Tuesday, 7 January 2014

Natural Farming Guru ------ Bhaskar Save
सुधारित तंत्रानेच करा गूळनिर्मिती

ऊसतोडणीनंतर सहा ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे. अन्यथा, चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो. ऊस गाळपासाठी सुधारित चरक्‍याची निवड करावी. सुधारित तंत्राने गुळाची गुणवत्ता वाढते. डॉ. बापूराव गायकवाड, प्रा. गजानन नेवकर, उमेश कुडतरकर
अपक्व उसापासून गुळाचा उतारा कमी मिळतो, गूळ नरम बनतो. गूळ रवाळ होत नाही. साठवणुकीमध्ये असा गूळ खराब होतो म्हणून ऊस योग्य प्रमाणात पक्व झाल्यानंतरच तोडणी करावी. उसाची पक्वता म्हणजेच साखरेचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी "हॅंड रेफ्रॅक्‍टोमीटर' किंवा "ब्रिक्‍स हैड्रोमीटर'चा वापर करावा. या उपकरणांच्या साहाय्याने उसातील रसाची घनता कळते. त्यास ऊस रसाचे ब्रिक्‍स असे म्हणतात. हे ब्रिक्‍स 21 डिग्रीपेक्षा जास्त असल्यास असा ऊस पक्व झाला आहे असे समजावे. ऊस पक्वतेची चाचणी शक्‍यतो सकाळी घ्यावी.

हॅंड रेफ्रॅक्‍टोमीटरचा वापर -
1) या उपकरणासोबत रस काढण्यासाठी टोचा मिळतो. उसाच्या 8 ते 10 व्या पेऱ्यावर थोडासा तिरकस कोनाने टोचा आत टोचावा आणि थोडासा फिरवावा.
2) टोच्याच्या पोकळीतून रस घेऊन काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बाटलीत जमा करावा. कमीत कमी 8 ते 10 ठिकाणांहून रस घेऊन एकत्र करावा.
3) या रसाचे दोन थेंब हॅंड रेफ्रॅक्‍टोमीटरच्या तबकडीवरील काचेवर घेऊन लोलकाने झाकावे.
4) उजेडाकडे तोंड करून दुर्बिणीतून पाहिल्यास ब्रिक्‍सची उभी मोजपट्टी आणि रसाचा फिक्कट थर दिसतो. दोन्ही रेषा जेथे जुळतात ते ब्रिक्‍सचे रीडिंग समजावे.

स्पींडल ब्रीक्‍स हैड्रोमीटरचा वापर - 1) उसाचा प्रातिनिधिक नमुना घेऊन त्याचा रस चरक्‍याच्या साहाय्याने काढावा.
2) रस एक लिटर क्षमतेच्या मोजपात्रात अथवा त्यासारख्या उभट भांड्यात घ्यावा.
3) रसाचा फेस तसेच बुडबुडे काढून रसात अलगदपणे ब्रिक्‍स हैड्रोमीटर सोडावा.
4) हैड्रोमीटर स्थिर झाल्यानंतर रसाच्या पातळीशी जुळणारी ब्रिक्‍सची रेषा मोजावी.

ऊसतोडणीः
पक्वतेची चाचणी घेतल्यानंतर धारदार कोयत्याने पक्व उसाची तोडणी जमिनीलगत करावी, त्यामुळे बुडक्‍याकडील जास्त साखर असलेल्या कांड्या वाया जात नाहीत. उसावरील मुळ्या, पाचट, माती काढून ऊस स्वच्छ करावा. उसाच्या शेंड्याकडील दोन ते तीन कोवळ्या अपक्व कांड्या वाढ्याबरोबर तोडून टाकाव्यात कारण त्यामध्ये पाण्याचे, नत्राचे आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते तर साखरेचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

गूळ उत्पादन तंत्रज्ञान - * ऊसतोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आतच उसाचे गाळप करणे गरजेचे आहे. अन्यथा, चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.
* ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्‍स असलेल्या चरक्‍याची निवड करावी.
* गुऱ्हाळासाठी चरक्‍याची गाळप क्षमता 65 ते 70 टक्केपर्यंत असावी.
* गाळप वाढल्यास सूक्ष्म कचऱ्याचे प्रमाण वाढते, रसातील सुक्रोजचे प्रमाण वाढते; परंतु खनिजे आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे गुळाचे औषधी महत्त्व कमी होते.
* उसाच्या रसात फिनॉलिक द्रव्य असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास त्याचा गुळाच्या रंगावर विपरित परिणाम होतो म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क टाळावा.
* स्वच्छ आणि आरोग्य पूर्ण वातावरणात तसेच निर्यातक्षम गूळ तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरक्‍याचा वापर करावा.
* द्विस्तरीय पद्धतीच्या गाळणीतून रस चांगला गाळून घेऊन "फूड ग्रेड'चे प्लॅस्टिक अथवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा.
* मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या साहाय्याने प्लॅस्टिकच्या अथवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा.
* हौदातून स्वच्छ रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून तो काहिलीत पुढील प्रक्रियेसाठी घ्यावा.

उत्तम प्रतीचा गूळ/ काकवी तयार करण्यासाठी उसाच्या रसामधील घटकाचे प्रमाण

रस प्रक्रियेसाठी काहिलीचा वापर - 1) रस उकळण्यासाठी 1000 ते 1200 लिटर क्षमतेच्या लोखंडी पत्र्याच्या काहिलीचा वापर करावा. काहिलीच्या तळाचा व्यास 9 फूट, वरील व्यास 10.5 फूट आणि उंची 26 इंच एवढी असावी. पत्र्याची जाडी तळासाठी 16 गेज, काहिलीचे काठ 14 आणि 12 गेज जाडीचे ठेवावेत.
2) सन 2009-10 मध्ये पूर्ण झालेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार 10 फूट 6 इंच तळव्यासाच्या काहिलीचा वापर करणे फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. प्रचलित नऊ फूट तळव्यासाच्या काहिलीपेक्षा 10 फूट 6 इंच तळव्यासाच्या काहिलीच्या वापरामुळे गूळ प्रक्रियेसाठी साधारणपणे 16 टक्के कमी कालावधी लागतो. इंधनामध्ये 15 टक्‍क्‍यांची बचत होते.
3) सुधारित काहिलीची मापे - तळव्यास- 10'6'', वरचा व्यास- 11'7'', मध्यभागी उंची 24'', बाजूची उंची 26.5'', काहिलीच्या बाजूंचा जमिनीशी कोन 64.5 असावा.
4) काहिलीच्या आतील बाजूने उडदाच्या पिठाचे लाडन करून घ्यावे.
5) शक्‍य असल्यास स्टेनलेस स्टीलच्या काहिलीचा वापर करावा.
6) रस उकळण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चिमणी चुलाण वापरावे. चुलाणावरून काहिल उतरण्यासाठी "फ्रेम-चाके-रूळ' यांचा समावेश असलेली यांत्रिक पद्धत वापरावी.

कोल्हापूर पद्धतीचे चिमणी-चुलाण - * चुलाणात तयार होणारी उष्णता आणि धूर यांच्या वहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जमिनीखालील सोऱ्याची ठराविक रचना ही या चुलाणाचे वैशिष्ट्य आहे.
* चुलाण- गोलाकार, व्यास- 9 फूट, खोली- 5 फूट (सुधारित निष्कर्षानुसार 10 फूट 6 इंच), जळणाचे छिद्र 9 इंच, हवेसाठी छिद्रे 4 इंच (संख्या 8), सोरा- 20 इंच, 22 इंच,
* सोरा जमिनीखाली 10 फुटांवर, लांबी 7 ते 8 फूट, त्यानंतर 40 ते 45 चा कोन करून सोरा चिमणीला जोडला जातो.
* चुलाण बांधकामाच्या मजबुतीसाठी आणि त्यातील उष्णता टिकण्यासाठी चुलाणाभोवती जाड वाळू आणि पांढरी माती याच्या मिश्रणाचा जाड थर द्यावा.
* बांधकामाकरिता साध्या विटांऐवजी फायर ब्रिक्‍स वापरल्यास चुलाणाचे आयुष्य आणि कार्यक्षमता वाढते.
* चिमणी-चुलाणाची कार्यक्षमता चिमणीवर अवलंबून असल्याने चिमणीची उभारणी व्यवस्थित करणे आवश्‍यक आहे.
* चिमणीचा आकार गोल अथवा चौकोनी, तळाचा आतील व्यास- 6 फूट तर तोंडाकडील व्यास- 3 फूट, उंची 16 फूट असावी.

रस उकळणे आणि मळी काढण : * चुलाण पेटवून रस तापत ठेवावा. मळी व्यवस्थित काढण्यासाठी चुन्याचे द्रावण (150 ते 200 ग्रॅम चुना पाच लिटर पाण्यात मिसळावा) रसात मिसळावे.
* तप्त रसातील मळी संपूर्णतः निघण्यासाठी प्रति 1000 लिटर रसासाठी दोन किलो भेंडीच्या रोपांचा ठेचा करून 15 लिटर पाण्यात कुस्करून त्याचा अर्क गाळून घ्यावा. तो अर्क काहिलीतील रसात मिसळावा किंवा भेंडी रोपापासून तयार केलेली भुकटी 1.6 किलो प्रति 1000 लिटर रसासाठी वापरावी.
* चुन्याची निवळी घातल्याने रसाचा सामू वाढविला जातो. रसातील नत्रयुक्त पदार्थ अविद्राव्य होऊन जाड काळ्या मळीच्या रूपाने (ढोरमळी) रसावर तरंगू लागतात.
* चुन्यामुळे रस उकळण्यापूर्वी रसात साखरेचे ग्लुकोजमध्ये होणारे रूपांतर थांबवले जाते.
* चुन्याचे प्रमाण जास्त झाले तर गूळ गडद तांबूस रंगाचा होण्याचा धोका असतो; परंतु चुना कमी पडला तर गूळ मऊ तयार होतो.
* रसाचे तापमान 85 अंश सेल्सिअस आल्यावर म्हणजे 25 ते 30 मिनिटांनी ढोरमळी काढावी.
* ढोरमळी काढल्यानंतर फॉस्फरिक आम्ल (आर्सेनिक मुक्त) 150 ते 200 मिली प्रति 1000 लिटर रस या प्रमाणात वापरावे.
* फॉस्फरिक आम्लाचा उपयोग रसातील अधिक नत्राचा, रसात घातलेल्या चुन्याच्या निवळीचा गुळाच्या रंगावर विपरित परिणाम टाळण्यासाठी, तसेच रस उकळताना साखरेचे ग्लुकोजमध्ये होणारे रूपांतर कमी करण्यासाठी होतो.
* फॉस्फरिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास गूळ मऊ बनतो, कणी बारिक धरते, गूळ चिक्कीसारखा होतो.

औषधी गूळ - काकवी गूळ आणि काकवीमध्ये आहारातील महत्त्वाचे, पचनास हलके, रुची वाढविणारे पौष्टिक अन्नघटक आहेत.
1) गुळामध्ये कॅल्शिअम, लोह, तांबे, स्फुरद इत्यादी खनिजे, काही प्रमाणात प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच "ब' जीवनसत्त्वे आहेत.
2) जनावरांसाठी खाद्य, आयुर्वेदिक औषधनिर्मिती, सौंदर्यप्रसादन निर्मिती, बेकरी मालाचे उत्पादन इत्यादी बऱ्याच ठिकाणी गुळाचा आणि काकवीचा वापर केला जात आहे.
3) गूळ आणि काकवीचे घटक गुळाच्या तुलनेत साखरेमध्ये अधिक सुक्रोज (99.5 टक्के) आणि अधिक उष्मांक (398 कॅलरीज) आहेत.

फोन नं.- 0231-2651445
(लेखक प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.)


संदर्भ # सकाळ अग्रोवन  

जनावरांची निवड करताना संतती परीक्षण आवश्‍यक

पशुपालन करताना उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी योग्य जनावरांची निवड आवश्‍यक आहे. गाई, म्हशींचे दुग्धोत्पादन, शेळीमध्ये मटण उत्पादन, मेंढीमध्ये लोकर व मटण उत्पादन, कोंबड्यांमध्ये अंडी किंवा मांस उत्पादन हे घटक पशुपालनामधील आर्थिक नफ्यासाठी महत्त्वाचे आहेत.
संबंधित जनावरांच्या उत्पादन गुणधर्मांनुसार आपण त्यांची निवड करत असतो. चांगल्या जनावरांच्या निवडीच्या इंडिपेंडन्ट किंवा वैयक्तिक निवड पद्धत, टेन्डम स्कोअर निवड पद्धत
आणि टोटल स्कोअर निवड पद्धत अशा तीन पद्धती आहेत. "टोटल स्कोअर' पद्धतीत प्रत्येक जनावरांचे ठराविक गुणसंचानुसार गुणांकन केले जाते. त्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या जनावरांची निवड केली जाते.

जनावरांची निवड ः 1) वैयक्तिक आधार ः प्रत्येक जनावर स्वतंत्रपणे पाहिल्यावर त्याच्या अंगी असलेल्या वैयक्तिक गुणधर्मावर आधारित आपण त्याची निवड करतो.
2) वंशावळीचा आधार ः संबंधित जनावराच्या वंशावळीचे गुणधर्म व उत्पादनक्षमता यांचा आधार घेतला जातो.
3) सहसंबंधीचा आधार ः जनावराचे इतर भाऊबंध असणाऱ्या/ रक्ताचे नाते असणाऱ्या, इतर जनावरांच्या गुणधर्म/ कार्यक्षमतेचा आधार घेतला जातो.
4) संतती परीक्षण ः जनावरांच्या पुढल्या पिढीतील पिल्लांचे गुणधर्म व उत्पादनक्षमता यांचा आधार घेतला जातो.

"संतती परीक्षण' महत्त्वाचे ः 1) जनावरांच्या आई-वडिलांतील गुणधर्म पुढल्या पिढीत अर्धे-अर्धे जात असतात. पुढील पिढीतील जनावरांची उत्पादनक्षमता म्हणजे त्यांच्या आई-वडिलांच्या गुणधर्माचा एकत्रित परिणाम असतो. मात्र अजूनही वंशावळीचा आधार घेऊन निवड करताना आपल्याला जनावरांत वंशावळीच्या नोंदी ठेवल्याचे दिसून येत नाही. तसेच सहसंबंधीची ही माहिती पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते. बरेच गुणधर्म फक्त एकाच लिंगामध्ये व्यक्त होतात. तेव्हा त्यांच्या निवडीसाठी वैयक्तिक आधारही फारसा उपयोगी होत नाही. याउलट पुढल्या पिढीतील जनावरांचे गुणधर्म व उत्पादनक्षमता इ.चा आधार निवड करताना जास्त उपयोगी येऊ शकतो. म्हणून "संतती परीक्षण' हा आधार जास्त महत्त्वाचा आहे.
2) संतती परीक्षण हे प्रक्षेत्रावर करता येते. संतती परीक्षणामध्ये जास्तीत जास्त पिल्लावळीची माहिती असणे आवश्‍यक असते. त्यासाठी नर व मादी यापैकी आपण नराची निवड करतो, कारण वळू हा त्याच्या आयुष्यात एका मादीपेक्षा जास्त पिल्लांना जन्म देऊ शकतो. सिद्ध वळूचे वीर्य संकलन करून ते कृत्रिम रेतनाद्वारे गाईंचे रेतन करून जास्तीत जास्त पिल्लांची माहिती कमी कालावधीत मिळविता येऊ शकते. हे फार्म अथवा प्रक्षेत्र दोन्ही ठिकाणी करता येते.

"संतती परीक्षण'चे फायदे ः अधिक उत्पादनासाठी आपल्या कळपात उत्तम निवड केलेली जनावरे असणे आवश्‍यक आहे. निवड करताना "संतती परीक्षण'चा आधार इतर आधारांपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो.
फायदे ः
1) कमी वेळेत जास्तीत जास्त पिल्लांचा मदतीने वळूचे अचूक मूल्यांकन करता येते.
2) उत्पादनात व कार्यक्षमतेत भरघोस वाढ दिसून येते.
3) विशिष्ट लिंगात दिसून येणारे गुणधर्म, कत्तलीपश्‍चातचे गुणधर्म, कमी आनुवंशिकता असलेले गुणधर्म इ.साठी अधिक उपयुक्त.
4) वळूच्या निवड प्रक्रियेतील तीव्रता अचूकतेने मोजता येते.
5) प्रत्येक वळूपासून अनेक पिल्लांची/ संततीची माहिती व नोंदी उपलब्ध असल्याने विश्‍वासार्हता जास्त आहे.
मर्यादा-
1) वळूचे मूल्यांकन करण्यास अनेक संततीची माहिती लागेल, तेव्हा या सर्वांच्या संगोपनांचा खर्च अधिक आहे.
2) पिढीजात अंतर वाटत असल्याने प्रतिवर्ष होणारी आनुवंशिक वाढ घटते.
3) दर वळूस संतती कमी असल्यास अचूकता कमी होते.
4) संतती परीक्षणाचा निकाल बऱ्याच उशिराने मिळतो.
5) अचूक नोंदी न ठेवल्यास दुष्परिणाम संभवू शकतात.

"सिद्ध वळू' महत्त्वाचा ः कळपातील सर्व वळूंचा त्यांच्या पिल्लांच्या उत्पादनक्षमतेनुसार तुलनात्मक अभ्यास केला असता क्रमवारीत अग्रेसर असणाऱ्या वळूला "सिद्ध वळू' म्हटले जाते. त्याचेच वीर्य कृत्रिम रेतन करण्यास वापरले जाते.
वळूचे विविध निर्देशांक ः
1) वासरांचे सरासरी उत्पादन (सिंपल डॉटर ऍव्हरेज) निर्देशांक
2) समपालक निर्देशांक (इक्वल पॅरेंट इंडेक्‍स)
3) कृष्णन्‌ निर्देशांक
4) डेरी सर्च निर्देशांक
संपर्क ः डॉ. बनकर ः 9960986429
(लेखक पशू आनुवंशिकी विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे सहायक प्राध्यापक आहेत.)
 
 
 
संदर्भ # सकाळ अग्रोवन  

दुग्ध प्रक्रिया उद्योगापूर्वी सर्वेक्षण महत्त्वाचे...

भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. येत्या काळात दुधाची मागणी वाढती आहे, तर दुसऱ्या बाजुला आजही ग्रामीण भागात दुधाला शहरी भागाच्या तुलनेत हवा तितका दर मिळत नाही. देशाच्या एकूण दूध उत्पादनात 37 टक्के दूध हे दुग्धपदार्थांच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते. यात 24 टक्के दूध हे अनियोजित क्षेत्रात वापरले जाते. येथेच दुग्धपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यास खूप मोठा वाव आहे.

अनेक जिल्ह्यांत हजारो बचत गट, विविध आर्थिक उन्नतीचे गट कार्यरत आहेत. अनेक जिल्ह्यांत विविध योजनांमार्फत गाई, म्हशींचे वाटप केल्यामुळे दुग्ध उत्पादनात काही ठिकाणी वाढही झालेली दिसते. "फ्लश सीझन' म्हणजे जास्त दुधाच्या काळात तर गाईचे दूध अनेक डेअऱ्यांमध्ये नाकारले जाते किंवा अत्यंत कमी दर मिळतो. हे लक्षात घेऊन गावातील तरुण गट, तसेच महिला बचत गटांनी एकत्र येऊन आपल्या गावातील, तसेच आसपासच्या इतर गावांतील शेतकऱ्यांकडून अतिरिक्त दूध गोळा करून ते पुढे विक्रीकरता न पाठवता प्रक्रिया केल्यास चांगली किंमत मिळू शकते. फक्त गरज आहे ती तंत्रज्ञानाची जोड व स्वच्छ, शुद्ध, उत्तम दुग्धपदार्थ पुरवण्याची.

दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करताना.... दूध प्रक्रिया करताना कुठले पदार्थ बनवावेत, यंत्रसामग्रीवर बराच खर्च करावा लागेल का, उत्पादित प्रक्रिया पदार्थ कोण घेणार, विक्री कशी करणार, पॅकेजिंगचे काय, ब्रॅंड तयार होईल का, असे अनेक प्रश्‍न व्यवसायास सुरवात करणाऱ्यांच्या मनात येतात. यासाठी पहिल्यांदा या उद्योगासंबंधी प्राथमिक अभ्यास महत्त्वाचा आहे.

दुग्धजन्य पदार्थांची मागणी - 1) गाव, शहर, निमशहर यानुसार पदार्थांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. परंतु सर्वांगाने विचार केल्यास अनेक हॉटेल, ढाबे, जेवणाची कंत्राटे घेणारे, या सर्वांना पनीर, खवा, तूप, दही, चक्का इ. ठराविक प्रमाणात लागत असतो.
2) हॉटेल, ढाबे यांची पनीरसाठीची रोजची मागणी असतेच.
3) लग्नाच्या जेवणात गुलाबजाम, मिठाईसाठी खवा, चक्का, पनीर इ. आवश्‍यक असतो. शंभर माणसांसाठी गोड दुग्धपदार्थ- उदा. गुलाबजाम तयार करण्यासाठी अंदाजे पाच किलो खवा म्हणजेच 500 ते 700 माणसांसाठी 25 ते 35 किलो खवा हा कच्चा माल म्हणून लागेल. तसेच शंभर जणांसाठी जेवणासाठी एका भाजीत पनीर वापरावयाचे असल्यास साधारणपणे 10 किलो पनीर लागेल. थोडक्‍यात, बाजारपेठेत मागणी आहे. ही मागणी आपण शोधली पाहिजे.

विक्रीचे नियोजन - 1) कुठल्याही व्यवसायात मागणी एकदम वाढणार नाही. बचत गटांच्या विविध प्रदर्शनांतून, "ऍग्रोवन'ने भरवलेल्या प्रदर्शनातून स्टॉल्स लावल्यास मोठ्या प्रमाणात जाहिरात होऊन मागणी वाढते.
2) हॉटेल, ढाबे यांची दुग्धपदार्थांसाठीची रोजची मागणी असतेच.
3) लग्नसमारंभाची मागणी लक्षात घेऊन तेथील जेवण तयार करणाऱ्या आचारी लोकांशी संपर्क ठेवून अपल्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढविता येईल.
4) अशा प्रकारे मागणी वाढत गेल्यास आजूबाजूच्या शहरांतील शॉपिंग मॉल्स, सुपर शॉपी, दुकाने इ. ठिकाणी योग्य पद्धतीने पॅक केलेले दुग्धपदार्थ विक्रीसाठी ठेवता येतील.

यंत्रसामग्रीची गरज - 1) छोट्या यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांच्या गटांना दूध प्रक्रियेच्या दृष्टीने लघुउद्योगांकडे वळण्यास मोठी संधी आहे.
2) खवा, पनीर, पेढा, श्रीखंड, लस्सी, क्रीम सेपरेशनसाठी लहान स्वरूपातील यंत्रे उपलब्ध आहेत.
3) विविध पदार्थांसाठी वेगवेगळ्या क्षमतेची बांधणीची यंत्रे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आपल्या उत्पादनानुसार ती विकत घेता येतील.
4) खवा उत्पादनासाठी कमीत कमी 40 हजारांपासून ते 2.5 लाखांपर्यंत यंत्रे उपलब्ध आहेत. पनीरसाठी साधा पनीर प्रेस 15-20 हजार, तर न्यूमॅटिक प्रेस हा 50 हजार ते 2.5 लाखांपर्यंत मिळू शकेल.
5) दुधातील साय वेगळी करण्यासाठी क्रीम सेपरेटरची किंमत 25 ते 40 हजारांपर्यंत आहेत. सुरवातीस एक किंवा दोन पदार्थांसाठी लागणारी यंत्रे खरेदी करून, गरजेनुसार इतर पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे विकत घेता येतील.

पॅकेजिंगसाठी डबे - 1) विविध दुग्धपदार्थांसाठी पॅकेजिंग मटेरिअल निवडताना मूळ पदार्थ व पॅकेजिंग मटेरिअलची गुणवत्ता विचारात घ्यावी.
2) सध्या बाजारात सहज उपलब्ध होणारे पीव्हीसी किंवा पॉलिप्रॉपिलीनचे प्लॅस्टिकचे डबे बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड, रसगुल्ला इ. साठी वापरता येतील.
3) मिठाई ठेवण्यासाठी कागदापासूनची वेष्टने व प्लॅस्टिकचे वेगवेगळे प्रकार लॅमिनेट करून वापरता येतील.
4) अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकची घनता, ताणशक्ती, ऑक्‍सिजनच्या प्रवेशक्षमतेमध्ये फरक असतो. या प्रकारच्या क्षमता तपासून त्या-त्या प्लॅस्टिकसंबंधी खात्री पटवता येते.
5) पनीर, मिठाईसाठी व्हॅक्‍यूम पॅकिंग वापरले जाते. नवीन तंत्रज्ञानामध्ये मॉडीफाइड ऍटमॉसफिअर पॅकेजिंग ऑक्‍सिजन ऍबसॉर्बर तंत्र उपलब्ध झाले आहे.

ब्रॅंडिंग महत्त्वाचे - 1) आपल्या उत्पादनाचा ब्रॅंड विकसित करण्यासाठी जाहिरातींबरोबरच स्वच्छ, शुद्ध, योग्य मूल्यवर्धित आणि पॅकेजिंग केलेले दुग्धपदार्थ तयार करणे खूप महत्त्वाचे आहे.
2) आजघडीला नवनवीन तऱ्हेने दुग्धपदार्थ उत्तमरीत्या पेश करून आपल्यासमोर येत आहेत. "मॉल' संस्कृतीमुळे एकच पदार्थ चार-पाच प्रकारे ग्राहकांसमोर येत आहेत.
3) बदलत्या जीवनशैलीमुळे पौष्टिक, शुद्ध, नैसर्गिक रंग आणि रसायनविरहित पदार्थांकडे कल वाढतोय. यासाठी स्थानिक उपलब्धतेनुसार दुग्ध पदार्थांत फळांचा वापर, कमी फॅटचे दुग्धपदार्थ, कमी कॅलरीजचे पदार्थ (कृत्रिम साखरेचा वापर), तंतुमय पदार्थांचा वापर अशा अनेक प्रकारे मूल्यवर्धन करता येईल.
4) दुग्धपदार्थ तयार करत असताना मिळणारे उप-उत्पादन- उदा.- स्किम मिल्क (फॅट नसलेले) जे साय काढल्यानंतर मिळते, निवळी जे पनीर, छाना तयार करताना मिळते, ताक इत्यादीवर छोटीशी प्रक्रिया करून विक्री करता येते. या प्रक्रियेच्या पद्धती अत्यंत सोप्या व सहज करता येण्याजोग्या आहेत.
5) ग्राहकाला उत्पादनाची गुणवत्ता पटवून दिली तर विक्रीत वाढ तर होईलच, तसेच ही माहिती "ब्रॅंड' बनवण्यासाठीही उपयुक्त ठरेल.

दुग्धपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण - कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयातील पशुशास्त्र व दुग्धशास्त्र विभागांत आयोजित होणारे मेळावे, प्रशिक्षण यातून दुग्धपदार्थ निर्मितीची माहिती मिळेलच, तसेच दुग्ध महाविद्यालय, पुसद, विविध जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये प्रशिक्षण, माहिती मिळेल. आणंद, गुजरात येथील प्रशिक्षण दुग्धतंत्र महाविद्यालय प्रसिद्ध आहे. येथे पाच-सहा दिवसांचे दुग्धतंत्रातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, डेअरीतील तंत्रज्ञ यांच्यासाठी सुरू असतात. प्रशिक्षण, भोजन, निवास यांचा खर्च धरून साधारणपणे प्रशिक्षण कालावधीनुसार 4 ते 10 हजार रुपये शुल्क आहे. याचबरोबरीने राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना येथेही प्रशिक्षण मिळते.

संपर्क - डॉ. धीरज कंखरे - 9405794668
(लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत.)


संदर्भ # सकाळ अग्रोवन   

पाश्‍चराईज्ड, होमोनाईज्ड दूधनिर्मितीतून बनवला "पद्मालय' ब्रॅंड


गिरणा नदीच्या काठावर वसलेलं दापोरी (ता. एरंडोल, जि. जळगाव) हे जेमतेम 700 लोकवस्तीचं गाव. गावातील माधव महिपत पाटील यांचं त्यातल्या त्यात मोठं म्हणजे 22 सदस्य संख्येचं एकत्रित कुटुंब. पाच मुलं, सुना व नातवंडं असा गोतावळा. शेतीही तब्बल 100 एकरांवर. सगळ्यांनीच शेतीत राबण्यापेक्षा आपण जोडधंदा करावा या विचाराने कुटुंबातील पवन यांनी 2006 मध्ये दुग्ध व्यवसायात उडी घेतली.

सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर चार होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) गाई विकत घेण्यात आल्या. गाईंचं दूध गावातील गिरणाई संस्थेमार्फत जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाकडे घातलं. त्यातून थोडीफार कमाई सुरू झाली. टप्प्याटप्प्याने गाईंसोबत म्हशींची संख्या वाढवत नेली. वडील पुंडलिक पाटील यांनीही प्रोत्साहन दिलं. दुग्धोत्पादन वाढल्यानंतर जळगाव शहरातील ग्राहकांना घरपोच दूध पुरवठा करण्याची संकल्पना 2009 मध्ये प्रत्यक्षात आणणं शक्‍य झालं. गुणवत्तेच्या जोरावर अनेक नवीन ग्राहक जोडले.

तयार झाला "पद्मालय' ब्रॅंड ...... दापोरीहून जळगाव शहराकडे जाण्यासाठी म्हसावदमार्गे पक्का रस्ता उपलब्ध असला, तरी तब्बल 35 किलोमीटर फेऱ्याचा आहे. शिरसोलीहून मधल्या कमी अंतराच्या रस्त्याने जायचं म्हटलं, तरी गिरणा नदीच्या पात्रातून जावं लागतं. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर तो रस्ताही बंद असतो. पाणी थोडं कमी झालं तरी बैलगाडीवर क्रेट ठेवून पैलतीरावर पोचविण्याशिवाय पर्याय नसतो. ग्राहकांना वेळेवर दूध पुरवण्यासाठी पवन यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, सर्व अडचणींवर मात करीत जळगाव शहरातील नागरिकांना दर्जेदार व निर्भेळ दूध पुरविण्याचं काम ते गेल्या चार वर्षांपासून सातत्याने करीत आहेत. सुरवातीच्या काळात जळगाव शहरातील ग्राहकांना ते सुटं दूध पुरवीत. मात्र, घरोघरी मापाने मोजून देताना वेळ खर्ची पडायचा. दुधाचे कॅन सायकलीस लावून फिरावं लागे. यावर उपाय म्हणून प्लॅस्टिक पिशवीत पॅकिंग करून दूध विकायचं ठरवलं. दापोरीपासून नजीक असलेल्या प्रसिद्ध पद्मालय देवस्थानाच्या नावाने दुधाचा "पद्मालय' ब्रॅंडही तयार केला.

दररोज सुमारे 210 लिटर दुधावर प्रक्रिया ..... पिशवीबंद दुधामुळे वितरणातील वेळ वाचून ग्राहकांपर्यंत सकाळी लवकर दूध पोचू लागलं, परिणामी ग्राहक संतुष्ट झाले. मात्र, वाटेत आडव्या येणाऱ्या गिरणा नदीमुळे दापोरी ते जळगाव प्रवासातील हाल कमी होत नव्हते. बऱ्याच वेळा दूध वेळेवर न पोचल्याने नासण्याची समस्या निर्माण व्हायची. या त्रासापासून मुक्ती शोधण्यासाठी, तसेच ग्राहकांना दर्जेदार दूध पुरविण्यासाठी दापोरीतच दुधावर "पाश्‍चरायझेशन', "होमोजिनायझेशन' व "चिलिंग'ची प्रक्रिया करण्याचं ठरवलं. वडिलांजवळ विचार बोलून दाखविला. त्यांनीही शेतीतील उत्पन्नाचे पैसे त्यासाठी दिले. सुमारे सहा लाखांवर भांडवली गुंतवणूक करून अहमदाबाद येथून 300 लिटर क्षमतेची यंत्रसामग्री मागविण्यात आली. पवन यांनी प्रक्रियेचं तंत्र फलटण, बारामती भागांत प्रक्रिया युनिट पाहून व तज्ज्ञांशी चर्चा करून आणि ऍग्रोवनमधील माहिती वाचून शिकून घेतलं. सध्या गाई व म्हशींच्या एकत्रित सुमारे 225 लिटर दुधावर दररोज प्रकिया होते, त्यामुळे दुधाची गुणवत्ता वाढली. चिलिंग टॅंकच्या सुविधेमुळे दोन्हीवेळच्या दुधाची एकावेळी वितरणाची सोय झाली.

मिल्किंग मशिनमुळे स्वच्छ दूध उत्पादन ...... जातिवंत जनावरांचा सांभाळ करण्यावर पाटील यांनी सुरवातीपासूनच भर दिला. त्यांच्या गोठ्यात 20 एचएफ गाई आहेत, पैकी 12 सध्या दुधावर असून दररोज एकूण 110 लिटर दूध मिळतं. 25 जाफराबादी म्हशी आहेत, पैकी 16 दुधावर असून एकूण 100 लिटर दूध मिळतं. मिल्किंग मशिनचा वापर होत असल्याने स्वच्छ तसेच कमी वेळेत दूध मिळतं, त्यामुळे मजुरांवर जास्त विसंबून राहावं लागत नाही. बऱ्याच वेळा स्वतः पवन कुटुंबीयांच्या मदतीने सर्व कामं पार पाडतात.

दर्जेदार दुधाला मिळते अधिक किंमत ..... पाटील यांच्या पाश्‍चराईज्ड व होमोजिनाईज्ड दुधाची लोकप्रियता जळगाव शहरातील ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्याकडील म्हशीच्या 5.5 फॅट व साडेआठ ते नऊ एसएनएफ दुधाला 40 रुपये प्रति लिटर, गाईच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ दुधाला 31 रुपये प्रति लिटर दर ग्राहकांकडून मिळतो.

अजून शंभर ग्राहक दुधाच्या प्रतीक्षेत जळगाव शहरात घरगुती वसाहतींत (कॉलनी) 130 ते 135 ग्राहक दररोजचे आहेत. दूध वितरणासाठी दोन मोटारसायकली व व्यक्ती नेमल्या आहेत. रोज सकाळी पॅकिंगमध्ये दूध पोच केलं जातं. दुधाची मागणी भरपूर असून अजून शंभर ग्राहकांनी "ऍडव्हान्स डीमांड' केली आहे. मात्र, तेवढं दूध उपलब्ध नसल्याचं पाटील म्हणाले.

चोख व्यवस्थापन पाटील यांनी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे. दुधाळ गाई दुधाच्या धारा काढण्यासाठीच फक्त मिल्क पार्लरमध्ये आणल्या जातात. मुक्त संचार पद्धतीचा वापर, खाद्य व औषध व्यवस्थापन, लसीकरण या सर्वांतून दूध उत्पादनात 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. 50 गावरान कोंबड्याही पाळल्या असून शेणातील किडे, गाईंच्या अंगावरील गोचिडे त्या फस्त करतात.

चाऱ्याचे नियोजन गोठ्यालगत तीन एकरांवर फुले जयवंत चारा पिकासह ऊस व दोन एकरांत ज्वारी आहे. बाराही महिने हिरवा चारा मुबलक राहील असा प्रयत्न असतो. कोरड्या चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी ज्वारीची कडबा कुट्टी, सोयाबीनचा भुस्सा साठवून ठेवला जातो. दूध काढणी वेळी गाई व म्हशींना भिजवलेली तुरीची चुनी व सरकी खाण्यास दिली जाते.

संपर्क - पवन पाटील - 9421522881
पुंडलिक पाटील - 9823635050

तज्ज्ञांनी केली प्रयोगाची प्रसंशा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत पशुवैद्यक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, की पवन पाटील यांनी उभारलेल्या प्रक्रिया युनिट प्रयोगाची प्रसंशा करावी लागेल. वाहतुकीच्या खर्चामुळे दुधाचे दर वाढतात. स्थानिक स्तरावर अशी युनिटे सुरू झाली, तर ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार दूध मिळेलच, शिवाय शेतकऱ्यांनाही थेट विक्रीचा फायदा घेता येईल. पाटील यांनी अशा युनिटच्या उभारणीसाठी अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
संदर्भ # सकाळ अग्रोवन  

Nalin Kukde's zero budget orange farming success story


                                                   झिरो बजेट नैसर्गिक शेती  --- 004Vishnu Tajne's zero budget orange farming success story                                               झिरो बजेट नैसर्गिक शेती  --- 003Dnyaneshwar Umate's zero budget turmeric (haldi) farming success story                                                      झिरो बजेट नैसर्गिक शेती  --- 002Friday, 3 January 2014

Madhukar Pisal's zero budget sugarcane farming success story

झिरो बजेट नैसर्गिक शेती  --- 001
आले सरबतनिर्मितीतून ननावरे झाले यशस्वी उद्योजक -

सातारा जिल्ह्यातील एकंबे (ता. कोरेगाव) येथील विनोद ननावरे कृषी पदवीधर युवा शेतकरी आहेत. तीन भाऊ, भावजयी व आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. कुटुंबास एकूण 15 एकर जमीन आहे. त्यामध्ये सध्या दोन एकर आले, पाच एकर ऊस व अन्य क्षेत्रांत हंगामानुसार गहू, ज्वारी, सोयाबीन यासारखी पिके घेतली जात.

मुलांना शिक्षण देत असताना विनोद यांच्या वडिलांवर आर्थिक कर्ज झाले होते. त्यामुळे आपण नोकरी करीत राहिलो तर ते लवकर फिटणार नाही, असे विनोद यांना वाटत होते. त्यातूनच शेतीपूरक किंवा प्रक्रिया उद्योग करावा असे त्यांना वाटत होते. दरम्यान, मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्रातील (बीएआरसी) शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश दळवी यांच्याशी त्यांची भेट झाली. कृषी प्रक्रिया उद्योग निवडताना आपल्या भागात कोणता कच्चा माल उपलब्ध आहे, याचा विचार महत्त्वाचा असतो, असे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून पुढे आले. त्यानुसार सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध आले पिकावर आधारीत सरबतनिर्मितीचा पर्याय पुढे आला.

- त्यानंतर विनोद यांनी डॉ. दळवी यांची मदत घेऊन म्हैसूर येथे प्रक्रिया उद्योगाशी संबंधित "सीएफटीआरआय' संस्था गाठली. तेथे आठ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
- सन 2003 मध्ये व्यवसायाला सुरवातही केली. प्रथम प्रदर्शनांतून केवळ सरबत पिण्यासाठी म्हणून विकले जाऊ लागले. ग्राहकांना चव आवडू लागली. ते घरी नेण्यासाठी पॅकिंग मागू लागले.
- त्यानंतर आपल्या उद्योगाचे "इनाका प्रोडक्‍स' या नावाने नामकरण केले. त्याअंतर्गत अमाई जिंजर या नावाने आले सिरप किंवा सरबत पॅकिंगमध्ये सादर केले. वर्षाकाठी एक हजार "बॉटल' उत्पादित होऊ लागल्या. दर्जा चांगला ठेवल्याने मागणी वाढू लागली. अधिक प्रमाणात उत्पादन व ऑर्डर पुरवण्याच्या दृष्टीने यांत्रिकीकरण वाढविण्याचे ठरवले.

यांत्रिकीकरणावर दिला भर सन 2005 च्या सुमारास सरबतनिर्मितीसाठी आवश्‍यक यंत्रे खरेदी केली. यामध्ये सिरप मेकिंग मशिन, ज्युसर, प्रदर्शनात सरबत देण्यासाठी डिस्पेन्सर आदींचा समावेश होता. त्या काळात या यंत्रांसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च आला. यंत्रसामग्री घेतल्याने पाक, तसेच सरबतातील अन्य घटकांचे चांगले मिश्रण तयार होऊ लागले. पहिल्यापेक्षा चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळू लागले. पूर्वी बॉटलमध्ये तळाला साका राहत होता. आता ही त्रुटी कमी झाली. यंत्राच्या वापरामुळे वेळ व मजुरीत बचत झाली. दिवसेंदिवस दर्जा चांगला ठेवल्याने "ऑर्डर' वाढत गेली.

ननावरे यांच्या उद्योगाची वैशिष्ट्ये - - स्वतःच्या दोन एकरांतील आले, तसेच कमी पडल्यास परिसरातील शेतकऱ्यांकडून ते कच्चा माल म्हणून घेतले जाते.
- आल्याची सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर
- मागणीनुसार आवळा कॅंडी, सुंठ पावडर, आवळा सरबत तयार केले जाते.
- जास्तीत जास्त सरबत हे विविध प्रदर्शनांतून विकले जाते.
- जिंजर सिरप हे मुख्य उत्पादन, त्याचे 700 मिलिचे पॅकिंग- त्याची एमआरपी 120 रु.
- वर्षभर सुमारे 15 विविध प्रदर्शनांत सहभाग, राज्यासह हैदराबाद, दिल्ली, बेळगाव, धारवाड येथेही भाग
- परराज्यांत जाण्यासाठी एनएचएम किंवा कृषी विभागाचे अनुदानसाह्य मिळते.

विक्रीला चांगला प्रतिसाद, मागणीही भरपूर - मोठ्या प्रदर्शनात संपूर्ण कालावधीत 500 ते 1000 बॉटल खप.
- प्रदर्शनात सरबत पिण्यासाठी आर्थिक खप त्याहून दीड ते दुप्पट.
- छोट्या प्रदर्शनात 250 ते 300 बॉटल खप.
- आवळा सरबत- पॅकिंग 700 मिलि., एमआरपी 100 रु.
- कोल्ड्रिंक व अन्य व्यावसायिकांकडूनही सिरपला सतत मागणी.
- एकूण मागणीनुसारच वर्षभर सिरपनिर्मिती.
- पावसाळ्यातील काही महिने उद्योग तात्पुरता बंद.
- एकूण उद्योगाची उलाढाल सुमारे बारा कोटी रुपयांपर्यंत.
- प्रति बॅच सुमारे 75 बॉटल उत्पादन तयार होते.
- एकूण खर्च वजा जाता 15 ते 20 टक्के नफा.
- कच्च्या मालाच्या किमतीनुसार नफ्याचे प्रमाण कमी-जास्त

ननावरे यांच्या सरबताची वैशिष्ट्ये - - कोणतीही रासायनिक प्रिझर्व्हेटिव्ह वा रंगद्रव्ये वापरली जात नाहीत.
- संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने निर्मिती.
- मालाची गुणवत्ता कायम चांगली ठेवली जाते.
- कच्चा माल घेताना परिचित शेतकऱ्यांकडूनच घेतला जातो.
- अन्न व भेसळ प्रशासन संस्थे (एफडीए) चा परवाना.
- आले सरबत हा थोडा वेगळा प्रकार असल्याने त्याला अधिक मागणी.

प्रक्रिया उद्योजक म्हणून महत्त्वाची जबाबदारी - वेळेवर ऑर्डर पोचविण्याचे कर्तव्य पार पाडावे लागते.
- दररोज खडतर कष्ट, प्रसंगी 16 ते 18 ताससुद्धा कामाची तयारी हवी.
- घरातील सर्व सदस्य राबतात.
- मालाची गुणवत्ता टिकवून ठेवावी लागते.

ऍग्रोवन प्रदर्शन सुरू झाल्यापासून ननावरे येथे आपला स्टॉल घेतात. प्रदर्शनात मोठी जाहिरात झाल्याने सर्व ठिकाणांहून ऑर्डर सुरू झाल्या.

व्यवसायात झालेली वाढ थोडक्‍यात - आले सरबत उत्पादन - लिटरमध्ये
लिटरमध्ये खालीलप्रमाणे
सन...................उत्पादन
2008 .............20,000
2009............. 24,000
2010.............32,000
2011............36,000
2012............41,000
2013............46,000 (नोव्हेंबरअखेर)

स्वतःची वाहतूक व्यवस्था प्रदर्शनास उत्पादने नेत असताना सुरवातीस वेळेत ती वेळेवर न पोचणे, शिल्लक राहिल्यास सहन करावे लागणारे नुकसान अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे 2006 मध्ये फोर व्हीलर घेतली. कालांतराने "ऑर्डर' वाढत गेली. आता मोठी जीप घेऊन स्वतःची वाहतूक व्यवस्था यंत्रणा उभारली आहे.

ननावरे म्हणतात, की व्यवसायात कुटुंबातील सदस्यांचा मोठा हातभार आहे. मी किंवा बंधू दत्तात्रेय प्रदर्शनाच्या निमित्ताने बाहेर असलो तरी पत्नी सौ. प्रिया, वहिनी सौ. शिल्पा, तसेच आई, वडील उद्योगाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. कुटुंबाच्या मदतीने व प्रक्रिया उद्योगामुळे कर्ज फेडू शकलो. कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. कृषी सहसंचालक उदय देशमुख, तालुका कृषी अधिकारी विश्‍वास कुराडे, उपविभागीय कृष्णराव धुमाळ यांचेही सहकार्य लाभले आहे.
विनोद ननावरे - 9158974846.

संदर्भ # सकाळ अग्रोवन 

द्राक्षबागेवर इटली तंत्रज्ञानाच्या प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग


चिंचखेड येथील रामनाथ संधान यांनी 2004 पासून द्राक्षशेती सुरू केली. दरम्यान त्यांचा मुलगा प्रवीण याने मुंबईच्या नामांकित व्हीजेटीआय संस्थेतून बी.ई. (सिव्हिल) पूर्ण केल्यानंतर वडिलांबरोबर शेतीत राहून त्यातच अधिक प्रगती करण्याचे ठरवले. द्राक्ष उत्पादनाबरोबर द्राक्ष निर्यातीचाही अभ्यास केला. हळूहळू वर्ष 2007 पासून द्राक्ष निर्यात करण्यास सुरवात केली. 2 ते 3 कंटेनरने केलेली सुरवात आता 40 ते 50 कंटेनरपर्यंत पोचली आहे. युरोप, थायलंड आणि कंबोडियातील बाजारपेठेत प्रवीणने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

फयानने दिला "ब्रेक' या वाटचालीला 2009 मध्ये फयान वादळाने मोठा "ब्रेक' दिला. बागेचे 70 टक्के नुकसान झाले. 15 ते 16 लाख रुपयांचा हा तोटा होता. त्यापुढील वर्षी "क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड'च्या अवशेषांवरून युरोपीय बाजारात भारतीय द्राक्षे अस्वीकृत झाली. प्रवीण यांनी स्वत:चे व परिसरातील शेतकऱ्यांचे मिळून पाठविलेले 32 कंटेनर संकटात सापडले. आर्थिक तोट्याबरोबरच शेतकऱ्यांच्या नाराजीचेही धनी व्हावे लागले. हे संकट पचविणे अवघड होते; पण पुन्हा हिमतीने सावरून प्रवीण नव्या दमाने कामाला लागले.

इटलीतील द्राक्षशेतीकडून प्रेरणा! प्रवीण म्हणाले, की या कालावधीत निर्यातीच्या निमित्ताने इटलीत जाणे झाले. तेथील द्राक्षबागांमध्ये प्लॅस्टिक आच्छादन पाहिले. नाशिक भागात पूर्वी असे प्रयोग झाले होते; पण त्यातून हाती फार लागल्याचे आढळले नव्हते. इटलीत या विशेष प्लॅस्टिक तंत्रज्ञानाचा सुलभ वापर पाहिल्यानंतर आपणही ते वापरण्याचे ठरवले. इटलीत मागील 25 वर्षांपासून ते प्रचलित असून, तिथे पीकविमा करण्याआधीच प्राधान्याने आच्छादन केले जाते.

इटलीचे तंत्रज्ञान आले भारतात अखेर पुरेशा चिंतनानंतर 2012-13 मधील ऑगस्टमध्ये प्रवीण यांनी इटलीतून हे पॉलिथिन भारतात आणले. सुरवातीला सहा ओळींवर (चार ओळी जंबो सीडलेस, दोन थॉम्पसन) प्रयोग केला. त्या वर्षी प्रयोग क्षेत्रावर डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव उर्वरित बागेच्या तुलनेत कमी जाणवला. जम्बो सीडलेसच्या चार ओळींतून 1200 किलोपर्यंत उत्पादन अपेक्षित असताना ते दोन हजार किलोपर्यंत मिळाले.

यंदाचा प्रयोग- यंदाच्या वर्षी चार एकरांवर (तीन एकर जंबो सीडलेस व एक एकर थॉम्पसन) हा प्रयोग केला. मागील वर्षी जम्बो सीडलेस वाणाची 28 सप्टेंबरच्या सुमारास फळछाटणी घेतली होती. यंदा 16 व 18 ऑगस्टला छाटणी घेतली. या काळात संपूर्ण ढगाळ वातावरण, संततधार पाऊस ही स्थिती असताना नेहमीपेक्षा लवकर छाटणी घेणे मोठे धाडसच होते. संपूर्ण दिंडोरी तालुक्‍यात यंदा सतत पावसाचे वातावरण राहिले. मात्र बाहेर पाऊस पडत असतानाही प्लॅस्टिकच्या वरील आच्छादनामुळे संधान यांच्या बागेतील सर्व कामे वेळेतच पूर्ण झाली. अत्यंत प्रतिकूल वातावरणात या बागेत "डाऊनी' वाढण्यासारखी परिस्थिती नव्हती. या काळात संधान यांनी प्रति लिटर पाण्यात बुरशीनाशकाचे प्रमाण शिफारशीपेक्षा निम्म्यानेच घेण्यास सुरवात केली. मात्र राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांच्याशी चर्चा केली असता, डोस अपुरा करू नका, गरजेनुसार फवारण्यांतील अंतर वाढवा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार नियोजन केले.

डाऊनीसाठी तीस दिवसांतील महत्त्वाच्या "स्प्रे' काळात वीस दिवस पाऊस राहिला. त्या काळात रोज दोन स्प्रे घेतले असते, तर एकूण 40 स्प्रे झाले असते. पण आच्छादन प्रयोगामुळे तीन ते चार व त्याही प्रतिबंधक फवारण्या झाल्या.

काय आहे हे प्लॅस्टिक तंत्रज्ञान! -"एचडीपीई वूवन फॅब्रिक' मटेरियलचा वापर
-यामुळे बागेतील तापमान व आर्द्रता यांचा समतोल साधला जातो. दुपारचे 32 अंश से. तापमान असताना बागेतील तापमान 27 ते 28 अंश असते.
-यातून दिवसा 85 टक्के सूर्यप्रकाश आत येतो व तो 65 टक्के विभागला जातो.
-रात्रीच्या वेळीही तापमान नियंत्रणामुळे वातावरण ऊबदार राहते.
-यामुळे पानांवर, घडांवर दव साचत नाही, असा अनुभव.
-यात वेलीचे शेंडे वरती प्लॅस्टिकला भिडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
-प्लॅस्टिक आणि वेली यात तीन-साडेतीन फुटांचे अंतर ठेवले जाते. वाढ नियंत्रित ठेवावी लागते.

बागेतील मांडणीचे काही मुद्दे - - "वाय' किंवा बावर अशा कोणत्याही पद्धतीसाठी हे तंत्र वापरता येते.
-झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी शेवटी गॅल्वनाईज्ड लोखंडाचा वापर करून संपूर्ण बागेच्या चारही बाजूंनी फ्रेम
-त्यावर साडेतीन मि.मी. गेजची ( 8 क्रमांकाची) तार ओळीत बांधली. त्यावर प्लॅस्टिक आच्छादन
-बागेतील फ्रेमच्या प्रत्येकी 25 फुटांवर एमएस पोल व त्याला दोन बांबूंचा सपोर्ट
-झाडांच्या रांगेत प्रत्येकी आठ फुटांवर बांबूंचे सपोर्ट. बांबू सिमेंटमध्ये पक्का रोवून त्याचा पॉलिथिन आच्छादनाला टेकू.
-तंबू आकाराची मांडणी
-प्लॅस्टिक कव्हर फाटू नये म्हणून प्रत्येक बांबूला प्लॅस्टिक कॅप. तारेच्या फ्रेमला "पीव्हीसी' मटेरियलच्या दोरीने बांधले. या दोरीत अधिक ताण सहन करण्याची क्षमता असते. वादळ-वाऱ्यात प्लॅस्टिक उडून जात नाही.

प्लॅस्टिक आच्छादन तंत्रज्ञानातून मिळालेले निष्कर्ष- - बागेतील सूक्ष्म वातावरण नियंत्रित राहिले
-भर पावसात कामे सुरू राहत असल्याने वेळ साधली गेली
-डाऊनी नियंत्रणाचा खर्च 70 टक्‍क्‍यांनी कमी झाला
-भुरीसाठी नेहमीप्रमाणेच खर्च झाला
-वेलीच्या वाढीचा वेग तुलनेने जास्त आढळला
-बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले
-सलग पावसातही फवारणीला अडचण आली नाही
-पावसानंतर ओलसरपणा न राहिल्याने वेली झटकण्याची गरज उरली नाही
-बाजारातील मागणीप्रमाणे हंगाम घेता आला

प्लॅस्टिकवरील खर्च भरून निघेल... संधान यांना यंदाच्या मार्चमध्ये द्राक्षांना किलोला 65 रुपये दर मिळाला. 18 ऑगस्टच्या दरम्यान फळछाटणी घेतली असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच माल बाजारात येण्यास सज्ज झाला आहे. 145 रुपये प्रतिकिलो दराने मालाचा व्यवहार आशियाई देशांसाठीच्या निर्यातीसाठी झाला आहे.

प्लॅस्टिकच्या संपूर्ण प्रयोगाला (प्लॅस्टिक, बांबू, मांडव रचना वगैरे एकत्रित) एकूण 22 लाख रुपये (एकरी साडेपाच लाख रुपये) खर्च आला आहे. द्राक्षाला अधिक दर मिळणार असल्याने प्लॅस्टिकवरील काही खर्च भरून निघेल, असा संधान यांना विश्‍वास आहे.

दर वर्षी खुल्या क्षेत्रावरील बागेत वर्षाअखेर एकरी एकूण उत्पादन खर्च एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत येतो. प्लॅस्टिक आच्छादनाच्या बागेत हा एकरी खर्च यंदा 30 हजार रुपयांनी कमी झाल्याचे संधान यांना दिसून आले आहे. प्लॅस्टिकचा वापर किमान सात ते आठ वर्षे टिकेल. त्यामुळे पुढील वर्षीपासून त्यावरील खर्चही कमी होत राहील, असे संधान म्हणाले.

खर्चाचा तपशील----खुल्या क्षेत्रावरील बाग (एकरी) --पॉलिथिन आच्छादनयुक्त बाग खते-----------35,000----------------------30,000
कीडनाशके--------50,000--------------------20,000
मजुरी------------40,000-----------50,000 (या तंत्रात मजुरी खर्चात वाढ धरली आहे)
संजीवके------15,000----------------15,000
----------------------------------------------
एकूण खर्च------1,40,000-----------1,05,000

जगाच्या बाजारातील संधी शोधू या! 28 वर्षीय प्रवीण मागील पाच वर्षांपासून द्राक्षांची नियमित निर्यात करीत आहेत. शेतातील उत्पादनापासून ते जगाच्या बाजारातील मागणीपर्यंत त्यांचा अभ्यास सतत सुरू असतो. युरोप हे भारतीय द्राक्षांसाठी महत्त्वाचे मार्केट. जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबरअखेरपर्यंत युरोपच्या बाजारात स्पेन, इटली, पोर्तुगाल या देशांतील द्राक्षांचा हंगाम असतो. नोव्हेंबरनंतरच्या हंगामाला "ओव्हरसीज सीझन' म्हटले जाते. ब्राझीलमधून या काळात द्राक्षे सुरू होतात. त्यानंतर क्रमाक्रमाने दक्षिण अफ्रिकेचा हंगाम हा जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. त्यानंतर अर्जेंटिनाची द्राक्षे 2 आठवडे चालतात. त्यानंतर चिलीचा हंगाम 4 आठवडे चालतो. त्यानंतर भारताचा हंगाम 1 मार्च ते 15 जूनपर्यंत असतो. इजिप्तचा द्राक्षांचा हंगाम 15 जून ते 30 जूनपर्यंत असतो.

भारताला संधी मागील काही वर्षांचा आढावा घेतला तर असे दिसते, की 15 डिसेंबर ते पाच जानेवारी या काळात युरोपात पाठविण्यात आलेल्या द्राक्षांना प्रतिबॉक्‍स 15 ते 20 युरोचे दर मिळाले आहेत. याच काळात युरोपीय बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने आपल्याला या काळात मोठी संधी आहे. या काळात बाजारात दर्जेदार द्राक्षे आणून आपण या संधीचा फायदा घ्यायला हवा, असेही प्रवीण यांनी सांगितले.

भारतीय द्राक्षांची गुणवत्ता अव्वल युरोपीय बाजारात चिली या देशाचा हंगाम आतापर्यंत एक मार्चपर्यंत राहिला आहे. मात्र भारतीय द्राक्षांनीही 15 एप्रिलपासूनच युरोपीय बाजारात मुसंडी मारल्याचे मागील दोन्हीही वर्षी दिसून आले. भारतीय द्राक्षांत अवशेषांचे निकष पाळले जात असल्याने भारतीय द्राक्षांची सकारात्मक प्रतिमा जगभरात पसरली आहे. भारतीय द्राक्षांना या स्थितीत मागणी वाढली आहे.

दृष्टिक्षेपात शेती- पीक- द्राक्ष (एकूण 11 एकर)
वाण : थॉमप्सन (8 एकर), जम्बो सीडलेस (3 एकर)
जमीन प्रकार : मध्यम प्रकारातील मुरुमाट आणि काळी
सिंचन : ठिबक

संधान यांच्या द्राक्ष व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे -खरड छाटणीनंतर बागेला किमान 15 दिवस विश्रांती
-एकरी दोन ट्रक एवढे कुजलेले शेणखत खरड छाटणीनंतर वरंबे फोडून दिले जाते.
-कॅनोपी व्यवस्थापन महत्त्वाचे. प्रत्येक वेलीला 30 काड्या आणि 15 ते 20 घड संख्या ठेवली जाते.
-खरड छाटणीतील कामांकडे प्राधान्याने लक्ष
-फळछाटणीआधी नियमित काडी तपासणी. छाटणीनंतरच्या 40 व्या दिवशी पर्ण-देठ परीक्षण व त्यानुसारच अन्नद्रव्य व्यवस्थापन.
-झाडाची "व्हीगर' नियंत्रित ठेवण्यासाठी गरजेनुसार पाणी व्यवस्थापन

संधान यांच्याकडील द्राक्ष उत्पादन- रामनाथ संधान हे निवृत्त कृषी अधिकारी आहेत. वेलीच्या गरजेनुसार पाणी, अन्नद्रव्ये, संजीवके यांचे नियोजन व कीड-रोगांच्या नियंत्रणाकडे त्यांनी प्रभावी लक्ष दिले आहे. सातत्याने प्रयोगशील राहणे, हा संधान पितापुत्रांचा स्वभावच बनला आहे. त्यातूनच दर्जेदार, निर्यातक्षम एकरी 8 ते 10 टन इतके उत्पादन ते घेत आहेत. वर्ष 2008 पासून ते अलीकडेपर्यंत द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, हे पुढील आकडेवारीवरून समजते.

वर्ष----एकरी उत्पादन (टन) -दर (प्रति किलो रु.)
2008-09-----8-----30 (फयानमुळे 70 टक्के नुकसान)
2009-10-----8-----50 (युरोपीय पेचामुळे तोटा)
2010-11-----10-----50
2011-12------11----60
2012-13-------11-----65

अपेक्षित
2013---
1)जंबो सीडलेस- तीन एकरांतून- 25 टन
निश्‍चित झालेला दर- प्रति किलो 145 रु.
2)थॉम्प्सन- एक एकर- 12 ते 13 टन

संपर्क 
प्रवीण रामनाथ संधान : 9823077753
रामनाथ संधान -9422945389

शास्त्रज्ञांनी दिला प्रयोगावर सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी संधान यांच्या प्लॅस्टिक आच्छादन प्रयोगावर व्यक्त केलेली मार्गदर्शनपर टिप्पणी अशी.
1) द्राक्षबाग झाकण्यासाठी किंवा वरून पडणाऱ्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी संधान यांनी केलेला प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग अतिशय चांगला आहे.
2) या तंत्रज्ञानात प्रत्येक ओळीत प्लॅस्टिकचे छत आहे. मात्र दोन ओळींतील मधला भाग मोकळा आहे. त्यातून पाणी खाली पडते. द्राक्षे तयार होण्याच्या काळात जर पाऊस आला, तर पडणाऱ्या पावसाचे हे अतिरिक्त पाणी मुळे शोषून घेतील व बेरी क्रॅक होण्याचा धोका वाढेल. त्यामुळे मधल्या जागेत प्लॅस्टिक अंथरून अतिरिक्त पाणी बागेबाहेर निचरा करण्याची सोय करावी लागेल.
3) या तंत्रज्ञानात झाडांवर पाणी पडत नसल्याने ती ओलसर राहत नाहीत. त्यामुळे डाऊनीचा धोका कमी राहील. फवारण्यांची संख्या कमी राहील. मात्र पावसाची परिस्थिती बिघडून आर्द्रता वा दव वा ओलसरपणा वाढला तर त्याची शक्‍यता लक्षात घेऊन फवारण्यांचे नियोजन करावे लागेल. अशी परिस्थिती कोणती ते पाहून फवारणी वेळापत्रक तयार करावे लागेल.
4) प्लॅस्टिक छताखाली भुरीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता वाढते. अशा वेळी "स्प्रेईंग' जास्त करावे लागते. अधिक चांगल्या प्रकारे भुरीचे नियोजन करावे लागेल.
5) प्लॅस्टिक छत व त्याअनुषंगाने येणारा खर्च लक्षात घेता, तो भरून काढण्यासाठी अर्ली प्रूनिंग घेणे, त्यातून द्राक्षाला चांगला दर मिळवण्याची जोखीम घेणे या गोष्टी कराव्या लागतील.संदर्भ # सकाळ अग्रोवन  

सेंद्रिय पद्धतीवर भर देत साधली हळद, आल्यातून समृद्धी

माळसोन्ना येथील तुकाराम नारायण दहे यांचे मूळ गाव मानवत. तेथे त्यांची एक एकर शेती होती. त्यांनी ती विकून आपल्या आजोळी, माळसोन्ना येथे एक एकर शेती घेतली. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1999 पासून दहे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला; परंतु केवळ एक एकरवर शेती परवडणारी नव्हती. त्यामुळे कर्ज घेऊन संकरित गाय विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. गावात दूध डेअरी सुरू केली. सात वर्षे ती चालवली खरी, मात्र पुढे काही कारणामुळे बंद करावी लागली. दरम्यानच्या काळात दहे कुटुंबीयांनी साडेचार एकर शेती खरेदी केली. अर्थात ती जिरायती होती. त्यामुळे मूग, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी अशी पिके त्यात घ्यावी लागत होती. त्यातून वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड करणे अशक्‍य होत असे.

शेतीशाळेमुळे कलाटणी दैठणा कृषी मंडळाचे तत्कालीन कृषी अधिकारी पी. डी. देशमुख यांनी माळसोन्ना येथे शेतीशाळा सुरू केली होती. दर आठवड्याला दहे नियमितपणे शेतीशाळेत जाऊ लागले. यामुळे त्यांना सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती मिळू लागली. बियाणे गुणवत्ता, लागवड पद्धत, पाणी, खते, कीडनाशके, पिकांवरील मित्रकीटक, शत्रुकिडी यांचे चांगले ज्ञान त्यांना होऊ लागले. जिरायती क्षेत्रात संरक्षित पाण्याची सोय करायची होती, तरच त्यातून उत्पन्नवाढ मिळणार होती. दागिने मोडून सिंचनासाठी शेतात 200 फूट बोअर घेतले. त्याला चांगले पाणी लागले. हळद हे पीक घेण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी 2006 मध्ये बेणे तयार करण्याच्या दृष्टीने हळद लागवड केली. पुढील वर्षी सरी- वरंबा पद्धतीने लागवड केली.

गादी वाफ्यावर हळद लागवड सन 2008 मध्ये गादी वाफा पद्धतीने हळद लागवड केली. या भागात अशा प्रकारचा प्रयोग नवीन होता. लागवडीपूर्वी माती परीक्षण व सामू तपासून घेतला. प्रत्येकी पाच फूट अंतरावर दोन फूट रुंदीचे गादी वाफे (बेड) तयार केले. प्रत्येक गादी वाफ्यावर दोन ओळी, दोन ओळींतील अंतर एक फूट आणि दोन रोपांतील अंतर सहा इंच याप्रमाणे दोन एकर क्षेत्रावर लागवड केली. त्यासाठी सेलम जातीचे एकरी दहा क्विंटल बेणे लागले.

पीक व्यवस्थापनातील काही गोष्टी- - गेल्या सात वर्षांपासून दहे हळदीची शेती बेणे निर्मितीसाठीच करतात.
- सेंद्रिय पद्धतीचा वापर सुमारे 80 ते 90 टक्के होतो. अगदीच वेळ पडली तर रसायनांचा वापर होतो.
- शेतात गांडूळ खताची चार युनिट आहेत. त्याचे खत वापरले जाते.
- याशिवाय बायोडायनॅमिक खतही वापरतात.
- दशपर्णी अर्क, जीवामृत, निंबोळी अर्क, व्हर्मीवॉश यांचाही वापर होतो.
- ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाबरोबर बिव्हेरिया बॅसियानासारख्या जैविक कीडनाशकांचाही उपयोग केला जातो.
- ठिबक सिंचनाद्वारा पाणी दिले जाते.

उत्पादन व मालाचा दर्जा - ओल्या हळदीचे एकरी 200 क्विंटल, तर वाळवलेल्या हळदीचे 40 क्विंटल उत्पादन सरासरी मिळते.
- उत्पादन खर्च एकरी 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत होतो.
- मार्केटमध्ये हळदीचा क्विंटलला जो दर सुरू असतो त्याच्या एक चतुर्थांश दराने बेणे विक्री होते.
- सेंद्रिय पद्धतीवर जोर असल्याने बेण्याची क्‍वालिटी चांगली असून, भेसळ जराही नसल्याचे दहे म्हणतात.
त्यामुळे आपले बेणे आगाऊ मागणीने विकले जाते. परिसरातील गावांबरोबरच आंध्र प्रदेशातील शेतकरीही त्यांच्याकडून बेणे नेतात.

पुरस्काराने सन्मान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (परभणी) विस्तार कार्यक्रमांतर्गंत माळसोन्नासह अन्य काही गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये विविध पिकांबाबत मार्गदर्शन होते. विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागातील प्राध्यापक डॉ. प्रवीण कापसे, कृषी अधिकारी पी. डी. देशमुख यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा अवलंब करत दहे यांनीही परिसरातील गावात सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यात सहभाग नोंदवला.
दहे यांना शेतीतील योगदानाबाबत 2011-12 या वर्षी राज्य शासनातर्फे वसंतराव नाईक "कृषिभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशात बेणे विक्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भेटीसाठी आलेल्या आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना दहे यांच्या हळद उत्पादनाची माहिती मिळाली. त्यांनी दहे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सुमारे दोनशे क्विंटल हळद बेण्याची खरेदीही केली. पंढरपूर, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडून बेणे विकत नेले आहे.

तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन माळसोन्ना येथील शेतकरी पारंपरिक पिके घेत असत. यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे गावातील काही लोक उपजीविकेसाठी शहरात स्थलांतर करीत. परंतु दहे यांनी गावात कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना एकत्र केले. त्यांच्यात शेतीची आवड निर्माण केली. पूर्वी गावातील कुणीही हळद लागवड करत नव्हते. मात्र दहे यांच्या प्रोत्साहनामुळे गावात हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

आले लागवडीतूनही आर्थिक हातभार काही वर्षांपासून दहे आले लागवडही करतात. एकरी सरासरी 180 ते 200 क्विंटल उत्पादन (ओले) मिळते.
बेणे व मार्केटसाठीही विक्री होते. या वर्षी आले पिकात शेवगा घेतला आहे. त्यापासून बोनस उत्पन्न मिळणार आहे.

पत्र्याच्या घरातून बंगल्यात तुकाराम दहे यांच्या कुटुंबाकडे पूर्वी एकर शेती होती. पत्र्याचे घर होते. आई नीलाबाई, बंधू आबासाहेब यांच्यासह सर्व कुटुंबीयांच्या मेहनतीमुळे आज त्यांच्याकडे 12 एकर शेती झाली आहे.
तीन बोअरच्या माध्यमातून ही शेती सिंचनाखाली येते. दहे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती आता चांगली झाली असून, गावातील मुख्य रस्त्यावर त्यांनी बंगला बांधला आहे. मुले चांगले शिक्षण घेत आहेत.

संपूर्ण कुटुंब राबते शेतात घरातील सर्व सदस्य शेतात राबतात. दहे यांचे मोठे बंधू आबासाहेब यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले आहे, परंतु नोकरीपेक्षा शेतीलाच त्यांनी जवळ केले आहे. आई नीलाबाई यांचे वय 70 वर्षे असूनही शेतीतील कष्ट करणे त्यांनी थांबवलेले नाही. त्या दर वर्षी पंढरपूरची वारी अजूनही पायी करतात, हे विशेष. नीलाबाई यांनी सुमारे 12 वर्षे मजूर म्हणून काम केले. मिळणाऱ्या उत्पन्नातून मुलांना वाढवले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. शिक्षणाचे महत्त्व समाजावून सांगितले. नोकरी मिळाली नाही तरी शेतीतून चांगले उत्पन्न घेता येते, हा विश्‍वास त्यांनी मुलांमध्ये जागृत केला.


तुकाराम दहे - 9822548325


संदर्भ # सकाळ अग्रोवन 

शून्यातून उभे केले एकात्मिक शेतीचे मॉडेल

ठाणे जिल्ह्यात निसर्गसौंदर्य आणि सुंदर समुद्रकिनाऱ्याने नटलेल्या उत्तर कोकणातील डहाणू तालुक्‍यात वसलेले छोटे गाव म्हणजे जामशेत. येथील पोतदार बंधूंच्या एकत्रित कुटुंबाची चिकू, आंबा, नारळ व अन्य विविध पिकांची शेती अभ्यासण्याजोगी आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करत वर्षभर उत्पन्न सुरू राहील असे प्रयोग येथे झाले आहेत. पोतदार बंधूंचे वडील (कै.) अनंत पोतदार यांनी "इलेक्‍ट्रिकल कॉंट्रॅक्‍टर'चा व्यवसाय सांभाळत शेती खरेदी करीत तिचा विस्तार केला. यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे निधन (वय वर्षे 78) झाले. संजय, प्रशांत व स्नेहल या बंधूंनी वडिलांकडून मार्गदर्शन घेत ही शेती आणखी विकसित केली आहे.
स्नेहल इलेक्‍ट्रिकल कॉंट्रॅक्‍टर असून, त्यांचे बंधू त्यांना व्यवसायात मदत करतात. मात्र शेतीकडे या बंधूंनी जराही दुर्लक्ष केलेले नाही. स्नेहल ठाणे जिल्हा नारळ उत्पादक हितवर्धक संस्थेचे (पालघर) सदस्य आहेत. मसाला लागवडीसाठी त्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने मोहीम सुरू केली आहे. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत ते आवर्जून सहभागी होतात. आई श्रीमती सुमनबाई यांची मोलाची साथ या बंधूंना मिळाली आहे.

अभ्यासातून साधली प्रगती - पोतदार कुटुंब मूळ नाशिक जिल्ह्यातील नामपूर (ता. सटाणा) येथील आहे. मात्र नोकरी व व्यवसायानिमित्त डहाणू हीच त्यांची कर्मभूमी झाली. या कुटुंबाने शून्यातून शेतीचे विश्‍व उभारले आहे. जिद्दीने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना अनुभवी, प्रगतिशील शेतकऱ्यांकडील शेती अभ्यासली.
पारंपरिक पिकांतून वर्षाकाठी जेमतेम लाख-दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळायचे. घरचे पाच-सहा जण राबायचे. जोडधंदा असूनही पोटापाण्याची हातमिळवणी अवघड झाली होती. पण वडिलांचा मोठा आधार, त्यांची जिद्द, हिंमत या गुणांमुळे पोतदार कुटुंब स्वस्थ बसले नाही. त्यांनी शेतात विहीर खोदली, दोन बोअर घेतले, पाण्याची टाकी बांधली. सुरवातीला लिली फुले, मिरची, पपई यांची लागवड केली. त्यानंतर कमी पाण्यावर येणाऱ्या फळपिकांचा विचार सुरू झाला.

चिकूची वाडी सन 1996 मध्ये पोतदार बंधूंच्या वडिलांनी पडीक जमीन सपाट करून चिकूच्या कालीपत्ती जातीची 2200 कलमे आणून लावली. सुरवातीला असलेली 25 एकर चिकूची बाग आता 42 एकरपर्यंत विस्तारली आहे. झाडांची सेंद्रिय पद्धतीने जोपासना केली जाते. गांडूळ खत, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क, जीवामृताचे युनिट आहे. चिकूच्या प्रति झाडापासून 250 ते 275 किलो, तर हेक्‍टरी सुमारे दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते.

फळांची विक्री - वर्षभर फळे देणाऱ्या झाडाला ऑक्‍टोबर ते मेपर्यंत अधिक चिकू लागतात. पावसाळ्यात ती कमी येतात. फळे विक्रीसाठी डहाणूच्या चिकू मार्केटला (ऑक्‍शनला) आणली जातात. येथे शेतकऱ्यांचा फळफळावळ संघ असून, तेथेही विक्री होते. ऑक्‍शनमध्ये मुंबई, पुणे, गुजरात, दिल्ली, खानदेश येथील व्यापाऱ्यांमार्फत उघड बोली पद्धतीने विक्री केली जाते. आकारानुसार चिकूला सरासरी आठ ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतो. मोठ्या आकाराच्या चिकूला 25 ते 30 रुपये भाव मिळतो.

पोतदार बंधूंचा मार्केट स्टडी चांगला आहे. गेल्या दहा वर्षांत चिकूला किती भाव मिळाला, याचे पूर्ण टिपण त्यांनी ठेवले आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांच्या एक "नंबर'च्या चिकूला किलोला 40 रुपये सरासरी, तर कमाल भाव 80 रुपये मिळाला.

जनावरांचे आदर्श संगोपन बाग दर्जेदार पिकवायची तर शेणखत मोठ्या प्रमाणात पाहिजे. त्यासाठी आधुनिक पद्धतीने सुसज्ज गाई, म्हशींसाठी 40 बाय 40 फूट आकाराचा गोठा आहे. एकूण 28 जनावरे आहेत. त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन होते. जनावरांपासून दररोज 30 लिटर दूध मिळते. दुधाची 30 रुपये प्रति लिटरप्रमाणे जागेवर व 40 रुपये लिटरप्रमाणे डहाणूत विक्री होते. वर्षभरात जनावरांपासून जवळपास 20 ते 25 ट्रक शेण मिळते. ते खड्ड्यांत टाकून चांगल्या प्रकारे कुजविले जाते. काही शेणाची स्लरी करून ती पिकांना दिली जाते. विरंगुळा म्हणून शेतात बदके, हंस पाळले आहेत.

नारळ - बाणवली जातीची सुमारे 325 झाडे आहेत. लहान-मोठे मिळून प्रति झाड 80 ते 100 नारळ मिळतात. डहाणूचे व्यापारी प्रति नग 5 ते 8 रुपये दराने शहाळी खरेदी करतात. धार्मिक व सणासुदीच्या निमित्ताने नारळाला 10 ते 12 रुपये (प्रति नग) दर मिळतो.
आंबा - आंब्याची सुमारे 75 झाडे असून हापूस, केशर, रायवळ, राजापुरी, पायरी आदी जाती पाहण्यास मिळतात. राजापुरी आंब्याचा उपयोग लोणच्यासाठीही करतात. हेक्‍टरी उत्पादन साडेचार ते पाच टन मिळते. हापूसला 30 ते 35 रुपये, केशर 20 ते 25 रुपये, तर राजापुरीला 20 रुपये प्रति किलो दर मिळतो.

अन्य फळझाडांचेही उत्पन्न पेरू (लखनौ), रामफळ, सीताफळ, पपई, बांधावर सागाची झाडे, केळी (वेलची व भाजीची केळी), अळूची पाने, कढीपत्ता, आवळा, सफेद जांबू, शेवगा, चिंच, पपनस, बिजोरा लिंबू, फणस आदी पिके आहेत. पॉंडमध्ये विविध जातींची कमळफुले लावली आहेत. दोन गुंठ्यांत छोटी नर्सरी असून, आंबा, चिकू, शोभिवंत, औषधी वनस्पती, सायकस आदींची रोपे आहेत.

मसाला पिके - छोट्या जागेत मसाला पिके आहेत. यात प्रामुख्याने तेजपान, जायफळ, लवंग, वेलदोडा, काळी मिरी (बुस्टर काळी मिरी) यांची थोड्या प्रमाणात लागवड. कोकणतेज जातीच्या दालचिनीची एकूण 150 कलमे. त्यांची लागवड बागेत ओहोळाच्या कडेने, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आहे. दालचिनीची साल, तसेच तमालपत्राला चांगली मागणी आहे. मसाला पिकांमधून वर्षाला सुमारे 30 हजार रुपयांची उलाढाल होते.

पोतदार बंधूंचे दूरदृष्टीचे नियोजन - - संरक्षित पाण्याची सोय म्हणून शेततळे.
- बोअर, ड्रिप इरिगेशन, विहीर खोल केली, पाणीसाठा वाढविला.
- विहीर व बोअरचे पुनर्भरण केले.
- दर वर्षाच्या बचतीतून वर्षाला दोन एकर याप्रमाणे 12.5 एकर बागायत जमीन विकत घेतली.
- घरात कृषीविषयक विविध पुस्तके, मासिके, "ऍग्रोवन' दैनिक यांचे वेगळे दालन.
- वेळोवेळी कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची तांत्रिक मदत.

बचतीचे महत्त्व - - घरचे सर्व जण शेतीत कष्ट करतात.
- पूरक व्यवसायातून आर्थिक पाठबळ.
- सेंद्रिय स्लरी व शेणखतावर भर.

यांत्रिकीकरणावर भर - - चिकू मार्केटला नेण्यासाठी जीप.
- एचटीपी पंपाद्वारा फवारणी.
- सुमारे 29 एकरांवर ठिबक सिंचन.
- द्रवरूप खतांवर भर.
- टॅंकमधून चिकूला पाइपलाइनद्वारा सेंद्रिय स्लरी दिली जाते.

सुधारणा - - पॅकहाऊ,त्तिसेच 50 शेतकरी बसू शकतील अशी शेड.
- दोन मोटारसायकली व कार.
- मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण.
- सर्व मुले हुशार. घरातील एका मुलीला दहावीत 91 टक्के गुण.


स्नेहल पोतदार - 9422477445, 9209270265
प्रा. उत्तम सहाणे-8087985890

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे येथे विषय विशेषज्ञ आहेत.)


संदर्भ # सकाळ अग्रोवन  

टोमॅटो पिकाने दिली

कौटुंबिक अर्थव्यवस्थेला बळकटी एकत्रित कुटुंबातून मजूरटंचाईवर मात शेतीतील वाढती मजूरटंचाई ही शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या बनली आहे. ही समस्या बऱ्याच प्रमाणात दूर करण्यात रावते यशस्वी झाले आहेत. कुटुंबातील सहा सदस्यांकडे शेतीकामांच्या जबाबदाऱ्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एका सदस्यावर कामाचा बोजा वाढत नाही.
संपूर्ण कुटुंब ऍग्रोवनचे वाचक आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य शिकलेले आहेत. आम्ही सर्व जणांनी ऍग्रोवन वाचूनच शेतीत बदल केले. टोमॅटो, मिरची, कोबी किंवा शेतमालाला कोणत्या बाजारपेठेत भाव आहे हे आम्हाला ऍग्रोवनमधूनच समजते. त्यानुसारच माल बाजारपेठेत पाठवतो. आम्हा परिवारासाठी ऍग्रोवन विठ्‌ठलच ठरला आहे, असे रावते बंधूंनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील शहापूर बंजर (वडाची वाडी) हे एक हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. शेती हाच गावचा मुख्य व्यवसाय. गावात कापूस, मका या पारंपरिक पिकांसोबत नव्याने टोमॅटो, मिरची व कोबी ही भाजीपाला पिके घेतली जातात. शेतीशी नाळ जुळलेले गावातील तरुण नोकरीऐवजी शेतीलाच जास्त प्राधान्य देतात.

गावातील विकास, त्यांच्या पत्नी सौ. किरण, तसेच विलास व त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा, आई सौ. चंद्रकला व वडील चंद्रभान रावते असे संपूर्ण कुटुंब एकत्रित शेती करते. पंधरा एकर शेतीत सात एकर कापूस, दोन एकर मका, एकरभर बाजरी व मूग, दीड ते दोन एकर टोमॅटो, उर्वरित दोन एकरांत कोबी, हिरवी मिरची व जनावरांसाठी हिरवा चारा घेण्यात येतो.

टोमॅटो शेती यंदा ठरली फायदेशीर शहापूर बंजर हे गाव काही वर्षांपासूनच टोमॅटोची शेती करते. रावते कुटुंब त्याला अपवाद नाही. त्यांच्याकडेही 2007 पासून सुमारे एक ते दोन एकरांत त्याची शेती होते. रावते कुटुंबीय पूर्वी पारंपरिक पद्‌धतीने शेती करायचे. जिरायती शेतीत कापूस, मूग आणि ज्वारी अशी पिके खरिपात घेतली जात. मात्र 2005 मध्ये खोजेवाडी धरणाचे काम पूर्ण झाले आणि जुनी विहीर पाण्याने तुडुंब भरली. याच वेळी गावातील अन्य शेतकरी भाजीपाला पिके घेत होते.
पाण्याची व्यवस्था झाल्याने रावते बंधूंनीही भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. यात सुरवातीला टोमॅटो आणि हिरव्या मिरचीसह ढेमसे, भेंडी व कारल्याची लागवड केली. पहिल्याच वर्षात यश मिळाले अन्‌ उत्साह वाढत गेला. हाती पैसा खेळू लागला. भाजीपाला शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून 2008 मध्ये चार किलोमीटर पाइपलाइन करून सहा एकर शेतीही पाण्याखाली आणली.

यंदाचे वर्ष ठरले समाधानाचे हवामान अनुकूल असेल तर त्या वर्षी टोमॅटोचे उत्पादन चांगले मिळाले. पण रावते कुटुंबाला कधी अति पाऊस, कधी दुष्काळी परिस्थिती यामुळे कोणत्या ना कोणत्या वर्षी तरी नुकसानीला सामोरेही जावे लागले.
सन 2011 व 2012 ही वर्षे त्यांच्यासाठी अवर्षणाची ठरली. टोमॅटो उत्पादनात घट आली. यंदाच्या वर्षी मात्र पावसाने साथ दिली. त्यामुळे टोमॅटो पीकही चांगले फुलले.

सेंद्रिय खताला विशेष महत्त्व लागवडीपूर्वी दोन एकर क्षेत्राला तीन ट्रॅक्‍टर शेणखत टाकले. लागवडीवेळी 12 गोण्या गांडूळ खत दिले. त्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक्षमता, टवटवीतपणा व झाडांची वाढ चांगली होण्यास मदत झाली. जानकीदेवी बजाज ट्रस्टने 12 गोण्या गांडूळ खत मोफत दिले. यामुळे चांगला हातभार लागल्याचे रावते सांगतात. घरीच रोपे तयार केली. पावसाळ्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 20 जूनच्या आसपास लागवड केली. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत ठिबक सिंचनाद्वारा 19:19:19, फळधारणा झाल्यानंतर 0:52:34 आदीं विद्राव्य खतांचा वापर केला. पीक साडेतीन महिन्यांचे झाल्यानंतर 12:32:16 दोन पोती, युरिया एक पोते व पोटॅशची दोन पोती मुळाशी देण्यात आली. कीड व रोगनियंत्रणाबाबत दक्षता घेतली. नागअळी, फळ पोखरणारी अळी यांचे रासायनिक नियंत्रण केले. कृषी सहायक बाळासाहेब सूळ, मारोती गवळी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
: विलास रावते, 7875813989
: विकास रावते, 8408986592

पुढील तंत्रज्ञानाचा वापर ठरला फायद्याचा बेड पद्‌धतीने टोमॅटो आणि मिरचीची लागवड
ठिबकने संपूर्ण भाजीपाला शेतीला पाणी शेणखताचा नेटका वापर
रासायनिक खतांचे "काटेकोर' वेळापत्रक आंतरमशागतीला विशेष महत्त्व

टोमॅटोचे अर्थशास्त्रही ठरले फायद्याचे एकूण व्यवस्थापनातून दोन एकर क्षेत्रातून आतापर्यंत 1900 क्रेट म्हणजे 41 टन 800 किलो म्हणजे एकरी 20 टन 900 किलो टोमॅटोचे उत्पादन मिळाले. प्रति क्रेट वजन सरासरी 22 किलो आहे. उत्पादन खर्च सुमारे 65 हजार रुपये आला. वाहतुकीसाठी 50 रुपये प्रति क्रेटप्रमाणे 95 हजार रुपये खर्च आला.
सुरत, अमरावती, नांदेड, परभणी ,जळगाव, औरंगाबाद व पुणे या प्रमुख बाजारपेठांत विक्री केली.

पहिल्या काढणीदरम्यान प्रति क्रेट 420 रुपये, मध्यावरील काढणीवेळी 300 रुपये, सद्य:स्थितीत 550 रुपये, तर सरासरी 350 रुपये प्रति क्रेट म्हणजे प्रति किलो 15 रुपये दर मिळाला.

एकरी तीन लाख 13 हजार पाचशे रुपये उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता एकरी दोन लाख 81 हजार रुपये उत्पन्न हाती आले. एकूण क्षेत्रात अजून दीड महिना काही क्रेट उत्पादन हाती लागेल.

यापूर्वीचे उत्पादन थोडक्‍यात असे सन 2010एकरी 1200 क्रेट उत्पादन
2011पावणेदोन एकर क्षेत्र - 1600 ते 1800 क्रेट
2012दीड एकर - 800 क्रेटसंदर्भ # सकाळ अग्रोवन 

अडचणींचा डोंगर सारण्यास रेशीम शेतीने दाखवला मार्ग

घनसावंगी (जि. जालना) येथील देवनाथ जाधव यांच्याकडे 15 एकर शेती आहे. त्यांनी अन्य लोकांच्या उदाहरण पाहून सन 2004 मध्ये 1000 डाळिंब झाडांची लागवड केली होती. ही जमीन भारी असल्याने ताणावर येण्यात अडचणी येऊ लागल्या. तसेच देवनाथ आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांनी गावाच्या व तालुक्‍यातील राजकारणात सरपंचापासून सभापतिपदापर्यंत विविध पदे भूषविली आहेत. या राजकारणाच्या व्यापातून शेतीकडे काहीसे दुर्लक्ष झाले. परिणामी, 2010 मध्ये बाग काढून टाकावी लागली. त्यानंतर तीन एकर क्षेत्रांवर उसाची लागवड केली. मात्र 2011 मधील दुष्काळी परिस्थितीमध्ये विहिरीचे पाणी कमी पडल्याने एकरी चाळीस टनांचे उत्पादन मिळाले. मग कमी पाण्यात व कमी खर्चात काय करता येईल, याचा शोध घेण्यास सुरवात केली. तालुक्‍यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील शेतकरी संतोष वराडे व श्रीपत धामणगाव येथील सुनील शिंदे, अरुण पवार हे शेतकरी अनेक वर्षांपासून रेशीम शेती करून चांगले उत्पादन मिळवत असल्याचे कळले. त्यांच्या व अन्य शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन तुती लागवडीविषयी जाणून घेतली. "ऍग्रोवन'मधील रेशीम शेतीवरील लेखमाला व यशोगाथांतून अधिक प्रेरणा मिळाली. रेशीम शेती करण्याचे निश्‍चित केले.

तुतीची लागवड जून 2013 मध्ये तीन एकर क्षेत्रांवर रेशीम शेतीची लागवड केली. तुतीचे बेणे तालुक्‍यातील श्रीपतधामणगाव व देवीदहेगाव येथून आणले. तीन ते चार डोळ्यांची काड्या एकरी सहा हजार प्रमाणे बुरशीनाशकाची प्रक्रिया करून दोन ओळींतील अंतर पाच फूट व दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवून लागवड केली. लागवडीपूर्वी नांगरट व मशागत करून एकरी चार ट्रॉल्या घरचे शेणखत टाकून घेतले. लागवडीनंतर या वर्षी सातत्याने पाऊस असल्याने तणांचे प्रमाण वाढल्याने दोन वेळा खुरपणी करावी लागली. 60 दिवसांत तुती लागवडीस कोंब फुटून किमान दीड ते दोन फुटांचे फुटवे तयार झाले. या शिवाय फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली. त्यामुळे तुतीचा पाला हिरवागार, लुसलुशीत व दर्जेदार मिळाला. एस. 1 या तुती वाणामध्ये रोगाला व दुष्काळी परिस्थितीला समाधान देण्याची क्षमता चांगली आहे. वाढीचा वेगही जास्त आहे. त्यामुळे खतांवरील खर्च कमी होतो. पाणीदेखील वाचते.

शेड व रॅक उभारणी - गांडूळ खतासाठीची दोन जुनी 30 फूट x 40 फूट आकाराची शेड तयार होती. पूर्वी या शेडसाठी दोन लाख खर्च झाला होता. त्यामध्ये अळी संगोपनासाठी पाच फूट रुंद व 30 फूट लांबीचे लोखंडी रॅक बनवून घेतले. त्यासाठी 40 हजार रुपये खर्च आला. बाजूने शेडिंग नेट व अन्य किरकोळ खर्च पाच हजारांपर्यंत झाला. तुती झाडांचा पाला योग्य प्रमाणात आल्यानंतर प्रथम 100 अंडीपुंज घेण्याचा निर्णय घेतला. 19 ऑक्‍टोबर रोजी 100 अंडीपुंजापासून तयार झालेल्या साधारण दहा दिवसांच्या 40 ते 50 हजार अळ्या शासनाच्या चॉकी सेंटरमधून आणल्या.

प्रत्यक्ष अळी संगोपनास सुरवात अळी संगोपनामध्ये खाद्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. अंडीपासून तयार झालेली अळी कोषांवर जाईपर्यंत चार वेळा कात टाकते. चॉकी सेंटरमध्ये त्यातील दोन वेळा कात टाकलेली असल्याने शेडमध्ये दोन वेळा कात टाकली. त्यानंतर अळी 24 ते 25 व्या दिवशी कोषावस्थेत पोचली. या अवस्थेसाठी तुती शेंड्यापासून हळूहळू खाद्य वाढविण्यात आले. प्रत्यक्षात शेडमध्ये तिसरी आणि चौथी कात पास झाल्यावर रोज सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता असा दोन वेळा तुती पाला पूर्ण फांदीच्या रूपात दिला. रेशीम अळी 25 व्या दिवशी रॅकवर चंद्रिका जाळी अंथरण्यात आली. दोन ते तीन दिवसांत संपूर्ण अळ्यांनी कोष निर्मिती केली. जाळीवर कोष तयार झाल्यानंतर दोन दिवसांत जाळ्यांवरील कोष चार महिला मजुराच्या साह्याने स्वच्छ करण्यात आले. शेडमधील निर्जंतुकीकरणासाठी पावडरचा वापर केला.

स्वतः गाठली परराज्यातील बाजारपेठ - 100 अंडीपुंजापासून 85 किलो कोष निर्मिती झाली. त्याची विक्री करण्यासाठी बंगलोर जवळील रामनगरम या शहरात रेशीम कोषाची बाजारपेठेमध्ये स्वतः कोष घेऊन विक्री केली. कोषाची प्रत चांगली असल्याने 35 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यानुसार 85 किलोस 30 हजार रुपये मिळाले. वाहतुकीसाठी दोन हजार रुपये खर्च झाला.
- अंडीपुंज खरेदीसाठी एक हजार रुपये झाला. अळी संगोपनासाठी मजुरीवर सहा हजार रुपये खर्च आला. निर्जंतुकीकरणासाठी व अन्य असा खर्च एक हजार रुपये झाला.
- तुती लागवडीसाठी नांगरट व मशागत दोन हजार रुपये, बेणे एकरी तीन हजार रुपये, लावणीसाठी मजुरी 2500 रुपये असा खर्च झाला. बागेमध्ये रोग व किडीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने फवारणीची गरज पडली नाही. एकदा लावलेली तुती बाग सुमारे 15 वर्षं टिकते. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च येणार नाही.
- पुढे तुतीपासून अधिक पाला मिळत जाणार असून, पुढील बॅचमध्ये 250 ते 300 अंडीपुजांचे संगोपन शक्‍य होईल. त्यातून प्रति बॅच 300 ते 400 किलो कोषांपर्यंत उत्पादन मिळू शकेल. योग्य नियोजनाअंती वर्षातून साधारणपणे पाच ते सहा बॅच घेता येऊ शकतात. कमी कालावधीत जाधव दांपत्यांच्या हाती समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे.
रेशीम शेतीसाठी तालुक्‍यातील शेतकरी संतोष वराडे व सुनील शिंदे, अरुण पवार यांच्यासह त्यासाठी जिल्हा रेशीम अधिकारी आहेरसाहेब, गायकवाडसाहेब यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

संपर्क - देवनाथ जाधव, 9421655290संदर्भ # सकाळ अग्रोवन 

मुक्त संचार गोठ्यातून म्हैसपालन केले फायदेशीर


सांगवी (बोरगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) येथील माधव गंगाधरराव गुंडुरे यांची अवघी वीस गुंठे शेती. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण असल्याने नोकरीची संधीही नाही. क्षेत्र कमी असल्याने त्यांनी उपजीविकेसाठी गावातच छोटेसे किराणा दुकान सुरू केले. उपलब्ध वीस गुंठे क्षेत्रावर पीक लागवड करण्यापेक्षा चार वर्षांपूर्वी गुंडुरे यांनी म्हैस पालन करण्याचे ठरविले. यासाठी कमी खर्चात चार म्हशींसाठी गोठा बांधला. नगर जिल्ह्यातील घोडेगाव बाजारातून त्यांनी एक जाफराबादी आणि एक मुऱ्हा म्हैस खरेदी केली. दुकान सांभाळतच म्हैसपालन सुरू केले. उर्वरित क्षेत्रात चारा पिकांची लागवड केली. त्यांच्या गावापासून दहा किलोमीटरवर देगलूर हे गाव आहे. तेथील लोकांशी संपर्क साधून दररोज 10 लिटर दुधाचे रतीब सुरू केले. दुधाच्या चांगल्या गुणवत्तेमुळे दरही चांगला मिळाला. दुधाला मागणी वाढू लागली. नफाही चांगला मिळू लागला. म्हशींचे व्यवस्थापन गुंडुरे स्वतः आणि त्यांचा मुलगा कृष्णार्जुन करू लागले. गेल्या चार वर्षांत हळूहळू पैसे जमवत गुंडुरे यांनी म्हशींची संख्या वाढविली. म्हशींची संख्या वाढू लागल्याने त्यांनी सगरोळी (जि. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रातील पशुतज्ज्ञांशी संपर्क साधून शास्त्रीय पद्धतीने मुक्त संचार गोठा बांधला.

मुक्त संचार पद्धतीने म्हशींचे व्यवस्थापन - 1) सध्या गुंडुरे यांच्याकडे तीन मुऱ्हा, एक जाफराबादी, एक पंढरपुरी व दोन मराठवाडी अशा एकूण सात म्हशी आहेत.
2) पूर्वी बांधलेल्या गोठ्याचा पुरेपूर उपयोग करीत गुंडुरे यांनी 25 फूट x 30 फूट जागेभोवती गॅबियन जाळी व लोखंडी अँगलचा उपयोग करून साडेचार फूट उंचीचे कुंपण तयार केले.
3) वैरणीसाठी लागणारी गव्हाण व पिण्याच्या पाण्याची टाकी मुक्त संचार गोठ्यात बांधली. हौदास नॉन रिटर्निंग व्हॉल्व्ह बसविला आहे, यामुळे टाकीत पाणी सतत उपलब्ध राहते. म्हशी गरजेनुसार पाणी पितात.
4) दूध काढण्याच्या वेळा (सकाळी व सायंकाळी) वगळता म्हशी गोठ्यात मोकळ्या फिरत असतात.
5) पहाटे पाच वाजता गोठ्यातील कामकाज सुरू होते. म्हशींना धुवून, गोठा साफ केला जातो. त्यानंतर दूधदोहन करताना म्हशींना खुराक दिला जातो. प्रति लिटर दुधामागे अर्धा किलो खुराक दिला जातो. खुराकामध्ये शेंगदाण्याची पेंड, सरकीची पेंड, मका, ज्वारी, हरभरा कुटार दिले जाते. दूध काढल्यानंतर म्हशी परत मुक्त गोठ्यात सोडल्या जातात.
6) एका म्हशीला दिवसभरासाठी सुमारे 30 किलो हिरवा चारा, सहा किलो वाळलेला चारा कुट्टी करून गव्हाणीत दिला जातो. त्यामुळे चारा वाया जात नाही, म्हशी गरजेनुसार चारा खातात.
7) म्हशींना मुक्त संचार गोठ्यात फिरण्यासाठी, पाणी पिणे, वैरण खाण्यासाठी आणि रवंथ करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. म्हशी शांत राहून जास्तीत जास्त रवंथ करतात. दिवसभर गोठ्याकडे कुणी जात नाही. जेवढ्या म्हशी शांतपणे रवंथ करतील, तेवढे दुधाचे उत्पादन चांगले मिळते. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने म्हशींना लसीकरण आणि रेतन केले जाते.
8) सायंकाळी सहानंतर पुन्हा म्हशी गोठ्यात घेऊन दूध काढले जाते. गुंडुरे म्हशींचे दूध काढताना गोठ्यात बासरीवादन, शहनाईवादन लावतात. त्यामुळे म्हशी शांत राहतात, दूध काढताना त्रास देत नाहीत, असा त्यांचा अनुभव आहे.
9) सध्या सात पैकी तीन म्हशी दुधात आहेत. बाकीच्या गाभण आहेत. एक जाफराबादी म्हैस दिवसाला 11 लिटर, मुऱ्हा म्हैस 12 लिटर आणि मराठवाडी म्हैस सात लिटर दूध देते. गुंडुरे यांचा मुलगा कृष्णार्जुन रोज सकाळी गाडीवरून देगलूर गावात तीस लिटर दुधाचे रतीब घालतो.
10) प्रति लिटर 50 रुपये दराने दूध विक्री केली जाते. दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने ग्राहकांकडून दुधाला कायम मागणी आहे. प्रति दिन दूध विक्रीतून त्यांना 1500 रुपये मिळतात. त्यातून चाऱ्याचा खर्च, गाडीसाठी पेट्रोल, स्वतःची मजुरी आणि इतर व्यवस्थापन खर्च साधारणपणे 700 रुपये होतो. खर्च वगळता रोज 800 रुपये नफा राहतो.
11) गुंडुरे दरवर्षी 10 ट्रॉली शेणखत विकतात. एक ट्रॉली 1400 रुपयाने विकली जाते. यंदाच्या वर्षी गुंडुरे यांनी गांडूळ खत उत्पादनाला सुरवात केली आहे.

पशुखाद्यात ऍझोलाचा केला समावेश - म्हशींच्या खुराकाचा खर्च कमी करण्यासाठी गुंडुरे यांनी ऍझोला उत्पादनास सुरवात केली आहे. त्यासाठी योग्य आकाराचे सहा वाफे तयार करून ऍझोलाचे उत्पादन घेतले जाते. याची तांत्रिक माहिती कृषी विज्ञान केंद्राकडून मिळाली. प्रत्येक म्हशीस रोज दोन किलो ऍझोला सकाळी खाद्यात मिसळून दिला जातो. यामुळे खनिज मिश्रणे व अंबोणावरील खर्च 25 टक्‍क्‍यांनी कमी झाला. तसेच दूध उत्पादनातही वाढ झाली.

चारा लागवडीचे नियोजन - म्हशींना पौष्टिक हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी गुंडुरे यांनी 18 गुंठे क्षेत्रात फुले यशवंत व फुले जयवंत या चारा पिकाची लागवड केली. गोठा धुतल्यानंतर वाहून जाणारे पाणी व मलमूत्र हे चारा पिकास दिले जाते. यामुळे चारा पिकाची चांगली वाढ होते. हिरव्या चाऱ्यामुळे म्हशींचे आरोग्य चांगले राहिले, दुग्धोत्पादन वाढले.

गोठ्याबाहेर दररोजचा कृषी सल्ला कृषी विज्ञान केंद्राद्वारे मोबाईलवरून पाठविण्यात येणाऱ्या कृषी सल्ल्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी गुंडुरे यांनी गोठ्याबाहेर "कृषी सल्ला' फलक लावला आहे. कृषी विज्ञान केंद्राचा कृषी व पशुपालनविषयक संदेश दररोज फलकावर लिहिला जातो.

मुक्त संचार गोठा फायद्याचा... 1) मुक्त संचार गोठ्यामुळे जनावरांना व्यायाम मिळतो. जनावरे मोकळी असल्याने गरजेनुसार चारा खातात, पाणी पितात. मजूर कमी लागतात. गोठा बांधणीचा खर्च कमी आहे.
2) या पद्धतीमुळे जनावरांना कासदाह, गोचिडांचा त्रास, खुरांच्या जखमा होत नाहीत. दुग्धोत्पादनात 10 टक्‍क्‍यांनी वाढ दिसून येते.
3) व्यायाम मिळाल्याने जनावरे नियमित माजावर येतात. गाभण राहतात. त्यांचे आरोग्य चांगले राहाते.

संपर्क -
माधव गुंडुरे - 9096424668.
डॉ. गजानन ढगे (पशुतज्ज्ञ) - 9423139923.

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ,(पशुवैद्यक शास्त्र) म्हणून कार्यरत आहेत)


संदर्भ # सकाळ अग्रोवन