Thursday, 27 February 2014

सहा महिने, सहा एकर, 300 टन वांगी, 72 लाख उत्पन्न, उस्मानाबादच्या शेतकऱ्याची यशोगाथा,

उस्मानाबाद: शेती म्हटलं की आपल्याकडे नाकं मुरडतात किंवा शेतीत काय मिळतं? शेती करुन काय फायदा? शेतमालाला भाव तरी मिळतो का? असे शेकडो प्रश्न विचारले जातात. अर्थात त्यातले काही बरोबरही आहेत. कारण आपल्या सरकारच्या धोरणामुळं शेतकरी शेतीपासून दुरावू लागला आहे. पण जर बाजारपेठेचा अंदाज घेऊन, पिकाचं योग्य नियोजन करुन आणि त्याचं दणकट मार्केटिंग केलं, तर काय होतं, हे दाखवून दिलंय तुळजापूर तालुक्यातील मोर्टा गावच्या शेतकऱ्यानं. त्यांचं नाव आहे सत्यवान सुरवसे.

सहा एकरात, सहा महिने पिकवलेल्या वांग्यानं त्यांना ७२ लाख रुपये मिळवून दिले आहेत.

दोन वर्षांपूर्वी दुष्काळानं त्यांच्या जमिनीला भेगा पाडल्या. तुळजापुरातल्या मोर्टा गावच्या सत्यवान सुरवसेंनी आपली 12 एकरवरची द्राक्षबाग भुईसपाट केली. वाटलं सगळं काही संपलं. पण दृष्टांत व्हावा असं काही तरी झालं आणि सत्यवान यांच्यावर दुष्काळात पैशाचा पाऊस पडला. द्राक्ष बागा मोडल्या पण बागेच्या अँगलनं वांग्याला आधार दिला. आणि वांग्यानं सुरवसेंना.

6 एकरात मोठ्या जिद्दीनं वांग्याची रोपं लावली. घरातला प्रत्येकजण शिवारात राबू लागला. आणि 2 महिन्यांनी पहिलं फळ हाती आलं. वांगं... तेही छोट्या फणसाएवढं किंवा दुधी भोपळ्याएवढं. 6 महिने, 6 एकर, 300 टन वांगी आणि उत्पन्न तब्बल 72 लाख रुपये.

आतापर्यंत 7 एकरच्या मालकीण असलेल्या सुरवसेताई थेट 95 एकरच्या मालकीण झाल्या आहेत.

पण ही काही लॉटरी नव्हती. त्यामागे होते अपार कष्ट.  कारण इथे ना पाणी होतं, ना काळी जमीन.

फक्त पीक घेणं हे आव्हान नव्हतं, तर इतक्या पिकाला मार्केटही मिळायला हवं. म्हणून सुरवसेंनी थेट हैदराबादची बाजारपेठ गाठली. लग्नसराई साधली आणि मग काय 72 लाखांचा पाऊस.

सत्यवान सुरवसे फक्त दहावी पास आहेत. पण या अवलियानं खडकाळ जमिनीत सोनं पिकवलं. आज त्यांच्याकडे गाडी आहे. बंगला आहे. जमीन जुमला आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेचं अनुकरण आता अनेकजण करताहेत.

दुष्काळात रडणारे अनेक असतात. पण लढणारे कमी. दुष्काळाला पुरुन उरलेल्या या सत्यवानाच्या दर्शनासाठी आता राज्यभरातून लोक येत आहेत. शेतीचं वांगं कसं करायचं हे अनेकांना कळतं. पण वांग्याची शेती करावी तर ती सुरवसेंनीच.
30 गुंठ्यात ‘आलं’ पीक 15 लाखाचं, बीडच्या बळीराजाची यशोगाथा

बीड: आल्याच्या पिकापासून शाश्वत उत्पन्न मिळतं. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कृष्णा पवार गेल्या चार वर्षापासून आल्याची शेती करत आहेत. सध्या त्यांच्याकडं ३० गुंठ्यात आल्याचं पीक आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार ते आल्याचं पीक घेतात. त्यामुळे त्यांना पैसेही चांगले मिळत आहेत.

उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावते. पण ज्या शेतकऱ्यांकडं उन्हाळ्यात पाणी उपलब्ध आहे. त्यांना मात्र त्याचा चांगला फायदा होतो. कृष्णा पवार हेही त्यातीलच एक. केज तालुक्यातल्या पवारवाडीचे ते रहिवासी असून त्यांच्याकडं पाच एकर शेती आहे. त्यामध्ये ते पारंपरिक पिकांबरोबरच भाजीपाल्याची शेती करतात.

उन्हाळ्यात त्यांच्याकडं दोन एकराला पुरेल एवढं पाणी आसतं. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर आणि उत्पन्नवाढीसाठी ते गेल्या चार वर्षापासून अद्रक शेती करत आहेत. पारंपरिक पद्धतीनं शेती करत असल्यानं त्यांना उत्पादनही कमी मिळत होतं. त्यामुळे गेल्या वर्षी त्यांनी सुधारित पद्धतीनं अद्रक शेती करण्याचा निर्णय घेतला आणि मे मध्ये ३० गुंठ्यात बेडपद्धतीनं अद्रक लागवड केली.

कृष्णा पवार यांनी बेडवर ५ बाय १.५ फुटावर अद्रकाची लागवड केली. ३० गुंठ्यासाठी त्यांना ३ क्विंटल बियाणं लागलं.  सेंद्रीय पद्धतीनं शेती करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. लागवडीपूर्वी ८ ट्रॉली शेणखत शेतात मिसळून त्यांनी अद्रक लागवड केली. पीक एक महिन्याचं झाल्यानंतर त्यांनी डीएपी,२०,२०,२० आणि १३,४०,१३ या खताचा डोस दिला.

खत आणि पाण्यासाठी ते ठिबकचा वापर करतात. त्यांच्याकडं दोन बोअऱ असून रोज ते ठिबकनं दोन तास पाणी देतात. बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी अकरा फवारण्या केल्या. गरजेनुसार आंतरमशागत करुन त्यांनी वेळीच तण नियंत्रण केलं.

जानेवारीमध्ये कृष्णा पवार यांनी अद्रकाची काढणी सुरु केली. आतापर्यंत त्यांना १० गुंठ्यापासून ५.७ टन उत्पादन मिळालंय. लातूर, परभणी आणि बीडच्या बाजारात ते अद्रकाची विक्री करतात. सरासरी ७० हजार रुपये टनानं त्यांना आतापर्यंत ४ लाख रुपये उत्पन्न मिळालंय. २० गुंठ्यापासून अजून त्यांना १२ टन उत्पादन अपेक्षित आहे. दोन टन अद्रकाची त्यांनी बेण्यासाठी १ लाख रुपये टनानं विक्री केली. त्यातून त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. यंदा बाजारात अद्रक कमी आहे. त्यामुळे येत्या काळात सरासरी १ लाख रुपये टनाचा दर त्यांना अपेक्षित आहे. म्हणजेच दहा टनापासून त्यांना दहा लाख रुपये मिळणार आहेत. पूर्णं हंगामात ३० गुंठ्यापासून त्यांना १६ लाख रुपये मिळणार आहेत. १ लाखाचा उत्पादन खर्च वजा करता त्यांना १५ लाखाचं निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे.

मे महिन्यात अद्रकाची लागवड केली जाते. पण याच काळात अनेक शेतकऱ्यांना पाण्याची कमरतता भासते. त्यामुळे फारच थोडे शेतकरी अद्रक शेती करतता. हेच मार्केट ओळखून कृष्णा पवार गेली चार वर्षापासून अद्रक शेती करत आहेत. त्यापासून त्यांना पैसेही चांगले मिळत आहेत. बाजरपेठ आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यानंच हे शक्य झाल्याचं ते सांगतात.