Friday, 8 November 2013

हिरव्या चाऱ्यापासून तयार करा पोषक मुरघास

सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात मुरघास बनवण्याचे नियोजन करावे. कारण या काळात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. तयार झालेल्या मुरघासाची उपलब्धता फेब्रुवारी ते मे या काळादरम्यान होऊ शकते.
- मुरघास बनविण्यासाठी एकदल (तृणधान्य) पिके जसे की मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके तसेच द्विदल (डाळवर्गीय) पिके जसे की लुसर्ण, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा यांचा वापर करावा.
- एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कार्बोदकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. त्यासाठी मका हे चांगले पीक आहे.
- द्विदल पिकांच्या चाऱ्यांमध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण जास्त असते.
- या व्यतिरिक्त हिरव्या चाऱ्याच्या बरोबरीने कृषी उद्योगातील टाकाऊ पदार्थ, फळे व भाजीपाल्यातील टाकाऊ पदार्थांचा वापरून चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करता येतो. अशा प्रकारच्या मुरघासामध्ये कमीत कमी 40 ते 50 टक्के चारा पिके असावीत.

मुरघास बनवण्याच्या पद्धती - अ) पारंपरिक पद्धती -
- जमिनीत मुरघास तयार करण्यासाठी योग्य आकाराचे खड्डे करावेत.
- सायलोपीट - जमिनीखालील सिमेंट कॉंक्रीटसहित व विरहित खड्डे.
- बंकर सायलो - जमिनीखालील किंवा जमिनीवरील सिमेंट कॉंक्रीटसहित व विरहित खड्डे.
- टॉवर सायलो - जमिनीवरील टॉवरवरील पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात मुरघास तयार करता येतो.

ब) आधुनिक पद्धती -
1) प्लॅस्टिक बॅग सायलेज -
विविध क्षमतेच्या व गुणवत्तेच्या प्लॅस्टिक बॅग वापरून उच्च प्रतीचा मुरघास तयार करता येतो. अशा प्रकारच्या प्लॅस्टिक बॅगा 5 किलो, 10 किलो, 50 किलो, 100 किलो, 500 किलो, 1000 किलो अशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या बॅगचा आकार हा आयातकार, चौरस, गोलाकार असतो. अशा प्रकारच्या बॅगा वारंवार वापरात येऊ शकतात. हाताळायलाही सोप्या असतात.

2) ड्रम सायलेज -
काही ठिकाणी वेगवेगळ्या क्षमतेचे प्लॅस्टिक ड्रम वापरून मुरघास बनवता येतो. प्लॅस्टिक ड्रमची क्षमता 100 ते 300 लिटरपर्यंत असते. ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणात मुरघास तयार करावयाचा आहे आणि साखळी पद्धतीने वापर करावयाचा आहे, त्या ठिकाणी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे.

3) बांबू सायलो -
ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध असतात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे बांबू सायलो बनवले जातात. सर्वसाधारणपणे 5 मीटर x 5 मीटर x 5 मीटर आकाराची बांबूची चौकट तयार करावी. या चौकटीच्या आतून 150 ते 200 मायक्रॉन जाडीचा प्लॅस्टिकचा कागद अंथरावा. त्यामध्ये साधारणतः 1000 ते 1500 किलोपर्यंत मुरघास तयार होतो.

मुरघास तयार करण्याची प्रक्रिया -- चारापिकाचे साधारणपणे 1 ते 2 इंच लांबीचे कुट्टी यंत्राच्या साह्याने तुकडे करून घ्यावेत.
- मुरघासासाठी तयार केलेल्या खड्ड्यामध्ये प्रथमतः प्लॅस्टिकचा कागद सर्व बाजूंनी अंथरावा. त्यावर चारा पिकाच्या कुट्टीचा थर पसरवावा.
- इतर पद्धतीमध्ये चारापिकाची कुट्टी बॅगेत किंवा ड्रममध्ये किंवा बांबूच्या चौकटीत व्यवस्थित भरायला सुरवात करावी.
- मुरघास बनत असताना आंबवण प्रक्रियेला मदत करण्यासाठी आम्ल तयार होत असते. त्यासाठी काही उपायकारक जिवाणूंची गरज असते म्हणून अशा प्रकारचे जिवाणू जर कुट्टीबरोबर मिसळले तर मुरघास लवकर व उत्तम दर्जाचा तयार होतो. त्यासाठी अशा प्रकारचे जैविक संवर्धक आजकाल बाजारात उपलब्ध असतात. त्यांचा योग्य वापर चांगल्या दर्जाचा मुरघास होण्यासाठी आपण करू शकतो.
- मुरघास तयार करण्यासाठी कुट्टीवर युरिया, मीठ, उसाची मळी किंवा गूळ आणि खनिज मिश्रण हे पदार्थ वापरून योग्य प्रक्रिया केल्यामुळे मुरघासाची प्रत वाढवण्यास मदत होते.
प्रतिटन कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पदार्थ ः
- युरिया - 1 किलो
- मीठ - 1 किलो
- उसाची मळी किंवा गूळ - 2 किलो
- खनिज मिश्रण - 1 किलो
वरील घटक वेगवेगळे मोजून घेऊन 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याचे मिश्रण करावे. तयार झालेले मिश्रण कुट्टीवर शिंपडावे. चाऱ्याचा थर चांगला दाबून घ्यावा.
- कुट्टी व वरील मिश्रणाचे थरावर थर व्यवस्थित पसरवून कुट्टी व्यवस्थित दाबून घ्यावी. जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. थर भरताना पायाने किंवा घूमस वापरून त्यातील हवा बाहेर काढावी. जर हवा आत दबून राहिली तर त्यामध्ये बुरशी होऊन मुरघासाची प्रत कमी दर्जाची होऊ शकते.
- खड्डा / ड्रम / बॅग / बांबू सायलो इत्यादी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून उपलब्ध असणारा पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा वाळलेले गवत इत्यादी थर पसरून आच्छादन करावे.
- अशा प्रकारे तयार केलेल्या आच्छादनावर 4 ते 5 इंचांच्या मातीचा थर द्यावा. जेणेकरून हवाबंद स्थिती व्यवस्थित होईल. गरज भासल्यास वरून परत एकदा प्लॅस्टिक कापड झाकावे, त्यामुळे पावसाचे पाणी मुरघासामध्ये जाणार नाही.
- हवाबंद केलेला मूरघास हा 40 ते 50 दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो.

अशी होते मुरघासाची प्रक्रिया - - मुरघास तयार होताना वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन चारा आंबवला जातो. हिरव्या चाऱ्याच्या पेशींमध्ये मुरघास तयार होताना श्‍वसन प्रक्रियेचा वेग जास्त असतो. या श्‍वसन प्रक्रियेत प्राणवायूचा उपयोग केला जातो. हवाबंद स्थितीत प्राणवायू संपुष्टात आल्यानंतर बुरशीची वाढ होऊ शकत नाही. काही प्रकारचे जीवाणू चाऱ्यातील शर्करा व कार्बोदके यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आम्ल तयार करतात.
- लॅक्‍टिक ऍसिड आम्ल प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होते, तसेच ब्युटिरिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड ही अल्पशा प्रमाणात तयार होतात. या आम्लांच्या सान्निध्यात असलेल्या जिवाणूंची वाढ होत नसल्यामुळे चारा कुजत नाही. आम्लांचे प्रमाण वाढल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया थांबते. आंबवण्याची प्रक्रिया वाढते.

मुरघासाची प्रत - - मुरघास बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या आम्ल व अल्कोहोलमुळे मुरघासाला गोड-आंबट असा सुगंध व चव येते, त्यामुळे जनावरे अशा प्रकारे तयार झालेला मुरघास चवीने व आवडीने खातात.
- उत्तम प्रतीचा मुरघास सोनेरी पिवळसर रंगाचा असतो.

मुरघासाचे फायदे - - पावसाळ्यामध्ये आवश्‍यकतेपेक्षा अधिक उत्पादित झालेला हिरवा चारा मुरघासाच्या माध्यमातून टिकवून ठेवून उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढता येते.
- हिरवा चारा कापून जनावरांना खाऊ घालताना त्यातील काही अन्नघटकांचे होणारे नुकसान मुरघासाच्या माध्यमातून टाळता येऊ शकते.
- महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन दूध वाढण्यास व दुधामध्ये सातत्य टिकून राहण्यास मदत होते. जनावरांची भूक वाढते.
- जनावरांना लागणाऱ्या खुराकाची बचत होऊन खाद्यावर होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते.
- यातील तयार होणाऱ्या विविध आम्लांचा उपयोग शरीर पोषणासाठी होतो. वाळलेल्या चाऱ्यातील असणाऱ्या अन्नघटकांची कमतरता भरून निघते.
- मुरघास बनविण्याच्या पद्धतीमुळे पिकाखालील क्षेत्र मशागतीसाठी लवकर उपलब्ध होते. दुबार पीक घेणे शक्‍य होते.

मुरघासासाठी चारा पिकांची निवड - - मुरघासासाठी चारा पिकांची निवड करताना ते पीक लवकर फुलोऱ्यात येणारे व लवकर तयार होणारे असावे.
- पीक हिरवे आणि लुसलुशीत असावे. पिकाची फुलोरा येण्याआधीची अवस्था पीक कापणीसाठी योग्य असते.
- मुरघासासाठी निवडलेल्या पिकाचे खोड भरीव असावे. भरीव खोडाचे तुकडे व्यवस्थित होतात. अशा प्रकारच्या पिकांच्या खोडात भरपूर शर्करा व कार्बोदके असतात.
- मुरघासासाठी वापरण्यात येणाऱ्या चारा पिकामध्ये कापणीच्या वेळी पाण्याचे प्रमाण 60 ते 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावे. जर पाण्याचे प्रमाण 60 ते 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल तर 4 ते 5 तास पीक उन्हात वाळू द्यावे जेणेकरून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.

मुरघास द्यावयाची पद्धत - - 50 ते 60 दिवसांनी तयार झालेला मुरघास उघडल्यानंतर काही वेळ तसाच उघडा ठेवावा. आवश्‍यकतेनुसार हवा तेवढाच मुरघास काढून घ्यावा. मुरघास काढून घेतल्यानंतर उरलेला मुरघास प्लॅस्टिकच्या कागदाने परत तसाच झाकून ठेवावा.
- सर्वसाधारणपणे दिवसाला प्रत्येक गाईस 20 ते 25 किलो मुरघास द्यावा. मुरघासाचे प्रमाण दूध देण्याच्या क्षमतेवर व हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
- आपल्या आवश्‍यकतेनुसार खड्डा करावा. साधारणपणे 1 फूट x 1 फूट x 1 फूट आकाराच्या खड्ड्यात 15 ते 16 किलो मुरघास मावतो.

संपर्क - (020) 26926248/26926265
(लेखक बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, पुणे येथे कार्यरत आहेत.)

ठिबक सिंचनावरच करा कांदा लागवड

कांदा पिकासाठी ठिबक सिंचनाच्या वापराबाबत अभ्यासासाठी नगर जिल्ह्यातील पारनेर व कोपरगाव तालुक्‍यांतील प्रत्येकी पाच गावसमूहाची निवड करण्यात आली होती. प्रत्येक गावांतील कांदा उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरणारे व पारंपरिक सिंचन पद्धती वापरणारे प्रत्येकी तीन, अशा प्रकारे दोन तालुक्‍यांतील कांदा उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरणारे व पारंपरिक सिंचन पद्धती वापरणारे प्रत्येकी 30 शेतकरी निवडण्यात आले होते. ही माहिती सन 2011 या वर्षातील रब्बी कांदा उत्पादनाची आहे. उत्पादनासाठी वापरलेल्या निविष्ठांच्या किमती, तसेच कांदा उत्पादनासाठी मिळालेले सरासरी बाजारभाव मागील वर्षातील आहेत.

ठिबक सिंचन संच उभारणी खर्च ः

कांद्यासाठी ठिबक सिंचन संच उभारणीसाठी (जोडणी खर्चासहित) प्रति हेक्‍टरी सुमारे 1,09,868 रुपये इतका खर्च निवडलेल्या शेतावर दिसून आला आहे. त्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 65 टक्के इतका खर्च हा लॅटरल खरेदीसाठी होतो. कांदा हे जास्त रोपघनतेचे पीक असल्याने या पिकासाठी लागणारी लॅटरलची संख्या ही जास्त आहे, त्यामुळे ठिबक सिंचन संच उभारणी खर्च हा जास्त आहे.

कामनिहाय मजुरांचा वापर
कांदा उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरणाऱ्या व पारंपरिक सिंचन पद्धती वापरणाऱ्या शेतांवर लागणाऱ्या मनुष्य, बैल व यांत्रिक मजुरांचा तुलनात्मक वापर दिलेला आहे.

1) कांदा उत्पादनासाठी पारंपरिक सिंचन पद्धती वापरण्याऐवजी ठिबक सिंचन पद्धती वापरल्यामुळे अभ्यासासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर एकूण मनुष्य मजुरांच्या वापरात 13.74 टक्के इतकी, तर एकूण बैल मजूर वापरात 37.50 टक्के बचत झाली. 2) सिंचनासाठी लागणाऱ्या मनुष्य मजूर वापरात 204 टक्के इतकी बचत ठिबक सिंचन पद्धतीत दिसून आली. लागवडीसाठी व काढणीसाठी मात्र 11.37 टक्के इतकी बचत ठिबक सिंचन पद्धतीत दिसून आली आहे.
3) लागवडीसाठी व काढणीसाठी मात्र 11.37 टक्के व 6.56 टक्के इतके मजूर जास्त लागतात. कारण ठिबक सिंचन पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या सलग सरीमुळे प्रति हेक्‍टरी रोपांची संख्या जास्त असते.

उत्पादन खर्च, उत्पन्न व नफा ः
ठिबक सिंचन पद्धतीच्या वापरामुळे पारंपारिक सिंचन पद्धतीच्या तुलनेत कांदा उत्पादनामध्ये दिसून आलेली वाढ व त्यामुळे वाढलेले उत्पन्न व नफा तक्ता 2 मध्ये देण्यात आलेला आहे.

1) परंपरागत पद्धतीत प्रति हेक्‍टरी उत्पादन हे 235.23 क्विंटल इतके, तर ठिबक सिंचन पद्धतीच्या कांदा लागवडीचे प्रति हेक्‍टरी एकूण उत्पादन हे 288.03 क्विंटल मिळाले. हे उत्पादन परंपरागत सिंचन पद्धतीपेक्षा 22.45 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. परंपरागत पद्धतीनुसार कांदा पिकातून प्रति हेक्‍टरी उत्पन्न 1,71,631.62 रुपये इतके, तर ठिबक सिंचन पद्धतीत 2,16,926.28 रुपये इतके मिळाले. म्हणजे उत्पन्नात 26.29 टक्के इतकी वाढ दिसून येते.
2) ठिबक सिंचन पद्धतीने कांदा उत्पादन घेताना येणारा एकूण खर्च हा प्रति हेक्‍टरी 1,28,632.05 रुपये असून, तो पारंपरिक सिंचन पद्धतीपेक्षा 11 टक्के इतका जास्त आहे, परंतु एकूण उत्पन्नात होणारी वाढ ही मात्र 26 टक्के असल्यामुळे ही सिंचन पद्धती फायद्याचीच ठरते.
3) कांदा उत्पादनासाठी होणाऱ्या नफा-खर्चाचे गुणोत्तर हे पारंपरिक पद्धतीत 1.48 इतके, तर ठिबक सिंचन पद्धतीत 1.69 इतके आहे.

सिंचनासाठी पाणी व वीजवापर ः
कांदा उत्पादनासाठी वापरात येणाऱ्या ठिबक सिंचन व पारंपरिक सिंचन पद्धतीत होणारा पाण्याचा व विजेचा वापर यांची तुलनात्मक माहिती तक्ता 3 मध्ये दिली आली आहे.
(अश्‍वशक्ती, तास = विद्युत पंपाचे तास x विद्युत पंपाची क्षमता (अश्‍वशक्ती)
(किवॉ, तास = विद्युत पंपाचे तास x 0.750 किवॉ)
(वीजवापर किंमत = रु. 3.50/किवॉ)

1) कांदा उत्पादनासाठी पाण्याचा वापर पारंपरिक सिंचन पद्धतीनुसार 693 अश्‍वशक्ती, तास/हेक्‍टर इतर, तर ठिबक सिंचन पद्धतीनुसार 540 अश्‍वशक्ती, तास/हेक्‍टर इतका आहे, म्हणजेच 22.08 टक्के इतकी पाण्याची बचत ठिबक सिंचन पद्धतीमुळे झाली.
2) प्रति क्विंटल कांदा उत्पादन लक्षात घेता असे दिसून येते, की ठिबक सिंचनावरील प्रति क्विंटल कांदा उत्पादनासाठी 1.87 अश्‍वशक्ती तास, तर पारंपरिक सिंचनाने 2.95 अश्‍वशक्ती, तास इतके पाणी वापरले जाते, म्हणजेच प्रति क्विंटल 36.31 टक्के पाण्याची बचत झाली आहे.
3) कांदा पिकाच्या सिंचनासाठी होणारा पाण्याचा वापर बघता असे दिसते, की पारंपरिक पद्धतीत प्रति हेक्‍टरी 519.75 कि.वॉ. तास, तर ठिबक सिंचन पद्धतीत प्रति हेक्‍टरी 405 कि.वॉ. तास इतकी, म्हणजेच परंपरागत सिंचन पद्धतीपेक्षा 22.08 इतकी कमी वीज वापरली जाते. हेच प्रमाण प्रति क्विंटल कांदा उत्पादनामध्ये 36.20 इतकी वीज बचत होत असल्याचे दिसते.

कांदा पिकासाठीच्या ठिबक सिंचन संचावरील गुंतवणुकीची आर्थिक व्यवहार्यता
कांदा पिकासाठी वापरात येणाऱ्या ठिबक सिंचन संचावरील प्रति हेक्‍टरी गुंतवणुकीची आर्थिक व्यवहार्यता संशोधन अभ्यासातून काढली आहे. त्यावरून असे स्पष्ट होते, की या गुंतवणुकीचे नफा-खर्च गुणोत्तर हे 1.69, तर आंतरिक परतावा दर हा 45.38 टक्के इतका आहे. म्हणून ही गुंतवणूक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे.

कांदा उत्पादनासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञान वापरात येणाऱ्या अडचणी ः अभ्यास प्रकल्पासाठी निवडण्यात आलेल्या ठराविक शेतकऱ्यांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते, की प्रामुख्याने ठिबक सिंचन संचासाठी लागणारा गुंतवणूक खर्च जास्त असणे (80 टक्के), आर्थिक मदत वेळेत न मिळणे (50 टक्के), कमी दाबाने व अनियमित वीजपुरवठा (73 टक्के), अनुदान किंवा कर्ज मिळविण्यासाठीची किचकट प्रक्रिया (60 टक्के), तसेच उंदरांच्या उपद्रवामुळे ठिबक संचाचे होणारे नुकसान (57 टक्के) या अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले.

असे आहेत निष्कर्ष ः 1) रब्बी कांदा उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे पारंपरिक सिंचन पद्धतीच्या तुलनेत मनुष्य मजूर (13.74 टक्के) , बैल मजूर (37.50 टक्के), पाणी (36.61 टक्के) आणि वीज (36.20 टक्के) इतकी बचत झाली.
2) कांदा उत्पादन 22.45 टक्‍क्‍यांनी वाढले. कांद्याची प्रतदेखील सुधारलेली दिसते.
3) ठिबक सिंचन संचावर केलेल्या गुंतवणुकीचे नफा-खर्चाचे गुणोत्तर 1.69 इतके, तर आंतरिक परतावा दर हा 37.31 इतका आहे. म्हणून ही गुंतवणूक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे.

संपर्क ः 02426-243236
(लेखक कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

वर्धा जिल्ह्यातील शेतकरी झाले तूरडाळ उद्योजक

सिंचन सुविधांचा अभाव असल्याने मराठवाडा, विदर्भात कपाशी, सोयाबीन व त्यात आंतरपीक म्हणून तूर, मूग, उडीद यासारखी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. ए. एन. पाटील यांच्या मते राज्यात तूर लागवडीखाली सुमारे साडेदहा लाख हेक्‍टर क्षेत्र असून त्यातील मोठे क्षेत्र मराठवाडा व विदर्भात आहे. विदर्भात सुमारे साडेपाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची लागवड होते. त्यात अमरावती, यवतमाळ या दोन जिल्ह्यांतच प्रत्येकी एक लाख हेक्‍टर इतक्‍या मोठ्या क्षेत्रावर तुरीची आंतरपीक म्हणून लागवड होते.

वर्धा होतोय तूर प्रक्रिया उद्योगाचा हब तूर लागवडीवर आधारित सर्वाधिक म्हणजे सुमारे 125 प्रक्रिया उद्योग अकोला औद्योगिक परिक्षेत्रात आहेत. लक्षावधी क्‍विंटल तुरीवर या ठिकाणी प्रक्रिया होत ही डाळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोचते. या उद्योगात व्यापाऱ्यांची असलेली मक्‍तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न वर्धा जिल्ह्यात शेतकरी समूहाद्वारे करण्यात आला आहे. येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शेतकऱ्यांमध्ये उद्योजकतेची बीज रोवण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यात सुमारे 55 हजार हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची लागवड होते. उत्पादित तुरीवर स्थानिक स्तरावरच प्रक्रिया झाल्यास त्याद्वारे शेतकऱ्यांचेच हित साधेल या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे प्रयत्न जिल्ह्यात झाले. गाव-पाड्यावर शेतकरी समूहांच्या बैठकी घेण्यात आल्या. तूर व तत्सम कडधान्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीस गती आली. आज सुमारे 19 शेतकरी समूहांद्वारे जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांत 19 डाळ प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीचे काम पूर्णत्वास गेले आहे.
समूहांच्या माध्यमातून हजारोवर क्‍विंटल तुरीवर प्रक्रिया होत लक्षावधी रुपयांची उलाढाल या व्यवसायात शेतकऱ्यांद्वारे होत आहे.

शेतकरी समूहाने कमावला नफा कवठा रेल्वे येथील "चकाचक' नावाच्या शेतकरी समूहाने 2010-11 या वर्षात डाळमिलची उभारणी केली. या प्रकल्पाचा खर्च सुमारे दोन लाख 55 हजार रुपये होता. कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून अनुदान म्हणून 89 हजार रुपये देण्यात आले. उद्योग उभारणीच्या पहिल्याच वर्षी गटातील सदस्यांकडील 20 क्‍विंटल तर अन्य शेतकऱ्यांकडील 200 क्‍विंटल डाळीवर प्रकिया करण्यात आली. या माध्यमातून समूहाला 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. सन 2011-12 मध्ये समूहातील सदस्यांच्या 50 क्‍विंटल तर त्याबाहेरील शेतकऱ्यांच्या 350 क्‍विंटल डाळीवर प्रक्रिया करण्यात आली. या माध्यमातून समूहाला 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचा ताळेबंद समूहाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर दिवाणे यांनी सादर केला. सन 2012-13 मध्येही एकूण डाळ प्रक्रियेतून एक लाख 25 हजार रुपयांचा नफा झाला.

मिनी दालमिलही आली उपयोगात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे निर्मित मिनी दालमिल शेतकऱ्यांकडे पाहण्यास मिळते. त्याद्वारे दिवसाकाठी 18 ते 19 क्‍विंटल तुरीवर प्रकिया होते. हंगामात 19 दालमिलच्या माध्यमातून चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत प्रक्रिया केली जाते. त्या नंतरच्या काळात हरभरा, गहू या पिकांसाठी त्याचा वापर केला जातो. हरभराडाळ मागणीनुसार तयार करून दिली जाते. त्यासाठी ठराविक शुल्काची आकारणी केली जाते.

हिंगणी येथील विनोद डेकाटे अध्यक्ष असलेल्या समूहाने एक लाख 80 हजार रुपये खर्चून उभारलेल्या उद्योगाकरिता 90 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. सन 2012-13 मध्ये त्यांनी व्यवसायात भरारी घेतली. सरत्या वर्षात 1.65 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना झाला. 350 रुपये प्रति पोत्याप्रमाणे 432 तुरीच्या पोत्यांवर समूहाने प्रक्रिया केली.

दाळ उत्पादक संघाने दिले बळ पिकवलेल्या तुरीची बाजार समितीत विक्री करून मिळणारे उत्पन्न करणे व त्याच तुरीवर प्रक्रिया करून मिळणारे उत्पन्न यातील फरक शेतकऱ्यांच्या मनात रुजविण्यात आला. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करावी लागल्याचे भाऊसाहेब बऱ्हाटे सांगतात. तूर उत्पादकांना प्रक्रियेनंतर प्रति क्विंटल 1200 ते 1500 रुपये अतिरिक्‍त मिळू लागले आहेत. गावपातळीवर रोजगार निर्मितीचा हेतूही साध्य झाला आहे. शेतकऱ्यांना सामूहिक स्तरावर विक्रीचे धोरण ठरविता यावे, व्यावसायिक वा बाजारपेठेतील अडचणींचा निपटारा करता यावा यासाठी वर्धा जिल्हा डाळ उत्पादक संघ स्थापन करण्यात आला आहे. संघाची रीतसर नोंदणीही झाली आहे.

माई ब्रॅंडनेमने विक्री आजच्या काळात ब्रॅंडिंगशिवाय मालाला बाजारपेठ उपलब्ध करणे शक्‍य होत नाही ही बाब हेरत शेतकऱ्यांद्वारे उत्पादित डाळीला ब्रॅंडनेम देण्याचा विचार पुढे आला. अनेक कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात सिने कलावंतांद्वारे होते. त्याच धर्तीवर सामाजिक क्षेत्रातील वलय प्राप्त व्यक्‍तीचे नाव या उपक्रमासाठी वापरण्याचे ठरले. चर्चेअंती हजारो निराधारांची माय असलेल्या सिंधूताई सपकाळ (पुणे) यांचे नाव पुढे आले. त्यांना ही संकल्पना आवडल्याने कोणतेच आढेवेढे न घेता शेतकरी हिताच्या या उपक्रमाला आपले नाव देण्यास त्यांनी होकार दिला. त्यानंतर वर्धा जिल्ह्यात उत्पादित या शेतमालाचे ब्रॅंडिंग "माई' नावाने करण्यात येऊ लागले. प्रायोगिक स्तरावर पहिल्या टप्प्यात कृषी विभागाद्वारे आयोजित धान्य महोत्सवाच्या माध्यमातून डाळींचे ब्रॅंडिंग करण्यात आले. आता किराणा तसेच मॉलमधूनदेखील हा ब्रॅंड "प्रमोट' करण्याचे प्रयत्न शेतकरी व कृषी विभाग सामूहिकपणे करणार आहे.

"आपुलकी' या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थेच्या माध्यमातूनही त्याचे प्रमोशन झाले. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या संगीत रजनीचे आयोजन लंडन येथे सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. यानिमित्ताने शेतकऱ्यांचा "माई' तुरडाळीचा ब्रॅंड थेट लंडन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला.

शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांनी धाडसाने उभारलेल्या तुरीवरील प्रक्रिया उद्योगाला मोठ्या उद्योगाच्या धर्तीवर व्यावसायिक दराने वीजपुरवठा होतो. वीज देयकाचा आकडा फुगत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. शासनाने शेतकरी उद्योजकांना लघुउद्योग श्रेणीतील "डी' झोनमधील दरानुसार सवलतीत वीज पुरविण्याची मागणी आहे. हे शक्‍य नसल्यास वीजपंपाला आकारण्यात येणारे दर उद्योगाला लावण्याची मागणी आहे.

शासनाने महिला समूहांना रॉकेल व स्वस्त धान्य दुकानाचे परवाने देण्याचे धोरण राबविले. त्याच धर्तीवर शेतकरी उद्योजकांद्वारे उत्पादित तूर व हरभराडाळ शासकीय आश्रमशाळांना पुरविण्याचे धोरण आखल्यास शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. "नाबार्ड'च्या योजनेतून शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम व्यवस्था अपेक्षित आहे.

संपर्क -
भाऊसाहेब बऱ्हाटे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
9423788600

ज्ञानेश्‍वर दिवाणे
अध्यक्ष, वर्धा दालमिल संघ
8888882801

दहा वर्षांच्या सेंद्रिय शेतीतून मिळवले फायदेच फायदे -

अवर्षणप्रवण जामनेर तालुक्‍यातील सोनाळा गाव अवलीबाबांच्या समाधिस्थळामुळे प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी पावसाळा बऱ्यापैकी झाल्यास विहिरींची पाणीपातळी टिकून असेपर्यंत शक्‍य तितकी शेती ओलिताखाली आणून जिरायतेतही चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. याच गावातील भीमराव पाटील यांची शेती लक्षवेधी आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते पूर्णपणे सेंद्रिय शेती करतात. परिसरातील बहुतांश शेतकरी रासायनिक शेती पद्धतीचा अवलंब करीत असताना पाटील यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारला आहे.

सेंद्रिय शेतीची सुरवात व विकास रासायनिक शेतीतून मिळणारे उत्पादन, त्यासाठी लागणारा खर्च व मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्याचे चालले होते. जमिनीचा कस हा चिंतेचा विषय होता. त्यामुळे सुमारे बारा वर्षांपूर्वी आठ गुंठ्यांपासून पाटील यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. कापूस हे त्यांचे मुख्य पीक.
सेंद्रिय शेतीबाबत त्यांनी अनेक माहिती घेतली होती. मात्र ऐकावे जनाचे, करावे मनाचे या उक्तीप्रमाणे ते सेंद्रिय शेतीचे विविध प्रयोग करू लागले. सुरवातीला कपाशीत आंतरपिके घेण्याचे प्रयोगही त्यांनी केले.

सेंद्रिय पद्धतीचे फायदे दिसू लागल्यानंतर पाटील यांना आत्मविश्‍वास आला.
आता अलीकडील वर्षापासून त्यांनी त्याचा विस्तार करीत सेंद्रिय पद्धतीची बहुमजली शेती करण्यास सुरवात केली आहे.
ही पीक पद्धती अशी आहे.

-यंदा 72 गुंठ्यांत ही पद्धती असून मुख्य पीक कपाशी आहे. (चार बाय एक फूट अंतरावर)
-कपाशीच्या आठ ओळींनंतर तुरीची ओळ. याच ओळीत उडीद, मूग, चवळी, मटकी, बाजरी, चिकणी ज्वारी, सोयाबीन, लाल अंबाडी, मका आदी पिके आहेत.
-मका काढणीनंतर रिकाम्या झालेल्या शेतात रब्बी हंगामात गहू
- मागील वर्षी त्यातून मिळालेले उत्पादन- (दीड एकरातील)

कपाशी- 15 क्विंटल
-उडीद- 70 किलो
-मूग- 50 किलो
-तूर- दोन क्विंटल
सोयाबीन- 35 किलो
भुईमूग- एक क्विंटल.
-या वर्षीचा एकरी नफा- 50 हजार रुपये

सन 2013 चे उत्पादन

मका- 20 गुंठे- 12 क्विंटल

70 गुंठ्यांतील उत्पादन-
उडीद- 90 किलो
मूग- 70 किलो
भुईमूग- दोन क्विंटल
तीळ- 20 किलो
कपाशी- अद्याप यायचे आहे.

सन 2011 चा एकरी नफा- 40 हजार रु. नफा

बहुमजली पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे टप्प्याटप्प्याने उत्पादन व उत्पन्न मिळते. एका पिकातून नुकसान झाले तर दुसऱ्या पिकातून भरून निघते. घरचे बियाणे, गांडूळ खतासह जिवामृत, गोमूत्र अर्क, निंबोळी अर्काचा वापर केल्यामुळे एकरी 10 ते 12 हजारांपर्यंत खर्च येतो.

दर व उत्पन्न
-कपाशी व मक्‍याची विक्री नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांनाच होते. दरही इतरांना मिळतो तसाच मिळतो.
-उडीद, मूग किंवा द्विदल धान्यासाठी पाटील यांचे नियमित ग्राहक आहेत. ते बाजारभावापेक्षा किमान 15 ते 20 रुपये अधिक देऊन हे धान्य खरेदी करतात.
-लाल अंबाडीचे सरबत तयार करूनही पाटील यांनी मागील वर्षी धान्य महोत्सवात विकले. या सरबतापासून त्यांना 15 ते 20 हजार रुपये अतिरिक्त मिळतात.

फायदा 1
पाटील म्हणतात, की पूर्वी रासायनिक शेतीत खर्च मोठ्या प्रमाणात व्हायचा. आता एकरी उत्पादन तेवढेच होते, मात्र एकरी खर्चाचे प्रमाण खूप कमी झाले आहे.

फायदा 2
आता सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची प्रतही सुधारली आहे.

सेंद्रिय शेतीचा मार्ग खडतर सेंद्रिय शेतीच्या पहिल्या वर्षी म्हणजे नेहमीपेक्षा कमी उत्पादन मिळाले. तरीही पाटील यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही. मात्र हळूहळू खर्च कमी होऊ लागला. उत्पादन स्थिर राहू लागले. काही वेळा थोडे अधिक मिळू लागले. रासायनिक खतांसह कीडनाशकांचा वापर टाळल्याने उत्पादन खर्चात बचत झाली. आंतरपिकांचे बोनस उत्पादन मिळू तर लागले. कपाशीचे कमी खर्चात एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणे शक्‍य झाले.

पाटील यांच्या सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये - 1) जिवामृत, बायोडायनॅमिक खत, गांडूळ खताचा वापर करीत जमिनीची सुपीकता वाढविण्याकडे लक्ष.
2) गोमूत्र, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची फवारणी करीत पीक संरक्षण
3) पिकांचे अवशेष व तण उपटून बाहेर फेकण्याऐवजी शेतातच त्यांचे आच्छादन करण्यावर भर.
4) पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर.
5) कमी शेतीमुळे (72 गुंठे) बैलजोडी ठेवणे शक्‍य होत नसल्याने आंतरमशागतीसाठी सायकल व हस्तचलित कोळप्याचा वापर.
6) मिश्र पीक पद्धतीमुळे सापळा पिकांचा हेतू साध्य होतो. ज्वारीचे पक्षीथांबे तयार होतात. रासायनिक वातावरण परिसरात नसल्याने मित्रकीटकांची संख्या वाढते. त्यामुळे पीक संरक्षण चांगले होते.
6) सेंद्रिय शेतीमालाला परिसरातच ग्राहक उपलब्ध

-केवळ सेंद्रिय शेतीमुळे शेतीतील वाढता खर्च कमी करून मी माझे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवले आहे.
माझ्या या वाटचालीत पाचोरा येथील (जि. जळगाव) प्रयोगशील सेंद्रिय उत्पादक विश्‍वासराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

""जामनेर तालुक्‍यात सेंद्रिय शेतीची संकल्पना रुजविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या भीमराव पाटलांचे प्रयोग बघून सुरवातीला गाव परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः वेड्यात काढले होते. मात्र आता त्यांची यशस्वी शेती पाहून आजूबाजूचे शेतकरी चौकशी करतात. वेळप्रसंगी सेंद्रिय शेतीविषयी सल्लाही विचारतात.
-दशरथ पाटील, शेतकरी सोनाळा

""भीमराव यांच्यासोबत आम्हीही सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला होता. मात्र नंतर त्यात सातत्य ठेवता आले नाही. भीमरावांनी मात्र सेंद्रिय शेतीची कास सोडली नाही. आता ते जामनेर तालुक्‍यात सेंद्रिय शेतकरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
-दीपक पाटील, शेतकरी सोनाळा

(संपर्क - भीमराव पाटील, 7875092275)

शेततळ्यातील मत्स्यपालनातून दिली शेतीला आर्थिक जोड

पिंपरी बुद्रुक (ता. खेड, पुणे) येथील कैलास ठाकूर यांची वडिलोपार्जीत तसेच खरेदी केलेली अशी एकूण सुमारे 30 एकर शेती आहे. उल्हास, कैलास, दत्तात्रय, बाबाजी अशा चार भावांचे मिळून कुटुंब शेतीवरच अवलंबून आहे. उल्हास यांचे 1993 मध्ये निधन झाल्याने सर्व जबाबदारी कैलास यांच्यावर आली. सध्या कैलास व दत्तात्रय हे दोघे शेती करतात, तर बाबाजी पिंपरी येथील नामांकित कंपनीत व्यवस्थापक आहेत. सुट्टीच्या दिवशी तेही शेतात मदत करतात.

शेतीला दिली जोडधंद्यांची जोड ठाकूर यांच्याकडे सध्या ऊस, हळद, केळी, चारा पिके, भात व फळबाग अशी सुधारित पद्घतीने घेतलेली विविध पिके आहेत. उत्पन्नाला जोड म्हणून कुक्कुटपालनास सन 2000 मध्ये सुरवात केली. एक-दोन वर्षे त्यातील बारकावे लक्षात आले. प्रति वर्षी त्यातून सरासरी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न ते मिळवत होते. त्यात थोडा जम बसला असे वाटल्यानंतर आणखी जोडव्यवसाय असावा म्हणून त्यांनी मत्स्यव्यवसायास सुरवात केली. सध्या दोन्ही व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू आहेत.

मत्स्यव्यवसायास सुरवात -ठाकूर कृषी विभागाच्या संपर्कात कायम असतात. कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यातून शेततळे व मत्स्यशेतीची काही ठिकाणी प्रात्यक्षिके त्यांच्या पाहण्यात आली. आपल्या पडीक शेतात आपण हा प्रयोग राबवू शकतो असे ठाकूर यांना वाटले. त्यासाठी भिगवण, हैदराबाद, खोपोली येथे पाहणी त्यांनी केली. मत्स्य व्यापाऱ्यांना भेटून मार्केटसंबंधी माहिती घेतली. अखेर या व्यवसायात उतरण्याचे नक्की केले. त्या दृष्टीने 2010-11 मध्ये 20 बाय 20 मीटर लांबीचे शेततळे घेतले. त्यात हडपसर येथील मत्स्यबीज केंद्रातून रोहू व कटला या जातींचे सातशे रुपये प्रति एक हजार या प्रमाणे मत्स्यबीज आणले. त्यांना घरचेच भरडधान्य, शेण, टाकाऊ भाजीपाला असा तीन दिवसाला एकत्रित 10 किलो याप्रमाणे सहा महिने खाद्य दिले. मात्र पहिलाच अनुभव असल्याने व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे शक्‍य झाले नाही. मरतुकीचे प्रमाण झाले. सहा महिन्यांनी हे मत्स्योत्पादन बंद केले.

मांगूर जातीचे व्यवस्थापन - रोहू व कटलाचे उत्पादन घेणे बंद केल्यानंतर पश्‍चिम बंगालमधील गंगासागर येथून व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने माशाच्या मांगूर जातीची एक लाख बोटुकली खरेदी केली. त्यासाठी 65 हजार रुपये गाडीभाडे दिले.
माशाची ही जात मांसाहारी खाद्यावर वाढत असल्यामुळे "मटन शॉप'मधून शिल्लक राहिलेले खाद्यान्न गोळा केले. कुट्टी मशीनद्वारे खाद्याची कुट्टी करून माशांना ते दररोज दिले. सुमारे 45 ते 50 दिवसांनी प्रथम चाळणी निवड करून 400 ते 500 ग्रॅम वजनाची वाढ झालेले मासे दुसऱ्या शेततळ्यात सोडले.
पुन्हा त्यांची वाढ झाल्यानंतर हे मासे तिसऱ्या शेततळ्यात चाळणीद्वारे सोडले. माशांना लागणारे खाद्य भोसरी, पिंपरी, चिंचवड आदी भागांतून स्वत:च्या वाहनातून आणले जाते. दर दोन महिन्यांनी माशांच्या पिलांची भूक वाढविण्यासाठी टॉनिक देण्यात आले. पाणी स्वच्छ होण्यासाठी तुरटी व पोटॅशिअम परमॅग्नेट ठराविक प्रमाणात दर महिन्याला वापरले. त्याचप्रमाणे दहा दिवसांनंतर शेततळ्यातील पाणी पिकांना देण्यात येते. तळ्याची पाणीपातळी राखण्यासाठी जुने पाणी बदलून नवे पाणी विहिर व नदीतून उपलब्ध होते. दर दहा- बारा दिवसांनी हे पाणी तळ्यात टाकले जाते.

मत्स्यपालनाचा ताळेबंद ठाकूर यांनी आत्तापर्यंत प्रति सहा महिन्यांची एक याप्रमाणे दोन बॅचचे उत्पादन घेतले आहे. तिसरी बॅच सध्या सुरू अवस्थेत आहे. प्रति सहा महिन्यांची एक बॅच वा युनिट धरले आहे. यात सुमारे एक लाख बोटुकली वाढवली जातात. दर सहा महिन्यांनी ती गंगासागर येथून खरेदी केली जातात. एक किलोपर्यंत वजन होण्यापर्यंत मासे वाढवले जातात. अर्थात सर्वच्या सर्व बोटुकली काही एक किलो वजनापर्यंत पोचत नाहीत.
ठाकूर यांच्या अनुभवानुसार त्यांना प्रति बॅच सुमारे 40 हजार किलो म्हणजे 40 टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे.
अर्थात योग्य नियोजन व खाद्याचे व्यवस्थापन त्यासाठी करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

माशांची विक्री - मिळणारा दर (प्रति किलो)
माशांना प्रति किलो 60, 65 रुपयांपासून ते अगदी 100, 105 रुपयांपर्यंत दर मिळतो. माशांना मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे ठाकूर म्हणाले. पुणे, पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण एमआयडीसी या ठिकाणी विक्री केली जाते, तसेच काही व्यापारी शेततळ्याच्या ठिकाणी येऊनही स्वतः मासे खरेदी करतात.

उत्पादन खर्च - - सुरुवातीला म्हणजे पहिल्या बॅचसाठी तो प्रति बॅचसाठी दहा लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो.
यात बोटुकली, खाद्य, वाहतूक, मजुरी, औषधे, जाळी, वीज आदींचा समावेश आहे.
सुरवातीला हे मत्स्यपालन कसे करायचे हे माहीत नसल्याने गंगासागर भागातील अनुभवी व्यक्ती येथे आणाव्या लागल्या. तोही खर्च जमेत धरावा लागतो. एका युनिटसाठी तीन शेततळी लागतात. त्याचाही खर्च करावा लागतो.
पहिले शेततळे 150 बाय 100 फूट व आठ फूट खोलीचे लागते. अन्य दोन शेततळी 50 बाय 50 फूट व पाच फूट खोलीचे चालते.
दर सहा महिन्याला नवीन मत्स्यबीजाची खरेदी करून ते तळ्यात सोडले जाते. त्यासाठी 30 दिवस आधी मत्स्यबीजाची नोंदणी करावी लागते. तळ्यासाठी एकूण 30 गुंठे जमीन ठाकूर यांनी गुंतवली आहे.
अर्थात सुरवातीचा भांडवली खर्च सोडला तर नंतरच्या बॅचसाठी तो कमी होतो असे ठाकूर म्हणतात.

पिकांना होतोय फायदा तळ्यातील पाणी माशांची विष्ठा व विविध घटकयुक्त असल्यामुळे ते पिकांना व फळझाडांना मानवते. हा मोठा फायदा असून सध्या हळद, ऊस, भात, आंबा, नारळ आदी फळपिके ठाकूर यांनी पोसवली आहेत.
आगामी काळात आणखी शेततळे घेऊन मत्स्यव्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

संपर्कः
कैलास ठाकूर - 9822959872
पिंपरी बुद्रुक, ता. - खेड, जि. - पुणे
9552875067

उच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर

बीएसी, पुढे एमए (इंग्रजी) व बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण करून सुरेश काळे यांनी शिक्षकी पेशाच्या नोकरीची प्रतीक्षा केली. मात्र अपेक्षित यश काही मिळाले नाही. अखेर त्यांनी पूर्ण वेळ वडिलोपार्जीत शेतीतच उतरण्याचे ठरवले. लहानपणापासूनच वडिलांसोबत बाजारपेठेत जाणे, तिथले वातावरण, उलाढाल सुरेश यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती. आज हेच शेतीचे संस्कार घेऊन त्यांची पुढील वाटचाल सुरू आहे. सन 1984-85 पासून वडील करीत असलेली फ्लॉवरची शेती सुरेश यांनी आजही कायम ठेवीत ती यशस्वी केली आहे.

जायकवाडी कालव्याला लागून व डांबरी सडकेला खेटूनच सुरेश यांची शेती आहे. त्यांची सुमारे 14 एकर शेती असून, त्यातील सहा एकर शेतीतील उत्पन्नातून घेतली आहे. आई, वडील, दोन भाऊ व बहीण असा सुरेश यांचा परिवार आहे. वडील पूर्ण वेळ शेतीकडेच लक्ष देतात. मोठा भाऊ ट्रॅक्‍टरचे काम तर सुरेश शेतीचे व्यवस्थापन व विशेष करून मार्केटिंग पाहतात.

एकूण क्षेत्रापैकी आठ एकर कापूस, साडेचार एकर मोसंबी व मोसंबीच्या नव्या दोन एकर बागेत आंतरपीक म्हणून फ्लॉवर आहे. मोसंबीचे उत्पादन सुरू होण्यासाठी कालावधी असल्याने आंतरपिकाचा खटाटोप केला आहे.
दोन एकरांवर ऊस आहे.

फ्लॉवर शेतीत ठेवले सातत्य गोलटगावचे केशवराव साळुंके हे सुरेश यांचे मामा. त्यांचा आग्रह व प्रोत्साहनातून काळे यांच्याकडे फ्लॉवर पिकू लागला. गेल्या अनेक वर्षांपासून या पिकात सातत्य राखत आल्याने त्यातील अनेक बारकावे अवगत झाल्याचे सुरेश सांगतात. मात्र एकाच भागात सतत हे पीक न घेता प्रत्येक वेळी जमिनीची फेरपालट केली जाते. जमीन भारीची व काळी असून सततच्या मशागतीमुळे व चांगल्या खत व्यवस्थापनामुळे जमिनीचा पोत चांगला राखला आहे. कमी कालावधीत फ्लॉवरपासून नगदी उत्पन्न मिळत असल्याने त्याचा फायदा अन्य पिकांच्या व्यवस्थापनासाठी होतो.

फ्लॉवरची लागवड - दर वर्षी किमान दोन एकर क्षेत्र या पिकाचे असते; परंतु या वर्षी एकूण 60 गुंठ्यांत म्हणजे प्रत्येकी तीस गुंठ्यांत व 28 दिवसांच्या अंतराने अशी दोन टप्प्यांत लागवड केली आहे. पहिल्या टप्प्याचे रोप लागवडीसाठी तयार झाले, की दुसऱ्या टप्प्याच्या फ्लॉवरचे बियाणे टाकण्यात आले.

यंदाचा प्रातिनिधीक अनुभव असा सांगता येईल. सर्वप्रथम 3 x 8 फूट आकाराचे गादीवाफे तयार करून घेतले. त्यात प्रत्येकी दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत व तीन किलो डीएपी खत टाकले. बियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली.

रोपाची पुनर्लागवड - फ्लॉवर रोपांची लागवड मोसंबीच्या 17 बाय 17 फूट लागवडीच्या नव्या बागेत आंतरपीक म्हणून केली आहे. बागेतील दोन ओळीत 2.5 x 1.5 फूट अंतरावर फ्लॉवर रोपाची पुनर्लागवड केली, त्या वेळी रोपांची मुळे प्रथम बुरशीनाशक द्रावणात व त्यानंतर शेण-गोमूत्र काल्यात बुडवून घेतली. पहिल्या टप्प्यातील 30 गुंठे लागवड जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दुसऱ्या टप्प्यातील 30 गुंठे लागवड ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केली.

पीकसंरक्षण - भाजीपाला पिकाला वेळेवर पाणी देणे तेवढेच महत्त्वाचे असते. या वर्षी ऑगस्ट वगळता वेळोवेळी पाऊस पडत राहिला. फक्त ऑगस्ट मध्येच दोन संरक्षित पाणी द्यावे लागले. सततचा पाऊसही फ्लॉवरला चालत नाही व पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतरही जास्त चालत नाही. जास्त पावसात फ्लॉवर सडण्यास सुरवात होते, तसेच किडींचाही प्रादुर्भाव जास्त होतो. लागवडीच्या सुरवातीपासूनच या वर्षी वातावरण ढगाळ होते, त्यामुळे दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या. अळी पानाच्या मागील बाजूस जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ती लवकर दिसत नाही; पण पानावर चट्टे पडलेले दिसले की अळीचा प्रादुर्भाव आहे हे इतक्‍या वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आले.

उत्पादन व विक्री - आत्तापर्यंत फ्लॉवरची एकूण क्षेत्रातून सुमारे 700 पोती एवढी विक्री झाली आहे. प्रति पोत्यात सुमारे 15 ते 17 किलो माल बसतो. सुरवातीला दर 300 ते 500 रुपये प्रति पोते याप्रमाणे मिळाला.
कमाल दर पाचशे ते साडेपाचशे रुपयांपर्यंत पोचला होता. सरासरी दर 400 ते 450 रुपयांपर्यंत राहिला.
वडीगोद्रीच्या आसपास अंबड, पाचोड, विहामांडवा, रोहीलागड, जामखेड हे प्रमुख व मोठे बाजार भरतात. तेथील किरकोळ व्यापाऱ्यांना फ्लॉवरची विक्री केली जाते. काही ठराविक व्यापारी तर बाजाराच्या एक दिवस अगोदरच मालाची आगाऊ नोंदणी करतात. त्यांच्या मागणीप्रमाणे माल काढला जातो.

चांगल्या अनुभवातून मिळते यश सुरेश म्हणतात, की पावसाळी व हिवाळी अशा दोन हंगामांत आम्ही हे पीक घेतो. पावसाळी हंगामात एकरी 450 पोत्यांपर्यंत माल मिळतो. अर्थात या हंगामातील वाण हे पुनर्लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांत पक्व होणारे असतात. प्रतिगड्ड्याचे वजन 700 ग्रॅम ते एक किलोपर्यंतही भरते. हिवाळी हंगामातील वाण मात्र 85 ते 95 दिवसांत पक्व होणारे असल्याने पावसाळी हंगामापेक्षा उत्पादनाही दुुपट्टीपर्यंत मिळते. गड्ड्याचे वजन कमाल तीन ते चार किलोपर्यंत भरते. हिवाळी हंगामातील फ्लॉवरला पावसाळी हंगामाच्या तुलनेत दर मात्र कमी मिळतात. प्रत्येक हंगामात अडचणींचे स्वरूप वेगळे असते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव ही समस्या पावसाळ्यात महत्त्वाची असते, त्यामुळे या पिकात चांगला अनुभव झाला, तर हे पीक नक्कीच यशस्वी करता येते असे सुरेश म्हणाले.

काळे यांच्या शेतीतील ठळक बाबी 1) सन 2009-10 मध्ये "नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्ड'द्वारे सुमारे 16 लाखांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्याअंतर्गत विहीर, पाइपलाइन, ठिबक, ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरचलित औजारे खरेदी केली. मोसंबीचीही लागवड केली.

2) लहान व मोठी मिळून एकूण 25 शेळ्या आहेत. दर वर्षी एका शेळीपासून किमान दोन करडे मिळतात. केवळ नरांचीच विक्री करण्यात येते. प्रति नग चार ते साडेहजार रुपयांना विकला जातो. लेंडीखतही मोठ्या प्रमाणात मिळते. त्याचा उपयोग शेतीत केला जातो.

शेतातच बांधला टुमदार बंगला - गावापासून सुमारे पाच किलोमीटरवर शेती असून पूर्ण वेळ शेतीतच लक्ष देता यावे यासाठी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. शेतातच टुमदार बंगला बांधला आहे.
सामाजिक कार्याची आवड व बोलणे लाघवी असल्याने कृषी विभागाशी, बॅंकांशी सुरेश यांचे चांगले संबंध जुळले आहेत. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी माणिक जाधव, कृषी पर्यवेक्षक रमेश चांडगे, कृषी सहायक कृष्णा गटटूवार यांचे मार्गदर्शन त्यांना होते. ऍग्रोवनमधील यशोगाथा आणि तांत्रिक माहितीचा शेतीकामांत खूप फायदा होतो. शेतकऱ्यांचा सखा असलेल्या "ऍग्रोवन'चे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच पडतात असे ते म्हणतात.

सुरेश यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही -- बाजारपेठेचा अभ्यास प्रथम करूनच शेतीतील पीक नियोजन.
- शेतीला शेळीपालनाची जोड.
- सेंद्रिय तसेच कंपोस्ट खतावर जास्त भर.
- 100 टक्के ठिबक.
- कृषी विभागाशी सतत संपर्क तसेच कृषीविषयक माहिती मिळेल तेथून संकलित करण्याची आवड.
- काटेकोर शेती करण्यावर भर

संपर्क - सुरेश काळे- 9822719255
वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना

सुधारित तंत्रपद्धतीतून जिरायती शेती केली यशस्वी

धानोरा काळे (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील प्रताप काळे यांचे एकत्रित मोठे कुटुंब आहे. वडील किशनराव, आई सौ. कमलबाई, पत्नी सौ. द्वारका तसेच दोन भाऊ प्रवीण, प्रकाश व भावजया सौ. रेणुका प्रवीण काळे व सौ. सारिका प्रकाश काळे, मुले व पुतणे असा हा परिवार आहे. घरातील सदस्य शेतात राबतात. काळे यांची वडिलोपार्जित चार एकर व संयुक्त कुटुंबात खरेदी केलेली 12 अशी एकूण 16 एकर शेती आहे.

प्रयत्नांतून प्रगतीकडे वाटचाल पूर्वी काळे व परिसरातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने जिरायती सोयाबीन व कापसातून जेमतेम उत्पादन घेत. घरची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. सन 2004 पासून काळे व त्यांचे बंधू प्रवीण यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. त्या वेळी त्यांच्याकडे चार संकरित गाई, दोन म्हशी होत्या. रोजचे 25 लिटर दूध शासकीय डेअरीला जायचे. यात बाराही महिने खंड पडू न देता नियोजन केले. घरचे शेणखत मिळू लागले. त्याचा वापर व फायदा घरच्या शेतीत दिसू लागला. त्यानंतर प्रताप पूर्णवेळ शेतीकडे वळाले.

जिरायती शेतीत वापरले तंत्रज्ञान गाव परिसरात अलीकडील काळात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन काळे यांनी जिरायती शेती शाश्‍वत करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे विकसित व शिफारशीनुसार काही तंत्रांचा वापर केला. तो असा.

-जमीन व पाऊसमान नुसार सोयाबीन + तूर (4ः2) ही जिरायती क्षेत्रासाठी योग्य पीक पद्धती निवडली व आंतरपीक पद्धतीचा अवलंब
-सोयाबीन व तुरीला ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता आला.
-जिवाणू संवर्धनात रायझोबियम व पीएसबी यांचा वापर
-सोयाबीनमध्ये पुढे चक्रीभुंगा व खोडमाशी यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पेरतेवेळेस फोरेट चार किलो प्रतिएकर जमिनीतून दिले.
-अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन, कीड-रोग व तण नियंत्रण योग्य वेळी व योग्य पद्धतीने केले.

उत्पादनवाढ साधली -या पीकपद्धतीत सोयाबीन या मुख्य पिकाच्या उत्पादनासोबतच तुरीचे अतिरिक्त उत्पादन मिळाले.
-रोपांची संख्या व दोन रोपांतील अंतर योग्य राखल्यामुळे तुरीची योग्य वाढ होऊन उत्पादनवाढीस मदत झाली.
--उत्पादन - सोयाबीन- एकरी 12 क्विंटल, तूर- एकरी 6 क्विंटल

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी - जिरायती पद्धतीमुळे सुरवातीचा पाऊस जागेवर मुरविण्याकरिता आडवी मशागत व पेरणी
- पेरणीनंतर 30 दिवसांनी प्रत्येक चौथ्या ओळीनंतर पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठविण्यासाठी कोळप्याच्या फणाला दोऱ्या बांधून सऱ्या पाडल्या. त्यामुळे वाहत्या पाण्याचा अपधाव कमी होऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली. पर्यायाने शेतातील माती वाहून गेली नाही.
-विशेष म्हणजे 2012-13 मध्ये झालेल्या कमी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर काढलेल्या सऱ्यांमुळे जमिनीतील ओलावा टिकून पिकाला लाभ झाला. हे तंत्रज्ञान सोपे व कमी खर्चाचे आहे.
-उभ्या पिकामध्ये ठराविक अंतरावर नांगराच्या साह्याने जमिनीच्या उतारास आडवे चर काढले. त्यामुळे जो काही पाऊस झाला त्याचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली.
-जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी काडीकचरा, तुराट्या, वाळलेले गवत आदी घटक आच्छादन स्वरूपात पिकाच्या दोन ओळींत पसरवून टाकले. त्यामुळे जमीन कमी भेगाळली. पिकाला अधिक ओलावा उपलब्ध झाला.
-पोटॅशियम नायट्रेट 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी. त्यामुळे पिकातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन कमी पाण्यात पिकाला अन्नद्रव्ये व पाण्याचा ताण सहन करण्याच्या माध्यमातून जीवदान मिळाले.
-हलक्‍या कोळपणीसोबतच सोयाबीन भुशाचे आच्छादन केल्याचा फायदा दिसून आला.
-विद्यापीठाने या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांच्या शेतावर केल्याने कमी पाऊस झालेल्या दोन वर्षांच्या काळात त्याचे महत्त्व काळे यांना पटले होतेच.

दुष्काळातही शंभर टक्के मोसंबी वाचवली सन 2010 मध्ये पाणीटंचाईच्या काळात काळे यांच्या विहिरींचे पाणी कमी झाले. अशा बिकट परिस्थितीत मोसंबी बाग वाचविण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी आणून विहिरीत साठवले. ते गरजेप्रमाणे मोटारीद्वारे हौदामध्ये घेऊन प्रतिझाड 140 लिटर याप्रमाणे डिसेंबर ते जून या दरम्यान दिले. संपूर्ण बागेला सोयाबीनची गुळी व गव्हाचे काड आच्छादन म्हणून वापरले. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून प्रत्येक झाडाभोवती प्लॅस्टिक मल्चिंग वापरले. अशा रीतीने दुष्काळातही मोसंबी बाग काटेकोर नियोजनातून शंभर टक्के वाचवली. त्यानंतर स्नेह्यांच्या मदतीने भांडवल उभारून दोन किलोमीटरवरून गोदावरी नदीवरून चार इंचांची पाइपलाइन करून पूर्ण क्षेत्र ओलिताखाली आणले. जुन्या विहिरीची खोली वाढवून विहिरीचे पुनरुज्जीवन केले.

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. हरिहर कौसडीकर, डी. डी. पटाईत यांचे मार्गदर्शन काळे यांना मिळते. कृषी सहायक प्रवीण काळे, श्री. माळेगावकर, ए. व्ही. चिटणीस, श्री. अंबुरे यांचे सहकार्य मिळते.

बदलासाठी वापरलेले तंत्रज्ञान -सपाट वाफा पद्धतीच्या लागवडीतून कांद्याचे उत्पादन वाढविले.
-एमएयूएस-71 व एमएयूएस-158 या सोयाबीनच्या वाणाचे ग्राम बीजोत्पादन घेऊन दर्जेदार बियाणे उत्पादितच केले. त्यामुळे अधिक भाव मिळाला. गेल्या तीन वर्षांमधील पहिल्या वर्षी 36 क्विंटल बियाणे 1300 रु. (प्रति 30 किलो), दुसऱ्या वर्षी 42 क्विंटल बियाणे 1500 रु तर तिसऱ्या वर्षी 58 क्विंटल बियाणे 1500 रु. याप्रमाणे विक्री केली.
-एकात्मिक शेती पद्धतीत मोसंबी व चिकू फळबागेत सोयाबीन, मिरची व कांदा पीक घेऊन उत्पादन वाढविले व खर्चात बचत केली. वीस गुंठ्यात खासगी कंपनीसाठी कांदा बीजोत्पादन घेऊन दोन क्विंटल उत्पादन घेतले. त्याद्वारे उत्पादन खर्च जाता निव्वळ नफा 24 हजार रुपये मिळविला.
-मार्केटमध्ये काय विकतंय हे अभ्यासून तसे प्रयोग काळे यांनी केले. बाजारपेठेवर नेहमी नजर ठेवून त्यातील घडामोडींचा अभ्यास, मालाची चांगली प्रतवारी करणे या त्यांच्या जमेच्या गोष्टी आहेत.

उत्पन्नाव्यतिरिक्त झालेला अन्य नफा - -सुधारित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची गुणवत्ता व सुपीकता वाढवली. उत्पादनात वाढ घेऊन खर्चातही बचत केली.
-सामाजिक पत वाढली. बचत गटाची स्थापना करून त्याद्वारे कृषी मेळावे, नेत्रदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. बचत गटाद्वारे निविष्ठांची खरेदी एकत्रित करून खर्चात बचत साधली.

परिसरातील शेतकऱ्यांना दिली प्रेरणा - काळे यांच्या विविध प्रयोगांना भेटी देऊन अनेक शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली आहे. अनेक शेतकरी ग्राम बीजोत्पादनाकडे वळले. गावातील 25 शेतकरी कांदा लागवडीकडे वळले.
-कृषी विद्यापीठाच्या सहभागातून मेळावे, प्रक्षेत्र भेट याद्वारे अधिकाधिक शेतकरी नवीन तंत्रज्ञानाकडे वळतील याकरिता काळे प्रयत्नशील असतात.

ऍग्रोवनचाही केला प्रसार काळे दररोज ऍग्रोवन तसेच कृषी विद्यापीठातील प्रकाशने, मासिके वाचतात. ऍग्रोवन पूर्वी गावी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी त्याची थेट एजन्सीच घेतली. ऍग्रोवनच्या वर्धापनदिनी सलग तीन दिवस 271 अंक शेतकऱ्यांना मोफत वाटले.
संपर्कः प्रताप काळे- 9422704237

(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)

वनौषधींची शेती ठरतेय विदर्भात फायदेशीर

विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड वाढली आहे. या भागातील औषधी वनस्पतींच्या पिकाच्या उत्पादन आणि उलाढालीमुळे महाराष्ट्र फलोत्पादन आणि औषधी वनस्पती महामंडळाने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र उभारणीचा निर्णय घेतला आहे.

कशी रुजली औषधी वनस्पतींची शेती... - अमरावती जिल्ह्याच्या अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) येथील "कार्ड' या संस्थेतील डॉ. विजय लाडोळे यांनी सांगितले, की 1960 च्या दशकात अकोला, अमरावती भागांत सातपुड्याच्या पायथ्याशी पानवेलीची लागवड मोठी होती. पानवेलीच्या मळ्यांमध्ये शेतकरी औषधी गुणधर्म असलेल्या लेंडी पिंपळीचे आंतरपीक घेतले जाई. या पिकाला असलेली मागणी आणि मिळणाऱ्या उत्पन्नामुळे 1965 पासून पानवेलीखालील क्षेत्र कमी होऊन लेंडी पिंपळी हेच मुख्य पीक होत गेले. "कार्ड' संस्थेने सर्वेक्षण केलेल्या 1,639 शेतकऱ्यांपैकी 1,399 शेतकरी लेंडी पिंपळीसारखे औषधी पीक घेतात. लागवडीखालील एकूण क्षेत्र 685 हेक्‍टर असून 16,057.23 क्‍विंटल उत्पादन अपेक्षित आहे. त्यामध्ये करारपद्धती खालील क्षेत्र 376.66 हेक्‍टर आहे.
- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, अंबोडा, अकोलखेड, खोडगाव, पांढरी, अडगाव खाडे, अचलपूर, शेलगाव, ब्राह्मणथडी यासह अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोली जहॉंगीर, पणज, उमरा या गावांमध्ये लेंडी पिंपळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
- लेंडी पिंपळीची लागवड ते काढणीपर्यंत कुशल मजुरांची गरज असल्यामुळे हजारो हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महिला मजुरांना 250 तर पुरुष मजुरांना 450 ते 500 रुपये प्रती दिवस मजुरी दिली जाते.

बाजारपेठ झाली विकसित - हिरव्या लेंडी पिंपळीच्या फळांची काढणी ऑक्‍टोबर ते जानेवारी या कालावधीत केली जाते.
- एक एकरातून वाळलेल्या पिंपळीचे उत्पादन सहा क्‍विंटल मिळते. याचा उपयोग प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधात व मसाल्यात केला जातो.
- याची बाजारपेठ भारतातील प्रमुख शहरात असून, लेंडी पिंपळीच्या मागणीपैकी 80 टक्‍के गरज केवळ अमरावती, अकोला या भागातून पुरवली जाते. परिणामी, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव हे लेंडी पिंपळी व तत्सम औषधी व सुगंधी वनस्पतीच्या खरेदी विक्री केंद्राचे हब म्हणून नावारूपास आले आहे.
- विदेशात या औषधी फळाला मागणी असून, दर चार ते साडेचार हजार रुपये प्रति किलो असा आहे. मात्र शेतकऱ्यांकडे विदेशात माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांमार्फतच पाठवला जाऊन त्यांनाच नफा अधिक मिळतो. शासनाकडून लेंडी पिंपळीच्या निर्यातीसंदर्भात प्रयत्न व्हावेत, तसेच शासनस्तरावरून हमीभाव निश्‍चित करण्याची गरज या भागातील शेतकरी व्यक्‍त करतात.
- महाराष्ट्र फलोत्पादन व औषधी महामंडळाने अंजनगाव बाजार समितीमध्ये औषधी वनस्पती खरेदी केंद्र सुरू करण्याविषयी ठराव होऊन, निधीची तरतूद झाल्याचे सूत्रांकडून कळले होते. मात्र बाजार समितीचे नवनियुक्‍त सचिव पंकज देशमुख यांनी त्या विषयी माहिती नसल्याचे सांगितले.

लेंडी पिंपळीचे व्यवस्थापन व आर्थिक ताळेबंद - पावसाचे दिवस वगळता लेंडी पिंपळी या पिकाला संरक्षित सिंचनाची आवश्‍यकता असते. थंड वातावरणातील पीक असल्याने उन्हाची झळ लागू नये, तसेच वेलींना आधारासाठी सावरी, हेटा, पांगरा यासारख्या वनस्पतींची लागवड केली जाते. बाजूने उन्हाच्या झळा लागू नये, यासाठी उसाचे पाचट किंवा तुराट्यांपासून केलेल्या ताट्यांचे संरक्षण केले जाते.
- 15 डिसेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत खुंट (बेणे) लावले जातात. हे बेणे स्थानिक शेतकऱ्यांकडूनच बाजारभावाने उपलब्ध होते. हे दहा महिन्यांचे पीक आहे. यासाठी बेणे, शेणखत, गाळाची माती, आधारासाठी बांबू या खर्चामुळे पहिल्या वर्षी एकरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन खर्च येतो. त्यातून पहिल्या वर्षी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळते. त्याला बाजारामध्ये 25 ते 45 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे उत्पादन एकरी 12 ते 14 क्विंटल व 10 ते 12 क्विंटल मिळते, तर प्रति वर्षी उत्पादन खर्च दीड ते दोन लाख रुपये होतो.
- गेल्या दोन- तीन वर्षामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, दोन हजार एकर क्षेत्रावरील लेंडी पिंपळी मळ्यांना धोका निर्माण झाला आहे. एकदा लागवड केल्यानंतर 1960 च्या दशकात एकाच वेलीवरून सात ते नऊ वर्षे लेंडी पिंपळीपासून उत्पादन घेतले जाई. मर रोगांच्या प्रादुर्भावामुळे 1985 हा कालावधी पाच वर्षे, तर अलीकडे तीन वर्षांपर्यंत कमी झाला आहे.

शेतकरी संपर्क - अशोक आसवर, (हिवरखेड, ता. तेल्हारा जि. अकोला), 9420104307
- डॉ. विजय लाडोळे, ("कार्ड' संस्था, अंजनगाव, अमरावती), 9822724939

1) तुरीत होतेय सफेद मुसळीचे आंतरपीक - - लेंडी पिंपळीबरोबरच अकोला जिल्ह्यातील शिवपूर, बोर्डी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तसेच नागपूरच्या सोनापूर नागपूर भागात माईनमुळा, अश्‍वगंधा यांसारखी औषधी लागवड होते.
- तसेच सफेद मुसळीखालील लागवड क्षेत्र दीड हजार एकरापेक्षा जास्त असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहायक संशोधन संचालक, तसेच नागार्जुन वनौषधी उद्यानाचे संचालक डॉ. संजय वानखडे सांगतात.
- तुरीमध्ये आंतरपीक म्हणून सफेद मुसळीचे पीक घेतले जाते. सहा महिन्यांचे हे पीक असून, जून महिन्यामध्ये लागवड केली जाते. या पिकाची ऑक्‍टोबर महिन्यात पानगळ होते. शेतातील उभ्या तुरीच्या पिकामुळे सावली पडून फायदा होत असल्याचे डॉ. संजय वानखडे यांनी सांगितले.
- वाळलेल्या चांगल्या दर्जाच्या सफेद मुसळीचे तीन ते चार क्‍विंटल (दर - 600 ते 1200 रुपये प्रति किलो) व हलक्‍या प्रतीच्या मुसळीचे एक ते दीड क्विंटल प्रति एकरी (दर - 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल) उत्पादन मिळते. या पिकासाठी एक ते सव्वा लाख रुपये प्रति हेक्‍टरी उत्पादन खर्च होतो.
- नव्या लागवडीसाठी बेण्यासाठी काढणी केल्यास एकरी 20 ते 22 क्विंटल ओल्या बेण्याचे उत्पादन मिळते. त्याला 15 ते 20 हजार प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळतो.
- अकोला जिल्ह्यातील बोर्डी (ता. अकोट) येथील जगन्नाथ धर्मे आणि दानापूर (ता. तेल्हारा) येथील अनिल मिसाळ यांच्यासह अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांकडे सफेद मुसळीची लागवड असते. गेल्या आठ, दहा वर्षांपासून या पिकामध्ये त्यांनी सातत्य ठेवले आहे.

2) पीकपद्धतीची वैशिष्ट्ये ... - स्थानिक स्तरावरच व्यापाऱ्यांकडून मालाची उचल
- आयुर्वेदिक औषधी गुणधर्मामुळे जागतिक व राष्ट्रीय स्तरावर मागणी मोठी
- कृषी विद्यापीठाकडूनही वनौषधीचे संवर्धनाचा प्रयत्न
- संरक्षित सिंचनाचे पर्याय असलेल्या भागात फायदेशीर पीकपद्धती
- जंगली पीकपद्धती असल्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी.

डॉ. संजय वानखडे, 9422193570
नागार्जुन औषधी उद्यान,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

शेतकरी - अनिल मिसाळ, 9665997563

अल्पभूधारक, अपंग शेतकऱ्याला मिळाली कुक्कुटपालनामुळे संजीवनी

शेलगाव ब्रह्म (ता.जि. वाशीम) येथील विष्णू परसराम घुगे यांच्या लहानपणी उजव्या पायाला पोलिओ झाल्याने अपंग आहेत. त्यांच्याकडे फक्त 23 गुंठे शेती आहे. या कमी क्षेत्रामध्ये एकत्रित कुटुंबाच्या सामाईक विहिरीतून पाळीने पाणी उपलब्ध होते. शेतीमध्ये सोयाबीन आणि तुरीचे उत्पादन घेतले जाते. एकूणच शारीरिक आणि आर्थिक बाजू कमकुवत होती. अर्थात, केवळ शेतीतून सहा व्यक्तींचे कुटुंब चालविण्यामध्ये अडचणी येत असत. अन्य लोकांच्या शेतामध्ये मजुरीला जावे लागे. शेतीला पूरक म्हणून काही व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. काही नातेवाइकांकडून कुक्कुटपालन व्यवसायातून मिळणाऱ्या फायद्याविषयी कळाले होते. मात्र खर्च अधिक असल्याने धाडस होत नव्हते. त्याचवेळी जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रातून मार्गदर्शन मिळू शकते, याविषयी कळाले. त्यांनी करडा येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची भेट घेतली. त्यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यास सांगितले. त्यानुसार केव्हीकेमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढला. परिस्थिती बिकट असल्याने सुरवातीचे भांडवल गोळा करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या. शेतातील धान्य विक्री करून, नातेवाइकांकडून व शेवटी काही रक्कम कर्जाऊ घेऊन 200 पक्ष्यांसाठी शेतामध्ये छोटेसे शेड उभे केले. हे वर्ष होते 2007. वाशीम येथील एका पशुखाद्य व्यावसायिकाकडून पहिल्या वर्षी कोंबडीचे पिल्ले, खाद्य, व औषधी इ. मदत एक महिन्याच्या मुदतीवर मिळाली. व्यवसायाला सुरवात झाली. पहिले वर्ष चांगले गेले.

अडचणीतूनही बांधले धाडस
व्यवसाय मार्गाला लागला असे वाटले तरी अडचणी संपल्या नव्हत्या. 2008 मध्ये एका बॅचमधील 200 पक्षी मुंगसाने मारून टाकले. मोठी समस्या निर्माण झाली. त्या वेळी पक्ष्यांचा प्रति किलो दर 42 रुपये होता. खर्च तर झाला होता. उत्पन्न काहीच नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र जिद्द सोडली नाही. प्रतिबंधक उपाय करत पक्ष्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याच वर्षी धाडस करून 2000 पक्ष्यांसाठी शेड उभे केले. त्यासाठी शेड उभारणीसाठी लोखंडी अँगल ऐवजी निलगिरीच्या लाकडांचा वापर केला. त्यामुळे खर्चात बचत झाली. तरी त्या वेळी एक लाख 60 हजार रुपयांचा खर्च झाला.
- या साऱ्या प्रयत्नामध्ये अडचणीमध्ये कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयोगी पडले. त्याच वेळी विष्णू घुगे हे अन्य प्रगतिशील शेतकऱ्यांच्याही संपर्कात होते. ते कशा प्रकारे तंत्रज्ञान वापरतात, याचीही सातत्याने माहिती घेत असत. त्यातील शक्‍य ते बदल आपल्या कुक्कुटपालन फार्ममध्ये करत हळूहळू सुधारणा करत गेले.
- कोंबडीची पिल्ले रोखीने घेतली जातात. त्यानंतर त्यांचा सांभाळ केला जातो. पशुखाद्यही बाजारपेठेतून खरेदी केले जाते. योग्य वजन झाल्यानंतर या कोंबड्यांची विक्रीही खुल्या बाजारात केली जाते. कोणत्याही खासगी कंपनीशी बांधून घेतलेले नसल्याने विक्रीही अधिक रक्कम देणाऱ्या व्यापाऱ्याकडे करता येते. प्रत्येक ठिकाणी काही प्रमाणात अधिक फायदा होतो. एखाद्या लॉटच्या वेळी तोटा झाला तरी वर्षातून पक्ष्यांचे सहा ते सात लॉट जातात. त्यातून तो वसूल होतो.
- नांदेड, अमरावती, अकोला, रिसोड, वाशीम येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी सतत संपर्क ठेवून पक्ष्यांची मागणी व किंमत यांचा अंदाज घेत नियोजन केले जाते. त्यातून पक्ष्यांच्या बॅच जुळवल्या जातात.

...असे आहे या व्यवसायाचे आर्थिक गणित
- 30.5 रुपये प्रति पिल्लू या प्रमाणे साधारणपणे पिल्ले आणली जातात. 45 ते 50 दिवसांमध्ये त्यांचे वजन अडीच किलोपर्यंत पोचते. त्या दृष्टीने खाद्याचे नियोजन केले जाते. वेळच्या वेळी लसीकरण केले जाते. पक्ष्यांची ऋतूनुसार आवश्‍यक ती काळजी घेतली जाते.
- बाजारपेठेतील चढ-उतारानुसार कोंबडीचे दर ठरत असतात. विष्णू घुगे यांच्या गेल्या काही वर्षांतील अनुभवाप्रमाणे बाजारपेठेमध्ये दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये दर कमी असतात. मात्र तरीही त्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. या वर्षी श्रावणाच्या सुरवातीला 72 रुपये प्रति किलो असे चांगले दर होते. शेवटच्या आठवड्यामध्ये कमी होऊन 65 पर्यंत खाली आले. तसेच उन्हाळ्यामध्ये 80 ते 82 रुपये प्रति किलो असे चांगले दर मिळतात. त्याच्या हिशेबाने नफा तोटा होतो. तरीही एका पक्ष्यामागे साधारणपणे सरासरी दहा रुपये मिळतात. वर्षाकाठी 60 ते 75 हजार रुपये निव्वळ नफा होतो.
- पक्ष्याची विष्ठा शेतात खत म्हणून वापरल्याने शेतातील उत्पादनामध्ये ही वाढ झाली आहे. खताच्या खर्चामध्ये बचत झाली आहे. ते उर्वरित खतापासून गांडूळखत तयार करतात.

मुलाचे शिक्षण शक्‍य झाले...
- गावाजवळच सैनिकीशाळा सुरू झाली होती, तेथील तीस हजारांचे प्रवेशशुल्क भरून मुलांच्या शिक्षणाची सोय केली. आज त्यांचा मुलगा पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. केवळ या पूरक व्यवसायामुळे शक्‍य झाल्याने घुगे यांनी सांगितले.

सामाजिक प्रतिष्ठाही मिळाली...
पूर्वी घरातील व्यक्तींना लोकांच्या शेतीमध्ये मजुरीसाठी जावे लागे. गावामध्ये सामाजिक प्रतिष्ठाही कमी होत चालली होती. आता कुक्‍कुटपालनाच्या व्यवसायामुळे सर्वांना घरामध्येच काम उपलब्ध झाले आहे. शेती आणि पूरक उद्योगातून उदरनिर्वाह बऱ्यापैकी चांगला सुरू आहे. गावामध्ये व परिसरामध्ये सामाजिक प्रतिष्ठा वाढली आहे. काही प्रमाणात पत निर्माण झाली आहे.

शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो जिल्हा परिसरामध्ये फायद्याचा...
- वाशीम जिल्ह्यामध्ये जिरायती शेतीचे प्रमाण अधिक असून केवळ 14-18 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत होत आहे. विविध विषयांच्या शेती शाळांच्या माध्यमातून शेतीला पूरक कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व मत्स्य शेतीसारख्या उद्योगांची माहिती व प्रशिक्षण दिले जाते. त्याचा लोकांना लाभ होत आहे.
- अडचणी आल्या तरी अपंग असलेल्या घुगे यांनी हा व्यवसाय चिकाटीने सुरू ठेवला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्यांचे शेड पाहण्यासाठी येतात. त्यातील पाच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत व्यवसाय सुरू केला आहे. शेतातील उत्पन्नाच्या अनिश्‍चिततेमुळे कमी भांडवलाचा, कमी कालावधीचा कुक्कुटपालन व्यवसाय अल्पभूधारक शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त आहे.
- विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत शेतीपूरक व्यवसायाशी निगडित शेतीशाळा करडा कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेतल्या जातात. त्यामध्ये विष्णू घुगे यांच्या शेडमध्ये प्रात्यक्षिकांवर आधारित शेती शाळा 31 मार्च ते 2 एप्रिल 2013 या कालावधीत आयोजित केली होती. या कार्यक्रमातून विष्णू घुगे यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

संपर्क ः
विष्णू घुगे, 9657416260

डॉ. डी. एल. रामटेके, 9423611700

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, करडा जि. वाशीम येथे विषय विशेषज्ञ आहेत.)

कष्ट, जिद्द, अभ्यासातून उभारली एकात्मिक शेती -

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या पटलावर आला. पाण्याचा शाश्‍वत आधार नसलेल्या तालुक्‍यात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. याच तालुक्‍यात नळविहिरा या छोट्या गावात संजय मोरे यांची एकत्रित 38 एकर शेती आहे. द्वि-पदवीधर व डी. फार्म. झालेल्या मोरे यांनी नोकरीच्या मागे न लागता सुरवातीला औषधविक्रीचे (मेडिकल) दुकान सुरू केले. मात्र त्यात फार वेळ न रमता ते पूर्णवेळ वडिलोपार्जित शेतीतच उतरले.

खडकाळ माळरानावर बहरली फळशेती जाफराबादसारख्या कायम दुष्काळी तालुक्‍यात 2003 मध्ये तुटपुंज्या पाण्यावर केसर आंब्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. 33 बाय 33 फूट अंतरावर केसर आंब्याची 40 झाडे व त्याच अंतराने चिकूची 40 झाडे लावली. 40 पैकी केसर आंब्याची सात व चिकूची नऊ झाडेच जगली. पहिल्याच प्रयत्नांत अपयश पदरी पडले तरी मोरे निराश झाले नाहीत. त्या जागी गावरान आंब्याची रोपे लावली. दरम्यान, विविध जागांत केसर आंब्याची लागवड सुरू होतीच. काही वेळा त्याचे अंतर 33 बाय साडेसोळा फूट केले. त्यातील मधल्या पट्ट्यात डाळिंब लावले. अशा रीतीने केसर आंबा लागवड अंतरानुसार व क्षेत्र बदलत आवळा, सीताफळ, शेवगा व जांभूळ आदीं मिश्रपिकांची जोड दिली. पूर्वी उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी कष्ट व अभ्यासातून बहरलेली फळशेती जणू कृषी पर्यटनाचे केंद्रच बनले आहे. सर्व मिळून एकूण तेरा हजारांपर्यंत झाडे आहेत.

दृष्टिक्षेपात फळशेती आंबा - केसर आंब्याची सुमारे तीन हजार झाडे. त्यापासून सुमारे सहा टन उत्पादन मिळते. किरकोळ बाजारात हातविक्री. किलोला ग्रेडनुसार सरासरी 100 रुपये व प्रतवारीनुसार 50 रुपयांपर्यंत दर मिळतो. दोन किलोंच्या पॅकिंगमधूनही विक्री.
आवळा - नरेंद्र सात जातीची सुमारे 500 झाडे. त्यापासून एक टन उत्पादन मिळते. छोट्या प्रक्रिया उद्योजकांकडून शेतावर येऊन 10 रुपये प्रति किलो दराने खरेदी.
सीताफळ - सुमारे 2500 झाडे. एकूण क्षेत्रातून तीन टन उत्पादन मिळते. जालना बाजारपेठेत विक्री. प्रति किलो सरासरी 30 रुपये दर मिळतो.
डाळिंब - 500 झाडे आहेत. अडीच टन उत्पादन मिळते. जालना, औरंगाबाद बाजारपेठेत विक्री होते. प्रति किलो सरासरी 40 रुपये दर मिळतो.
शेवगा - 500 झाडे असून, त्यापासून सुमारे पावणेचार टन उत्पादन मिळते. प्रति किलो 40 रुपये दर मिळाला आहे.

आंतरपिकांनी दिला फायदा मोरे कल्पकतेतून शेती करतात. आपल्या 17 एकर फळबागेत सोयाबीन व तुरीचे आंतरपीक घेतले आहे. त्यातून 30 क्‍विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले. 15 क्‍विंटल तुरीचे उत्पादन हाती आले.

मोरे यांच्या एकात्मिक शेतीतील वैशिष्ट्ये - 1) फळशेतीत "बाजीगर' ठरलेल्या मोरे यांनी शेततळ्यात मत्स्यपालन केले. त्यात रोहू, कटला आदींचे 13 पेट्या मत्स्यबीज सोडले आहे.
2) सतरा एकरांतील शेतीत रासायनिक खत वापरले जात नाही. तणनाशकाचा वापर न करता भांगलणीद्वारा काढलेले तण झाडाच्या बुडाशी टाकण्यात येतात. सोयाबीन, तूर या पिकांचा पाला खत म्हणून उपयोगी ठरतो. गांडूळ प्रकल्प असून, हे खतही उपयुक्त ठरते.
3) रोपवाटिका, आवळा प्रक्रिया व मत्स्यपालनातून उत्पन्नाची भर दर वर्षी पडते.
4) सुमारे 50 लाख लिटर क्षमतेच्या शेततळ्यातून संपूर्ण शेतीला पाणी पुरविण्यात येते. सतरा एकर शेतीसाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर असून, काटेकोर पाणी देण्यात येते.
5) आंबा, आवळा, सीताफळ, डाळिंब आदींसाठी आवश्‍यक सुविधा असलेले पॅकहाऊस आहे.
6) कागदी लिंबू अन्‌ फुलशेती - सूत्रकृमींवर उपाय म्हणून शेवग्यात झेंडूचे आंतरपीक फायद्याचे ठरले. दसऱ्यावेळी स्थानिक बाजारपेठेत 10 हजार रुपयांचे उत्पन्न झेंडूने, तर कागदी लिंबाच्या तीन झाडांपासून 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. बांधावर बांबू, पेरू, बोर, कडुलिंब, बिब्बा, चिंच यांचीही लागवड आहे.
7) यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात - पेरणीसाठी यंत्र, फवारणीसाठी एचटीपी पंप, आंतरमशागतीसाठी विविध अवजारे उपयोगात आणली आहेत.

दुष्काळातही जगली बाग आंबा बागेत साडेचार बाय चार फूट अंतरावर खड्‌डे खोदून प्रत्येक खड्ड्यात शिफारशीत कीटकनाशक पावडर पसरून खड्ड्यातच पालापाचोळा व कुजलेले शेणखत टाकले. गावरान आंब्याच्या दर्जेदार कोया वेगळ्या केल्या. जूनमध्ये ठिबक पसरवून खड्ड्यात शेजारी शेजारी पाच कोयांची लागवड केली. एका वर्षानंतर तयार झालेल्या रोपांपैकी चार रोपांना एका रोपास बांधून घेतले. त्यास केसर आंब्याचे कलमीकरण करून घेतले. या तंत्रामुळे झाडे व फळे जोमाने वाढण्यास मदत झाली. त्यामुळे दुष्काळातही बाग तग धरू शकली.

अमेरिकेने चाखली केसरची गोडी उजाड माळरानावर बहरलेल्या केसर आंब्याचा गोडवा थेट अमेरिकेत पोचला आहे. केसर निर्यातीसाठी आवश्‍यक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून जालना येथील निर्यात सुविधा केंद्राच्या मदतीने त्यांनी केसरची निर्यात थेट अमेरिकेत करण्याचा प्रयोग करून पाहिला आहे. नळविहिरा गावच्या उजाड माळरानावरील केसरचा गोडवा अमेरिकेत पोचल्याचा आनंद साऱ्या गावाला आहे.

कुटुंबाकडून मिळाला आत्मविश्‍वास फळशेतीच्या सुरवातीला अपयश आले, परंतु आई-वडिलांसह कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आत्मविश्‍वास दिला. आई सौ. लीलावती, वडील दमोतराव, भाऊ हरीश, भावाची पत्नी सौ. शोभा यांची शेतीत, तर पत्नी सौ. संगीता यांची शेती सांभाळण्यात मोठी साथ मिळाली.

बाजारात माईकद्वारा फळविक्री विक्री व्यवस्थेत मोरे यांनी वेगळी ओळख निर्माण केली. टेंभुर्णी, जाफराबाद, जिंतूर, जालना, औरंगाबाद बाजारात स्वत: चारचाकी गाडीवरून माईकद्वारा प्रचार करून केसर आंब्याची विक्री केली. जिल्ह्याबाहेरील बाजाराचा कानोसा घेत डाळिंब व सीताफळाची विक्री, तर अन्य फळांची स्थानिक बाजारपेठेत विक्री केली.

गटशेतीतून रोवली समृद्धीची गुढी जाफराबाद तालुक्‍यात डॉ. भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली 2005 मध्ये सुरू झालेल्या गटशेतीच्या चळवळीत मोरे सहभागी झाले. सध्या ते गटशेतीत सहभागी शेतकऱ्यांना थेट शेतावर मार्गदर्शन करतात.
मोरे यांचा राज्यस्तरावर विविध आठ पुरस्कारांनी सन्मान झाला आहे.

संपर्क :
संजय मोरे पाटील : 9404694840, 9422378593