऱ्यांकडूनच मोठी मागणी असल्याने त्यांनाच सारी विक्री केली जाते. यंदाच्या वर्षी त्यांनी ही विक्री 40 रुपये प्रति किलो या दराने केली, तर दोन वर्षांपूर्वी हाच दर त्यांना 110 रुपये असा मिळाला होता. एकरी उत्पादन खर्च सुमारे 35 ते 40 हजार रुपये होतो.
परिसरातील शेतकऱ्यांना नांदेडसारख्या मार्केटमध्ये हा लसूण विकून किलोला 40 रुपये दर मिळतो.

त्यांना कांदा व लसूण लागवडीसाठी नाशिक येथील तुषार अंबरे, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे, राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा- लसूण संशोधन संचालनालयातील डॉ. शैलेंद्र घाडगे आदींचे मार्गदर्शन मिळाले आहे.
कांदा व लसूण पिकाचा प्रयोग करण्यापूर्वी या शेतात सोयाबीन व अन्य प्रचलित पिके घेतली जात, त्यापासून नामदेवराव यांना एकरी वीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असे. कांदा व लसूण पिकाचा अवलंब सुरू केल्यापासून उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.

लसूण शेतीतील नामदेवराव यांची वैशिष्ट्ये - - या पिकाला कांदा पिकाच्या तुलनेत पाणी जास्त लागते, त्यामुळे त्याची लागवड कांद्यापेक्षा कमी असते.
- गादीवाफ्यावर लागवड केली जाते, गादीवाफ्याची रुंदी चार फूट, उंची सहा इंच ठेवली जाते.
- जमीन भुसभुशीत असल्याने गादीवाफ्याचा फायदा होतो. मुळ्यांची वाढ चांगली होते. लालमाती मिश्रित जमीन असल्याने निचरा चांगला होतो.
- हवामान चांगले असल्याने पीक चांगले येते.

पाण्याची सोय - 44 बाय 44 मीटर आकाराचे शेततळे आहे, त्यात सुमारे 15 लाख लिटर पाणी साठते.
- नाल्यावर बांध घातले आहेत. दोन विहिरींचे पुनर्भरण केले जाते.
- लसणी फुटण्याच्या काळात पाण्याची अधिक गरज असते.
- शेत तणांपासून स्वच्छ ठेवले जाते.
- सेंद्रिय खत दर तीन ते चार वर्षांनी एकदा 10 ते 12 ट्रॉली याप्रमाणात दिले जाते.

कांदा लागवडीचे "शेड्यूल' उन्हाळ्यात शेतीची मशागत, त्यानंतर जुलैमध्ये रोपवाटिका तयार करण्यात येते. सप्टेंबरमध्ये गादीवाफ्यावर कांदा लागवडीचे दरवर्षीचे ठरलेले शेड्यूल पार पडते. कांद्यात एकरी 22 टन उत्पादनापर्यंत ते पोचले आहेत. त्याचे बीजोत्पादनही ते घेतात. त्याचे एकरी सहा क्विंटलपर्यंत त्यांनी उत्पादन घेतले आहे. त्याला 20 हजार रुपये प्रति क्विंटल दरही मिळाला आहे.

"ऍग्रोवन' ठरला मार्गदर्शक
दैनिक "ऍग्रोवन'मधील लेख व यशकथांमधून मिळालेली माहिती महत्त्वाची ठरली. कृषी प्रदर्शन, कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्राकडील तंत्रज्ञानाचा वापर माझ्या शेती बदलासाठी महत्त्वाचा ठरला असून "ऍग्रोवन'चे आपण नियमित वाचक असल्याचे नामदेवराव अभिमानाने सांगतात.

* नामदेवरावांकडून शिकण्यासारखे 1. माती परीक्षण करून जमिनीनुसार पिकांची निवड
2. कांदा व लसूण पिकातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले.
3. बाजारपेठेचा कानोसा घेत माल बाजारपेठेत पाठविला. भाव नसल्यास गोदामात साठवणुकीची व्यवस्थाही करण्यात आली.
4. मजूरटंचाईची अडचण दूर करण्यासाठी यांत्रिकीकरण वाढविण्यावर भर दिला.
5. सततच्या वीज भारनियमनावर मात करण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर सुरू केला.

सुमारे पाच ते साडेपाच महिन्यांच्या कालावधीत रब्बी हंगामात चांगला पैसा मिळवून देणारे लसूण हे पीक आहे. शेतकऱ्यांनी या पिकाचे तंत्रज्ञान समजून घेतल्यास खरीप कांद्याप्रमाणे हे पीक नगदी ठरू शकते. दर्जेदार बियाण्याचा अभाव, स्थानिक ठिकाणी तंत्रज्ञान प्रचार यंत्रणेचा अभाव यामुळे लसूण लागवडीस मर्यादा येतात; परंतु माझा प्रयोग अनुभवल्यानंतर परिसरातील शेतकरी या पिकाकडे वळू लागले आहेत.
नामदेवराव अढाऊ -

संपर्क : नामदेवराव अढाऊ - 8888500722
देऊळगाव, ता. पातूर, जि. अकोला

काटेकोर नियोजनातून वाढविला दुग्ध व्यवसाय

सातारा शहरापासून दक्षिणेस साधारण सात किलोमीटवर करंडी हे गाव आहे. या गावातील अनिल जाधव यांची 14 एकर शेती आहे. सातारा येथील पतसंस्थेमधील नोकरी सांभाळून बंधू अरविंद यांच्या मदतीने त्यांनी शेती आणि जनावरांचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. सात वर्षांपूर्वी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दोन म्हशींपासून पशुपालन सुरू केले. शेतामध्येच 40 फूट बाय 25 फूट असा गोठा बांधला. परिसरातील शेतकरी आणि पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांच्या व्यवस्थापनातील तंत्र शिकत त्यांनी दोन वर्षात सहा म्हशी वाढविल्या. म्हशींच्या व्यवस्थापनाचा अंदाज आल्यावर व्यवसाय वाढविण्यासाठी संकरित गाईंची खरेदी करण्याचे ठरविले. त्याअगोदर जाधव यांनी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गोठ्यांना भेटी देऊन संकरित गाईंच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. परिसरातील शेतकरी, तसेच अकलूज, बारामती येथील बाजारपेठेतून टप्प्याटप्प्याने होल्स्टिन फ्रिजियन गाईंची खरेदी सुरू केली. जशी गाईंची संख्या वाढेल त्याप्रमाणे गोठ्यात सुधारणा केली. सध्या त्यांच्याकडे 110 होल्स्टिन फ्रिजियन, 10 कालवडी, पाच खिलार गाई, दोन म्हशी आणि चार बैल आहेत. जाधव यांची दर वर्षी सात एकर ऊस लागवड असते. जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी चार एकर क्षेत्रावर मका, कडवळ, मारवेल गवत या चारा पिकांची हंगामानुसार लागवड ते करतात. इतर क्षेत्रावर हंगामी पिकांची लागवड केली जाते. पुरेसे शेणखत उपलब्ध असल्याने पीकलागवड करताना शेणखताचा पुरेसा वापर केला जातो. त्याचा पीक उत्पादनवाढीला फायदा मिळाला आहे.

असा आहे गोठा - - गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी 150 बाय 70 फुटांचा गोठा.
- गोठ्यात दुधाळ गाई, कालवडी आणि वासरांसाठी स्वतंत्र व्यवस्था. चारा योग्य पद्धतीने खाता यावा यासाठी योग्य आकाराच्या गव्हाणी.
- डोक्‍याकडे डोके या पद्धतीने गाई गोठ्यात बांधल्या जातात. दोन्ही बाजूंच्या गव्हाणींमध्ये मोकळी जागा. तेथून चारा, पशुखाद्य देणे सोपे जाते. जनावरांवर व्यवस्थित लक्ष ठेवता येते.
- गाईंना पाहिजे तेव्हा स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी त्यांनी प्रत्येक गाईंच्या समोर पाण्याची भांडी बसवली आहेत. पाइपद्वारा प्रत्येक भांड्यास पाण्याची टाकी जोडलेली आहे. त्यामुळे गाईंनी जेवढे पाणी प्यायले तेवढे परत त्या भांड्यात जमा होते.
- गोठ्याच्या बाजूला पाण्याची टाकी, मजुरांना राहण्याची खोल्या बांधल्या आहेत.
- गोमूत्र, गोठा धुतलेले पाणी बाहेर नेण्यासाठी गोठ्यात कडेला नाली आहे. हे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून शेतात सोडले आहे.

गोठा व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी - जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज गोठा स्वच्छ धुतला जातो.
- गोठ्यात जनावरांना बसण्यासाठी सिमेंटचा कोबा करण्यात आला होता, त्यामुळे गाईंची नखे, गुडघ्यांना उठता- बसताना जखमा होत होत्या. हे टाळण्यासाठी गाईंना बसण्यासाठी मॅटचा वापर केला जातो.
- पशुवैद्याकडून जनावरांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. शिफारशीनुसार लसीकरण, जंतनिर्मूलन केले जाते.
- चाऱ्याच्या व पाण्याच्या काटेकोर वापरावर भर आहे.
- प्रत्येक दिवसाचे नियोजन करून ते काटेकोर पाळले जाते.
- जनावरांसाठी असणाऱ्या आठ मजुरांची राहण्यासाठी चांगल्या घरांची सोय केली आहे, तसेच गोबरगॅस उपलब्ध करून दिला आहे.

असे आहे पशुपालनाचे अर्थशास्त्र - - सध्या 60 होल्स्टिन फ्रिजियन गाई दुधाळ आहेत. एक गाय प्रतिदिन सरासरी 20 ते 30 लिटर दूध देते.
- गोठ्यातील सर्व जनावरांना दिवसाला 200 किलो पशुखाद्य लागते. या खाद्याचा खर्च पाच हजार येतो. वैरणीस दोन हजार आणि मजुरी दोन हजार जाते. हिरवी वैरण शेतातील असते, परंतु कडबा विकत आणावा लागतो.
- सध्या सकाळी सरासरी 350 लिटर आणि संध्याकाळी 350 असे एकूण दिवसाला सरासरी 700 लिटर दूध जमा होते. या दुधाला जागेवर 21 रुपये भाव मिळतो. फॅटनुसार दर कमी-जास्त होतो.
- सर्व जनावरांचे खाद्य बैरण, मजुरी, इतर किरकोळ खर्च वजा जाता खर्च दिवसाला सरासरी पाच हजार रुपये मिळतात, परंतु खर्च आता वाढतो आहे. त्यामुळे काटेकोर व्यवस्थापन ठेवले जाते.
- वर्षाला 350 ट्रॉली शेणखत तयार होते. एक ट्रॉली शेणखत 3000 रुपयांना विकले जाते.
- दर वर्षी दहा कालवडी गोठ्यात तयार होतात. त्यापासून वेगळे उत्पन्न मिळते. एक कालवड सरासरी 50,000 रुपयांना विकली जाते.
- रोजचे गोठ्यातील दुधाचे संकलन मोठे असल्याने परिसरातील अनेक डेअऱ्यांकडून संपर्क होत असतो, त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते. स्वतःच्या गाडीतून डेअरीवर दूध पोच केल्यामुळे लिटरमागे दोन रुपये जास्तीचे मिळतात.

काटकोर व्यवस्थापन असेल तरच पशुपालन फायद्याचे - पशुपालनातील वाटचालीबाबत बोलताना जाधव म्हणाले, की गाई, म्हशींच्या व्यवस्थापनामध्ये वडिलांचे मार्गदर्शन आणि बंधू अरविंद यांची मदत होते. जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये डॉ. बापूराव कोरडे, दयानंद ननावरे, पंतगराव देशमुख यांचे चांगले सहकार्य मिळते. चाऱ्याच्या खर्चात बचत करण्यासाठी हायड्रोपोनिक्‍स तंत्राने चारानिर्मिती करण्याचा विचार आहे. सध्या दुधाचे दर बदलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चारा, कडबा, पशुखाद्याचे दर वाढत आहेत. नफा कमी होत चालला आहे. यामुळे शासनाने दुधास सातत्याने चांगला भाव मिळावा या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. या व्यवसायामध्ये पहिली चार,पाच वर्षे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होते, हे लक्षात घेऊन पशुपालकांनी जनावरांचे आरोग्य, लसीकरण, खाद्य व्यवस्थापनाकडे लक्ष दिले तर खर्चामध्ये बचत करणे शक्‍य आहे. योग्य व्यवस्थापनामध्येच दुग्ध व्यवसायाचा आर्थिक नफा आहे.

असा आहे दिनक्रम - - पहाटे चार ते सहा या वेळात गोठ्यातील शेण गोळा करून गोठा स्वच्छ केला जातो.
- सहा ते आठ या कालावधीत गाईंच्या धारा दूध काढणी यंत्राने काढल्या जातात.
- गाईंना 20 किलो हिरवा चारा आणि कडबा कुट्टी करून दिला जातो. त्याचबरोबरीने सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो खुराक दिला जातो.
- गोळा झालेले दूध स्वतःच्या गाडीतून सातारा येथे डेअरीवर पोच केले जाते.
- सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधीत गाई-म्हशी गोठ्यात शांतपणे रवंथ करतात.
- दुपारी तीननंतर गोठा धुतला जातो. सध्याकाळी साडेसहा ते आठ या कालावधीत पुन्हा धार काढली जाते. त्यानंतर दूध सातारा शहरात पोच केले जाते.

संगणकावर होतात सर्व नोंदी.... गोठ्यात जनावरांची संख्या मोठी असल्याने सर्व जनावरांच्या लिखित नोंदी ठेवणे अवघड होते. त्यामुळे त्यासाठी अनिल जाधव यांनी संगणकावर या नोंदी ठेवण्यासाठी प्रणाली तयार केली आहे. गोठ्यातील प्रत्येक गाईला क्रमांक दिलेला आहे. त्यानुसार प्रणालीमध्ये रेतन तारीख, गर्भधारणेची तारीख, दुग्धोत्पादनाची माहिती नोंदविली जाते. या नोंदीमुळे गाईंचे रेतन, दुग्धोत्पादन, कालवडी यांची नोंद तत्काळ उपलब्ध होते. त्यानुसार पुढील नियोजन करणे सोपे जाते.


संपर्क - अनिल जाधव - 9822751129

Tuesday, 15 October 2013

करडई : बहुपयोगी पीक

08-10-2013 00:43:58    38 A- A A+

महाराष्ट्रातील प्रमुख गळीत धान्य पिकांमध्ये करडई हे रबी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर करडईची लागवड मुख्यत: बियांपासून मिळणा-या तेलासाठी व फुलापासून मिळणारा उपयुक्त रंग यासाठी केली जाते. करडई झाडाचा प्रत्येक भाग जसे खोड, पाने, फुले, बिया उपयुक्त असून करडईच्या पाकळ्यांपासून बनविलेला चहा हर्बल टी म्हणून प्रसिद्ध होत आहे.
करडईचे विविध उपयोग-
करडई तेल-
करडई तेल फार पूर्वीपासून खाद्य तेल म्हणून वापरात आहे. ग्रामीण भागातील लोक आजही तेलाच्या घाण्यावर करडईचे तेल काढून आणताज. करडईच्या तेलामध्ये लिनोलीक आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे तेल मानवी हृदयासाठी वरदान आहे. मानवाच्या रक्तातील कोलोस्टेरॉलचे प्रमाण मर्यादित राहते म्हणून करडइ तेल आरोग्यासाठी चांगले आहे.करडईच्या तेलामध्ये मानवी शरीराच्या सामान्य वाढीसाठी लागणारे प्रथिने, खनिजद्रव्ये आणि जीवनसत्वे माफक प्रमाणात असतात. करडइच्या तेलामध्ये असणा-या ७० ते ८० टक्के लिनोलिक आम्ल व ६ ते ८ टक्के ओलिक आम्लामुळे या तेलाची तुलना ऑलिव्ह ऑईलसोबत केली जाते. करडईमध्ये सर्वसाधारणपणे २५ ते ३५ टक्के तेल, १५ टक्के प्रथिने, ४१ टक्के चोथा तसेच २.३ टक्के अ‍ॅश असे प्रमाण आढळते.करडईचे तेल कमी तापमानात सुद्धा चांगल्या प्रतीचे राहते. या तेलामधील खाद्य लवकर खराब होत नाहीत. या तेलातील पदार्थांना वास लागत नाही.करडई तेलाची मालीश सांधेदुखी सारख्या आजारावर करतात.साबण उद्योग, वंगण तेल, ग्रीसिंग ऑईल इत्यादीमध्ये करडई तेलाचा उपयोग केला जातो. करडई तेलाचा उपयोग लोणी टिकविण्यासाठी केला जातो. करडई तेलामुळे लोण्यामधील न विरघळणारे स्निग्ध पदार्थात वाढ होण्यास मदत होते.
करडईची पाने-
करडईच्या पानामध्ये अ चे प्रमाण भरपूर आहे. कॅरोटीन, थायमीन, रायबो पलोविन, जीवनसत्व ब -१२ तसेच जीवनसत्व क अढळून आले आहे.
करडईची फुले व पाकळ्या-
करडईची फुले व पाकळ्यांचा औषधी उपयोग ही मानवी आरोग्यास वरदायी ठरत आहे. करडईच्या पाकळ्यापासून तयार केलेल्या चहाचा उपयोग मधुमेह, हृदयरोग, स्पॉउलेसिस उच्च रक्तदाब, त्वचा रोग यासारखे रोग बरे होण्यासाठी करण्यात येतो. फुलातील औषधी द्रव्यांमुळे स्त्रियांच्या मासिक पाळीतील तक्रारी दूर होवून गर्भपाताचे प्रमाण कमी होते.पुरुषांनाही वंधत्व कमी होतो.
करडईच्या पाकळ्यांच्या रंगाचा खाद्य पदार्थात उपयोग-
करडईच्या पाकळ्यात कारथॅमिन नावाचे पिवळसर रसायन असते. जे खाद्यपदार्थात रंग म्हणून वापरतात.
कापड उद्योगात करडईच्या रंगाचा उपयोग-
करडईच्या पाकळ्यांपासून कापडांना रंगवण्यासाठी रंग बनविता येतो.
मध उत्पादन-
करडई हे मध्यम परपरागसिंचीत पीक असल्यामुळे अधिक बिजोत्पादनासाठी मधमाश्यांच्या पेट्या करडइ फुलावर असतांना करडई पिकात ठेवतात. यामुळे भरपूर प्रमाणात बिजधारणा होऊन मधमाश्यांच्या पेट्यामधून उत्कृष्ट असा मध गोळा करता येऊ शकतो.
करडईपासून बनविलेले सोनेरी दूध-
करडइच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर म्हशींच्या दुधामध्ये मिसळून पेय तयार करतात. त्याला सोनेरी दूध म्हणतात.
करडई बियांच्या पक्षी खाद्यासाठी उपयोग-
करडईच्या विशेषत: शुद्ध पांढ-या तेलाव्यतिरिक्त पक्षी खाद्याकरीता विशेषत: कबुतरांच्या खाण्याकरीता होतो.
करडईचा चा-यासाठी पेंड म्हणून उपयोग करतात.
करडईच्या चा-यामध्ये ओट व बरसिमच्या बरोबरीने पौष्टिक गुणधर्म आढळतात.तसेच करडईपासून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीचा उपयोग पशुखाद्य म्हणून करतात.
* करडईच्या टरफलांचा उपयोग कागद उद्योगामध्ये, वीटभट्यां-
मध्ये, टाईल्स व पोलाद उद्योगामध्ये होतो.
* करडईच्या वाळलेल्या काडाचा वार कार्ड बोर्ड उद्योगामध्ये, क्राप्ट पेपर, पार्टिकल बोर्ड उद्योगात तसेच कंपोष्ट तयार करण्यासाठी होतो.
सौ.ध. सु. सुतार , डॉ. शा. भि. घुगे , डॉ. मेघा सूर्यवंशी
अ. भा. स. करडई संशोधन प्रकल्प,
व. ना. म. कृ. वि., परभणी

खरबूज लागवड - BEED


लातूर : खरबूज शेतीतून एकरी 3 लाखांचा नफा

पाण्याचा केला जपून वापर
बेलकुंड- भादा (ता.औसा, जि.लातूर) येथील उपक्रमशील शेतकरी, सरपंच बालाजी शिंदे यांनी आठ एकरावरील खरबूज शेतीतून 24 लाखांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. त्यांचे खरबूज सध्या वाशी (जि.ठाणे) येथील बाजारात जात आहेत. त्यांच्या उपक्रमशील खरबूज शेतीमुळे परिसरात एक आदर्श निर्माण झाला आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीद्वारे विकासाची गंगा सर्व जगभर वाहते आहे. त्याचाच आदर्श घेत भादा (ता.औसा) येथील सरपंच बालाजी मनोहर शिंदे यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करीत एकरी तीन लाखांचा नफा मिळविला आहे. त्यांनी आजतागायत विविध फळ शेती करण्यासाठी प्रयोग राबविले आहेत. त्यांनी स्वतःच्या 8 एकर शेतीत कुंदन जातीच्या खरबुजांची लागवड केली. लागवड करताना रोपाच्या दोन्ही काकरीत सहा फुटाचे तर रोपामध्ये सव्वा फुटांचे अंतर ठेवले. पाणी देताना अंत्यत काळजीपूर्वक वापर करीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. खरबूज शेतीमध्ये एकरी सरासरी 15 टन उत्पादन काढण्यात आले आहे.

सध्याची शेती नुकसानीची होत असल्याची ओरड होत असते. बालाजी शिंदे यांनी फळ शेतीमधून फायदेशीर शेती कशी करावी याचा आदर्श दाखवून दिला आहे. त्याची फळ शेती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. या शेतीसाठी त्यांना बार्शीचे काका भराडे, बोरगावचे दिनकर पाटील, भाऊ साहेबराव शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

मार्केटिंगवरही लक्ष...
खरबुजाचे चांगले मार्केटिंग करावे असा निश्‍चय करीत त्यांनी वेगवेगळ्या बाजारांचा आढावा घेतला. त्याअंती वाशी (जि.ठाणे) येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. तेथे एका नगाला सरासरी 25 ते 30 रुपये भाव प्राप्त झाला. त्यांच्या 15 टन उत्पादनाद्वारे 3 तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 8 एकर शेतीमध्ये कुंदन जातीच्या खरबुजांचे 24 लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे.

रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन

1) रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. हलक्‍या जमिनीसाठी सिलेक्‍शन-3, फुले अनुराधा, तसेच मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी 35-1, भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. 22, पीकेव्ही क्रांती, परभणी मोती या जाती निवडाव्यात. हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड करावी.
2) रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उतारानुसार 10x12 चौ.मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. किंवा 2.70 मीटर अंतरावर उताराला आडवे सारा यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळिराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत.
3) पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करावी.
4) प्रतिहेक्‍टरी 10 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (300 मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
5) पेरणीसाठी 45 x 15 सें.मी. अंतर ठेवावी.
6) बागायती पिकासाठी भारी जमिनीस एकूण 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. त्यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश पेरणीच्यावेळी पेरून द्यावे. उरलेले 50 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. मध्यम जमिनीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावा. त्यापैकी अर्धा नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरताना द्यावा व उर्वरित 50 टक्के नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा.
7) कोरडवाहू हलक्‍या जमिनीतील पिकासाठी हेक्‍टरी 25 किलो नत्र पेरणीच्यावेळी पेरून द्यावे.
8) ज्वारी पीक पेरणीसाठी दोन चाडी पाभरीचा वापर करावा.

रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जाती - करडई लागवड -
1) पेरणीसाठी सुधारित जातींची निवड करावी. फुले एसएसएफ 733 ही जात 120-125 दिवसांत तयार होते. याचे उत्पादन प्रति हेक्‍टरी 13 ते 29 क्विंटल इतके मिळते. ही जात मावा किडीस प्रतिकारक्षम असून, जिराईत क्षेत्रास चांगली आहे. एसएसएफ 658, बिन काटेरी जात आहे. या जातीचे प्रति हेक्‍टरी उत्पादन 14 ते 15 क्विंटल आहे. जिरायती क्षेत्रावर या जातीची लागवड करावी. भीमा ही जात 130 ते 135 दिवसांत तयार होते. प्रति हेक्‍टरी या जातीचे 14 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते. डी.एस.एच.129 ही जात 125 ते 130 दिवसांत तयार होते. या जातीचे प्रतिहेक्‍टरी 18 ते 20 क्विंटल इतके मिळते.
एस.एस.एफ. 708 ही जात 115 ते 120 दिवसांत तयार होते. या जातीचे जिरायतीमध्ये प्रति हेक्‍टरी 13 ते 15 क्विंटल आणि बागायतमध्ये 20 ते 22 क्विंटल उत्पादन मिळते.
2) पुणे जिल्ह्यातील जिरायती व ओलिताच्या क्षेत्रासाठी फुले कुसुमा (जेएलएसएफ- 414) या जातीची लागवड करावी. ही जात 135 ते 140 दिवसांत तयार होते. या जातीचे हेक्‍टरी जिरायती भागात 12 ते 15 क्विंटल व बागायती परिस्थितीत 15 ते 17 क्विंटल उत्पादन मिळते.
3) करडईचे सलग पीक घ्यावे. लागवडीसाठी हेक्‍टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 250 ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
4) पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. पेरणी उशिरात उशीर 10 ऑक्‍टोबरपूर्वी पूर्ण करावी.
5) पेरणी 45 सें.मी. अंतराच्या पाभरीने करावी. बियाणे पाच ते सहा सें.मी. खोलीवर पडेल अशी काळजी घ्यावी.
6) पेरणीच्यावेळी जिरायती पिकासाठी हेक्‍टरी 50 किलो नत्र व 25 किलो स्फुरद द्यावे. शक्‍यतो दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळेस पेरावे. बागायती पिकासाठी हेक्‍टरी 60 किलो नत्र व 30 किलो स्फुरद द्यावे. यापैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरदाची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. राहिलेले निम्म्या नत्राची मात्रा 30 दिवसांनी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावी.
7) पेरणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. दोन झाडांतील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे.

Wednesday, 2 October 2013

एकाच रोपापासून मिळेल टोमॅटो- बटाटा उत्पादन!

ब्रिटिश कंपनीने विकसित केली कलमी रोपे
थॉम्पसन आणि मॉर्गन ही ब्रिटिश कंपनी लवकरच "टोमटॅटो'ची रोपे बाजारात आणणार आहे. "टोमटॅटो' हा शब्द टोमॅटो आणि पोटॅटो या दोन इंग्रजी शब्दांपासून बनविलेला आहे. या रोपांपासून एकाच वेळी टोमॅटो आणि बटाटा यांचे उत्पादन घेणे शक्‍य होणार आहे. यामुळे एकाच कुंडीमध्ये कमी जागेमध्ये दोन्ही भाज्यांचे उत्पादन घेणे आता शक्‍य होणार आहे. शहरातील बागा आणि गच्चीतील परसबागेसाठी या प्रकारची रोपे आदर्श असल्याचे मत कंपनीच्या वतीने मांडण्यात आले आहे.

शहरामध्ये कमी जागेमध्ये भाज्यांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात, त्यांच्यासाठी इंग्लंडमधील एका कंपनीने एक नवे उत्पादन बाजारात आणले आहे. त्यांनी एका कुंडीमध्ये "टोमटॅटो'चे रोप उपलब्ध करून दिले आहे. या रोपापासून एकाचवेळी टोमॅटो आणि मातीमध्ये बटाटे यांचे उत्पादन घेता येते. एका झाडापासून सुमारे 500 चेरी टोमॅटो पूर्ण कालावधीमध्ये मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याबाबत माहिती देताना थॉम्पसन आणि मॉर्गन या कंपनीचे व्यवस्थापक मायकेल पेरी यांनी सांगितले, की हे झाड शंभर टक्के नैसर्गिक असून, कोणत्याही प्रकारे जनुकीय बदल करण्यात आलेले नाहीत. बटाट्याच्या रोपावर टोमॅटोचे कलम हाताच्या साह्याने करण्यात आले आहे. ही कलमाची प्रक्रिया अत्यंत नाजूक असून, त्यासाठी कौशल्याची आवश्‍यकता असते. कमी जागेमध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हा टोमॅटो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुढील हंगामापासून "टोमटॅटो'च्या रोपांची विक्री कंपनी सुरू करणार असून, त्याची किंमत 15 ब्रिटिश पौंड (सुमारे 1500 रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे.

अशी बनविली जातात "टोमटॅटो' रोपे - टोमॅटो आणि बटाटा ही पिके एकाच सोलॅन्सिस या कुळातील आहेत, त्यामुळे त्यांचे कलम करणे शक्‍य आहे.
- दोन्ही रोपांपासून अत्यंत लहान आकाराचा तुकडा काढण्यात येतो, त्यामध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करून, प्रथम एका जेलमध्ये व नंतर कंपोस्टमध्ये त्यांची वाढ केली जाते.
- दोन इंच उंचीची रोपे झाल्यानंतर, त्यावर तिरका काप घेऊन कलम केले जाते. एकमेकांशी जुळून येईपर्यंत म्हणजे साधारणपणे एक आठवड्यापर्यंत क्‍लिपांनी जोडून ठेवले जाते.
- खालील बाजूला बटाटा रोपाची मुळे आणि वरील बाजूला टोमॅटोच्या फांद्या असे त्याचे स्वरूप ठेवले जाते.

...अशी झाली सुरवात - थॉम्पसन आणि मॉर्गन या बागकामविषयक कंपनीचे संचालक पॉल हॅन्सोर्ड यांच्या अमेरिका भेटीच्या वेळी पंधरा वर्षांपूर्वी टोमॅटो आणि बटाटा या रोपांचे कलम करण्याची कल्पना आली.
- त्या कल्पनेवर सातत्याने काम करत, त्यांनी कलम करण्याची प्रक्रिया निर्दोष करण्याचा प्रयत्न केला.
- हॉलंड येथील विशिष्ट प्रयोगशाळेमध्ये उत्पादन करण्यात येत आहे. त्यानंतर ती रोपे इंग्लंडमध्ये आणून हरितगृहामध्ये वाढविण्यात येतात. 40 लिटरच्या बॅगेमध्ये किंवा मोठ्या कुंड्यांमध्ये ही रोपे ठेवली जातात.
- 3.5 इंच उंचीची झाल्यानंतर "टोमटॅटो'च्या रोपांची विक्री करण्यात येणार आहे.

बायोगॅस निर्मिती देईल आर्थिक नफा

जैववायू (बायोगॅस) निर्मिती हीही समाजाची रोजची आणि वाढत जाणारी गरज आहे. जैववायू निर्मिती ही कृषिजन्य अवशेषांवर करता येते. हे अवशेष प्रत्येक कृषी हंगामात तयार होतात आणि त्यांची विल्हेवाट गरजेची असते. हे अवशेष कुजत असताना वायूनिर्मिती होतच असते. हे सर्व कृषिजन्य अवशेष संपूर्ण देशभर विकेंद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि हाच जैवभार या व्यवसायाचा कच्चा माल आहे. या जैवभारापासून वायूनिर्मिती करण्याची "कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन' ही इतर व्यवसायांसारखी यंत्रे किंवा मजुरांवर अवलंबून नाही तर वायूनिर्मिती ही प्रक्रिया विनॉक्‍सी वातावरणात जिवाणूंकडून घडवली जाते.
समाजाच्या आर्थिक स्तराप्रमाणे इंधनांची गरज बदलत नाही, बदलली तर त्यातील इंधनांचे स्वरूप जसे, की गरिबांच्या घरात चूल जळेल तर श्रीमंतांकडे द्रवीभूत खनिज वायूवरची शेगडी. एखादा व्यवसाय जर संगणक क्षेत्रातील असेल, तर त्याचा ग्राहक वर्ग हा शिक्षित असेल तसे इंधनाचे नाही. इंधन व्यवसाय अशा परिस्थितीत दैनंदिन गरजेचे ठरतात.

बायोगॅस निर्मिती व्यवसायाची गरज - 1) जैववायू किंवा बायोगॅस मोठ्या प्रमाणावर निर्माण करणे ही काळाची गरज आहे. येथे गोबर गॅस प्लांटची तुलना करता येणार नाही. याला कारण गोबर गॅस प्लांटची सगळ्यांत मोठी आवश्‍यकता असते ती म्हणजे शेण. त्यासाठी गाई- म्हशींचा गोठा हवा. तोही छोटा नव्हे तर किमान दररोज अडीच टन शेण हवे, म्हणजे 2500 किलो शेण तयार होण्यासाठी 250 तरी जनावरे असली पाहिजेत.
2) व्यावसायिक बायोगॅस प्लांट आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी किमान 100 घ.मी. एवढी वायूनिर्मिती रोज व्हायला हवी. 100 घ.मी. म्हणजे एक लाख लिटर गोबर गॅस.
3) इथे वायूनिर्मितीचा नियम आहे. एक किलो शेणापासून 40 लिटर बायोगॅस मिळतो. याच्या निर्मितीचा कालावधी सुमारे 40 दिवसांचा असतो. आजकाल मोठे डेअरी फार्म सोडले तर बहुतांशी शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या घटत चाललेली दिसते. वायूनिर्मितीसाठी दुसरा पदार्थ कोणता असा प्रश्‍न सहजच पडतो, तेव्हा यापूर्वीच्या लेखात चर्चा केलेल्या इंधन शेतीचा संदर्भ उपयोगी ठरेल.
4) मोठ्या प्रमाणावर वायूनिर्मिती होण्यासाठी त्यात जो पदार्थ वापरला जातो, त्यात पिष्टमय पदार्थ किंवा शर्करा यांचे प्रमाण सर्वोच्च असावे लागते. त्यांचा कुजण्याचा कालावधीही कमी हवा. कारण 100 घ.मी. वायूनिर्मितीसाठी गोबर गॅस प्लांटच्या पाचक टाकीचे आकारमान हे 200 घ.मी. म्हणजेच सुमारे दोन लाख लिटर एवढे असते.
5) पाचक टाकी आणि वायूनिर्मिती यांचे प्रमाण 2-1 या गुणोत्तरात असते. याच मापाने वायूनिर्मिती व्यवसाय किफायतशीर व्हायला हवा, तर हे गुणोत्तर त्यापेक्षा कमी म्हणजे 1-1.5 असेसुद्धा येऊ शकते.
6) उदाहरण द्यायचे झाले तर आमच्या संस्थेच्या फलटणमधील बायोगॅस प्लांटची टाकी एक लाख लिटर आहे. पण त्यातून होणारी दररोजची वायूनिर्मिती मात्र 150 घ.मी. एवढी आहे. गुणोत्तराची ही आकडेवारी बदलण्यासाठी खूपच प्रयोगांची मालिका झाली
7) बायोगॅस प्लांटमध्ये आपण जे पदार्थ टाकतो त्याला "फीड' असे म्हणतात आणि ज्या टाकीत हे पदार्थ घातले जातात त्याला "डायजेस्टर' असे म्हणतात. हे जणू काही आपल्या पोटासारखं... पाहा आपण रोज न्याहारीसाठी एक दोन पोळ्या खातो, दुपारच्या जेवणात तीन किंवा चार, संध्याकाळच्या न्याहारीत पुन्हा एक किंवा दोन आणि रात्रीला दोन किंवा तीन म्हणजे दिवसभरात सुमारे 10 ते 12 पोळ्या खातो, पण उद्या जर असं ठरवलं, की या सर्व पोळ्या एकाच वेली खायच्या तर काय होईल, पोट तर बिघडेलच आणि ऍसिडिटीही होईल. याच नेमक्‍या घटना बायोगॅस प्लांटमध्येही घडतात. म्हणूनच नवा विचार पुढे आला "पिरिऑडिक फीडिंग'. म्हणजेच बायोगॅस प्लांटचे खाद्य त्याला एकाच वेळी न देता सहा ते आठ तासांच्या अंतराने द्यायचे.
8) बायोगॅस प्लांटच्या खाद्यासाठी तासांचे अंतर निश्‍चित करण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये 10 ते 12 छोट्या बायोगॅस प्लांटची माळच उभारली होती आणि त्यांना दर 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24 अशा अंतराने फीडिंग देत होतो. यातील 1, 2, 3, 4, 6 हे सर्व बायोगॅस प्लांट पहिल्या तीन चार दिवसांतच ऍसिडिक झाले. मात्र 8, 12, 24 तासांनी फीडिंग होणारे तीनही बायोगॅस प्लांट पुढील महिनाभर व्यवस्थितरीत्या वायूनिर्मिती करीत होते आणि ऍसिडिक झालेल्या बायोगॅस प्लांटमधील वायूनिर्मिती तर थांबलीच, पण सर्व जिवाणूही मरून गेले. याचे एकमेव कारण बायोगॅस प्लांटची वाढलेली ऍसिडिटी. याचा सामू सुमारे 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावी लागते ही आदर्श पातळी 8, 12, 24 या तिन्ही बायोगॅस प्लांटमध्ये कायम होती.
याचाच अर्थ 24 तासांतून एकदा फीडिंग होणारा बायोगॅस प्लांटची क्षमता एक अशी धरली, तर दिवसातून तीन वेळेला म्हणजेच दर आठ तासांनी फीडिंग होणाऱ्या बायोगॅस प्लांटची कार्यक्षमता तीनपट झाली, असं म्हणण्यास पुरेसा वाव आहे. निसर्गाच्या कलाने एखादी गोष्ट केली तर त्यातून मिळणारे उत्पन्न हे टक्‍क्‍यांत न राहता पटीतच मिळते.
9) दर आठ तासांनी फीडिंग होणारा बायोगॅस प्लांट, याची कार्यक्षमता तीन पट होत असल्याकारणाने आमच्या प्लांटचे मूळ उत्पादन जे 50 घ.मी. होत होते, ते 150 घ.मी. होऊ लागले. सुमारे 30 टक्‍क्‍यांनी कार्यक्षमता तर वाढलीच, पण मिळणाऱ्या वाढीव उत्पादनासाठी कोणतीही नवी भांडवली गुंतवणूक करावी लागली नाही. इथं एक नवा निष्कर्ष डोळ्यांसमोर आला, तो म्हणजे निसर्गाचे फायदे आणि नियम समजून जर आपण काही करायला गेलो तर उत्पादनही चक्क पटीनं होतं. मानवनिर्मित यंत्राची उत्पादकता मात्र टक्केवारीतच मोजायला लागते.

शुद्ध वायूची गरज - मोठ्या प्रमाणावर वायूनिर्मिती केल्यावर त्याची साठवणूक करणेही तितकेच गरजेचे असते. मग ही साठवणूक कशी करायची? वायू साठवून कशात ठेवायचा? असे एका पाठोपाठ एक प्रश्‍न निर्माण व्हायला लागले. हे सारं समजावून घेण्यासाठी पहिल्यांदा माहिती करून घेणे गरजेचे ठरते, ते म्हणजे जैववायूमधील विविध वायू आणि त्यांची टक्केवारी. गॅस क्रोमॅटोग्राफ या अत्याधुनिक उपकरणाद्वारे या घटक वायूंची टक्केवारी मोजता येते. मात्र त्यासाठी सुमारे 99.99 टक्के शुद्ध असलेले वायूही आवश्‍यक असतात. गॅस क्रोमॅटोग्राफ या वायू शुद्धता तपासणाऱ्या यंत्रावर जैववायू तपासला असता, सर्वसाधारणपणे वायूंचे प्रमाण असे असते. मिथेन -55 ते 60 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 40 ते 45 टक्के आणि इतर घटक वायू जसे हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया, सल्फर-डाय- ऑक्‍साईड आणि बाष्प म्हणजे पाण्याचा अंश मात्र हे सर्व घटक पीपीएम या तत्त्वावर मोजले जातात.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर हायड्रोजन सल्फाईड 250 पीपीएम म्हणजे एकूण जैववायूचे जर दहा लाख कण असतील तर त्यातील 250 कण हायड्रोजन सल्फाइडचे. यातील विषारी असलेले हे तीन वायू वेगळे करणे हा एक अवघड भाग. इथेही अतिशय साधे, सोपे, व्यवहार्य आणि सर्वांत महत्त्वाचे कोणालाही करता येऊ शकेल, अशी प्रणाली मला विकसित करायची होती. मग यावरचे काम सुरू झाले.

(लेखक बायोगॅस विषयातील तज्ज्ञ आहेत.)

बायोगॅस - तंत्र शाश्‍वत ऊर्जेचे

बायोगॅससोबत असते बाष्प आणि न जळणारा किंबहुना अग्निशामक असा लौकिक असलेला कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू. या वायूचे यशस्वी विलगीकरण करणे हा मुद्दा कळीचा होताच. इथेही शाळेत शिकलेले सामान्य विज्ञानच कामी आले. सहावी- सातवीच्या विज्ञानाच्या धड्यात आपण सर्वजण हे शिकलोच आहोत, की दाबाखाली कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू पाण्यात द्रावणीय आहे. याचे रोजच्या व्यवहारातील उदाहरण म्हणजे काचेच्या बाटलीतील फसफसणारा सोडा. अधिक माहिती घेता हे लक्षात येते, की थंड पाण्यामध्ये जर कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू सोडला, तर तो वायुस्वरूपात न राहता पाण्यामध्ये विरघळला जातो. शास्त्रीय परिभाषेत याला कार्बोनिक ऍसिड म्हणतात. इथे हा विरोधाभास महत्त्वाचा, की पाण्याचे तापमान कमी असताना त्यात जरा कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू विरघळतो. त्याउलट पाण्याचे तापमान वाढले असता, तो त्यातून सहजी वेगळा होतो. आपल्याला सोडा वॉटर प्यायला दिल्यानंतर येणारा ढेकर याचं कारण हेच असतं.

बायोगॅसमधील वायू विलगीकरणावरच्या प्रश्‍नाची उत्तरं जरी सापडली, तरी ती प्रत्यक्षात उभी करणं हे थोडंसं आव्हानात्मक होतं. या विलगीकरणासाठी जैववायू आणि पाणी यांचा संपर्क होण्यासाठी दोन गोष्टी विशेषत्वाने आवश्‍यक होत्या. एक जैववायूतील संयुक्त स्वरूपात असलेले मिथेन आणि कार्बन डाय-ऑक्‍साईड या वायूंचे रेणू वेगळे करणे, त्यासाठी वायूंचे आणि पाण्याचे रेणू एकमेकांच्या संपर्कात येण्यासाठी आवश्‍यक असलेले वायू आणि पाणी यांचे वहनाचे दर (फ्लो रेट). हा सर्व प्रयोग करत असताना मी आधीच निश्‍चित केले होते, की यासाठी कोणतेही परदेशी तंत्रज्ञान वापरायचे नाही आणि याच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूही केवळ भारतीय नाहीत, तर अगदी तालुक्‍याच्या बाजारपेठेत उपलब्ध असल्या पाहिजेत. याचा हा उद्देशही अगदी योग्य होता. याचं मूळ कारण स्थानिक प्रश्‍नास स्थानिकच उत्तर असलं पाहिजे.

असे केले वायूंचे विलगीकरण - संशोधनासाठी मुळात दोन गोष्टी आवश्‍यक असतात. एक मनामध्ये आलेला विचार डोळ्यांसमोर उभा करणे आणि त्यादृष्टीने त्याची उभारणी करणे, याच विचारप्रक्रियेला एकदा सुयोग्य दिशा मिळाली, की त्यापुढील काम अगदी सोपं असतं. मला हा अनुभव वारंवार आलेला आहे आणि म्हणूनच प्रश्‍न मध्यभागी ठेवून त्याच्या अवतीभोवती मी जेव्हा पाहायला लागलो, तेव्हा लक्षात आलं, वायूला जर प्रवास करायला लावायचा असेल, तर त्याची घनता लक्षात घेतली पाहिजे. या वायूला पाण्याबरोबर अभिक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे.
1) यासाठी सहा इंच व्यासाचा एक पी.व्ही.सी. पाइप सुमारे 20 फूट उंचीचा उपयोगात आणायचं ठरवलं. त्याची दोन्ही तोंडं एंड कॅप लावून बंद केली आणि वरच्या टोकाला अंघोळीचा शॉवर जोडला. एक एचपी पाण्याची मोटार लावून प्रवाहाचा वेग सुमारे 25-30 लिटर प्रति मिनीट ठेवला आणि आतल्या बाजूला वायूंच्या कणांचे सुटे-सुटे होणे अपेक्षित होते, यासाठी नारळाच्या शेंड्यांचा वापर केला.
2) नारळाच्या शेंड्या उघड्यावर पटकन कुजत नाहीत, तर पाइपमध्ये भरल्यावर त्यांचं आयुष्य वाढणारच. नैसर्गिकरीत्या त्यांना उत्तम सच्छिद्रता लाभलेली असल्याने या छिद्रांमधून कार्बन डाय-ऑक्‍साईड आणि मिथेन वायूचे वहन खालून वरच्या दिशेने होते.
3) इथे हेही लक्षात घेणं आवश्‍यक आहे. जैववायूमध्ये असलेल्या ह्या दोन्ही घटक वायूंची घनता निरनिराळी आहे. मिथेनची घनता 0.64, तर कार्बन डाय-ऑक्‍साईडची घनता सुमारे 1.5. याचाच अर्थ मिथेन हलका वायू असल्याने तो लवकर वर जातो आणि कार्बन डाय-ऑक्‍साईड हवेपेक्षा सुमारे दीडपट जड असल्याने हळूहळू वरती जातो आणि त्याचवेळेस वरच्या बाजूने येणाऱ्या पाण्याच्या कणांचे आणि वायू कणांचे घासणे (स्क्रबिंग) होते आणि कार्बन डाय-ऑक्‍साईड वायूचे रेणू पाण्यामध्ये विरघळले जातात आणि हे पाणी स्क्रबर पाइपच्या खालच्या टोकातून बाहेर पडते. या तंत्राला "वॉटर स्क्रबिंग' असे म्हणतात. आणि संपूर्ण जगभर हे तंत्र अवलंबले गेले आहे. सर्व शीतपेयांमध्ये विरघळलेला कार्बन डाय-ऑक्‍साईड हे आपल्या दैनंदिन जीवनातील परिचयाचे उदाहरण.
4) आता थोडासा तांत्रिक भाग तपासून पाहूयात म्हणजे या वायूंचे विलगीकरण आवश्‍यक का होतं ते समजावून घेणं सोपं जाईल. मुळात औष्णिक मूल्यांची (कॅलरीफिक व्हॅल्यू) तुलना करता स्वयंपाकासाठीचे आदर्श इंधन हे द्रवीभूत खनिज वायू (L.P.G.) यांच्याबरोबर जैववायूची सममूल्यता तपासली तर ती आहे सुमारे 2300 लिटरच्या आसपास किंवा 2.3 घनमीटर. मात्र, यामध्ये मिथेन वायू सुमारे 60 टक्के म्हणजेच सुमारे 1400 लिटर (1.4 घ.मी.).
5) आता उरलेला 900 लिटर वायू हा कार्बन डाय-ऑक्‍साईड होता. तो वेगळा केल्यावर उरलेला मिथेन हा आमच्या ढोबळमानाने सांगायचं झालं तर एक ग्रॅम एलपीजीला सममूल्य 1.4 लिटर मिथेन हा 1400 लिटर वायू सुमारे 60 कि.ग्रॅ./ सें.मी. 2 या दाबाला जर टाकीत भरायचा ठरला, तर टाकीचं आकारमान होतं सुमारे 25 लिटर क्षमतेच्या आसपास.
6) सर्वसाधारण कुटुंबात जर दररोज अर्धा कि.ग्रॅ. एलपीजी इंधन स्वयंपाकासाठी लागत असेल, तर हा 25 लिटर क्षमतेच्या टाकीत भरलेला 1400 लि. वायू आपल्या घरात सुमारे दोन दिवस पुरेल. इथेच या प्रकल्पातल्या व्यवसायाची व्यवहार्यता लक्षात येते आणि मग आम्ही संस्थेद्वारे यासाठीचा पहिला व्यावसायिक प्रकल्प उभा केला.
7) एखाद्या विषयावर मूलभूत संशोधन करताना जशा अनेक तांत्रिक, आर्थिक किंवा व्यावहारिक अडचणी येतात, त्याच अडचणी थोड्याफार फरकाने व्यवसायाच्या बाबतीतही आल्या. इथे अडचणींचा बागुलबुवा उभा करायचा हेतू नाही किंबहुना सकारात्मक दृष्टीने या अडचणींकडे पाहता, त्यावर व्यवहार्य पर्याय काढून मात करणे गरजेचे ठरते. आम्हीही नेमके हेच केले आणि उद्या एखाद्याला असाच व्यवसाय उभा करायचा असेल तर त्यासाठी नेमकी गरज कशाची? ते उभारताना येणाऱ्या अडचणी कोणत्या? आणि या सर्वांवर मात कशी करायची? हे आधी घेतलेल्या अनुभवावरून नेमके माहीत होते आणि त्यादृष्टीने व्यावसायिक प्रकल्प उभा करणे उलट जिकिरीचे न होता सोपे बनते.
8) यापूर्वीच्या इंधन पिके लेखात आपण कोणत्या गोष्टींपासून किती वायुनिर्मिती, किती वेळात आणि त्याची किंमत हेही पाहिले आहे. याचाच वापर करून मोठ्या प्रमाणावर वायुनिर्मिती करायची, वायूंचे विलगीकरण करायचे आणि तो वायू योग्य दाबाखाली टाक्‍यांमध्ये भरून त्यांच्या विक्रीचा व्यवसाय असा क्रम लावून प्लांट उभारणी केली. आम्ही या तंत्रज्ञानाचे पेटंट (स्वामित्व हक्क) हे हेतुतः घेतलेले नाही. व्यवहार्य इंधननिर्मिती करून आज आपली गरज पूर्ण करून इंधनामध्ये स्वयंपूर्णता मिळवणे गरजेचे आहे.
इथे हाही मुद्दा स्पष्ट करायला हवा, की हे तंत्र मला आजमितीला वरवर जरी सोपे वाटले असले, तरी प्रत्यक्ष उभे करताना सुमारे पाच- सहा वर्षांचा कालावधी लागला. आपली त्यातून गरज भागवणारे महत्त्वाचे सोपे दिसणारे तंत्र जरी असले, तरी प्रत्यक्ष अवलंब करून व्यवसाय करण्यासाठी आवश्‍यकता आहे सखोल ज्ञान घेण्याची आणि तंत्राचा प्रभावी वापर करण्यासाठी अनुभवाची. हे एकदा साधलं तर मग संपूर्ण देशात हा इंधनांचा व्यवसाय करणं अजिबात अवघड नाही.

सैन्यात असो वा शेतात लढणे सोडले नाही

वर्णे (ता. सातारा) हे गाव सातारा शहरापासून पूर्वेला 14 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील धोंडिराम पवार यांच्याकडे 20 एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांची दोन्ही मुले योगेश व संतोष हे दोघे सैन्यदलामध्ये कार्यरत होते. या बंधूंपैकी योगेशच्या डाव्या मांडीमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये गोळी लागली. देशसेवा करताना त्यांला अपंगत्व आले. योगेश 2000 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर योगेशने दोन वर्षे खासगी नोकरी केली. मात्र शेतीच्या कामांची आबाळ होत असल्याने नोकरीत मन रमत नव्हते. अपंगत्वामुळे शेतीतील कामे कितपत जमतील, या विषयी आत्मविश्‍वास नव्हता. त्यामुळे निर्णय होत नव्हता. मात्र घरातील लोकांनी आत्मविश्‍वास दिल्याने शेतीकडे लक्ष देण्यासाठी नोकरी सोडली.

...अशी होती परिस्थिती - वडिलोपार्जित शेती 20 एकर असली तरी बागायतीचे प्रमाण कमी होते. शेतीसाठी पाण्याची सोय म्हणून नवी विहीर खोदली. त्यावरून शेतापर्यंत सुमारे सहा हजार फूट पाइपलाइन केली. या पाण्याने दहा एकर बागायत केले.
- शेतीची सुरवात ऊस, सोयाबीन, ज्वारी यांसारखी पारंपरिक पिके घेत केली. गावात अनेक शेतकऱ्यांकडे हरितगृह आहेत. त्यांच्या प्रमाणेच आपलेही हरितगृह असावे, अशी इच्छा मनात होती. मात्र मोठा भाऊ संतोष सैन्यात कार्यरत व आपल्या पायास अपंगत्व आलेले. हरितगृहातील कामे कितपत जमतील या विषयी शंका होती. त्यामुळे योगेश यांनी अन्य शेतकऱ्यांच्या हरितगृहामध्ये जाऊन फवारणी, फुले तोडणी यांसारखी कामे करता येतील का याचा अंदाज घेतला. ही कामे जमू शकतील, असे वाटल्यावर दहा गुंठे क्षेत्रावर ग्रीन हाऊस उभारण्याचा निर्णय घेतला.
- सध्या योगेश पवार यांच्याकडे 10 एकर बागायत क्षेत्रापैकी सात एकर ऊस, तीन एकर आले, 10 गुंठे हरितगृहात जरबेरा ही पिके आहेत.

हरितगृहाचे नियोजन - 2009 मध्ये योगेश पवार यांनी हरितगृह उभारणीचे नियोजन केले.
- त्यांनी सुरवातीस दहा गुंठे क्षेत्रामध्ये 20 ट्रेलर शेणखत, दोन टन भाताचा भुस्सा, एक ट्रेलर वाळू व लाल माती 110 ब्रास या प्रमाणे मिश्रण करून घेतले.
- त्यानंतर लाल माती भिजवून जमिनीला वाफसा आल्यानंतर रासायनिक खताचा बेसल डोस दिला.
- गादी वाफे दोन फूट आकाराचे करून मध्ये चालण्यासाठी एक फूट आकाराचा रस्ता सोडला. या बेडवर जूनमध्ये जरबेरा रोपांच्या दोन ओळी 45 सेंटिमीटर अंतरावर ठेवून दोन रोपांमध्ये एक फूट इतके अंतर ठेवले. लागवडीसाठी सहा हजार 200 जरबेरा रोपे लागली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस फुले सुरू झाली.

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी - दहा एकर शेतीमध्ये ठिबकचा वापर करतात.
- हवामानाच्या बदलावर लक्ष ठेवून फवारणीचे नियोजन केले जाते.
- शेतीतील सर्व प्रकारच्या नोंदी ठेवल्या जातात.
- मुख्य पिकास पोषक आंतरपिके घेतली जातात.
- प्रत्येक वर्षी उसातील पाचट न जाळता आच्छादन करतात.
- हरितगृहातील सर्व कामे वेळेवर करण्यावर भर दिला जातो.

वैशिष्ट्ये - ऊस शेतीतील एकरी 70 टनापर्यंत उत्पादन.
- आल्याचे एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन घेतात.
- स्वतः योगेश अपंग असूनही हरितगृहामध्ये सर्व कामे करतात. त्यांना घरातील सदस्यांची साथ मिळते. त्यासाठी मजूर लावत नाही. फुलांची काढणी व पॅकिंग आई, पत्नी दीपाली, भावजय मनीषा, बहीण कोमल या करतात.

हरितगृह शेतीचा ताळेबंद - लाल माती 110 ब्रास व वाळू एक ब्रास - एक लाख 13 हजार रुपये, भाताचा तूस ः पाच हजार रुपये
- हरितगृह उभारणीसाठी - पाच लाख 40 हजार रुपये
- रासायनिक खत व शेणखत - 80 हजार
- बेड बनविण्यासाठी 15 हजार रुपये
- ठिबक सिंचन यंत्रणा - 80 हजार
- 10 गुंठे हरितगृहामध्ये 6200 रोपे (प्रति रोप 27 रुपये प्रमाणे) - एक लाख 67 हजार 400 रुपये
- पाण्याची टाकी, फवारणीसाठी स्प्रे पंप व खते देण्यासाठी व्हेंचुरी - 90 हजार
- रासायनिक खते व कीडनाशके यांचा खर्च प्रति वर्ष साधारणतः - एक लाख 60 हजार रुपये
- तसेच पॅकिंग, वाहतूक व अन्य खर्च - 90 हजार रुपये
- एकूण 12 लाख 50 हजार 400 रुपये खर्च आला आहे.
- या खर्चासाठी बॅंकेतून आठ लाख 90 हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते.
- पहिल्या वर्षी तीन लाख फुले मिळाली असून, अडीच रुपये सरासरीप्रमाणे सात लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. बाजारातील दरामध्ये चढ-उतार असतात. आजपर्यंत प्रति फूल किमान एक रुपया ते कमाल सात रुपयापर्यंत दर मिळाला आहे.
- दुसऱ्या वर्षीपासून कीडनाशके व रासायनिक खताला एक लाख 60 हजार, पॅकिंग व वाहतूक 85 ते 90 हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता वर्षाकाठी साडेतीन ते चार लाख रुपये मिळतात.

बाजाराचा अभ्यास - वर्णे गावात शेतकऱ्यांकडे हरितगृहाची सुमारे 300 युनिट आहेत. त्यामुळे येथून दिल्ली, मुंबई, पुणे, विजयवाडा, हैदराबाद आदी ठिकाणी दररोज फुले पाठवली जातात. यामुळे फुलांचा दररोज दर कळतो.
- गावातून मोठ्या प्रमाणात फुले येत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून इतरांपेक्षा दर चांगला मिळण्यास मदत होते.
- येथून वेगवेगळ्या शहरात फुले जात असल्यामुळे दर व मागणी यांची माहिती मिळते. तसेच या विविध व्यापाऱ्यांच्या संपर्क करूनही माहिती घेतली जाते.
- "ऍग्रोवन'मधील दर, फुलांची उपलब्धता याबाबत सातत्याने माहिती घेतली जाते. सण, समारंभ, त्यानुसार फुले काढणीचे नियोजन केले जाते.

समस्या व उपाय - हरितगृहामध्ये पिकासाठी हवामान अनुकूल असल्याने रोग व किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. जरबेरामध्ये पावसाळ्यात पांढरी माशी व सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव झाला होता. हिवाळ्यात भुरी, करपा रोग व उन्हाळ्यात कोळी, थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचा अनुभव आहे. यासाठी वेळेवर फवारणी व आळवणी केली जाते.
- गावात हरितगृह शेती अनेक वर्षांपासून होत असल्याने अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन उपाययोजना केली जाते.
- वर्षातील काही महिन्यांमध्ये फुलांना दर कमी असतो. दर कमी असला तरी रोपांची काळजी घेतली जाते.

नियोजन आणि मार्गदर्शन - - गावातील अनुभवी शेतकऱ्यांकडून हरितगृह उभारणीपासून मार्केटच्या नियोजनापर्यंत मार्गदर्शन झाले आहे.
-रोज ऍग्रोवन वाचून त्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवतो. गरज वाटल्यास प्रत्यक्ष भेट देतो. ऍग्रोवनमधील आवश्‍यक लेखांची कात्रणे काढत असल्याचे योगेश यांनी सांगितले.
- बंधू संतोष याच्यासह दरवर्षीच्या पिकांचे नियोजन केले जाते. आणखी 20 गुंठे हरितगृह व 10 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवडीचे नियोजन आहे.

योगेश पवार, 9890722665